अखेर

मी तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही. तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढण खर तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते. माझ्या सभोवतालच्या अनेक स्त्रिया रोज अशा ओझ्यासह जगतात याची मला आठवण रहावी म्हणून मी हा फोटो काढते आहे.

मी बिहारमधल्या मुंगेर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यावर चालले आहे. वाटेत एका ढाब्यावर आम्ही नाश्ता करायला थांबलो आहोत. रस्त्यावर काही ’स्वच्छ’ खायला मिळणार नाही हे माहिती असल्याने माझे सहकारी खाण्याची तजवीज करून आले आहेत. ब्रेड, बटर आणि जाम असा सुखासीन नाश्ता आम्ही गरीबीने वेढलेल्या वातावरणात करत आहोत. आमची चारचाकी एअर कंडिशन्ड आहे. माझ्याजवळ बाटलीबंद पिण्याचे पाणी आहे; हातात मोबाईल आहे आणि डिजीटल कॅमेराही आहे. माझ्या खिशात पुरेसे पैसे आहेत.मला उद्याची चिंता करण्याच काही कारण नाही. माझ्या समोरून चाललेल्या स्त्रीच जगण आणि माझ जगण यात प्रचंड अंतर आहे. तिला त्याची जाणीव आहे की नाही मला माहिती नाही, पण मी मात्र त्या विरोधाभासाने, त्या अंतराने अस्वस्थ आहे.

आम्ही पुढे जातो. एका टेम्पोच्या टपावर बसून माणस प्रवास करताना दिसतात. मग ते चित्र सारख दिसत राहत. या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाची काही गोष्टच नाही, त्यामुळॆ लोकांना मिळॆल त्या वाहनातून आणि मिळेल त्या सोयीने प्रवास करावा लागतो. गाडीच्या आत खचाखच गर्दी आहे. इतक्या उकाड्यात त्या आतल्या लोकांच काय भरीत होत असेल याची कल्पनाही करवत नाही. अनेक स्त्रिया त्या आतल्या गर्दीत कशाबशा उभ्या आहेत. त्यांना बसणारे धक्के कसे असतील याची मला जाणीव आहे. हेही त्यांच्या जगण्याच एक प्रकारच ओझ आहे. माझा सुखासीन प्रवास आणि त्या स्त्रियांचा प्रवास यातला विरोधाभास, त्यातल अंतर मला पुन्हा एकदा जाणवत.

एका ठिकाणी रस्ता अचानक संपतो आणि आमची गाडी तिथ थांबते. एक संथाल तरूण आमची वाट पहात तिथ थांबलेला आहे. त्याच्या वस्तीत आम्हाला घेऊन जायची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो एकदम व्यवस्थित हिंदी बोलतोय आणि मुख्य म्हणजे अजिबात लाजत नाही. भाताच्या खाचरातून त्याच्या मागोमाग, अगदी त्याच्या पावलांवर पावल ठेवत मी चालले आहे. माझ पूर्ण लक्ष पायवाटेवर आहे. तो बिचारा सारखा मागे वळून पहात माझ्याकडे लक्ष ठेवून माझी काळजी घेतो आहे. तो तरूण भरभरून बोलतो आहे, ते मी प्रश्न न विचारता ऐकते आहे. सभोवतालची हिरवाई मनमोहक आहे.पण इकडे तिकडे पहायची काही सोय नाही – कारण थोड दुर्लक्ष झाल की मी थेट खालच्या भाताच्या खाचरात जाणार अशी मला भीती आहे. त्या आदिवासी तरूणाच्या आणि माझ्या जगण्यातल्या विरोधाभासाचा मी विचार करते आहे. मी ’माझ्या समाजासाठी’ अस काही स्वयंसेवी काम करत नाही. माझा वेळ खर्च करून मी काही समाजपयोगी काम करत नाही. या तरूणाला त्याच्या वस्तीची जेवढी माहिती आहे तेवढी मला मी राहते त्या परिसराची माहिती नक्कीच नाही.

