शेकोटी...

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

...दिवस उजाडलाच तो गोठलेला. आकाशात मळभ दाटलेला. थंडी मी म्हणत होती आणि आकाशाचा उदासपणा छातीत धडकी भरवीत होता. युकॉनच्या मुख्य रस्त्यापासून तो आत वळला. पायवाटेने चढ चढल्यावर त्याला एक पूर्वेकडे जाणारी आडवाट लागणार होती. दमछाक कराणारा तो चढ चढून गेल्यावर त्याने घड्याळात बघण्याच्या निमित्ताने थोडा दम घेतला. सकाळचे नऊ वाजले. आकाशात सूर्य नव्हता. त्याचे अस्तित्वच जाणवत नव्हते. त्याने वर पाहिले, आकाशात ढगही नव्हते. दिवस तसा स्वच्छ होता पण आसमंतात अदृष्य काहूरा कोंडला होता. त्यामुळे दिवस दिवसाढवळ्या अंधारा वाटत होता. हे सगळे सूर्य दिसत नसल्यामुळे. अर्थात त्यामुळे त्याची त्याला बिलकूल काळजी वाटत नव्हती. आकाशात सूर्य नसणे ही बाब त्याच्यासाठी नवीन नव्हती. गेले कित्येक दिवस त्याला सूर्यदर्शन झाले नव्हते. काही दिवस उलगडल्यावर त्याला दक्षिणेकडे क्षणभर उगवणारे आणि लगेच मावळणारे सूर्यबिंब दिसले असते.

त्याने आलेल्या पायवाटेवर नजर टाकली. खाली युकॉन नदीचे जवळ जवळ एक मैल रुंदीचे पात्र बर्फाच्या आवरणाखाली दडपलेले त्याला दिसले. तीन फुट तरी बर्फ असावा तो मनाशी म्हणाला. शिवाय वरती भुसभुशीत बर्फाचा तेवढाच थर होता तो वेगळाच. त्या हिमकणांच्या पांढऱ्याशूभ्र लाटांच्या कडांचे बर्फ झाले होते. त्याची नजर पोहोचेपर्यंत पांढऱ्या रंगाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. त्या पांढऱ्या रंगावर दक्षिणेकडे दूरवर, झाडांनी झाकलेल्या बेटाची काळसर रेखा वाकडीतिकडी वळणे घेत दुसऱ्या बेटांच्या रेषेत गडप होत होती. ही काळी रेषा म्हणजे त्याची वाट होती, जी त्याला चिलकूट खिंडीत घेऊन जाणार होती. मग डायी. त्याच पायवाटेवर उत्तरेकडे सत्तर मैलावर होते डावसन, तसे पुढे अजून उत्तरेकडे हजार मैलांवर न्युलाटो व शेवटी अजून हजार मैलांवर होते बेरींग सागरावरचे ‘द सेंट मायकेल’चे बंदर.

पण या गूढ वातावरणाचा, त्या अदृष्य होणाऱ्या काळ्या रेषांचा, हाडे गोठविणाऱ्या थंडीचा, काहुराचा त्या माणसावर कसलाही परिणाम झाला नव्हता. तो असल्या वातावरणात मुरला होता म्हणून नव्हे. खरेतर तो या भागात नवखा म्हणजे चेचॅक्वो होता. त्या भागातील मुळनिवासी ज्या माणसाने त्या भागात खरा हिवाळा काढला नाही अशा माणसाला चेचॅक्वो या नावाने ओळखतात. थोडक्यात हा माणूस त्या भागात नवखा होता आणि त्याचा हा कडाक्याचा पहिलाच हिवाळा होता, अर्थात त्या भागातील. माणूस चलाख व धडधाकट होता. आयुष्यातील चढउतारही त्याने पाहिलेले होते, अनुभवलेले होते पण दुर्दैवाने कडाक्याची थंडी याचा खरा अर्थ त्याला उमगलेला नव्हता. खऱ्या अर्थाची कल्पना करण्याइतकी कल्पनाशक्तीही त्याच्याकडे नव्हती. शुन्याखाली ५० डिग्री म्हणजे गोठविणारी थंडी एवढेच त्याला अभिप्रेत होते. जरा जास्त त्रास एवढेच..बस्स्... तापमानापुढे मनुष्यप्राणी किती हतबल होऊ शकतो याची तो कल्पनाच करु शकत नव्हता. नाहीतरी माणूस जेव्हा तापमानाचा विचार करतो – गरम किंवा गार, तेव्हा त्याच्या विचारांच्या मर्यादा फार संकुचित असतात आणि त्याच तापमानाच्या मर्यादेमधे तो जगू शकतो. त्या मर्यादांमधे रममाण होत तो या विश्वातील त्याचे स्थान व आयुष्याचा तर्क करतो. शुन्याखाली पन्नास डिग्री खाली म्हणजे हिमदंशाच्या वेदना. त्याच्यापासून संरक्षणासाठी उबदार हातमोजे, कान झाकणारी कानटोपी, गरम बुट व जाडजुड पायमोजे हे आवश्यकच. दुर्दैवाने शुन्याखाली खाली पन्नास डिग्री म्हणजे त्याच्या दृष्टीने तापमानमापकातील एक तापमान एवढेच होते. त्यापेक्षाही त्याला काही वेगळ अर्थ असू शकतो हे त्याच्या डोसक्यातच शिरत नव्हते.

चालण्यासाठी त्याने पाऊल उचलले आणि तो जमिनीवर थुंकला. थुंकल्याबरोबर एखादी काटकी तुटावी तसा आवाज झाला. त्या आवाजाने तो दचकला. तो परत थुंकला आणि परत तसाच आवाज झाला. त्याच्या थुंकीचा जमिनीवर पडेपर्यंत बर्फ झाला होता. त्याला उणे ५० डिग्रीला थुंकी जमिनीवर पडल्यावर असा आवाज येतो हे माहीत होते पण येथे तो प्रकार हवेतच होत होता. त्याच्या दुर्दैवाने तापमान बहुतेक -५०च्या खाली होते पण किती खाली हे त्याला माहीत नव्हते. कितिका खाली असेना, त्याला कुठल्याही परिस्थितीत हेंडरसनच्या खाडीच्या डाव्या फाट्यावर पोहोचायचे होते. तेथे त्याचे सोबती अगोदरच पोहोचले होते. ते इंडियन खाडीच्या प्रदेशातून तेथे येणार होते तर तो वळसा मारुन युकॉनच्या बेटांवर असलेल्या नदीवर काही लाकुडफाटा मिळतोय का ते पाहणार होता. संध्याकाळी सहापर्यंत, पण थोडासा अंधार पडल्यावर तो त्यांच्या तळावर पोहोचला असता. पण त्याचे साथीदार तेथे असणार होते, शेकोट्या पेटलेल्या असणार होत्या आणि गरमागरम जेवण तयार असणार होते. दुपारच्या जेवणाचा विचार मनात येताच त्याने कोटाच्या आत असलेली पुरचुंडी हाताने चाचपडून पाहिली. रुमालात गुंडाळलेले ते जेवण त्याच्या कमिजच्या आत त्याच्या कातडीला चिकटून त्याने ठेवले होते. पाव गोठण्यापासून वाचविण्याचा हा एकमेव मार्ग त्याला सुचला होता. पावाची आठवण येताच त्याला जरा धीर आला. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. पावाला त्याने मस्तपैकी लोणी चोपडले होते व आत बेकन ठासून भरले होते.

