चित्रबोध -१

'चित्रबोध' रसग्रहणवर्गांची रविवारी सांगता झाली. आधी मी हरेक दिवसाचे वार्तांकन करायचे ठरवले होते. मात्र रोज रात्री घरी आलो की दिवसभराच्या माऱ्याने शिणलेला मेंदू अधिक काही करायला नकार देत असे. आणि आता, सारी व्याख्याने संपल्यावर एकाच विषयावर विविध व्याख्यात्यांनी व्यक्त केलेल्या मताचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्याख्यानाचे 'वार्तांकन' करण्याऐवजी मी या रसग्रहण वर्गाचे सार 'प्रश्नोत्तरे' या पद्धतीने ऐसीअक्षरेच्या वाचकांपुढे ठेवायचा प्रयत्न करणार आहे.
भाग-१

दृश्यकला म्हणजे काय? यात काय अंतर्भूत होते?


ज्या कलांचा आस्वाद मुख्यतः डोळ्यांचा वापर करून घेतला जातो व ज्यात 'परफॉर्मन्स' चा भाग कमी असतो, त्यांना दृश्यकला म्हणता येईल. यात मुख्यतः चित्रकला, शिल्पकला, विविध हस्तकला (जसे कुंभकला, सुतारकला इत्यादी), छायाचित्रण, चित्रपट व नाटकातील दृश्य-व्यवस्थापन येतात. या रसग्रहण वर्गात मात्र 'चित्रकला' याच विषयावर बहुतांश चर्चा झाली.


एकुणात या रसग्रहण वर्गाचे उद्दिष्ट काय होते? कुठकुठल्या विषयांवर व्याख्याने झाली?

यासाठी पूर्वतयारी हा धागा उपयुक्त ठरावा. या व्याख्यानांशिवाय काही व्हिडियो, डॉक्युमेंट्रीज प्रेक्षकांना दाखवण्यात आल्या. याव्यतिरिक्त दर व्याख्यानाच्या आधी माधुरी पुरंदरे व श्री. प्रमोद काळे यांनी विविध लेखांतील, कवितांतील, प्रकाशित पत्रातील उत्तमोत्तम उतारे वाचून दाखवले. दर व्याख्यानाआधीचे हे अभिवाचन हादेखील आकर्षणाचा आणि वाट पाहायला लावणारा भाग होता. कधी माधव आचवल तर कशी गायतोंडे यांच्या पुस्तकातले उतारे यायचे, तर कधी चानी आपल्याला भेटायची, कधी अवनींद्रनाथांची पत्रे समोर येत, तर कधी धामणस्करांची भेट घडे, फ्रेंच कवितांची स्वतः केलेली भाषांतरेही माधुरीताईंनी एकदा सादर केली. यातील प्रत्येक उतारा, वेचा अतिशय श्रवणीय, अनेकदा मननीय व अभिवाचनाचा वस्तुपाठ देणारा होता.


रसग्रहणवर्गानंतर चित्रे काढण्याच्या पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी माध्यमे-साधने, त्यात होणारे बदल, त्यांचा प्रवास याविषयी नवी माहिती मिळाली का? कोणती?


होय वैशाली ओक यांचे 'कलासाहित्य' हे व्याख्यान पूर्णपणे या विषयाला वाहिलेले होते. कलासाहित्यावरचे हे भाषण मला काहीसे अडखळत सुरू झाल्यासारखे वाटले. बहुदा दडपण असेल किंवा काय माहीत नाही पण काही वेळातच त्या सावरल्या आणि अधिक आत्मविश्वासाने बोलू लागल्या. प्रागैतिहासिक काळांपासून ते आधुनिक काळापर्यंत चित्र काढण्यासाठी / प्रतिमा काढण्यासाठी कोणकोणती माध्यमे वापरली गेली, त्या माध्यमांची माहिती, त्याचे गुण, त्यातील त्रुटी अश्या स्वरूपाचे हे व्याख्यान होते. प्रत्येक प्रकारच्या साहित्याने, विशिष्ट पृष्ठभागावर चित्र काढताना वापरण्यात आलेली पद्धत दाखवण्यासोबतच, त्या त्या साहित्याचा वापर करून चितारण्यात/रंगवण्यात आलेली प्रसिद्ध चित्रकारांनी काढलेली चित्रे, त्याद्वारे विविध पद्धतीत पोत, प्रकाश आदी गोष्टी दाखवायच्या पद्धती यातील कधी सूक्ष्म तर कधी ढोबळ भेद आदी मार्गाने हे व्याख्यान पुढे सरकत होते.

