ज्यां दूधकि नदियां बाहे...

१९७६ साली, म्हणजे माझ्या जन्माच्या जवळपास प्रदर्शित झालेला "मंथन" मी आजवर पाहिला नव्हता. मला आता राहून राहून याचे आश्चर्य वाटतेय. म्हणजे गाजलेला प्रत्येक सिनेमा मी पाहिलेलाच आहे, किंवा पाहिलेला असायला हवा वगैरे काही मनात नाही; पण माझ्याच डोक्यात घोळत असलेल्या "प्रांतांच्या गोष्टीं" च्या अनेक बीजांपैकी एक जणू साकार होऊन चित्रपटरुपात आपल्या समोर येतंय असं वाटत राहिलं. म्हणून आश्चर्य.

ही समीक्षा नाही. चित्रपट समजणे आणि तो समजाऊन सांगणे एवढी प्रगल्भता माझ्याकडे नाही. हे एक शेअरिंग आहे.

चित्रपट गाजलेला तर आहेच. एक उत्कृष्ट चित्रपट, श्याम बेनेगल - विजय तेंडुलकरांचा, ऑस्करसाठी भारताची एंट्री असलेला, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसिरुद्दिन शाह, डॉ मोहन आगाशे, अनंत नाग, अमरीश पुरी अशी तगडी स्टारकास्ट असलेला म्हणून दखलपात्र तर आहेच आहे. पण त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे "अमूल" चे आणि श्वेत क्रांतीचे शिल्पकार डॉ वर्गीस कुरीयन यांनी लिहीलेली कथा, स्वत:वर बेतलेले नायकाचे पात्र, आणि 'गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन' च्या पाच लाख शेतकरी भागधारकांनी प्रत्येकी दोन दोन रुपये जमा करुन निर्मीलेला सिनेमा या दोन बाबी या सिनेमाला एका वेगळ्या "एकमेव" कॅटॅगरीत नेऊन ठेवतात.

मंथनमधील मला भावलेल्या काही बाबींबद्दल, आणि मंथन पाहून मनात आलेल्या गोष्टींबद्दल लिहिण्याआधी थोडक्यात कथेची रुपरेखा सांगणे आवश्यक वाटते.

***********

गुजरातमधील एका दूर कोपर्‍यातील खेड्यामध्ये लोकांचे आयुष्य संथ आणि सुरळीत सुरु असते. दारिद्र्याने गांजलेल्या लोकांना त्याची सवय होऊन काही खुपत नसते. गावामध्ये एक दूध डेअरी असते. डेअरीमालक मिश्रा त्याच्या मर्जीनुसार दुधाचे दर ठरवून भरपूर पैसा जोडत असतो आणि सोबत सावकारीही करत असतो. कुणालाच त्यात काही वावगे वाटत नसते. मोठ्यांची बरोबरी लहानांनी करु नये हे साधे सरळ तत्व लहानांच्या अंगवळणी पडलेले असते, आणि मोठ्यांच्या तर सोयीचेच असते. गावात दलितांचे प्रमाण लक्षणीय असते. त्यांना आर्थिक आणि सामाजिक असा दुहेरी दारिद्र्याचा शाप असतो. अशा वेळी दारिद्र्यनिर्मूलन योजनांआंतर्गत खेडोपाडी सहकारी तत्वांवर डेअरी सुरु करण्यासाठी एक टीम गावात येते. टीम लीडर डॉ राव हा तिशीतील उमदा आशावादी व्हेटरनरी डॉक्टर असतो. त्याची दॄष्टी केवळ जनावरांच्या आरोग्यापुरती किंवा डेअरी सुरु करण्यापुरती सीमित नसते. सहकारी सोसायटी स्थापन करुन गरीबांना आणि दलितांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देण्याचे स्वप्न तो पहात असतो. त्याच्या टीमला त्याच्या या व्हिजनशी फारसे देणेघेणे नसते. एकजण पूर्ण निराशावादी असतो. हे असले सहकारी सोसायटीचे प्रयोग बोलायला ठीक असतात, प्रत्यक्षात कधी येत नसतात वगैरे. एकजण पूर्ण प्रॅक्टिकल असतो. आपण फक्त डेअरी बघायचीय. ते सामाजिक समता आणि गावातील राजकारण याच्याशी आपला काय संबंध? तिसरा आपला मस्तपैकी लाल शर्ट घालून गावातील सौंदर्य न्याहाळण्यात (आणि जमलेच तर हाताळण्यात) मग्न असतो. ही टीमची अवस्था. गावातही परिस्थिती फारशी बरी नसते. मिश्राला तर हा तापच असतो. गावचा सरपंच सोसायटीकडे त्याचा नवा प्लॅटफॉर्म म्हणून बघत असतो. गावातील अन्य लोक उदासीन असतात.

दलित वस्तीमधील भोला हा तरुण आक्रमक वृत्तीचा असतो, त्याचाही शहरी लोकांवर अकारण (अकारण म्हणा किंवा वैयक्तिक कारणांमुळे म्हणा. त्याच्या आईला एका शहरी बाबाने फसवलेले असते असा एका संवादात पुसट उल्लेख आहे) राग असतो. अशा सर्व बाजूंनी हताश वातावरणात हार न मानता डॉ राव आपले प्रयत्न जारी ठेवतात. एका प्रसंगात जनावरांचे इंजेक्शन एका मृत्युघटका मोजणार्‍या लहान मुलाला देऊन त्याचा जीव ते वाचवतात, आणि कृतज्ञता म्हणून त्या मुलाचे पालक त्यांच्या सोसायटीत यायला तयार होतात आणि गाडी रुळाला लागते. तरी भोलाला आपल्या बाजूला आणणे, आपल्या रंगील्या टीममेंबरला अर्ध्या रात्री सामानासकट गावाबाहेर काढणे, मिश्राच्या फोडा आणि झोडा कारवायांना पुरुन उरणे हा सर्व संघर्ष डॉ रावना करावाच लागतो. बरे, पत्नीची या सर्वात साथ असावी, तर तेही नाही. तिला या लष्करच्या भाकरी आजिबात पसंत नसतात. अशातच सोसायटीच्या निवडणुकीचा प्रश्न येतो. सरपंचाचा या निवडणुकीला विरोध असला तरी डॉ राव आग्रह धरतात, आणि भोलाच्या आक्रमक भूमीकेमुळे दलित मोती सरपंचाला हरवून अध्यक्ष बनतो. हे सहन न होऊन सरपंच आपल्या लोकांकरवी दलित वस्तीला आग लावून देतो. वर कायदा सुव्यवस्थेचे कारण दाखवून पोलीस दलितांनाच आत टाकतात. त्यांना बाहेर काढण्याचे आणि सर्व सहाय्य करण्याचे नाटक करुन मिश्रा पुन्हा सर्वांना आपल्या दावणीला बांधतो. डॉ रावचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गावातील एका गरजू बाईकरवी त्यांच्यावर बलात्काराची खोटी तक्रार करवतो. इकडे डॉ रावांवर वैतागलेला सरपंच त्यांची बदली करवण्याच्या पक्क्या इराद्याने राजधानीला जातो. रावांची बदली होतेच. निराश मनाने डॉ राव कुणाचाही निरोप न घेता गाव सोडून निघून जातात. पण जिद्दी भोला सोसायटी पुनर्जीवित करतो, आणि हिंमतीने चालवायला घेतो.

