दहा रुपयांची सत्ता

पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला. आपल्याच देशात वावरतानासुद्धा पैशांची किंमत अनेक वेळा बदलत जाते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. माझा तरी कोठे होता विश्वास?

उत्तर प्रदेशातील चित्रकूट भागात पहिल्यांदा गेले, तेव्हा राहण्याच्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणी रोज ये-जा कशा पद्धतीने करायची हा प्रश्न उपस्थित झाला. चित्रकूट तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने रस्त्यांवर गर्दी भरपूर, पण माणस तिथे क्वचितच एकटी येतात. माझ राहण्याच ठिकाण आणि कामाच ठिकाण यात किमान पंधरा किलोमीटरच अंतर असल्याने रोजचा प्रवास अटळ होता.

इतकी गर्दी या शहरात असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मात्र काहीच पत्ता नाही. लोकांनी आपली आपली काय ती व्यवस्था लावून घ्यावी, त्यातून जे काही हितसंबंध निर्माण होतील, त्यातून आपल्या बळावर मार्ग काढावा असं बहुधा शासनाच्या मनात असावं. लोकांनी पण याचा आनंदाने स्वीकार केला असावा असं दिसतं. कारण जिकडे तिकडे खांद्यावर बंदूक लटकवून लोक - म्हणजे पुरूषवर्ग - रोजच्या व्यवहारात मग्न असतात. बंदूक घेऊन चहा पीत बसलेले पुरूष, एका हातात बंदूक धरून एकमेकांना टाळी देत मनसोक्त हसणारे पुरूष , हे इथलं अगदी नेहमीचचं दृश्य!

असल्या असुरक्षित वातावरणाची मला सवय नसेल असं वाटून तिथेले माझे सहकारी माझी फार काळजी घ्यायचे. सकाळी घ्यायला यायचे, संध्याकाळी सोडायला यायचे. पण तीस किलोमीटरचा फेरा म्हणजे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय असं मला सारखं वाटायला लागलं. तोवर खूप वेळा जाऊन माझ तिथलं पाहुणेपणही संपुष्टात आलं होतं.

मग पर्याय निघाला सहा आसनी रिक्षांचा. अर्थात सहा आसनी हे केवळ म्हणण्यापुरतं झालं. या रिक्षात कमीत कमी पंधरा प्रवासी भरायचे, असा तिथला अलिखित नियम. एवढ्या गर्दीत विड्या, दारू, गुटखा यांचे वास अंगावर घेत प्रवास करणं जिवावर यायचं. कितीही अंग चोरून बसलं तरी सहप्रवाशांचे आगंतुक स्पर्श झेलावे लागायचेच. हे सगळं करून मी कामाच्या जागी थेट पोचायचे नाही. त्यासाठी पुन्हा काही अंतर सायकलरिक्षाने काटावं लागायचं. संपूर्ण अंतर सायकलरिक्षाने एकदा गेले, तर भरपूर वेळ लागला. शिवाय सायकलरिक्षावाल्याला लागलेला दम पाहून मला अपराधीपण आलं.

स्थानिक प्रवासाच्या या प्रश्नावर उत्तर शोधण्याची मनाची नकळत बरीच धावपळ चालली असणार यात काहीच शंका नाही. एका सकाळी एका रिक्षावाल्या माणसाला मी धीर करून विचारलं, "पुढे तुम्ही किती माणसं बसवता?" त्याने जरा चमत्कारिक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, "आहे ना जागा, बसून घ्या." तरी पण मी तोच प्रश्न विचारल्यावर त्याने "तीन" असं उत्तर दिलं. प्रवासी फारसे नसल्यामुळे त्याला थोडा मोकळा वेळ होता. मला कुठे जायच आहे याची त्याने विचारणा केली. "पाच रूपये सीट, पाच रूपये सीट" असं ओरडत तो आणखी प्रवासी शोधू लागला.

मी त्याला म्हटलं, "मी पुढे बसते. मी तुम्हाला तीन प्रवाशांचे पैसे देते. तुम्ही कोणालाही पुढे बसवू नका." तो चांगल्यापैकी गोंधळला होता. तीन- चार लोकांनी मिळून प्रवास केला तर वाद घालून कमी पैसे द्यायची इथली पद्धत. अशा स्थितीत कोणी एकटंच प्रवास करून तीन लोकांचे पैसे द्यायला का तयार होतं आहे, हे त्याला समजत नव्हतं. माझा हिशोब सोपा होता. दहा रूपये खर्च करून मी माझी सोय बघत होते. पण त्या भागात दिवसभराचा खर्च भागविण्यासाठी दहा रूपये जवळ असणं ही चैनीची परिसीमा आहे. अशा वेळी कोणी दहा रूपये असे हकनाक कशाला उडवेल?

