ऐसा अमेरिकन सोक्षमोक्ष (अंतिम भाग )

ऐसा अमेरिकन सोक्षमोक्ष (अंतिम भाग )
खास लोकाग्रह नसता सादर केलेल्या पर्यटनलीळा !

आपल्या खाजगी परदेशवारीच्या बातम्या पेपरात देताना लोकं त्याला नसलेल्या सामाजिक कार्याचा किंवा अभ्यासाचा सोनेरी मुलामा खुशाल चढवून देतात. चमेलीच्या एका परिचिताची आई नातवंड सांभाळायला जाणार होती,पण तिने ब्रिटीशांच्या सामाजिक जीवनाचा जवळून अभ्यास करायला जाणार आहे असे पेपरात बेधडकपणे छापून दिलेले पाहून चमेली थक्क झाली.त्यामुळे तिनेही पर्यटनासोबत ऐसीकर मित्रांच्या जीवनाच्या शॉर्ट टर्म अभ्यासाची संधी साधून एक मसालेदार वृत्तांत लिहून काढायचे ठरवले. तर आता चलो अल्बनी आणि वॉशिंग्टन डीसी !

"तणाव"ग्रस्त !
फ्लोरिडातून गाशा गुंडाळून न्युयॉर्कची राजधानी अल्बनीमध्ये येताना विमान बिफोर टाईम येऊन पोहोचले.चमेलीने मित्ररत्नाला फोन करुन बिफोर टाईम आल्याची सूचना दिली. चंदूला नेहेमीप्रमाणे वाट पहाण्याची घाई झाल्याने ते विमानतळावरच्या उबदार वातावरणातून बाहेर येऊन म्याडसारखे थंडीत कुडकुडत उभे राहिले. चमेलीचे मित्ररत्न प्रयत्नांची पराकाष्ठा करुन,प्राणप्रिय कुत्ररत्नाचा विरह सहन करत, अर्ध्यातासात येऊन पोचले.चमेलीला भेटणे आणि दिवाळी अंकाची तयारी असे एका दगडात दोन पक्षी मारणाऱ्या ,ऐसीकर टेक्सास सुंदरीने मिठी मारून, "लौ यु " बोंबलत स्वागत केले. तेंव्हा मित्ररत्न "तणाव" ग्रस्त तरीही मधुर हास्य करते झाले. त्यांचा तणाव पाहुणे आल्याने नसून घरासमोरील भिकारड्या लॉनमध्ये वाढत्या तणामुळे असल्याचे निष्पन्न झाले.पंचक्रोशीत शोधूनही इतकं कुरूप लॉन चमेलीला दिसलं नाही. ठेविले अनंते टाईप नागरिकांना, आपण याहून चांगले लॉन सहज लावू शकतो अशी प्रेरणा मिळावी म्हणून "घासरत्न "पुरस्काराने मित्राचा सन्मान होणार असल्याचं कळल्यानं चमेलीला गहिवरून आलं.
"श्वानाचे श्लोक"मध्ये वर्णिल्याप्रमाणे मित्ररत्नाचे आणि कुत्ररत्नाचे अद्वैत झाल्याचे आढळले. मग ते एकाच चषकातून सोमरस प्राशन करणं असो किंवा भेळपुरी, पेडिग्री,सॉसेज वगैरे खाण्यासाठी एकच वाडगा शेअर करणं असो.असं म्हणतात की,स्व.कुमार गंधर्वांच्या घरी अहोरात्र तानपुऱ्याचा झंकार सुरु असायचा ,तसा मित्ररत्नाकडे अहोरात्र, "गुड्डॉग गुड्डॉग गुड्डॉग गुड्डॉग" असा मंत्रजप ऐकू येई. यापेक्षा मशिदीतील बांग परवडली, कारण ती दिवसातून फक्त पाच वेळा ऐकू येते असं चमेलीला वाटू लागलं.रोज सकाळी फिरायला जाताना होणाऱ्या ताटकळण्याच्या छळाला त्रासून ते अद्वितीय कुत्ररत्न , 'असुनी खास मालक घरचा म्हणती श्वान ज्याला .......परवशता लीश दैवे ज्याचा गळा लागला' अशी विदग्ध आळवणी करायचं . त्यामुळे अतोनात करुणरस पाझरून बगिचा आपोआप ओलिताखाली यायचा. वृक्षवल्ली बहरून ओसंडायाची.नारळ टपाटप पडून नेबरहूड मध्ये टेंगुळबाधित नागरिकांची संख्या दिन दुनि रात चौगुनी वाढायची. अल्बनी वाहतूक खात्याला नाईलाजाने त्या विभागात हेल्मेटची सक्ती करावी लागली.