व्याख्यानातल्या प्रत्येक माध्यमावर इथे लिहिण्याचे प्रयोजन नाही. मात्र त्यातील काही रोचक/महत्त्वाची माहिती (मला रोचक वाटलेली) आपल्यापुढे ठेवत आहे.
-- चारकोल हे माध्यम वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चारकोलने काढलेल्या रेषा पुसणे अगदी सोपे असते. जाड रेषा हाताच्या टिचकीनेही धूसर होतात. जर पूर्ण पुसायच्या असतील तर साधारणतः 'ब्रेड'चा वापर करतात (हो, हो! खायचा ब्रेड)
-- पेस्टल रंग तयार करताना खनिजांची पूड करून मिळवलेले मूळ रंग डिंकात मिसळून कोरडे (ड्राय) पेस्टल रंग बनविले जातात, तर ते रंग मधमाश्यांच्या मेणात मिसळून मेणाचे रंग (खडू किंवा कोणत्याही आकारात) बनविले जातात.
-- जलरंगांसाठी वापरला जाणारा ब्रश हा खारीच्या केसांपासून बनविलेला असतो तर ऑईलपेंट्ससाठी {यात जवसाचे तेल वापरलेले - मिसळलेले- असते) डुकराच्या केसांचे ब्रश वापरणे अधिक सोयीचे पडते.
-- अजिंठ्याची चित्रे हा तर चित्रकारांच्या आवडीचा विषय. तिथे असणारी चित्रं अजून टिकून आहेत त्याचं कारण ती रंगवायला वापरलेले रंगच नसून ती ज्यापद्धतीने बनविली आहेत त्यात आहे. हि चित्रे चुन्याच्या ओल्या गिलाव्यावर चितारली आहेत. अश्या चित्रांसाठी पृष्ठभाग हा 'ताजा ताजा' तयार करून घ्यावा लागतो. निवडलेल्या भिंतीवर चुना, डिंक यांचे मिश्रण करून गिलावा केला जातो. एक वाळल्यावर त्यावर अजून एक असे डिंकाचे प्रमाण कमी करत करत थर दिले जातात. शेवटी केवळ चुन्याचा गिलावा करतात व तो वाळायच्या आत त्यावर चित्र काढावे लागते. जर खूप मोठे चित्र असेल तर जितक्या भागात चित्र काढायचे आहेत तितक्याच भागावर गिलावा करतात. जर गिलावा वाळला की मग त्यावर चित्रा काढले जात नाही. पुन्हा सगळे फोडून ही पद्धत पहिल्यापासून राबविली जाते.
"नितीन हडप" यांनी अश्या भित्तिचित्रांच्या पद्धतीवर (पद्धत सांगण्यासाठी) एका अनाम कवीने रचलेल्या ओळी आपल्या व्याख्यानात सादर केल्या होत्या त्याही इथे देतो:

चित्र लिहावेयांची आईती केली| नीट मिती कापडीली|
षडी सारूनी घोटाळली| वर्ते षडी मेळविली|
षडी पाची हिंगुळू आळीता| नीती मनसीळ गोंदता|
मसी डीकू दोडे घेऊ| केलिया लिपणीया बहुता|
भिंगी मारमुकेला संषू| आदरीली चित्ररेषू||

