'द केस फॉर क्राईस्ट' आणि 'नमस्ते लंडन'

काल एका धार्मिक, अकाउंटंट आणि मला सहन करणाऱ्या मैत्रिणीखातर 'केस फॉर क्राईस्ट' नावाचा सिनेमा बघितला. सिनेमाची कथा अशी काहीशी (कंसातल्या कॉमेंट्स माझ्या)-
एक नास्तिक पत्रकार असतो. (हा अतिशय असंवेदनशील, उद्दाम आणि आपल्याला फार काही समजत नाही, हे ही न समजणारा इसम असतो.) हॉटेलात जेवताना त्यांच्या मुलीच्या घशात गोळी अडकते. ती काढणारी बाई धार्मिक असते, म्हणून त्याची बायको अचानक धार्मिक बनायचं ठरवते. त्यामुळे पत्रकार अस्वस्थ होतो. (त्याला स्वतःच्या नास्तिक्याबद्दल काहीही खात्री नसते आणि धर्म, धार्मिकांची भीती वाटत असते. आपली बायको आणि पर्यायानं मुलगीही धार्मिक झाल्या तर जगाचा अंत होईल, अशासारखा तो पिसाळतो. मुळातच बुद्धी कमी, अनुभवही नगण्य आणि त्यात जगात (अमेरिकेतही) अब्राहमिक धर्म सोडून इतर धर्म, रूढी, परंपरा, संस्कृती आहेत; याबद्दल कसलीही माहिती न घेता 'संशोधन' सुरू करतो.) धर्मगुरू, माजी पुरातत्वशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, डॉक्टर वगैरे लोकांना भेटतो. मानसशास्त्रज्ञ त्याला म्हणते की, ५०० लोकांना पुनर्जन्म झालेला ख्रिस्त दिसला, म्हणजे ते खरंच असणार. कारण ५०० लोकांना एकदम भास होणं, हा पुनर्जन्मापेक्षा मोठा चमत्कारच आहे. (सिनेमा १९८० सालात घडतो, त्यामुळे लाखो लोकांना गणपतीच्या दूध पिण्याचा हिस्टेरिया होणं, या गोष्टीकडे त्यांना सहज दुर्लक्ष करता येतं.)

मग भाई संशोधन आणि बायकोचं धार्मिक होणं यांच्या तणावाच्या नावाखाली रोज रात्री दारू पिऊन कागदं वाचत, लिहीत राहतो. बायकोशी आणि लहान मुलीशीही असंवेदनशीलपणे वागतो. एका शुभ दिवशी बायकोच्या प्रेमामुळे, देवाचंही आपल्यावर प्रेम आहे, हे तो मान्य करतो. आणि मग पत्रकाराचा धर्मगुरू बनतो.

सिनेमा संपतो.

मैत्रिणीनं मला मोठ्या आशेनं विचारलं, "मग, कसा वाटला सिनेमा?"

मी : खूप शब्दबंबाळ आहे. 'बघा तुमचं मतपरिवर्तन केलं नाही तर बापाचं नाव लावणार नाही', छापाची रिकामचोट मर्दानगी ठासून भरलेली आहे. म्हणजे पाहा, तो पत्रकार जेव्हा ठरवतो की, आता याचा छडा लावणारच; तेव्हा बाह्या सरसावण्याची काय गरज आहे! मी फार विचार करायला लागते तेव्हा नखं कुरतडते, कोणी केसांची चाळे करतात, कोणी पेन्सिल तोंडात खुपसतात. खड्डे खणणारे लोक बाह्या सरसावतात...

मैत्रीण : पण एवढं संशोधन करून त्याचा देवावर विश्वास बसतो, ते त्याच्या बायकोला लगेच समजलेलं असतं.

मी : कारण त्या दोघांना बदलण्याची इच्छा असते. मला देवाची गरज नाही. ज्यांना देव आहे हे मान्य करायचं असतं, त्यांचा चमत्कारांवर सहज विश्वास बसतो. ज्यांना मान्य करायचं नसतं ते अजिबात मान्य करत नाहीत.

मैत्रीण : असं थोडीच होतं!

मी : हो तर! मला बरेच लोक म्हणतात की मी माझ्या भावासारखी दिसते. मला ते मान्य करायचं नसतं, मी मान्य करत नाही. मात्र, मी अगदी माझ्या आईसारखी दिसते हे मी आपण होऊनच लोकांना सांगते. कारण मला ते मान्य करायचं आहे. देवावर विश्वासही असाच असतो. विश्वास नसणं थोडं निराळं असतं.

मैत्रीण : म्हणजे कसं?

मी : 'ही माझी आई आहे' किंवा 'आईच्या कुशीत मला छान वाटतं' अशा गोष्टी शब्दांशिवायच लहान पोरांनाही समजतात. देव ही संकल्पना शिकवावी लागते. जर ही संकल्पना शिकवलीच नाही, तर मनुष्य आपसूकच देव मानणार नाही. तसं पाहा, उत्क्रांती किंवा महास्फोटाचा सिद्धांत, या गोष्टींवर तुझा विश्वास नाही हे मला माहीत्ये. पण महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये काय अडचण आहे, हे मी तुला अधिक चांगलं सांगू शकते. तरीही माझा महास्फोट झाला, यावर विश्वास आहे.

तुझी देवावर असणारी श्रद्धा प्रामाणिक आहे, हे मला समजतं. माझी विज्ञानावर असणारी श्रद्धा तेवढीच प्रामाणिक आहे. मला तुझा प्रामाणिकपणा समजतो; मला तो आत्मसात करायचा नाही, पण समजतो. मला तुझ्या धार्मिकतेची भीती वाटत नाही; माझ्या अधार्मिकपणात काही चूक आहे असंही मला वाटत नाही. तुला माझा प्रामाणिकपणा पटत नाही; माझ्या अधार्मिकतेची तुला भीती वाटते का, हे मला माहीत नाही.

मैत्रीण : (एकीकडे बिस्किटाचा तुकडा तोंडात टाकत) पण लोक चुकीच्या रस्त्याला लागत असतील तर...