त्याने स्पृसच्या तुरळक झाडीत स्वत:ला झोकून दिले. रस्त्याचा माग अंधुक दिसत होता. साहजिकच आहे. शेवटची घसरगाडी त्यावरुन गेल्यावर त्याच्यावर जवळजवळ एक फुट बर्फ पडला होता. त्याने घसरगाडी न आणल्याबद्दल स्वत:ला धन्यवाद दिले. खरं म्हणजे या असल्या प्रवासात जास्त सामान नको म्हणून त्याने पोटाशी धरलेल्या जेवणाखेरीज कुठलेच सामान बरोबर घेतले नव्हते. पण आजच्या थंडीचे त्याला मनोमन आश्चर्य वाटले. ‘जरा जास्तच आहे गारठा’’ त्याने नाकाचा शेंडा व गालफाडे हातातील मोज्यांनी चोळत मनाशी म्हटले. त्याचे कल्ले चांगले वाढलेले होते पण गालाचा काही भाग तर उघडा पडला होता आणि त्याच्या लांब सरळ नाकाने त्या गारठलेल्या हवेत नाक खुपसले होते.

त्याच्या पायाशी त्याचा मोठा हस्की जातीचा कुत्रा चालत होता. करड्या रंगाचा हा कुत्रा आणि लांडग्यातील फरक ओळखणे अवघड. अर्थात त्याचाच भाऊबंद तो !. त्या भयानक थंडीने तो कुत्रा बिचकला. प्रवासाची ही वेळ नाही हे त्याला पक्के माहीत होते. त्या माणसाच्या अंदाजापेक्षा त्याची अंत:प्रेरणा त्याला जास्त खरं सांगत होती. आणि ते बरोबर होते कारण तापमान शुन्याच्या खाली पन्नास नव्हते, साठही नव्हते, सत्तरही नव्हते. ते शुन्याखाली पंचाहत्तर डिग्री होते. गोठण बिंदू शुन्याच्या वर बत्तीस डिग्री असतो... त्या कुत्र्याला बिचाऱ्याला तापमानमापकाची काहीच माहीती नव्हती. कदाचित त्याच्या मेंदूत माणसाप्रमाणे ‘हाडे गोठविणारी थंडी’ अशी जाणीवच नसावी. पण त्या प्राण्यात उपजत प्रवृती होती. त्याच्या दुर्दैवाने हा माणूस असा का वागतोय हे लक्षात न आल्यामुळे तो शांतपणे हलक्या पावलाने त्याच्या मालकाच्या पायात चालत होता. त्या माणसाच्या प्रत्येक हालचालींकडे तो प्रश्नार्थक नजरेने बघत होता. जणूकाही त्याला विचारायचे होते की त्याचा मालक कुठल्यातरी वस्तीवर का जात नाही आणि शेकोटीच्या उबेत का बसत नाही ? त्या कुत्र्याला शेकोटी म्हणजे काय हे माहीत होते आणि त्याला आत्ता शेकोटी पाहिजे होती. ती नसती तर त्याने स्वत:ला बर्फात गाडून घेतले असते व गोठवणाऱ्या हवेशी संपर्क तोडला असता.

कुत्र्याच्या श्र्वासातून बाहेर पडणारे बाष्पाचे हिमकण त्याच्या केसाळ कातडीवर जमले होते. त्याचा जबडा व नाकाड त्या कणांमुळे पांढरे पडले होते. त्या माणसाची तांबडी दाढी व मिश्याही पांढुरक्या झाल्या होत्या. पण त्याचा आता बर्फ झाला होता. त्याच्या प्रत्येक श्र्वासागणिक तो वाढत होता. त्याचे ओठ बर्फाने एकमेकांना इतके घट्ट चिकटले होते की त्याने चघळलेल्या तंबाखूचा ओघळ त्याच्या ओठातून बाहेर आला होता तोही त्याला साफ करता येत नव्हता. त्या साठलेल्या बर्फामुळे त्याची हनुवटी लांब झाली होती व तिचा रंगही बदलला होता. जर तो आत्ता कुठे धडपडला असता तर एखाद्या काचेप्रमाणे त्याचे शंभर तुकडे झाले असते. त्याला त्याची काळजी वाटली नाही. त्या प्रदेशातील सर्व तंबाखू चघळणाऱ्यांना ही शिक्षा मिळे. त्याने तसे दोन हिवाळे या भागात काढले होते पण ते एवढे भयंकर नव्हते.

त्याने सपाटीवर विरळ जंगलातून अनेक मैल पायपीट केली आणि तो एका टेकाडावरुन एका गोठलेल्या ओढ्याच्या पात्रात उतरला. हा हेंडरसनचा ओढा ! त्याला माहिती होते की आता दहा मैलांवर या ओढ्याचा दुफाटा येणार. त्याने त्याच्या घड्याळात पाहिले. दहा वाजले होते. त्याने मनोमन हिशेब केला. तासाला चार मैल म्हणजे दुफाट्यावर तो अंदाजे साडेबाराला पोहोचेल. त्या विचाराने आनंदित होत त्याने दुफाट्यावर दुपारचे जेवण करायचे ठरवले.

त्याने पात्रात चालण्यास सुरुवात केली आणि त्याच्या कुत्र्याने नाखुशीने त्याची शेपटी खाली केली व गुरगुरत पायातून चालण्यास सुरुवात केली. थोडेसे पुढे घसरगाडीच्या फाळाच्या खुणा अजुनही अस्पष्ट दिसत होत्या परंतू फुटभर बर्फाने त्याच्याबरोबर पळणाऱ्या माणसांच्या पाऊलखुणा झाकल्या होत्या. गेला महिन्याभरात त्या ओढ्यावर कोणी आले नव्हते. त्याने सावकाश चालण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यात खास असे काही विचार नव्हते. पण त्यामुळे त्याच्या मनात दुपारच्या जेवणाचा आणि संध्याकाळी सहाला भेटणाऱ्या मित्रांचा विचार येऊ लागला. बोलण्यासाठी कोणी बरोबर नव्हते आणि जरी असते तरी बोलण्यासाठी तोंड उघडणे जमलेल्या बर्फामुळे त्याला अशक्यच वाटले. त्यामुळे तो सतत तंबाखू चघळत होता आणि आपल्या तपकिरी रंगाच्या हनुवटीची लांबी वाढवत होता.

मधेच ‘‘थंडी जरा जास्तच आहे’’ हे पालुपद मनातल्यामनात उगाळीत तो आपले गाल व नाक हातमोज्यांनी चोळे. आता त्याचे हात वारंवार त्याचे नाक व गाल यांत्रिकपणे चोळू लागले होते. पण कितीही चोळले तरी पुढच्याच क्षणी ते बधीर होत होते. गालाला तर हिमदंश होणार याची त्याला खात्री वाटत होती त्याने नाक झाकण्याची टोपी बरोबर आणली नाही म्हणून स्वत:ला दुषणे दिली. पण ठीक आहे. ‘‘हिमदंशाचे काय एवढे ? दुखेल काही दिवस !’ त्याने स्वत:ची समजुत घातली.

मनात काही विचार चालू नसल्यामुळे एक मात्र झालं. त्याचे डोळे काम करु लागले. त्याने त्या ओढ्याच्या पात्रात होणारे बदल टिपण्यास सुरुवात केली. त्याची वळणे, त्याच्यात अडकलेले ओंडके, झाडे, त्याने साठलेले पाणी... त्याची दृष्टी आता पाऊल ठेवण्याआधी जमिन तपासू लागली. एका वळणावर एखाद्या बिचकलेल्या घोड्यासारखा तो थबकला. ज्या वाटेवरुन तो जाणार होता त्याच वाटेवरुन तो मागे फिरला. पाणी तळापर्यंत पार गोठले होते याची त्याला खात्री होती. या तापमानात पाणी असणे शक्यच नव्हते पण त्याला हेही माहिती होते की डोंगरातून येणारे कित्येक ओहोळ त्या बर्फाखालून खळाळून वाहत असतात. त्याला माहीत होते की कितीही थंडी असली तरीही ती या ओहोळांना गोठवू शकत नाही. त्या ओहोळांचे मग सापळे होतात. कधीकधी पाण्याच्या त्या डबक्यांवर बर्फाचा पातळ थर साठतो व त्याच्यावर भुसभुशीत हिम. त्याच्या खाली तीन इंच ते सहा-सात फुट खोल असे कितीही पाणी असू शकते. कधीकधी पाण्याचे आणि बर्फाचे असे एकमेकांवर थरही चढत जातात. जेव्हा एखादा माणूस यात फसतो तेव्हा तो ते थर तोडत तोडत आत फसतो अगदी पार कमरेपर्यंत.

