लोक शाकुंतल

गेला महिना-दीड महिना तीव्र उन्हामुळे, पुण्यात(तसेच इतर ठिकाणी देखील) राहणारा मी अगदी हैराण झालो होतो. काही दिवसांपूर्वी बंगळूरूला जाण्याची संधी मला मिळाली. मी पूर्वी कित्येकदा बंगळुरूला गेलो आहे पण तरीसुद्धा मी मनातून सुखावून गेलो. पहिले कारण असे, तेथील हवामान, इतक्या प्रमाणात शहरीकारण होवूनही बरेच सुखावह असते. तेथील वैशिष्ट्य म्हणजे, बहुतेक वेळेला संध्याकाळी पावसाच्या सरी काही काळ पडून हवेत हवाहवासा थंडावा येतो. दुसरे कारण मला कन्नड नाटकांचा आस्वाद घेण्याची पर्वणी मिळणार होती. पुणे विमानतळावरू विमानाने उड्डाण केले आणि सहज खिडीकीतून खाली पहिले तर, लोहगाव, खराडी ह्या खडकाळ, वैराण, बिलकुल हिरवाई नसलेला प्रदेश नजरेस पडतो. नाही म्हणायला मुळा-मुठा नदी दिसते, ती वरून स्वच्छ, छानच दिसते, पण आपल्याला सर्वांना माहिती असते, की जशी दिसते तशी ती नदी मुळीच नाही. या उलट, जसे जसे विमान बंगळूरूच्या केम्पेगौडा विमानतळाच्या जवळ येते, त्यावर घिरट्या मारते, आणि तुम्ही खाली पहिले तर, छान हिरवाई, नारळाच्या बागा दिसतील, आखीव, रेखीव, शेती दिसेल. आणि मनाशीच आपण म्हणतो की वा! आली की ही गार्डन सिटी!

बंगळुरूमधील काही दिवसांच्या मुक्कामाच्या शेवटल्या टप्प्यावर आलो तेव्हा कुठे नाटक पाहण्याबद्दल वगैरे बद्दल जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. पण त्याआधी सिनेमा पाहायची टूम निघाली. सचिन पाहावा की बाहुबली २, ही काथ्याकूट करण्यात २-३ दिवस गेले आणि शेवटी कटाप्पाने बाहुबलीला पहिल्या भागात का मारले हे अजून जाणून घ्यावयाचे असल्यामुळे तोच सिनेमा पाहायचे ठरले आणि पाहिला देखील. आता काही मी त्या सिनेमाबद्दल काही लिहीत नाही, नाही तर जुने ते जुने गुऱ्हाळ ठरायचे. परत नाटकाचे ठरवण्याच्या उद्योगाला लागलो. वर्तमानपत्रात पहिले, तर ७-८ नाटके त्या वीकएंडला होणार होती(शिखंडी, सुयोधन सारखी कन्नड प्रायोगिक नाटकं). बंगळूरमध्ये कन्नड व्यावसायिक नाटक असे नाहीच, पण प्रायोगिक नाटकं बरीच, आणि ती प्रामुख्याने वीकएंडला. त्यातील बरीच इंग्रजी नाटके होती. काही कन्नड नाटके होती. पण मला माझ्या सोयीनुसार जाता येण्याजोगे एकच नाटक होते ते म्हणजे लोक शाकुंतल. हे नाटक प्रसिद्ध नाटककार के. व्ही. सुब्बण्णा, ज्यांनी निनासम ही संस्था सुरु केली होती, त्यांनी लिहिले आहे. लोक रंगभूमी जागृत ठेवण्याचे त्यांचे कार्य मी जाणून होतो. त्यातच शाकुंतल नाटकाचे लोक रंगभूमीवरील सादरीकरण कसे असेल ह्याची मला उत्सुकता लागली. सकाळीच BookMyShow वर तिकीट राखून ठेवले. आधुनिक मराठी रंगभूमीची ज्या संगीत शाकुंतल नाटकाने झाली, त्याचा मी लोक रंगभूमीवरील कन्नड भाषेतील अवतार पाहणार होतो!

आणि मी संध्याकाळी निघालो. नाट्यगृह होते बंगळूरुच्या मध्यवर्ती भागात, जवळ जवळ १२-१५ किलोमीटर लांब. मला धडकीच भरली होती. वाहतूक-कोंडीमुळे, गर्दीमुळे, तेथे जाई पर्यंत माझा अर्धा जीव जायचा. त्यातच संध्याकाळी पाऊस पडतो, आणि तो त्यादिवशी देखील पडलाच. कसाबसा वेळेवर नाटकाला पोहोचलो. थोडीफार गर्दी दिसत होती. प्रवेशद्वाराजवळ नाटकाशी संबंधित असलेले काही लोक तिकीट वाटप करत बसले होते. त्यातील एक-दोन जण परिचयाचे निघाले, निनासममध्ये ओळख झाली होती. नाट्यगृह आणि आसपासचा परिसर सुंदर, झाडी असलेला होता. नाट्यगृहाचे नाव गुरुनानक भवन. त्याच परिसरात National School of Dramaच्या बेंगळुरू शाखेचे शहरातील केंद्र आहे(प्रमुख केंद्र हे बेंगळुरू विद्यापीठाच्या परिसरात आहे). लोक शकुंतल हे नाटक अंतरंग संस्थेने बसवले आहे, आणि दिग्दर्शन केले आहे प्रसिद्ध नाट्य-दिग्दर्शक चिदंबरराव जम्बे यांनी. कर्नाटकातील सुप्रसिद्ध नाट्य-संस्था रंगायन याचे ते संचालक देखील होते. ही संस्था मैसुरू येथे आहे. निनासम संस्थेचे जवळ जवळ २२ वर्षे प्रमुख देखील होते. या सर्वामुळे, एकूणच कालिदासाच्या संस्कृत ‘अभिज्ञान शाकुंतल’ नाटकाच्या ह्या कन्नड नाट्य-प्रयोगाला एक वेगळेच वजन प्राप्त झाले होते.