बराच वेळ मी त्याला तेच सांगत होते आणि तो नुसताच हसून दुर्लक्ष करत होता. मी त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विश्रामगृहात राहत होते. मी बराच वेळ रिक्षावाल्याशी बोलतेय हे पाहिल्यावर तिथला एक कर्मचारी धावत माझी मदत करायला आला. त्याने मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं, "मुंबईच्या आहेत मॅडम."

स्वत:च्या सोयीसाठी दहा रूपये खर्च करणं म्हणजे फार मोठी चैन झाली तिथल्या हिशोबाने. सहा आसनी रिक्षात मी पुढच्या सीटवर एकटीने बसून केलेला प्रवास हा लोकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय झाला. दर दोन मिनिटांनी रिक्षा प्रवाशांसाठी थांबायची. पुढे मोकळ्या दोन जागा पाहून प्रवासी ऐटीत पुढे यायचे आणि रिक्षावाला त्यांना मागे जायला सांगायचा. पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है".

मग हे नेहमीचचं झालं. रिक्षावाल्यांना पण ही व्यवस्था सोयीची होती, कारण त्यांना दोन प्रवासी कमी शोधायला लागायचे. एखाद्या रिक्षात पुढे कोणी प्रवासी बसले असतील तर त्यांना उठवू नका, अशी मी रिक्षावाल्यांना विनंती करायचे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा दहा रूपये जास्त आहेत, हा केवळ सुदैवाचा भाग आहे याची मला जाणीव होती.

मी दूरवर दिसले की ते पुढे बसलेल्या प्रवाशांना मागे बसवायचे. कधीच कोणा प्रवाशाने " मी उठणार नाही, त्यांच्याकडे पैसे जास्त असले म्हणून काय झालं?" असं प्रत्युत्तर दिलं नाही. "एवढी पैशांची मस्ती असेल तर स्वतःची गाडी घेऊन हिंडा" असा अनाहूत सल्लाही मला कोणी दिला नाही.

चार साडेचार वर्षांच्या काळात किमान पंचवीस वेळा मी चित्रकूटला गेले असेन, त्या सगळ्या काळात स्थानिक प्रवास मी असाच केला. दहा रूपयांत घेता येईल तितकं सुख विकत घेण्याचा मी प्रयत्न केला.

मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले. ते तर मला मिळालच,पण त्याचबरोबर मिळाली दहा रूपयांची सत्तादेखील! ही काही अनिर्बंध सत्ता नव्हती, पण ती ठोस होती.

पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो, यावर पण ती अवलंबून असते तर! पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? एकदा इतर व्यक्तींच्या मापाने आपण आपल्याला तोलायला लागलो की सुख आणि समाधान हाती लागण्याची शक्यता दुरावणारच....पैसा कितीही असला तरी! म्हणून आपल्यावर पैशांची सता चालणार की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं ---- कितीही कठीण असलं तरी!

पूर्वप्रसिद्धी:

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

प्रत्येकवेळी पैसा हीच सत्ता असेही समिकरण जुळत नाही. मुजोरी कुठूनही येते. कदाचित मनगटातली रग, हातातली बंदूक यांच्यावरही ती अवलंबून असते.

मुद्दा तो नाही पण....
" मी उठणार नाही, त्यांच्याकडे पैसे जास्त असले म्हणून काय झालं?" असं प्रत्युत्तर दिलं नाही.

तुम्ही नशीबवान आहात. रेल्वेचे रिझर्वेशन करून उत्तर प्रदेशात फिरायला गेलेल्या माझ्या आई-वडिलांना , " असेल रिझर्वेशन, मग काय झाले? आम्ही बसलोय ना इथे? काय करायचंय ते करा" अशी उत्तरे ऐकायला मिळाली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही नशीबवान आहात. रेल्वेचे रिझर्वेशन करून उत्तर प्रदेशात फिरायला गेलेल्या माझ्या आई-वडिलांना , " असेल रिझर्वेशन, मग काय झाले? आम्ही बसलोय ना इथे? काय करायचंय ते करा" अशी उत्तरे ऐकायला मिळाली होती.

