शिट्टी

भानू कुत्रं आज तळ्याकाठी एकटंच बसलं होतं. बाभळीच्या झाडाखाली आज त्याला निवांत झोप लागली होती. तसंही करण्यासारखं काही नव्हतं. बरेच दिवस जवानीचा हिसका न दाखवल्यानं खरंतर तो तुंबला होता. सोय म्हणून त्यानं डोंगरपायथ्याच्या चार-पाच कुत्र्या बघून ठेवल्या होत्या. पण सुगीचा हंगाम नसल्याने त्या विशेष दाद देत नसत.

उन्हाची तिरीप डोळ्यावर आली तसं भानू कुत्रं उलथापालथा झालं. आता पाण्यात पोहून जंगलात फेरफटका मारावा या विचाराने ते तळ्याकडं चाललं. काठावर त्याला शालन करडू दिसलं. पुढचं पाय वाकवून तळ्यातलं पाणी पीत होतं. हे शालन करडू म्हणजे रंगा बोकडची धाकली लेक. नुकतीच वयात आलेली उफाड्याची पोर.

खरंतर भानूला ती आवडायची. आडोश्याला उभा राहून तो शालनला निरखत राहिला. ते काळेभोर केस, ती घाटदार शिंगं, ते भरीव पोट, तो गंध. तो सुगंध.

तेवढ्यात वातावरणात एक जोरदार 'शिट्टी' घुमली. आमराईतले कावळे फडाफडा उडाले. शालन करडू बिथरलं. भानू कुत्र्यानं कान टवकारले. समोरच्या झाडीत थोडी सळसळ झाली.
झाडपाल्यातून वाट काढत एक दाढीधारी रांगडा सिंह बाहेर आला आणि त्याने काहीच विचार न करता पुन्हा एकदा जोरदार शिट्टी मारली.

"शाले, पळ पळ लवकर पळ, त्या सिंव्हाला मी बघतो नंतर " भानू कुत्रं मागल्या मागे उडी टाकून पळालं सुध्दा. शालन करडू त्याच्या मागोमाग सुटलं.
धुराळा उडाला!
जीव मुठीत धरून भानूकुत्रं पळत होतं. रंगा बोकडाच्या घरापाशी येऊनच त्यानं दम सोडला. मागोमाग शालन करडू उधळत आलं.

"रंग्या, भाईर यी रंग्या" धपापून भानू कुत्रं वराडलं.
"काय झालं रं भान्या?" दाढीवरनं हात फिरवत रंगा बोकड पहिल्या खेपेतच भाईर आलं.
"सरपंच आसला म्हणून काय झालं, आयघाला शिट्टी मारतूय आपल्या शालीकडं बघून "
"कोण प्रतापसिंव्ह? थांब मी कोयत्या आणतू आतनं, कापतूच आयघाल्याला"
"तुला एकट्याला नाय झेपायचं, आपुन वाघुबाच्या कानावर घालू, त्योच काय ती निवाडा करल " भानू कुत्र्यानं ऐन वेळी योग्य मार्ग सुचवला.

तशी ती तिघं भर दुपारी वाघोबाकडं निघाली. उन नुसतं टळटळत होतं. रंगा बोकड पेटून उठलं होतं. भानू कुत्रं चेकाळलं होतं. शालन करडू अजूनही बिथरलेलंच होतं.

₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰

झऱ्यातून पाणी धो धो कोसळत होते. कपारीतून खाली येत थेट फेसाळत होते. वाघोबा ऐन दुपारी जलक्रीडा करत होते. यथेच्छ डुंबल्यावर एका दगडावर ते ऊन शेकत बसले, तेवढ्यात हे तिघे दाखल झाले.

"वाघोबा, न्याय हवाय वाघोबा, तुमच्या राज्यात आयाबहिणींच्या इज्जतीवर हात घातला जातोय वाघोबा " रंगा बोकड धाय मोकलून वाघोबाच्या पायावरच पडलं.
"रंगा, शांत हो रंगा, काय झालं जरा नीट सांगशील का?" एवढा मुलायम बोलणारा वाघोबा आज एखाद्या ऋषीमुनीसारखा भासत होता.
"प्रतापसिंव्हानं शिट्टी मारली वाघोबा, माह्या पोरीकडं बघून, बोला आता काय करु त्यझं?"