उदरभरण नोहे ................

अमेरिकेत गेल्यावर मेक्सिकन पदार्थ खाल्ले नाहीतर थेट नरकात जावे लागते. त्यामुळे 'नो मीट' व शुद्ध शाकाहारी रूपात बुरितो, इंचीलाडा,टॉर्टिल्ला( मक्याच्या पोळ्या)टाको वगैरे इंद्राय स्वाहा , तक्षकाय स्वाहा करावे लागले. 'टाको बेल' या साखळी हॉटेलातले पदार्थ चवीला अगदीच भिकार वाटले.भात, काळ्या बीन्स वगैरे कालवाकालव केलेलं मक्याच्या आवरणातील जुनाट वासाचं लाकूड खातोय असे काहीतरी चमेलीला वाटलं.मायामीला की वेस्ट मध्ये हिंडताना रस्त्यावर हिंडणारा तुर्रेबाज कोंबडा आणि त्याला पिझा खाऊ घालणारा मालक असे अफलातून दृश्य तिला पाहायला मिळाले.मॅकडी चा बर्गर, कोक वगैरे खायचीप्यायची संधी न मिळाल्याने तिला अपार खिन्नता आली.सगळीकडे मिळणारी बादलीभर कॉफी पाहून चंदूला आणि तिला धडकीच भरे.आम्हाला अंघोळीला पाणी लागतं हो ,कॉफी फक्त अर्धा कपच पुरते असे चंदू वेटरला मराठीत म्हणे.वेटर म्हणे, वॉटेवा ,आय डोंट केअ !

अल्बनीमध्ये त्यांना टेक्साससुंदरीच्या पाकसिद्धीकृत यातना सहन कराव्या लागल्या.एरवी नुसत्या मार्मिक शब्दयोजनेमुळे लोकांचा रक्तदाब वाढवणारी टेसुंदरी,त्यांचा रक्तदाब वाढू नये म्हणून, बिनतिखटमिठाचे पदार्थ खाऊ घालून त्यांच्या रुचीकलिकांना(टेस्ट बड) विश्रांती देण्याची पराकाष्ठा करू लागली.त्या पदार्थांना छान छान म्हणणाऱ्या चंदू आणि चमेलीला,सर्वोत्तम अभिनयासाठी ऑस्करच्या बाहुल्या स्वतः ओबामाने तात्काळ घरीच आणून दिल्या. चंदू म्हणाला ,"छे छे , अभिनय कुठला ? घरी शिजवलेलं अन्न अमृतासमान आहे.आपल्याला हव तर त्यावर लोणचं, मीठ, लिंबाचा रस वगैरे भरपूर शिंपडून ते सहज रुचकर होऊ शकतं.ओबामा भारावून म्हणे , ' मग तुमची काही हरकत नसेल तर सहनशीलतेसाठी विशेष सन्मान म्हणून हि बाहुली ठेवाल का ?' ओबामाच्या सौजन्याची परतफेड म्हणून चंदूने ऑस्करची बाहुली ठेवून घेतली.टेसुंदरीला चंदू लैच आवडू लागला. टेसुंदरीने एकदा चुकून पावभाजी मध्ये तिखटमीठ टाकले होते. पुन्हा इतका चविष्ट पदार्थ कधी खायला मिळेल कोण जाणे, या विचाराने चमेलीने तेंव्हा मनमुराद हादडून घेतले होते. त्यामुळे टेसुंदरीचा आपल्या पाककौशल्याबद्दलचा अभिमान शून्य मंडळाला भेदू लागला.एकदा टेसुंदरीला वाईनप्राशन केल्यावर चिंटूला आणायला विमानतळावर ड्रायव्हिंग करत जायची वेळ आली.लेकाच्या भेटीसाठी व्याकुळ चमेलीला तिने अपघाताच्या भीतीने कारमध्ये येऊ दिले नाही.माझे पदार्थ खाऊन मरायला टेकलीस तरी डॉक्टरांना तुला वाचवायला वेळ मिळेल पण कार अपघातात नक्कीच मरशील म्हणे.चिंटू आल्यावर म्हणाला, "आई ,हिने तुला उगीच घाबरवले, हिचे कार ड्रायव्हिंग १००% सुरक्षित आहे. दोन बैलगाड्या आणि एक मॉर्निंगवॉकवाला आम्हाला ओव्हरटेक करून गेला." सुंदरीच्या या अथांग प्रेमामुळे चमेली सद्गदित झाली.क्रम्बलेल्या पाश्चात्य पदार्थात रमलेल्या टेसुंदरीने किचन गार्डनमधली अळूची पाने तोडून, अळूचं 'ऑर्थोडॉक्स फदफद ' शिजवून खाऊ घातलं, तेंव्हा तिच्या मराठी खाद्यसंस्कृती प्रेमामुळे गलबलून चमेली ऑक्साबॉक्षी गाऊ लागली...
नको देवराया अंत आता पाहू .... प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ...............