**********

ही झाली थोडक्यात कथेची रुपरेखा. प्रत्यक्षात सिनेमा अनेक तरल बाबींना स्पर्शून जातो. स्मिता पाटीलने साकारलेली बिंदू ही व्यक्तिरेखा म्हणजे एक आख्खा वेगळा सिनेमाच आहे असे म्हणले तरी चालेल. डॉ राव यांच्या पत्नीच्या पात्राला जेमतेम एखादा संवाद असेल नसेल, पण डॉ रावांच्या अनेक लाएबलिटीजपैकी अजून एक असे ते ओझे संपूर्ण सिनेमाभर जाणवत राहते. डॉ मोहन आगाशे त्यांच्या कॅज्युअल रिमार्क देण्याच्या शैलीत ते पात्र गावातील राजकारणापासून किती अलिप्त असावे याचा एक स्पष्ट दाखला देऊन जातात. अशा किती म्हणजे किती गोष्टी सांगाव्यात! गिरीश कर्नाडांविषयी काहीही बोलण्याची मज पामराची आजिबात लायकी नाही एवढेच बोलतो. संपूर्ण सिनेमाला व्यापून हे पात्र उरते. एखादा आदर्शवादी, तरीही व्यवहारी हिंमतवान तरूण एखादे काम तडीस नेण्यासाठी कशा प्रकारे वागेल हे अतिशय वास्तविक रीतीने या सिनेमात दाखवले आहे.

चित्रपटाचे शीर्षक गीत म्हणजे एक वेगळाच विषय आहे. अलीकडेच अमूल ने सुनिधी चौहानच्या आवाजात पुनर्मुद्रित केले आहे. छानच आहे; पण मूळ गाण्यातील गोडवा काही वेगळाच. मेरो गांव काठाबाडे ज्यां दूधकि नदियां बाहे मारो घर आंगणाना भूलो ना...सिनेमात स्मिता पाटीलच्या भावमुद्रांवर हे चित्रित केले आहे.

***********

सिनेमात सहकारी चळवळ एका दुर्गम गावामध्ये प्रतिकूल परिस्थितीत रुजवण्याचे प्रयत्न चित्रीत केलेले आहेत. अतिशय सुंदर रीतीने हे चित्रण झालेले आहे. कुठेही अतिरेक नाही. अवास्तव प्रसंग नाहीत. साहजिकच आहे. स्वतःच्या अनुभवांवर आधारित अशी कथा पद्मविभूषण डॉ वर्गीस कुरीयनांनी लिहिलेली आहे, आणि तीही श्याम बेनेगलांसोबत. विजय तेंडुलकरांची पटकथा. परफेक्ट.

************

सिनेमाची गोष्ट आणि खरी गोष्ट यात थोडे अंतर आहे. काही महत्वाचे सत्याचे अंश असे, की दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणात दुधाचे मूल्य देणे ही पद्धत कुरीयनांनी सुरु केली. त्यातून सचोटीला इंसेटिव्हाइज करण्यात आले. दुसरे म्हणजे (जात हा मागासलेपणाचा निकष ठरवून) जातीवर आधारीत गरीबांचे संघटन करण्यात आले, आणि त्यातून सहकारी चळवळ उभी राहिली. (ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा; पण अमूलचा खरा इतिहास हा असाच आहे). डॉ रावांचा आदर्शवाद आणि त्यासाठी त्यांनी झटून केलेले परिश्रमही इतिहासावर आधारित आहेत. पण हा सिनेमा म्हणजे अमूलचा इतिहास असे मानण्यापूर्वी काही मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत. खरी गोष्ट अशी आहे, की ज्या आनंदमध्ये डॉ कुरीयननी ही चळवळ रुजवली, ते आनंद मुळीच दुर्गम नव्हते. अहमदाबाद मुंबईला जोडणार्‍या रेल्वे लाईनवर होते. (सिनेमातही रेल्वे लाईन दाखवली आहे म्हणा.) सहकारी चळवळीचे बीज आनंदमध्ये गांधीजी आणि सरदार पटेलांनी १९१८ मध्येच खेडा सत्याग्रहाने रुजवले होते. त्यामुळे सहकार तिथे नवा नव्हता. दूध व्यवसायही तिथे नवा नव्हता. पॉलसन डेअरी आनंदमधील दूध गोळा करुन मुंबईला विकायची. त्रिभुवनदास पटेलांनी या मक्तेदारीला आळा घातला. हे सरदार पटेलांचे चेले. सतत पंधरा दिवस पॉलसनला दूध द्यायचे नाही केवळ या अट्टाहासापाई शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतले. हे १९४६ साली. त्यांनी खेडा डिस्ट्रिक्ट मिल्क प्रोड्युसर्स युनियन स्थापन केली. वर्गीस कुरीयनांचे भारत सरकारशी काँट्रॅक्ट होते. त्यांना सरकारने स्कॉलरशिप दिली होती. परदेशात शिकायला. त्याबदल्यात त्यांना आनंद इथे दूध पावडर करायचे एक काम करावे लागत होते. ही म्हणजे या मेटलर्जी आणि न्यूक्लियर फिजिक्स मध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या माणसाची थट्टा होती. पण माणूस जबरदस्त सामाजिक जाणीव असलेला. राजीनामा देऊन कुरीयन तिथून काढता पाय घ्यायच्या बेतात असताना त्रिभुवनदासांनी त्यांना गाठले आणि थांबण्यासाठी गळ घातली. कुरीयनही थांबले. त्रिभुवनदास चेअरमन आणि कुरीयन जनरल मॅनेजर अशी नेता-टेक्नोक्रॅट जोडी जमली. सचोटीचे अधिष्ठान होतेच. सरकारी पाठींबा होता. लोकांचे संघटन करायला त्रिभुवनदासांची काँग्रेस आणि सरदारांची पुण्याई गाठीला होती. अमूल असे आकाराला आले.