१- तयारी २- पूड
ओळी घाईत लिहून घेतल्या आहेत चूभूद्याघ्या

विविध माध्यमे वापरून तयार केलेल्याच चित्रांची झलक इथे पाहू. इथे लक्षात घेण्यासारखी बाब आहे ती वेगवेगळी माध्यमे वापरून 'पोत' दाखवण्याच्या पद्धतीतला फरक. म्हणजे भांडे, पाणी, काच, कापड आदी वस्तू आपण डोळ्याने 'स्पर्शतो'. म्हणजे त्याच्या 'पोताचा' अंदाज जसा वस्तू बघून आपला मेंदू करतो तसाच ते चित्र बघूनही करतो:

चारकोल
चारकोल
जलरंग (चंद्रकांत मांढरे)
जलरंग (चंद्रकांत मांढरे)
ऍक्रेलिक (रायट-सुधीर पटवर्धन)
ऍक्रेलिक (रायट-सुधीर पटवर्धन)


कलावंताला जे व्यक्त करायचे असते त्याचा आणि माध्यमाच्या निवडीचा संबंध असतो का?

अर्थातच. केवळ काय व्यक्त करायचे आहे त्यावरच नव्हे तर तजेलदारपणा, टिकाऊपणा, हवामानाचा परिणाम इत्यादी बाबी देखील माध्यम निवडताना महत्त्वाच्या असतात. याशिवाय माध्यमाची उपलब्धतादेखील अर्थातच लक्षात घेतली जाते. वैशाली ओक यांनी याचे फार चांगले उदाहरण दिले. त्यांना ललित कला अकॅडमी कडून राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकृती इथे बघता येईल (शेवटचे चित्र). हे चित्र गोध्रा घटनेनंतर काढलेले आहे. या अभिव्यक्तीसाठी त्यांनी 'फॅब्रिक' हे माध्यम वापरले आहे. रूढार्थाने ते चित्र नाही. विविध फॅब्रिक्स एकावर एक चिकटवून योग्य तो पोत निर्माण केला आहे. चित्राने रक्त काढण्यापेक्षा कापडातूनच रक्ताचा आभास निर्माण करून त्यांनी केवळ चित्रापेक्षा अधिकचा संदेश या माध्यमाच्या निवडीतून पोहोचवला आहे. कित्येक आदिवासी त्यांना उपलब्ध असलेले गेरू, हळद, तांदळाची पिठी, नीळ अश्या गोष्टी वापरूनच चित्र काढत असत / काढतात. याव्यतिरिक्त काही जणांनी काही तंत्रे व्यावसायिक कारणासाठी तयार केली - वापरली. जसे लिथोग्राफीचे तंत्र राजा रवी वर्मा यांनी चतुरपणे वापरले ज्यामुळे त्यांच्या चित्रांची क्वालिटी बरीच कमी झाली मात्र ती घराघरात पोहोचायला मदत झाली. केवळ माध्यम बदलून चित्रकलेत आणि चित्राच्या प्रतीत झालेला बदल राजा रविवर्म्यांच्या चित्रांचा अभ्यास करता लक्षात यायला अधिक मदत होते. (ऋचा कुलकर्णी यांनी तुलना करण्यासाठी "लक्ष्मण व सुभद्रा" हे चित्र वापरले होते. त्याची लिथोग्राफिक प्रिंट न मिळाल्याने मी इथे दुसरे उदाहरण घेत आहे. इथे डावीकडील चित्र रवी वर्मा यांचे आहे तर उजवीकडे त्याच चित्राची लिथोग्राफिक प्रिंट आहे.

दिसणं आणि बघणं यावर कोणी बोललं का? काय बोललं?