मेरे साजन हैं उस पार, मैं मन मार, हूँ इस पार ...............

अल्बनीहून सकाळच्या बसने न्युयॉर्कला जाऊन,दिवसभर हिंडून संध्याकाळी घ्यायला येणाऱ्या मित्ररत्नासोबत वॉशिंग्टनला जाण्याचा कार्यक्रम ठरला होता. चंदू आणि चमेली दिवसभर न्युयॉर्कमध्ये सबवेने प्रवास करणार होते.जवळ डॉलर असूनही त्यांना मल्टीकरन्सी कार्ड वापरून मेट्रो कार्ड काढावे लागणार होते.मल्टीकरन्सी कार्ड कधीच वापरले नसल्याने मेट्रो कार्डसाठी एका मुलीने त्यांना मदत केली. पुन्हा तिकीट काढायचे असेल तेंव्हा याच कार्ड वर पैसे वाढवा असे ती म्हणाली.न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरला हिंडून फिरून युनियन स्क्वेअरला जाण्यासाठी त्यांनी सबवेच्या मेट्रोकार्डवर बराच खटाटोप करुन दोन तिकिटांचे डॉलर अॅडवले. मेट्रोकार्ड स्वायपून चंदू लोखंडी बार ओलांडून पैलतीरी गेला. चमेलीने अनेकदा कार्ड स्वायपूनही तिची नैया पार होईना.मग नव्या तिकिटासाठी आणखी काही डॉलर टाकायला पुन्हा मल्टीकरन्सी कार्ड ऑपरेटचा खटाटोप सुरु झाला. चंदुला बावळट बाई म्हणायची सुसंधी लाभल्याने तो पैलतीरावरून केकाटू लागला.चमेली आतंकित होऊन इकडून बोंबलू लागली.कोडनंबर ओरडून चंदूचा घसा सुकला. इतका मेलोड्रामा सुरु असूनही त्यांना प्रेक्षक मिळेनात. १०/१५ मिनिटे आटोकाट प्रयत्न करुनसुद्धा काही होईना.तो वेळ तिला अंतहीन वाटू लागला होता.सोबत डॉलर असूनही तिथे उपयोग नव्हता. ती व्याकुळतेने गाऊ लागली ....मेरे साजन हैं उस पार, मैं मन मार, हूँ इस पार ओ मेरे माँझी अबकी बार, ले चल पार, ले चल पार ...........

चंदू दातओठ खाऊन तिला म्हणाला की,ताबडतोब या लोखंडी बार खालून ये ,काही बायका तशाच बिनातिकीट गेल्या. फक्त बायकाच कशा काय गेल्या म्हणून ती विचारू लागली. तो पिसाळून ओरडला , अबे भलते प्रश्न विचारू नकोस , आपण प्रयत्न केला ना मग झालं तर ! ये आता इकडे. चंदूऐवजी मीच आधी बार ओलांडून गेले असते तर बर झालं असतं. तिकीटाची थोडी खटपट करुन चंदू केंव्हाच बिनधास्त बारखालून निसटला असता असं तिला वाटलं.अखेर ती अत्यंत धाडसाने,जीव मुठीत धरून लोखंडी बार खालून निसटली.सगळे सीसीटीव्ही कॅमेरे तिच्यावर रोखले असून कोणत्याही क्षणी NYPDचे पोलीस येऊन "युआर्ररंडररेस्ट" म्हणत तिला हातकड्या घालतील म्हणून तिची हृदयक्रिया बंदच पडायला लागली.कसाबसा सबवे प्रवास करुन स्टेशनबाहेर आल्यावर तिने सुटकेचा श्वास घेतला.

पाहुण्यांचा कुंभमेळा .....

