स्ट्रॅटेजी

आठ - दहा दिवसांपूर्वी व्हाट्सॲपवर आंतरसोसायटी हापपिच क्रिकेट स्पर्धेच आवतान आल. आणि गेलं नाही तर आपल्या सोसायटीची काय इज्जत राहिल? हा प्रश्न प्रत्येक सोसायटीच्या क्रीडाप्रेमी, हौशी क्रीडापटू इ. लोकांना पडला. आणि बघता बघता स्ट्रॅटेजीजना सुरुवात झाली. आमच्या सोसायटीचे हौशी क्रीडापटू कसे मागे राहतील?

फक्त क्रिकेटचेच खेळाडू संघात निवडायचे या महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीपासून आम्ही सुरूवात केली. त्याचं शेवटच्या दिवसापर्यंत काय झालं विचारू नका! शेवटी मॅचच्या दिवशी कॅरम किंवा बुद्धिबळ खेळायला आलं तरी चालतंय ओ, तो पण खेळाडूच असतोय की! हा मुद्दा आपोआप उचलून धरून प्लेयर्स गोळा करण्यापर्यंत स्ट्रॅटेजी बदलावी लागली. असो.

तर दुसरी महत्वाची स्ट्रॅटेजी अशी ठरवण्यात आली की रोज रात्री जेवणानंतर सोसायटीच्या मोकळ्या जागेत प्रॅक्टिस करायची! ही स्ट्रॅटेजी सुद्धा रोज बदलत होती. अमका येतोय. तमका आत्ताच ऑफिसमधून आलाय. सोसायटीच्या गेटवर मस्त शेकोटी पेटवलीये वॉचमनने, जरा शेकूया, वगैरे कारणांनी मॅचच्या दिवसाच्या आदली रात्र उगवली. पण प्रॅक्टिसला काय कुणी सिरीयस घेतलं नाही. बरेच जण तर हापपिच तर आहे! त्याला काय प्रॅक्टिस करायचीय? हे असं निवांतपणे कमरेवर हात ठेऊन विचारत होते जसं काय यांच्या आधीच्या तीन पिढ्या रणजीत पाणी, टॉवेल वगैरे द्यायला होत्या!

मॅचच्या आदल्या रात्री मग प्रॅक्टिस नाही निदान उद्या खेळायचयं ते मैदान, खेळपट्टी पाहून उद्या कसं खेळायचं याची स्ट्रॅटेजी आज ठरवता येईल अशी एक स्ट्रॅटेजी ताबडतोब ठरली. लगेच फोन फिरवले गेले.
एका किडनॅपिंग व्हॅन मध्ये उद्या खेळणाऱ्यातले काहीजण भरले . रात्री दहाला सोसायटीच्या बाहेर एकजण भाजी आणतो म्हणून गेलेला, तो सिगारेट्स घेताना सापडला, तो ताबडतोब किडनॅप झाला! ग्राऊंड सापडलं. जाऊन पाहिलं तर खेळपट्टीवर गवताऐवजी कॉंक्रिट! लगेच स्ट्रॅटेजी ठरवली गेली. उद्या स्पिन नाही, फक्त फास्टर खेळवण्यात गेम आहे! लागलीच तिथे फोटो सेशन होऊन सगळ्यांना तस कळवण्यात आलं!

मॅचचा दिवस उजाडला. सकाळी दहा वाजता सर्व संघाना हजर राहण्याबद्दल कळविण्यात आले होते त्याप्रमाणे साडेदहा पर्यंत सर्वजण जमा झाले. सोसायटीचा अभिमान म्हणून आधीच, अशा प्रसंगी घालायचे टी शर्ट्स घालून खेळायला येण्याबद्दल सर्वांना ताकीद देण्यात आली होती, त्याप्रमाणे सर्वजण सोसायटीचे नाव असलेला टी शर्ट घालून आलेले. अशा रितीने तीन चारचाकी गाड्या धुरळा उडवित मैदानाकडे रवाना झाल्या.

मैदानावर पोचलो. उद्घाटन वगैरे सोपस्कार पार पडले. आमच्याच सोसायटीची पहिली मॅच आहे असे कळाले आणि लगेच स्ट्रॅटेजीवाले पुढे सरसावले व पहिली मॅच नको! ग्राऊंडचा अंदाज, फील्डिंग, बॉलिंग, बॅटींग याचा इतर टीमच्या मॅचेस पाहून योग्य स्ट्रॅटेजी ठरवता यावी म्हणून दुसरी मॅच घ्यावी अशी स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली व ती संयोजकांच्या घशात उतवण्यातही आम्ही यशस्वी झालो आणि त्याप्रमाणे त्यांनी आमची तिसरी मॅच ठरवली.

