एका लेखणीचे आत्मवृत्त

एका लेखणीचे आत्मवृत्त

शिरस्त्राण टाकून माझे, होते भराभर धावत
वेड्यावाकड्या रेषा आणि विचित्र वर्तुळे रेखत
स्वप्नांची एक रम्य नागरी माझ्या निमुळत्या मनात
होईन माता दिव्य काव्याची, गुंजेन लक्ष जनांत

बसून गेले अल्लद ऐटीत खिशात मालकाच्या
ऐट दाखविली लेखण्यांवर, स्वस्त अन् जीर्ण-जुन्या ज्या
नेले कोण्या तिऱ्हाईताने उचलून राजरोस
आकर्षक ह्या शरीराचा अगदीच क्षुद्र तो हव्यास

लपून त्याच्या कुशीत गुपचूप, अलगद पोहोचले घरी
मला चिमुकल्या हातांत घ्यायला उत्सुक एक परी
उत्साहाने दाबले तिने मज कागदांवर निकरी
उद्रेक होऊन मग फवारल्या निळ्याभोर सरी

लगेच फुलला त्या शर्विलकाचा सात्विक अंगार
'वापरा अन फेका' संस्कृतीतली ठरले मग मी भंगार
गवसले दोन मळकट हाती माझे निष्प्राण कलेवर
जपुनी ठेविले त्यांनी मला त्या आभाळाच्या कडेवर

डोक्यावरचा सूर्य दिसला, एकदा मज त्या डोळ्यांत
तिथेच मिटला दंभ सगळा, विझली अभिमानाची वात
झिरापविले रक्त माझे मी त्यांच्या जर्जर वह्यांत
सार्थक झाले अन् आयुष्याचे त्या पवित्र कुटीरात

लेखण्यांनो-
तुमच्या रन्ध्रांनी पावन होवो प्रत्येक ग्रंथपर्ण
प्रत्येक कहाणी मग होईल उत्तरी सुफळ संपूर्ण
रचा काव्ये, लिहा ग्रंथ, मांडा पुस्तके नि शोधनिबंध
सृजनास तुमच्या न पडो असहिष्णुतेचे निर्बंध
(पडल्यास) करा चर्चा, होवोत वाद नि करा क्रांतीचा एल्गार
उद्या तुमच्याच पुढे लवेल प्रत्येक दुधारी तलवार!

ऐसीवर माझी पहिलीच पोष्ट. जरा लाऊडे. समीक्षा-अभिप्राय-प्रतिक्रिया-चर्चेच्या अपेक्षेत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा! मस्त. आवडली.
शर्विलक हा शब्द किती दिवसांनी ऐकला. काय आहे त्याचा अर्थ? चोर ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! हो. चोरच आहे त्याचा अर्थ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.