अमूल ने तीन प्रकारे क्रांती केली असे म्हणता येते - १. गरीबांचे संघटन, आणि त्या संघटनाला अर्थकारणाची जोड, त्यातून ग्रामीण अर्थकारणाचे "मॉनेटायझेशन". २. जातीवर आधारीत संघटनातून सहकारी चळवळीचा विकास. (योग्य की अयोग्य माहीत नाही). ३. पायाभूत सुविधांचा ग्रामीण भागात प्रसार आणि डेअरीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाची ग्रामीण भागाला ओळख.

अमूल अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अमूल गर्ल, अमूल साँग, मंथन सिनेमा, तसेच अमूलचे अजून एक अमूल्य योगदान स्वतंत्र भारताच्या इतिहासात आहे - नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. राष्ट्रीय पातळीवरील ही एकमेव संस्था अशी आहे, की जी अमूल सारख्या एका स्थानिक संस्थेने, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थेने निर्माण केलीय. अमूलचा प्रयोग देशभरात रिप्लिकेट करण्यासाठी आजवर या संस्थेन ९६००० सहकारी संस्थाचे जाळे तयार केलेय. राजकीय नेतृत्वाने ठरवले तर कसले जबरदस्त सामाजिक काम होऊ शकते याचे अमूल जितेजागते उदाहरण आहे.

अमूलची फिलॉसॉफी समजून घेण्यासाठी मंथन हा सिनेमा अवश्य पहावा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

चित्रपट आणि अमूलची ओळख आवडली. टीव्ही घरात आल्यापासून 'अमूल'ची जाहिरात म्हणून हे गाणं माहित आहेच. चित्रपट पाहिलेला नाही पण जरूर बघेन.

हे प्रीती सागरच्या आवाजतलं गाणं: https://www.youtube.com/watch?v=RW9DSUbZX34 (जाहिरात म्हणून हेच पूर्वी पाहिलेलं आहे.)
हे सुनीधी चौहानच्या आवाजातलं: https://www.youtube.com/watch?v=onhgE0-z1qM

प्रीती सागरच्या आवाजात अधिक निरागसपणा वाटतो, सुनिधीच्या आवाजातल्या नवीन गाण्यात (तिचा नेहेमीचा) नखरेलपणा आहे. चित्रीकरणात या गावातल्या स्त्रिया अधिक शिकलेल्या, मोबाईल-संगणक वापरणार्‍या, आत्मविश्वास असणार्‍या दिसतात. एक प्रकारे हे समाजातलं परिवर्तन म्हणूनही बघता येईल. मला दोघींचाही आवाज आणि गाणी आवडलं.
नवीन गाण्याच्या चित्रीकरणात स्टुडीओत गाण्याचं नाटक करत लिप-सिंक करणार्‍या स्त्रिया हे दृष्य कृत्रिम वाटलं; सुनीधी चौहान कितीही चांगली मिमिक्री करत असली तरीही तिचा आवाज लपत नाही.

या गावाचं नाव आणंद असं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्रपटाचा आढावा आवडला. फारा वर्षांपूर्वी मंथन पाहिला होता पण पडद्यामागील गोष्टी आजच समजल्या!

अमूलने केलेल्या तीन प्रकारच्या क्रांतींचा उल्लेख तुम्ही केला आहे. पैकी जातीवर आधारीत संघटन वगळता, अन्य बाबी पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी ऊस कारखान्याबाबत घडल्या, असे दिसते काय?

माझ्या मते, होय. हेच थोडेफार त्याच परिसरातील वारणा-गोकुळ आदि दुध संघटनांबाबतदेखिल म्हणता येईल.

कुरियन यांना शेवटी ज्या प्रकारे जावे लागले ते पाहणे थोडे क्लेषकारकच होते (बांगलादेशचे महंमद युनुस हे एक दुसरे उदाहरण!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पडद्यामागील गोष्टी मलाही अलीकडेच समजल्या आहेत. त्यामुळेच मी तो सिनेमा पाहिला. बाकी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांमध्येही काही कमी जातीयवाद नव्हता. आणि त्याच्या आधाराने काँग्रेसने अनेक वर्षे राजकारण केले, आणि पक्ष बळकट केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक चित्रपट आणि त्या अनुषंगाने 'मिल्क फेडरेशन' ची वाटचाल यावरील आ.रा. यांचा हा लेख आवडलाच, पण त्याने मलाही पंचवीस वर्षामागे नेले.

मुळात सहकार चळवळीची महती सांगण्यासाठी अगदी 'डॉक्युमेन्टरी" धर्तीचे म्हणावे असे भासणार्‍या अत्यंत त्रोटक अशा कथानकावर ज्यावेळी 'मंथन' निर्माण होणार असल्याचे आमच्या कॉलेज वर्षात वाचनात आले त्यावेळी त्यामागील टीम ही 'अंकुर' 'निशांत'....आणि कलाकारही तेच [त्यावेळी फक्त स्मिता, नसिरूद्दीन आणि गिरीश कर्नाड यांची नावे 'माधुरी' मध्ये आल्याचे स्मरते....बाकीच्यांना मग थेट थिएटरमध्येच पाहिले] आहेत हे पाहिल्यावर 'मंथन' च्या घुसळणीतून जे काही निघणार आहे ते नक्कीच हरवून टाकणारे असेल हे आम्ही मित्रांनी गृहीत धरलेच होते....झालेही तसेच.

डॉ.राव यांची प्रतिकूल परिस्थितीतही 'यश' मिळविण्याची धडपड आणि त्यांच्या पत्नीला 'कुठे येऊन पडलो आहोत आपण असल्या काटेरी गावात ?" याची वाटणारी तगमग [पत्नीची भूमिका गुजराती चित्रपटातील आभा धुलीया या अभिनेत्रीने साकारली होती], संसारी बिंदूला रावांविषयी वाटणारी सुप्त ओढ.....[किमान तसे जाणवत राहते प्रेक्षकाला], भोलाची सुरुवातीची चळवळीविषयी वाटणारी अप्रिती....सरपंचाचा थेट विरोध....आदी ग्रामीण भागातील 'डेव्हलपमेन्ट' च्या आड येणार्‍या गोष्टी बेनेगलांनी कोणत्याही प्रकारे एका विशिष्ट पातळीच्या वर दाखविल्या नाहीत, त्या विरोधाला धारदार बनविण्याची जणू गरजच भासली नसावी, इतके सुंदर रीझल्ट्स को-ऑपरेटिव्ह चळवळीला 'आणंद' ने मिळवून दिले......[मी तेथील देवनागरीतील फलक 'आणंद' असे पाहिले होते; मात्र आता खात्री नाही....तरीही बहुधा 'आनंद' नसावे असे वाटते. असो, हा काही मुद्दा होऊ शकत नाही चर्चेचा.]

