बुंगाट रपेट (विनोदी कथा)

सकाळची वेळ होती. सूर्य नुकताच लांबलचक पसरलेल्या काळ्या शेतायच्या मागून उगवला. त्यानं आपल्या बोचऱ्या किरणायनं मंगरूळकरायले खडबडुन जागं केलं. सुर्य वीतभर वर येईलोक सगळेजण उठले होते. घराच्या खबदाडीत, गोठ्याच्या ताटव्याले, मोरीच्या खिळ्याले अडकवलेले टमरेलं मोहिमेवर निघले. अजून झोपेचा अंमल पूर्णपणे न उतरलेले जीव टमरेलात घोटभर पाणी ओतून ते डुचमळत घेऊन निघाले.
मानकशेठ मात्र आपल्या पेशल बेडरुममध्ये टिरि वर करून झोपला होता. सूर्य आजुन थोडा वर आला तव्हा त्याले जाग आली. मग निसर्गानं बोकांडी मारलेले प्रात:विधी पार पाडून त्यानं दुकान उघडलं.

मानकशेठ म्हणजे काही साधी असामी नव्हती. मंगरूळचा अंबानी म्हणायचे त्याले. बुढं सत्तरीकडं झुकलं तरी आजुन जवानासारख्या उड्या मारत होतं.कंजूसपणाच्या बाबतीत त्यानं भल्याभल्यायले मागं टाकलं होतं. रोज नियमितपणे एखादी गोष्ट केली त त्याचा भविष्यात मोठा फायदा होतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे मानक. लहानपणापासून त्याची एक छोटी सवय होती- परसाकडं गेल्यावर परत येतांना एक दगड आणायचा. पन्नाशीले पोहचता पोहचता एवढे दगडं जमा झाले की त्याच्या दोनमजली घराचा पय्या बांधायले ते पुरुन उरले. अख्ख्या गावाले जेऊ घालायची ऐपत आसूनही फुकट जेवायले भेटतं म्हणून हा पंचक्रोशीतलं एकबीन लग्न सोडायचा नाही.
तर आसा हा मानक आपलं किराणा मालाचं दुकान उघडून काउंटरवर बसला होता. आंगावर त्याचा नेहमीचा यूनिफॉर्म म्हणजे पांढऱ्या रंगाची कोपरी अन नाड्यावाला पट्ट्यापट्ट्यायचा पयजामा होता. पायात होती घासून घासून गायब व्हायले आलेली स्लिपर. सकाळचे गिऱ्हाइकं म्हणजे पाच रूपयाची साखर, रुपयावाली चहापत्तीची पुडी, एखादा टोस्ट नाहीतर पाचपाचवाले बिस्किटचे पुडे. ज्याले टेकन देल्याशिवाय प्रेशर येत नाही आसं एखादं टमरेलधारक गायछापची पुडी नाहीतर बिड्यायचं बिन्डल घेऊन जायचं.

सकाळचे नऊ साडेनऊ वाजले आसतील. मानक हिशोबाच्या वहीतल्या उधाऱ्या चाळंत होता.
“रामराम मानकशेट.” दरवाजात सुनील टेलर उभा होता. डोळ्याले काळा गॉगल, झकपक शर्टपँट अन पायात चमचम चमकणारा काळाशार बुट आसा त्याचा अवतार. हातातली की चैन फिरवत त्यो काउंटरजवळ आला.

“बोला काय पाह्यजे?” मानक वहीतली नजर न हटवता बोलला.

“गायछाप अन चुन्याची डब्बी द्या.”

मानकनं हवी ती वस्तू काढून देली. मधेच त्याची नजर रस्त्यावर गेली. बाहेर सुनील टेलरची बाईक एम 80 उभी होती.

“सकाळी सकाळी कुठं चालले टेलर?” मानकचा बेरका प्रश्न.

“बायको आठ दिवसायपासून माहेरी जाउन बसली. तिले आणायले चाललो नायगावात. तसंबीन धोंड्याचा मह्यना हाये म्हणून सासऱ्यानं बोलवलं होतं धोंडे खायले.”

