तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?

एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत ऐसीकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच ऐसीच्या मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे.

धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती.

धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे.
- दररोज पूजा करणं
- मंदिरात नियमितपणे जाणं
- देवाला नवस बोलणं
- तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं
- विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं
- पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं
- शिवाशीव, विटाळ पाळणं
- मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं.
- घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं.
- घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं

या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.

१. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.)
२. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.)
३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.)

तर तुम्हाला खालीलपैकी एक पर्याय निवडायचा आहे. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.

प्रतिक्रिया

माझ्या बाबतीत आजी-अजोबा मेजर म्हणजे प्रचंड देवभक्त होते. (शिवाशीव वगैरे आलंच.)
आई-बाबांनी बहुतेक ते झेलून स्वतःला देवदेवस्की (डोस्टोयेवस्की :ड) पासून दूर ठेवलं, आणि मी आपसूकच आणखी दूर गेलो.
मित्रांकडे वगैरे घरात देवाचे फोटो/छोट्या मूर्ती बघितल्या की स्वतःच्या घरातला त्यांचा अभाव क्वचित जाणवतो, आणि क्वचित गोव्याला गेलो तर देवळात जाऊन येतो. देवाशी बाकी फार संबंध येत नाही. धर्माशी संबंध शून्य.
.
पण गणपती हा मेजर वीकपॉईंट आहे. गणपतीत आरत्या, गवताच्या पात्यांची मोजणी किंवा बाकी काहीही बाप्पाशी संबंधित कामं आवडीने करतो. गणपती अतिप्रिय आहे.

मी तयार केलेले गट हे थोडे तोकडेच आहेत हे मला माझं स्वतःचं मत नोंदवताना जाणवलं. कारण माझे आईवडील कमी धार्मिक गटात असले तरीही मी शून्य धार्मिक आहे. आमच्या घरी वडील कमी आणि आई किंचित धार्मिक स्वभावाची. अधूनमधून सत्यनारायण, घरातल्या देवांची नोकरी सांभाळत आठवड्यातून एकदोनदा पूजा यापलिकडे आईने फारसं काही केलं नाही. तरीही काही कठीण प्रसंगी तिला नवस बोलावासा वाटतो.

याउलट मी पूर्णपणे सास्कृतिक हिंदू आहे. देवळात जायला नकार देत नाही, प्रथा म्हणून कोरडेपणे हातही जोडतो. गणपतीच्या आरत्या म्हणतो, आणि तो प्रसंग म्हणून एंजॉय करतो. पण देवाविषयी श्रद्धा, पावित्र्य वगैरे काही वाटत नाही. मुलाला अनेक वर्षं देव म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. आता तो जवळपास आठ वर्षांचा होईल. परवाच त्याने एक प्रसंग सांगितला. तो कोणाकडे गेला असताना त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान मुलगी त्याला काहीतरी गॉड वगैरेविषयी सांगत होती. हे सांगून तो आम्हाला म्हणाला 'आय वॉज लाफिंग इनसाइड माय हेड. देअर इज नो गॉड. अॅंड शी डझंट नो दॅट!' म्हणजे हे प्रकरण तर आमच्याही पुढे आहे. मी शाळेत होतो तेव्हा देव-भूत वगैरे कल्पनांचा बऱ्यापैकी पगडा होता. तो मला स्वतःलाच प्रश्न विचारून उडवावा लागला होता. इथे तर काहीच ओझं नाही.

आमच्याकडे तरी आमचे आईवडील ३, मी ४ आणि मुलगा ५ अशी स्थिती दिसते आहे.

वैयक्तिक होत असेल तर सॉरी पण नवस बोलणारी व्यक्ती ३ मध्ये कशी? १ वा २ असायला पाहिजे राइट?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

व्यक्तीपेक्षा घरच्या वातावरणाकडे माझा रोख अधिक होता. नवसाचं म्हणाल तर मी अगदी तिशी ओलांडून गेल्यानंतर बहुधा तिने सुरूवात केली. लहानपणी परीक्षेच्या वेळी देवाला नमस्कार करून जा वगैरे तिने कधीही म्हटलं नाही. पूजादेखील त्या बिचाऱ्या देवांची कधीमधीच व्हायची. त्यामुळे घरात संपूर्ण बिनधार्मिक वातावरण होतं. आईमध्ये किंचित भाविकपणा होता इतकंच.

ओके. धार्मिकता पिढी दर पिढी कमी होते असा हायपोथेसिस टेस्ट करताय का या कौलाने गुर्जी तुम्ही?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तसा निष्कर्ष कढणं शक्यच नाही. फार तर ऐसीवरील सदस्यांमध्ये धार्मिकता , पिढी दर पिढी कमी होते आहे - असा निष्कर्ष निघू शकतो. मिपावर कौल घेतल्यास तिथे हा निष्कर्ष निघू शकतो. पण विदासंच फारच मर्यादित असल्याने निष्कर्षही अ‍ॅज मच गांभीर्यानेच घ्यावा लागेल.
.
अर्थात गुर्जी हे जाणत असणारच.

हो. कारण माझ्या आसपास दिसणाऱ्या लोकांत खरोखरच देवदर्शन, घरी पूजा करणं, नवस बोलणं या गोष्टी सर्वसाधारणपणे कमी होताना मला दिसतात. त्याचबरोबर सार्वजनिक आयुष्यात धार्मिकतेची अभिव्यक्ती वाढलेली वाटते. हे दोन्हीही कदाचित माझे गैरसमज असू शकतील. त्यामुळे ऐसीवरच्या लोकांना विचारून बघतो आहे. अर्थात या कौलाने तो हायपोथिसिस सिद्ध व्हावा इतकी या कौलाची पत नाही. निदान अगदी मर्यादित डेमोग्राफिकसाठी त्याचा विचार करण्यासाठी प्राथमिक विदा म्हणून बघता येईल.

कौलामागचा हेतू पाहता हे तिन्ही गट निरपेक्ष निकष लावून बनवण्यापेक्षा तीन सापेक्ष पायऱ्या म्हणून बघावेत. म्हणजे चार-पाच गटांची गरज पडणार नाही आणि गोंधळ कमी होईल. मी त्या विचाराने मत दिलंय आणि अनुपचा मुद्दा मान्य आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या घरी देवधर्म वगैरे सगळं लोणचं-मिरची इतपतच होतं. मुख्य अन्न म्हणजे पुस्तकं. आई होती तोवर वर्षात तीन उपास करायची, बाबा दोन. एका हरताळकेच्या दिवशी मी नेहेमीप्रमाणे आईची शेपूट म्हणून इमारतीत एकांकडे पूजा होती तिथे गेले होते. तिथे "तू उपास का नाही करत चांगला नवरा मिळण्यासाठी?" असा प्रश्न मला विचारण्यात आला. समानता, स्वतःची पात्रता याबद्दल काडीमात्र आकलन नसतानाही "मी कशाला उपास करू? माझ्याशी ज्यांना लग्न करायचंय त्या सगळ्यांनी उपास करावा" असं उत्तर दिलं होतं. आणि ते ऐकून आईने पसंतीची मान डोलावली होती. असला धर्मबुडवेपणा करायला घरून फुल्ल परमिशनच होती असं नाही, भरीव पाठिंबाही मिळायचा. त्या उत्तराबद्दल बक्षिस म्हणून माझ्या आवडीचे पदार्थ घरी बनले होते. कधी वाटतं आईला जी लिंग-समानता आत्मसात करता आली नाही ती तिला माझ्यात उतरवायची असेल; त्यामुळे आपसूक मला धर्मबुडवेपणासाठी प्रोत्साहन मिळालं.

उपासांच्या दिवशी आम्हाला दोघांना (भाऊ आणि मी) दिवसभर पोळीभाजी छाप अन्न खाण्याचं बक्षिस म्हणून संध्याकाळी चांगलं-चांगलं म्हणजे साबुदाण्याचे वडे, दाण्याची आमटी वगैरे पदार्थ मिळायचे. आई असेस्तोवर. पुढे बाबांनी उपासालाच काट मारली. आपल्याला वाटेल तेव्हा खिचडी, भगर, दाण्याची आमटी करून खाता येते तर उपास कशाला करायचा? आई असेस्तोवर रोज फुलं तोडून आणून देवपूजा होत असे. आईच्या मागे बाबांनी यथास्थित सवडीशास्त्र सुरू केलं. वेळ असेल तर फुलं तोडायला गेले नाहीतर देवांना हळदकुंकू वाहून घराबाहेर पसार.

आई गेल्यावर काही वर्षांनी एका मित्राशी रात्रभर चर्चा करून देव नाही, असं मी (माझ्यापुरतं) ठरवलं. दुसऱ्या दिवशी बाबांना हे सांगितलं, ते नेहेमीप्रमाणे 'हो' एवढंच म्हणाले. मला देवाची मानसिकदृष्ट्याही गरज नाही, इतपत तयारी व्हायला आणखी काही वर्षं जावी लागली. यथावकाश 'कोणीतरी येईल काहीतरी भलं करेल' यावरचा विश्वासही उडाला. त्यामुळे कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपण बूड हलवल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आलं. हे जसजसं आत्मसात करत गेले तशी एकंदर अभ्यास, कामावरची निष्ठा वाढत गेली. कष्टांचा कंटाळा अजूनही येतो, पण एखादी गोष्ट घडायला हवी असेल तर कितीही कंटाळा आला तरी आपण आधी कष्ट करायला पाहिजेत हे समजत गेलं.

एकेकाळी माझा उल्लेख आई 'आळशी ओंडा' असा करायची. घरात आस्तिकताही तिच्याकडेच जास्त होती. माझी आस्तिकता गेली आणि 'आळशी ओंडा' असणं बरंच कमी झालं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रथम देव ही कल्पना आइवडिलांकडे होती.अतिरेक नव्हता.मला मात्र ती कळली नाही.नंतर समजलं देव नसलेलाही एक धर्म आहेच.हे सगळे मनाचेच खेळ आहेत.मुलांनी पाळावेत/नाही हा आग्रह नाहीच.सरळ लिहिलंय .१,२,३ वगैरे मांडून घ्या.

म्हणजे तुमचं एकंदरीत - आईवडील २ तुम्ही ३ असं मत दिसतं आहे. तो पर्याय तुम्ही कृपया नोंदवाल का? म्हणजे शेवटची मोजमाप करायला सोपं जाईल.

आईवडील ३ (अज्जिबात धार्मिक नाहीत. आई रामरक्षा क्वचित म्हणत असे तर बाबा गणपतीपुढे उदबत्ती क्वचित लावत). एकंदर धार्मिकांबद्दल उपहासच. धार्मिक स्थळांबाबत उदासीनता ही नाही तर उलट कडाडून विरोधी मत की किती घाण असतात, किती चेंगराचेंगरी होते अन तरी लोक मेंढ्यांसारखे जातात. म्हातारपण आलं की देवपूजेला लोक लागतात - असलीच मतं नेहमी आई-बाबा मांडत.
.
मी रोज स्तोत्र म्हणते, देवावर भक्ती आहे. मला १२ ज्योतिर्लिंगे पहाण्याची निदान नाशिकचे त्र्यंबकेश्वर पहाण्याची इच्छा आहे. अर्थात अ‍ॅक्टिव्ह उपास वगैरे करत नाही पण देवळात जाणे, तिथे डोळ्यातून टिपे गाळणे म्हणजे अतिभावनाप्रधानतेमुळे इ प्रकार करते.
.
काकांना ध्यान करताना पाहीले आहे. मामी तर शोडषोपचारे पूजा करे जी की मला अतिशय आवडे. मी हट्टाने पूजा करत असे. अर्थात अन्य जवळचे नातेवाईक बर्‍यापैकी भाविक आहेत. पण आई-बाबा नाहीत. आजोबा(आईचे वडील) तर खरोखर ११ वेळा रामरक्षा म्हणत.
.
एकंदर आई-वडील अन मी १८० अंश वेगळे आहोत. अन कदाचित रिबेलिअन म्हणूनच मी देवभोळी झाले असे वाटते. रिबेलिअन किंवा डिफेन्स ही असेल. किंबहुना डिफेन्स च असेल कारण घरात प्लँचेट मात्र यथेच्छ होत. भूताखेतांवर, ब्लॅक मॅजिक वगैरे वरती विश्वास असे. त्यांचा फक्त देवावरच विश्वास नव्हता. हे उफराटेपण लहान वयात मला घाबरवणारच असणार त्यातूनही आस्तिक झाले असावे, तशी खूप शक्यता आहे.
____
मुलीला माझ्याकडून संपूर्ण मुभा आहे - आस्तिकतेची/नास्तिकतेची च फक्त नव्हे तर पुढे कोणता धर्म आचरायचा आहे त्याचीही. लहानपणी अगदी ७ वर्षाची असताना ती काळजी करे - "मला मराठी येत नाही मग मी तुझ्यासारखी स्तोत्रे कशी वाचू?"

प्लँचेट? ओह.. मला फार कुतुहल आहे या प्रकाराविषयी. पण कधीच कोणाकडून first-hand अनुभव नाही ऐकायला मिळाले. तुम्ही सांगा ना काहीतरी याबद्दल.