याच कारणासाठी तो बिचकला होता. त्याच्या पायाखाली बर्फ तडकला आणि त्याला खोल काहीतरी तुटल्याचा आवाजही आला. या अशा हवेत पाय ओले होणे म्हणजे महाभयंकर संकटालाच सामोरे जाणे... अगदी समजा काही दुखापत झाली नाही तरी त्याला उशीर तर झालाच असता कारण पाय, मोजे व बुट सुकविण्यासाठी त्याला शेकोटी पेटवावी लागली असती. त्यात त्याचा बराच वेळ गेला असता. त्याने शांतपणे उभे राहून त्या पात्राकडे नजर टाकली आणि ठरवले की पाण्याचा प्रवाह उजवीकडून येतो आहे. त्याने नाक गाल चोळत थोडावेळ विचार केला व तो डावीकडे वळला. प्रत्येक पावलाआधी पायाखालचा बर्फ चाचपडत त्याने पावले टाकली. सकंटातून बचावल्यावर त्याने तंबाखूचा एक बार भरला व परत त्याची चाल पकडली.

दोन तासात त्याने असे अनेक बर्फाचे सापळे पार केले. या असल्या पाण्याच्या डबक्यावर जमलेला बर्फ थोडासा वेगळा दिसतो व त्यामुळे तेथे खाली पाणी आहे हे कळू शकते. एकदा तो मरता मरता वाचला आणि एकदा खात्री नसल्यामुळे अशा सापळ्यात त्याने कुत्र्याला तो पार करायला लावला. कुत्र्याला जायचे नव्हते. तो मागे मागे सरकत होता पण त्याने त्याल चक्क ढकलल्यावर तो पटकन त्या पांढऱ्या अखंड बर्फावरुन गेला व दुसऱ्याच क्षणी भसकन खाली गेला. एका बाजूला कलंडला व लगेचच काठावर चढला. या प्रकारात कुत्र्याचे पाय मात्र त्या पाण्यात गुडघ्यापर्यंत भिजले. त्याच क्षणी त्याच्या पायाला लागलेल्या पाण्याचा बर्फ झाला. कुत्र्याने लगेचच स्वत:चे पाय चाटले व बर्फात खाली बसकण मारुन त्याने त्याच्या बोटांमधे साठलेला बर्फ दाताने फोडायचा प्रयत्न सुरु केला. ही अर्थात त्याची प्रक्षिप्तक्रिया होती. बोटांमधे साठलेला बर्फ म्हणजे हिमदंशाला आमंत्रण. अर्थात त्याला हे माहीत नव्ह्ते. तो फक्त त्याच्या मेंदूतून गुढपणे आलेल्या आज्ञा पाळत होता. पण त्या माणसाला ते माहीत होते. त्याने पटकन उजव्या हातातील मोजा काढला व त्या कुत्र्याच्या पायातील बर्फ झटकला. त्याने काहीच क्षण हात उघडा टाकला असेल पण तेवढ्यातही त्याची बोटे बधीर झाली. ज्या वेगाने त्याची बोटे बधीर झाली होती त्याने तो आश्चर्यचकित झाला. ‘‘फारच थंडी आहे’’ तो पुटपुटला. त्याने घाईघाईने मोज्यात आपला हात कोंबला व बोटात जीव आणण्यासाठी उजवा हात छातीवर अनेक वेळा आपटला.

सकाळचे का दुपारचे बारा वाजले. सगळ्यात जास्त प्रकाश पडला खरा पण सूर्य त्याच्या शिशिरातील प्रवासात अजून बराच दक्षिणेकडे होता. त्याला क्षितिजावरुन नाहिसे होण्यासाठी अजून बराच वेळ लागेल. सूर्याचा प्रकाश हेंडरसनवर, जेथे तो चालत होता तेथे पडण्यात मधील गोलाकार टेकाडांचा अडथळा होत होता. बारा वाजता सूर्य डोक्यावर आला आणि खाली त्याची सावली नाहिशी झाली. बरोबर साडेबारा वाजता तो हेंडरसनच्या दुफाट्यावर पोहोचला. त्याच्या वेगाने तो स्वत:वरच खुष झाला. त्याने हाच वेग जर कायम ठेवला असता तर सहा वाजता तो तळावर निश्चितच पोहोचला असता. त्याने त्याच्या कोटाची व अंगरख्याची बटणे खोलली व जेवण बाहेर काढले. त्या काही क्षणातच त्याची बोटे बधीर झाली. त्याने हातमोजे न चढवता बधीर झालेली बोटे त्यांच्यात संवेदना आणण्यासाठी पायावर अनेक वेळा आपटली तो एका बर्फाने झाकलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर बसला. बोटे आपटल्यावर त्याच्या बोटातून एक जिवघेणी कळ उठली ज्याने तो कळवळला. त्याला वाळलेल्या पावाचा तुकडा हाता धरता येईना. त्याने एक घास घेण्याचा प्रयत्न केला पण तोंडावर गोठलेल्या बर्फाने ते त्याला जमत नव्हते. जशी त्याची बोटे अधिक बधीर झाली तेव्हा त्याला आठवले की तो शेकोटी पेटवायला विसरला होता. स्वत:च्या मूर्खपणावर तो हसला. बसताना त्याच्या पायाच्या बोटातून उठणाऱ्या कळाही आता ओसरत चालल्या. पायाच्या बोटात ऊब आल्यामुळे का ती अजून बधीर झाली होती, त्यामुळे त्या कळा थांबल्या होता हे त्याला कळेना. त्याने पाय त्याच्या जोड्यात सरकवले व त्या कळा बोटे बधीर झाल्यामुळे थांबल्या असाव्यात असा निष्कर्ष काढला.

त्याने घाईघाईने आपले हातमोजे चढवले व उठला. त्याला प्रथमच भीती वाटली. त्याने कळा येईपर्यंत त्याचे पाय जमिनीवर जोरजोरात आपटले. ‘‘फारच गोठविणारी थंडी आहे आज !’’ तो मनात म्हणाला. सल्फर क्रीकच्या म्हाताऱ्याने त्या भागात थंडी किती अक्राळविक्राळ रुप धारण करते ते सांगितलेले खरे होते तर. त्या वेळी तो त्याला हसला होता. काही गोष्टी गृहीत धरणे चुकीचेच असते. भयानक गारठा होता, शंकाच नाही. त्याने पाय आपटत खालीवर चालण्यास सुरुवात केली. शरीरात थोडी ऊब आल्यावर त्याने काडेपेटी बाहेर काढली आणि तो शेकोटी पेटविण्याच्या उद्योगाला लागला. बर्फाखाली वाहणाऱ्या पाण्यामुळे काही झुडुपे उगवली होती त्याच्या काटक्या त्याने सरपणासाठी गोळ्या केल्या. ठिणग्या विझणार नाहीत याची काळजी घेत, बारीक काटक्यांपासून सुरुवात करत त्याने धगधणारी शेकोटी पेटवली. त्या आगीवर त्याने आपल्या चेहऱ्यावरचा बर्फ वितळवला व त्या शेकोटीच्या उबेत त्याने जेवण्यास सुरुवात केली. त्या क्षणी तरी शेकोटीच्या भोवतालचा गारठ्याने माघार घेतली. कुत्र्यानेही शेकोटीजवळ, सुरक्षित अंतरावर बसकण मारली. बिचाऱ्याच्या डोळ्यात मालकाने योग्य निर्णय घेतल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.