आम्ही आदिवासी पाड्यावर पोचतो तेव्हा हात पाय धुण्यासाठी आमच्यासमोर बादलीभर पाणी ठेवल जात. पाच मिनिटांत तिथल्या समाज मंदिरात स्त्रिया जमा होतात. त्यांच्यासोबत त्यांची लेकरबाळ असतात. पुरुषही जमा होतात – ते मागे बसतात आणि स्त्रिया पुढे बसतात. ती जागा गच्च भरली आहे. माझ्यासाठी एक खुर्ची ठेवलेली आहे. एरवी खर तर मी एकटीच खुर्चीत बसत नाही, सगळ्यांसाठी पुरेशा खुर्च्या नसतील तर मी पण जमिनीवर बैठक मारते. . पण आत्ता मी खाली जमिनीवर बसले तर लोकांचे चेहरे मला नीट दिसणार नाहीत. चेहरा दिसला नाही तर बोलण्यात, ऐकण्यात काही मजा नसते. शिवाय आज आणखी एक अडचण आहे. आम्ही आलो त्या वाटेवर बरेच काटे होते आणि माझी सलवार त्या काट्यांनी भरलेली आहे हे माझ्या लक्षात आलय. खाली मांडी घालून बसल, की ते सगळॆ काटे टोचणार …म्हणून आज मला खुर्चीत बसण्याशिवाय गत्यंतर नाही. इथल्या स्त्रिया आणि इथले पुरुष रोज या काटेरी वाटेवरून चालतात…. या वस्तीवर दुकान नाही, दवाखाना नाही, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत चालत जावे लागते. त्याबद्दल ते तक्रार करत बसत नाहीत, त्यांनी त्यातल्या त्यात स्वत:साठी आनंदाच्या जागा, आनंदाचे क्षण शोधले आहेत. त्यांच्याकडे जे कौशल्य आहे या काटेरी वाटेवरून चालण्याचे, ते माझ्याकडे अजिबातच नाही! मला पुन्हा एकदा त्या आदिवासींच्या आणि माझ्या जगण्यातला विरोधाभास, त्यातले अंतर जाणवते.

गावात जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणे ही माझी एक जबाबदारी आहे. खर सांगायच तर अशा बैठकातून मी त्यांना फारस काही शिकवत नाही, मला मात्र त्यांच्याकडून बरच काही शिकायला मिळत. या वस्तीच नाव आहे ’वन्नारकोला’. इथ अवघी ३६ घर आहेत. विजेचे खांब दिसताहेत पण प्रत्यक्षात वीज अजून इथ यायची आहे. स्त्रिया आणि लहान मुल कुपोषित आहेत हे एका नजरेत लक्षात येत माझ्या. मला त्यांच्या भाषेत – संथाली भाषेत – बोलता येत नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते – तेव्हा ते सगळॆ समजुतीने मान डोलावतात – ’चालायचच’ अशा अर्थाने. माझ्या अडाणीपणामुळॆ त्यांच काही माझ्याबद्दल वाईट मत होत नाही हे मला विशेष वाटत. घरटी जमिनीचा छोटा तुकडा आहे – त्यात पोटापुरता भात कसतात. इथल्या स्त्रियांनी ’स्वयंसहाय्यता गट’ स्थापन केले आहेत. काही जण शेती विकासाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. साधारण तासभर मी त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलते आणि माझ्या सहका-याच्या हाती पुढची सूत्र सोपवते.

कोणाच लक्ष नाही अस पाहून मी त्या समाज मंदिराच्या बाहेर पडते. मला हा आदिवासी पाडा आवडलाय. घर मातीची आणि छोटी आहेत. सभोवताली भातशेतीतल्या लाटांचा नाच चालू आहे. आकाश एकदम निळ दिसतय – तो हिरवा आणि निळा रंग आणि भवतालची शांतता यांनी माझ मन एकदम शांत झालय. शहरात हा निवांतपणा कधी लाभणार नाही हे माहिती असल्याने मी तो क्षण पुरेपूर उपभोगते आहे. अर्थात माझा हा एकांत फार काळ टिकत नाही.

