... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फेण्या

फेण्या हा निव्वळ एक पदार्थ आहे अशी तुमची समजूत असेल तर ती आधी दूर करा. तो एक सांस्कृतिक उपक्रम आहे.

'बर्‍याच दिवसांत फेण्या नाही बा झाल्या...' अशा एखाद्या कुरकुरसदृश पुसट वाक्यानं त्याची सुरुवात होते. असल्या निरुपद्रवी वाक्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यावर संपूर्ण दुर्लक्ष करायचं असतं हे आकाशवाणी जाणून असल्यामुळे ते वाक्य हवेतच विरतं. कुरकुरवाक्याला जन्म देणारी बोरही बाभळीच्याच गावची असल्यामुळे ती अजिबात खचून जात नाही. रागरंग, वातावरणातला दाब, तापमान, हवामान, वार्‍याची दिशा, मूड, वेळवखत आणि आसमंतातून मिळू शकणारा पाठिंबा पाहून पुन्हा एकदा, पण या खेपेला थोड्या ठाम आवाजात, त्याच वाक्याची डिलिवरी केली जाते. "बरेच दिवसांत फेण्या नाही झाल्या." (या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. तरंगती तीन टिंबं नाहीत, प्लीज नोट.) टायमिंग जमून आलेलं असेल (घरातल्या सगळ्यांना रविवार सकाळ मोकळी असणे आणि अशी रविवार सकाळ बरोब्बर तीन-चार दिवसांच्या अंतरावर उभी असणे) तर वातावरणातून दुजोरा मिळतो आणि गाडी, 'किती तांदूळ भिजत टाकू?' या प्रश्नावर सरकते.

हा प्रश्न अत्यंत ट्रिकी आहे, लक्षात घ्या. फेण्यांच्या कार्यक्रमात नक्की कोण कोण कशा प्रकारची मदत करणार आहे, गिळायला कुणाकुणाला बोलावलं जाणार आहे, कधी नव्हे ते फेण्या वाळवण्याचा आचरटपणा आकाशवाणीच्या डोक्यात आलेला नाही ना, मंडळींचे डाएट प्लॅन्स कोणत्या टप्प्यावर आहेत, अशा अनेक उपप्रश्नांची उजळणी केल्यानंतर या प्रश्नाचं अचूक आणि सोईचं उत्तर सापडतं.

फेण्या वाळवायच्या असतील, तर प्रश्नच मिटला. मग त्या उपक्रमाला आपल्या दृष्टीनं तसाही काही अर्थ नसतो. म्हणजे वर्षात कधीतरी कुठल्यातरी संध्याकाळच्या बोअर आमटीभाताला टेकू म्हणून तळणाची तरतूद व्हावी; याकरता तांदूळ भिजवणं, धुणं, आंबवणं, वाटणं, ४ तास खर्चून त्याचे पापुद्रे शिजवणं आणि मग राखण वगैरे करून ते वाळवणं? कमॉन. याहून मी मेंदी सात वेळा गाळून घेऊन त्याचे कोन करीन आणि विकीन. मलमलीच्या फडक्यातून. त्यामुळे वाळवणाचा किडा कुणाला (कुणाला म्हणजे आकाशवाणीला. बाकी कुणी तितकं विकृत नाही. बाबांच्या माहेरून आलेल्या एका आजींनी एकदा 'हे काय? फेण्या वाळवाच्च्या नैत? नुसत्याच खायच्या?' असा प्रश्न विचारून स्वतःला ब्लॅकलिस्ट करून घेतलं होतं. त्यांना अत्यंत तुच्छ लुक देण्यात बाबा आघाडीवर असल्यामुळे आम्हांला त्यांचा आत्यंतिक अभिमान वाटला होता. असो.) चावला असेलच, तर तो तिथल्या तिथे ठेचावा लागतो. मग कुटुंबबाह्य असा पाचवा (वा अधिक) कोन रविवारी सकाळी उगवणार आहे(त) काय, याची सावध चौकशी. आपल्याला ओट्यापाशी उभं राहायला (हे 'ओट्यावर बैठक मारायला' असे वाचावे.) किती वेळ आहे, त्याचाही एक अंदाज. मग "३ किलो तरी तांदूळ टाक." इथून घासाघिशीला सुरुवात होते.