जेवण झाल्यावर त्याने आपला पाईप काढला त्यात तंबाखू भरली व बराच वेळ तो ओढला. थोड्याच वेळाबे त्याने आपले मोजे चढवले, कानावर टोपी ओढली व त्या दुफाट्याची डावी बाजू पकडली. त्याच्या कुत्र्याला अजुनही शेकोटी सोडवत नव्हती. या माणसाला थंडी म्हणजे काय हे अजुनही माहीत नव्हते. यालाच काय त्याच्या पूर्वजांनाही खऱ्या थंडीची कल्पना असेल की नाही याची शंकाच आहे. खरी थंडी उणे एकशेसात... पण कुत्र्याला ते माहीत होते..त्याच्या सगळ्या पूर्वजांना माहीत होते व ती माहीती त्याच्याकडे पूर्वजांकडून चालत आली असणार. त्यामुळे त्याला हेही माहिती होते की अशा भयानक थंडीत प्रवास करणे किती चुकीचे आहे ते.. अशा वेळी बर्फातील एखाद्या भोकात शांतपणे, एखाद्या ढगाची वाट पहात, पडून राहणे यातच शहाणपणा होता हेही त्याला माहीत होते. पण हा शहाणपणा कोणी कोणास शिकवायचा ? कुत्रा तर माणसाचा गुलाम आहे आणि जो काही संवाद त्याच्यात आणि माणसात होतो तो चाबकांच्या फटकाऱ्यांनी व कुत्र्यांच्या खुनशी गुरगुरण्याने. याच कारणाने बहुधा त्याच्या कुत्र्याने त्याच्या मालकापाशी त्याची काळजी व्यक्त केली नसावी. त्याला शेकोटी सोडायची नव्हती ती स्वत:साठी. त्याला त्या माणसाशी काही घेणेदेणे नव्हते. पण त्या माणसाने शिट्टी वाजवली आणि चाबूक फडकावताना काढतात तसला आवाज काढल्यावर तो गुपचुपपणे त्याच्या मागे चालू लागला.

त्याने तोंडात तंबाखू टाकली आणि पिवळ्या रंगाची दाढी वाढवायचे काम सुरु केले. त्याच्या श्र्वासाने लगेचच त्याच्या मिशांवर, पापण्यांवर व भुवयांवर बर्फाचे पांढरे कण जमा झाले. त्या डाव्या फाट्यावर जास्त ओढे हेंडरसनला येऊन मिळत नसावेत बहुदा. कारण अर्ध्या तासात त्याने एकही ओढा पार केला नाही. एके ठिकाणी जेथे त्याला पुसटशी शंकाही आली नाही अशा जागी तो फसला. सगळ्यात वरच्या थरात एखादी रेषही न उमटलेल्या ठिकाणी असा सापळा असेल असे कोणाच्या स्वप्नातही आला नसते. तो फसला पण नशिबाने गुढघाभर पाण्यात. नशिबाने पाणी जास्त खोल नव्हते. पण बाहेर येईपर्यंत त्याचे पाय भिजायचे ते भिजलेच.

चरफडत त्याने स्वत:च्या नशिबाला शिव्या घातल्या. त्याने सहापर्यंत तळावर पोहोचण्याचे ठरवले होते पण आता यामुळे एक तासाचा उशीर पक्का झाला होता कारण आता त्याला परत शेकोटी पेटवायला लागणार होती आणि त्यावर आपले पाय व बुट, मोजे सुकवावे लागणार होते. त्या तापमानात हे फार महत्वाचे होते हे तेवढे त्याला माहीत होते. त्याने थोडे वर चढण्यासाठी डावी बाजू पकडली. वर स्पृसच्या छोट्या झाडांचे वाळलेले असंख्य बुंधे, फांद्या, काटक्या त्याला दिसल्या आणि त्याने सुटकेचा नि:श्र्वास टाकला. त्याने बर्फाळ जमिनीवर चांगल्या जाड जून फांद्या टाकल्या. हा त्याच्या शेकोटीचा पाया असणार होता. त्याने खालच्या काटक्या वितळलेल्या बर्फाच्या पाण्यात भिजल्या नसत्या. त्याने खिशातून बर्चच्या खोडाची एक पातळ ढलपी काढली व त्यावर एक काडी घासली. ही ढलपी अगदी कागदापेक्षाही भुरभुर जळते. ती जळती ढपली त्याने त्या खाली रचलेल्या लाकडावर अत्यंत काळजीपूर्वक ठेवली..व त्यावर वाळलेले गवत ती ठिणगी गुदमरणार नाही या अंदाजाने टाकले. त्यानंतर त्यावर त्याने अत्यंत बारीक, वाळलेल्या काटक्या टाकण्यास सुरुवात केली.

शेकोटी पेटली नाही तर पुढे काय वाढून ठेवले आहे याची त्याला कल्पना होती. काटक्या पेटल्यावर त्याने आता हळुवारपणे त्यावर जरा जाडसर काटक्या ठेवण्यास सुरुवात केली. बर्फात बसकण मारुन तो झुडपात गुंतलेल्या काटक्या काढून त्यात टाकत होता. शेकोटी न पेटून चालणार नव्हती. उणे पंचाहत्तर तापमानात ते परवडणारे नव्हते आणि पाय भिजलेले असताना तर मुळीच नाही. जर त्याचे पाय भिजले नसते आणि शेकोटी पेटली नसती तर त्याने अर्धा एक मैल पळून शरीरात रक्त खेळवले असते. त्यात उब आणली असती. पण उणे पंचाहत्तरला पाय ओले असताना त्यात उब आणणे शक्य नव्हते. तो कितीही जोरात पळला असता तरी पायावरचे पाणी गोठतच गेले असते.

हे सगळे त्याला माहीत होतं. सल्फर क्रीकवरच्या म्हाताऱ्याने त्याला मागच्या थंडीत याची कल्पना दिली होती. त्याने त्याचे मनोमन आभार मानले. आत्तातरी त्याच्या पायातील सर्व संवेदना नष्ट झाल्या होत्या. शेकोटी पेटविण्यासाठी त्याला हातातील मोजे काढावे लागले होते आणि तेवढ्यात त्याची बोटे बधीर झाली. आत्तापर्यंत त्याच्या चालण्याच्या वेगासाठी त्याचे ह्रदय, रक्त शरीराच्या इतर भागात ओतत होते पण तो थांबल्या थांबल्या त्याचे ह्रदय मंदावले. रक्ताभिसरण मंदावल्याचा फायदा घेऊन थंडीने त्याच्या शरीराच्या बाह्यांगावर हल्ला चढविला. त्यातल्या त्यात उघड्या पडलेल्या बोटांना याचा पहिला मारा सहन करावा लागला असणार. बोटांपर्यंत पोहोचायच्या अगोदरच रक्त मागे फिरत होते. कुत्र्यात आणि रक्तात आता काही फरक उरला नव्हता. कुत्र्याला उबेसाठी शेकोटीकडे परत जायचे होते तर रक्ताला बोटाकडे जायचे नव्हते. जोपर्यंत तो तासाला चार मैल या वेगाने चालत होता तोपर्यंत रक्त त्याच्या धमण्यातून कसेबसे का होईना वहात होते पण आता ते शरीरातील गर्गेत ओघळत होते. ह्रदयापासून अंतरावर असलेल्या अवयांना आता त्याचा तुटवडा भासू लागला. त्याचे ओले पाय सगळ्यात आधी गारठले व गोठले. त्यानंतर त्याची बोटे बधीर झाली पण अजून गोठली नव्हती. नाक व गाल गोठण्याच्या मार्गावर होते तर सर्व कातडी थंडगार पडली.