सहमत आहे विसुनाना. उत्तरेकडे असेच अनुभव लोकांना बर्‍याचदा अनुभवायला मिळतात.
मी स्वतः अनुभव घेतला आहे हा. पण मी सडा होतो व जागा मिळवली देखील.
पण माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला हा अनुभव फॅमिली बरोबर असताना आला होता. त्यावेळी टीसी ला सांगूनही टीसीने हात वर केले होते. सुदैवाने त्यावेळी माझा एक दणकट भाऊ त्यांच्याबरोबर होता त्याने शेवटी त्या टग्या लोकांचे बखोटे पकडून गाडीबाहेर प्लॅटफॉर्मवर फेकून दिले.

सविताताई असे चांगले अनुभव तुम्हाला येतात याबद्दल तुम्ही खरेच खूप नशीबवान आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही नशीबवान आहात. रेल्वेचे रिझर्वेशन करून उत्तर प्रदेशात फिरायला गेलेल्या माझ्या आई-वडिलांना , " असेल रिझर्वेशन, मग काय झाले? आम्ही बसलोय ना इथे? काय करायचंय ते करा" अशी उत्तरे ऐकायला मिळाली होती.

गाडी लांब पल्ल्याची की छोट्या पल्ल्याची? रिझर्वेशन सीटचे की बर्थचे?

कारण, रेल्वेच्या नियमांप्रमाणे, लांब पल्ल्याच्या गाडीतील बर्थचे रिझर्वेशन हे फक्त रात्रीच्या प्रवासापुरतेच लागू असते. दिवसा त्या जागेवर (बाकाची क्षमता पूर्ण होईपर्यंत) येणार्‍याजाणार्‍या कोणाही अतिरिक्त (अनारक्षित) प्रवाशाला(सुद्धा) जागा करून द्यावी लागते. (३ टियर ब्रॉडगेजमध्ये कूपेच्या प्यासेजशेजारच्या मोठ्या भागात ३ + ३ अधिक छोट्या भागात कडेला २ असे एकूण ८ स्लीपर बर्थ म्हणजे ८ जणांची झोपायची जागा असते. मात्र, खालच्या टियरवरच्या बाकांवर १० जण बसू शकतात. म्हणजे एका कूपेमध्ये रात्री जेवढे प्रवासी झोपू शकतात, त्यापेक्षा २ अधिक प्रवासी दिवसा कूपेमध्ये बसू शकतात. त्यामुळे, रेल्वेच्या नियमांप्रमाणे, प्रत्येक कूपेमागे २ अनारक्षित प्रवाशांना दिवसाचे वेळी बसू द्यावे लागते.)

टीसी (बहुधा) रात्री ८ पर्यंत (नक्की कटऑफ टाइम याक्षणी आठवत नाही.) याबद्दल काहीही करू शकत नाही. कारण दिवसाचे वेळी तुमच्या रिझर्वेशनमुळे तुम्हाला त्या बाकावर बसण्याचे एक्स्क्लूज़िव हक्क नसतात. (तुम्हाला बसायचा हक्क असतो, परंतु तुम्हाला जागा मिळते आहे तोपर्यंत अतिरिक्त प्रवासी बसल्यास त्यांना नाकारण्याचा हक्क तुमच्या रिझर्वेशनमुळे दिवसाच्या वेळेपुरता तुम्हाला प्राप्त होत नाही. अपवाद बहुधा राजधानीसारख्या 'खास', पूर्ण आरक्षित गाड्यांचा.) पण रात्री ८नंतर (किंवा जो काही कटऑफ टाइम असेल त्यानंतर) मात्र (केवळ रात्रीच्या प्रवासापुरता) तुमच्या बर्थवर तुमचा संपूर्ण हक्क असतो, आणि त्याची अंमलबजावणी टीसी करू शकतो (आणि सहसा करतो, असा अनुभव आहे).

(डिस्क्लेमरः माझी माहिती (/ अनुभव) माझ्या विद्यार्थिदशेच्या काळातली, म्हणजे सुमारे पंचवीसएक वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर या नियमांत काही बदल झाले असल्यास चूभूद्याघ्या. पण तशी शक्यता कमीच वाटते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेल्वेचे बाकीचे नियम काहीही असोत हो, पण ज्याचे रिझर्वेशन आहे त्याला निदान बसायला तरी मिळण्याचा हक्क आहे की नाही? की 'अगोदर बसेल त्याची जागा'?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याचे रिझर्वेशन आहे त्याला निदान बसायला तरी मिळण्याचा हक्क आहे की नाही? की 'अगोदर बसेल त्याची जागा'?