न्युयॉर्कहून कारने,पाऊस आणि वाहतूक मुरांब्यातून रमतगमत रात्री नऊ वाजता निघून चमेली-चंदू , ऐसीचं संपादकद्वय & मंडळी पहाटे पावणे तीन वाजता वॉशिंग्टन डीसीला पोहोचले. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल होष्टचंद्र, हास्याचं पिठूर चांदणं पसरवून वेलकमते झाले.त्यांना घरी बारमाही पाहुण्यांचा कुंभमेळा भरवायचं व्यसन आहे. त्यांच्या खाजगी विमानतळावरून अहोरात्र शटलने ये-जा करत पाहुणे खोखो खेळतात. घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये बुचुबुचू पावणे ठुसले की यांच्याकडे दिवाळी सुरु होते.दारूकामाचे बार,नाचत-माशे, अन्नछत्र, धोबीघाट आणि हास्यक्लब वगैरे उपक्रम अहोरात्र सुरु असतात.अनेक वर्षांपूर्वी नाशिकच्या कुंभमेळ्यात बिछडलेले दोन भाऊ एकमेकांना याच पावन तीर्थावर पुन्हा भेटले होते म्हणे.एक हरवलेल्या आजीबाई खूप शोधून कुठे सापडेनात,घाबरलेल्या होष्टचंद्रिकेने पोलिसात जाण्यापूर्वी सहज क्लॉझेट उघडले तर आज्जीचं मुटकुळं सुशेगाद घोरत होतं.हॉटेल्सना माल पुरवणाऱ्या "कॉस्टको" महादुकानाची एक शाखा फक्त यांच्या घरच्या माल पुरवठ्यासाठी राखीव आहे.होष्टचंद्रांच्या तळघरात कुबेराच्या खजिन्यासम विशाल ग्रंथालय असून त्याचा उपयोग वाचनाखेरीज मुख्यत्वे जालीय धुरंधरांना संदर्भ फेकून चितपट करण्यासाठी अहोरात्र होतो.

एकदा देश सोडला की आपल्या महान संस्कृतीचे पिरियॉडिक गहिवर काढायला एखाद्या मंडळाची आवश्यकता भासते.हे कार्य सिद्धीस नेणारे वॉशिंग्टन डीसीमधले, होष्टचंद्रांचे तनमनधन समर्पित," कल्चर व्हल्चर मंडळ " अख्ख्या अमेरिकेत वर्ल्ड फेमस आहे. या मंडळातल्या तमाम रुक्ष मराठ्यांना पाझर फुटावा म्हणून तिथल्या एका क्रांतीकारक स्त्रीने पुढाकार घेऊन "हग" मारायची रोमांचक फॅशन सुरु केल्याचे समजले.त्यामुळे वेळात वेळ काढून हजर रहाणाऱ्या इच्छुक,फॅशनेबल मराठ्यांना ,तिथले लोकं रसिक म्हणू लागले.

होष्टचंद्राच्या आग्रहाखातर चमेलीने म्युझियमे आणि काही टुरिस्टखेचक स्थळे बघायचे ठरवले. तिचा मल्टीकरन्सी कार्डचा न्युयॉर्कचा भयप्रद अनुभव बघता, दिलदार होष्टचंद्राने आपले क्रेडिटकार्ड यांना देऊ केले.चमेलीने अत्यानंदाने त्यांचे कार्ड वापरून जीवाचं वॉशिंग्टन करायचं ठरवलं. तिथली प्रेक्षणीय स्थळे पाहताना अतोनात पायपीट झाल्याने तिच्या पायाचे तुकडे पडले. सर्वत्र मठ्ठ , कुरूप आणि प्रचंड खांब असलेल्या रोमन शैलीतल्या, सरकारी इमारतीचं पेव फुटलेलं पाहून चमेली कंटाळली. कधी एकदाचं भारतात जाऊन कोंबड्यांची मोहक खुराडी पाहतोय असं तिला झालं.

लौट के बुद्ध घरको आये. ..........
चमेलीने आप्तमित्रांसाठी, एक टक्काही अमेरिकेन नसलेली चॉकलेट वगैरे भेटवस्तूंची व्यर्थ खरेदी केली. तब्बल एक महिन्याने घरी परत जायच्या आनंदात प्रवास कधी सुरु झाला आणि कधी संपला हे तिला कळलेच नाही.
भारतात परतल्यावरही मंडळींचं सामान न मिळण्याचा सिलसिला कायम होता. एअर फ्रान्सच्या वॉशिंग्टन डीसी -पॅरिस -मुंबई अशा प्रवासात मुंबईला उतरल्यावर कळले कि त्यांच्यासह ८६ भाग्यवान प्रवाशांच्या ब्यागा संपामुळे पॅरिसहून आल्याच नाहीत. त्या प्रवाशांच्या देहातून आणि मुखवासाने कोमांतिक दुर्गंधी पसरून एअरपोर्टवर हाहाःकार होऊ नये म्हणून विमानकंपनीने त्यांना टॉयलेट संच दिला . त्यात ब्रश,पेस्ट, दाढीच्या फावड्यासोबत डीओडरंट होताच शिवाय एक बनियानसुद्धा (!) होते. त्यांची बॅग घरपोच येणार असल्याने कागदोपत्री फॉर्मात येण्याचे सोपस्कार करून मंडळी डोमेस्टिक विमान पकडून घरी परतली .तीन दिवसांनी रेल्वेप्रवास करुन त्यांची बॅग घरी सुखरूप प्रकटली. मंडळींनी चॉकलेट वगैरे सोबत आणल्याने,बिछडलेल्या बॅगेच्या तीन दिवसीय रेल्वेप्रवासात सुदैवाने त्याचे डांबरीकरण होऊ शकले नाही .
आपल्या घरी आल्यावर त्यांना हाच तो पृथ्वीवरचा स्वर्ग आहे, हा साक्षात्कार तात्काळ झाला.
येणेप्रमाणे ,जेहत्ते काळाचे ठायी अमेरिकन सोक्षमोक्षाप्रत येऊन पर्यटनलीळा सुफळ संपूर्ण जाहल्या.