मी : चूक काय हे कोण ठरवणार? तू कितीही तलवार फिरवलीस तरी माझा आक्षेप नाही. माझं नाक सुरू होतं, तिथे तुझा, किंवा कोणाचाही तलवार फिरवण्याचा हक्क संपतो. आता हेच पाहा, थोड्या वेळापूर्वी तू मला म्हणालीस की तुला वजन कमी करायचं आहे. तुला ग्लूटन सेन्सिटिव्हिटी आहे. पण तरीही तू आत्ता, माझ्यासमोर बसून ग्लूटन असलेला कीश खाल्लास; साखर भरलेलं बिस्किट खाल्लंस. हे सगळं विकत घेत असताना मी आडून आडून तुझ्या आहाराची चौकशीही केली. आणि बिस्किटाचा उल्लेख सरळच 'विष' असा केला. तरीही तू ते विकत घेतलंस. मी काही आक्षेप घेतला का? मी एवढंच म्हटलं, "त्या बिस्किटातली भरमसाट साखर मला विषसमान वाटते. मी ते खाणार नाही."

तर माझ्या दृष्टीनं तुझं वर्तन चूक आहे. पण तू ते बिस्किट माझ्यावर लादत नाहीयेस. आणि मला ग्लूटनचा काहीही त्रास नाही. मी ग्लूटन खाऊ नये, असंही तू मला सांगत नाहीस. तर मग चालू दे. तुझ्यासाठी चूक काय आणि बरोबर काय हे ठरवणारी मी कोण? आपण आपापल्या रेघोट्या वाळूत ओढतो आणि तीच काय ती योग्य सीमारेखा, म्हणत राहतो.

मैत्रीण : पण देवाशिवाय नैतिकता कोण शिकवणार? म्हणून ख्रिस्ताची गरज वाटते.

मी : मी परवा दुसरा सिनेमा पळवत बघितला. 'नमस्ते लंडन'. त्यात एक डायलॉग आहे, तो मला तिथे बटबटीत वाटला, सिनेमात शोभून दिसला तरीही. त्यात तो म्हणतो, "आमच्या संस्कृतीत सगळ्यांना हात जोडून नमस्कार करतात. कारण प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश असतो, असं आम्ही म्हणतो." मी धार्मिक होते तेव्हाही ख्रिश्चन नव्हते, मी हिंदू होते. तर त्या हिशोबात माझ्यासाठी तू पुरेशी आहेस. आणखी निराळा देव कशाला हवा ....

तशा कॅफेत बसून जेवताना बऱ्याच गप्पा झाल्या. दोघींनाही तहान लागली म्हणून आम्ही पेय आणायला आत गेलो. आत जाताना ती तिची पर्स घेऊन गेली. मी तिला चिडवलंच, "इथे कोण तुझी पर्स चोरणार, असं मी म्हणत नाही. पण माणसांमध्ये असलेल्या ईश्वरावर माझा विश्वास आहे, म्हणून मी इथे माझी पर्स असती तर ठेवून दिली असती."

तर त्यापुढेही आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. महिन्यातून एकदा भेटलंच पाहिजे, यावर आमचं नेहमीप्रमाणे एकमत झालं. तिनं मला घरी सोडलं आणि ती गेली. घरी परत आल्यावर बरा अर्धा म्हणे, "You two are thick as thieves. सिनेमा दोन तासांचा आणि त्यावर तुमच्या गप्पा चार तास चालतात." मी हसले. "तुला कोणी धार्मिक मित्र नाहीत म्हणून माझ्यावर जळू नकोस," अशी काडी सोडली. त्यानं माझ्या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केलं.

आज सकाळी मात्र सव्वातीन वाक्यांचा वाद घातल्यावर बरा अर्धा आणि माझं एकमत झालं. (होतात हो अशा चुका!) मुद्दा हा की, मी हिंदू होते त्याची नास्तिक झाले, याचं कारण माझं मतपरिवर्तन कोणी इतरांनी केलं नाही; मीच माझं मतपरिवर्तन केलं. माझ्याशी चर्चा करणारा तो मित्र निमित्तमात्र होता.

मी मैत्रिणीला 'आंखो देखी' दाखवण्याच्या विचारात आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ती मैत्रीण तुमच्याच विचारांचीच असती तर किती तास गप्पा झाल्या असत्या?
ही एक गम्मत सुचली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

सहा तास. कारण त्यांनी सिनेमा बघण्यात दोन तास घालवले नसते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

अंक‌ग‌णित ब‌रीक चांग‌ले आहे हो तुम‌चे! रॅंग्ल‌र‌ म्ह‌णून नाव काढाल‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक वैयक्तिक विचारू का ?

"तुझी देवावर असणारी श्रद्धा प्रामाणिक आहे, हे मला समजतं. माझी विज्ञानावर असणारी श्रद्धा तेवढीच प्रामाणिक आहे. मला तुझा प्रामाणिकपणा समजतो; मला तो आत्मसात करायचा नाही, पण समजतो. मला तुझ्या धार्मिकतेची भीती वाटत नाही " किंवा
" तू कितीही तलवार फिरवलीस तरी माझा आक्षेप नाही. माझं नाक सुरू होतं, तिथे तुझा, किंवा कोणाचाही तलवार फिरवण्याचा हक्क संपतो. "

हे बोलताना बऱ्याच लोकांचा (माझ्यासकट ) एक मॉरल , रॅशनल आणि लिबरल हाय पोझिशन घेतोय असे वाटल्याने का माहित नाही , पण टोन उंच आणि धारदार होतो . त्यामुळे समोरचा माणूस स्वतःची पोझिशन अजून घट्ट धरून बसतो आणि ते चर्चेला काउंटर प्रॉडक्टिव्ह ठरते असा स्वानुभव . तुमचे तसे होते का ? असे विनम्रपणे विचारतोय .