“वा वा वा.” मानक डावा डोळा बारीक करत बोलला, “अर्जँट तं नाही नं एकदम? म्हणजे पाचदहा मिन्टं वेळ हाये का?”

“हाये तसा थोडाफार वेळ.”

मानकनं काउंटरवरून टुनकन उडी मारली. या अनपेक्षित मूव्हनं सुन्या दचकून मागं सरकलं.

“जरा स्टॅण्डवरून जाउन यायचं होतं. पाच मिन्टात येतो.” असं म्हणून त्यानं चाबीसाठी हात पुढं केला.

“बरं लवकर या पण.”

“आसा गेलो अन आसा आलो.”

दुकान सांभाळायच्या नोकराले सुचना देऊन मानकनं गाडीवर टांग टाकली.

पाच म्हणता म्हणता पंधरा मिनटं झाले, वीस झाले, पंचवीस झाले अन हा हा म्हणता आर्धा घंटा सरला. दहा मिनटाच्या बोलीवर गेलेला मानक आजुन वापस आला नव्हता. सासुरवाडीले जायचं म्हणून पोळ्याच्या बैलावानी सजून आलेला सुन्या तगमग करू लागला. त्यानं मनगटावर गुंडाळलेल्या शंभर रुपयाच्या घड्याळात पाह्यलं.दहा वाजले होते. इतका वेळ त्यानं कसाबसा दम मारला. आता त्यो पायीपायीच बसस्टॅण्डच्या दिशेनं निघला.

मंगरूळच्या स्टॅण्डवर दोन चहा नाश्त्याच्या हॉटेली, तिन पानटपऱ्या अन दोन वरली मटक्याच्या टपऱ्या होत्या. लाल डब्बा बसगाड्या अन तिनचाकी डुकरायचा (अॅपे रिक्षाचा) स्टॉप होता त्यो.

सुन्या स्टॅण्डवर आला. समोरच त्याचा दोस्त नाऱ्याची हॉटेल होती. हॉटेल म्हणजे चारीबाजूनं लाकडाच्या बल्ल्या रोवून ठोकलेल्या टिनायचा डब्बा, आत मोडकळीला आलेले दोनतीन लाकडी बाकडं अन सातआठ काळपट प्लास्टिकच्या खुर्च्या.समोर भट्टीवर कढई टेकवून नाऱ्या भजे तळत होता.

“नाऱ्या, मानकशेट दिसले का इकडं येतांना?”

“कुठून?”

“गावातून.”

“काय काम हाये?”

हा चभरा हाये अन माहीत आसलं तरी लवकर उत्तर देणार नाही हे सुन्याले माहित होतं.
“त्यो मही गाडी घेऊन गेला. पाच मिन्टात येतो बोलला पण आर्धा घंटा झाला तरी आला नाही.”

“तुले काय काम हाये लगे अर्जँट गाडीचं?”

सुन्याचा संयम ढळू लागला होता.

“मी सासुरवाडीले चाललो बायकोले आणायले.”

“अरं वा पण लगे सकाळी सकाळीच?”

“सासऱ्यानं धोंडे खायले बोलवेल हाये.”

नाऱ्या खुदकन हासलं. भजाचा एक घाना काढून त्यानं कोपरात ओतला. नंतर मूठभर मिरच्या कढईत टाकल्या. मिरच्यायच्या बिया थोडावेळ ताडताड उडल्या. मग त्यानं भजे प्लेटित ओतून गिऱ्हाइकायले देईपर्यंत दोन तीन मिनीटं निघून गेले.
“हा बोल सुन्या काय काम होतं?”
नाऱ्या जसंकही आधी काही झालंच नाही आशा आवीर्भावात बोलला. आता मात्र सुन्याची पुरी सटकली. त्यानं एका झेपंत नाऱ्याची गचांडी पकडली.

“फोकनीच्या, सासुरवाडीले जायले महा जीव चाल्ला अन तू शहाणपणा चोदून राह्यला. ते मानक बुढं दिसलं का सांग आधी, नाहीतं या भजाच्या कढईतच तुहं डोकं बुडवीन.”

सुन्याचा हा अवतार नाऱ्यासाठी नवीन होता. ते जाम टरंकंलं. भजे खाणारे फिदीफिदी हासायले लागले.

