भयंकर सुंदर

मराठीच्या गमतीजमती-
'भयंकर सुंदर!'
बंगालीतलं 'भीषण सुंदर' सुप्रसिध्दच आहे. पण अशी विशेषणं वापरण्यात आपणही काही कमी नाही. परवाचीच गोष्ट! घरची आणि पाहुणी मुलं-मुली एक छानसा सिनेमा पाहून आली होती. कसा होता--यावर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी.
'सही'! 'लय भारी'! 'भन्नाट'! 'जबरदस्त'!
मला 'प्रचंड' आवडला!
काय 'भयानक' हसलोय आम्ही! (हे मात्र सहज शक्य आहे.)
तोपर्यंत चहा झाला होता.
'वॉव, काकू, आल्याचा चहा? मला 'भयंकर' आवडतो'!
'ओ! ग्रेट'!
'मस्‌ऽऽऽऽस्त'!
'आहा! कूऽऽऽऽल'!
म्हणजे चहा 'भयंकर'? का मस्त(वाल), का 'कूऽऽल' म्हणजे थंड?
पण असा विचार करायचा नसतो. विशेषणांचा अर्थ शब्दश: घ्यायचाच नसतो. नाहीतर 'भीषण सुंदर', 'भयंकर सुंदर' म्हणजे कसं काय??
अशी अर्थाशी संबंध नसलेली, किंवा उलटच, किंवा किंचित संबंध असलेली कितीतरी विशेषणं आपण सर्रास वापरत असतो. भय-- म्हणजे भीती. त्यापासून बरीच विशेषणं होतात; भयाण, भयावह, भयंकर, भयानक, भीषण, भीतीदायक ---वगैरे वगैरे. त्यातली भयंकर आणि भयानक ही खूपच लोकप्रिय आहेत.
नुसतं छान, चांगलं हे कसं सपक वाटतं. विशेषत: मुलांच्या उसळत्या उत्साहाला असंच काहीतरी दमदार हवं असतं.
हीच मुलं एखाद्या हुशार मैत्रिणीला नुसतं हुशार म्हणतील; पण दुसर्या एखाद्या अगाऊ मुलीला 'हुशार' म्हणताना शा वर असा काही जोर देतील की त्यांच्या मनातलं लगेच कळावं.
शहाणा हा शब्द असाच. तो सरळ अर्थाने किंवा उपहासाने, दोन्ही पध्दतींनी वापरला जातो. वाक्य उद्‌गारवाचक आलं (शहाणा आहेस फार!) तर आपण अति/दीड शहाणे आहोत (बोलणार्याच्या मते) हे कळून चुकतं. तसंच विद्वान या शब्दाचं. तो तर उपहासानी आदरार्थी बहुवचनात वापरतात.
'चालू' असंच. लाइट, रेडिओ वा टीव्ही चालू असेल तर ते खरंच चालत असतं. पण हेच विशेषण एखाद्या व्यक्तीसाठी वापरलं तर अर्थ किती बदलतो!
अता वेड हा शब्द पाहा. त्याचा अर्थ खूळ किंवा नाद. पण त्याची विशेषणं पाहिली तर आपणच वेडे होऊ. वेडा, वेडपट, येडपट, वेडगळ, वेडापीर, वेडापिसा; वेगवेगळ्या छटा. तर अरे वेड्या, ए वेडाबाई, वेडबंबू, वेडू, येडू, हे थोडं कौतुकाने, लाडाने! क्रिकेट म्हटलं की हा 'वेडा' होतो. इथे नाद/छंद आला. एखाद्या गोष्टीचं वेड लागतं. म्हणजे ध्यास! आणि तसं ते लागलं तरच त्या क्षेत्रात माणूस पुढे येतो. काही भरीव कामगिरी करतो. 'नादखुळा' होतो.
लीलाबाईंच्या मुलाने त्यांना लॅपटॉप भेट दिला किंवा तात्या-माईंच्या मुलांनी त्यांची सिनिअर सिटिझन्सची टूर बुक केली, मुलांनी एक दिवस आईला कामाला हात लावू दिला नाही--- तेव्हा 'काय 'वेडे' आहात का'? अशी प्रतिक्रिया आली. यात थोडा संकोच, थोडं सुखावणं आणि बरंचसं कौतुक अशा संमिश्र छटा होत्या.
आमच्या एका खूप हुशार, कल्पनेपलिकडल्या हुशार भाच्याला सगळे 'वेडा' हुशार म्हणतात.
थोडक्यात काय, विशेषणांचा अर्थ शोधायचा 'वेडेपणा' नको करायला. ती समजून घेतलेलीच बरी!
'व्रात्य' हे विशेषण आपण कुठल्या अर्थाने वापरतो! पण नुकतंच वाचनात आलं की त्याचा संबंध व्रताशी आहे. म्हणजे मूळ अर्थ व्रत आचरणारा, व्रताने बांधलेला असा काहीसा आहे.
आमच्या लहानपणी 'गोड' हे विशेषण नव्याने आलं. (इंग्रजी स्वीट वरून.) आम्हाला त्याचं आश्चर्य वाटे. आम्ही इंग्रजी खूप उशीरा शिकलो ७वी/८वी त; म्हणून असेल. पण आता हे मुळातलं चवीचं विशेषण कुठल्याही गोष्टीसाठी चांगलंच रुळलंय. स्वभाव असो, लहान मूल असो, फूल, कलाकृती, एखादी सुंदरी, एखादी आज्जी सुद्धा गोड असू शकते.