वनराज भाटियांच्या पोषक अशा संगीताने या चित्रपटाला अधिकच खुलविले आहे. "मेरो गाम काठा पारे...." चित्रपटात जरी प्रीति सागरच्या आवाजात असले तरी पुढे अनेकांनी या गाण्याला आपापल्या आवाजात पेश केल्याचे दिसते. 'सारेगामा' सारख्या टीव्हीवरील संगीत स्पर्धेत भाग घेणार्‍या मुली हमखास हे गाणे निवडतात, इतके ते वेगवान आणि इथल्या मातीतील आहे.

(चित्रपट अजून स्मरणात आहेच....काही मज्जादेखील...विशेषतः डॉ.राव यांच्या टीममध्ये सामील होण्यासाठी शहरातून आलेल्या अनंत नाग याला मुक्कामाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी प्रातर्विधीसाठी गावाबाहेर जावे लागते, असे समजल्यावर त्याचा पडलेला चेहरा, आणि ते काम अटळ असल्याने त्याने टमरेल घेऊन गावाबाहेर जायला सुरुवात करणे, आणि तसल्या हीरोला पाहून त्याच गावच्या विहिरीवरून पाणी आणायला निघालेल्या हसर्‍या मैनांनी त्याचा पाठलाग करणे, आणि अनंत नाग याला जीणे नकोसे करून टाकणे... हे सारे बहारदारच.)

भारतीय चित्रपटसृष्टीने आपल्या निर्मितीबाबत अभिमान बाळगावा अशी जी काही मोजकी चित्रपट असतील त्यात 'मंथन' प्राध्यान्याने असेल यात दुमत असणार नाही.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाटीलसाहेब, धन्यवाद. खूप गाळलेल्या जागा भरल्या तुम्ही. तुम्ही आणि अदिती म्हणता त्याप्रमाणे ते "आणंद"च आहे. आमची जुनी खोड आडवी आली. स्वत:चे संस्करण दुसर्‍याच्या नावावर करायची!

ग्रामीण भागातील निरनिराळे पुश-पुल्स विकासाला बाधक असतात असे आपल्याला वाटते खरे. ते बरेचसे खरेही आहे असा माझा आजही अनुभव आहे. पण त्यासाठी विकासाच्या आपल्या कल्पनाही कारणीभूत आहेत. सवडीने त्याविषयी इथेच लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट चांगला असेलसे वाटते. आजवर तो "आर्ट फिल्म दिसते साली" ह्या पूर्वग्रहामुळे पाहिला नव्हता.
.
.
.
स्मिता पाटीलने साकारलेली बिंदू ही व्यक्तिरेखा म्हणजे एक आख्खा वेगळा सिनेमाच आहे असे म्हणले तरी चालेल.
आख्खी सिन्माची ओळख वाचून "कोण बिंदु" असा प्रश्न पडलाय.
.
.
१. गरीबांचे संघटन, आणि त्या संघटनाला अर्थकारणाची जोड, त्यातून ग्रामीण अर्थकारणाचे "मॉनेटायझेशन". २. जातीवर आधारीत संघटनातून सहकारी चळवळीचा विकास. (योग्य की अयोग्य माहीत नाही). ३. पायाभूत सुविधांचा ग्रामीण भागात प्रसार आणि डेअरीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाची ग्रामीण भागाला ओळख.
स्वातंत्र्योत्तर काळात रुजवण्यात येत असलेला हा टिपिकल समाजवाद दिसतो आहे.
(म्हणजे संघटन + सहकारी संस्थेचे तत्व)
हासुद्धा भारतभर प्रामाणिकपणे खरोखर अंमलात आला असता तर चित्र नक्कीच वेगळे असते. तुम्ही राजकपूरचा प्रचंड गाजलेला १९५० च्या दशकातला"श्री ४२०" पाहिलात?
त्यातला बॉलीवूडीपणा, भंपकबाजी सोडून द्या. पण एकूणच त्यावेळेला वारे कसे वाहत होते ते त्यातून दिसते.चित्रपटाच्या शेवटी "शंभर रुपयात घर देइन हो" असे म्हणत खलनायक आख्ख्या मुंबैतून हजारो लोकांच्या जमा केलेल्या पैशाला घेउन पोबारा करण्याच्या तयारीत असतो, सुरुवातीला राजकपूरनेही त्याला साथ दिलेली असते पैसे जमवण्यात. शेवटी खलनायकास तो रोखतो . क्रुद्ध जमावापुढे भाषण देतो, शेवटची दोन वाक्ये बोलतो "सौ रुपिये में कोइ घर नही बनता. लेकिन करोडो रुपियों में लाखो घर जरुर बन सकते है.(तुमच्याकडे एकत्रित भांडवल बरच आहे, इतके सगळे लोक आहात म्हटल्यावर एकेकट्या कडे काहीच नसले तरी संघटित कौशल्य बरेच आहे. संघटित श्रमही बरेच आहेत. तुमच्यापैकी कुणी विटा पाडू शकतो, कुणी रंग देउ शकतो. उरलेले घर बांधणीत श्रमाचे भागीदार होउ शकतात. एकमेकांस सहकार्य केल्यास प्रत्यक्ष घर बांधणे ते किती दूर? हे सगळ्म अध्याहृत)"
हा सगळा आदर्श्वाद १९५० च्या दशकात भारतात होता.कुठल्ही सेक्टार ऑर्गनाइझ्ड असावं, पण "कॉर्पोरेट" म्हण्वल्या जाणार्‍या प्रकारापेक्षा वेगळं असावं, त्याला काही स्थानिक अधिष्ठान असाव. स्थानिक समस्येशी एकरुप असं तो प्रोजेक्ट त्या समस्येवर एक स्वतंत्र उत्तर असावं. असा तो दृष्टिकोन होता.
तो सर्वत्र आला नाही म्हणून १९९२ पासून ट्रॅक बदलावा लागला.(बदलूनही नक्की सगळंच चांगलं चाललय की नाही ते ठाउक नाही.)
.
.
१९५०च्याच दशकात दिलीपकुमारचा "नया दौर " प्रचंड गाजला. कल्पना साधीशीच. एका श्रमकरी वस्तीचा रोजगार कायमचा जाण्याची वेळ आलेली. कारण, कारखान्याच्या मालकाने आणलेले यांत्रिकीकरण. पण "संपूर्ण यांत्रिकीकरण करुन असा मजुरांच्या पोटावर पाय द्यावा का?" असा विचार स्वत: कारखानदार(बडे मालिक) करत असो, पण छानछोकित राहणरा, निव्वळ नफ्याचा विचार करणारा कारखानदारचा मुलगा(छोटे मालिक) नाही. नाय्क(दिलीपकुमार) त्याचे च्यालेंज स्वीकरतो. आणि एका अवघड, डोम्गरदर्‍यातूंन जाणार्‍या मार्गात कारखानदारचा मुलगा ट्रक्/ट्र्रॉली घेउन निघतो, दिलीपकुमारला आव्हान असते ते ह्या ट्रॉलीच्या आधी नियोजित स्थळी पोचण्याचे. अर्थातच तो ते करतो आणि शर्यत जिंकतो. त्याचा शेवटचा डायलॉग काय आहे ? "साहब, हमें मशीनों से कोइ दुश्मनी नही है| लेकिन कुछ ऐसा रस्ता निकालिये जिसमे आप भी हो, हम भी रहे , मशीनें भी रहें|" तीच काहीशी समाजवादी शैली. योग्य अंमलबजावणी झाली असती तर शुद्ध समाजवादी वगैरे राहूनही भारत खूपच चांगला बनू शकला असता.
अर्थात, हे माझे विचार, दोन्ही पिक्चर पूर्ण पाहिलेले नाहेत, तुकड्या तुकडयत, च्यानेल बदलत पाहिलेले आहेत.
.
.
.
सरकारी पाठींबा होता. राजकीय नेतृत्वाने ठरवले तर कसले जबरदस्त सामाजिक काम होऊ शकते याचे अमूल जितेजागते उदाहरण आहे.
अगदि अगदि. व्यवस्थेवर प्रभाव असणार्‍यांची इच्छाशक्ती नि सचोटी असेल तर बरेच काही चांगले होउ शकते. तीच गोष्ट एकेकट्याला करणे दहा जन्मातही पूर्ण होणे अवघड आहे. बिहारातल्या "पहाडबाबा" केसबद्दल कुणाला ठाउक आहे का?( दोन गावात रस्ता नव्हाता, वर्षानुवर्षे, तर हे गृहस्थ स्वतः जन्मभर खोदत/बनवत बसले, एकटेच.)
चांगले, टिकाउ रस्ते बांधणे हे खरोखर इतके अवघड काम आहे का? सरकार(कुठलेही, जि प, मनपा, राज्य, केंद्र वगैरे) ते करुच शकत नाही का? असा जबरदस्त निगरगट्टपणा कुठुन येतो ह्यांच्याकडं? ह्यांचे काम हे करत नाहीत म्हणून
प्रयत्न केल्याबद्दल सामान्याचे कौतुक करण्यापेक्षा व्यवस्थेचे काम असे एकट्या दुकट्याला करावे लागते आहे ह्याबद्दल कुणालाच चीड कशी आली नाही, येत नाही ह्याचे मला त्याही वेळेला आश्चर्य वाटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा, सविस्तर प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे. बिंदुविषयी मी काहीच लिहिले नाही हे खरे आहे. तिची भूमीका खरे तर महत्वाची आहे. पाटीलसाहेबांनी त्याविषयी काही लिहिले आहेच. मला त्याविषयी लिहिणे अवघड वाटले. म्हणून मी ते वगळले. तो विषय जरा विचार करुन मगच लिहिण्यासारखा आहे. त्या संसारी बाईला डॉ रावांविषयी आकर्षण का वाटावे याचा मी विचार करतोय. त्यातून डॉ रावांचेच व्यक्तीमत्व अधोरेखीत होतेच, पण ती एक सामाजिक परिस्थितीवरही कॉमेंट आहे असे मला वाटते. असो. बोलू त्यावर.