अवांतर : माझी विज्ञानावर असणारी श्रद्धा तेवढीच प्रामाणिक आहे. : ये क्या हय ? श्रध्दा ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा, एक‌द‌म‌ नेम‌के.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन , मला वाटते कि मी उल्लेखिलेला गुणधर्म /दोष ( आपल्या चवीनुसार घ्या ) कट्टर धर्मवादी ( हिंदू , इस्लाम , ख्रिश्चन आणि आणि बाबा लोक आणि त्यांचे अनुयायी ) तसेच पुरुषवादी /स्त्रीवादी , भांडवलवादी / समाजवादी या सर्वांमध्ये आढळत असावा .
हा गुण /दोष त्या कुठल्याही विचारसरणीचा स्पेसिफिक नसून माणसाच्या एखाद्या गोष्टीवर दृढ विश्वास असण्याचा असावा असे वैयक्तिक मत . ( हा दोष माझ्यात नक्कीच आहे बाकी कोणा कोणाच्यात आहे तो अंगुलीनिर्देश करू इच्छित नाही . )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू कितीही तलवार फिरवलीस तरी माझा आक्षेप नाही. माझं नाक सुरू होतं, तिथे तुझा, किंवा कोणाचाही तलवार फिरवण्याचा हक्क संपतो.

हे अशाच आणि अशाच श‌ब्दात लोकांना नाही सांगीत‌ल‌ं त‌र लोक‌ं (ब‌रीच‌शी) म‌ऊ दिस्ल‌ं म्ह‌णुन कोप‌राने ख‌णू लाग‌तात्. तअशा लोकांना म‌र्यादा घाल‌ण‌ं आव‌श्य‌क‌ अस‌त‌ं. तेव्हा हा प‌र‌ख‌ड‌प‌णा अदितीक‌डुन उच‌ल‌ण्यासार‌खा म‌ला वाट्तो.
.
प‌ण त्यामुळे स‌मोरील‌ म‌नुष्य‌ स्व‌त:च्या मुद्द्याला अधिक‌च क‌व‌टाळून ब‌स‌तो हे स‌त्य‌ आहे. अर्थात त्या व्य‌क्तीने अधिक‌ क‌व‌टाळून ब‌स‌ल्याने आप‌ल्या अंगाला क्षते प‌ड‌त‌ नाहीत‌च्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात‌च‌, त‌सेच‌ आहे. प‌ण विचार‌स‌र‌णीच्या नादात आंध‌ळे झालेल्यांना त्याचे काय होय‌!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अंगुलीनिर्देश करू इच्छित नाही ...
आपण बरेच लोकं यात येतो हा मुद्दा होता .
हा गुण /दोष कुंपणावरच्या लोकांमध्ये नसतो असे निरीक्षण .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>" तू कितीही तलवार फिरवलीस तरी माझा आक्षेप नाही. माझं नाक सुरू होतं, तिथे तुझा, किंवा कोणाचाही तलवार फिरवण्याचा हक्क संपतो. "
हे बोलताना बऱ्याच लोकांचा (माझ्यासकट ) एक मॉरल , रॅशनल आणि लिबरल हाय पोझिशन घेतोय असे वाटल्याने का माहित नाही , पण टोन उंच आणि धारदार होतो .<<

ह्यात हाय पोझिश‌न‌ क‌स‌ली? माझं नाक आहे तिथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी " हाय पोझिशन घेतोय असे वाटल्याने का माहित नाही " असा संदेह व्यक्त केला होता
"ह्यात हाय पोझिश‌न‌ क‌स‌ली? माझं नाक आहे तिथे." या आपल्या वाक्याने माझे शंका निरसन झाले . धन्यवाद .
आता त्या काय म्हणतात ते बघणे महत्वाचे .
लिहिलेले स्पष्ट आहे . मला वाटते कि त्यांना समजेल . त्या उत्तर देतील .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>या आपल्या वाक्याने माझे शंका निरसन झाले . धन्यवाद .<<

विनोद‌ क‌ळ‌ला नाही की काय!
हे पाहा :

nose in the air

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विनोद होता ? रोचक आहे .
नोज इन द एयर असे वाटले . चालायचेच . सामान्य समतावादी ट्रोलांना असे विनोद कळतील हि अपेक्षा अवास्तव असे वाटते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सामान्य समतावादी ट्रोलांना असे विनोद कळतील हि अपेक्षा अवास्तव असे वाटते .<<

Smile बाप‌ट चिड‌लात त‌र नाही? या एकदा ब‌सू आणि बोलू Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बसून किंवा उभे राहून बोलायला कधीही ना नाही . कधी ते बोला . Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा असा आहे की नास्तिक असो वा आस्तिक, जोपर्यंत आपले विचार आणि आचार दुसर्यावर लादत नाहीत तोपर्यंत काहीही फरक पडत नाही. स्वतःच्या डोक्यात आणि घरात काय हवा तो सावळागोंधळ घाला. जोपर्यंत दुसर्याला त्याचा त्रास होत नाही तोपर्यंत सगळंच छान आहे.

या 'जगा आणि जगू द्या' भूमिकेत काय आलीय हाय पोझीशन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरी गैरसमज होतोय इथे .
.... या 'जगा आणि जगू द्या' भूमिकेत काय आलीय हाय पोझीशन?...
आपण म्हणताय हे सर्व तर्कशुद्ध वगैरे आहे .
प्रश्न समोरासमोर बसून चर्चा करतेवेळी होणाऱ्या एक्सप्रेशन चा आहे व मी त्याबद्दलचे माझे निरीक्षण व त्याचा परिणाम लिहिला आहे व ताईंना त्यांचे निरीक्षण काय हा प्रश्न विचारला आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्र‌श्न‌ असा आहे, की लाद‌णे म्ह‌ण‌जे न‌क्की काय‌, नि त्रास‌ होतो किंवा नाही (किंवा क‌शाचा त्रास‌ होतो), हे न‌क्की कोणी आणि क‌शाच्या आधाराव‌र ठ‌र‌वाय‌चे? त्याचे ष्ट्याण्ड‌र्ड‌ काय‌, नि ते न‌क्की कोण एष्ट्याब्लिश क‌र‌णार‌ (नि एन्फोर्स‌ क‌र‌णार‌)?