माझे दोन सहकारी माझा शोध घेत येतात. त्यांच्याबरोबर गावातले एक दोन लोकही आहेत. मग आमची ’गावात काय काय करता येईल पुढच्या काळात’ यावर चर्चा चालू होते. मी अनेक प्रश्न विचारते, ते सगळॆ माहिती पुरवतात. आम्ही त्या वस्तीत चक्कर टाकतो. अनेक घर नुसती बाहेरून कडी लावून बंद आहेत – (ते लोक तिकडे कार्यक्रमात आहेत) – आम्ही त्यांच घर उघडून आत जातो. घराची पाहणी करतो – चुलीत काय सुधारणा करता येईल, घरात प्रकाश कसा आणता येईल, पिण्याचे पाणी कसे ठेवले आहे, घरात किती ओल आहे …. अशी पाहणी होते, चर्चा होते. ही चर्चा माझे सहकारी नंतर गावातल्या लोकांशी करतील सविस्तर. वाटेत एक दहा वर्षांची मुलगी दिसते. तिला बोलता येत नाही – त्यामुळे तिचे नाव इतरांनी ठेवले आहे ’गुंगी’. तिच्यासाठी काय सरकारी योजना आहेत त्याबद्दल आम्ही बोलतो. एक पुरुष एका छोट्या मुलीला खांद्यांवर घेऊन उभा आहे – त्या दहा महिन्यांचा मुलीचे नाव आहे खुषबू. घरांतली भांडीकुंडी, कपडे सगळ वेगळ आहे. घरातच कोंबड्या आहेत, बक-या आहेत. काही अंगणात गाय आहे, झाडांवर पक्षी आहेत. माझ्या घरापेक्षा या घरांच चित्र अगदीच वेगळ आहे. मला पुन्हा एकदा माझ्या आणि या आदिवासींच्या जगण्यातला विरोधाभास जाणवतो आहे. इथली शांतता, इथली मातीची घर … हे सगळ काही काळ चांगल वाटत – धकाधकीच्या जगण्यात बदल म्हणून! पण रोज अस मला जगता येईल का? अशा जगण्याची माझ्यावर सक्ती झाली तर आजची माझी शांतता टिकेल का? जर मला जगण्यासाठी अधिक सुखसोयी लागतात तर त्या या लोकांनाही का मिळू नयेत?

कार्यक्रम संपतो. गावातल्या स्त्रियांनी सगळ्यांसाठी चहा आणि बिस्कीटांची व्यवस्था केली आहे. बारक्या पोरांना मात्र फक्त बिस्कीटे आहेत, चहा नाही हे मला दिसते. बरोबर आहे, साखर, दूध सगळ्याचा प्रश्न असणार इथ! त्या बारक्या पोरापोरींच्या डोळयांत मला चहाची इच्छा दिसते. मग मी माझा चहाचा कप पुढे करून ’यात बिस्कीट बुड्वून खा’ अस त्यांना सांगते. क्षणार्धात माझ्याभोवती पोर जमा होतात. त्यांचा ’चहा बिस्कीटाचा’ आनंद अगदी निरागस आहे. मला त्यांचे चमकते डोळॆ आणि चेहरे पाहून फार बर वाटत.

मला पुन्हा एकदा त्यांच्या आणि माझ्या जगण्यातला विरोधाभास जाणवतो. तस पाहायला गेल तर आनंद किती छोट्या गोष्टींत दडलेला असतो आणि तो किती उत्स्फूर्त असतो. पण मी सुख, समाधान, आनंद या सगळ्या बाबी केवढ्या गुंतागुंतीच्या करून घेतल्या आहेत स्वत:साठी!

आम्ही निघतो. गावातले काही स्त्री पुरुष आम्हाला पोचवायला मुख्य रस्त्यापर्यंत म्हणजे साधारणपणॆ दोन किलोमीटर येतात. हाच तो मघाचा भातखाचरातला आणि काट्यांनी भरलेला रस्ता. आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत, हसतो आहोत. मी आता चिखलात पडेन अशी भीती मला नाही कारण माझे दोन्ही हात आता दोन स्त्रियांच्या हातात आहेत, आणखी दोघी माझ्या खांद्यांवर हात ठेवून चालल्या आहेत; ती एवढीशी पाउलवाट आता आम्हा सर्वांना सामावून घेते आहे. चालता चालता आम्ही मधेच थांबून हसतो आहोत. आम्ही पुढच्या गोष्टी ठरवतो आहोत. “आमची वस्ती आवडली का तुम्हाला, परत कधी येणार तुम्ही?” असा प्रश्न जवळजवळ सगळॆच जण विचारत आहेत. मला कधी बोलवायच परत याबाबत त्यांचा आपापसात विचारविनिमय चालू आहे – आणि त्यांच काही एकमत होत नाहीये.