!! लेखनसंन्यास !!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

ROFL
तणावग्रस्त परिच्छेद हैट ए.. हा भाग भारी जमलाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कसली हसतीये. एकदम झकास झाला आहे हा भाग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी असं ऐकून आहे की पाव्हणे गेले आणि तुमच्या मित्ररत्नाच्या लॉनला हिरवळ फुटली. मला वाटतं 'पाव्हणोजींची स्वारी आली, लॉने टर्कुनि पिवळी पडली' असं काहीतरी झालेलं असणार. आता तणाव पूर्णपणे नाहीसा झालेला असून त्यांच्या पंचक्रोशीतल्या सर्वात वाईट लॉनांपेक्षा कितीतरी देखणं आहे असं तो टेक्साससुंदरीला सांगत होता म्हणे.

घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये बुचुबुचू पावणे ठुसले की यांच्याकडे दिवाळी सुरु होते.

हे खासच. वर्षातले दोनतीन दिवस त्यांच्याकडे पाव्हणे नसतात तेव्हा त्यांना आपल्या आयुष्याचं काय करावं असा प्रश्न पडतो. सगळी कपाटं शोधून पाहातात, रिकाम्या बेडरुमांमध्ये जाऊन निश्वास टाकतात असं ऐकून आहे. इतकं शोधूनही पाहुणे सापडले नाहीत की ते अचानक दोनतीन नोकऱ्या बदलतात. मला वाटतं नवीन नोकरीत त्यांचं ओरिएंटेशन झालं की कधी एकदा कॉंप्युटर हाती येतोय आणि आपण राजीनाम्याचं पत्र खरडून बॉसच्या इनबॉक्सवर आदळतोय याची त्यांना घाई होते. म्हणून काही कंपन्या त्यांना पहिले काही आठवडे कॉंप्युटरच देत नाहीत. हा डाव कधीकधी यशस्वी होतो, कारण एकदा नवीन पाहुणे घरी येऊन पोचले की मग त्यांना घराबाहेर पडण्यासाठी निमित्त मिळतं.

घरी पोचल्यावर दिसलेला स्वर्ग आणि त्याआधी महिनाभर अनुभवलेला नरक याची तुलनाही येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॉनला हिरवळ फुटली? हा हा हा "मेल्या म्हशीला मणभर दुध" बाकी < लॉने टर्कुनि पिवळी पडली'> Biggrin Biggrin

<रिकाम्या बेडरुमांमध्ये जाऊन निश्वास टाकतात असं ऐकून आहे. > ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे! लेख वाचून हसायचं आणि प्रतिसाद वाचूनही हसायचंच?
बहुत नाइन्साफी हय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"गुड्डॉग गुड्डॉग गुड्डॉग गुड्डॉग", रुचीकलिका, बुचुबुचू, कोंबड्यांची मोहक खुराडी ब ब ब ...काय काय वेचावे. कहर लिहिलंय

गरम पातेल्यातल्या पॉपकॉर्नसारखा तडतडा फुटणारा लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधीचा भाग आवडला होता. हा भाग आवडला-आवडला.( रेज़्ड टु हे टंकता येत नसल्याचा पुरावा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याच त्या अ-प्रेक्षणीय स्थळांची थोड्याफार फरकाने वर्णने वाचायला मिळणार कि काय अशी धास्ती होती पण सखुबैंनी त्या स्थळांकडे पाठ फ़िरवुन अवर्णनीय म्याड व्यक्तिचित्रण करून चांगलेच सर्प्राइज दिले. बाकी आपण तर त्यांचे डाय हार्ड फ्यान आहोत बुवा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0