स्वतःच्या डोक्यात आणि घरात काय हवा तो सावळागोंधळ घाला.

म्ह‌ण‌जे? फ‌क्त‌ क्लॉझेटेड नास्तिक‌ (किंवा आस्तिक‌) राहाय‌चे काय‌?

नि घ‌ट‌नेने दिलेल्या " freedom of conscience and the right to freely profess, practice, and propagate religion"चे काय? ते कोठे नेऊन घालाय‌चे?

की घ‌ट‌ना ही शेक्स‌पिय‌र‌सार‌खी आहे? Sounds great, but does not mean a thing?

आणि दुस‌री गोष्ट‌ - तुम्ही मारे फ‌त‌वा काढ‌लात‌, की 'स्व‌त:च्या डोक्यात नि घ‌रात‌ काय‌ ह‌वा तो साव‌ळागोंध‌ळ घाला; जोव‌र‌ दुस‌ऱ्याव‌र‌ लाद‌त‌ नाही नि दुस‌ऱ्याला त्रास‌ होत नाही, तोव‌र‌ ठीक‌च‌ आहे' म्ह‌णून‌. नि तुम‌चे ऐकून‌ मी माझ्या घ‌रात‌ बीफ‌ शिज‌व‌ले नि खाल्ले. दुस‌ऱ्याला जाऊन‌ दिले नाही, दुस‌ऱ्याव‌र‌ लाद‌ले नाही किंवा इत‌रांनी खाल्लेच‌ पाहिजे म्ह‌णून‌ स‌क्ती केली नाही. म‌ला उड‌व‌ले जाणार‌ नाही याची ह‌मी तुम्ही देऊ श‌क‌ताय‌ काय‌? न‌स‌ल्यास‌ तुम‌च्या फ‌त‌व्याला 'फुकाची हाय‌ पोझीश‌न‌' याव्य‌तिरिक्त‌ काय‌ किंम‌त‌ आहे?

(अतिअवांत‌र‌ प्र‌श्न: उज‌वे - ज‌गात‌ कोठेही - स‌त्तेत‌ आले, त‌र‌ स‌र्व‌प्र‌थ‌म‌ घ‌ट‌नेची र‌द्दी/ढुंग‌ण‌काग‌द‌ का क‌र‌तात‌?)

..........

यात कोठेही स्प‌ष्ट‌प‌णे (किंवा अस्प‌ष्ट‌प‌णे) म्ह‌ट‌लेले न‌स‌ले, त‌री religionम‌ध्ये or lack thereof हे अंत‌र्भूत‌ आहे, असे सोयिस्क‌र‌रीत्या गृहीत ध‌र‌तो. (गेला बाजार‌ वादाच्या सोयीसाठी.)

माझ्या डोक्यात‌ काय‌ ह‌वा तो साव‌ळागोंध‌ळ घालाय‌ला म‌ला त‌शीही प‌र‌वान‌गी किंवा फ‌त‌व्याचा आधार‌ लाग‌त नाही. दुस‌ऱ्याला टेलेप‌थी अस‌ल्याखेरीज‌ माझ्या डोक्यात‌ला साव‌ळागोंध‌ळ त्याच्या/तिच्याप‌र्य‌ंत‌ पोहोच‌ण्याची सुत‌राम श‌क्य‌ता नाही. तेव्हा माझ्या म‌नात‌ल्या साव‌ळ्यागोंध‌ळाचे सोडून‌च‌ देऊ. प्र‌श्न‌ तेव्हा उद्भ‌व‌तो, जेव्हा मी (खाज‌ क‌रून‌) तो (माझ्या डोक्यात‌ला) साव‌ळागोंध‌ळ‌ (माझ्या डोक्यापुर‌ताच न‌ ठेव‌ता) दुस‌ऱ्याला सांगाय‌ला जातो तेव्हा. दुर्दैवाने घ‌ट‌नेने म‌ला तोही अधिकार‌ देऊन‌ गोची क‌रून ठेव‌लेली आहे. प‌ण‌ तेही सोडून‌ देऊ. 'घ‌ट‌नाकारांनी नेम‌के ज्या क‌शाचे सेव‌न‌ क‌रून घ‌ट‌नेत हासुद्धा अधिकार‌ घात‌ला, ते म‌ला (सेव‌न‌ क‌राय‌ला) का ब‌रे मिळ‌त‌ नाही? ते म‌लासुद्धा मिळाय‌ला ह‌वे, नि आत्ताच्या आत्ता!' असा घ‌ट‌नाकारांचा म‌त्स‌र‌ अधिक‌ ह‌ट्ट‌ क‌रून तूर्तास‌ तो मुद्दा सोडून‌ देऊ, नि तूर्तास‌ फ‌क्त‌ माझ्या घ‌रात‌ल्या साव‌ळ्यागोंध‌ळाब‌द्द‌ल‌ बोलू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उजवे- घटनेचा ढुंगण कागद निरीक्षण आणि उपमा आवडली .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नि सामान्य (किंब‌हुना अतिसामान्य) आहे.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपलं म्हणणं मांडणं आणि कोणाला सातत्याने विचारांचा मारा करून बदलण्याचा प्रयत्न करणं यात फरक आहे. 'धन्यवाद, तुझं म्हणणं ऐकलं, पण मला माझे विचार बदलायचे नाहीयेत.' असं सांगितल्यानंतरही प्रयत्न चालू रागिले तर त्या दोहोंतली मर्यादा ओलांडली जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे बोलताना बऱ्याच लोकांचा (माझ्यासकट ) एक मॉरल , रॅशनल आणि लिबरल हाय पोझिशन घेतोय असे वाटल्याने का माहित नाही , पण टोन उंच आणि धारदार होतो

टोन बदलतो, हे खरंच आहे. पण तुम्ही निवडलेल्या वाक्यात मी स्नॉबरी केली असं मला वाटत नाही. आम्ही जेवण विकत घेत असताना तिनं बिस्किट विकत घेतलं. मलाही विचारलं. मी म्हटलं, "पैसे खर्च करून त्यातलं साखर नावाचं विष विकत घेऊ मी!" ती हसली. आणि स्वतःपुरतंच गोड बिस्किट विकत घेतलं. यात थोडं काँडिसेन्शन जरूर होतं, आणि नेहमी असतं. त्याचा धर्माशी संबंध नाही.