“अबे ते बुढं तुही एम 80 घेऊन चिखलीच्या दिशेनं गेलं.”

“काय बाराचं म्हतारं हाये. मले बोललं स्टॅण्डवर जाउन येतो अन हे गावं हिंडुन राह्यलं. पाह्यतोच त्याले आता. चाबी दे.”

“कशाले?”

“जातो त्याले शोधायले अन आणतो धरून.”

“अरे यील वापस. एवढं काय अर्जँट लगे.” नाऱ्यानं गाडीची चाबी द्यायचा कंटाळा दाखवला.

“मह्या एम 80 चे ब्रेक लुज हायेत. बुढं गाडी घेऊन बोकांडी आपटलं तं आफंत यील फुकटची.”

यावर नाऱ्याले काही बोलता आलं नाही. त्यो थोडंसंक कानं झाला अन पयजम्याच्या चोरखिश्यातली चाबी बाहेर काढली.

“पेट्रोल जरा कमी हाये गाडीत, टाकून घेशीन. तुही पंचाईत होऊ नाही म्हणून सांगून राह्यलो बरं का.”

“हा ठिक हे. दहा वीस रुपयाचं टाकून घील. आन इकडं चाबी.” सुन्यानं चाबी हिसकून घेतली अन गाडीच्या दिशेनं निघला. थोडं पुढं जाउन त्यो माघारी वळला. खिशात हात घालून एक मजूर छाप बिडी बाहेर काढली. नाऱ्याची भट्टी पेटलेली होतीच. कढईखालून बिडी घुसाडून त्यानं ती पेटवून घेतली. ओठाच्या कोपऱ्यात बिडी कोंबून त्यानं स्टाईलनं किक मारली. एक मारली, दोन मारल्या, पाचसहा मारल्या. ‘घ्यांगS घ्यांगSS’ करत फटफटी सुरु झाली. नेहमीच्या सवयीनं त्यानं गेअर टाकायले डावं मनगट फिरवलं. पण ही एम 80 नव्हती. गेअर पडला नाही. चूक लक्षात येताच सुन्यानं बिडी चावली अन डाव्या टाचंवर जोर देऊन ‘खडालखट’ गेअर टाकला. गाडीनं गपकन उसळी घेतली अन मंगरूळच्या त्या इंटरनॅशनल हायवेवरून दाणदाण आदळत पळू लागली.

“अरं ढबंनं चालव गाडी.” नाऱ्याची आरोळी हवेतच विरून गेली.

---------------------

मानकची एम 80 पुंगाट पळत होती. पिवळ्याधमक उन्हात त्याचं टक्कल चमचम चमकत होतं. सीटवर फुटभर मागं बसल्यामुळं त्याले हॅण्डल पकडायले वाकणं पडत होतं. त्यामुळं त्याच्या विचित्रपणात आजुन भर पडली होती.
थोड्याच वेळात त्याची गाडी वरखेड अन करतवाडी ओलांडून दहीगावात आली. भिकासाऱ्यासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्यामुळं आसंल किंवा पयजमा बनीयन घातलेला वेगळाच प्राणी गावात घुसला या समजुतीमुळं आसंल, गावातले सगळे कुत्रे जीव खाऊन गाडीच्या मागं लागले. मानकनं वेळेवर अॅक्सलेटर पिळला अन त्या टोळभैरवांच्या तावडीतून निसटला. पंचक्रोशीतले बरेचजण मानकले ओळखत होते. पारावर बसलेल्या रिकामटेकड्या लोकायले मानक येतांना दिसला.

“मानकशेट कुठं चालले?”
गाडी पारावरून पुढं जातांना एकांनं विचारलं.

“गाडी बंद होऊन नाही राह्यली.” मानक जोरात आरडला.
प्रत्येक गावात त्याले हाच प्रश्न विचारण्यात आला होता अन उत्तरबीन सेम होतं.

मानकच्या मागावर सुन्या वरखेडात आला. तिथं विचारपूस केल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्यो याच रस्त्यानं गाडी दामटत गेला. एका दातपड्या म्हताऱ्यानं सांगितलं,
“ बुढं याच रस्त्यानं गेलं. गाडी बंद होऊन नाही राह्यली आसं बोंबलत होतं.”