भारतीय रेल्वेच्या आरक्षणाच्या संकेतस्थळावर येथे पुढीलप्रमाणे (नेमका) नियम सापडला:

When berths are reserved for passengers, the intention is to provide sleeping accommodation between 9 PM to 6 AM. During 6 AM to 9 PM, the passengers concerned, if required make room for other passengers in compartment up to its carrying capacity.

याचाच अर्थ, बर्थच्या आरक्षणाचा उद्देश फक्त रात्रीचे वेळी झोपण्याकरिता हक्काची एक ठराविक जागा तुम्हाला पुरवण्याचा आहे. दिवसाचे वेळी बसण्याची हक्काची एक ठराविक जागा पुरवणे हे बर्थच्या आरक्षणामागील उद्दिष्टही नाही आणि त्या आरक्षणात ते आपोआप अंतर्भूतही नाही. हं, आता त्या डब्यात तुमचे हक्काचे रात्रीचे रिझर्वेशन आहे आणि तुमचा प्रवास रात्रीपुरता मर्यादित नाही, म्हटल्यावर त्या डब्यात / शक्यतो त्या कूपेमध्ये बसायला मिळण्याचा (किंवा तशा अपेक्षेचा) हक्क तुम्हाला निश्चितच आहे. परंतु नियमांवर / बर्थच्या आरक्षणाकडे बोट दाखवून एका विशिष्ट जागेवर तो हक्क तुम्ही बजावू शकत नाही.

थोडक्यात, सहप्रवाशांशी सामोपचाराने / विनंती करून तुम्ही त्या कूपेत कोठेतरी बसायला मिळण्याचा तुमचा हक्क तुम्ही मिळवू शकता. मात्र, नियमांवर (किंवा आरक्षणाकडे) बोट दाखवून कोणत्याही अमूक एका जागेवर तुम्ही हक्क बजावू शकत नाही. म्हणजेच, कोणत्याही ठराविक एका जागेपुरते बोलायचे तर 'अगोदर बसेल त्याची जागा' हेच तत्त्व (त्या कूपेत बसण्याकरिता कोठलीतरी एक जागा तुम्हाला मिळण्याच्या तुमच्या हक्काच्या बावजूद) लागू होते. 'येथे आमचे बर्थचे आरक्षण आहे; कृपया जरा थोडे सरकून आम्हाला बसण्यापुरती जागा करून देता का?' अशी विनंती तुम्ही निश्चितच करू शकता, आणि शक्य तोवर अशा विनंतीला (विशेषतः या विशिष्ट परिस्थितीसारख्या परिस्थितीत उतारूच्या वयाकडे पाहून) मानही मिळू शकतो, परंतु 'ही आमची जागा आहे' या तत्त्वास धरून जागेची मागणी केल्यास त्यास 'आम्ही आधीपासून येथे बसलो आहोत, काय करायचे ते करा' असे जर उत्तर मिळाले, तर त्याबद्दल आश्चर्यही वाटून घेऊ नये आणि त्याबद्दल कायद्याने काही करता येण्याची फारशी तरतूदही नसावी. कारण, माफ करा, पण (दिवसाच्या प्रवासापुरती) ती 'तुमची जागा' नाही. तुमचा हक्क 'तेथेच कोठेतरी बसायला मिळण्या(च्या अपेक्षे)'पुरता मर्यादित आहे, आणि 'एका विशिष्ट जागे'च्या नियुक्तीअभावी तो कायद्याने अंमलबजावणी करता येण्यायोग्य नाही.

(अवांतरः ही अडचण बहुधा निम्नतम वर्गाच्या बिगरवातानुकूलित आरक्षित शयनयानांपुरती मर्यादित असावी. वातानुकूलित / निम्नतमेतर वर्गात ही अडचण सहसा येऊ नये, असा अंदाज आहे. तेव्हा, ही अडचण टाळायची असेल, तर एक तर 'जावा की फस्किलासात', नाही तर मग 'आपस में मिटा लो, यार'. तिसरा (कायदेशीररीत्या अथवा नियमांनुसार) उपाय नाही.)