त्यामुळे जेव्हा ती म्हणाली, "लोक चुका करत असतील तर त्यांना थांबवलं पाहिजे, असं तुला वाटत नाही का?" तेव्हा मी जोराऽत हसले, आणि तिला म्हटलं, "पण मी तुला नाही थांबवलं. कारण तू सज्ञान आणि हुशार व्यक्ती आहेस, हे मला दिसतंय. तुझं आयुष्य, तुझे निर्णय. मी फारतर तुला आठवण करून देईन. व्हॅलरी, नक्की खायचंय का तुला हे?"

मी लिबरल पोझिशन घेतेच. तिच्याबरोबर २४ डिसेंबरला चर्चात जाऊन आले. (तिथेही बिस्किट होतं, फुकट; खाल्लं नाही.) तिनं हा सिनेमा बघायचा सुचवल्यावर, सिनेमा काय असणार हे माहीत असूनही, सिनेमा बोगस वाटणार याचा अंदाज असूनही गेले. मी तिला ओढून नेलं ते फार्मर्स मार्केटात; चांगल्या गोष्टी खायला घालायला. एकदा घरी बोलावून जेवायला घातलं. मी आपण होऊन, कधीही उत्क्रांती आणि महास्फोट हे अबैबलीय विषय काढत नाही.

अनोळखी लोकांशी देवाधर्माबद्दल वाद घालायचा मला आता आळस येतो. पण ही मैत्रीण म्हणावी एवढी जवळची वाटते. तिच्याबरोबर वेळ घालवायचा म्हणून सिनेमा हे निमित्त होतं. 'मी फार स्नॉब आहे', असं एकदा म्हटलं तर ती तिचा नवराही कसा स्नॉब आहे याबद्दल बोलायला लागली. थोडक्यात तिथेही मत्तं जुळतात.

लिबरल पोझिशन ही उच्च नैतिक भूमिका आहे, असं मला वाटतं. म्हणूनही मी उदारमतवादी बनायचा प्रयत्न करते. मैत्रिणीनं मला विचारलं होतं, "तू देव का मानत नाहीस?" त्यावर मी म्हटलं होतं, "एके काळी याचं बरंच भडक उत्तर मिळालं असतं. पण आता 'मला गरज नाही म्हणून मी देव मानत नाही', एवढं सोपं उत्तर आहे. पाऊस नसेल तर सोबत छत्री वागवत नाही, तसंच. कधी कधी वाटतं की कठीण काळात देव मानत असते तर आयुष्य सुकर झालं असतं. पण ते बौद्धिक पातळीवर झेपत नाही. तडजोड करताच येत नाही, त्यामुळे तो पर्यायच माझ्यासमोर नाही. ज्यांना ते जमतं, त्यांचं आयुष्य बहुदा अधिक सुखाचं होत असेल."

उदारमतवादात माझा स्वार्थ अर्थातच आहे. देव न मानणारे लोक अनैतिक नसण्याची शक्यता असते; देव न मानणारे लोक टाकाऊ नसतात; ते मैत्री करण्यालायकही असू शकतात; हे तिला पटवून देणं ही माझी व्यक्तिगत आणि राजकीय गरज आहे.

तसं बिस्किटातल्या साखरेचं नाही. लोकांनी कितीही साखर खाल्ली तरी मला फरक पडत नाही; म्हणून करते स्नॉबरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्हाला नेमका प्रश्न समजला . प्रतिसाद आवडला . तुम्ही स्नोबरी केलीत असे माझे म्हणणे अजिबात नाही . एक्सप्रेशन बद्दल बोलत होतो . धन्यवाद .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही स्नोबरी केलीत असे माझे म्हणणे अजिबात नाही

हा माझा अपमान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता प्रतिसाद क्रमांक दोन : आपल्या प्रतिसादावरून आपले आचारविचार अतिशय अभिनिवेश रहित आणि संयत आहेत असे प्रतीत होत आहे . चांगलं आहे . मराठी मध्यम वर्गीयांचे हे तर वैशिष्ट्य आहे . म्हणूनच देशातील आरक्षणाला कंटाळून ते जरी परदेशी गेले तरी तिथे आपल्या संस्कृती , नीतिमूल्ये आणि आचरणाने परदेशस्थ व्यक्तींमध्ये लोकप्रिय होतात आणि त्यांची मने जिंकतात . तेवढा एक विज्ञाना वरच्या आपल्या श्रद्धे बद्दल खुलासा केलात की आजचे शंकानिरसन होईल . धन्यवाद .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञानावर असलेली श्रद्धा ती अशी की सगळ्या विषयांतलं सगळं विज्ञान मला समजत नाही. पण उदाहरणार्थ, 'मोठमोठी देवळं/चर्चेस देवाच्या भक्तीपोटीच तर बांधली ना भक्तांनी!', असं कोणी म्हटलं की त्यात मूलभूत मानवी स्वभाव हे खरं कारण आहे आणि देव हा प्लेसहोल्डर आहे, किंवा बोलणाऱ्यांना तपशील माहीत नाहीत, असं मला वाटतं. ही माझी मानसशास्त्रावरची श्रद्धा आहे, कारण माझा मानसशास्त्राचा अभ्यास नाही.

तसंच, महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये अडचणी आहेत, हे मला माहीत आहे. पण मी तो सिद्धांत मानते, त्यावर माझी श्रद्धा आहे. 'महास्फोटाच्या आधी' असं काही फॅलसी आहे, पण मग वस्तुमान किंवा उर्जा आले कुठून, अशासारखे प्रश्न मी सोडून देते. जसं 'देवाला कोणी बनवलं' हा प्रश्न आस्तिक लोक सोडून देतात. किंबहुना, मी असल्या मेटाफिजिकल वाटणाऱ्या प्रश्नांच्या वाटेलाच जात नाही. जे समोर दिसतंय, त्याचा अभ्यास करून समजून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत; असं मी स्वतःला सांगते.