दोनतीन गावायत विचारपूस केल्यावर सुन्याच्या लक्षात सारा प्रकार आला. मानकचं मंगरूळच्या स्टॅण्डवरच काम होतं पण गाडी कशी थांबवायची याचा अंदाज त्याले आला नाही म्हणून ते एका पाठोपाठ एक गावायची रपेट मारत चाललं होतं. सुन्याले आतालोक दोनदा सासुरवाडीहून फोन येऊन गेला होता. तिसऱ्यांदा वाजणारा फोन त्यानं उचलला

“अहो दाजी कितीक वेळ लागंन आजुन?” साल्याचा प्रश्न

“अर्जँट काम आलं एक. येतोच आर्ध्या घंट्यात.”

“त्यह्यले म्हणा लवकर या.” पाठीमागून सासूचा आवाज आला.

“लवकर या,ले उशीर होऊन राह्यला.”

“हाव हाव. लगे निघतोच आता.”

टूक. टूक.. टूक… फोन बंद झाला

आता आणीबाणीचा प्रसंग आला होता. सुन्यानं लगेच पेठले पानटपरी चालवणाऱ्या आपल्या मित्राले फोन लावला.
“हॅलो भाग्या, मी काय सांगतो ते आईक.”
सुन्यानं सगळा प्रसंग थोडक्यात समजाउन सांगितला.

"थोड्याच वेळात म्हतारं पेठमध्ये येईल. ते आलं की काहीबीन करून त्याले धरायचं.बुढ्ढं सुटलंच नाही पाह्यजे.”

“तू बीनघोर राह्य. सोडतच नाही त्याले.” पलीकडुन आवाज आला.

मानक पेठमध्ये येईपर्यंत भाग्यानं सगळी फिल्डिंग लावून ठेवली होती. त्यो अन त्याचा मित्र रस्त्याच्या दोन्ही बाजूले उभं राहून मानकची वाट पाहू लागले.
थोड्याच वेळात मानकचा चमचम करणारा ठिपका भरधाव वेगानं पेठच्या दिशेनं येतांना दिसला. भाग्या तयारीत होतंच. ठिपका हळूहळू मोठा झाला. मानक टप्प्यात येताच त्यो जोरात आरडला-
“मानकशेट वेग कमी करा अन गेअर उतरून गाडी न्युट्रल करा.”
पण मानकच्या चेहऱ्यावरुन आसं दिसंत होतं की त्याले काही आयकूच आलं नाही.

“वेग कमी करा वेग.” त्यो रस्त्यावर येऊन हातवारे करू लागला. आजूबाजूचे चारपाच लोकबीन त्यात सामील झाले. मानकनं वेग कमी केला. सगळेजण थोडसेक निश्चिंत झाले. पण भाग्या अन त्याची पलटण जवळ येताच एम 80 चा वेग झपकन वाढला अन भाग्याले कट मारून गाडी चिंगाट निघून गेली. थोड्याच अंतरावर स्पीडब्रेकर होता, त्येच्यावर गाडी जोरात उसळली. मानकचं टिंगर सीटपासून फुटभर उंच उडलं अन दाणकन सीटवर आदळलं.
भाग्याची गाडी पंक्चर आसल्यानं पाठलाग होऊ शकला नाही.

------------------------

मानकची सवारी आता मंगरूळपासून चाळीस किमी अंतरावरच्या पिंपळगावात येऊन पोहचली. आतालोक सूर्य बराच वर आला होता, सावल्या आखुड व्हायले लागल्या होत्या. शेतायतले बायामाणसं दुपारचे जेवणं करायले सावलीचा आसरा ढूंढू लागले होते. हजार ठिगळ देलेल्या पॅंडीवानी दिसणारा रस्ता मात्र संपता संपत नव्हता. गाव जवळ आलं तसा रस्ता आजुन खराब झाला. वाळलेल्या शेणाची नक्षी स्पष्ट झाली. सकाळी उगवलेल्या गुलाबायचा वास जरा कमी झाला होता हा एकमेव दिलासा.