परगावाहून, काका, आत्या वगैरे आले की बहुतेक बाबा आणि त्यांना लहानपण आठवायचं. मग एका कागदावरती लांब लांब आणि चारी बाजूला A ते Z अक्षरे लिहीली जायची. ० ते ९ आकडेदेखील लिहीले जायचे. एका ठिकाणी येस व नो.
केंद्रभागी लहानशी वाटी ठेवली जायची.
मग कोण्या आत्म्याला गांधीजी/नेहरु किंव अखापरपणजोबा/पणजी ही क्वचित बोलावलं जायचं की आलात तर येस वर या. शांत राहून कॉन्सन्ट्रेट केलं की थोडी थोडी हलायची वाटी. व शेवटी जोरात हलायला लागायची. अन सर्वांची बोटे वाटीवर सेंटरला. त्यामुळे तसेच मी नीरीक्षण केलेले तेव्हाही कोणीही आपण होऊन प्रयत्न करताना अज्जिबात दिसत नसे पण वाटी हलायची.
मग बरेच फुटकळ प्रश्न विचारले जात. ज्याची उत्तरे मिळत.
____
पण हे अनेकदा अनुभवले आहे, पार्टिसिपेट केले आहे.

तुम्ही तेव्हा लहान होतात म्हणजे तुमची गंमत करायला काही चिटींग करत नव्हते ना ते? (जेन्युइनली विचारतोय)

असे खरंच आत्मे येऊन उत्तरं द्यायचे?

नाही माझी नुसतीच लुडबुड असायची. बाकी त्यांनाच करायचं असायचं वाटी हलायची हे खरे आहे. एकदा राग येइल असा प्रश्न विचारला तर जोरात इकडून तिकडे हलायला लागली.
कोणीही सरकवताना दिसायचे नाही पण वाटी सरकायची. बरं सर्वांचा फोर्स व्हर्टीकल असायचा (अर्थात फोर्स अप्लाय करायचाच नसतो, हलके बोट ठेवायचे असते.) पण वाटी हॉरिझॉन्टल सरकायची.
आईच्याने कधी व्हायचेच नाही. काकू, मी , काका व बाबा आमच्याने व्हायचे.

हे कॉलेजात असताना अनेकदा ट्राय केलं आहे. वाटी, चकती इ इ जे काही वापरु ते सरकतं हे अगदी खरं आहे.. कारण ते सरकलंच नाही तर त्या पूर्ण कन्सेप्टलाच काही अर्थ उरणार नाही. बाकी मास हिस्टेरिया म्हणा किंवा सामुदायिक मनोरंजन म्हणा, पण सर्व लोक खरोखर वाटी सरकतेय असं समजून नेहमी पुढेही तसंच सांगतात हाच तर गमतीचा भाग आहे.

वाटीच्या पृष्ठभागावर गुळगुळीत टाल्कम पावडर टाकून पाहिली होती का कधी? फार वेळा हे बघून झाल्यावर आणि प्रत्यक्ष अनुभवल्यावर* मी एकदा अशी पावडर टाकली होती. त्यामुळे

अ. जो कोणी बोट सरकवेल त्याच्या बोटाची छोटी का होईना पण फिस्कटलेली रेघ वाटीवर उमटते.
ब. गुळगुळीतपणामुळे एका बोटाच्या जोराने वाटी सरकवणं कठीण जातं. ग्रिप मिळत नाही.

मग कसले नेहरु अन कसले खापरपणजोबा..!!

* अनुभवल्यावर म्हणजे वाटीचा हलविता धनी कोण आहे याचा वहीम पक्का झाल्यानंतर..!!

शुचिकाकू, तुमचं मत चुकलंय. प्लँचेट वगैरेवर विश्वास असणारे लोक ३? गुर्जी, जरा लक्ष द्या इकडे अन एक दोन अंधश्रद्धेच्या कॅटेगर्‍याही अ‍ॅड करा वरती. किमान न-अंधश्रद्धेच्या कॅटेगर्‍या अ‍ॅड करा नास्तिकांच्यात, म्हणजे गोंधळ कमी होईल.

-Nile

शी! तसल्या घाणेरड्या प्रकारांवर विश्वास नाहीये. पण आय वॉज पार्ट ऑफ इट. अन पाहीलेले आहे.

मग कोण्या आत्म्याला गांधीजी/नेहरु किंव अखापरपणजोबा/पणजी ही क्वचित बोलावलं जायचं की आलात तर येस वर या. शांत राहून कॉन्सन्ट्रेट केलं की थोडी थोडी हलायची वाटी. व शेवटी जोरात हलायला लागायची. अन सर्वांची बोटे वाटीवर सेंटरला. त्यामुळे तसेच मी नीरीक्षण केलेले तेव्हाही कोणीही आपण होऊन प्रयत्न करताना अज्जिबात दिसत नसे पण वाटी हलायची.

बाकी त्यांनाच करायचं असायचं वाटी हलायची हे खरे आहे. एकदा राग येइल असा प्रश्न विचारला तर जोरात इकडून तिकडे हलायला लागली.
कोणीही सरकवताना दिसायचे नाही पण वाटी सरकायची. बरं सर्वांचा फोर्स व्हर्टीकल असायचा (अर्थात फोर्स अप्लाय करायचाच नसतो, हलके बोट ठेवायचे असते.) पण वाटी हॉरिझॉन्टल सरकायची.
आईच्याने कधी व्हायचेच नाही. काकू, मी , काका व बाबा आमच्याने व्हायचे.

असो.

-Nile

निळे मी माझा अनुभव चक्षुर्वै सत्यं नाकारु तर शकत नाही Sad बाकी वाटी कोणी हलवत असेलही पण मला ते दृगोचर झाले नाही कधीच.

आमच्याकडे वडील कमी धार्मिक तर आई जरा अधिक धार्मिक स्वभावाची आहे. मी अधेमधे कुठेतरी आहे. पूर्णपणे नास्तिक होणे जरा अवघड आहे कारण स्वत:ला येणारे वैयक्तिक पातळीवरील काही अनुभव असे असतात ज्यांची तार्किक-वैज्ञानिक कारणे देणे अवघड होऊन बसते.विज्ञानालाही आपल्या मर्यादा आहेत व राहणारच आहेत. जोवर आपण स्वत: परिशीलन करून नवा विचार मांडू शकत नाही तोवर पारंपरिक विचार त्यागण्यात काही अर्थ नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. केवळ वादविवादाने,सांगणार्‍याच्या-लिहिणार्‍याच्या वक्तृत्वाने-व्यक्तिमत्वाने-लेखनशैलीने प्रभावित होऊन एखाद्याचा आध्यात्मिक/धार्मिक विचार/अनुभव जसा मी मानत नाही तसा एखाद्याचा विवेकवादी/नास्तिकतावादी विचारही.स्वत:चा अभ्यास,अनुभव व चिंतन महत्त्वाचं.

परंतु आस्तिकता/धार्मिकता ही माझ्याकरिता ओब्सेसिव्ह नाही. उदा. मी आयुष्यात एकदाच कलकत्त्याला गेलो. तिथे कालीमातेच्या मंदिरापर्यंत भर उन्हात ०२-०३किमी पायपीट करत गेलो. पण बाहेर पंडे लोकांशी पैसे घेण्यावरून वाद झाल्यामुळे दर्शन न घेताच परतलो.मला त्याचे काही वाईट वाटले नाही.उलट कलकत्त्याच्या रस्त्यारस्त्यातून आणि माणसांच्या चेहर्‍यावरून ओसंडणारे दारिद्र्य पाहून कधी एकदा त्या गावातून पळून जातो असं झालं होतं. असो.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

मी आपले सगळे प्रश्न लिहून काढले, मग त्यांची ऑब्जेक्टीवली उत्तरे दिली, त्यावरून गुण दिले तर सरासरी गुण सरासरीएवढेच आले. म्हणजे-

आईवडील सरासरी धार्मिक, मी सरासरी धार्मिक.

आपल्या स्केलनुसार- २/२.

पण हे बरोबर वाटत नाही. माझे वडील जितके धार्मिक आहेत तितका धार्मिक होण्याची मी फक्त आशाच करू शकतो. धर्मग्रंथांचा अभ्यास, कर्तव्यकठोर असणं, क्षमाशीलता, इ. निकष वरचे गुण देताना वापरलेले नाहीत. मी जर धार्मिकतेच्या कसोट्यांमध्ये हे निकष घेतले, तर माझे वडील अत्यंत धार्मिक असतील आणि मी फारच कमी. माझ्या स्केलनुसार- १/३

हे चांगलं की वाईट असं म्हणलात तर वाईट असं मी म्हणेन. इच्छेनं नाही, तर कमकुवत असल्याने मी माझ्या वडलांपेक्षा कमी धार्मिक आहे.

कमकुवत असल्याने आपण कमी धार्मिक आहात असे आपल्याला का वाटते? मला तर मी कमकुवत असल्याने धार्मिक आहे असेच वाटते. उदा अंधारात मी लहानपणी रामरक्षा म्हणे. पोट दुखताना , मळमळताना मला देव आठवे वगैरे.
सर्व नास्तिक मला कमालीचे स्ट्रॉन्ग वाटतात.

स्ट्रॉन्ग म्हणजे headstrong का?

शक्य आहे. अधार्मिक दहशतवाद(!) फारतर वैचारिक पातळीवरच बोकाळलेला दिसतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्ट्राँग असणे आणि आस्तिक-नास्तिक असणे याचा काहीएक संबंध नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे माहीत आहे. पण म्हणूनच असं मला वाटतं असे लिहीले,

पुरेसं स्पष्ट झालं नाही का ? काहीतरी लिहायचं राहिलं का?

धार्मिकता या शब्दाचा मी जो अर्थ घेतोय, त्यानुसार हे लिहिलंय...

धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यावर सगळ्या नाही, तरी काही काही प्रश्नाची उत्तरे नक्कीच मिळू शकतील. आपल्याला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता असूनसुद्धा ती मिळवण्याचा प्रयत्न न करणे, हे कमी धार्मिकपणाचे असले तरी चांगले नक्कीच नाही.

कर्तव्य कठोर असणे, हेही मी धार्मिक माणसाचं एक परीमाण म्हणत आहे. जर तुम्ही आपल्या कर्तव्यात कुचराई करत असाल, तर तुम्ही धार्मिक कसे? कुठलाही धर्म तुम्हाला तुमच्या कामाच्या आड येणार्‍या गोष्टींचं कौतुक करून, काम नाही केलं तरी चालेल असं सांगतो का?

क्षमाशीलता हेही मी धार्मिक असण्याचं एक परीमाण मानलेलं आहे. इथे एक साधा धक्का कुणी मारला जाता जाता तर मी ते पटकन विसरू शकत नाही. पराकोटीची क्षमाशीलता असणारा माणूस धार्मिक असला पाहिजे.

दुर्दैवाने ह्या तीन गोष्टीत मी माझ्या वडलांपेक्षा कमी पडतो. त्यामुळे मी कमी धार्मिक दिसत असून ही गोष्ट मला लाजिरवाणी वाटते.

मत नोंदवलं आणि ही कल्पनाही आवडली.

मत तर दिलंय की आई-वडील २ आणि मी ३ म्हणून पण हे कप्पे ओव्हर्लॅपिंग असतात याची काही मजेशीर उदाहरणे.
खरं तर आई नास्तिक म्हणावी एवढी स्पष्ट आहे. पण बाबा आळस करतात तेव्हा देव आहेत म्हणून रोज देवांची पूजा ती करते. पण देवांच्या जवळचा तेलाचा दिवा विझला की बाबा कासाविस होतात , आई म्हणते "पाहिजे कश्याला तो दिवा, लाईट आहे ना?" रारामरक्षा, स्त्रोत्र वैगेरे पाठांतर दोघांचही आहे. पण आम्हाला आवर्जून काही शिकवलेलं नाही किंवा म्हणायला लावलेलं नाही. आजी सकाळ संध्याकाळ काही बाही म्हणायची देवाच्या पाया पडायची पण नवस वैगेरेच्या विरुद्ध होती. "उठी गोपाळजी जाई धेनुकडे वाट पाहती संवगडे तुझी" किंवा कैलासराणा शिवचंद्रमौळी फणीन्द्र माथा मुकुटी झळाळी" हे सकाळी उठल्यावर सगळी कामं आटोपताना ती म्हणत असायची त्यामुळे हे कुठे दिसलं ,ऐकू आलं की तिची आठवण होउन बरं वाटतं.

पूर्वी मी देवपूजा आवडणारी वैगेरे होते. बराच काळ अगदी समजण्याच्या वयापर्यंत होते पण देवभोळी नव्ह्ते. विवेकाला वाव होताच. संस्कृत स्त्रोत्र आवडतात पण आवर्जून काही म्हणत नाही.
अगदी कॉलेजला असतानाही दर गुरुवारी नियमित देवळात जायचे. पण ते बंधन नंतर नकोसं वाटायला लागलं आणि निरर्थकसुद्धा.
लग्नानंतर नविन संसार थाटताना, देवांनाही जागा दिली होती. सकाळी हात पण जोडायला वेळ नसायचा. त्यात संध्याकाळी मी देवासमोर दिवा लावला की बाहेर जाताना नवरा तो फुंकर मारुन विझवायचा जे माझ्या कोकणी मनाला नकोसं वाटायचं. मग दिवा लावणं बंद केलं. काही वर्षांनी नवरा म्हणाला "लावत जा दिवा बरं वाटतं घर असल्यासारखं. म्हटलं "तू आधी येतोस तू लावत जा. " पण पुन्हा तेच रोजचं निरर्थक बंधन नकोसं दोघानाही. घरात आमच्याबरोबर देव आहेत पण दोघांनाही एक्मेकांची बंधनं नाहीत. आमचं अमुकप्रकारेच भलं कर असं बंधन त्या देवांवर नाहीत आणि त्याच्या दिवाबत्तीच्या सोयीचं बंधन आमच्यावर नाही.