त्यातून, ज्या लोकांना 'ही वीट आहे', अशा छापाचं 'सत्य' तेवढंच समजतं, त्या लोकांशी सत्य, तथ्य, ग्राह्य यांतल्या सूक्ष्म फरकांबद्दल वाद घालत बसण्यापेक्षा 'मी तुझ्या श्रद्धेच्या आड येत नाही, तू माझ्या श्रद्धेच्या आड येऊ नकोस' हे म्हणत एकीकडे दारू पिणं सोपं असतं. विशेषतः व्यक्तिगत संबंध बिघडवायचे नसतात तेव्हा. (निळोबांशी वाद घालताना मी चिकार काडेचिराईतपणा करेन, कारण निळोबांना असा प्रकार मानवतो.)

त्या सिनेमामध्ये अगदीच काही नव्हतं असं नाही. एखादी व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची असेल, त्यांच्यासाठी देव-धर्म महत्त्वाचा असेल आणि तुमच्यासाठी नसेल, तर काय कराल; असा व्यवहार्य प्रश्न विचारला (आणि सोप्पीशी, गोडशी उत्तरुली दिलेली) आहे. (या विषयावरची, माझ्या दृष्टीनं चांगली कथा, नवरा-बायकोंना नास्तिक-आस्तिक ठेवेल आणि विचार न बदलताही त्यांचे बिघडलेले संबंध ते कसे सुधारतात, याबद्दल असेल.) माझ्यासाठी देव-धर्म महत्त्वाचे नाहीतच, पण व्यक्ती महत्त्वाची आहे. तर मग 'तुझी श्रद्धा देवाच्या अस्तित्वावर आहे; माझी अस्तित्व नसण्यावर आहे. एकमेकांच्या श्रद्धा दुखावून काय मिळणार', असं म्हणणं हा माझा व्यवहारी डँबिसपणा आहे.

अमेरिकेत माझं धर्माशी फार भांडण नाही. (कारण इथे नातेवाईक आणि भारतीय शेजारी नाहीत.) पण 'प्लॅन्ड पेरेंटहुड', गर्भपात, शाळेत क्रिएशनिझम शिकवणं वगैरे गोष्टी येतात तेव्हा धर्म आड येतो. त्यातून सध्याची मोदी, ब्रेक्झिट, ट्रंपुली अशी लाट पाहता आणि एकंदरच राजकारण्यांचा आवडता धंदा - समाजामध्ये फूट पाडणं - मला भांडाभांडीच्या वाटेला जाणं पटत नाही. पण गोड माणसांशी गप्पा मारताना त्यांच्या कोशातले, त्यांचे लाडके शब्द वापरले तरीही 'माझ्या नाकाशी तुझं तलवार फिरवण्याचं स्वातंत्र्य संपतं', हे मी जाता-जाता का होईना, सांगून ठेवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'केस फॉर क्राईस्ट' नावाचा सिनेमा बघितला.

बरा रिकामटेकडेपणा जमतो ब्वॉ तुम्हा लोकांना! आणि त्या टेक्सासात जिकडे तिकडे क्राईस्टचा सुळसुळात असताना अजून कशाला केसेस हव्यात हो!

बाकी, तुमच्या मैत्रिणीला 'लाईफ ऑफ ब्रायन' दाखवा त्यापेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बाकी, तुमच्या मैत्रिणीला 'लाईफ ऑफ ब्रायन' दाखवा त्यापेक्षा.

ह‌जार‌बार स‌ह‌म‌त‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी तिला 'चुकून', मोठ्या हौसेनं 'ब्लॅक मिरर' बघायला सांगितलं. पहिला भाग बघूनच ती घाबरली. आता कधीतरी मनधरणी करून पुढचे भाग बघायला सांगणार आहे.

पण नाही, 'लाईफ ऑफ ब्रायन'चं ट्रोलिंग मी तिच्याशी करणार नाही. म्हणूनच मला 'आंखो देखी' आठवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म‌राठी "देऊळ‌ बंद‌ " आठ‌व‌ला. -- https://www.youtube.com/watch?v=oxbnqzAS0K4
निदान‌ म‌ध्यंत‌रानंत‌र‌चा भाग‌ त‌री प‌हावा असं आव‌र्जून सुच‌व‌तो.
नास्तिकांचं जे म्ह‌ण्णं आहे असं क‌थालेखक‌ व‌गैरेंना वाटत‌ं ; ते त्यांनी चांग‌ल‌ं खोडून व‌गैरे काढ‌ल‌य‌.

नाय‌ल्याक‌डे दुर्ल‌क्ष‌ क‌रा आणि स्व‌त्: सिनेमा ( विशेष्ह‌त्: उत्त‌रार्ध‌ ) ब‌घा.
त‌र्क‌ क‌ठोर‌ मांड‌णीतून‌ तावून ल सुलाखून निघालेलं आस्तिक्य आहे ते.
उदा -- नास्तिक‌तेचा ख‌रा चेह‌रा देखाव‌लाय त्यात‌.
नास्तिक म्हंजे कोण ? स‌त‌त‌ चिड‌चिड क‌र‌णारे लोक‌ . "देव आहे, आणी तो खुप खुप वाईट्ट आहे" असा क‌ट्ट‌र‌ विश्वास‌ अस‌णारे लोक. ज‌रुर प‌हावा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