काहीही सूचना, घोषणा न करता नाटक सुरु झाले, पडदा देखील नव्हता. रंगमंचावर नेपथ्य अगदी माफकच होते. दुष्यंत राजा सैनिकांबरोबर शिकारीला गेला आहे हे पहिले दृश्य होते. दोन काठ्यांनी आणलेला धनुष्य-बाणाचा आभास, एका स्त्री-कलाकाराने केलेली हरिणाची भूमिका हे छान वाटले. दुष्यंत राजा अगदीच मामुली वाटला. लोक-संगीत, यक्षगान नृत्याविष्कारावर आधारित हा नाट्य-प्रयोग नटला आहे. रंगमंचाच्या मध्यभागी दोन वादक(एक पेटी-वादक, आणि एक ढोलकवाला) होते, आणि एक गायक, जो सूत्रधार देखील होता. दुष्यंत-शकुंतला यांची कथा प्रसिद्धच आहे, ती काही सांगत बसत नाही. पण ह्या एक तास पन्नास मिनिटांच्या दीर्घ एकांकीच्या प्रयोगात मला विशेष मजा आली नाही. प्रयोग तसा रुक्षच वाटला. शकुंतलेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने थोडीसी जान आणली आहे. कन्नड भाषा, तिचा वेगळा बाज, वेगवेगळे शब्द ऐकताना तसे छान वाटले. पण एकूणच ह्या नाटकात जे नाट्य आहे, राग, प्रेम, पश्चाताप इत्यादी भावनेचे प्रदर्शन आहे, जे अगदी कमीच वाटले. प्रयोग संपल्यानंतर सर्व कलाकारांची ओळख करण्यात आली, तसेच ह्या नाटकाचा पुढील प्रयोग पाहण्यासाठी आप्तेष्टांना घेवून येण्याचे आवाहन करण्यात आले.

असो. प्रयोग संपल्यानंतर रात्री परत घरी जायचा प्रश्न होता. पाऊस अजून पडतच होता. मनाचा हिय्या करून, हे नाटक पाहून बंगळूरू भेटीचे सार्थक झाले असे मनाची समजूत घालून परतीचा प्रवास मी सुरु केला. वर सुरुवातीला म्हटले खरे की बंगळूरू मध्ये पाऊस पाडून हवा छान होते वगैरे, पण बऱ्याचदा असे होते की पाऊस थोडाफार पडतो संध्याकाळी, पण तो घरी परतणाऱ्या लोकांना काळ वाटतो, कारण, पावसामुळे जमणारे पाणी, जोराच्या वाऱ्यामुळे पडणारी झाडे, फांद्या, यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नाटक पाहात नाही परंतू हे ललित आवडले. तिथेही सिनेमाच्या ओझ्याखाली नाटकपरंपर दबली असावी. बंगळुरूकडचे कानडी सौम्य थोडासा हेल काढून बोलतात तसे गोकाक वगैरे उत्तरेकडे नसते. कडाकडा भांडल्यासारखे असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

बंगळुरू वर्णन असे नाव दिले असते तरी चालले असते, इकडे अपेक्षाभंगच होतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

माझाही अपेक्षाभंगच झाला नाटक पाहून! तुमच्या स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणताय तसं झालं खरं...नाटकाचे परीक्षण लिहायचा विचार नव्हता(तसा वकूबही नाही माझा), तो ललित लेख आहे...पण शीर्षकामुळे वेगळ्या अपेक्षा निर्माण होवू शकतात हे मान्य...पाहतो दुसरे काही सुचते की काय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

ल‌लित आव‌ड‌ले. बंग‌ळूरू युनिव्ह‌र्सिटी श‌ह‌राच्या म‌ध्य‌व‌र्ती भागात आहे? ती त‌र मैसूर रोड‌व‌रती पार‌ गावाबाहेर आहे ना? आर‌व्ही कॉलेज‌ ज‌व‌ळ‌ (तिथून १-२ किमी)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो, बंग‌ळूरू युनिव्ह‌र्सिटी शहराबाहेरच आहे..गुरुनानक भवन हे शहरात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com