मुलीला आवर्जून काही शिकवलेलं नाही. पण ती बर्^यापैकी नास्तिक. तरी मजा म्हणजे आजी संस्कृत शिकवते म्हणून फक्त संस्कृतच्या पेपरला जाताना आजीच्या पाया पडते. (पर्यायाने आमच्या पाया पडणं नाहीच कारण आम्ही काहीच शिकवत नाही)
देव आहे किंवा नाही याचा निकाल लावणे माझ्या बुध्दीला झेपणारं नाही त्यामुळे ठाम नास्तिकताही नाही पण रोजच्या व्यवहारात सारख्या देवाच्या कुबड्या घ्यायची गरज नाही भासत. नास्तिक होण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो जो शून्य आहे त्यामुळे कुंपणावर. पण सध्या रस्त्यावर येणार्^या देवादिकांमुळे लवकरच दुसर्^या टोकाला पोहोचेन ही खात्री होत चाललीय.

संस्कार या दृषटीने मुलीवर असे संस्कार करण्याची गरज नाही वाटली. त्या मुळे गुढीपाडव्याची शोभायात्रेला "कधीच गेली नाहीस तू ?" असं विचारणार्^या मैत्रिणीला " तू तरी गेलीयस का कास पठारावर फुलं बघायला किंवा बटरफ्ल्याय गार्डन बघायला" असं मुलीने विचारलं तेव्हा मला फार बरं वाटलं.

आई-वडिल आणि मी = ४:४.
तीन म्हणजे कमी धार्मिक म्हणता, तर आमच्यासारख्या अल्पसंख्यांसाठी ४ = शून्य धार्मिक ही श्रेणी हवी होती.
माझ्या काकांकडे आणि आईकडे प्रचंड धार्मिक वातावरण. दोन्हीकडे, सणवार्,सत्यनारायण, मंत्रजागर अगदी धूमधडाक्यात.
का कोण जाणे, पण माझ्या वडिलांचा यावर कधीच विश्वास नव्हता. लग्न झाल्यावर आई-वडिल मुंबईला आले. त्यांची पुण्याच्या कर्मठ वातावरणातून सुटका झाली. मुंबईच्या खडतर आयुष्यांत त्यांच्यावर अनेक कठीण प्रसंग आले. पण, त्या सर्वांना त्या दोघांनी स्वतःच्या हिंमतीवर तोंड दिले, कधीही देवाचा धावा केला नाही. घरी अर्थातच देव नव्हते.आम्ही संपूर्णपणे नास्तिक वातावरणांत वाढलो. कदाचित त्यामुळेच, स्वभावातील पळपुटेपणा नष्ट झाला. जे समोर येईल त्याचा स्वतःच्या हिंमतीवर मुकाबला करायचा. घरांत फुले आणली तर ती फक्त फ्लॉवरपॉट मधे ठेवण्यासाठी.
घरापासून सिद्धिविनायकापर्यंत अनवाणी पायी चालत जाणार्‍यांचे कधी कौतुक वाटले नाही. उलट, खाकर्‍या-थुंक्या आणि बेडक्यांनी भरलेल्या रस्त्यांवर ही मंडळी अनवाणी चालण्याचा घाणेरडेपणा कसा करु शकतात, असा प्रश्न , मनांत येतो.
वडिलांच्या एका वाक्याची कायम आठवण येते. जेंव्हा, एखादी अन्यायाची परमावधी होणारी बातमी वाचायचे, तेंव्हा ते म्हणायचे," अरेरे, या जगांत देव असता तर किती बरं झालं असतं!"

एखादी अन्यायाची परमावधी होणारी बातमी वाचायचे, तेंव्हा ते म्हणायचे," अरेरे, या जगांत देव असता तर किती बरं झालं असतं!"

क्या बात है! well said!

वर म्हटल्याप्रमाणे ओव्हरलॅपिंग गोष्टी बर्‍याच असतात. माझ्या घरी आई धार्मिक/अध्यात्मिक आहे, वडिल त्या मानाने कमी धार्मिक पण अध्यात्मावर प्रचंड श्रद्धा असलेले आहेत. पण दोघेही माणसांच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणारे आहेत. घरात रोज देवपूजा/संध्याकाळची दिवाबत्ती होते पण त्याचं अवडंबर/अट्टाहास होत नाही. पापपुण्याच्या हिशोबात दोघांनीही कधी बोलल्याचं ऐकलं नाही. उलट लहानपासूनची मला मिळालेली शिकवण 'चांगला वाग, दुसर्‍याला त्रास होईल असं वागू नकोस' अशा प्रकारची आहे. माझं म्हणाल तर देवपूजा वगैरे रोज करतो, आणि ते आवडतंसुद्धा. पण एखादे दिवशी उशिर झाल्याने किंवा इतर अडचणींमुळे जर जमलं नाही तर त्याचं वाईट वाटत नाही. तीर्थयात्रा वगैरे प्रकर्षाने टाळतो. ध्यानधारणा वगैरेवर विश्वास आहे, करतोही. स्तोत्र वगैरे म्हणायला आवडतं. सध्या परिस्थिती आईवडील १.५- मी १.५ अशी आहे असं वाटतंय.

आई-वडील १.
देवावर भरपूर श्रद्धा असलेले. रोज पुजा. नियमीत देवळात जाणे. उपास करतात. विटाळ शिवाशीव नाही. नवस बोललेला देखील कधी पाहिलेला नाही.

मी २. देव आहे का नाही याच्याशी घेणं देण नाही, पण त्या संकल्पनेची गरज आहे असं वाटतं. मी स्वतः घेतो त्याचा आधार काही टेन्स सिचुएन्शन्समध्ये.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

स्त्रियांच्या बाबतीत सासरचे घर हा ही एक फॅक्टर असावा. कारण कित्येकदा तुम्ही ज्या घरातून आलात आणि ज्या घरात पोचलात यामधे धार्मिक-अधार्मिक वातावरणात जमिन-अस्मानाचा फरक असु शकतो.

माझ्याच बाबतीत पहा ना;

आई १ : रोजची पुजा-अर्चा, रामरक्षा ईत्यादी स्तोत्रे नियमीत. वैभवलक्ष्मीचे व्रत बरीच वर्शे करत होती...(कधी फळलं नाही ते सोडा..!!), आम्हां तिन्ही मुलींनांही गणपतीस्तोत्र, शुभंकरोती, मारुतीस्तोत्र, मोरया मोरया मी बाळ तान्हे ई.ई. स्तोत्रे रोज संध्याकाळी नियमीत म्हणायची सक्ती करायची. आमची लग्ने जुळावीत म्हणून कसली कसली व्रते उदा. रुक्मिणी व्रत (?) असे काही काही आम्ही करावीत अशी तिची मनापासून ईच्छा असे. वस्तू हरवली की कार्तविर्यर्जुनाचा मंत्र अजुनही म्हणत राहते. ती पण भरपुर वाचन करते पण जरा योगिनी जोगळेकर टाईप.

तरिही विटाळ - शिवाशीव ईत्यादी पाळत नव्हती.

दादा २ : संशयीत धार्मिक. देवावर फारसा विश्वास नाही. पण कधी स्पष्ट बोलले नाहीत. पुजा करणे मात्र टाळायचे. मुलीचे लग्न जुळावे म्हणून आईने त्यांना शनीच्या देवळात तेलाचा दिवा लावायला पाठवले. असे ११ शनिवार करायचे होते. त्या देवळात जाईपर्यंत त्यांच्या जिवातजीव नव्हता की कोणीतरी मला हे असलं विचित्र करतांना पाहील. ते अर्ध्या रस्त्यातूनच परत फिरले. अर्धा शनिवारही हे व्रत न सांभाळल्याने आमची लग्ने उशिरा झाली... Wink वाचन भरपुर. शक्यतो ईंग्लिश.

मी ३ : खरं म्हणजे ४ आणि ५ : पण हे पर्याय नसल्याने तिसरा निवडला. माझ्या अश्या असण्याचे श्रेय पुर्णपणे घरातूनच आलेल्या वाचनाच्या आवडीला आहे. आधी अर्थातच धार्मिक होते. स्तोत्रे म्हणायचे. एकदा पाचवी सहावीत असतांना तर कुठेतरी बाहेर जायचे होते तेंव्हा अचानक भरपुर पाऊस पडू लागला. तो थांबावा म्हणून मी देवासमोर मांडी घालून बसले आणि 'शरण तुला..." मंत्राचा अखंड जप सुरू केला. पाऊस आण्खीन वाढला आणि पुढचे ४ दिवस थांबलाच नाही....

विचार हळु-हळू वळत गेलेत. पुजा करण्याचा कंटाळा होताच. तरिही परी़क्षेला जातांना देवाला नमस्कार व्हायचाच. हे ही प्रयत्नपुर्वक थांबवले. आणि त्यामुळे निकालावर काही फरक पडत नाही हे पण यथावकाश लक्षात आले. एकदा परिक्षेच्या आधी एका अंगात आलेल्या बाईच्या पाया पडायला आईने पाठवले होते. मी नमस्कार केल्यावर त्या म्हणाल्या "पहीला नंबर येणार आहे हां...पण अभ्यास भरपुर करावा लागेल" . अर्थात हे काही रॉकेट सायंन्स नाहिये. हा प्रसंग बहुतेक माझ्या मनात नास्तिकतेची पहिली ठिणगी पाडून गेला. तसेच त्या बाईंच्या अशिर्वादाने निपुत्रीकांना मुले व्हायची अशी त्यांची ख्याती होती. पण त्यांना स्वता:ला मुल-बाळ नाहीये, यातला विरोधाभासही पहील्या नास्तिक दर्शनाचे कारण ठरला असावा.

आता फारच शेफारलेय मी!!

सासु-सासरे -१ (उणे एक) : हि पण एक श्रेणी हवी होती ईथे. सासु-सासरे अतिप्रचंड धार्मिक. मुळ नागपुरचे आणि त्यातून देषस्थ असे डेडली काँबो असल्याने घरात पुर्ण वर्षाचे सगळे सण-वार! कुळाचार, करंज्या, पात्या बारा भानगडी !! नागपंचमीचा सण माहित होता. पण त्यादिवशी झाडून सगळ्यांच्या नावाचे, अगदी चुलत घराच्या नावाचेही दिवे बनवायचे, हा अतिप्रसंगच होता. एक एक वेळेला त्या दिवशी घरात २२ गोड पदार्थ बनायचे ! प्रत्येक कुळाचाराला पुरणपोळीचा अत्याचार असायचाच. वर्षातून १२-१५ वेळा तरी पुरणपोळ्या बनत असाव्यात. आधी गणपती १० दिवस असायचे. ते दिड दिवसावर आणले. पण त्या दिड दिवसात १० दिवसांची झाडून सगळी कर्मकांडं ! श्रावण आणि चातुर्मास म्हणजे तर उत नुसता. सणावारांना शिवा-शीव, विटाळ आवर्जून पाळला जायचा.

ईथे माझी मतं जाहीर करणं म्हणजे पराकोटीचा संघर्ष होता. तसच वयातल अंतर पाहता ते लोक बदलणही अशक्य होतं. पण तरिही धीमेपणाने का होईना माझ्यापुरता बदल मी घडवलाय. विरोध होतोच पण तरिही माझे छोटे छोटे लढे मी लढतेच आणि चक्क जिंकतेही. कसलेही उपास, व्रते ई. मी करत नाहीच.

ईतक्यातच मला सवाष्ण म्हणून जेवणाचे आमांत्रण आले होते. त्या जेवणाच्या आधी अर्धा दिवस उपास ठेवायचा होता. मी सवाष्ण म्हणून जाणे साफ नाकारले. छोटा प्रसंग वाटला तरी सवाष्ण जाण्याचे नाकारणे म्हणजे काय असते हे माझ्या जागी असल्याशिवाय नाही कळू शकणार. चक्क त्यांच्या मुलाच्या आयुष्याशीच खेळ की !!

सर्व्हे साठी: पालक - मी = २ - ३

नागपूरचे आणि त्यातून देशस्थ म्हणजे काय? कोकणातले नाहीत म्हणजे देशस्थच ना?
की देशस्थ ब्राह्मण म्हणायचे आहे? क्षमस्व पण ऐसीवर येणारे सगळेच याबाबत जाणकार किंवा ब्राह्मण नसतात त्यामुळे हे सगळ्यांनाच कळत नाही आणि त्याने काय फरक पडतो तेही कळत नाही.

सगळेच देशस्थ देशावर राहात नाहीत, तसेच सगळेच कोकणस्थ कोकणात राहात नाहित.

ब्राम्हणांमधल्या चालिरितींविषयी भाष्य केले असल्यामुळे तो शब्दप्रयोग केलाय. तरी हा जातीविषयक प्रतिसाद नाही. देशस्थ आणि कोकणस्थ ब्राम्हणांमधे सणवार, रिती-भाती, कर्मकांड यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तरी एक सर्वसाधारण विधान म्हणून कोकणस्थ जात्याच आटोपशीर तर देशस्थ अघळपघळ असे समजले जाते. देशस्थांमधेही नागपुर किंवा एकंदरीतच विदर्भ प्रांतात असणार्‍या असणार्‍या देशस्थांकडे सगळे सणवार जास्तच मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात असे दिसते.