(अतिअवांतरः 'बर्थच्या आरक्षणाद्वारे संपूर्ण प्रवासभर आपल्याला हक्काची जागा असते' अशी माझीही एके काळी (भाबडी मध्यमवर्गीय) समजूत होती. अनुभवाअंती ती गळून पडली - Learned it the hard way म्हणा ना! असो. हे नियम रेल्वे वेळापत्रकात छापलेले असतात. आपल्यापैकी बहुतेक जण ते वाचण्याची तसदी घेत नाहीत, आणि माहितीअभावी 'आपल्या हक्कां'बद्दल आपल्या अवास्तव/चमत्कारिक कल्पना असतात. असो चालायचेच. रेल्वेप्रवासात याच मुद्द्यावरून दोन सहप्रवाशांचे भांडण चाललेले असता त्यात हा मुद्दा निघाल्याने कुतूहलाने, ही नेमकी भानगड आहे तरी काय, हे पहावे, म्हणून मजजवळच्या रेल्वे वेळापत्रकात सहज नियम चाळले म्हणून ही माहिती मिळाली. नाहीतर मी तरी कशाला झक मारायला रेल्वे वेळापत्रकातील नियम वाचायला जात होतो? असो. प्रवासातूनही शिक्षण होते, ते असे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'वी बाजू, रेल्वे आरक्षणाबाबत सविस्तर माहिती मिळाली तुमच्या प्रतिसादातून. आभार.

अनेकदा एखाद्या समुहाबद्दल, गटाबद्दल, राज्याबद्दल आपल्या मनात एक प्रतिमा असते अनुभवातून (वाचून, ऐकून इत्यादीही) तयार झालेली. ती प्रतिमा गृहित धरून आपण समोरच्याशी व्यवहार करायला जातो असे बरेचदा घडते. म्हणजे उत्तरेतले लोक आक्रमक आहेत, त्यांना नियमांची चाड नाही (हे खरे असेलही अनेकदा, पण नेहमीच खरे असेल असे नाही ही शक्यता राहतेच) असे आपल्या मनात असते. माझे अनेक उत्तर भारतीय परिचित आणि स्नेही (उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांतले लोक) 'महाराष्ट्रीयन लोक उद्धट आणि स्वतःला शहाणे समजणारे आहेत' असे मानतात. ते नेहमीच खरे असते असे नाही - पण ती एक प्रतिमा आहे. अशी प्रतिमा तयार होण्यातून पण एक प्रकारचा 'सत्तासंबंध' प्रत्यक्ष व्यवहार होण्याच्या आधीच निर्माण होतो आपल्या मनात असाही माझा अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का?

अहा!
केवळ 'अहा!' वाक्य आहे Smile
सत्ता पैशानीच मिळाली पाहिजे असे नाही वर विसूनाना म्हणतात त्याप्रमाणे कशीही मिळालेली असो मात्र पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? हा मूलभूत प्रश्न आहे.

With great powers come greater responsibilities हे एकविसाव्या शतकतील सुपरहिरोचं वाक्य जाणवायला फार 'पॉवर' असावी लागत नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याकडली 'पॉवर' आपण अनेकदा दाखवून देत असतो. कित्येकदा याचा संकोचही वाटतो मात्र सत्ता गाजवायची दरवेळी उर्मी टळतेच असे नाही. निसर्गात 'बळी तो कान पिळी' नियम असताना 'बलवान असूनही सत्ता गाजवावी का?' असा विचार करावासा वाटणे यातच 'माणूस'पण दडले आहे असे वाटते.

<वरचे विस्कळीत विचार लाऊड थिंकिंग समजून दरम्यानच्या मोकळ्या जागा समजून घ्याव्यात>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुरेख आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुरेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

प्रसंग अन परीक्षण यांचे चित्रण आवडले. बाकी सहप्रवाशांच्या सहकार्याबद्दल साश्चर्य कौतुक वाटले ! आमच्याकडेहि 'वडाप' आहे. पण दहाच काय, शंभर रुपये दिले तरी असली 'सत्ता' चालत नाही. चालकालाही अन प्रवाशांनाही ! पश्चिम महाराश्ट्रातल्या सुबत्तेचा परिणाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार विसुनाना, सागर, ऋषिकेश, मेघना, वि. अदिती आणि स्नेहांकिता.