श्री ४२०, नया दौर हे सिनेमे म्हणून बरे आहेत. पण त्यातला आदर्शवाद हा पुस्तकी आहे. आर्मचेअर डिबेट आहे. मंथन इज समथिंग डिफरंट.

पहाडबाबाविषयी माहीत नाही. सविस्तर सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आ.रा.सर.....

वर मनोबा यानी आपल्या प्रतिसादात उल्लेख केलेल्या 'पहाडीबाबा' च्या विलक्षण अशा जिद्दीची कहाणी तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीने जरूर जरूर वाचावी अशीच आहे.

दशरथ मांझी....गहलौर, गया, बिहार....येथील एका व्यक्तीने 'सिंगल हॅण्डेडली' केलेल्या अचाट म्हटल्या जाणार्‍या कामाचा सविस्तर अहवाल खालील लिंकवर तुम्हास वाचायला मिळेल. [हा धागा वाचणार्‍या अन्य सदस्यांनीही हे स्फूर्तीदायक कार्य वाचावे असेच आहे.....'नया दौर' मधील शंकरला 'तो शर्यती' चा रस्ता तयार करण्यासाठी मदतीला प्रथम त्याची प्रेयसी रजनी आणि नंतर सारा गाव येतो असे दाखविले आहे. पण दशरथ मांझीचे कार्य 'एकला चालो रे....' ह्या ट्यूनवर चालले होते.

लिंक
http://inspirationalstories.motivationalposters1.com/Dashrath_Manjhi-3.html

१७ ऑगस्ट २००७ रोजी नवी दिल्लीतील 'एम्स' मध्ये दशरथ मांझी यांचे निधन झाले. आमीर खान यांच्या 'सत्यमेव जयते' कार्यक्रमाच्या अखेरच्या भागात या 'पहाडीबाबा... माऊंटनमॅन' ची ओळख सार्‍या देशाला झाली होती....त्या अनुषंगाने मीही अधिकची माहिती गोळा केली....त्यात सापडलेली वरील लिंक.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण प्रतिसाद अवांतर असल्याने पांढर्‍या रंगात केलाय.