आम्ही आजच भेटलो, आणि चार पाच तासांचीच काय ती भेट – पण आम्हाला एकमेकांबद्दल आपुलकी वाटते आहे – आमच्यात एक प्रकारची जवळीक निर्माण झाली आहे. आता आमच्यात न भाषेचा अडसर आहे , न वयाचा, न शिक्षणाचा, न परिस्थितीचा, न पैशांचा, न आणखी कशाचा. आमचे एक नाव नसलेले नाते निर्माण झाले आहे.

परस्परभेटीची इच्छा त्यांना आणि मलाही आहे. एकमेकांना भेटल्याचा आनंद त्यांना झाला आहे, तितकाच मलाही झाला आहे. आमचे एकमेकांच्या हातातले हात, आमचे फुललेले चेहरे, आमच हसू, आमची परस्पर भेटीची इच्छा … त्यात खोट काही नाही, वरवरच काही नाही.

अखेरच्या क्षणी, निरोपाच्या या क्षणी आमच्या जगण्यात काहीही विरोधाभास नाही, काहीही अंतर नाही.

सकाळपासून मला अस्वस्थ करणा-या सगळ्या विरोधाभासाला, अंतराला पेलून कसल्यातरी अनामिक धाग्याने आम्ही एकमेकांशी जोडले गेलो आहोत. कदाचित आम्ही कधीच भेटणार नाही पुन्हा, तरीही …..
**
पूर्वप्रसिद्धी

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

आवडले!

वाटेत एक दहा वर्षांची मुलगी दिसते. तिला बोलता येत नाही – त्यामुळे तिचे नाव इतरांनी ठेवले आहे ’गुंगी’.

आमच्या शेताच्या सरकत्याची बायकोच नाव बहिरी होत. ती मुकी व बहिरी होती. तिची मुलही तिला बहिरीच म्हणतं. सौ. बहिराबाई चंदू येडे असच तिच नाव रजिस्टरला होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

प्रकाश घाटपांडे, आभार. 'बहिरी' सारखी नावं आपल्या मध्यमवर्गीय कल्पनांच्या दृष्टिकोनातून असंवेदनशील वाटतात आपल्याला अनेकदा. पण जे आहे त्याला तेच नाव देणे आणि त्याचा जसाच्या तसा स्वीकार करणे - ज्यातून इतरांना त्या व्यक्तीच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना यावी आणि पुढचे अवास्तव प्रश्न अथवा खोटीखोटी सहानुभूती टळावी - अशीही त्याची उपयोगिता असेल काय असा एक प्रश्न माझ्या मनात कधीकधी येऊन जातो - जो कदाचित पूर्णतः असंवेदनशील असेलही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रांजळ लेखन!
पाड्यांवरचं वर्णन वगैरे आहेच त्याहीपेक्षा आहे- त्याहीपेक्षा भावतो- प्रांजळपणे घेऊ पाहणारा आत्मशोध -आत्मबोध.
लेखन अतिशय आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिक्रिया देत नाही. तीच तीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही. क्षमस्व. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन अर्थातच आवडलं. लिहिताना कुठलाही आव आणला जात नाही हे खूप आवडतं.
लिहीत रहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आव! छे, आतिवास यांच्य लेखनात आव येइल असं वाटत नाही. आलीच तर एक सौम्य भूमिका येइल, जी लीलया स्विकारली जाइल इथल्या वाचकांकडून. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहूदा भुमिका नसल्यानेच सगळ्यांना ते लेखन आवडतं आहे, भुमिका आल्यावर तट पडतील व लेखनाची(विचारांची) समिक्षा केली जाईल अशी भिती मला वाटते, पण ते लेखन जास्त जिवंत वाटेल असं पण वाटतं, पण तो बहूदा वैयक्तिक मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार ऋषिकेश, श्रावण मोडक, क्षिप्रा, मी (इथं स्वतःचेच आभार मानल्यासारखं वाटतंय मला Lol आणि रामपुरी.

मी आणि रामपुरी, इथं 'काही भूमिका नाही' हे तुमच निरीक्षण विचार करण्याजोगं निश्चितच आहे. तुमच्या या प्रतिसादामुळे 'भूमिका म्हणजे काय' असं विचारांच एक वेगळ आवर्तन माझ्या मनात सुरु झालं हे चांगलंच - त्याबद्दल तुमचे आभार.