पण तो सुरक्षित होता. नाक, गाल आणि बोटे यांनाच हिमदंश झालाच तर झाला असता, कारण शेकोटी आता धगधगली होती. बोटांच्या जाडी इतक्या जाडीच्या काटक्या त्याने त्यात टाकल्यावर ती अजूनच पेटली. अजून काही मिनिटातच त्यात तो चांगल्या जाडजूड फांद्या टाकू शकला असता आणि मग त्याला त्याचे बुट व मोजे काढता आले असते. सुकवता आले असते आणि ते सुकत असताना त्याने त्याचे पाय त्या शेकोटीच्या उबेत शेकले असते. अर्थात त्याआधी त्याने पायांवर बर्फ चोळला असता. सल्फर क्रीकच्या म्हाताऱ्याचा सल्ला ! शेकोटी आता चांगलीच पेटली होती. संकट आता टळले होते. त्याला सल्फर क्रीच्या म्हाताऱ्याचा सल्ला आठवला. त्या म्हाताऱ्याने क्लॉनडाईकच्या प्रदेशात प्रवास करताना काय काळजी घ्यायची याचे नियमच तयार केले होते. त्यातील पहिला नियम होता, ‘‘क्लॉनडाईकमधे उणे पन्नास तापमान असताना एकट्याने प्रवास कधीही, कुठल्याही परिस्थितीत करु नये.’’ ते आठवून तो थोडा हसला. पण तो तेथे होता. त्याला अपघातही झाला होता आणि त्याने स्वत:ला त्यातून वाचविलेही होते. ‘‘हे म्हातारे जरा जास्तच काळजी करतात, बायकांसारखे...’’ तो मनात म्हणाला. माणसाने फक्त त्याचे डोकं ताळ्यावर ठेवले पाहिजे मग काही होत नाही त्याला. जो खरा पुरुष आहे त्याला एकट्याने प्रवास करण्याची कसली भिती ? पण ज्या वेगाने त्याचे गाल व नाक गोठत होते त्याचे त्याला आश्चर्य वाटले आणि एवढ्या लवकर त्याची बोटे निर्जिव होतील असे त्याला वाटले नव्हते. निर्जिवच पडली होती ती, कारण बोटे एकत्र आणून त्याला साधी काटकीही पकडता येत नव्हती. ती बोटे त्याच्यापासून अनेक योजने दूर आहेत असे त्याला वाटू लागले. जणू ती त्याच्या शरीराचा भागच नव्हती. जेव्हा तो एखादी काटकी पकडे (किंवा त्याला तसे वाटत असे) तेव्हा त्याला प्रथम ती बोटात आहे का नाही हे डोळ्याने पहावे लागे. त्याच्या बोटांच्या टोकांचा आणि बोटांचा जणू संपर्कच तुटला होता.

पण आता समोर शेकोटी धडधडत होती, त्यातून ठिणग्या उडत होत्या आणि ज्वाळांच्या नाचांनी त्या निर्जिव वातावरणात प्राण फुंकला होता. साथीला जळणाऱ्या काटक्यातून येणाऱ्या आवाजाचे संगीत होतेच. त्याने आपले बुट काढण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर भरपूर बर्फ जमले होते. एखाद्या सळईसारख्या त्याच्या नाड्या एकामेकात गुंतल्या होत्या तर आतील मोज्यांच्या कडक सुरनळ्या झाल्या होत्या. थोड्यावेळ त्याने बोटांनी नाड्या सोडण्याचा प्रयत्न केला पण ती चूक लक्षात येऊन शेवटी त्याने कमरेच्या म्यानातील चाकू काढला.

पण त्या नाड्या सोडण्याआधीच एक भयानक गोष्ट घडली. अर्थात चूक त्याचीच होती. त्याने स्पृसच्या झाडाखाली शेकोटी पेटवायला नको होती. मोकळ्या आकाशाखाली त्याने ती पेटवली असती तर बरे झाले असते. पण त्याचा आळशीपणा नडला. झाडाखाली पडलेल्या काटक्या पटकन गोळा करता येतील या उद्देशाने त्याने झाडाखाली शेकोटी पेटविली खरी पण त्याने झाडाच्या फांद्यांवर जमलेला बर्फ लक्षात घेतला नव्हता. बरेच दिवस वारा सुटला नव्हता त्यामुळे प्रत्येक फांदी बर्फाने लगडलेली होती. त्याने ओढलेल्या प्रत्येक काटकीने झाडाला थोडेसे का होईना डिवचले होते. तेवढे त्या झाडाला पुरेसे होते. वर कुठेतरी एका फांदीने तिच्या अंगावरचे बर्फ झटकले. तो बर्फ खालच्या फांद्यांवर पडला. त्यांच्यावरचा बर्फ त्याच्या खालच्या फांद्यांवर....ही पडधड सुरु झाली आणि साऱ्या झाडात पसरली. एखाद्या बर्फाच्या वादळाप्रमाणे हा बर्फ कुठलिही पूर्वसुचना न देता खाली कोसळला....त्या माणसावर आणि त्याने कष्टाने पेटवलेल्या शेकोटीवर. एका क्षणात ती शेकोटी विझली. जेथे शेकोटीची राख होती तेथे आता दिसत होते तिचे बर्फाळ थडगे.

ते पाहताच तो जागच्याजागी थिजला. जणू काही त्याने स्वत:च्या कानाने स्वत:ला मिळालेली मृत्युदंडाची शिक्षाच ऐकली होती. क्षणभर तो जेथे शेकोटी पेटली होती त्या जागेकडे टक लाऊन पहात बसला. दुसऱ्याच क्षणी तो एकदम शांत झाला. सल्फर क्रीकच्या म्हाताऱ्याचा सल्ला बरोबर होता. आत्ता जर त्याच्याबरोबर कोणी सहप्रवासी असता तर तो या संकटात सापडला नसता. त्याने परत शेकोटी पेटवली असती. आता त्यालाच परत शेकोटी पेटवायची होती आणि या वेळी अपयश येऊन चालणारच नव्हते. अर्थात आता तसा उशीरच झाला होता. शेकोटी पेटली असती तरी काही बोटे सडणारच होती कारण त्याला जाणवत होते की त्याचे पाय आत्ताच गोठले आहेत आणि शेकोटी पेटविण्यास अजून काही वेळ लागणार होता.

अर्थात तो काही गप्प बसून हे सगळे विचार करीत नव्हता. त्याचे जमेल तसे काम चालूच होते. त्याने प्रथम लाकडाचा पाया तयार केला..या वेळी चांगला उघड्यावर, आकाशाखाली जेथे तसले हलकट झाड नव्हते. नंतर त्याने गचकणातून वाळलेले गवत आणि काटक्या गोळा केल्या. त्याला बोटे एकत्र करता येत नसल्यामुळे त्याने ते काम हाताच्या पंजांनी केले. त्याने गोळा केल्या काटक्यांमधे अनेक कुजक्या काटक्या व शेवाळे होते जे त्याला मुळीच नको होते. पण यापेक्षा जास्त तो काही करु शकत नव्हता. तो अत्यंत काळजीपूर्वक हळूहळू पण ठामपणे काम करीत होता. नंतर, आग पेटल्यावर लागतील म्हणून त्याने जाड काड्या व काही फांद्याही गोळा करुन ठेवल्या आणि तो हे सर्व करताना त्याचा कुत्रा बसून त्याला न्याहाळत होता. त्याच्या डोळ्यात आता लवकरच शेकोटी पेटणार याची आशा डोकावत होती पण ती लवकर पेटत नव्हती याबद्दल काळजीही दिसत होती.