समर नखाते यांनी आपल्या 'दृष्टी-सृष्टी-कलासृष्टी' भाषणाची सुरवात प्रश्नांनी अत्यंत प्रभावीपणे केली. (पुढे उत्तरार्धात भाषण काहीसे अमूर्त झाले; ) व माझ्या बरेच डोक्यावरून गेले ते सोडून देऊ). याआधीच्या एका व्याख्यानात काही कलाकृती दाखवल्या होत्या व त्या दाखवल्यानंतर शेवटी सांगितले की या कलाकृती जन्मापासून अंध मुलांनी बनविल्या होत्या. नखाते यांनी या प्रश्नाचा धागा घेत प्रेक्षकांना विचारलं की म्हणजे या व्यक्तींनी आयुष्यात प्रकाशाची तिरीपही पाहिली नाही मात्र तरीही ते जग त्यांच्या परीने बघतच असतात हे खरं की नाही?. तेव्हा केवळ डोळ्यांनी पाहण्याच्या पुढे ही क्रिया असणार हे तर उघड आहे. सामान्यतः माणूस नुसता निरूद्देश्य पाहण्याच्या पुढची एक पायरीदेखील गाठतो, ज्यात डोळे भरून बघणं, डोळे मिटून बघणं वगैरे येतं. शिवाय हेही खरं की डोळ्यांना एकाच वेळी अनेक गोष्टी दिसत असतात. मात्र आपला मेंदू त्याला गाळणी लावून त्यातील ठराविकच गोष्टी 'बघायला लावतो'. (जसे आपल्याला आपले नाक सतत दिसत असते, मात्र मेंदू त्याची जाणीव होऊ देत नाही). मात्र तरीही याव्यतिरिक्त कित्येक गोष्टी माणसाला दिसतात पण तो त्यांच्याकडे बघत नाही. ते म्हणजे आतमध्ये बघणं किंवा 'स्व' मध्ये बघणं. जेव्हा आपण बाहेरून एखादी गोष्ट बघतो तेव्हा त्याचा दृश्य-अदृश्य परिणाम आपल्या 'स्व' वर होत असतो. तो काय परिणाम होतो तो आपण बघायला विसरलो किंवा टाळतो आणि त्या चित्राचं 'बाह्य' वर्णन करायला सुरवात करतो. तेव्हा एखाद्या चित्राचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याच्या बाह्यवर्णनापलिकडे जाऊन त्या चित्रकाराला काय सुचवायचं आहे ते समजून घ्यायला लागतं. प्रत्येक चित्रकाराला आलेला अनुभव, पार्श्वभूमी आपल्याला माहीत असेलच असे नाही मात्र जर त्याचा अंदाज आपण चित्र बघून लावू शकलो तर आपल्याला ती 'दृष्टी' आली असे म्हणू शकू. आणि ती कशी आणायची याचा असा काही ठोस फॉर्म्युला नाही. त्यासाठी केवळ 'सराव' हे एकच उत्तर आहे.

भारताची स्वतःची अशी कलापरंपरा आहे का? असल्यास त्याची थोडक्यात ओळख कशी करून दिली गेली?

'भारतीय कलापरंपरेची ओळख' यावर नितीन हडप व ऋचा कुलकर्णी यांची अत्यंत सुंदर व्याख्याने झाली. दोघांनीही खास या कार्यशाळेसाठी प्रेक्षकांपर्यंत पोचतील अशी तथ्ये सांगणारी नेमकी चित्रे आपल्या व्याख्याना दरम्यान वापरली होती. त्यांच्या चित्रांमुळे त्यांनी 'ओतलेल्या' माहितीच्या धबधब्यातही काही सुसंगती लावता आली. खरं तर या विषयाचा आवाका फार मोठा आहे. प्रागैतिहासीक काळापासून गुहांच्या भिंतींवरच्या चित्रांपासून ते ब्रिटिश अंमल संपेपर्यंतचा काळ या दोन वक्त्यांनी उलगडवून दाखवला. नितीन हडप यांनी प्रागैतिहासीक काळापासून ते मुघल चित्रांपर्यंतचा प्रवास उलगडला तर ऋचा कुलकर्णी यांनी मुघल चित्रकलेपासून सुरवात करून इंग्रजांचे आक्रमण, युरोपियन चित्रांचा शिरकाव, राजा रविवर्मा यांचे युरोपीय चित्रांचे भारतीयीकरण, रविंद्रनाथ-अवनींद्रनाथ-अमृता सहगल पर्यंतचा प्रवास उलगडवून दाखवला. ऋचा कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचा विशेष उल्लेख याहीसाठी हवा की केवळ शैली-त्यातील बदल न दाखवता त्यावेळची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती व त्याचा चित्रकलेवर होणारा परिणाम त्यांनी अत्यंत छान उलगडवून दाखवला.