पण मला वाटतं की एखादी व्यक्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातले काही अनुभव जी माणसं तिच्या ओळखीची नाहीत त्यांना संकेतस्थळाच्या माध्यमातून का होईना सांगते आहे - ही एक भूमिकाच आहे. हजारो घटना/प्रसंग घडत असताना त्यातला नेमका एखादा अनुभव सगळ्यांसमोर मांडणं हीसुद्धा एक प्रकारची भूमिकाच आहे. भूमिका ठासून न मांडण्याचीही एक भूमिका असू शकते. रूढार्थाने ही सामाजिक, वैचारिक, तात्त्विक .. वगैरे प्रकारची भूमिका असेल किंवा नसेलही - वाचक म्हणून तुम्हाला त्याचा जो अर्थ लागतो तो महत्त्वाचा आहे.

भूमिका घेतल्याविना अभिव्यक्ती होऊ शकते का - हा एक खोलात जाऊन विचार करण्याचा मुद्दा आहे. भूमिका घेतल्याविना एखाद्या अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येऊ शकतो का - हाही असाच एक खोलात जाऊन विचार करण्याचा मुद्दा आहे.

भूमिका आणि व्यक्तिमत्त्व, भूमिका आणि अपेक्षा, भूमिका आणि प्रतिमा... हेही मुद्दे आहेतच.

तुम्ही एकदम मला विचार करायला लावायची भूमिका घेतलीत इथं, कदाचित तुमच्याही नकळत .. हे आवडलं Smile त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादा अनुभव सगळ्यांसमोर मांडणं हीसुद्धा एक प्रकारची भूमिकाच आहे. भूमिका ठासून न मांडण्याचीही एक भूमिका असू शकते.

सहमत.

भूमिका घेतल्याविना अभिव्यक्ती होऊ शकते का - हा एक खोलात जाऊन विचार करण्याचा मुद्दा आहे. भूमिका घेतल्याविना एखाद्या अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येऊ शकतो का - हाही असाच एक खोलात जाऊन विचार करण्याचा मुद्दा आहे.

नक्कीच, एक वाचक म्हणून तुमचे लेखन वाचणे हा एक आनंददायी अनुभव आहे. पण भुमिकेची मागणी करण्यामागे वाचकाला लेखकाने केलेले चिंतन वाचायला अवडत असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी, तुमचा मुद्दा मला कळला .. पण त्याला मी कितपत न्याय देऊ शकेन याबाबत माझ्या मनात शंका आहे. लक्षात ठेवेन मी तुमची अपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< पण मला वाटतं की एखादी व्यक्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातले काही अनुभव जी माणसं तिच्या ओळखीची नाहीत त्यांना संकेतस्थळाच्या माध्यमातून का होईना सांगते आहे - ही एक भूमिकाच आहे. हजारो घटना/प्रसंग घडत असताना त्यातला नेमका एखादा अनुभव सगळ्यांसमोर मांडणं हीसुद्धा एक प्रकारची भूमिकाच आहे. भूमिका ठासून न मांडण्याचीही एक भूमिका असू शकते. रूढार्थाने ही सामाजिक, वैचारिक, तात्त्विक .. वगैरे प्रकारची भूमिका असेल किंवा नसेलही - वाचक म्हणून तुम्हाला त्याचा जो अर्थ लागतो तो महत्त्वाचा आहे. >>

असं असेल तर मग तटस्थ निरीक्षक कोणास म्हणावे? की असा कोणी नसतोच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चेतन गुगळे, माझ्या अल्प माहितीनुसार पूर्ण तटस्थ असे समाजात वावरताना कोणीच नसते. आपली पार्श्वभूमी, आपला अनुभव, आपल्या आवडी-निवडी, आपले नैतिक आदर्श, आपल्या व्यावहारिक गरजा .. या सगळ्याचा आपल्या निरीक्षणावर, आपल्या अनुभव घेण्याच्या क्षमतेवर कळत-नकळत परिणाम होतच असतो. त्या सगळ्याबद्दल जागरूक राहून हा पूर्वग्रह काही प्रमाणात कमी करता येतो इतकंच - पण तो एकदम नामशेष नाही करता येत.