सगळी तयारी झाल्यावर त्या माणसाने बर्चच्या सालासाठी खिशात हात घातला. त्याला ती साल तेथे आहे याची खात्री होती. खिशात चाचपडताना बोटांना कळत नव्हते पण त्याचा चुरचुरणारा आवाज त्याच्या कानावर पडला. बिचाऱ्याने ती साल बोटात पकडण्याचा बराच प्रयत्न केला पण ती त्याच्या बोटात येत नव्हती. त्याने निकराचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आले की हे करताना त्याच्या डोक्यात त्याच्या थिजलेल्या पायाबद्दल विचार चालू आहेत. कदाचित त्यामुळे त्याचे लक्ष केंद्रीत होत नसावे. क्षणभर तो गडबडला पण त्याने प्रयत्नपूर्वक स्वत:वर ताबा मिळवला. दातात मोज्यांची टोके धरुन त्याने ते हातातून ओढून काढले व आपले हात मांड्यांवर आपटण्यास सुरुवात केली. हे सगळे तो कुत्रा बघत होता. बर्फात बसून त्याने आपले पुढचे पाय त्याच्या झुबकेदार, उबदार शेपटीने झाकले होते. माणसाच्या प्रत्येक हालचालीने लांडग्यांच्या कानासारखे त्याचे कान टवकारत होते. त्याला पाहताच त्या माणसाच्या मनात असुयेची एक तीव्र कळ उठली.

काही काळाने दूर कोठेतरी त्याच्या बोटात संवेदनांची हालचाल जाणवली. संवेदनांच्या त्या हलक्या जाणीवांनंतर सुरु झाल्या जिवघेण्या कळा ज्या त्याच्या बोटातून वर सरकत होत्या. पण त्याने त्या वेदनांचे स्वागत केले. त्याने उजव्या हातातील मोजा ओढून काढला व बर्चची पातळ साल बाहेर काढली. उघडी पडलेली बोटी लगेचच बधीर झाली. नंतर त्याने आगकाड्यांचा एक जुडगा बाहेर काढला. त्यातील एक घेताना तो सगळा जुडगाच खाली बर्फावर पडला. त्याने त्यातील एक उचलण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण त्याची बधीर बोटे ना त्याला स्पर्ष करु शकली ना ती काडी पकडू शकली. त्याने मनातून त्याच्या गोठणाऱ्या पायांचा, नाकाचा, गालांचा विचार मनातून निकराने काढून टाकला व फक्त काडीवर लक्ष केंद्रीत केले. स्पर्षापेक्षा त्याला आता त्याच्या दृष्टीवर जास्त भरवसा वाटला. डोळ्याने पहात त्याने बोटे त्या काड्यांच्या दोन्ही बाजूला आणली व बोटे जवळ आणली...म्हणजे त्याला आणायची होती...कारण तसे काहीच झाले नाही. बोटांनी त्याची आज्ञा पाळली नाही..बहुधा बोटांचा आणि त्याच्या शरीराचा संपर्कच तुटला असावा. त्याने परत हातमोजे चढविले व त्या काड्या बर्फासकट दोन्ही हाताने उचलण्याचा प्रयत्न केला. पण छे ! व्यर्थ !

बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याने दोन्ही हाताच्या तळव्यात त्या काड्या पकडण्यात एकदाचे यश मिळविले. त्याने त्या तोंडाशी नेल्या. त्याने तोंड उघडतात त्याच्या तोंडावरचा बर्फ कडाकडा वाजत तुटला. त्याने जबड्याचा वरचा ओठ बाजूला करुन दाताने एक काडी वेगळी करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या दुर्दैवाने ती त्याच्या मांडीवर पडली. परत तेच..त्याला आता मात्र ती उचलता येईना. त्याने वाकून दातात ती काडी पकडली व पायावर घासली. वीस पंचवीस वेळा घासल्यावर ती एकदाची पेटली. त्याने ती पेटती काडी त्या बर्चच्या सालीवर धरली. त्याच्या नाकात काडीचा धूर गेला व तो खोकू लागला. ती पेटती काडी खाली बर्फात पडली व विझून गेली. पण त्याची जिवंत राहण्याची इच्छा मात्र अजून विझली नव्हती...

सल्फर क्रीकच्या म्हाताऱ्याने बरोबर सांगितले होते...उणे पन्नास तापमानात एकट्याने प्रवास करु नये.. त्याने परत त्याचे हात आपटले पण त्यात तो संवेदना निर्माण करु शकला नाही. त्याने एकदम सगळ्या काड्या हाताच्या तळव्यात पकडल्या. नशीब त्याच्या खांद्याचे स्नायू अजून त्याचे ऐकत होते. त्याने त्या सगळ्या काड्या एकदम त्याच्या विजारीवर घासल्या. एकदम सत्तरएक काड्या.. एकदम जाळ झाला. नाकात धूर जाऊ नये म्हणून त्याने आपले डोके एका बाजूला झुकविले व तो पेटता जुडगा बर्चच्या ढलप्याखाली धरला. काही क्षण त्याला बोटांना काहीतरी होतंय याची जाणीव झाली. त्याच्या बोटांचे मांस जळत होते. त्याला मांस जळल्याचा वास येत होता...आत कुठेतरी खोलवर त्याला भाजल्याच्या संवेदना झाल्या ..थोड्याच वेळात त्याचे वेदनेत रुपांतर झाले..पण त्याने त्या काड्या सोडल्या नाहीत पण त्याची बोटे आड येत असल्यामुळे त्या बर्चच्या ढलप्याला आगीची धग नीट लागली नाही... शेवटी त्याने चटका बसून आपले हात झटकले. पेटत्या काड्या जमिनीवर पडल्या पण पडताना त्यांचे काम करुन गेल्या. तो बर्चचा तुकडा पेटला होता. त्याने वाळलेले गवत व बारीक काटक्या त्यावर टाकण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने मागच्याप्रमाणे त्याला काटक्या निवडता येत नव्हत्या कारण त्याला आता त्या तळहाताने उचलाव्या लागत होत्या. काटक्यांवर शेवाळे साठले होते ते त्याने दाताने खरवडून काढले. त्याने त्या निखाऱ्याच्या अंकूरावर हळूवारपणे फुंकर घालण्यास सुरुवात केली. तो निखारा म्हणजे त्याचे जीवन होते. तो निखारा कुठल्याही परिस्थितीत जिवंत रहायलाच पाहिजे. गरम रक्ताने आता त्याच्या शरीराच्या दूरच्या भागातून माघार घेतल्यामुळे तो आता कुडकुडू लागला. त्याच्या थरथरत्या हातातून शेवाळ्याचा एक मोठा तुकडा त्या फुलणाऱ्या निखाऱ्यावर पडला. त्याने त्याच्या थरथरत्या हाताने तो निखाऱ्यावरुन ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या थरथरण्यामुळे तो जरा जास्तच पुढे ढकलला गेला. त्याने त्या शेकोटीचे स्फुलिंग विस्कटले. विस्कटलेल्या काटक्या त्याने त्याच्या थरथरत्या हाताने एकत्र करण्याचा प्रयत्न केल्या पण आता त्याचे सारे शरीर थरथरु लागल्यामुळे त्या अधिकच विस्कटल्या. प्रत्येक काटकी धूर ओकून गप्पगार झाली. त्याच्या शेकोटीचे बीजच खुरटले, मेले. त्याने निराश होत चहुबाजूला नजर टाकली आणि त्याच्या दृष्टीस त्याचा कुत्रा पडला. शेकोटीच्या अवशेषांपलिकडेच काही अंतरावर तो बेचैनपणे पाय खालीवर करत उभा होता.