नास्तिक‌निर्दाल‌क‌ अजो१२३ याब‌द्द‌ल काय बोलेल हे पाह‌णे रोच‌क‌ ठ‌रावे. अजो, हो जा शुरू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अत्यंत भिकार सिनेमा आहे तो. कोणीही पाहू नका अन वेळ वाचवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ह्या बाब‌तित स‌ह‌म‌त्. मी त‌र न‌ ब‌घ‌ता प‌ण सांगु श‌क‌ते तो सिनेमा भिकार‌ अस‌णार म्ह‌णुन्.
फाल्तु विष‌य, सुमार लेख‌क, सुमार दिग्द‌र्श‌क्. ह्या स‌ग‌ळ्यातुन काही चांग‌ले निघ‌णे श‌क्य‌च नाही. बाहुब‌ली प‌र‌व‌ड‌ला त्यापेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी खरं तर तिला 'बाहुबली' दाखवण्याचाही विचार करत होते; तिच्यामुळे 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' बघितल्याचा बदला म्हणून. पण तिचा बदला घ्यायचा तर मलाही तो सिनेमा बघायला लागेल; या भीतीपोटी 'बाहुबली' आणि बदल्याचा विचार डोक्यातून दूर सारला. तिचा बदला घ्यायचा तर मी तिला बहुतेक माझ्या हातचं आणखी एकदा जेवायला घालेन; मग फिट्टंफाट होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या आधी आप‌ण‌ लिहिल‌ं असेल‌ त‌र म्या ग‌रीबाने वाच‌ल‌ं नाही म्ह‌णून‌ विचार‌तो आहे -
तुम‌च्या म‌ते चांग‌ले दिग्द‌र्श‌क‌ आणि लेख‌क‌ कुठ‌ले आहेत‌?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नास्तिकांचं जे म्ह‌ण्णं आहे असं क‌थालेखक‌ व‌गैरेंना वाटत‌ं ; ते त्यांनी चांग‌ल‌ं खोडून व‌गैरे काढ‌ल‌य‌.

मी जो सिनेमा पाहिला, त्यातही त्यांनी त्यांना नास्तिकपणा म्हणजे जे काही वाटतं ते खोडून काढलंय. पण मी नाही त्यांतली! (मला तो इसम पुरेसा नास्तिकही वाटला नाही, पण त्याची मर्जी!) आपली बाजू आपल्याला हवी तशी ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला असतं, पण विरोधी बाजू कशी हे ठरवण्याचं स्वातंत्र्य घेता येतं, ते झेपतंच असं नाही. मठ्ठपणे (ट्रोलिंग करताना) सगळे हिंदू बाबू बजरंगी किंवा ख्रिश्चन हिटलर म्हटलेले चालतील का? मला चालणार नाही.

नास्तिक किंवा धार्मिक असा मोठा गट असतो त्याचं असं एकसाची प्रतिनिधित्व करता येत नाही. मला माझ्या मैत्रिणीची हिटलरशी तुलना करायची नाही. आणि साटल्यच बघायचं तर याच धाग्यावर किती तरी नास्तिक लिहीत आहेत, त्यांची आपापली नास्तिक्याची निराळी व्याख्या असेल. आम्हाला सगळ्यांना एका साच्यात बसवता येणार नाही. किंवा तो साचा बुरख्यासारखा 'सगळ्यांसाठी एकच माप' बनतो. त्यात सौंदर्य आणि सोय दोन्ही साधत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक सहज आपलं सुचवणी
तुमच्या लेखातील विषयाशी संबंधित वाटले म्हणून
द रुलींग क्लास
https://en.m.wikipedia.org/wiki/The_Ruling_Class_(film)