तिथल्या सहप्रवाशांचे 'सहकार्य' आश्चर्यकारक आहे हे विसुनाना, सागर आणि स्नेहांकिता यांचे मत मान्य आहे. पण छोटे गाव आणि मोठे गाव; स्थानिक माणसं आणि बाहेरची माणसं; बदलणारा काळ, बाहेरच्या जगाशी आलेला संपर्क असे अनेक पैलू या अनुभवाला कारणीभूत असतील. आणि तुम्ही तिघांनी म्हटले त्याप्रमाणे कदाचित मी नशीबबान असेन (आहे) ही शक्यताही आहेच.

ऋषिकेश, माणूसपणाचा शोध सत्तेच्या संदर्भात कदाचित अधिक स्पष्टपणे घेता येतो का? मलाही असे वाटते खरे कधीकधी. कधीकधी अशा अर्थाने की सत्ता नसतानाही माणुसकी असतेच - पण ती गृहित धरली जाते आणि सत्ता नसणे हे तिचे कारण समजले जाऊ शकते. आणि सत्ता असणारी व्यक्ती थोडी जरी नॉर्मल वागली तरी तिचे कौतुक आपण करतो - त्यात सत्तेचा उद्दामपणा गृहित असतो एका अर्थी. सत्तेकडे पाहण्याची आपली नजर कसकशी तयार होत जाते हा एक विचार करण्याचा मोठा विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्तेकडे पाहण्याची आपली नजर कसकशी तयार होत जाते हा एक विचार करण्याचा मोठा विषय आहे

खरं आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीचा मुळ/खरा स्वभाव माहित करून घ्यायचाय तर त्या व्यक्तीला सत्ता/शक्ती (पॉवर) द्या असे म्हटले जाते ते अनेकदा पटते.

बाकी यावर/यामुळे एखादा चिंतनात्मक लेख किंवा इतरांची चिंतनात्मक मते वाचायला आवडतीलच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश, एखाद्या व्यक्तीला सत्ता देऊन बघा हे जसं असत; तसंच एखाद्या व्यक्तीची सत्ता काढून बघा असंही असत. म्हणजे नेहमीची सोडून एखादी वेगळी परिस्थिती उद्भवली की माणूस कसा वागतो - विशेषतः अनपेक्षित आणि विपरीत परिस्थितीत कसा वागतो यावरून माणसाचा स्वभाव कळू शकतो असं म्हणतात.

'सत्तेकडे पाहण्याची आपली नजर/ समज कशी तयार होते' यावर कोणी काही लिहिलं, तर मलाही जरुर वाचायला आवडेल. तुम्हीच का नाही सुरुवात करत? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्यक्षातल्या सत्तेबद्दल माहित नाही. पण नेहेमीचं काम करायच्या हातातल्या कंप्यूटरवर संपूर्ण अधिकार नसले की फार चिडचिड होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान.

बाजारभावापेक्षा अधिक पैसे देऊन, हुज्जत टळल्यामुळे मी कधीकधी "वेळ" विकत घेतो. बाजाराच्या दृष्टीने हा मुजोरपणा होतो काय? त्यामुळे अन्य लोकांसाठी बाजारभाव चढतो काय? अशा प्रकारची चिंता मी कधीकधी करतो. त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय, अधिक किंमत मोजून आपण काही (सोय, वेळ, आराम) विकत घेत असू तर त्याला मुजोरपणा म्हणायचं की नाही हे मलाही माहिती नाही. साधारणपणे मी त्याला मुजोरपणा न म्हणता 'पैशांच्या सत्तेचा उपयोग' असं म्हणेन - पण हे अर्थात परिस्थितीनुसार बदलेल. म्हणजे भूकंप अथवा नैसर्गिक आपत्तीत केवळ माझ्याकडे जास्त पैसे आहेत म्हणून मी संकटस्थळापासून जास्त लवकर सुरक्षित स्थळी पोचू शकते असे असेल (जे आहेच ब-याच अंशी) तर तो बाजाराच्या दृष्टीने नाही पण माणूस या नात्याने मुजोरपणा होईल असे मला वाटते. किती मुजोरपणा क्षम्य आहे आणि कधी तो मर्यादा ओलंडतो हा माझ्याही दृष्टीने एक गोंधळाचा विषय आहे अद्याप. याला 'एक' उत्तर असेल असे अनुभवावरून वाटत नाही - आणि वेगवेगळी उत्तर बरेचदा विरोधाभासी असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0