फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.

१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते

मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?

दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.

यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.

यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.

२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?

‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.

या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?

जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.

अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.

मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?

जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.

जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.

३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र

तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.

२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.

या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.

इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.

४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे

टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.

पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.

५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.

पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?

प्रतिक्रिया

छान

like it Smile

याला उपप्रतिसाद द्यायची सोय आहे अजून!
Smile

आणि याला पण!

अरे वा!
पण शीर्षक गायब!

राकुंना वॅलेंटाइन डेची भेट असावी बहुदा व्यवस्थापकांकडून

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अडगळीत असली, कोणी कमेंट करू शकत नाही हे माहित असूनही 'आपली' आहे म्हणून कधीतरी फेरफटका होई. तसेच आज झाल्यावर चक्क खाली प्रतिक्रिया दिसल्या.
आनंदाची गोष्ट आहे.
माझ्या एकट्यासाठी नव्हे तर एकूणच सगळ्यांसाठी येथे काही बदल झाले, तर चांगलेच आहे.
उगाच विरोधासाठी विरोध करायचा म्हणून नव्हे, पण आपल्याला जे मनापसून वाटते ते कसलेही नियम न मोडता करत राहणे किंवा त्याबाबतचा आग्रह धरणे हेच योग्य. अर्थात एखाद्याने तुमचे सदस्यत्वच रद्द केले तर कसला आग्रह किंवा गांधीगिरी.? केवळ यासाठी का होईना, व हे अतिशय महत्त्वाचे आहे, संपादकांनाही याचे श्रेय आहेच.

खेड्यातल्या वढाळ गायीचे दोन पाय एकमेकांशी बांधून पळण्याचा वेग आणि अंतर यावर नियंत्रण ठेवलं जातं पण म्हटलं तर फ्रीडम ऑफ मूव्हमेंटही दिलं जातं. अशा धर्तीचा उपाय प्रतिसाद अन प्रतिसादकांवर केलाय की काय? Wink

वाह! काय उपमा दिलीत गवि!

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फुसके बार – १५ फेब्रुवारी २०१६ - पालकांची हळुवार शिकवणूक, फिल्मफेअर, चीनी कम
.

१) फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या कार्यक्रमामध्ये बजरंगी भाईजान या सिनेमाला सर्वोत्तम चित्रपटाचे व धन्य सलमानखानला सर्वोत्तम अभिनेत्याचे नामांकन मिळते, यातच या अवॉर्डच्या दर्जाची कल्पना येते. की हा दर्जा हिंदी चित्रपटसृष्टीचा म्हणावा? पाच दर्जेदार सिनेमांची, दर्जेदार अभिनेत्यांची नावे यांना मिळू नयेत?

तरी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये या सिनेमाला मानवतेचा संदेश देणारा सर्वोत्कृष्ट सिनेमा; मग तो संदेश कितीही बटबटीत व कितीही बटबटीतपणे दिलेला का असेना, किंवा तत्सम अवॉर्ड मिळण्याचा धोका अजूनही आहेच.

यावरून अनेक वर्षांपूर्वी एका सिनेमासिकामध्ये वाचल्याचे आठवते. आणीबाणीच्या सुमारास राजेश खन्नाचा रोटी हा सिनेमा आला होता. पुरस्कारांची हेराफेरी करणा-या एका दलालाने त्याला विचारले की या सिनेमासाठी तुम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून द्यायचे का?

त्यावर्षी त्यापेक्षा अनेक उत्तम चित्रपट स्पर्धेत असल्यामुळे राजेश खन्नाने त्याला सांगितले, “थोडी शरम कर यार। अगली साल दिलवा देना। इस साल दिलाओगे, तो पब्लिक जूते मारेगी।

२) वैजयंती वैजयंती यांनी त्यांची एक आठवण शेअर केली आहे. पालकांनी वेळेत योग्य व मनाला पटेल अशी समजुत व तीदेखील हळुवारपणे घातली की त्याचा कसा वेगळा परिणाम होतो ते सांगणारी.