अर्थात याबद्दल वेगळे मत कोणाचे असेल तर ते वाचायला जरुर आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< अर्थात याबद्दल वेगळे मत कोणाचे असेल तर ते वाचायला जरुर आवडेल. >>

अगदी असेच नाही तरी या विषयाशी जवळीक साधणारे (तो विषय नेमका असा होता की, एखाद्याच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आणि त्या हास्याचे कारण आपण असू तर आपणांस आपण त्या हास्याचे कारण नसताना होणार्‍या आनंदापेक्षा जास्त आनंद होईल का?) संभाषण माझ्यात आणि एका विदुषीत झाले होते. ते या संस्थळावर http://www.aisiakshare.com/node/820 येथे मांडले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तुम्ही दैनंदिनी लिहिता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी, हा प्रश्न तुमच्या मनात का यावा याच कुतूहल वाटलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं. नेहमीप्रमाणेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चहाच्या ऊल्लेखावरुन गोदूताई परुळेकरांच्या पुस्तकातल्या चहाची आठवण झाली
कसतरी झाल पुन्हा एकदा

प्रांजळ लेखन आवडल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आभार सेरेपी आणि जाई.
जाई, मला नेमका संदर्भ लागत नाही आता - पुस्तक वाचून बराच काळ लोटला. व्यनितून सांगाल का मला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतिवास व्यनी पाहावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

प्रतिसाद इथे हलवला आहे -संपादक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण नेहमीप्रमाणेच आवडलं. हे वाचून एक प्रश्न मनात आला : अशा ठिकाणी सरकारी माणसं पाठवताना स्त्री-पुरुष असलेलं मिश्र पथक पाठवावं असा काही शिरस्ता आहे का? निव्वळ पुरुष गेले तर किंवा निव्वळ स्त्रिया गेल्या तर पाड्यावरची माणसं त्यांच्याशी बोलताना काही अंतर राखतील किंवा काही तपशील लपवतील. याउलट दोघंही गेले तर ते परस्परपूरक ठरतील असं वाटलं - उदा : काही गोष्टी स्त्रियांपाशी चांगल्या व्यक्त होतील, तर काही पुरुषांपाशी, काही तपशील स्त्रियांच्या लक्षात येतील तर काही पुरुषांना दिसतील, वगैरे.

तटस्थ निरीक्षक - आपले (सांस्कृतिक-राजकीय वगैरे) पूर्वग्रह बाजूला ठेवणं आणि तटस्थ राहणं यात फरक आहे. ज्यांच्या मदतीसाठी आपण जातो आहोत त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवता येण्यासाठी त्यांच्याविषयी आस्था आणि कळकळ असायला हवी. याउलट तटस्थ असण्याला 'कुणाचीही बाजू न घेता न्यायनिवाडा करण्याचा' (इम्पार्शल, बट जजमेंटल) कुठेतरी स्पर्श होतो असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आभार चिंतातुर जंतू.

"सरकारी माणसं पाठवताना स्त्री-पुरुष असलेलं मिश्र पथक पाठवावं असा काही शिरस्ता आहे का? (का?" - या प्रश्नांच उत्तर मला माहिती नाही. म्हणजे सरकारचा शिरस्ता आहे की नाही हेही माहिती नाही आणि त्याची कारणमीमांसाही माहिती नाही.

पण अनुभव असा आहे की एखाद्या ठिकाणी जाताना फक्त स्त्री-पुरुष असं नाही तर वेगवेगळ्या विषयातली माहिती आणि दृष्टी असणा-या लोकांची टीम एकत्र गेली तर फायदा होतो. परिस्थितीकडे अनेक अंगांनी एकाच वेळी पाहता येत आणि पुढची वाटचाल ठरवतानाही अनेक पैलू समोर येतात. परिस्थितीचे एकमेकांत गुंतलेले धागे असतात ते कळायला अशा 'बहुगुणी' टीमचा नक्कीच जास्त उपयोग होतो.

पूर्वग्रह बाजूला ठेवणं आणि तटस्थता यातला तुम्ही स्पष्ट केलेला फरक मान्य आहे. ज्याला/जिला समोरच्या समुहात गुंतून जाता येत नाही (आता पुन्हा हा एक मोठा विषय होईल) त्याला/तिला काम करण्यात आनंद मिळणार नाही इतके मी जरुर म्हणू शकते. आणि गुंतण्याची पुढची पायरी त्यातून बाहेर पडणे - ही पण असतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0