मेरे जीवन साथी...

(या लेखात जोडीदार हा शब्दप्रयोग पती वा पत्नी यांना उद्देशून केलेला आहे.)

लग्नाच्या विषयाकडे आजचे तरुण वेगळ्या नजरेनं बघतायत. काय गरज आहे लग्नाची? सगळ्यांनी लग्न करायलाच हवं का? लग्न करणं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का? आणि स्वत:च्या आनंदासाठी, सुखासाठी म्हणून जर लग्न करायचं असेल तर त्यासाठी नवरा कशाला हवा? मी भरपूर कमावते, मला हवं ते करायला कुणाची बंदी नाही. हा.. कदाचित म्हातारपणी मला एकटं वाटेल. पण तेव्हाचं तेव्हा पाहू. मनात येईल ते करण्याचं स्वातंत्र्य गमावून कुणाचं तरी घर सांभाळण्याचं काम करण्यात काय अर्थ आहे, असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. आजकाल तर लग्न करण्यापूर्वीच प्री-नप्शिअल अ‍ॅग्रीमेंट करतात. उगाच पटलं बिटलं नाही तर नंतर काही भानगड नको.

शामिकाला ( वा कुठल्याही करीअरिस्ट तरुणीला) जी भीती वाटतेय त्यात कितपत तथ्य आहे? आणि ही भीती फक्त करिअरविषयीच आहे का? यातला कुठलाही नियम सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच लागू करता येतो का? कमिटमेंट, स्वातंत्र्य, मुलं, जास्तीच्या जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टींचं तिला टेन्शन आहे, ते का? पूर्वी नव्हत्या का या गोष्टी? आजच्या जमान्याच्या टोकाच्या स्वकेंद्रित जगण्याचं हे प्रतिबिंब आहे का? की लग्न ही संस्थाच आता आउटडेटेड व्हायला लागलीय? मग कुटुंबसंस्थेचं भविष्य काय? आणि कुटुंबाच्या युनिटवर अवलंबून असलेल्या सोसायटीचं काय? या बदलत्या विचारप्रवाहात ती टिकून राहणार का? तुम्हाला काय वाटतं?

डॉ. वैशाली देशमुख यांच्या ‘ताण’लेल्या गोष्टी : लग्न करायलाच हवं का?’ (व्हिव्हा, लोकसत्ता, 9 मे 2017) या लेखातील हे शेवटचे परिच्छेद आहेत. परिच्छेदातील प्रश्न केवळ तरुणींच्यासाठी नसून तितक्याच तीव्रतेने तरुणानासुंद्धा लागू होत आहे, म्हणून हा लेखन प्रपंच

अर्थपूर्ण आयुष्यासाठी जोडीदाराची खरोखरच गरज आहे का? कदाचित हा प्रश्न अनेकांना विसंगत वाटेल, काहींना हा काय प्रश्न म्हणून पुढील मजकूर न वाचताच पान बदलावेसे वाटेल. परंतु प्रत्येक गोष्टीची चिकित्सा कराविशी वाटणाऱ्या या काळात विवाहोत्सुक जोडीदारासाठी आकाश पाताळ का केले जाते याबद्दलही विचार करण्याची वेळ आली आहे. मिसरूड फुटायच्या आत तरुणांना तरुणींचे तर छाती थोडीशी जरी पुढे आलेल्या तरुणींना तरुणांचे आकर्षण वाटणे स्वाभाविक असले तरी या शारीरिक आकर्षणाच्या (व भावनेच्या) आहारी कितपत जावे हे प्रत्येकाच्या चित्त प्रकृतीवर अवलंबून असते. स्वार्थी जनुक आपले सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. संततीवाढ हे त्यांचे लक्ष्य असते. जैविक उत्क्रांतीचा पायाच मुळात संततीच्या वाढीत आहे. संततीची वाढ लैंगिक व्यवहारात आहे. परंतु त्यासाठी अनिर्बंध स्वातंत्र्य दिल्यास समाज व्यवस्था बिघडून जाण्याची शक्यता आहे. शक्ती, शिरजोरी, सत्ता व संपत्तीच्या जोरावर (जिसके हाथ में लाठी उसकी म्हैस या न्यायाने) काही जण इतरांवर बळजबरी करून इतरांना लैंगिकसुखापासून वंचित ठेवण्यामुळे समाजात अनागोंदी माजण्याची शक्यता असते. सामाजिक शिस्त म्हणून प्रत्येक समाज अगदी अनादी काळापासून नागरिकांच्या लैंगिक विषयाबद्दल काही बंधन घालत आलेला आहे. समाजांतर्गत कुटुंब ही संस्था, जोडीदाराबरोबर बिनधास्त लैंगिक व्यवहाराला मान्यता म्हणून विवाह विधी व अपत्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी रूढ झाल्या असावेत. (विवाह विधीचा ज्यांना तिटकारा वाटतो त्यांच्यासाठी म्हणून लिव्ह इन् रिलेशनशिपलाही हळू हळू समाजमान्यता मिळत आहे.)