नागपुरचे आणि देशस्थ हा अघळपघळपणाचे निदर्षक असलेला एक वाक्प्रचार सदृष्य आहे. अर्थात असा अघळपघळपणे तो वापरणही चुकच, हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!!

प्रतिसादांबद्दल मनापासून आभार.

नास्तिकता, बंडखोरी, स्वतंत्र विचार या गोष्टी जन्मापासूनच, संस्कार असल्यासारख्या घरातूनच मिळाल्यामुळे कधी कधी त्याची किंमत लक्षात राहत नाही. लादल्या जाणाऱ्या रीतीभाती कोणे एकेकाळीच कचऱ्यासारख्या घराबाहेर टाकल्यामुळे आयुष्य आता किती सुखासमाधानाचं झालंय हे ही विसरायला होतं.

---

पण त्या पुरणपोळ्या मला चालतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझे आईवडील धार्मिक होते की नाही याविषयी शंका आहे. म्हणजे आमच्याकडे रोज पूजा केली जाई. कधी कधी मी सुद्धा करीत असे.

दत्ताचे देऊळ चाळीला लागूनच असल्याने* गुरुवारी दत्ताच्या देवळात जाणे आणि शनिवारी मारुतीच्या देवळात जाणे हे होत होते. शिवाय शनिवारी उपास (=साबुदाण्याची खिचडी Wink ) केली जाई. या सगळ्यात त्या दत्तावर, मारुतीवर श्रद्धा असण्याचा भाग किती होता ही शंका आहे. एक रूटीन म्हणून ते केले जाई.

*अगदी लहान असताना मी त्या देवळात सकाळ संध्याकाळ आरत्यांच्यावेळी जात असे.

एवढे सोडले तर विटाळ शिवाशिव वगैरे माझ्या आठवणीत (मला समजू लागल्यानंतरचे आठवतय तोवर) तरी पाळले गेले नाहीत.

आयुष्याच्या एका टप्प्यावर वडील काहीसे धार्मिक (श्रद्धाळू) झालेले पाहिले. त्याला (अगतिकतासदृश) काही कारण होते हे ठाऊक आहे.

मी साधारण कॉलेजात जाऊ लागल्यापासून वरील गोष्टी करणे बंद केले. त्या करण्याविषयी त्यांनी कोणताही दबाव आणला नाही.

वरच्या पर्यायांमध्ये रूटीन पाळणे म्हणजे धार्मिक असणे असे गृहीतक दिसते. परंतु मला वाटते की माझे आईवडिल अनेक रूटीन पाळत होते पण ते धार्मिक नव्हते (श्रद्धाळूही नव्हते- एखादेवेळी जेवले नाही तर काही बिघडत नाही हे माहिती असलेला मनुष्य जसा तरीही वेळ झाल्यावर जेवतो तसे त्यांचे होते).

मी मुळीच धार्मिक/श्रद्धाळू नाही. नास्तिक आहे. तो पर्याय इथे नाही. तो हवा होता. [तरी एखाद्या पर्यटनस्थळी गेल्यावर तिथल्या देवळात जातो आणि (टेक्निकली) नमस्कारही करतो].

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

* आईवडील २, मी खरं तर ४ किंवा ५.
* 'देवपूजा ही भातुकली' असल्याचं माझ्या आईचं मत आहे, पण तरी ती आस्तिक आहे. कर्मकांडात्मक धर्मावर तिचा अजिबात विश्वास नाही. पण नैतिकतेचे अधिष्ठान म्हणून धर्म तिला मान्य असावा.
* मला लहानपणी भरपूर स्तोत्रे शिकवलेली होती, आणि मी ती आवडीने म्हणून, वर अजून नवीन पाठ करायला पण तयार असायचे.
* माझे बाबा बर्‍यापैकी धार्मिक, आस्तिक आहेत, तरी वर्षातून फक्त दोन-तीन वेळा घरच्या देवांची पूजा करतात. (गणपती, दिवाळी, गुढीपाडवा वगैरे निमित्ताने!) आवर्जून देवळात वगैरे जात नाहीत. पण सामाजिक वर्तनावर नियंत्रण ठेवणारी धर्माची जी चौकट असते, ती त्यांना फार मान्य आहे. स्वतः फार धर्म पाळत नसले, तरी धर्मसंस्थेवर त्यांचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा अधार्मिक वर्तन (उदा. कुंकू न लावणे, धार्मिक विधीशिवाय - सिव्हिल - लग्न करणे इ.) केलं, तेव्हा तेव्हा त्यांचं-माझं कडाक्याचं भांडण झालं आहे.
* देवावरचा आणि धर्मावरचा माझा विश्वास कॉलेजात असताना हळुहळू उडत चालला होता. पण त्यावेळी (संस्कृतच्या) अभ्यासक्रमात गीता होती, तिचा मी कसून अभ्यास करत असल्याने, 'देव नसला तरी आत्मा आहे' अशी माझी काही काळ श्रद्धा होती. मग दुर्गाबाईंच्या एका पुस्तकात एक बौद्ध संदर्भ वाचनात आला - जसा दिवा विझतो, तसा मृत्युकाळी माणूस विझतो - त्यातून आत्मा बित्मा कुठे निघून जात नाही, अशा अर्थाचा. ते वाचून माझ्या मनातल्या बर्‍याच प्रश्नांचा उलगडा झाला. (हा धार्मिक संदर्भ वाचल्यानंतर) मी पूर्णतः नास्तिक झाले! नंतर धर्माची चौकटपण उडवून लावली. आता मी फारच उनाड आहे Wink
* खूप वर्षं हॉस्टेलमधे राहिल्यामुळे कुठलीच धार्मिक बंधनं तोंडदेखलीसुद्धा पाळायला लागली नाहीत. त्यामुळे सासरी आल्यावर फार पंचाईत झाली (माझ्यापेक्षा माझ्या सासरच्यांची!). सासूबाई वरच्या निकषांवर १ नंबर आहेत, पण त्यांनी मी आणि माझ्या नवर्‍यापुढे आता हात टेकले आहेत Wink

वरील दिलेले निकष उपासना पद्धती बाबत आहे, धार्मिकते बाबत नाही आहे. मी धार्मिक आहे , धर्माच्या १० लक्षणांपैकी बहुतेकांचे पालन करण्याचा यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न करत राहतो.

बाकी देवाची उपासना कश्या रीतीने करायची या बाबत.(अर्थात वरील दिलेल्या निकषांवर)

घरात देवासाठी जागा आहे. पण मी वर्षातून १-२ वेळा बहुतेक मजबुरी में पूजा करतो. सौ. दररोज पूजा करते. २-३ वर्षाकाठी सत्यनारायण करतो. (सौ.च्या इच्छेचा हि सम्मान करणे भाग आहे).

लहानपणी नित्यनेमाने शुभं करोति, रामरक्षा, संध्याकाळी वडील घरी आल्यावर म्हणत असे.
गेल्यावर्षी पासून मुलाने गणपतीची स्थापना व पूजा १० दिवस करण्याची नवीन परंपरा सुरु केली आहे.

गेल्या ७-८ वर्षांत अनेकदा गंभीर आजारी पडलो तरी कुणाला पत्रिका दाखविली नाही किंवा घरात कुणी नवस इत्यादी बोलले हि नाही.

वरील दिलेले निकष उपासना पद्धती बाबत आहे, धार्मिकते बाबत नाही आहे. मी धार्मिक आहे , धर्माच्या १० लक्षणांपैकी बहुतेकांचे पालन करण्याचा यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न करत राहतो.

हा चांगला मुद्दा आहे. मी मांडलेले निकष हे बाह्य वर्तनाबाबत आहेत, आणि प्रत्येकाला आपली व आपल्या आईवडिलांची तुलना करण्यासाठी उपयुक्त व्हावेत, त्यांनी वेगवेगळ्या अंगांचा विचार करावा यासाठी ते दिलेले आहेत. पण बहुतेक वेळा आपल्या आईवडलांचे आंतरिक विश्वास मुलांना या उपासनेपलिकडेही जाणवतात. किंबहुना अनेकांनी वर त्या स्वरूपाची विधानं केलेलीही आहेत. (माझी आई पूजा वगैरे करायची पण मनातनं ती बरीचशी नास्तिक होती या स्वरूपाची...)

धर्माच्या १० लक्षणांविषयी अधिक विस्ताराने लिहिता येईल का?

प्रतिसाद वाचले नाहीतच.
धाग्यातील फक्त चॉईसेस पाहिलेत व आईवडिलांची स्वतःशी तुलना करायचा प्रयत्न पाहिला.
गुरुजी,
आमच्या मातोश्री प्रचण्ड धार्मिक होत्या. पिताश्री शून्य.
या काँबोचा हिशोब कसा करावा? व्हाय आर आई-वडील क्लब्ड अ‍ॅज आई+वडिल?

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

व्हाय आर आई-वडील क्लब्ड अ‍ॅज आई+वडिल?

या कौलाचा हेतू असा आहे की आपण ज्या वातावरणात वाढलो ते वातावरण आणि त्यातून बाहेर पडताना आणि स्वतःच्या विचारांनी घडलेले आपण यात तफावत किती आहे? दुसऱ्या बाजूने असंही म्हणता येईल की मागची पिढी आणि आत्ताची पिढी यात आंतरिक धार्मिक मनोवृत्तीत एका विशिष्ट दिशेला फरक दिसतो का? सार्वजनिक जीवनात तर हे स्तोम वाढल्यासारखं वाटतं आहे - त्याचं कारण नवीन पिढीच अधिक धार्मिक आहे का? या प्रश्नांची उत्तरं द्यायची तर फक्त आई किंवा फक्त वडील असा विचार न करता एकत्रित विचार करून तुलना करावी अशी इच्छा आहे.

या कॉंबोचा हिशोब तुमच्या मनाने हवा तसा करा. उत्तर अचूक असलंच पाहिजे असं नाही. जे काही उत्तर लिहाल त्याला कुठेतरी मर्यादा असणारच - पण ते सगळ्यांच्याच उत्तरांना लागू पडतं. तेव्हा सरासरीने यातनं काहीतरी पॅटर्न दिसू शकेल. आणि तसाही हा कौल अगदी मर्यादित आहे - ऐसीवर येणाऱ्या, जरा जास्तच शिकलेल्या, बुद्धीजीवी लोकांचा. त्यामुळे फार डोक्याला ताप देऊ नका.

कौलात दिलेल्या उत्तरांपेक्षाही इथे लोकांनी स्वतःचे अनुभव मांडले आहेत ते मला जास्त रोचक वाटतात.

माझे आजोबा "३" होते. देवळात गेले तरी बाहेर बसणार, किंवा स्वयंपाकघरातल्या डब्यांना रिठा / ब्रासो लावण्याचा वार्षिक कार्यक्रम करतानाच त्या ढिगात देवही ढकलणार. ते तसे का झाले हे मी त्यांना कधी विचारलं नाही. एवढ्या गंभीर चर्चा करायचं माझं वय होण्याआधीच ते गेले.

आई-बाबा "२" आहेत. बाबाची अनेक वर्षं फिरतीची नोकरी होती. कामानिमित्त काशी, रामेश्वर, गुवाहाटी वगैरे ठिकाणी गेल्यावर आवर्जून देवळांबिवळांत जाऊन यायचा. आईचंही असंच. घरात सत्यनारायण क्वचितच झाला आहे. आधीच्या घराची वास्तुशांतही केली नव्हती.

माझ्या स्वतःच्या धार्मिकतेबाबत मात्र मी जरा गोंधळात आहे. जेव्हा एखादी गोष्ट माझ्या कंट्रोलच्या बाहेर असते, तेव्हा हमखास देवाची आठवण होते. (उदा० परीक्षांचे निकाल, पाहिजे त्या विद्यापीठात प्रवेश, वगैरे)

कदाचित "ही गोष्ट माझ्या कंट्रोलबाहेर असली तरी तिला कंट्रोल करणारं काहीतरी मेकॅनिझम असलं पाहिजे" असा विचार असेल, आणि त्या मेकॅनिझमला मी देव म्हणत असेन. काय की.

वेळोवेळी "ओह् लॉर्ड" म्हणणारा शेल्डन कूपर एकदम जवळचा वाटतो.

मत देणार नाही.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दिलेले निकष अपुरे आहेत कारण यांत कुठेच धड न बसणारे कैकजण परिचयाचे आहेत. रूढ अर्थाने धार्मिक नसलेले परंतु अध्यात्मावर विश्वास असणारे, कर्मकांड न पाळणारे परंतु सांस्कृतिक वारशाच्या अनेक रूपांबद्दल सहानुभूती असणारे यांची वर्गवारी करायला वरील निकष एकदम अपुरे आहेत. अशा लोकांची संख्याही कमी नाही. एकूण सश्रद्ध-अश्रद्ध फरकात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे धार्मिकतेच्या व्याख्येत वरील पैलूंचा समावेश करणं योग्य ठरेल असे मत आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हेच निकष वापरा असं म्हटलेलं नाही. 'या या गोष्टींचा विचार करू शकता' असा मदतीचा सल्ला आहे. या सगळ्यापलिकडे मुलांनी आपल्या आईवडिलांबरोबर इतका वेळ घालवलेला असतो की त्यांना आपल्या आईवडिलांचा स्वभाव, त्यांची विचार करण्याची पद्धत, वागण्याची पद्धत हे व्यवस्थित माहीत असतं. स्वतःविषयीही तेच. त्यामुळे आईवडिलांशी स्वतःची तुलना ही बऱ्यापैकी बरोबर असेल अशी आशा आहे.