भीमबेटका (मध्यप्रदेश) - गुंफाचित्रे
भीमबेटका (मध्यप्रदेश) - गुंफाचित्रे

नितीन हडप यांनी भीमबेटका वगैरे ठिकाणी मिळणारी गुंफाचित्रे त्याची माध्यमे वगैरे पासून सुरवात केली. भारतीय पुराणातील 'चित्रसुत्र', त्यातील काही तत्त्वे यांचाही त्यांनी अगदी थोडक्यात परामर्श घेतला. गुंफाचित्रांकडून हळूहळू भित्तीचित्र (बदामी, तंजावूर) वगैरे प्रवास करत अजिंठ्यापाशी गाडी येऊन थांबते. प्रागैतिहासिक चित्रांसासून साधारण याकाळापर्यंतचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ जिवंत-हलत्या प्राण्यांचा चित्रात समावेश असणे. झाडे, पर्वत, घरे वगैरे बाबींना चित्रातून वगळलेले दिसते. यानंतरच्या काळात मुघल आक्रमणानंतर चित्रांच्या दुनियेत पुन्हा एकदा खळबळ माजलेली दिसते. पर्शियन लोकांनी आणलेली त्यांची शैली, त्यातही शिया चित्रविषय, सुन्नी चित्रविषय आदीमधील जन्माला आलेली मुघल चित्रशैली व दक्षिणेकडील दख्खनी चित्रशैली येते. शिवाय मुस्लिम राजवटीत मूर्तीचित्रांना वाव कमी मिळू लागल्याने चित्रकार झाडे, फुले, सण यांची चित्रे काढू लागले. याकाळात या खास तयार झालेल्या शैलीत काढली चित्रे अनेक दिसतात.

मुघल चित्र
मुघल चित्र

साधारण १४व्या शतकात कागदाचा शोध लागला आणि भित्तिचित्रे कमी होत गेली. कागदाचा मुख्य वापर पोथ्या तयार करण्यासाठी। होऊ लागला आणि 'पोथीचित्रे' जन्माला आली. मुघलशैलीतली ही चित्रे 'मिनिएचर'चित्रांची जननी म्हणायला हवी. गरज असेल तिथे व तितक्याशा जागेत काढलेल्या या चित्रातही सारे तपशील मात्र खुबीने दिसायचे.

या काळापर्यंतच्या चित्रात अजून एक लक्षात घेण्या व ठेवण्याजोगी बाब म्हणजे अंतरे दाखवायच्या पद्धती. जवळची वस्तू खाली तर दूरची वस्तू वर काढण्याचा प्रघात होता. मात्र वस्तू जवळची असो वा लांबची त्यांचा आकार अथवा दृश्यमानता यात फरक केला जात नसे. लांबची वस्तू देखील तितक्याच ठसठशीतपणे व तसेच तजेलदार मूळ रंग वापरून काढली जात. युरोपियन चित्रांचा प्रभाव सुरू झाल्यानंतर दूरच्या वस्तू धूसर करणे वगैरे सुरू झाले. याव्यतिरिक्त जैन चित्रकलेवरदेखील नितीन हडप यांनी काही वेळ घेतला तो इथे विस्तारभयाने टाळतो.