ज्याबद्दल गौरव केला जातोय ते भारतीय व्यवस्थेबद्दल, मनोवृत्तीबद्दल माझी तक्रार तीच आहे. एखाद्या माणसानं का म्हणून आयुष्याची आख्खी २२ वर्षे बर्बाद करावीत रस्तेबांधणीत? रस्ते बांधणे हे काही अनवट, अवघड, जनविरोध होनारे कार्य नाही, कधीच नव्हते ज्यासाठी एखाद्या समाजसेवकाने आपले आयुष्य वेचावे. कर्वे , फुले, आंबेडकर ह्यांनी विविध कारनांसआठी आयुष्य वेचले. कारण त्या काळाच्या मानानी ते काहीतरी "वेगळे" करत होते. कदाचित सरकार ती कामे करण्यास धजावले नसावे, सुरुवातीला.
पण स्वातंत्र्योत्तर काळात रस्ते बांधणी हे काय आवाक्याबाहेरचे काम आहे का? का म्हणून एखाद्या समाजाला तुम्ही रस्ते देत नाही? त्यात तो समाजही "हां, इथे रस्ता नाहीच. असं करु, पलीकडून चाळीसेक किमी अधिकचे फिरुन मग गंतव्य ठिकाणे जाउ" असा विचार करायला शिकतो. मग कुणी "मला रस्ता हवा, मी रस्ता बांधणार" असा पवित्रा घेत रस्ता बांधायला आयुष्याचा मोठा भाग वेचतो. व्यवस्थ अलगेच "कित्त्ती कित्ती थोर हा" म्हणत कौतुक करते.
hopeless. ही तीच वृत्ती आहे. स्वतः बॉम्ब फुटाताना रोखू शकत नाहीत आणि वरून बॉम्ब फुटल्यावरही रोजीरोटीसाठी अगतिक माणूस दुसर्‍या दिवशी बाहेर पडला की "व्वा वा. किती हे स्पिरिट. मुंबै स्पिरिट " म्हणत त्याचे कौतुक करुन अहंकार गोंजारु पाहतात. म्हणजे, हुरळून जाउन त्यानं मूळ तक्रार विसरूनच जावी. आणि तेच होते आहे. रस्ता बांधणे हे अचाट भगीरथ प्रयत्नाचे काम आहेच, पण त्यासोबतच, सरकारकडून हे रस्ते बांधून घेणार्‍यांची आज जास्त गरज आहे.
एकत्या माणसाला रस्ते बांधण्यास वीसेक वर्षे लागली. तेच संपूर्ण यंत्रणेसाठी हे काम किरकोळ होते. १०-१२ महिन्यांहून अधिक लागायला नकोत. सुसज्ज मशीन्स, मजूर सर्व लावा की कामाला. टॅक्स काय फुकटात भरतोय का आम्ही.
तुमच्या "सर्कारी पाठिंबा" ह्याशब्दाच्या ताकदीबद्दल हे माझे म्हणणे आहे. बळी घेताना, मरणार्‍यांकडे दुर्लक्ष करताना आत्यंतिक निष्ठूर, उत्तरदायित्वाच्या बहुतांश कामात कमालीची सुस्त, पण प्रभावक्षेत्रातील आख्ख्या समाजाचे आयुष्य बदलून टाकायची, निदान त्यात बर्‍याच अंशी सुधारणा करायची जबरदस्त क्षमता/पोटँशिअल असलेली व्यवस्था, यंतरणा म्हणजे "सरकार."
@ अशोक काका :- दुव्याबद्दल आभार. पहाडीबाबा प्रकरण सत्यमेव जयते मध्ये आलेले आहे हे ठाउक नव्हते. मी त्याच्याबद्दल बरेच काही गौरवपर पेपरमधून्च वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पांढर्‍या रंगाचे प्रयोजन आवश्यक नाही. चर्चेत असे मुद्दे जरुर यावेत. असो.

पहिली गोष्ट म्हणजे समाजातूनच सरकार आकाराला आलेले आहे. वेगळे नाही. त्यामुळे समाजाची कड घेऊन सरकाराला बोल लावण्यात फार मोठा पॉइंट नाही.

दुसरे म्हणजे ही गोष्ट १९६० ते ८२ या काळातील आहे. या काळात एकूणच खेडोपाडी रस्त्यांची फार मोठी टंचाई होती. हायवेदेखील धड नव्हते, रस्त्यांच्या अलीकडील काळात आकाराला आलेल्या वेगवेगळ्या योजना (उदा. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना) त्यावेळी नव्हत्या. आमदार/ खासदार विकास निधी त्यावेळी नव्हता. (१९९३ साली खासदार विकास निधी सुरु झाला. त्यानंतर आमदार निधी.) जो काही तुटपुंजा निधी उपलब्ध होता, तो ज्या लोकांचा आवाज मोठा, त्या लोकांना मिळत असे. (आवाज मोठा म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक). त्यामुळे या रस्याला निधी मिळाला नाही यात मला तरी नवल वाटत नाही, आणि चीडही येत नाही. अशासाठी नाही, की इथे रस्ता दिला असता तर नक्कीच आणखी कुठेतरी असाच महत्वाचा रस्ता बाजूला पडला असता. (मग त्याविषयी पुन्हा संताप!). पण जर असे म्हणत असाल, की अनेक अनावश्यक कामे सुरु असतानाही या रस्त्याकडे दुर्लक्ष होत होते तर भाग वेगळा. पण त्याही परिस्थितीत, त्या "समाजाने" निवडून दिलेले ग्रामपंचायतीपासून विधानसभा-लोकसभेपर्यंतचे नेते, त्यांना जबाबदार असणारे सरकारातील त्याच "समाजातील" लोक काय करत होते? शेवटी जबाबदारी समाजाचीच.

हे त्या "रस्ता न देणार्‍या" व्यवस्थेचे समर्थन आहे असे कृपया समजू नये. आपला संताप व्यक्त करताना "का म्हणून एखाद्या समाजाला तुम्ही रस्ते देत नाही" या (व्यवस्थेला विचारलेल्या) प्रश्नाला मला सुचत असलेले हे काउंटर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मंथन पाहून मनात आलेल्या गोष्टींबद्दलचा अधिक तपशीलवार उत्तरार्ध आला पाहिजे. विमानानं टेक ऑफ घेतला, ते पुढं सरकलं आणि एकदम माघारी वळून उतरलं असं झालं. कदाचित मनोमन अवाजवी (म्हणजे, अनुचित संदर्भ आणत त्याआधारे) अपेक्षा ठेवल्यानं तसं झालं असेल खरं, पण उत्तरार्धाचा विचार करावाच.
थोडा दवणीयतेचा आधार घेत सांगायचं तर तो 'मंथन' समजला. त्यावरून झालेले 'मंथन' पूर्ण व्यक्त झाले नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. मंथन पूर्णपणे व्यक्त झालेले नाही. सहा दिवस तुकड्या तुकड्यांनी लिहिल्यामुळे असेल. सलग सवड मिळाली की विकासाबाबत काय वाटते ते लिहायचा विचार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमूलचा प्रयोग देशभरात रिप्लिकेट करण्यासाठी आजवर या संस्थेन ९६००० सहकारी संस्थाचे जाळे तयार केलेय. राजकीय नेतृत्वाने ठरवले तर कसले जबरदस्त सामाजिक काम होऊ शकते याचे अमूल जितेजागते उदाहरण आहे.