त्यांच्या पोस्टचा थोडा भाग खाली.

“अकरावीत गेले..नागपूरच्या एका सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये ....राहणे होस्टेलला.
कॉलेजचे वातावरण खूप वेगळे...मुले-मुली हसूनखेळून मिसळून राहत ह्याचे काही मला अप्रूप वाटले नव्हते, पण पहिल्या आठवड्यातच कानावर पडले की कुणी सिनिअर मुले अकरावीतल्या मुलीना 'I love you' असे एकदम पुढ्यात जाऊन म्हणतात.
मुली गोंधळून जात...बहुतेकजणी घाबरत. रडू फुटे. दुसऱ्या दिवशीपासून मोठा भाऊ किंवा वडील कॉलेजला सोडून देत असे दृश्य दिसे.
शनिवारी घरी गेले तेव्हा आईबाबाना हे सांगितले. आईच्या चेहऱ्यावर थोडे काळजीचे भाव दिसले, पण ती काही बोलली नाही. बाबा शांत होते. 'तुला त्रास होईल का असं तुला कुणी म्हटलं तर?' त्यांनी विचारलं.
मला त्या कल्पनेनेच जवळजवळ रडू कोसळले. 'त्रास नाही करून घ्यायचा', बाबा म्हणाले. 'समज तुला अचानक कुणी पुढ्यात येऊन गाठून असं काही बोलून दाखवलं तर काय करशील?' त्यांनी विचारलं. माझा जीव आणखीनच घाबरा झाला. 'घाबरायचं नाही. शांत रहायचं. त्या मुलाकडे स्थिर, शांत नजरेनं बघायचं, आणि त्याला म्हणायचं 'Thank you so much. So kind of you.'
थक्कच झाले मी हे ऐकून. बाबा माझ्याकडेच बघत होते. 'हे बघ, खरोखर त्या मुलाला असं वाटत असेल किंवा नसेल, हे तुला नाही कळू शकणार कदाचित. ती निव्वळ खोडी सुद्धा असू शकते. पण ती त्याची प्रामाणिक भावना सुद्धा असू शकते. काहीही का असेना. त्याच्या बोलण्याचा मान ठेवायचा. आणि मन शांत ठेवायचं.'

यावरून आठवले. माझ्या एका मित्राने त्याच्या मुलीला सांगून ठेवले होते. कोणी 'आय लव्ह यू' असे आगंतुकपणे म्हटलेच, तर त्याला विचारायचे की 'ठीक आहे. लग्न करायला तयार आहेस का?' या प्रश्नावरच बहुतेक जण गार पडतात. त्यातूनही कोणी हो असे म्हणालाच, तर म्हणायचे की ठीक आहे, तुझे नाव क्यू मध्ये घातले आहे. वाट पहा. अर्थात हे थोडे मोठे झाल्यावरचे.

परंतु हे सारे “तू हॉं कर या न कर, तू है मेरी किरन” हे सिनेमातून समाजात पाझरले नव्हते व नकार पचवता येत नाही म्हणून त्यावरून मुलीचा थेट जीव घेण्याइतकी किंवा तिचा चेहरा अॅसिड टाकून आणखी सुंदर करण्याइतकी मुले शहाणी झाली नव्हती, तोपर्यंत ठीक होते.

३) चीनी कम

आज ब-याच दिवसांनी पर्वतीवर गेलो. गिरनार वगैरेच्या मानाने इथल्या पाय-या फार नाहीत किंवा राजगडाएवढी अवघड चढणही नाही.. पण शारीरिक तंदुरूस्ती ही एवढी मोठी सार्वत्रिक समस्या झालेली आहे की तेथे अनेक नमुने पहायला मिळतात.