कोरड्या धरणाच्या काठाजवळून पंधरा-वीस म्हशी झुंडीत चालल्या होत्या. पलिकडं जायले इतकूशीक जागा उरली. मानकनं वेग कमी केला अन अंगठ्याखालचा हॉर्न जोरजोरात दाबला.
‘बीप बीप बीप’ अरं बाजूले हाकल म्हशी S

“हंब्या होS... हुर्रSS.” म्हशीमागच्या माणसानं औपचारिकता पार पाडली.

‘बीप बीप बीप….. बीपबीप….बीSSSप.’ गाडीनं सगळे सुर लावून पाह्यले. पण बाजूले व्हायच्या ऐवजी एक म्हैस बुजाडली अन सरळ गाडीवर धाउन आली. मानकची पारपुक झाली अन त्यानं गर्रकन हॅण्डल फिरवलं. डाव्या हाताले खोलवर खाली धरणाचं कोरडं पात्र होतं. गाडी रस्त्याच्या कडंवरून खाली उतरली. बुढ्यानं जोरात ब्रेक मारला, पण तीव्र उतार अन लुज ब्रेक येच्यामुळं गाडी काही थांबली नाही. काट्याकुपाटीतून घासंत, दगडाधोंड्यावरून दणादण आदळंत गाडी उतरत होती. शेवटचा उपाय म्हणून मानकनं गेअर उतरवून गाडी बंद केली. तरीबीन गाडी दगडावर आदळली अन मानक सातआठ हात उडून बाजूच्या चिखलात जाउन पडलं.

---------------------

विचारंत विचारंत, दोनतीन चुकीच्याच गावाले जाउन आल्यावर दुपारी एक वाजता सुन्या पिंपळगावात जाऊन पोहचलं. पारावर मानक थंडागार होऊन शौचआसनस्थितीत बसला होता. आजुबाजुले हौशे गौशे नौशायचा बाजार भरला होता.
सुन्याची एम 80 गुमान उभी होती. तिचा एक आरसा फुटला होता.

मानक भेटल्यावर त्याले सनकन कानाखाली द्यायची सुन्याची इच्छा होती पण मानकचा मांजरीवानी केविलवाणा चेहरा पाहून त्यानं सगळा राग तात्पुरता गिळून टाकला. अतिशय संयमित आवाजात त्यो काही बोलणार तेवढ्यात त्याच्या खिशातला मोबाईल ढाण्या आवाजात बोंबलला. दहाव्यांदा आलेला हा फोन अर्थातच सासुरवाडीहून होता. सुन्यानं नाईलाजानं फोन उचलला.

“ तुम्ही कुठे मले खरंखरं सांगा.” बायकोचा दरडावण्याचा आवाज

“ले मोठी स्टोरी हाये नंतर सांगतो तुले.”

“मले कडुबा बोलला की तुम्ही पायठंच मंगरूळातून निघेल हाये.”

“हावो पण….”

“मग तुम्ही आजुन नायगावले कसंकाय आले नाही. कुठं वरली मटका खेळत तं नाही बसले नं.” आवाजाची पट्टी वाढली.

“अवं नाही महे माय.”

“मग कोणाच्या घरात घुसेल हाये खरंखरं सांगा.”

“पल्ले, महं डोकं आधीच सटकेल हाये, नंतर बोलतो तुह्याशी.”

“नंतर नाही आताच.”

“आइक तं मग. एका रांडेच्या घरात घुशेल हाये मी. काम झालं की येतो खुश??”

त्यानं फोन बंद केला अन स्विच ऑफ करून खिशात कोंबला..
मागं वळत नाही त एक धोतरफेट्यावाला माणूस पळतच समोर आला. हा सुन्याचा चुलत चुलत मामा होता.

“रामराम जावई.”
प्रत्येक मामा म्हणजे मानलेला सासरा हा नियम पाळला गेला.

“रामराम मामा. तुमच्याच घरी येणार होतो पहा आता.”

“कोणत्या का कारणानं का होईना तू आमच्या गावात आला, आनंद झाला.”

“हावो आनंद तं मलेबीन ले झाला.” सुन्या चेहऱ्यावर उसनं हासू आणंत बोलला.