कुत्र्याला पाहताच त्याच्या मनात एक कल्पना चमकली. त्याने एकदा बर्फाच्या वादळात सापडलेल्या शिकाऱ्याची गोष्ट ऐकली होती. त्यात त्याने एका काळविटाला मारुन त्याचे कातडे सोलले होते व त्या अखंड कातड्यात शिरुन त्याने स्वत:चे प्राण वाचवले होते. तोही कुत्र्याला मारुन त्याच्यात आपले हात खुपसून त्यात उब निर्माण करु शकतो. एकदा का हातात उब निर्माण झाली की अजून एकदा शेकोटी पेटविण्यास कितीसा उशीर ? त्याने कुत्र्याला साद घातली व त्याला जवळ बोलावले पण त्याच्या आवाजातील भीतीने तो कुत्रा दचकला. त्याने आजवर कुठल्याच माणसाला असे बोलताना ऐकले नव्हते. काहीतरी भयंकर घडत होतं. कुत्र्याने काहीतरी धोका आहे हे ओळखले..काय हे त्याला कळत नव्हते पण त्याच्या मेंदूत कुठेतरी या माणसाबद्दल टिकटिक झाली व त्याला त्याच्याबद्दल खात्री देता येईना. त्याने कान पाडले व चुळबुळत त्याने एक पाय उचलला व खाली ठेवला. नंतर दुसरा उचलला व खाली ठेवला. पण तो त्या माणसाजवळ गेला नाही. माणसाने ते ओळखताच आपल्या पायावर रांगत त्याच्याकडे जाण्यास सुरुवात केली. माणसाला या अवस्थेत त्याने कधीच पाहिले नसल्यामुळे तो त्याच्याकडे पहात अजून थोडा दूर गेला.

माणूस क्षणभर बर्फात बसला. त्याने शांत होण्यासाठी प्रचंड धडपड केली. मग त्याने दाताने आपले मोजे खेचून हातातून काढले व उभा राहिला. पायात संवेदना नसल्यामुळे त्याने आपण उभे राहिलोय याची खात्री करण्यासाठी स्वत:वर एक नजर टाकली. पाय पूर्ण बधीर झाल्यामुळे तसेही त्याचे जमिनीशी असलेले स्पर्षनाते तुटलेच होते. तो ज्या पद्धतीने सरळ उभा होता त्याने त्या कुत्र्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्या माणसाने त्याला नेहमीच्या चाबूकी आवाजात बोलाविल्यावर मात्र त्या कुत्र्याने त्याचा मालकाप्रती असलेली निष्ठा दाखविली व तो त्याच्या जवळ गेला. तो जवळ आल्यावर त्या माणसाने कुत्र्यावर झडप घातली पण ना त्याचे हात वाकले ना त्याची बोटे. त्याची बोटे थिजली आहेत हे तो विसरला. ती जास्त गोठतच चालली होती. पण कुत्र्याने उडी मारायच्या आत त्याने त्याला आपल्या मगरमिठीत कवटाळले. त्या विव्हळणाऱ्या व सुटण्याची धडपड करणाऱ्या कुत्र्याला घेऊन तो खाली बसला. ज्या हाताने त्याला काड्याही उचलता येत नव्हत्या त्या हातांनी त्या कुत्र्याला ठार मारणे त्याला शक्यच नव्हते. त्याला लवकरच उमगले की ते त्याला करणे शक्यच नव्हते. त्याने कुत्र्याला सोडून दिले. सोडल्याबरोबर तो कुत्रा धडपडत त्याच्या हातातून सुटला व गुरगुरत चाळीसएक फुटावर जाऊन थांबला. तेथून तो त्या विचित्र माणसाकडे लक्ष देऊन पाहू लागला. त्याने कान टवकारले व त्याच्या पुढच्या हालचालींचा कानोसा घेऊ लागला. त्या माणसाने आपले हात शोधण्यासाठी खाली नजर टाकली. त्याला ते खाली लोंबत असलेले सापडले. स्वत:चे हात शोधण्यासाठी स्वत:च्या डोळ्याची मदत घ्यावी लागेल हे त्याच्या स्वप्नातही कधी आले नसेल. पण उणे पन्नास हा काही फक्त तापमानमापकावरील आकडा नसतो. त्याहुनही जास्त काहीतरी असते हे त्याच्या हळूहळू लक्षात येऊ लागले होते. त्याने हात जोरात हलविण्यास सुरुवात केली. मधून मधून तो ते बाजूवर आपटत होता. जवळ जवळ पाच मिनिटे त्याने हात आपटले पण त्याने फक्त त्याचे थरथरणे थांबले. पण त्याच्या हातात काही संवेदना जाणवली नाही. खांद्याला खाली काहीतरी वजन लोंबकळत असल्यासारखे त्याला वाटले. त्याने मनाने हाताला काहीतरी सुचना पाठविण्याचा प्रयत्न केला पण ते बिचाऱ्याला शक्य झाले नाही.

आता मात्र मृत्युची भिती त्याचे मन कुरतडू लागली. थोड्याच वेळात त्या भितीने त्याच्या ह्रदयात ठाण मांडले. आता हात, नाक, हात, पाय येथे ही भिती थांबत नव्हती. त्याच्या जीवनमृत्युचा प्रश्र्न होता. हा विचार मनात येताच तो हादरला. त्याने पळण्यास सुरुवात केली. कुत्र्याने आत्तापर्यंत त्याची संगत सोडली नव्हती. त्यानेही मालकामागे धाव घेतली. तो आंधळेपणाने वाट फुटेल तिकडे पळू लागला. आजपर्यंत त्याला एवढी भिती कधीच वाटली नव्हती. थोडे पळल्यावर तो थोडासा भानावर आला व त्याला अजुबाजुचे भान येऊ लागले. नदीचा काठ, ओंडक्यांनी आडवलेले पाणी, निष्पर्ण आस्पेनचे वृक्ष आणि आकाश. सूर्य नसलेले आकाश. पळण्याने त्याल जरा बरं वाटलं. त्याचे कुडकुडणे आता थांबले होते. ‘जर असाच धावलो तर माझ्या पायात जीव येईल’’ तो मनात म्हणाला. ‘‘ आणि मी असाच धावत राहिलो तर कदाचित तळावरही पोहोचू शकतो’’. त्याच्या मनात लगेचच एका विचाराने डोके वर काढले, ‘हातापायाची काही बोटे जातील यात शंका नाही पण एकदा तळावर पोहोचल्यावर बाकीचे त्याची काळजी घेतील’ दुसऱ्याच क्षणी त्याला वाटले "आता तो तळावर पोहोचणे शक्यच नाही. तो कित्येक मैल दूर आहे. हाडे गोठविणाऱ्या थंडीने त्याला पुरते नामोहरम केले होते. ‘‘लवकरच त्याचे शरीर गोठेल व वाळलेल्या झाडाच्या बुंध्यासारखे कडक होईल.’’ त्याने लगेचच हा विचार मागे टाकला. तो क्रूर विचार मधूनमधून वर येत होता पण तेवढ्याच निग्रहाने त्याला तो खाली ढकलत होता.