+१. स्वातंत्र्यानंतर भारतात धवलक्रांती झाली. गेल्या साठ वर्षांत दुधाचं उत्पादन १७ वरून ११० मिलियन टनांपर्यंत गेलेलं आहे. लोकसंख्या बरीच वाढलेली आहे हे खरं असलं तरी तरी दरडोई दूध अडीच पट! आज भारत दुग्धोत्पादनात जगातला प्रथम क्रमांकाचा देश आहे. आणि इतर विकसित देशांची दुग्धोत्पादनातली वाढ मंदावली असली तरी भारतात सुमारे ५% वाढ आजूनही चालू आहे. सध्या गरीब शेतकऱ्यांच्या 'लो इनपुट - लो आउटपुट' या पद्धतीवर ते आधारित असल्याने जसजशी संपन्नता वाढेल तसतसं उत्पादन वाढवणाऱ्या पद्धती परवडायला लागतील. त्यामुळे हाच दर पुढची बरीच वर्षं चालू राहील असा विश्वास वाटतो.

अंड्यांच्या उत्पादनाबाबतही अशीच नेत्रदीपक कामगिरी आहे. १९५० ते २००११ या काळात उत्पादन ३५ पटीने वाढ झालेली आहे. भारत हा जगातला तिसरा देश आहे. स्वातंत्र्यानंतर एकंदरीत अन्नाचं उत्पादन - धान्य, दूध, अंडी मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. ही कमान अशीच चढती राहील अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. स्वातंत्र्यानंतर (वैद्यकीय सुविधा आणि नवे ज्ञान उपलब्ध झाल्यामुळे) लोकसंख्येची वाढ जलद गतीने झाली. त्या मानाने अन्नधान्य / दूधदुभते यांच्या उत्पादनाची वाढ कमी झाली त्यामुळे ६० च्या दशका अखेरीस भारताची परिस्थिती अत्यंत वाईट झाली. अमूलच्या साईटवर गेल्यास असे दिसते की १९४६ ते १९७० या काळात दूध उत्पादनातील वाढ अत्यंत कमी होती. म्हणजेच दरडोई दूधाची उपलब्धता खूपच कमी झाली. (स्वातंत्र्यानंतर सगळे बिघडले असे वाटण्यास ही वस्तुस्थिती कारणीभूत असावी).

१९७० ते १९९० या काळात उत्पादन वेगाने वाढले. आणि परिस्थिती पालटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अंड्यांच्या उत्पादनाबाबतही अशीच नेत्रदीपक कामगिरी आहे. १९५० ते २००११ या काळात उत्पादन ३५ पटीने वाढ झालेली आहे. भारत हा जगातला तिसरा देश आहे. स्वातंत्र्यानंतर एकंदरीत अन्नाचं उत्पादन - धान्य, दूध, अंडी मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. ही कमान अशीच चढती राहील अशी आशा आहे.
बाकी गोष्टींचं ठाउक नाही, पण भारत अन्नाबद्दल स्वयंपूर्ण झाला. धान्योत्पादन वाढलं ; हरितक्रांतीनंतर भूकबळी कमी झाले असं सर्वसाधारण मानलं जातं ते अर्धसत्य आहे.
धान्योत्पादन वाढलं पण किती वाढलं? लोकसंख्या अडीचपट वाढली, तेव्हा धान्योत्पादन सव्वादोन पट वाढलं. "सरासरी धान्योपलब्धी" किंवा दरडोइ उप्लबध अन्न साधारण तेवढच राहिलं ही गंमत आहे!
मग भूकबळी कसे कमी झाले? वितरण व्यवस्थेतील(distribution system मधील) सुधारणा हे ह्याचं प्रमुख कारण. ह्याच विधानाचा व्यत्यास घ्यायचा तर १९६० च्या दशकात(विशेष्तः १९६५ मध्ये) किंवा १९७२-७३ मध्ये अशीच चांगली वितरण व्यवस्था असती तर खूप अनर्थ, भुकेचा प्रलय टळला असता. कदाचित मग इंदिरा गांधी सरकार विरूद्ध तितका जनसमुदायही एकवटला नसता; किंवा जेपींना पाठिंबाही थोडा कमीच मिळाला असता. जर वितरण व्यवस्था चांगली असती तर.
हरीत क्रांतीचं काहीच महत्व नाही का मग?
आहेचंइ:संशयपणे आहे. पण नुसती हरीत क्रांती कदापिही पुरेशी ठरली नसती. उत्पन्नाचे साधन मिळून चार पैसे पदरी पडावेत पण खिशालाच अगणित भोके असावीत अशी ती अवस्था असली असती. भारतात एकाच वेळी चार पैसेही मिळाले, आणि फाटकी झोळीही काही प्रमाणात शिवली गेली. कमावलेले चार दाणेतरी नीट साठवता येउ लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा सिनेमा यूट्यूबवर लगेच मिळाला आणि पाहूनही झाला..खूपच आवडला. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
अनेक सिनेमांमधलं ग्रामीण जीवन अगदी कृत्रिम वाटत. मंथन मधे असं क्षणभर देखील वाटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>राजकीय नेतृत्वाने ठरवले तर कसले जबरदस्त सामाजिक काम होऊ शकते याचे अमूल जितेजागते उदाहरण आहे.

