म‌हा(न‌) भार‌त‌

सन २०५१. नोव्हेंबरचा महिना.
भारताची अभूतपूर्व प्रगती करुन दाखवणाऱ्या महानेत्याचा सत्कार व प्रगट मुलाखत होती. वार्ताहरांचे थवे व्यासपीठाभोवती जमले होते. त्यांच्यामागे अफाट जनसागर पसरला होता. तो ट्रकने आणला नव्हता, तर उस्फूर्तपणे आला होता.
प्रारंभी दोन चार नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रमुख विरोधी नेत्यातर्फे महानेत्याला नोटांचा हार घालण्यात आला. महानेत्याने सत्काराचा स्वीकार केला आणि तो भाषण द्यायला उभा राहिला.
मित्रहो, तुमच्या प्रेमाने मला भरुन आले आहे. अल्पवर्षात या देशाची झालेली प्रगती पाहून मला देखील आश्चर्य वाटत आहे. पण या सर्वाचे श्रेय आमच्या गुरुंचे आहे. चाळीस वर्षांपूर्वी आपल्या देशात एक महाघोटाळा झाला होता तेंव्हा माझ्या आईला व मला हे राज्य चालवणे अशक्य वाटू लागले होते. आम्ही फार गोंधळलो होतो. आणीबाणी आणण्याची चूक आम्हाला करायची नव्हती. विरोधी पक्ष हटून बसले होते. माझी आई साधी! ती आमच्या घराण्याच्या गुरूंना शरण गेली. त्यावेळी गुरुंनी जी वाट दाखवली त्यामुळे आपल्याला हा आजचा दिवस दिसत आहे.
गुरुजी म्हणाले, वत्सा, दोन धान्ये एकमेकात मिसळली तर ती कशी निवडतात ? जे कमी असेल तेच वेचून बाजुला करावे. त्यानंतर आम्ही गुरुंबरोबर ध्यान केले आणि मला एकदम साक्षात्कार झाला. आम्ही लगबगीने घरी आलो. सर्व विरोधकांना आम्ही बैठकीस बोलावले.
" मित्रांनो, आपल्यात वादाचा ख‌रा मुद्दा काय "? विरोधक म्हणाले, भ्र‌ष्टाचाराची संधी कोणाला, हाच‌ एक‌मेव‌ वादाचा मुद्दा आहे.
मी म्हणालो, अगदी बरोबर. यावरुनच मला एक छान कल्पना सुचली आहे. जरा विचार करा. आपल्या देशांत भ्रष्टाचाराचे प्रमाण किती ? राजकारण्यांमधे तर ते ९९% आहे. आणि ते इतकी वर्षे आहे की सामान्य जनतेलाही ते आता मान्य झाले आहे. त्यांच्यातही ते प्रमाण खूपच वाढले आहे. तर आपण भ्रष्टाचार हा राजमान्य करुया, अगदी सर्व पातळींवर ! आणि जे अल्पसंख्य प्रामाणिक, तत्वनिष्ठ वगैरे आहेत त्यांची आपण 'खास' काळजी घेऊच की. विरोधकांच्या चेहेऱ्यावरचे भाव वाचून मी प्रस्ताव मांडला.
स‌र्वांना स‌मान‌ संधी राहील, अशी योजना माझ्याकडे आहे. आपण पांच‌ व‌र्षे, आलटून पालटून सत्ता चालवू. दोन मोठे भ्र‌ष्टाचारी पक्ष फक्त राहतील. बाकीच्यांनी त्यांच्यात विलीन व्हावे. बाकी तपशील, स‌र्व‌स‌ह‌म‌तीने ठरवून घेऊ. बैठक अर्ध्या तासात संपली. आणि त्यानंतर काय चमत्कार झाला तो तुम्ही पाहताच आहात. दोन्ही हात जोडून महानेता खाली बसला. बराच वेळ त्याच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्यावर प्रगट मुलाखत सुरु झाली. बरीच प्रश्नोत्तरे झाली. त्यावेळी महानेत्याने देशाला झालेल्या फायद्याचा विस्ताराने परामर्ष घेतला, त्याचा हा गोषवारा.