पुढे हे माप एका किलोवर घसरतं की वास्तववादी अशा दीड-दोन किलोंवर स्थिरावतं, हा तुमच्या आणि आकाशवाणीच्या बार्गेनिंग स्किल्सचा भाग आहे. मग तांदूळ भिजत पडल्याची खातरजमा करून घ्यायची आणि अधून मधून परमळणारा धान्य आंबल्याचा अनवट सुगंध अनुभवत रविवार सकाळीची वाट पाहायची, हा मोहक भाग वाटेत लागतो.

तांदूळ रोज रात्री चोळून चोळून धुवायचे असतात. पाणी बदलायचं असतं. तिसर्‍या रात्री ते गंधासारखे वाटायचे असतात. हे थोडे गद्य तपशील. विशेषतः वाटणाचा भाग. ते वाटताना मिक्सरच्या भांड्यात आधीच बरंच पाणी ठेवून चालत नाही. तसं केल्यास कण्या राहतात. तांदूळ आधी बारीक वाटून घेऊन मग त्यात हळूहळू पाणी घालायचं आणि प्रकरण गंधासारखं मऊ वाटून घ्यायचं. वाटतानाच मीठ घातलेलं उत्तम. मिक्सरच्या भांड्यावर फार लोड येता कामा नये, अशा बेतानं तांदूळ घालायचे. तसंच वाटणाच्या ४ ब्याच झाल्यानंतर थोडं थांबायलाही विसरायचं नाही. मिक्सर तापून रबर वितळलं आणि फेण्या बोंबलल्या असा अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. हे सगळं करताना अ‍ॅप्रन किंवा गेला बाजार जुना पंचा चढवायला विसरायचं नाही. वाटण झालं की त्याकडे एकदा धन्य होऊन बघायचं.

मग किमान अर्धा लीटर तरी दुधाला - सायीसकट - विरजण लावायचं. आणि निवांत ऑफलाईन (हे 'ऑनलाईन' असे वाचावे.) जायचं. घरातल्या इतर सदस्यांमध्येही उत्कंठा असल्यामुळे कुणीतरी फेण्यांचा साचा आणि पत्रे हुडकून, धुऊन-पुसून समोर काढून ठेवलेले असतात. रविवारी सकाळी साताच्या आसपास उठून स्वैपाकघरात दाखल व्हायचं, बस. तुम्ही एकटे नसताच.

फेण्यांमध्ये जिरं घालायचं की मिरची वाटून घालायची, पांढरे तीळ हवेत की नकोत, नुसत्या मिठाच्याच छान लागतात... असा काहीतरी खल चालू असतो. सोबतीला आयता चहा. रविवारचे पेपर. रंगोली. बहुतेकदा या वादात आपलं बहुमोल मत घेऊन उतरायची गरज नसते. तिळांची सरशी होते आणि साचे लागू लागतात. पाण्याच्या थेंबाच्या आकाराचा एक, असे सात पातळ पत्रे एका संचात असतात. हे पत्रे एकमेकांना न चिकटता वाफवता यावेत असा साचा असतो. या पत्र्यांवर प्रत्येकी एक डावभर पातळ पीठ सोडणे आणि पत्रा हातानं गोल फिरवून ते पीठ त्या पत्र्याला साऽरखं लिंपणे हा कौशल्याचा भाग आहे. हा थर कमीजास्त जाडीचा झाला तर फेणी पत्र्यापासून सोडवताना आयमाय काढायची वेळ येते. असे दोन संच हाताशी ठेवलेले असतात. एक संच भरून विनाशिट्टीच्या कुकरात (किंवा मोदकपात्रात) वाफवायला ठेवायचा आणि पाच-सात मिनिटं कशीतरी कळ काढायची.