चला, पहिली मॅच सुरू झाली व प्रत्येक बॉलला एक अशा पाच ओव्हरच्या मॅचमध्ये तीसेक स्ट्रॅटेज्या ठरवल्या गेल्या. दुसऱ्या मॅचच्या वेळी आपण बसून न राहता फील्डिंगची प्रॅक्टिस केली तर वार्म अप होईल अशी एक स्ट्रॅटेजी पुढे आली व आम्ही सर्वजण जवळच्याच पडीक रानात गोल उभा राहिलो व एकमेकांकडे बॉल फेकत प्रॅक्टिसची स्ट्रॅटेजी अमलात आणली!

झालं! अखेर दुसरी मॅच संपून आमच्या मॅचची वेळ झाली. लगेच सर्वानुमते, टॉस जिंकला तर पहिली बॅटींग घ्यायची अशी स्ट्रॅटेजी ठरली. टॉस हरला. पण समोरच्या टीमने बॉलिंग निवडल्यामुळे आम्ही आपोआप स्ट्रॅटेजी वर्क होतेय ह्या आनंदात होतो तेवढ्यात आयोजकांपैकी कोणतरी सांगत आले की, अहो, कुणासोबत टॉस केला तुम्ही? दुसऱ्या टीमचा कॅप्टन तर आत्ता आलाय ग्राऊंडवर! बोंबला! पुन्हा टॉस झाला. पुन्हा हरला! समोरच्या टीमने पहिली बॅटींग घेतली. पण टीमचे मनोधैर्य खचू न देता आम्ही मैदानात उतरून हडल-बिडल केल आणि पहिल्या मॅचच्या वेळी ठरवलेल्या तीसेक स्ट्रॅटेज्या तीन मिनिटात उजळून टाकल्या!

मॅच सुरू झाली. चार का पाच ओव्हरची मॅच असं मध्ये कन्फ्यूजन झालेलं जरा, तेवढं सोडलं तर काही कळायच्या आत समोरच्या टीमने ५ ओव्हरमध्ये ६६ रन्स कुटलेले! सगळ्या स्ट्रॅटेज्या फुग्याचा दोरा अचानक सुटला तर फुगा जसा वाऱ्यावर सुरसुरत भिरभिरतो तशा फुस्स झालेल्या! तशाही अवस्थेत टीमने ऑस्ट्रेलिया विरूध्द साऊथ आफ्रिकेची फेमस ४३४ वाल्या मॅचची स्ट्रॅटेजी डोळ्यासमोर ठेवलीच!

आमची इनिंग सुरू झाली आणि अहो आश्चर्यम! सलामीचे दोन्ही बॅट्समनने तुफान फटकेबाजी करायला सुरूवात केली आणि विरोधी टीमचे धाबे दणाणले. पहिल्याच ओव्हरला १२ रन्स. दुसऱ्या ओव्हरअखेर २४ रन्स आणि तिसऱ्या ओव्हरअखेर बिनबाद ३३ रन्स! जोश वाढला होता. बाहेर बसलेल्या प्रत्येकाचा घाम सुकला होता. उरलेल्या दोन ओव्हरमध्ये ३४ रन्स हव्या होत्या. आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलने एका ओपनरचा घात केला. सिक्सला आऊट होतं हो. बिचारा किती आवरणार स्वतःला? शिवाय आस्कींग रन रेट वगैरे प्रकार असतोच की! सवयीप्रमाणे सिक्स मारून तो परतला आणि पुढे टीम इंडियाचा कित्ता आमच्याही टीमने गिरवला! गळती लागली. एका बॉलमध्ये २९ वगैरे जरा अवघडच लक्ष्य आमच्यासमोर आल्यावर शेवटी नाईलाज होऊन आम्ही स्ट्रॅटेज्यांना आवरतं घेतलं!

समोरच्या टीमबरोबर हातमिळवणी वगैरे प्रकार करायची प्रथा आम्ही आमच्यापुरती त्यावेळेसपासून बंद पाडायचं ठरवलं. सोसायटीने भाग घेतलेल्या पहिल्यावहिल्या स्पर्धेत आलेलं अपयश आम्ही थम्सअप, स्प्राईटने जिरवल व अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे एकमेकांना सांगत आणि अशा अनेक पायऱ्या चढाव्या लागल्या तरी बेहत्तर अशी नवी स्ट्रॅटेजी ठरवून आम्ही सोसायटीत परतलो!

- संदीप चांदणे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Ekch number re sandybaba.
Aawadli strategy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वावावा!झकासच.
डेविड आणि गलाअथ आठवले.
कुणी The Bible पाहातं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0