यापुढल्याभागात ऋचा कुलकर्णींनी विशद केलेल्या काळासोबत, अशी समृद्ध कलापरंपरा असताना 'भारतात पारंपरिक कलेपेक्षा वास्तवदर्शी चित्रकला इतकी लोकप्रिय का? ' याचा आढावा घेण्याच्या प्रयत्नातून काय निष्कर्ष आले? ते आपण बघणार आहोत

(क्रमशः)
यापुढील भागात....
भाग-२
'भारतात पारंपरिक कलेपेक्षा वास्तवदर्शी चित्रकला इतकी लोकप्रिय का? ' याचा आढावा घेण्याच्या प्रयत्नातून काय निष्कर्ष आले?
कलाकाराचे अनुभव व विचार चित्ररुप कसे धारण करतात? यावर काही उहापोह झाला का?
जागतीक कलविश्वावर चर्चा ठरविली होती त्याचे फलित काय?
समकालीन कला, अमूर्त चित्रण यावर विविध व्याख्यात्यांनी काय मते मांडली? त्यांच्याकडे विशेषतः अमूर्तचित्रांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला का?
दृश्यकला आणि साहित्य यांचा संबंध श्री. वसंत डहाके यांनी कसा स्पष्ट केला? त्यांच्या व्याख्यानाचे सार काय सांगता येईल?

भाग -३
ही दृश्यकलेची जाण मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागेल?
दृश्यकलांच्या स्पर्धा, परीक्षा असाव्यात का? त्याचे मुलांवर कसे परिणाम होतात?
एकुणात चित्रबोधचे वातावरण कसे होते? व्याख्यानांशिवाय इथे इतर कोणत्या अॅक्टीव्हीज होत्या का?
मला चित्रबोधमधून काय कळले? काही कळले का
?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

सर्वप्रथम या विस्तृत आढाव्याबद्दल मनापासून आभारी आहे. हौसेने एखाद्या कार्यशाळेला हजर राहणे निराळे नि त्यातल्या अभ्यासाचा सांगोपांग आढावा घेण्यासाठी कष्ट घेणे निराळे. या लेखमालेमुळे माझी खंत थोडी कमी होईल. Smile
अगदी सोप्या साध्या-सरळ भाषेत लिहिले आहे तुम्ही. मजा येते आहे वाचायला.
बाकी - विस्तारभयास्तव काही टाळले नाहीत तरी चालेल. वाचायला आवडेल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सर्वप्रथम या विस्तृत आढाव्याबद्दल मनापासून आभारी आहे. हौसेने एखाद्या कार्यशाळेला हजर राहणे निराळे नि त्यातल्या अभ्यासाचा सांगोपांग आढावा घेण्यासाठी कष्ट घेणे निराळे. या लेखमालेमुळे माझी खंत थोडी कमी होईल.
अगदी सोप्या साध्या-सरळ भाषेत लिहिले आहे तुम्ही. मजा येते आहे वाचायला.
बाकी - विस्तारभयास्तव काही टाळले नाहीत तरी चालेल. वाचायला आवडेल.

असेच म्हणतो, आढावा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद! सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन. तपशीलात एक किंचित दुरुस्ती : पिकासोचं तैलरंगातलं म्हणून जे चित्र दिलं आहे ते पिकासोचं नाही. त्याऐवजी उदाहरण म्हणून पिकासोचं 'वाचणारी स्त्री' हे चित्र वापरता येईल. (छायाचित्र किंचित तिरक्या कोनातून काढलेलं आहे.)

Pablo Picasso - La liseuse, 1920 at Centre Pompidou Paris France

चारकोलमध्ये केलेलं लिओनार्दो दा विंचीचं हे एक सुप्रसिद्ध चित्र (Madonna and Child with St Anne and the Young St John - नॅशनल गॅलरी, लंडन) :