त्याला अशा बधीर पायांवर तो अजूनही पळू शकतोय याचेच आश्चर्य वाटले. पायाला जमिनीचा स्पर्ष होत नसल्याने त्याला वाटत होते की जणू उडतच चालला आहे. पक्षांनाही असेच वाटत असेल का ? त्याने विचार केला व स्वत:शीच हसला.
पळत पळत तळ गाठण्याचा त्याचा विचार एवढा काही चुकीचा नव्हता पण त्यात त्याने एक गोष्ट चुकीची गृहीत धरली होती ती म्हणजे त्याची सहनशक्ती. पळताना तो अनेक वेळा धडपडला व शेवटी खाली कोसळला. त्याने उठण्याचा निष्फळ प्रयत्न केला. ‘‘जरा विश्रांती घेतली पाहिजे आणि आता पळणे बंद. त्याने उगीचच दमायला होते. फक्त चालायलाच पाहिजे.’’ त्याने मनाशी ठरविले. बसल्यावर त्याला जरा बरे वाटले. आता तो कुडकुडतही नव्हता, त्याचा श्र्वासही ठीक चालला होता व शरीरात बऱ्यापैकी उबही निर्माण झाली होती. त्याने गालाला, नाकाला हात लाऊन पाहिला पण त्याला काहीच कळले नाही. पळण्याने त्यांचा बधीरपणा कमी होण्याची शक्यता जरा कमीच होती म्हणा. मग त्याला वाटले की बहुधा त्याचे शरीर बधीर होत चालले आहे. हाही विचार त्याने मागे सारला तो दुसऱ्या गोष्टींवर विचार करायचा प्रयत्न करु लागला. या असल्या वाईट विचारांनी काय होते याचा अनुभव त्याने नुकताच घेतला होता. त्याने तो विचार निकराने टाळला. पण त्याच्या मेंदूत त्या विचाराने मूळ धरले होते. त्याच्यासमोर त्याच्या गोठलेल्या शरीराची दृष्ये येऊ लागली. ‘‘ हे फार झालं’’ असे म्हणून त्याने परत एकदा धाव घेतली. मधेच त्याने चालण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यासमोर त्याचे गोठलेले शरीर येताच त्याने परत धावण्यास प्रारंभ केला.

या सगळ्या पळापळीत त्याच्या कुत्र्याने त्याची साथ सोडली नव्हती. त्याच्या पायात थोडे अंतर ठेऊन तोही धावत होता. जेव्हा तो परत कोसळला तेव्हा त्याने आपली शेपटी पायाभोवती गुंडाळून त्याच्या समोर ठाण मांडले व त्याच्या तीक्ष्ण नजरेने तो या विचित्र माणसाकडे पाहू लागला. त्या कुत्र्याच्या शरीरातील उबेचा व त्याच्या केसाळ कातडीचा त्या माणसाला क्षणभर राग आला. ओरडत त्याने संतापाला वाट करुन दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून बिचाऱ्या कुत्र्याने आपले कान पाडले. त्याला समजत नव्हते त्याचे काय चुकले ते.. यावेळी मात्र त्या माणसाचे अंग थंडीने जास्तच थरथरु लागले. थंडीबरोबरची लढाई तो बहुतेक हरत चालला होता. थंडी त्याच्या शरीरात सर्व बाजूने घुसत होती. मृत्युच्या कल्पनेने तो परत धावायला लागला पण तो शंभर फुटापेक्षाही जास्त पळू शकला नाही. शेवटी झोक जात तो खाली कोसळला. ते त्याचे शेवटचे कोसळणे होते. तो सावरुन बसल्यावर जरा भानावर येताच त्याने मृत्युला कसे सामोरे जावे याचा विचार चालू केला. असे सैरावैरा धावत पळत त्याला मृत्युला सामोरे जायचे नव्हते. "गोठून मरायचेच होते तर पळपुट्यासारखे नको’’ त्याने विचार केला. या विचाराने त्याचे मन थोडे शांत होते ना होते तोच त्याला एक प्रकारची गुंगी येऊ लागली. झोपेतच मरण आले तर किती बरे होईल त्याने विचार केला. भुलेचे औषध दिल्यासारखे... गोठून मरणे ही फार वाईट गोष्ट नसावी बहुतेक... यापेक्षा कितीतरी भयानक तऱ्हेने लोक मरतात...

त्याच्या डोळ्यासमोर त्याला शोधणारे त्याचे सगेसोयरे, मित्र दिसू लागले. एकदम त्याने स्वत:लाच त्या गर्दीत पाहिले. त्यांच्याबरोबर तो त्याच रस्त्याने त्याला शोधत येत होता. थोड्यावेळाने त्यानेच त्यांना त्याचे प्रेत बर्फात कुठे पडले आहे ते दाखविले. तो तो राहिला नव्हता. एका त्रयस्थ माणसासारखा तो स्वत:च्या गोठलेल्या शरीराकडे पहात होता.... ‘‘खरेच फार थंडी होती आज’’ तो मनाशी म्हणाला...परत परत म्हणत राहिला. तो त्याच्या गावी जाईल तेव्हा त्याच्या मुलाबाळांना खरी थंडी काय असते हे सांगतोय अशी दृष्ये त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली....दुसऱ्याच क्षणी तो सल्फर क्रीकला पोहोचला... धुम्रपान करणारा तो म्हातारा त्याला आता स्पष्ट दिसू लागला...‘‘तुझे म्हणणे बरोबर होते म्हाताऱ्या...खरे ठरले’’ तो त्याला म्हणाला. त्या कबुलीने त्याला झोप लागली. अत्यंत आरामदायी, उबदार अशी झोप. अशी झोप त्याने आजवर कधीच अनुभवली नव्हती.

हे सगळे लक्ष देऊन पहात एवढा सगळा वेळ त्याचा कुत्रा त्याच्यासमोर बसून होता. बर्फाच्या टेकाडांच्या सावल्या लांब पडू लागल्या. आसमंतात केविलवाणी तिन्हिसांज भरुन गेली. शेकोटीची कुठलीही चिन्हे त्या कुत्र्याला दिसत नव्हती. त्याने तो गोंधळून गेला. त्याने आपले कान पाडले व त्याने तोंडातून ऊं..ऊ..ऊ असा आवाज काढला. पण त्या विचित्र माणसाकडून कसलाच प्रतिसाद आला नाही. मग मात्र त्याने आकाशाकडे तोंड करुन रडायला सुरुवात केली. त्याने धीर धरुन त्या माणसाजवळ आपले नाक नेले. मृत्युच्या वासाने त्याने झटकन आपले तोंड मागे घेतले. एकदाही आपल्या मालकाला न सोडणाऱ्या त्या कुत्र्याने प्रथमच आपल्या मालकाला सोडले व आकाशाकडे बघत परत एकदा लांडग्यासारखा आक्रोश केला.

एकदा त्या निपचित पडलेल्या माणसाकडे पहात त्या कुत्र्याने शांतपणे त्या रस्त्याच्या मागावरुन धावण्यास सुरुवात केली. त्याला आता लवकरात लवकर त्या तळावर पोहोचण्याशिवाय गत्यंतर नव्हते कारण तेथे त्याला अन्न मिळणार याची खात्री होती..आणि...
...शेकोटी सुद्धा..

समाप्त.

मुळ लेखक : जॅक लंडन
अनुवाद : जयंत कुलकर्णी.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जबरदस्त.
आवडला अनुवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवाद आवडला.
जॅक लंडन यांच्या कथांच्या मराठी अनुवादांचे चार भाग सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मौज प्रकाशनने प्रकाशित केले होते. अनुवादक मला वाटते पुरुषोत्तम आत्माराम चित्रे ('अभिरुचि' वाले) होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच सुंदर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतानाच हुडहुडी भरली. इवलेसे जेमतेम कथाबीज आहे. खरं तर एक काही एक संपूर्ण कालावधीत फक्त एक घटना घड्ते. पण अतिशय परिणामकारक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0