तुम्हांला अभिप्रेत असलेली तुलना अजून व्यवस्थित करण्यासाठी ते अ‍ॅडिशनल पॉइंट्स मदतीला येतील असे आणि इतकेच सांगायचे आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जरूर घ्या. तुम्ही नक्की कुठचे निकष वापरता हे महत्त्वाचं नाही. कदाचित वेगवेगळे निकष लावून तुम्ही आत्तापर्यंत निष्कर्ष काढलेलाही असेल. तो सरळ वापरला तरीही चालेल.

गुर्जींनी सांगितल्याप्रमाणे मी फक्त मत दिलं....
इथे वरती अभिप्रायही द्यायचाय हे ठाऊक नव्हतं...
तरी या विषयावर जे काही म्हणायचंय ते इथेच लिहून संपवलंय! अजून नवीन काय लिहिणार?
http://www.misalpav.com/node/2522

आईवडिल१ मी३ हा जवळचा पर्याय वाटतो.
गरजेनुसार अस्तिक गरजेनुसार नास्तिक व गरजेनुसार अज्ञेयवादी असण हे व्यवहार्य वाटते.आता कोणी याला दांभिक म्हणू शकतात. तरीपण व्यक्तिचा साधारण कल लक्षात येत असतो.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माझे आई-वडिल आणि मी नास्तिक नाही. पण तरी देव-धर्म इ. चे घरातले प्रमाण अत्यल्प म्हणजे जरूरी पुरते.
म्हणजे ३-३ असे असेल बहुदा .
आई थोडी जास्तं धार्मिक ... म्हणजे परंपरा , प्रथा सांभाळायला पाहिजे असे मानणारी , पण कट्टर अजिबात नाही.

आमच्या घरी देव होते. फक्तं लक्ष्मी आणि बाळकृष्णं . रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे, शुभंकरोती वगैरे आम्ही करायचो. पण पुजा वगैरे नाही. आमच्या वाड्याच्या जवळ दोन तिन मंदिरे होती. रामनवमी, गणपती, नवरात्रं, संक्रांत इ. समारंभ तिथे आणि वाड्यातल्या प्रत्येकाकडेच असायचेच. त्यामुळे आमच्याकडेपण... आमच्या घरचे देव माझ्या दुसर्‍या काकांकडे होते (जे आमच्याच वाड्यात रहात होते) . त्याच्याकडे देवघर, देवाची उपकरणी वगैरे सगळे होते. एक गुरूजीबाबा (वेलणकर) रोज सकाळी पुजा करायला यायचे. आणि सगळे सण वार. लग्नं, मुंजी साग्रसंगीत गुरूजीबाबांच्या सल्ल्य्यानुसार व्हायचे. आमच्याकडे जोगवा मागायला दोघीजणी यायच्या दर महिन्याला. आणि आई त्यांना सगळा शिधा द्यायची. पण इतकच.
देवदर्शनासाठी म्हणुन कुठे आम्ही कधीच गेलो नाही. पण प्रवासा दरम्यान जर कुठले मंदिर असेल तर नक्की दर्शनासाठी जाणे व्हायचे. पण तिर्थयात्रा वगैरे नाही.
शिवाशिव, जातपात, सोवळेओवळे वगैरे काहीच नव्हते, अजूनही नाही. आम्ही कधी कुणाचीच जात काढली नाही. पण आमच्य शेजारच्या वाड्यातली लोक आम्हाला कधी कधी 'बामणाची पोरं' असे म्हणायचे. त्यामुळे आम्ही ब्राम्हण आहोत हे माहिती झाले होते.
माझा कुठल्याही कर्मकांडावर अजिबात विश्वास नाही. आईचा पण फारच थोडा असावा, नक्की सांगता येत नाही. कारण मला वाटते, ती सवयीने म्हणा अथवा त्या काळच्या संस्कारानुसार सारं काही करत असावी. कारण ती कधीच पोथ्या, पुराणे, नवस पुजा, होम इ. करताना मी पाहिले नाही.
पुण्याला माझ्या घरी देव होते. (प्रशस्तं जागा वगैरे नाही ). तिथेसुद्धा मी रोज देवापुढे दिवा लावून मुलाला शुभंकरोती वगैरे म्हणायला सांगत असे. पण याचे कारण मला वाटते भक्ती पेक्षा सवय असावे. कारण माझी कुठलीही अडचण सोडवायला देव येणार नाही, मलाच प्रयत्नं करायचेत हे मला पुरेपुर माहिती आहे. पण तरीही मला देवळात जायला आवडतं (अर्थात गर्दी नसलेल्या). पण यज्ञ, याग, अभिषेक, नवस, मंत्र, तंत्र इ. मी काहीच करत नाही. कारण या सर्वं गोष्टींवर माझा विश्वास नाही. सोमवारचा उपास करते, गेली जवळ जवळ १६ वर्षे पण तितकेच. त्यामुळे मला काही लाभ होईल वगैरे मला वाटत नाही. मी अथर्वंशिर्षं आणिक काही स्तोत्रं म्हणते, पण तो पण सवयीचाच एक भाग म्हणून.
माझे पति, आणि मुलगा दोघही नास्तिक म्हणावे असे आहेत. पण कुठल्याही धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी होतात. विरोध करत नाहीत.

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

आई वडील हे एकत्र का जोडले आहेत हे फार्फार विचार करुन ही कळले नाही. लग्न केले म्हणजे स्वतंत्र अस्तीत्व लोप पावते असे काही गुर्जींचा समज आहेत का?

दुसरे हे कळले नाही की फक्त नंबर मागीतले असताना लोक २०० शब्दांचे अभिप्राय का लिहीत आहेत. Blum 3

----------
माझ्या बाबतीत
आई १.५ मी ५
वडील ३ मी ५ ( वडलांच्या ३ मधे सेक्युलर संस्कार वगैरे अजिबात नाहीत )*

माझ्या ५ किंवा १०० असण्यात आईवडलांचा काडीचा हात नाही. तसा तो कोणाचाच नाही.

------------
* : धर्म न पाळणारे किंवा धर्मिक रुढी न पाळणारे म्हणजे सेक्युलर हा कुठला अर्थ आहे माहीती नाही.
माझ्या सारखे कुठलाही धर्म न पाळणारे पण काही धर्मांबद्दल ( क्रीश्न्चन )सहानभुती बाळगणारे, काहींबद्दल न्युट्रल असणारे( हिंदु, पारसी ) आणि काही धर्मांबद्दल एकदम विरूद्ध असणारे असू शकतात. आणि अश्या लोकांची संख्या खूप आहे.
त्यामुळे सेक्युलर आणि धार्मिकता ह्याचा संबंध जोडू नका.

आई वडील हे एकत्र का जोडले आहेत हे फार्फार विचार करुन ही कळले नाही.

वर आडकित्ता यांना याच प्रश्नाला सविस्तर उत्तर दिलं आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर विशिष्ट व्यक्तींपेक्षा मी ज्या घरात वाढलो त्या घरचं वातावरण आणि त्या जडणघडणीतून झालेला माझा स्वभाव यांची तुलना करायची आहे.

दुसरे हे कळले नाही की फक्त नंबर मागीतले असताना लोक २०० शब्दांचे अभिप्राय का लिहीत आहेत.

खरं तर हा विषय इतका कठीण आणि तरीही जिव्हाळ्याचा आहे म्हणून या आकड्यांमध्ये सामावून न जाणारे वातावरणाचे पोत मुद्दामच लिहायला सांगितले होते.

धर्म न पाळणारे किंवा धर्मिक रुढी न पाळणारे म्हणजे सेक्युलर हा कुठला अर्थ आहे माहीती नाही.

मी सेक्युलर हा शब्द वापरलेलाच नाही. धार्मिकता ही संकल्पना काही तराजूच्या काट्यावर मोजण्याजोगी नाही. म्हणूनच प्रत्येकाला ज्याचे त्याचे निकष वापरून त्याच निकषांवर त्यांना माहीत असलेली आधीची पिढी आणि ते स्वतः अशी तुलना करायला सांगितली आहे. अशा अनेकांच्या निकषांमधूनही दोन पिढ्यांमध्ये फरक पडला आहे का याबाबत काही विश्वासार्ह विधानं करता येतील.

दुसरे हे कळले नाही की फक्त नंबर मागीतले असताना लोक २०० शब्दांचे अभिप्राय का लिहीत आहेत.

तिसरे कळाले नाही की १, २, ३ असे पर्याय असताना लोक -१, ४, ५, १.५ असले आकडे का टाकत आहेत.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

१, २, ३ हे अत्यंत मर्यादित पर्याय आहेत. खरंतर ५ पर्याय द्यायचे असा माझा विचार होता. पण कौल देताना त्याची २५ कॉंबिनेशन्स झाली असती. त्यामुळे कौलाच्या सोयीसाठी हे केलं. तसंही अपेक्षित प्रतिसाद जर ५० असतील तर इतक्या कॅटेगरी करणं पुन्हा निरर्थक ठरलं असतं कारण प्रत्येकच कॅटेगरीमध्ये खूप कमी मतं आली असती. तेव्हा संख्याशास्त्रीय दृष्ट्याही ३ पर्याय ठेवणं जास्त योग्य होतं.

३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.)

हा पर्याय स्वतःसाठी निवडावा वाटला पण पुन्हा त्यात "विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून," हे वाक्य असल्यामुळे निवडता येत नाही. कारण विधी/प्रथा अजिबात पाळत नाही, अगदी नावालाही नाही.
बाकी बाबा कैच्याकै धार्मिक, आई खूप धार्मिक पण बाबांपेक्षा कमीच. पण दोघांनीही मी धार्मिक असावच अशी कधीच सक्ती केली नाही, कधी कोणी स्तोस्त्र/श्लोक शिकवल्याचं ही फार आठवत नाही (त्यामुळे श्लोक वगैरे अजिबात येत नाही ना शाळेत संस्कृत विषय होता).
माझा मुलगा, अजून तसा लहान आहे. त्याच्या दोन्ही आज्या त्याला श्लोक शिकवतात आणि शाळेतही. त्याच्या बालमुखातून ते श्लोक ऐकायला फार गोड वाटतात, ऐकतच रहावं. कधीकधी मी संध्याकाळी ऑफिसहून घरी येण्याची आणि आई/सासू ह्यांची देवापुढे दिवा लावण्याची एकच वेळ असते, तेव्हा मात्र मुलाला आजीजवळ बसून शुभंकरोती/श्लोक म्हणायचा आग्रह आवर्जून करतो. म्हणजे मग कसं मला मुलाच्या व्यत्ययाशिवाय निवांत पेपर वाचता येतो Smile (कोण म्हणतं देव नसतो ;))

वर मत नोंदवलं आहेच. (आईवडील २, मी ३.) हे आकडे पुरेसे आणि अचूक नसले, तरी ते निव्वळ मदतीपुरते आहेत, हेही वर आलंच आहे. त्यात पुन्हा जायला नको.

थोडे अनुभव:

घरात देव्हारा आहे. बाबा पूजा करतात. बाबा उपलब्ध नसतील तर आई करते. पण ते कोणत्याही कारणास्तव नाही झालं, तर आभाळ कोसळलं असं काही त्यांना वाटत नाही. ते दोघंही घरात नसताना मी आणि बहीण या गोष्टी करू याची त्यांना खात्री नसते, त्याबद्दल फार तीव्र मतं वा आग्रहही नसतात. कोणत्याच सणावाराला आमच्याकडे धार्मिक कृत्यं होत नाहीत. मोठ्यात मोठं धर्मकृत्य म्हणजे बाबा अथर्वशीर्ष म्हणतात. मरणोत्तर क्रियांबद्दलही आमचं स्पष्ट बोलणं झालं आहे. त्या दोघांचेही दिवसवारे करायचे नाहीत, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्यामागे फार मोठं तात्त्विक भूमिकेचं अवडंबर मात्र जाणवलं नाही. ’आपण गेल्यावर त्या सोपस्काराला काही अर्थ नाही. निरर्थक उपचार आणि त्रास.’ इतकंच त्यांचं स्पष्टीकरण. त्याऐवजी कुठे जाऊन देणग्या द्या, रडत बसू नका-हसा असल्या मागण्याही नाहीत. बाबा-बुवा-उपास-तापास या बाबतीत आई जास्त बंडखोर असावी. म्हणजे तिला कुणी याबद्दल काही सांगायला गेलं तर भोट चेहरा करून ती ऐकून घेईल. पण तो माणूस (जवळचा नसेल तर तो गेल्यावर, जवळचा असेल तर त्याच्या तोंडावर) तिच्या थट्टामस्करीला आणि उपरोधाला सामोरा जाईल, यात शंका नाही. बाबा त्या बाबतीत निर्विकार असतात. त्यांना रस नाही. पण इतर कुणाला असेल, तर त्यांची काही भूमिका नाही.