चढताना जेवढा खडा चढ, तेवढाच उतरताना खडा उतार. अशा वेळी उतरतानाची अव्हाने वेगळीच असतात. प्रत्येक वेळी पाय पायरीच्या खाली टाकल्यावर ब्रेक लावावा लागतो.

एक युगुल उतरत होते. हिंदड असावेत. हिच्या उंच टाचेच्या चपला. उतरताना दोनदा तोल गेला. त्याच्यावर वैतागली. ये कहॉं लेके आये मुझे आज के दिन. तो सांगतोय की मी हात धरलाच आहे, तू पडणार नाहीस, सावकाश उतरू. पण हिचे सुरू, ‘मेरे सामने पुरी जिंदगी पडी है, पैर को कुछ हो गया तो? और वोभी आज के दिन’. मग याने सांगितले की सरळ चपला हातात घे व उतर, सोपे होईल. यावर ‘तुम भी ना, मुश्किल से मुश्किल आयडिया देते जा रहे हो, आज के दिन’. मग लक्षात आले की ‘आज के दिन’चे हे पालुपद व्हॅलेंटाइन डेबद्दलचे असावे. हा दिवस काही जणांच्या डोक्यात इतका भिनलेला असू शकतो याची कल्पना नव्हती. त्याच्या डोक्यातही आले नसेल, पण मला वाटले की हिची कशालाच तयारी नाही, तर मग याने हिला कुठल्याशा सिनेमातल्या हिरोप्रमाणे त्या उतारावरून उचलून घेऊन जावे अशी हिची अपेक्षा आहे की काय! एव्हाना आम्ही वरच्या पायरीपर्यंत पोहोचलो होतो. परत येईपर्यंत ते तेथे दिसले नाहीत, म्हणजे कसे तरी उतरून गेले असावेत असा कयास बांधला.

काही पाय-या थोड्य मोठ्या उंचीच्या आहेत व या परिसरात अनेक भटकी कुत्री आहेत. त्यातले एक कुत्रे पायरीच्या खालीच झोपलेले होते. असे, की उतरणा-याला ते दिसूच नये. उतरणा-यांमध्ये एका जोडप्याचा हात धरलेली त्यांची दोन लहान मुले होती. उतरताना तीच अर्थात पुढे. त्यामुळे कोण कोणाला आधार देत आहे हा प्रश्न पडावा. पुढे असलेल्या मुलाला पायरीखालचे कुत्रे अगदी ऐनवेळी दिसले व त्याचा पाय त्या कुत्र्यावरच पडला. त्यासरशी ते कुत्रे केकाटत पळून गेले पण त्या गोंधळात त्या मुलासह ते चौघेही खाली पडले. मोठाच गोंधळ. मुलांना त्या पडण्याचे काही विशेष वाटले नाही, उलट गंमतच वाटली. मात्र मोठ्यांना म्हणजे आईवडलांना मोठे होताना शिंगेही फुटलेली असल्यामुळे तसे पडणे त्यांना अपमानास्पद वाटले आणि मग झाली ग्रेट भारतीय परंपरेप्रमाणे पतीदेवांकडून पत्नीदासीची हजेरी घेणे सुरू. इरसाल मराठीतून. तोपर्यंत सुशिक्षित वाटणा-या त्या जोडप्याचा खरा आवतार दिसला.

काही जण नियमितपणे चढणारे. अशा एकाचा मित्र त्याच्यासमवेत नव्याने आलेला. धापा टाकत चढणारा. रोज येणा-याला तो वेग असह्य झाला. तो त्याला म्हणाला तू सावकाश चढ. आपण वर भेटू. तेवढ्यात माझ्या दोन तरी खेपा होतील. हे बेस्ट वाटले.