वाघोबा सावरुन बसला. आळीपाळीनं त्यानं भान्याकडं बघितलं. शालीकडं बघितलं. मग रंगाकडं बघत म्हणाला,
"इलेक्शनला मतं देताना बरं प्रतापसिंव्ह दिसला रं तुमाला, आमी काय मेलतो का?" जुने दिवस आठवून वाघोबा खवळला.
"चुकी झाली सरकार, आपलं म्हणून पदरात घ्या" रंगा बोकडानं गयावया करत हातच जोडले.
वाघोबानं थोडा विचार केला.
"बरं, तुमी जावा, मी बघतो काय करायचं ते, भले तो सत्तेत असू दे, इरोधी पार्टी म्हणून आमीबी काय कमी न्हाय, तुमी काळजी करु नका, जाताना तेवढं गेटवरच्या माकडांना आत पाठवा " वाघोबा आता शड्डू ठोकूनच उभा राहिला.

गेटवरची माकडं आत आली तशी वाघोबानं भराभरा सुत्रं हालवली. कोल्ही, कुत्री, गेंडे, म्हशी, रानडुकरे, हत्तींना आवताने धाडली गेली. त्यांना आपल्या बाजूला वळवून वाघोबानं मोठ्ठी आघाडीच उघडली. फौजेला तयार राहण्या सूचना दिल्या. ढोल बडवले जाऊ लागले. मशाली पेटवल्या गेल्या.

आरोळ्या ठोकत वाघोबा प्रतापसिंहावर पुर्ण ताकतीनीशी चालून गेला. नैऋत्येकडून लांडग्याची फौज त्याने निम्मी कापून काढली. सिंहाचे धाबे दणाणले.जंगलभर वणवा पेटला. सिंहाच्या बालेकिल्ल्यात हाहाकार माजला. रणांगणात ऊसळत्या तोफा उतरवून वाघोबाने जोरदार मुसंडी मारली.

नंतरचे आठ दिवस जंगलातून नुसते धुराचे लोट बाहेर पडत होते. सत्तर लाख बांगडी फुटली. या घनघोर युध्दात सिंहाने शेवटी पांढरे निशान फडकवले. आणि युध्दसमाप्तीची घोषणा झाली

दुसऱ्या दिवशी दरबार भरला. सिंहाने आपला मुकुट वाघोबाच्या मस्तकावर ठेवला. वाघोबाचा जयजयकार झाला. जंगलभर बुंदीचे लाडू वाटले गेले. गुलाल ऊधळला गेला. ग्रामपंचायतीत बिस्लऱ्यांचे वाटप झाले. हालग्या वाजवून राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
वाघोबा सरपंच झाले आणि जंगलावर राज्य करु लागले.

₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰₰

आज पुन्हा भानू कुत्रं तळ्याकाठी एकटंच बसलं होतं. नुकत्याच झालेल्या युद्धाची झळ त्यालाही बसली होती. डोगरपायथ्याच्या चारही कुत्र्या शत्रूपक्षानं पळवल्या होत्या. बरेच दिवसांपासून तो तुंबला होता. 'आता पुढे काय?' याचा विचार करत असतानाच त्याला शालन करडू जंगलात भराभर जाताना दिसलं. तसे भानू कुत्र्याचे कान टवकारले. शालीच्या मागे मग तो ही दबकत जाऊ लागला.

शालन करडू झाडीत शिरलं. उंच गवतात लपलेल्या प्रतापसिंहाला शालीनं कचकचून मिठी मारली. बराच वेळ आतमध्ये खुसफूस चालली. शाली तुरा शोधण्यात गुतली. मग सिंहानं बरंच गवत उपटलं. गवताचे भारेच्या भारे उपटले गेले.
भरपेट झाल्यावर जाताना सिंह म्हणाला, " त्या भान्या कुत्र्यापास्नं सावधान, गेल्यावेळी शिट्टी काय मारली, झौन्यानं माजी सत्ता उलथवली "
"सॉरी डार्लिंग सॉरी, मला माहीतच नव्हत की तो मागे आहे, नेक्स्ट टाईम शिट्टी मारु नको, मीच येत जाईन ईकडे " शाली पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. यावेळी सिंहानं मग पुन्हा राहिलेलं गवत मुळासकट उपटलं.

सिंह निघून गेला. मग शाली हात झटकत गवतातनं बाहेर आली. जेव्हा तिनं झुडपं क्रॉस केली तेव्हा भानू कुत्रं दत्तं म्हणून तिच्यासमोर उभं होतं.
" त्याचं कायेय शाले, तुमचं चालू द्यात, पण आडचणच आशी हाय की, डोंगरपायथ्याच्या चारीपण कुत्र्या पळवल्या गेल्यात, त्यात मी आसा सोंड्या " भान्या कुत्र्यानं जिभल्या चाटल्या.

शाली काय ते समजून गेली आन पुन्हा गवतात शिरली.
यावेळी भानू कुत्रं जे काय आसल ते उपटणार होतं.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!