मी एकूण देवाधर्माबद्दल शाळा संपता संपता कधीतरी विचार करायला लागले असणार. विरोध-तावातावानं विरोध-उदासीनता-विवेकी विरोध असं झालं असावं असं वाटतं. या सगळ्या टप्प्यांवर आईबाबांकडून कधीही ब्लॅकमेलिंग, विरोध, समजुती झाल्या नाहीत. त्यांनी फक्त खांदे उडवले. क्वचित सौम्य प्रश्न विचारले. पण त्यातही अमुक एक करायचंच / नाहीच, असा आग्रह नव्हता.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'आईवडील २ मी ३' असं मत दिलं खरं पण इतकी सरळसोट विभागणी अशक्यच.

आमच्याकडे आई-बाबा धार्मिक आहेत, नाही असं नाही; पण मला त्यांची धर्मिकता बरेचदा 'करावं लागतं/सोडून चालत नाही' अशी काहीशी वाटते. म्हणजे धार्मिक कर्मकांडांविषयी सांगायचं तर, सकाळी देवपूजा/संध्याकाळी देवाशी दिवा वगैरे असतं. मध्यंतरी बराच काळ आईनी पूजा करणं सोडून दिलेलं. मग काय वाटलं कुणास ठाऊक, पुन्हा चालू केलं.
ते बाहेरगावी कुठे गेले असले तर दिवसेंदिवस पूजा होतच नाही. आईनी सुरूवतीला सांगून पाहिलं, मग सोडून दिलं.

बाबा एका आजारपणानंतर देवाशी दिसायला लागले. पण ते तितपतच. नास्तिक वगैरे नाहीत पण.
बाकी गौरी-गणपती, नवरात्र वगैरे आजी-आजोबांपासूनच नव्हतं. (त्यावरून आठवलं - एकदा आजोबा कसल्या तरी तिरीमिरीत सगळे देवांचे फोटो आणि काही चांदिच्या मूर्त्या तळ्यात फेकून आलेले. अजूनही काही नातेवाईक आज्या 'काssय तो आण्णांचा माथेफिरूपणा..' अश्या छापाची आठवण काढतात. Biggrin ) ते सगळे एकत्र राहात असताना पाडव्याला गुढी असायची. आई-बाबांच्या घरात आम्ही तीही कधी उभारली नाही. देवळात क्वचितच जातात. बाहेरगावी फिरायला जातात तेव्हा तिथली देवळं मात्र आवर्जून बघतात. आम्ही शक्यतो टाळतो ती.

स्तोत्र मी अजूनही म्हणतो. आंघोळ करताना गाण्याचा मूड लागला नसेल तर सवयीने स्तोत्र सुरु होतातच.

वर स्वराबाईंनी म्हटलंय त्या 'देशस्थी' वाक्प्रचारावरून - माझं सासर देशस्थ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या एका अगदी निवांत गावातलं. तिथे सगळे सण-वार होतात आणि फार elaborated असतात. त्यामुळे बायकोला सुरूवतीला इथे फार वेगळं वाटायचं. तरी गुढीपाडव्याआधी "आपण काही नाही तर निदान गुढी तरी उभारत जाऊया" असं म्हणून बघते. आणि मी ते हाणून पाडतो. आता तिलाही सवय झाल्ये. Wink

फारच कठीण प्रश्नय, मात्र धागा प्रचंड आवडला
माझं वागणं इतक्या विसंगतींनी भरलेले आहे की काय म्हणावे हेच कळत नाही.

साधारणतः मी समोरच्याला शक्यतोअर आनंद होईल (किंवाते शक्य नसेल तर किमान त्रास होईल) असे वागतो. त्यामुळे इतरांचा विचार करून धार्मिक/सश्रद्धांच्या म्हणाव्यात अश्या अनेक गोष्टी मी करताना आढळतो. जसे थोरांना वाकून नमस्कार करणे, देवळात जाणे, आई-बाबा बाहेर गेले असले तर किमान आठवड्यातून एकदा पुजा करणे, इतकेच काय आई-बाबांच्या मित्र/मैत्रीणींकडे त्यांच्या इच्छेखातर मेहूण/ब्राह्मण वगैरे म्हणून जेवायला जाणे, काही घरात चालत आलेल्या प्रथा पाळणे (तर काही अव्हेरणे) :प.

काही धार्मिक म्हणवल्या जाणार्‍या गोष्टी अशा इतरांच्या आनंदासाठी नाही तर मलाच आवडतात म्हणून करतो. जसे वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे व ठरलेले पदार्थ करणे, गणपतीतच असे नाही तर एकुणच आरत्या म्हणणे, नवरात्रीत वेळ व मूड आला तर देवीभोवती गरबा खेळणे, मूड असेल तेव्हा आणि जिथल्यातिथे मोठमोठ्याने संस्कृत श्लोक वगैरे म्हणणे, जुन्या हेमाडपंथी टैप देवळात (जसे कोल्हापूरचे मंदीर) जाऊन तासनतास बसणे, किर्तने ऐकणे, केळवणे घालणे इत्यादी.

दुसरीकडे अगदी कट्टर नास्तिकतेवर श्रद्धा असणार्‍यांना शोभाव्यात अशाही गोष्टी मी करतो, जसे कोणतेही वार न पाळणे - कोणत्याही वारी/काळात आवडते व मूड असेल ते खाणे, उपास न करणे, जातीपाती सोडूनच द्या पाळीवगैरेचाही विटाळ न मानणे व त्याबद्दल आग्रही असणे, नवस न करणे, धर्मस्थळांना (मंदीर आवडते हे कारण सोडल्यास) आवर्जून भेटी न देणे, घरी कोणालाही दक्षिणा न देणे (खरंतर घरी पुजा करायलाच कोणाला न बोलावणे - मूड असला तर स्वतःच करावी की), पत्रिका न बघणे, अपत्यांची पत्रिका न काढणे, वर्तणूकीत धार्मिक बेसिसवर शक्यतो फरक न करणे (तरीही क्वचित असा फरक झाल्याचे पश्चातबुद्धीने जाणवले आहे, खंतही वाटली आहे.)

पण मी नास्तिकही नाही. देव असण्याची किंवा नसण्याची मला अजिबात खात्री नाही. किंबहुना मला त्याच शोध घेण्यातच इंटरेस्ट नाही.

माझे विचार आणि आचार अनेक बाबतीत मेळ खात नाहीत तर आता माझी धार्मिकता कशी मोजायची?

माझं उदा म्हणून दिलं, आई वडिलांचीही धार्मिकता काढणं मला कठीण आहे.

====

अर्था हे तुमच्या मतांवरून द्यायचे नसून आचारावरून द्यायचे आहे असे समजतो
प्रश्न जर फक्त विचार आणि मतांचा असता तर माझे विचार/मते ३ रेटिंगमध्येही सहज मावावीत. Smile पण प्रश्न आचाराचा आहे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी माझं उत्तर दिलय. मी इथल्या बहुसंख्यांकातच आहे.. २-३.

पण धार्मिकता तपासण्यासाठी पूजा, विधी करणे वगैरे यासारख्या गोष्टी विचारून योग्य चित्र मिळेल असे वाटत नाही.
एकंदरीत जीवनात धर्माचे महत्व अथवा धर्माची गरज किती याची किंचितशीही कल्पना वरील प्रश्नाच्या उत्तरातून मिळेल असे वाटत नाही.

३ उत्तर दिलेल्या व्यक्तीकडून हिंदू धर्म हा इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ असे उत्तर मिळण्याचीदेखिल शक्यता आहे. अधार्मिक म्हणवूनही देशस्थ-बेशिस्त, कोकणस्थ- मोजून मापून वगैरे जनरलायझेशन मनात ठासून भरलेले असण्याची शक्यता आहे.. थोडक्यात जात धर्म वगैरेमुळे पारंपरिकरीत्या डोक्यात असलेली मानसिकता/सवयी काँशिअसली दूर ठेवण्याची तयारी नसणे अशामुळे मी धार्मिक नाही पण माझा धर्म इतरांपेक्षा चांगला हे उत्तर स्युडोअधार्मिकता दर्शवेल..

उदा. माझी आईदेखिल कर्मकांडावर विश्वास नाही , त्यामुळे काहि चांगले होतेच असे नाही असे म्हणताना म्हणते.. इतक्या वर्षांची सवय म्हणून देवापुढे दिवा लावणे वगैरे करते असं म्हणते
पण आडनावावरून जात ओळखून लेबल चिकटवणे.. इतर लोकांच जेवण तिखट ब्राह्मणांचं गोड असे समज इतके अंगी मुरलेत की तिला वरच्या प्रश्नांवरून अधार्मिकतेकडे झुकवणे कठीण वाटते..

मागीलच्या मागील पिढ्या २, मागील पिढी ३, मी ३. पुन्हा एकदा - ४, ५ असे पर्याय असते तर ५. ६-७ असे पर्याय असते तर ७.

पण मी मुद्दाम कोणाच्या "सत्य वदे वचनाला नाथा"ला "नुसते क्यिर्र" म्हणायला जाणं बंद केलं आहे.

चर्चाविषय आवडला. माझ्या लहानपणी घरात देव्हारा होता पण आईबाबा फारसे देवदेव करणाऱ्यांमधले नव्हते. वडिलांना रोज एकदा पूजा करावी लागे. वडील दुसऱ्या गावी वगैरे असले तर घरातील इतरांपैकी कोणालातरी करावी लागे. आमच्याकडे गणपतीही बसवत नसत. त्यातही धार्मिक-अधार्मिकपेक्षा वेळेची गैरसोय हा मुख्य मुद्दा होता. आईबाबा दोघांचीही नोकरी असल्याने असली कर्मकांडे करायला वेळ मिळणे अवघड होते. त्याच अनुषंगाने वटसावित्री, नागपंचमी, सत्यनारायण, हरताळका, होळी वगैरेंचेही काहीही विधी नसत. (या सणांनिमित्त गोडधोड मात्र खायला मिळे ). गुढीपाडवा, नवरात्र-घटस्थापना आणि दिवाळीचे सामान्यपणे होणारे घरगुती विधी (उदा. लक्ष्मीपूजन) मात्र केले जात. आईवडील कधी मंदिरात गेल्याचे आठवत नाही. श्रावण महिन्यात एखादी पोथी वाचावी अशी आमच्या घरात प्रथा होती. त्याचा वडिलांना कधीकधी वैताग येत असे असे वाटते. एखादा शनिवार-रविवार वगैरे बघून १६-१७ तास बसून ती पोथी 'उरकून' टाकत असत. माझी आजी वारकरी आहे. ती एकूणएक सगळ्या एकादश्या करते. पण माझे आजोबा होते तोवर ती त्यांना मांसाहार करण्यासाठी मटण वगैरे शिजवून देत असे.

त्यामुळं तसं धार्मिक बाबतीत खुलं वातावरण होतं असं वाटतंय.

मात्र निवृत्तीच्या वयाजवळ - माझं लग्न व्हायला आल्यावर आईवडील दोघेही प्रचंड धार्मिक झाले. उदा. रोज मंदिरात (कधीकधी दोन-दोन वेळा) जाणे. सत्यनारायण वगैरेचा आग्रह धरणे, (मी मांसाहार करत होतो तेव्हा) विशिष्ट दिवशी (सोम-गुरु-शनि-एकादशी-चतुर्थी इ.) शाकाहार केला पाहिजे, किमान हात जोडलेच पाहिजेत, हे प्रकार आता सुरु झाले आहेत. थत्तेचाचांनी म्हटल्याप्रमाणे अगतिकतेची काही कारणे मला माहिती आहेत.

स्त्रियांच्या बाबतीत सासरचे घर हा ही एक फॅक्टर असावा. कारण कित्येकदा तुम्ही ज्या घरातून आलात आणि ज्या घरात पोचलात यामधे धार्मिक-अधार्मिक वातावरणात जमिन-अस्मानाचा फरक असु शकतो.

हे स्वरा यांनी म्हटलेले पुरुषांनाही लागू आहे असे माझ्या व मित्रांच्या अनुभवातून दिसते. मी मूर्तीपूजा-कर्मकांडे वगैरेंमध्ये देव मानत नसलो तरी बायको प्रचंड मानते. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास, श्रावणातले सोमवार, शनिवार, शक्य तितक्या सगळ्या चतुर्थ्या, चतुर्थीला गणपतीची आरती, आषाढी-कार्तिकी एकादश्या, घरी गणपती-घटस्थापना-हरताळका-गौरी असे प्रकार आमच्या सासुरवाडीला आहेत. अशा पद्धतीचे तिच्यावर संस्कार असल्याने माझे सोयीपुरती पूजा किंवा जमेल तितके धार्मिक राहणे हे तिच्यासाठी खूप धक्कादायक होते. याच कालखंडात आईवडीलही प्रत्यक्ष धार्मिक झाल्याने मी एकदम आईवडील आणि बायको यांच्या तावडीत सापडलो.

सुदैवाने माझ्याबरोबर राहून आता तिलाही अशा अनेक गोष्टींची निरर्थकता कळायला लागली आहे. 'तू केलंच पाहिजे' या आग्रहापासून बदलत अ‍ाता 'मी माझं करते' इथवर तिचा प्रवास झालाय. (लग्नानंतर मला चांगली 'सरळ' करेल अशी बायको मिळाल्यामुळे आनंद झालेल्या आईवडिलांचा मात्र अपेक्षाभंग होतोय.)