संसदेचे काम सुरळीत झाल्यामुळे अत्यंत वेगाने निर्णय घेतले जाऊ लागले.
न्यायालयांचे काम एकदम कमी झाले. आर्थिक घोटाळ्यांचा प्रश्न निकालात निघाल्यामुळे सीबीआयला फक्त गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करता आले.
घटनेत दुरुस्ती करुन राष्ट्रपती, राज्यपाल, मेयर अशी सर्व निरुपयोगी पदे नष्ट झाली आणि उदघाटन करायला केंद्र व राज्य स्तरावर उदघाटन मंत्री नेमले गेले.
काळा पैसा हा प्रकारच न राहिल्यामुळे दुप्पट पैसा चलनात आला आणि स्विस बँकेतले सर्व पैसे अर्थकारणात येऊन भरमसाट भरभराट झाली. कोणी गरीबच राहिला नाही.
आयकर, आरटीओ वगैरे सरकारी खात्यात दहापट भ‌र‌ती झाली आणि ते सर्व मालामाल झालेच पण सरकारी तिजोऱ्याही भरु लागल्या. 'काय करु हो, नोटा ठेवायलाच जागा नाहीये आता,' अशा लाडिक तक्रारी ऐकू येऊ लागल्या.
भ्रष्टाचाराची विद्यापीठे निघाली आणि त्यात शिक्षण घ्यायला परदेशी लोकांच्या रांगा लागल्या.
मतदानावरचा अनावश्यक खर्च टळला आणि सक्तीने मतदान करावं लागणार की काय, या भयगंडातून चंगळवादी लोकांची कायमची सुटका झाली.
थोडक्यात, पैशाने कुठलेही काम होऊ लागल्यामुळे सर्वत्र आबादीआबाद जाहले.
तर आता तुम्ही विचाराल की गरीब व तत्वनिष्ठ मध्यमवर्गीयांचे काय झाले ?
रोजगाराच्या संधी इतक्या वाढल्या की गरीब फारसे राहिलेच नाहीत आणि जे काही राहिले त्यांना दोन वेळेचे जेवण फुकट देण्याची मायबाप सरकारने सोय केली.
तत्वनिष्ठ, प्रामाणिकपणाचा अहंगंड असलेल्या अल्पसंख्यांकांसाठी 'तत्वाश्रम' काढले गेले. त्यात त्यांच्यासाठी लुटुपुटीचे प्रामाणिकपणा दाखवायला वाव असणारे खेळ विकसित करण्यात आले. त्या चार भिंतींच्या आत, त्यांना भ्रष्टाचारावर भरपूर, मनसोक्त तोंडसुख घेता यावे, यासाठी 'हातरे कट्टा' उपलब्ध करुन देण्यात आला. विचार‌वंती संस्थ‌ळे बंद‌ क‌र‌ण्यांत‌ आली.
अशा त‌ऱ्हेने, म‌हान‌ भार‌ताची संक‌ल्प‌ना प्र‌त्य‌क्षांत‌ आली.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तत्वनिष्ठ, प्रामाणिकपणाचा अहंगंड असलेल्या अल्पसंख्यांकांसाठी 'तत्वाश्रम' काढले गेले. त्यात त्यांच्यासाठी लुटुपुटीचे प्रामाणिकपणा दाखवायला वाव असणारे खेळ विकसित करण्यात आले. त्या चार भिंतींच्या आत, त्यांना भ्रष्टाचारावर भरपूर, मनसोक्त तोंडसुख घेता यावे, यासाठी 'हातरे कट्टा' उपलब्ध करुन देण्यात आला.

नामे फेसबुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आयकर, आरटीओ वगैरे सरकारी खात्यात दहापट भ‌र‌ती झाली आणि ते सर्व मालामाल झालेच पण सरकारी तिजोऱ्याही भरु लागल्या. 'काय करु हो, नोटा ठेवायलाच जागा नाहीये आता,' अशा लाडिक तक्रारी ऐकू येऊ लागल्या.

चलनफुगवटा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0