यावरून वाटले. ते ‘आज का दिन’ जाऊ दे, पण चीनी कम मधल्या का प्रसंगामध्ये तरूण असलेली मुलगी तिच्यापेक्षा वयाने किती तरी मोठा असलेल्या एकाच्या प्रेमात पडते. पण त्यातल्या त्यात डोळसपणे. ती त्याची परीक्षा घेण्यासाठी तेथून काही अंतरावर एक झाड की काहीतरी असते. ती त्याला तिथपर्यंत धावत जाऊन ये असे सांगते. हा कसेबसे ती अट पूर्ण करतो आणि मग पुढे ते दोघे सुखाने नांदू लागतात. बहुतेक. बहुतेक म्हणायचे कारण की अशा नात्यातली गुंतागुंत फार वेगळी असते. ते सिनेमाचा पुढचा भाग काढेपर्यंत कळणे नाही. कोणी तरी ही बाब त्यांच्यापर्यंत पोहोचवावी.

तर ती मुलगी ही चाचणी काही ‘विशेष’ कारणासाठी घेते. मात्र त्या मानाने वयाच्या दृष्टीने नॉर्मल जोडपी असली तरी अनेकदा दोघांच्या शरीराचा आकार इतका बदलतो, की काहींना अगदी परावलंबी व्हावे लागते. मागे उरळीकांचनला जे निसर्गोपचार केंन्द्र आहे, तेथे एका वजनदार महिलेला दाखल करायचे होते. महिला इतकी वजनदार होती, की तिला त्या काळातली सर्वात मोठी अशी जी गाडी होती, त्या अँबॅसॅडर गाडीतून बाहेरच काढता येत नव्हते. अर्थातच तिला स्वत: बाहेर पडणे सक्यच नव्हते. तेथील केंद्राच्या लोकांनी बरेच प्रयत्न केले, पण त्यांना जमेना. त्यांचा प्रश्न पडला की मुळात या गाडीत मावल्याच कशा.

हे सगळे पहात त्या महिलेचा अगदी सडपातळ पती जवळच उभा होता. तो शांत होता तरी अर्थातच अस्वस्थ दिसत होता. त्यांचा जाडपणा काही जेनेटिक प्रश्नामुळे आहे का असे तिथल्या केंद्राच्या एका अधिका-याने त्याला विचारले तर तो निराशपणे ‘काहे का जेनेटिक, मुंह कभी बंद रहता ही नहीं इसका’ असे गुजराती वळणाने म्हणाला. अखेर त्याने त्याच्या मुलांना खूण केली. त्यासरशी दोन्ही मुले दोन बाजुंनी गेली. एकाने हाताने जोर पडेना म्हणून पायाने त्या महिलेला म्हणजे आपल्या आईला रेटले आणि दुसरीकडून दुस-याने तिला ओढले. अशा प्रकारे ती महिला गाडीतून बाहेर आली. त्यापुढचे दिव्य वेगळेच होते. तिला तिच्या पायावर तिचा भार पेलताच येत नव्हता. व्हीलचेअरमध्ये ती मावत नव्हती. अखेर तिला स्ट्रेचरवर कसेतरी चढवून आत नेले. What's Eating Gilbert Grape हा लिओनार्दो व जॉनी डेप यांचा सिनेमा या घटनेच्या ब-याच कालावधीनंतर आला असेल, पण तो सिनेमा पाहताना या घटनेची हमखास आठवण येते.

तेव्हा प्रश्न असा आहे, व्हॅलेंटाइन काय, एकमेकांचे वाढदिवस काय, लग्नाचा वर्धापनदिन काय, इतके प्रसंग असतात. कोणी कोणी एकमेकांच्या मागे लागलेल्या गोळ्या नियमितपणे घेतल्या जात आहेत ना, इतपत जरूर चौकशी करत असतील, काळजी घेत असतील. पण आपल्या जोडीदाराचे पोते होऊ नये म्हणून शारीरीक तंदुरूस्तीचा आग्रह एकमेकांकडून धरला जाताना दिसतो का?

मुळात हादेखील एकमेकांवरील प्रेमाचाच भाग आहे असे तेवढ्याच तीव्रतेने वाटताना दिसते का आपल्याला?

पाने