(लग्नानंतर मला चांगली 'सरळ' करेल अशी बायको मिळाल्यामुळे आनंद झालेल्या आईवडिलांचा मात्र अपेक्षाभंग होतोय.)

माझा एक मित्र आहे, कट्टर नास्तिक असण्यापासून खेळीमेळीतला नास्तिक झाला आहे. शाळेत असताना तो प्रार्थना म्हणत नसे म्हणून त्याला भिंतीकडे तोंड करून उभा करत.

त्यांच्या घरी, आई-वडलांकडे, गणपती असतो. कॉलेजात असताना आमची ओळख झाली. गणपतीच्या दिवसांमध्ये एक संध्याकाळ त्यांच्याकडे नास्तिक संध्याकाळ असे, हा मित्र आणि त्याचा भाऊ यांचे सगळे टारगट मित्रमंडळ जमा होत असे. या दोन्ही भावांच्या मैत्रिणी कमीच. त्यांची आई आम्हां दोन-तीन मुलींना कळवळून सांगत होती, "तुम्ही तरी त्याला सांगा, जरा तरी (देवाची) भीडभाड बाळग." आम्ही लाजेकाजेस्तव हसून "काकू, आमचाही विश्वास नाही हो" म्हणत होतो.

यथावकाश त्या मित्राने लग्न केलं. त्याची बायको आस्तिक. काकूंची आशा पल्लवित झाली. लग्नानंतर तीसुद्धा जर्मनीला काही काळ राहिली. राजाराणीला एकांत मिळाल्यावर राणीसुद्धा नास्तिक झाली. नंतर कधीतरी गणपतीला त्यांच्याकडे गेले होते तेव्हा हा विषय निघालाच नाही, फक्त फराळाचे पदार्थ निघाले.

मित्राचा मुलगा आता तसा प्रश्न पडण्याएवढा मोठा आहे, ७-८ वर्षांचा असेल. आज्या त्याला देवधर्म शिकवतात. या दोघांची ना नसते, पण ते काहीच बोलत नाहीत. तो पोरगा मोठा होऊन स्वतंत्र विचार करायला लागेल तेव्हा कसा विचार करेल याबद्दल मला फार कुतूहल आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आई-वडील २, मी ३.५

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यन्त मी देवळात कधी कधी जात होतो; पण आताशा ते-ही बंद झालेय. देवपूजा नाही, पण दिवाळीला वगैरे बायकोच्या सांगण्यावरून नमस्कार होतो.

निरिक्षणः साधारण पणे आजूबाजूला पाहिलं तर असं दिसतं की आजी-आजोंबाच्या काळात (६०-७० वर्षांपूर्वी) ब्रतवैकल्य/पूजाअर्चा/विटाळ वगैरे प्रकार बर्‍यापैकी प्रचलित होते, त्या-मानाने आईवडिलांच्या काळात (३०-४० वर्षांपूर्वी) व्रतवैकल्य/विटाळ बरेच कमी झाले (शहरीकरणामुळे ?) आणी आताच्या काळात वाढत्या जागतिकीकरणामुळे असेल कदाचित पण विटाळ बहुतेकांच्या आयुष्यातून हद्दपार झाला आहे, पूजा-अर्चा नित्यांतून नैमित्तिकांत आल्या आहेत, आणि व्रतवैकल्या।ची जबाबदारी "फक्त आईवडील सांगतात म्ह्णून" करण्यापुरती उरली आहे.

थोडक्यात खाजगी जीवनात कर्मकांडांचं महत्व कमी होत जाताना दिसतं (सार्वजनिक जिवनात मात्र उलटं होत आहे असं वाटतं)

-------------------------------------------

बादवे १-१ किंवा २-१ असा प्रवास असणार्‍यांना ऐसीवर वाळीत टाकण्यात येणार आहे का?

वाळीत टाकणे ही प्रतिगामी पद्धत झाली. पुरोगामी पद्धत टोचुन टोचुन मारण्याची आहे.

>> वाळीत टाकणे ही प्रतिगामी पद्धत झाली. पुरोगामी पद्धत टोचुन टोचुन मारण्याची आहे. <<

आपल्या पुरोगामीपणाची खुद्द अशी कृतीतूनच कबुली देण्याचा प्रकार आवडला. माझ्याकडून एक मार्मिक.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

क्षणभर लादेनने दहशतवादाचा निषेध केल्यासारखं वाटलं खरं, पण नंतर कळालं काय ते. एक मार्मिक.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बादवे १-१ किंवा २-१ असा प्रवास असणार्‍यांना ऐसीवर वाळीत टाकण्यात येणार आहे का?

-त्यांचा कंटाळा करण्यात येईल.
-त्यांना पकण्यात येईल.
-त्यांची भेट झालेल्या कंटाळवाण्या घटनांवर प्रासंगिक मालिका लिहीण्यात येतील.
-त्यांना कंटाळून अनेक २-३ वाले ऐसी सोडून जाण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येईल.

Wink

.खवचट श्रेणी द्यावी.

जसं १-२-३ असताना लोकांनी मी ४..मी ५.. केलं तसच इथेही खवचटच्या पुढील ... प्रचंड खवचट अशी श्रेणी द्यावी लागेल..

अवांतर :-
आत्तापर्यंत आलेल्या सदस्यांच्या काही प्रतिसादात असं दिसून आलं की ते आधी आस्तिक होते पण अता/काळानुरूप तितकेसे किंवा अजिबात आस्तिक नाहीत. अश्या सदस्यांच्या ह्या बदला मागची कारणं/अनुभव ऐकायला आवडतील. थोडक्यात, काही विशेष असे प्रसंग होते का ज्यामुळे आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे जावं वाटलं किंवा कदाचित त्याच्या विरुद्ध दिशेने ही हा बदल असू शकतो, त्याबद्दल ही अनुभव ऐकायला आवडतील.

माझ्या बद्दल सांगायचं झालं तर. मी मधल्या काही वर्षांमधे (साधारण २००० ते २००९ काळ) प्रचंड धार्मिक आणि आस्तिक झालो होतो. त्याआधी स्वतःची अशी काही मतं असल्याचं आठवत नाही, प्रवाहाप्रमाणे स्वतःची धार्मिक मतं बनवत असायचो. पण ह्या नंतरच्या काळात कट्टर धार्मिक/आस्तिक झालो. अर्थात हे काही अचानक नव्हतं पण नक्कीच आई-वडिलांच्या कुठल्याही आग्रहाने नव्हतं, त्यांनी कधीच त्यांची मतं लादली नव्हती ना सक्ती केली होती. पण कदाचित घरातलं एकंदर वातावरण, चुलत-मावस भावंडात असलेले धार्मिक विचार आणि त्यात भर म्हणून काय तर एक-दोन मित्र झाले त्या काळात ते ही अतिशय धार्मिक संस्कारात वाढलेले. मग मी ही त्या मार्गाला जाणं फार साहजिक होतं तेव्हा. त्यात नविन नविन आस्तिकतेची मेंबरशिप घेतल्यावर त्याची चांगली फळं पण मिळाली, मग काय, ही आस्तिकता कट्टर आस्तिकतेमधे रुपांतरीत झाली. मग वार सांभाळणं, उपास-तापास, मंदिरात नित्यनियमाने जाणं हे सगळं सुरू झालं आणि ह्या माझ्या धार्मिक इन्व्हेस्टमेंट वरचं माझं व्याज म्हणून मी "हक्काने" देवाला नवस ही बोलायला लागलो, देवाचा व्हाल्यूड कस्टमर झालो होतो मी तोपर्यंत. (पण ते रांगेत उभं राहून दर्शन घेणं आणि गर्दीत तिर्थस्थळांना जाणं तेव्हाही अजिबात मान्य नव्हतं). ही नवस मागण्याची चटक पुढे वाढत गेली, हव्या त्या गोष्टी मिळत गेल्या मग वाटायचं की जेवढी धार्मिकता/आस्तिकता तेवढी इन्व्हेस्टमेंट जास्त आणि त्यावर तेवढं व्याज - व्याजाचा मोबदला नवसात.

मग घरापासून दूर, पुण्याला शिकायला आलो आणि पुढे नोकरी वगैरे. ह्या धकाधकी मधे नव्हतं जमत देव-देव करायला, ते उपास-तापास पाळायला. तरीही जमेल तसं करत होतो. वाचन वाढत गेलं, नवीन विचारांचे मित्र मिळाले. काही अनुभवांतून आणि नोकरीतल्या आयुष्यात 'प्रॅक्टीकल' असण्याचं महत्त्व लक्षात आलं, प्रॅक्टीकल होत गेलो. तेव्हा कुठे स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात झाली. आपण हे का करतो? आस्तिकता म्हणजे काय? खरचं काही अशी शक्ती आहे का? आणि खरंच अशी शक्ती आपल्या पाठीशी आहे म्हणूनच आपल्यात आत्मविश्वास येतो आणि कामं सहज होतात? अश्या शक्तीच्या आधाराची सतत गरज का असावी आपल्याला? बर हरकत नाही, एखाद्या शक्तीने मदत होत असेल तर हरकत नाही. पण ही शक्ती फुकटात पाठीशी नसते. इन्व्हेस्टमेंटच नाही तर व्याज/मोबदला काय मिळणार. म्हणून ही शक्ती नकोशी वाटायला लागली. एक उपास चुकला, मंदिरात जायचं राहिलं, सकाळची पुजा राहिली की दिवस भर रुखरुख. कधीकधी तर पार्किंग मधे आलेलो असताना आठवायचं देवाला नमस्कार केला नाही की पुन्हा वर जायचो, नमस्कार करून मग ऑफिसला जायचो. पण मग बॅक-ऑफ-माय-माईंड चिडचिड व्हायची, काय मुर्खपणा आहे हा -अतीच होतंय हे असं वाटायचं. सगळं झिडकारून टाकावं असे विचार मनात यायचे. पण अर्थात ते इतकं सहज सोप्पं नव्हतं. जी शक्ती आपला आत्मविश्वास कुरवाळते त्याला खतपाणी घालून वाढवते आहे तिलाच झिडकारायचं? हे म्हणजे आपल्या शरीराचा एक अवयव आपण स्वतःहून कापण्यासारखं होतं. प्रॅक्टीकली सगळं पटत होतं पण तरीही कुठेतरी ते स्विकारायला तयार नव्हतो, केवळ भितीपोटी.

१० दिवसांसाठी विपश्यना ला जायचा योग आला ("और मेरे जिंदगी मे ऐश्वर्या आयी" छाप वाक्य आहे हे Wink ). त्यांच्या नियमाप्रमाणे तिथे कुठलेही पुजा-पाठ-जप-श्लोक त्या दहा दिवसांच्या दरम्यान करायचे नसतात. हे फार भारी वाटलं मला, विचार केला, हीच संधी आहे जिथे आपण निदान दहा दिवस तरी ह्या सगळ्या पासून दूर राहू. शिवाय हे सगळं बंद ठेवणं हे त्यांच्या नियमांमुळे करतोय आपण (देव माफ करेल आपल्याला, काही वाईट झालं तर विपश्यनेचं होईल :P) हे एक मानसिक समाधान त्यामुळे फार गिल्ट न ठेवता तयार झालो. दहा दिवस फक्त स्वतःशीच गप्पा मारायच्या होत्या, त्यातून स्वतःला काय हवंय आणि काय पटतय हे जास्त स्पष्ट झालं आणि "युरेका" :). अर्थात लगेच नास्तिक झालो असं नाही पण प्रवास हळू हळू त्या दिशेने सुरु झाला. हा प्रवास गर्दी-कोलाहलापासून दूर एकांतात मोकळ्या रस्त्यावर सुरू झालाय जाणवू लागलं, हलकं वाटलं. ती दडपणं, धास्ती, चिडचिड, अपेक्षा, देवाण-घेवाण सगळं कालांतराने संपत गेलं. लक्षात आलं, आपण ज्याला इन्व्हेस्टमेंट म्हणत होतो ते खरं तर कर्ज होतं आणि आपण ते व्याजासकट फेडलंय. अता आपण निश्चिंत, कारण ज्या शक्ती कडे आपण तारण म्हणून होतो त्यातून आपण स्वतःला सोडवून घेतलय, आणि खर्‍या अर्थाने अता आपण आपल्या नावावर झालोय - कायमसाठी. जे काही होईल इथून पुढे - चांगलं किंवा वाईट त्याला सर्वस्वी आपण स्वतःच जबाबदार असू/आहोत.

मी आता नास्तिक म्हणजे पुरोगामी फार भारी असलं काही अजिबात इथे दाखवायचं नाहीये किंवा कुठलेही उपदेश द्यायचे नाहीत. गुर्जीं च्या ह्या सर्वे मुळे माझ्या भूतकाळात डोकावलो आणि "मी ३" हा पर्याय निवडण्याआधी मी ही "१" होतो ते सत्य आधी सांगावं वाटलं म्हणून हा शब्द-पसारा, इतकच.