त्याचं झाकण निघालं की घरदार - पाहुणे असतील तर पाहुणेही. सुरुवातीला काही मंद पाहुणे लाजतात. पण हळूहळू त्यांची भीड चेपते आणि फेण्यांचं आकर्षण जिंकतं. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. येतात मागाहून. - ओट्याशी गोळा होतं. पत्रे वाटून घेतले जातात. नवशिक्या लोकांना पत्र्यापासून फेणी सोडवायला दुसरा पत्रा, सुरी, चमचा असलं काहीतरी आयुध लागतं. पण हे असलं काहीतरी वापरणं आमच्याकडे अपमानास्पद मानतात. शिजून चकाकी आलेली पात्तळ फेणी अशी नितळपणे सुटून येते आणि थेट तोंडात जाते! ती तशी सुटली नाही, तर 'कित्ती घाई तुम्हांला? शिजायला हव्ये!' असं करवादण्याचा पर्याय असतोच.

एकापाठोपाठ एक साचे शिजत जातात. सुरुवातीची क्षुधाशांती होईपर्यंत दरेक साच्यावर झडप घालून पत्र्यांची वाटणी होते. सोबत सायीचं दही आणि मीठ. गोडेतेल आणि मीठ. किंवा काहीच नाही. कधी सुरळीच्या वडीसारखी गुंडाळून घ्यायची आणि मग ती एकेक पदर सोडवत खायची. कधी तिची नीट घडीच्या पोळीसारखी घडी करून खायची. कधी आख्खंच्या आख्खं वर्तुळ तोंडात गडप करायचं... कधी दुसर्‍याकडचा पत्रा पळवायचा. आपले पत्रे राखायचे. अधून मधून ओट्यावर स्थानापन्न होऊन आकाशवाणीला सुट्टी द्यायची. सूचना ऐकणे, स्वीकारणे, परतवणे - असा खेळ खेळायचा. पुढच्या खेपेला फेण्या खायला कुणाला बोलवायचं त्याचे बेत करायचे. पुण्यातल्या तुळशीबागवासी सुपीक डोक्याच्या लोकांनी हे साचे विकायला काढेस्तोवर हाच उपद्व्याप पळसाच्या पानांवर 'एका वेळी तीन' अशा दरानं करत असत आणि वर फेण्या वाळवतही असत, त्याबद्दल गप्पा करून तेव्हाच्या मुलांची (आणि बायकांची) कीव आणि नवल करायचं. बाबांच्या माहेरच्या त्या आजींचा एकमतानं उद्धार करायचा. ऑफिसातल्या एका कोस्टल एलिमेंटनं मारे कौतुकानं कशा डबाभर फेण्या आणल्या, आणि बाकी प्रांतातल्या मंडळींना या गुळाची चव ठाऊक नसल्यामुळे तो डबा आपल्या उदरी कसा सद्गती पावला, त्याच्या कहाण्या कौतुकानं चघळायच्या. "कुणीसं दारावर येतं विकायला. पण एकेका फेणीचे तीन-तीन रुपये घेतात!" असेही पोट-अचंबे करायचे...

फेण्यांची चव, वास आणि पोत जितका महत्त्वाचा असतो, तितकीच ही कर्मकांडंही महत्त्वाची असतात.

हळूहळू आत्मे तृप्त होतात, तसतशी सोडवून घडी करून ठेवलेल्या फेण्यांची डिंगोळी साचत जाते. उशिरा उठलेले वा आलेले, आणि या प्रक्रियेतले रसगंध अनुभवण्याला मुकलेले, काही आळशी लोक नंतर या फेण्या खातात. कितीही फेण्या खाल्लेल्या असल्या, तरी "मला आमटीभाताशी थोड्या ठेव गं!" असे पुकारे होतात. "फार तहान तहान होते नाही?" "मग? आंबवलेला तांदूळ! मेल्यांनो, भाकर्‍या खाल का इतक्या? सगळं पीठ संपवलंत!" असे उद्गार निघतात. "एकदा मी वाळवणारच आहे थोड्या. हावरी कार्टी मेली!" असे संकल्प सुटतात...