“चाला मग घरी जेवायले. मानकशेटले बीन घ्या सोबत. मस्त धोंडे खाऊ घालतो तुम्हाले.”

सकाळपासून उपाशी आसल्यानं सुन्याले रट्टावून भूक लागलेलीच होती. धोंड्याचं नाव काढताच त्याचे डोळे आनंदानं चकाकले.

“अहो राहूद्या मामा. मी जेउन येल हाये.”

“डबल जेवायचं. भाच्याले तसं जाऊ देणार नाही आपण.”

मग जास्त आढेवेढे न घेता सुन्या अन मानक मनातल्या मनात उड्या मारत मामाच्या मागं निघले.

-------------

'मानक बुढ्याले गाडी बंद करता आली नाही म्हणून ते गाडी पळवंत पिंपळगाव पर्यंत गेलं. तिथं गांडीवर आपटलं तव्हा गाडी थांबली'
आशी बातमी सगळीकडं पोहचली. अवघ्या दोन चार तासांत मानक मंगरूळ ते पिंपळगाव या चाळीस किलोमीटरच्या पट्ट्यात फेमस झाला. त्यानंतर बरेच दिवस मानकशेटचा विषय निघला की सगळेजण फिदीफिदी हासायचे, लहान लेकरं रडायचं थांबायचे.

----------------

रपेटीच्या रात्री:

मानकशेटनं उधारीची वही बाहेर काढली. पिंपळगावच्या सदा पाटोळेच्या नावासमोर १०० रुपये उधारी मांडली होती ती त्यानं खोडली. गेल्या वर्षभरापासून सदा काही मंगरूळात आला नव्हता अन पिंपळगावले जाउन यायचं म्हटल्यावर सत्तर रुपये जायचे म्हणून ते शंभर रुपये आजुन वसूल झाले नव्हते. पण मानकच्या आजच्या कर्तबगारीमुळं फक्त दोन रुपये खर्च करून ( दोन रूपयाची अंबीहळद उगळून त्याले सुजलेल्या बुडावर लावणं पडली.) त्यानं १०० रुपये मिळवले होते. तेपण मानकची हालत पाहून सदानं स्वतःहून ते पैसे आणून देले होते. शिवाय फुकाचं जेवणबीन भेटलं होतं. मानकचा प्लॅन सक्सेसफुल्ल झाला होता. त्यानं आपल्या कोपरीच्या खिशात हात टाकला. शंभरच्या करकरीत नोटेचा स्पर्श सुखावणारा होता.

“येड्या भोकाचे लोकं कुणीकडचे. ज्यानं बारा गावचं पाणी पेल हाये त्याले एक गाडी बंद करता येणार नाही का!!” असं म्हणून त्यो हजारो लोकायवर खदखदून हासला.

------------------------------------------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुढील गोष्टीसाठी शुभेच्छा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनःपूतम समाचरेत्|

म‌स्त‌ये. ह‌ह‌पुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा.. एक‌द‌म‌ खंग्रीये..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

छान‌!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ज‌ब‌ऱ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

थेँक्स Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स

भारीच‌ झालीये गोष्ट!

नेहमीच्या सवयीनं त्यानं गेअर टाकायले डावं मनगट फिरवलं. पण ही एम 80 नव्हती. गेअर पडायच्या ऐवजी जोरात अॅक्सलेटर पिळल्या गेला.

एक‌ श‌ंका: एमेटी न‌स‌ली त‌री कोण‌त्याही गाडीच्या डाव्या मुठीत‌ अॅक्स‌ल‌रेट‌र‌ क‌सा असेल‌?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेफ्ट हॅंड ड्राइव्ह‌ असेल आबा. स‌म‌जुन घ्याना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर. गडबडीत तसं टन्कल्या गेलं. सुधारणा केली आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स

इर‌साल‌, मिरास‌दारी क‌थेची आठ‌व‌ण झाली. छान ज‌म‌लीये भ‌ट्टी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा म‌स्त‌ आहे क‌था. फार‌ ह‌स‌ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै हसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा! हा! हा! अगदी खरंय! द. मा. आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0