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

क्षमस्व. "पिकासो ऑईल पेंटिंग" अश्या टायटलचं ते चित्र पिकासोने काढलेलं नाही. Sad
(मी देखील चकीत झालो होतो की त्याचे 'असं' चित्र कसं काढलं Smile पण घाईत जास्त शोध घेतला नाही. माझी चुक)
चित्र लेखातून काढतो आहे. व त्याऐवजी जलरंगातले चित्र टाकत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सपाट चेहरा, उजव्या हातात व्यंग असूनही डाव्या हातात पुस्तक धरून वाचण्याची प्रबळ उर्मी दाखवणारे त्या चेहऱ्यावरचे भाव, उजवीकडच्या मागच्या पायाशी तिरकस बांधणी असलेली खुर्ची... असलं काय काय या वाचणाऱ्या बाईच्या चित्रात दिसलं. आता मी या लेखमालिकेतील तिसऱ्या लेखाच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराची प्रतीक्षा करावी हे बरं... Smile कदाचित त्यातून काही गवसावे आणि अधिक विस्तृत दृष्टिकोन यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविस्तर वृत्तांताबद्दल आभार. थोडं काही समजल्यासारखं वाटलं वाचताना - ते तुम्ही सोप्या भाषेत लिहिलं आहे म्हणून. पण हा एक अवघड विषय आहे याचीही जाणीव झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे जे आपणासी ठावे ते ते इतरां सांगावे | शहाणे करून सोडावे | सकळ जन
अशा कार्यशाळांना उत्साहाने जाणारे थोडे असतात; त्यात ही इतक्या अत्मियतेने दुस-यांपर्यंत पोहचवणारे आणखी थोडे.
लेखाबद्दल धन्यवाद !

पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत. (विशेषतः भारतात पारंपारिक शैलीला बाजूला सारून आधुनिक शैली कशी रूजली त्याबाबत)

अवांतर - मला जॅमिनी रॉय यांची चित्रे आवडतात; त्यांच्या चित्रांना कोणत्या साच्यात बसवावे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ऋषिकेश.
आढावा माहितीपूर्ण आहे, आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचते आहे. सोप्या भाषेत लिहिल्यामुळे समजते आहे व पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता टिकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बघण्या'विषयीच्या नखात्यांच्या व्याख्यानातले आणखी काही मुद्दे:

'चारुलता' - नवरा आपल्याकडे 'बघत' नाही याचं वैषम्य चारुलताला असतं. आपल्या सुबक, सजलेल्या घरात बंद राहिल्यानं खायला उठणारा रिकामा वेळ घालवण्यासाठी चारुलता बाहेर 'बघत' असते, पण त्या बघण्यानं तिचं नैराश्य किंवा एकटेपण किंवा बंदिस्तपण दूर होत नाही. अंध मुलांना पाहता येत नसूनही दिसत असतं; याउलट चारुलताला पाहता येत असूनही त्याचा उपयोग नसतो. थोडक्यात, बघणं आपल्याला समृद्ध करू शकतं, पण त्यासाठी आपली दृष्टी घडवण्याचे कष्ट आपण घ्यायचे असतात.

बघितल्यावर आपल्याला जे दिसतं ते जसं व्यक्तिसापेक्ष असतं तसंच ते संस्कृतिसापेक्षही असतं. उदाहरणार्थ, आफ्रिकेतल्या आदिवासी लोकांचं रखरखीत वास्तव, त्यातले त्यांचे चेहरे आणि शरीरं, ते घालत असलेले मुखवटे आणि ते पेहरत असलेले रंग हे खास 'त्यांचे' आणि म्हणून त्यांच्यासाठी 'सुंदर' असतात. ग्रीक-रोमन आदर्श सौंदर्यशास्त्राच्या कल्पना त्यांना लागू होणार नाहीत. चारुलताचा जसा बंदिस्तपणा होता, तसाच ग्रीक-रोमन सौंदर्यशास्त्रातच अडकून राहणं हादेखील एक बंदिस्तपणा आहे.


फादर, सन अँड द होली वॉर (आनंद पटवर्धन)
आपल्या दृष्टीला राजकीय जोखडंदेखील असतात. उदाहरणार्थ, पुरुषप्रधान शिकवणुकीत पुरुषार्थ म्हणजे काय याचे धडे घालून दिले जातात; त्याबरोबरच पुरुषाच्या स्वतःविषयीच्या असुरक्षिततेला खतपाणी घालत त्याला आक्रमक केलं जातं. आपल्या परिसरातल्या प्रतिमा यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. पाहायला शिकण्याचा एक भाग म्हणजे याच्याकडे डोळसपणे पाहायला लागणं आणि ही जोखडं बाजूला करता येणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||