तसंच एक, लहानपणी टॉऽप! म्हणायची फॅशन होती. कुठलीही गोष्ट फार आवडली की जितका जोर देता येईल तितका देऊन ते म्हणायचं. आणखी पुढे जाऊन कुणी कुणी टॉपिटी टॉप, टॉपकट्‌ असंही म्हणायचे.
'चंट' (अती स्मार्ट/पुढारलेला), 'झटॅक'(भडक कपडा), 'चिवटंबावटं' (खूप रंगांचं प्रिंट असलेलं कापड), 'भन्नाट' (हे भयंकर सारखं कुठेही वापरता येतं) यांना तर शब्दश: तसा अर्थच नाही.
नुसतं 'बेरंगी' म्हणजे रंगाचा अभाव; त्याला 'रंगी' जोडायचा अवकाश, की फुलांचे ताटवे, फुलपाखरं, विविध पोषाखातली मुलं/माणसं, इंद्रधनुष्य असं काही डोळ्यांसमोर येतं की नाही?
मात्र सगळीच विशेषणे अशी नसतात. काही शब्द तर त्या वर्णनाला अगदीच समर्पक असतात. आता हेच पाहा ना! लठ्ठ हा शब्दच लठ्ठ वाटतो. तसाच मठ्ठ! गलेलठ्ठ, अगडबंब, ओबडधोबड, ठसठशीत हे असेच वजनदार वाटतात; तर मिळमिळीत, विळविळीत, सुळसुळीत हे जसे हातात धरले तर अलगद निसटून जातील!
अघळपघळ, अजागळ, अचकटविचकट हे डोळ्यांसमोरही नको वाटतात. तर भरधाव, सुसाट म्हणताना ते वाहन आता अंगावर येईल असं वाटतं. आणि चटकदार, चमचमीत, चविष्ट, झणझणीत या शब्दांनीच तोंडाला पाणी सुटतं. डोळ्यांसमोर वडे, भेळ, मिसळ - किंवा रस्सा (कोल्हापुरी असाल तर तांबडा/पांढरा), वांग्याचे पदार्थ हे येतंच. चुलीवरला भात आणि मनातलं काहीतरी खरंच 'खदखदत' असतं.
'झगमगतं', 'चमचमतं' हे खरंच डोळ्यांसमोर चमकू लागतं.
सारेगमचे परीक्षक खूपच खूष झाले तर चाबूक, इ. वापरतात. 'नादखुळा' तर नेहमीच असतो. परवा तर एका गायकाला (त्याच्या गाण्याला) 'टाइमपास' म्हटलं गेलं. त्याचा अर्थही लगेच स्पष्ट केला, = टाइमपास या सिनेमासारखं हिट्‌! =अप्रतिम! मात्र, बहुसंख्य परीक्षकांना इंग्रजी विशेषणंच आवडतात हे खरंय. माइंड ब्लोइंग, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, फॅन्टॅब्युलस, मार्व्हलस इ.इ.
हॉरिबल, टेरिफिक, ही तर आपल्या सगळ्यांचीच आवडती आहेत. स्मार्ट, क्यूट, ही पण आपण मराठीत सर्रास वापरतो.
खास तयार केलेली 'चमको' (भडक/चमचमता पेहराव असणारी), 'खासम्‌खास' (खूपच विशेष) ही नुकतीच वाचण्यात आली. आडनावावरूनही केली जातात. आमच्या मुली लहानपणी 'पटवर्धनी' आमटी कर (त्यांच्या आजोळसारखी, भरपूर चिंचगुळाची) किंवा बाह्या लांड्या असल्या तर ताशा बाह्या घालणार्या दानवे बाईंवरून दानवेरी ब्लाउज असं सर्रास म्हणायच्या.
आपल्याकडे पदार्थ चिवट होतो. पण जाहिरातींमधे डाग चिवट असतात. हट्‌टी ही असतात. असो.
बोली मराठी 'भयंकर'/'भयानक' लवचिक आहे हे खरंच. म्हणूनच आमचं तिच्यावर 'प्रचंड' प्रेम आहे.
--------------------------------------------------------------------------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप्पच बारिक अन् सटिक निरिक्षण आहे, बेदम आवडलं!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

" भ‌य‌ंक‌र‌ " आव‌ड‌लं Smile
म‌स्त‌य‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ‌ य‌ंक‌रसुं द‌र‌म राठी भाषा हे द. दि. पुंडे ह्यांचे पुस्तक वाच‌ल्याचे आठ‌व‌त आहे. त्यात हा, खास‌क‌रून 'भ‌य‌ंक‌र' इ. विशेषणांचा, आणि अनेक इत‌र गोष्टींचा उहापोह खूप म‌नोरंज‌नात्म‌क प‌द्ध‌तीने केलेला आहे. ते आठ‌व‌ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

तमिळ रोम्ब नल्लारिक्याइ
( = खूप चांगलं आहे. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0