आणि इंगमार बर्गमान ची फेथ trilogy खास करुन
https://www.criterion.com/boxsets/89-a-film-trilogy-by-ingmar-bergman
जमल्यास जरुर पहा तुम्हाला आवडेल कदाचित असे वाटले म्हणून सुचवणी केवळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमे जमतील तसे, सवडीनं बघेन. (आणि जमेल तितपत राजू परुळेकरांचं लेखन टाळेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मतपरिवर्तन करावं लागणे याविषयी एक कथा वाचलेली आठवते. बय्राचदा काय होतं आपण तिह्राइत यावर कोरडी चर्चा करतो पण त्या प्रसंगात अडकलेली पात्र ह्रुदयावर दगड ठेवून तसे करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मतपरिवर्तन करावं लागणे याविषयी एक कथा वाचलेली आठवते. बय्राचदा काय होतं आपण तिह्राइत यावर कोरडी चर्चा करतो पण त्या प्रसंगात अडकलेली पात्र ह्रुदयावर दगड ठेवून तसे करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल एका धर्मलंड, गीकी आणि आगाऊ मैत्रिणीला वळणावर आणायचा एक आणखी प्रयत्न करायचा म्हणून तिला 'केस फॉर क्राईस्ट' नावाचा सिनेमा दाखवला. सिनेमाची कथा अशी काहीशी (कंसातल्या कॉमेंट्स माझ्या)-
एक नास्तिक पत्रकार असतो. (हा एकंदर ईश्वरी कृपेकडे पाठ फिरवलेला पण आत्म्यात चांगुलपणाची ज्योत तेवत असलेला इसम असतो.) हॉटेलात जेवताना त्यांच्या मुलीच्या घशात गोळी अडकते. ईश्वरी कृपेने देवदूताचा अवतार असलेली एक बाई ती गोळी काढते असते, म्हणून या नास्तिक माणसाच्या किमान बायकोला तरी ईश्वरी लीलेचा साक्षात्कार होतो. त्यामुळे पत्रकार अस्वस्थ होतो. (त्याला स्वतःच्या नास्तिक्याबद्दल काहीही खात्री नसते आणि धर्म, धार्मिकांची अकारण भीती वाटत असते. आपली बायको आणि पर्यायानं मुलगीही धार्मिक झाल्या तर जगाचा अंत होईल, अशासारखा तो पिसाळतो. मुळात श्रद्धेची बाजू कच्ची, पुण्यही नगण्य आणि पण या प्रसंगामुळे किमान दैवी प्रकाशाच्या मार्गाचं 'संशोधन' सुरू करतो.) धर्मगुरू, माजी पुरातत्वशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, डॉक्टर वगैरे लोकांना भेटतो. एक पुण्यवान मानसशास्त्रज्ञ त्याला ५०० लोकांना पुनर्जन्म देण्याच्या परमसत्यस्वरूप ख्रिस्तदर्शनाची कथा सांगते. (सिनेमा १९८० सालात घडतो, किमान धर्मलंड लोकांची सरशी होण्याचा हा भयंकर काळ यद्यपि सुरू झालेला नसतो.)
मग भाई संशोधन आणि बायकोचं धार्मिक होणं यांच्या तणावाच्या नावाखाली रोज रात्री ईश्वरी लीलेच्या जवळ जायचा ज्ञानमार्ग चोखाळतो. बायकोशी आणि लहान मुलीशीही अपरिहार्यपणे अंतर निर्माण होतं. एका शुभ दिवशी बायकोच्या प्रेमामुळे, देवाचंही आपल्यावर प्रेम आहे, हे तो मान्य करतो. आणि मग पत्रकाराचा धर्मगुरू बनतो. त्याच्या आयुष्यात दिव्य प्रकाश पसरतो.
सिनेमा संपतो.
मैत्रिणीला मी मोठ्या आशेनं विचारलं, "मग, कसा वाटला सिनेमा?"
मैत्रीण : खूप शब्दबंबाळ आहे. 'बघा तुमचं मतपरिवर्तन केलं नाही तर बापाचं नाव लावणार नाही', छापाची रिकामचोट मर्दानगी ठासून भरलेली आहे. म्हणजे पाहा, तो पत्रकार जेव्हा ठरवतो की, आता याचा छडा लावणारच; तेव्हा बाह्या सरसावण्याची काय गरज आहे! मी फार विचार करायला लागते तेव्हा नखं कुरतडते, कोणी केसांची चाळे करतात, कोणी पेन्सिल तोंडात खुपसतात. खड्डे खणणारे लोक बाह्या सरसावतात...
मी : पण एवढं संशोधन करून त्याचा देवावर विश्वास बसतो, ते त्याच्या बायकोला लगेच समजलेलं असतं. या शक्तीचा, लीलेचा अनुभव घ्यायला हवा.
मैत्रीण : ते बदलतात कारण त्या दोघांना बदलण्याची इच्छा असते. मला देवाची गरज नाही. ज्यांना देव आहे हे मान्य करायचं असतं, त्यांचा चमत्कारांवर सहज विश्वास बसतो. ज्यांना मान्य करायचं नसतं ते अजिबात मान्य करत नाहीत.
मी : ईश्वराची इच्छा नसली तर या जगात पानही इकडचं तिकडे थोडीच होतं!
मैत्रीण : हो तर! मला बरेच लोक म्हणतात की मी माझ्या भावासारखी दिसते. मला ते मान्य करायचं नसतं, मी मान्य करत नाही. मात्र, मी अगदी माझ्या आईसारखी दिसते हे मी आपण होऊनच लोकांना सांगते. कारण मला ते मान्य करायचं आहे. देवावर विश्वासही असाच असतो. विश्वास नसणं थोडं निराळं असतं.
मी : म्हणजे कसं?
मैत्रीण : ... कायतरी निरर्थक धर्मलंड बडबड ...
मी: (एकीकडे बिस्किटाचा तुकडा तोंडात टाकत) पण लोक चुकीच्या रस्त्याला लागत असतील तर...
मैत्रीण : .... पुन्हा कायतरी निरर्थक ऊर्मट बडबड. माझ्या बिस्कीटा वर घसरणं. ....

मी: (चुरा आवरत आणि चाटून पुसून खात) पण देवाशिवाय नैतिकता कोण शिकवणार? म्हणून ख्रिस्ताची गरज वाटते.
मैत्रीण : ....जाऊन द्या. मी धड ऐकलं नाही....
तर त्यापुढेही आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. महिन्यातून एकदा भेटलंच पाहिजे, यावर आमचं नेहमीप्रमाणे एकमत झालं. मी तिला घरी सोडलं आणि घरी आले. घरी परत आल्यावर हे म्हणाले, "You two are thick as thieves. सिनेमा दोन तासांचा आणि त्यावर तुमच्या गप्पा चार तास चालतात." मी हसले. "तुला कोणी धर्मलंड मित्र नाहीत - आणि त्यांना प्रकाशाचा रस्ता दाखवून पुण्य तुला मिळणाअर नाही - म्हणून माझ्यावर जळू नकोस," अशी काडी सोडली. त्यानं माझ्या श्रद्धेय ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केलं.
आज सकाळी मात्र सव्वातीन वाक्यांचा वाद घातल्यावर बरा अर्धा आणि माझं एकमत झालं. (ईश्वरी कृपेने हे अहर्निश होतं) मुद्दा हा की, मी अज्ञानी पापीण होते त्याची पुण्यवंत झाले, याचं कारण माझं स्वतःचं डोक चालवायचा मूर्खपणा मी कदापि केला नाही; पुण्यवान आत्म्यांनी सांगितलेल्या पवित्र मार्गावर चालले . माझं अस्तित्व हे ईश्वरी सत्तेच्या आविष्काराकरता एक निमित्तमात्र आहे,.
मी मैत्रिणीला ओल्ड आणि न्यू टेस्टामेंट संगीतात गाऊन म्हणून दाखवण्याच्या विचारात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मैत्रिणीने माझ्यासाठी infidel किंवा तत्सम शब्द वापरला, तर मी तिचा भर फार्मर्स मार्केटात मुका घेईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी कधी श्रद्धेच्या चर्चेत भाग घेत नाही किंवा विचारांची देवाणघेवाणही करत नाही. तसं करणं चुकीचं वाटतं. परंतू त्यांच्या श्रद्धास्थानात लुडबुड करणं टाळतो. खरंतर सर्वांना निरुत्तर करण्याची किल्ली कोणा अज्ञात ठिकाणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

परंतू त्यांच्या श्रद्धास्थानात लुडबुड करणं टाळतो.

__/\__ सेम हिय‌र्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

मांड‌णी आव‌ड‌ली आणि 'विज्ञानाव‌र‌ श्र‌द्धा' हे त‌र खूप‌च‌ आव‌ड‌ल‌ं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0