बाकी स्वैपाकातलं काही हातून घडो ना घडो. पक्वान्नं तर मी तशीही विकतचीच खाणार. पण फेण्या नामक उपक्रमाचा वारसा मात्र मी माझ्याही स्वैपाकघरात नक्की चालवणार आहे.

तो काय निव्वळ पदार्थ थोडाच आहे?!

***

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

आमच्याकडे याला सालपापड्या म्हणतात. असा साचा पहिल्यांदाच पाहिला. घरची पद्धतः पातेल्यात पाणी उकळत ठेवायचं. उथळ प्लेटमध्ये थोडंसं पीठ घालून सारखं करायचं. आणि त्या पाण्यावर ही प्लेट आणि वरती वाफ न जाऊ देणारी दुसरी प्लेट ठेवायची. एका वेळी एकच सालपापडी होई, त्यातच पीठ नीट वाटलं गेलं नसेल किंवा कमी शिजलं की ती नीट सुटायची नाही. पहिल्यांचा सुईच्या टोकानं जराशी सोडवून घेऊन मग हलक्या हाताने काढायची आणि पालथ्या वेताच्या करंडी/बुट्टीवर वाळत घालायची.

गव्हाच्या कुरड्या हा बेत वेगळा आहे. गहू दोन-तीन दिवस भिजत घालावे लागतात. रोज त्यांना कितीही धुतलं तरी त्याचा कुबट वास येत राहतो. तिसर्‍या दिवशी हे गहू दाबून त्यांच्या स्वच्छ पांढरा चीक काढायचा अन् शिजवायचा. शिजवलेला पदार्थ सोर्‍यामध्ये घालून तिच्या कुरडया करतात. वर्षभर कुरडया खायला कितीही आवडलं, तरी 'बेकट्याचा' वास सहन करणं अवघड!!

पाट्यावर गंधाळ वाटता येतं, पण वेळ खूप लागतो. अगदी कमी पाणी घालावं लागतं, त्यामुळे पाट्यावरून खाली ओघळ येत नाहीत. मी कधी काळी चटण्या आणि पुरण वाटलंय. साध्या आठवणीनेच हात दुखायला लागला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

फेणी म्हणजे सुतरफेणी किंवा गोव्यात मिळणारी दारू असं वाटत होतं....
पण हा भलताच नाजूक आणी कौशल्याचा प्रकार दिसतोय. आवडला..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांचे हाबार्स!

इतका काही नाजूक प्रकार नाहीय. याहून देखणे मोदक वळायला बरंच हस्तकौशल्य लागतं. (अनेकदा प्रयत्न करूनही माझे मोदक एखाद्या गचाळ बाईनं कशीतरी गाठोडी बांधावीत तसे बापुडवाणे दिसतात.) फक्त किचकट आणि धीर लागणारा प्रकार आहे. योग्य मोटिवेशन असलं पाहिजे, जे मला फेण्यांचं व्यसन लागल्यामुळे मिळतं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाटण झालं की त्याकडे एकदा धन्य होऊन बघायचं.

Biggrin Biggrin
अगदि खरे आहे.
गन्धासारखे बारिक वाटण हवे असेल तर धन्यता मानायलाच हवी न?
नवीन पदार्थ इतक्या खुमासदार शैलीत वाचल्याचा नक्कीच आनन्द आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

करायचा विचार आहे ...
फेण्यांसाठी स्टॅन्ड आणला आहे .
आता फक्त मुहुर्त लागायची वाट बघते आहे .. Biggrin

अवांतर : .. पण या प्रकाराला आम्ही काहीतरी वेगळं म्हणतो . पातोळी/पानगी किंवा काही (आत्ता लक्षात येत नाहीये) फेण्या म्हणजे सुत्तरफेण्या की काय असे वाटले मला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

काही ठिकाणी याच प्रकाराला पापड्या / सालपापड्या असं म्हणताना ऐकलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पाने