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळ चित्रपट पाहिल्याशिवाय प्रतिक्रीया द्यायची नाही असे ठरवले होते. (नाहितर नंतर बघु म्हणतो आणि बघणेच होत नाही Smile )
काल रात्री जागून पाहिला.. आवडला तर आहेच

अश्या विषयांवर पोकळ अभिनिवेषरहित, शब्दबंबाळ नसलेले मोजके चित्रपटच असतील त्यात हा एक नक्कीच आहे. मला सर्वाधिक (अगदी मातब्बरांच्या उत्कृष्ट अभिनयापेक्षा अधिक) भावले ते यातील संवाद! "नेमके" हे एकच विशेषण लागु पडतील असे! जेव्हा गावागावात आपला हिरो फिरत असतो तेव्हा जमलेल्या जन्तेने अगदी सगळे काही कळतेय हा न आणलेला आव सुखावून गेला. "साब हम आपके पार्टिकोही वोट देंगे|" वगैरे मार्मिक संवाद केवळ दुग्धक्रांतीच नव्हे तर एकूणच ग्रामिण जीवन मानसिकता सगळ्याला स्पर्शून जाते

असे जुने चित्रपट माहितच नसतात (त्यावेळी गाजले असले तरी:)त्यामुळे त्याची ओळख करून दिली त्याबद्दल आरांचे आभार!
परिक्षण-परिचय छान उतरला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संवाद तेण्डूलकराञ्चे असल्याने, ते नेमके असणे, हे अध्यारूत आहे. ज्या चित्रपटान्ना त्याञ्चे संवाद आहेत, किंवा पटकथा आहे, त्यात हा स्थायी भाव आढळेल. अगदी '२२ जून १८९७' पासून ते केतन मेहताञ्च्या 'सरदार' पर्यन्त. कधीतरी, केवळ संवादान्करिता हे चित्रपट अवश्य पाहा. विशेषतः '२२ जून...' मधले चापेकर आणि ब्रुईन, किंवा चापेकराञ्चे वडील आणि ब्रुईन यान्मधील संवाद. तेण्डुलकराञ्ची लेखन या माध्यमावर किती जबरदस्त पकड होती ते उमगेल (सामना, सिंहासन, उम्बरठा, अर्धसत्य इ. सहज आठविणारी इतर उदाहरणे).

आता थोडे 'मन्थन' विषयी. चित्रपटाच्या गोष्टीच्या प्रवाहात दोन गोष्टी तेवढ्या सलग वाटल्या नाहीत. एक, बिन्दूचे आणि दुसरे भोलाचे रावांविषयीचे मतपरिवर्तन. (बिन्दूचे आकर्षण हा वेगळा विषय). कदाचित मूळ चित्रपटात सलगता असेल पण सङ्कलित केलेले पाहताना, या दोन गोष्टी थोड्या अचानक होत आहेत असे वाटते. मी हा चित्रपट यू-ट्यूबवर पाहिला. त्यामुळेही मूळ स्रोतात ढवळाढवळ झालेली असण्याची शक्यता आहे. पण एकदा मतपरिवर्तन झाल्यावर गोष्टीत पुन्हा सलगता आहे. असो.

अगदी सुरुवातीलाच, 'सॉरी सर, गाडी टाईम पे आ गयी', हा अफलातून संवाद ऐकून मजा आली. चित्रपट चाड्गला वाटला पण तेवढा भिडला नाही, मोहून वगैरे गेलो नाही (सङ्घर्ष दाखविणारे इतर अनेक चित्रपट पाहिल्याने झाले असावे). आवडलेली बाब म्हणजे गोष्टीची पार्श्वभूमी आणि त्याला जडून येणारे माणसाञ्चे स्वभाव. राव आणि देशमुख यान्तील माण्डलेली मतान्तरे फार आवडली. त्याञ्च्या संवादान्तून 'दुग्ध सहकारी वसाहत' निर्माण करणे आणि सामाजिक कार्य करणे, या गोष्टीन्तला फरक स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे, रावाञ्चे, नेमके कशासाठी त्या गावात आलो आहोत, याचे भान सुटत नाही. काही परीक्षा पाहणार्‍या प्रसङ्गान्त चलबिचल झाली, तरी उद्दीष्ट कायम डोळ्यासमोर असल्याने अश्या भावनात्मक प्रसङ्गान्त लागणारी अलिप्तता आणि चटकन् अड्ग झटकून पुन्हा उभे राहण्याची क्षमता उत्तम रेखाटली गेली आहे. अशी स्थितप्रज्ञता असणे हे माणूस या प्राण्याशी सङ्घर्ष करताना किती उपयोगी पडते हे अधोरेखीत होते. शेवटी बदलीची तार येते तेंव्हा राव एक उसासा सोडतात, तो महत्त्वाचा वाटला; एक गाव झाले, एक लढा सम्पला, आता पुढल्या मुक्कामी पुन्हा त्याच आसाभोवती नवे चक्र सुरू...

प्रथम एका चित्रपटाची चाङ्गली ओळख करून दिल्याबद्दल आणि नन्तर तो पाहण्याच्या चाड्गल्या अनुभवातून नेल्याबद्दल 'आळश्यांचा राजा', याञ्चे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही हा सिनेमा परवाच पाहिला...

पटकथा तेंडुलकरांची आहे पण संवाद कैफी आजमींचे आहेत...
लेखात व्यक्त झालेल्या भावनेशी मात्र सहमत आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद, मास्तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच लिहायला आलो होतो. संवाद कैफी आजमींचे आहेत. एरवी चांगले कवी आणि गीतलेखक म्हणून प्रसिद्ध असणार्‍या कैफी यांचा संवाद लेखक म्हणून दुसरा चित्रपट आठवेना (आता विकीवर शोधता काही मिळाले आहेत)

"तें" चे संवाद अधिक 'टोकदार' असतात असे माझे मत आहे. मात्र मंथन मधील संवाद बरेच हलकेफुलके तरीहि मार्मिक होते.
बाकी "सॉरी ट्रेन टाईम पे थी!" वगैरेच्या बाबतीत सहमत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम परीक्षण. बर्‍याच वर्षांपूर्वी हा सिनेमा पाहिलेला होता. आता या निमित्ताने परत पाहीन असं म्हणतो. कुरियन यांचं आत्मनिवेदनपर पुस्तकही आहे तेही वाचनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वर्गीस कुरीयन यांना श्रद्धांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक धडाडीचा प्रशासक आणि आंत्रपनर हरपल्याचं दु:ख झालं.. मन:पूर्वक श्रद्धांजली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जवळ जवळ पांच वर्षांनी हा लेख वर आणण्याचे प्रयोजन लक्षांत नाही आले।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

का रे मनोबा लेख वर आणलास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबांचे ऐसी व्यवस्थापनाशी कैतरी बिनसले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग अशी टिंबे वाटून काय होणारे?
भांडायचे तर बिन्धास्त घरी घुसून भांडायचे, आवाज वाढला पैजे, बाह्या सरसावल्या गेल्या पैजे, कैतरी खळबळजनक, दखलपात्र असे घडले पैजे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी.... हा विषय बंद !! मनोबांनी वेगळा खुलासा व्यनितून केला आहे.

संपादकांनी माझा आधीचा प्रतिसाद उडवला तर बरं !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.