तुमचाही असा काही प्रवास झाला असेल तर ते प्रवासवर्णन ऐकायला आवडेल Smile

अत्यंत दिलचस्प प्रतिसाद.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एकाच रंगमंचावर वाजपेयीजी आणि पु.ल.देशपांडे यांची सावरकरांवर भाषणे झाली होती. सारवकरांच्या विज्ञाननिष्ठेमुळेच माझ्यातल्या नास्तिक्याला बळ मिळाले असे देशपांडे म्हणाले तर सावरकरांमुळेच आम्ही आस्तिक झालो, आम्हाला आमचा खरा देव भेटला असा दावा वाजपेयींनी केला. दोघांचीही भाषणे मोठी छान आहेत

विपश्यनेमुळे तुझा झालेला नास्तिक्याचा प्रवास वाचून मला हेच आठवले. Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विपश्यनेमुळे तुझा झालेला नास्तिक्याचा प्रवास वाचून मला हेच आठवले.

Smile धन्यवाद. ऋ, तुला नेमकं काय म्हणायचं हे आलं लक्षात तरीही लोकांचा घोळ होऊ नये म्हणून इथे मुद्दाम एक गोष्ट नमूद करतो.
इथल्या मंडळींना विपश्यनेबद्दल बरीच माहिती असेलच, तरीही एक विनंती, विपश्यना म्हणजे नास्तिक्याकडे वाटचाल असा गैरसमज अजिबात करू नये. किंवा विपश्यना म्हणजे 'बौद्ध" धर्माची दिक्षा घेणे किंवा त्या धर्माचा अवलंब करणे असेही अजिबात नाही. विपश्यना ही विद्या/शास्त्र हे केवळ गौतम बौद्धांनी आपल्या पर्यंत पोहचवले आहेत. केवळ नास्तिकतेकडे जायचं म्हणून विपश्यना हा माझा मुळ उद्देश अजिबात नव्हता, विपश्यनेबद्दल पहिल्यापासून कुतूहल होतेच आणि त्यात वरच्या माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पुजा-पाठ बंद हा नियम तिथे असल्याने मला वैयक्तिक दृष्ट्या ते फायद्याचे वाटले इतकेच.

हा खुलासा मुद्दाम देण्यामागचं कारण म्हणजे, मी विपश्यनेला जाण्यापूर्वी मी काही अफवा ऐकल्या होत्या की तिथे लोकांना बौध्द धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, त्या धर्माचा प्रसार केला जातो. देव, पुजा वगैरे कसं चुक आहे हे सांगितलं जातं वगैरे वगैरे. मला असे कुठलेच अनुभव आले नाहीत आणि तिथे कुठल्याही धर्माचा प्रसार केला जात नाही, अगदी बौद्ध धर्माचा देखील. मी नास्तिक झालो कारण मला ते हवंच होतं - विपश्यना केवळ निमित्त होतं, त्यांच्या मुळ कल्पनेत असे काहीही नव्हते/नसते.
धन्यवाद!

कोणत्याही कारणाने, अपघाताने मनुष्य सलग काही मिनिटे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय सरळसोट प्रकारे विचार करु शकला तर तो माझ्यामते नास्तिक्याकडे / अज्ञेयकबुलीकडेच जाईल.

विपश्शना हे असा विचार घडून येण्याचं कारण ठरलं असणार. इतरही अनेक कारणांनी मनुष्य फक्त स्वतःशी स्वतंत्र मुक्तपणे विचार करतो आणि आपोआप त्याला जाणवतं की हे देव वगैरे गणितातला हातचा आहेत. तो न धरता थेट गणित करता येतंय असं दिसलं तर मग नास्तिकतेला /अज्ञेयवादाला पर्याय नाही.

नास्तिक्य / अज्ञेयवादात काही कॉम्प्लिकेटेड नाही. फक्त मोकळ्या मनाने मान्य करणं आहे.

याला काहीशी समांतर अ‍ॅनॉलॉजी म्हणजे, मनुष्याचं शरीर पाण्यावर तरंगण्याइतकी त्याची कमी घनता असते ही फॅक्ट आहे. बुडणारा माणूस धडपडीमुळे, चुकीच्या पोश्चर्समुळे बुडतो. हातपाय झाडत राहिल्याशिवाय पाण्यावर तरंगताच येत नाही हे तो कुठून कुठून बघूनऐकून घट्ट शिकून बसलेला असतो.

पाण्यात तरंगायला "शिकलो" असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ते काही नवीन कर्मकांड शिकलेले नसतात तर फक्त ती "तसेही आपण तरंगतोच" ही फॅक्ट जाणवल्याने शांतपणे विनाभय विनाधडपड पाण्यावर आडवे होऊ लागतात इतकंच.

_/\_ गवि महाराज की जय हो!!! (आखाडा नंबर काय तुमचा कुंभमेळ्यात? :P)

विपश्शना हे असा विचार घडून येण्याचं कारण ठरलं असणार.

अगदी बरोबर, त्याचमुळे मी म्हणालो, 'विपश्यना केवळ निमित्त'.

एकाच रंगमंचावर वाजपेयीजी आणि पु.ल.देशपांडे यांची सावरकरांवर भाषणे झाली होती.

पुलंचं नर्मविनोदी तर वायपेयींचं लांबड लावून, शब्दाला शब्द जोडून (इतके हिंदी शब्द तातडीने सुचावे हे त्यांच्यातल्या कवीलाच जमावं नाही का?) वगैरे केलेलं भाषण. दोन्ही एकदा ऐकायला हरकत नाही. दोन्ही भाषणं मला फार प्रामाणिक वाटत नाहीत.

-Nile

मी ऋ ला विनंती करणारच होतो की भाषणाचा व्हीडो असेल तर इथे डकव. धन्यावाद निळे.

बादवे, प्रामाणिक वाटत नाही म्हणजे नेमकं काय? (अजून भाषण ऐकलं नाहीये मी, कदाचित ऐकल्या/पाहिल्यावर मलाही तसं वाटू शकतं).

आभार!

माझ्यासाठी ही भाषणे, त्याकाळी जाहिर मंचावर राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय नेत्याकडून व/वा लोकप्रिय साहित्यिकाकडून जितकी प्रामाणिक भाषणे होऊ शकली असती तितकी (किंबहून त्याहून काकणभर अधिकच प्रामाणिक) आहेत

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घनु, तुमचा प्रतिसाद अतिशय रोचक आहे. खरं तर एका धाग्याचे पोटेन्शिअल असलेला.
.
मलाही आजकाल मिळमिळीत आस्तिकतेपेक्षा, खणखणीत नास्तिक्य बरे असे वाटू लागले आहे. निदान आपल्या कर्माची जबाबदारी आपण घेऊ इतका तर आत्मविश्वास हवा, शिस्त हवी. पण हे जे देवांबद्दलचं "प्रेम" आहे ते आड येतं. खरं तर "प्रेम" कशाला म्हणतात? प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते माझीही आहे, पण मला ती मांडता येणार नाही. प्रचंड शब्दातीत आहे, किंवा मी तरी तितकी आर्टिक्युलेट नाही.
संध्याकाळी आजकाल मी स्तोत्रे म्हणणे सोडून दिले आहे. अन तरीही मधे मधे देवाबद्दल प्रेमच दाटून येते. अब क्या बोलनेका? सांगता येत नाही.

आई-वडील १, मी २.५

त्यातही वडील जरा जास्त धार्मिक - तासन्तास पूजा, पोथी यात रमणारे. स्वेच्छानिवॄत्तीच्या कैक वर्षे आधीच त्या<नी पूजासाहित्याचे दुकान सुरू केले आणि स्वेच्छानिवॄत्ती नंतर पुर्ण्वेळ तेच करत आहेत अजूनही!

घरी गौरी- गणपती, कुळाचार सगळे आहे.

आई त्या मानाने कमीच! (मधल्या काही काळात जेव्हा तिचे मनस्वास्थ्य ठिक नव्हते तेव्हा एक्दा तिर्मिरीत सगळे देव गुंडाळून ठेवले होते)
करायला पहिजे, सगळेजण करतात म्हणून ती सर्व काही करत होती आणि आता झेपत नसताना करवादत का होईना करतेच आहे.

नातेवाईक जमले की "हल्ली लोकांचा देवावर विश्वास वाढला आहे त्यामुळे पूजा साहित्याचे दुकान हे चांगले चालणारच" इत्यादी (पुचाट)चर्चा ऐकत ऐकत मोठे झालो. काही मत नसताना किंवा अडचण आलेली असताना ( के.टी., नोकरीचे शोध इ.इ.) चतुर्थी, एकादशी, मंगळवार, नियमित स्त्रोत्रवाचन इत्यादी केले आहे.

नंतर नंतर जेव्हा लक्षात आलं की उपास हे एक ओझे होतं आहे, विसरतो, नको वाटतो आप्ल्याला तेव्हा सोडला.

खरेतर माझा प्रवास उलट्या दिशेने लग्नायाही आधी तेव्हाच सुरू झाला होता जेव्हा एका मित्राने प्रत्येक गोष्टीला तर्काच्या कसोट्या लावायला शिकवले.

आणि आधी सुद्धा लक्षात आले असले तरी मग प्रत्येक गोष्टी मधली विसंगती ठळक जाणवायला लागली.

माझ्या गतिमंद भावासाठी आई-वडिलांनी कोणतेही व्रत करायचे बाकी ठेवले नव्हते. पण प्रत्यक्षात प्रयत्न असे म्हटले तर त्यांनी काहीच केले नव्हते. त्याच्यासाठि विशेष शाळा शोधणे, मानसोपचार तज्ञाकडे नेणे वगैरे मी आणि बहिणीनेच जे काय इकडून तिकडून अर्धवट माहिती मिळेल त्या आधारे आई-वडिलांना करायला लावले होते. ते आपण देवाचे सगळे करतो मग देव सगळे व्यवस्थित करेल या आशेवर बसले होते, अजूनही आहेत.

नवीन लग्न झाल्यवर नवरा सर्व करत होता म्हणून परत चतुर्थी करायला लागले (नव्या नवलाईत अशा गोष्टी करावाश्या वाटतात Smile ) पण गरोदर पणात उपास जे सोडले ते सोडलेच. परत सासूबाईंनी आठवण करून सुद्धा परत करावेसे वाटले नाही. कारण माझा उलटा प्रवास कदाचित अजून पुढे गेला होता, शिवाय नेटवरती या विषयांवर भरपूर चर्चा होतात त्या वाचून वाचून मतं अजून पक्की होत गेली.

माझ्या सहवासाचा परिणाम किंवा साबुदाणे खाऊन कंटाळा आला म्हणून पण नव-याने आता सगळे उपास सोडले आणि या वर्षी तर ऐन श्रावणात जिम ट्रेनरने सांगितलेय म्हणून अंडे खातोय.

"सगळं सोडलंय, सगळं बुडवलंय" इत्यादी सासूबाई कधीतरी पुटपुटताना दिसतात पण मी सोईस्कर दुर्लक्ष करते.

परवा त्या मला म्हटल्या "तुझ्या आईवडिलांकडे सगळे धार्मिक वातावरण आहे, तुमचे देवाशी संबंधित दुकान आहे ते बघून तू पण तशी असशील ही मला अपेक्षा होती (याचा अर्थ मला 'कदाचित त्यांची विवाह ठरवताना पसंती या गोश्टीमुळे ब-यापैकी होती' असा लागला) मग तू अशी कशी झाली?

ज्यावर माझे उत्तर हेच होते की ते सगळे पाहूनच डोक्यात तिडिक बसत गेली, विशेषतः माझ्या भावाच्या आयुष्यातली महत्वाची वर्षे या त्यांच्या देवाच्या विश्वासापायी वाया गेली आहेत हे मला कधीच विसरता येत नाहीत जे कधीच भरून निघणार नाहीये.

आजही मी स्वतःला नास्तिक म्हणणार नाही पण कर्मकांडांवरचा विश्वास मात्र जवळ्जवळ पूर्ण उडाला आहे. देवाला प्रार्थना करताना "मी स्वतः प्रयत्न केले नाही
तर नुसते देव काहीच करणार नाहीये" हे नक्की डोक्यात असते.

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अवांतर:
हा विदा बाकी काय सिद्ध करत असेल ते करो, पण "बर्ड्स ऑफ अ फेदर..." हे तरी नक्की करतो.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सहमत. इतरत्र आलेले प्रतिसाद आताच वाचले आणि "बर्ड्स ऑफ अ फेदर..." ची खात्री पटली.

मला फक्त एवढाच संशय आहे की सर्व पक्षी त्या रंगाचे होते की अन्य रंगांच्या सबमिसिव्ह पक्ष्यांनी, हळूहळू कंडिशनिंग होऊन अथवा गंडयुक्त भावनेने रंग बदलले?

प्रतिसाद न दिलेल्या सर्व लोकांनी कीस (kiss नाही ;)) न काढता पटापट प्रतिसाद द्यावेत असे आवाहन Wink

आई - ३, बाबा - स्वतःचा विश्वास नसावा, पण तरी आमच्यावर संस्कार वगैरे व्हावेत म्हणून शुभंकरोति/ स्तोत्र म्हणायला लावायचे. (कल्चरल धार्मिक?) - २.५

मी - ४.

पण खरंतर १, Being a staunch member of the church of the Flying Spaghetti Monster! Wink

पालक ३ व स्वतः १ किंवा पालक २ व स्वतः १ अशी मते काहिंनी दिली आहेत.
त्यापैकी कोणी काही लिहू शकेल काय? इतर प्रवासांइतकाच हा प्रवासही इंटरेस्टिंग असणार

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्याकडे आई '३' आणि बाबा '२' मध्ये गणता येतील. मी '३' मध्ये.
पोल तोकडा आहे त्यामुळे मत दिलेलं नाही.

पाने