आपण रहात असलेला समाज कितीही लवचिक असला तरी विवाहबाह्य संबंध व अपत्याबद्दलचे बेजबाबदार वर्तन सहन करू शकणार नाही. (एके काळी विवाहपूर्व प्रेम हा व्यभिचार समजला जात असे. आताही तीच धारणा असली तरी प्रेमानंतर विवाह याला आता (तरी) समाजमान्यता आहे. त्याचप्रमाणे समलिंगी संबंध निषिद्ध म्हणून कठोर कायदा करणारा हा समाज आज त्याला, नाखुशीने का होईना, मान्यता देत आहे, हेही नसे थोडके!) त्यासाठी समाजाकडून काही बंधनं लादल्या जातात, कायदे केले जातात व कायद्याचे पालन करण्याची सक्ती केली जाते. समाजाने आखलेल्या रेषेच्या पलीकडे जाणे काही वेळा दुस्तर ठरू शकते. परंतु समाजमान्य विवाह याच्याबद्दल अजूनही समस्या आहेत. ठरवून केलेल्या विवाहात सुरुवातीला प्रेमाचा अंशही नसला तरी शारीरिक आकर्षणामुळे व कौटुंबिक जबाबदारीमुळे कुटुंब तगून राहते. वयोमानाप्रमाणे हे आकर्षण कमी कमी होत गेले तरी दीर्घकाळच्या सहवासातून एकमेकाबद्दल आपुलकी निर्माण होते (वा होत असलेला भास होतो.) व अपत्याच्या जबाबदारीचे ओझे संभाळावे लागत असल्यामुळे कुटुंबसंस्थेबद्दल तक्रारीस वाव नसतो. ही कुटुंबसंस्था वेगवेगळ्या टप्प्यातून जात जात आता फक्त नवरा-बायको-मुलं या चौकोनी व्यवस्थेपाशी स्थिरावली आहे.

तरीसुद्धा यौवनावस्थेतील प्रत्येकांना प्रेम विवाहाची ओढ असते. (मनापासूनचे) प्रेम हे विकतही घेता येत नाही किंवा त्याबरोबर सौदाही करता येत नाही. प्रेम जमावे लागते व तसे प्रेम जमलेली जोडपी शारीरिक आकर्षण संपल्यानंतरही सुखाने नांदू शकतात. याचेच उदात्तीकरण केलेली कथानकं कादंबऱ्या, नाटक, चित्रपट वा सिरियल्समध्ये नेहमीच आढळतात. काही तुरळक अपवाद वगळता अशा प्रकारच्या यशस्वी प्रेमविवाहाची उदाहरणं फारच विरळ. म्हणून अजूनही लग्न जमवणाऱ्या संस्था मोठ्या प्रमाणात धंदा करत आहेत. व (आपल्या देशात तरी) बहुतांश लग्न असे ठरवूनच केले जातात, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे जरूरीचे आहे. परंतु काही तुरळक धाडसी तरुण तरुणीं समाज बंधन तोडून राहूही शकतात. परंतु सर्वांना हे जमेल याची खात्री देता येत नाही.

प्रेम विवाह असो वा जमवून केलेले लग्न असो, वैवाहिक जोडीदाराबद्दल निष्ठा, संसाराबद्दलची बांधिलकी, अपत्यांचे पालन पोषण, कुटुंबसंस्थेला तडा जावू नये यासाठी आटोकाट प्रयत्न, दीर्घकालीन बंधनाची सतत जाणीव, आर्थिक व सामाजिक जबाबदारीयुक्त वैयक्तिक जीवन, वृद्धत्वाच्या काळातील परस्पर सेवा-संगोपन, इत्यादी अपेक्षा प्रत्येक जोडीदाराला पूर्ण कराव्या लागतात. यातील एखाद्या गोष्टीला जरी तडा गेला तरी त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. आणि त्यासाठी मनाचा कणखरपणा हवा. यासंबंधात टोकाची भूमिका घेतल्यास कुटुंब व्यवस्था कोलमडते, अपत्यांचे हाल होतात, व एकल पालकत्वाची तयारी ठेवावी लागते. वृद्धावस्था भयाण वाटू लागते. हे सर्व मार्ग तितके सोपे नाहीत याची जाणीवही ठेवावी लागते. त्यामुळे प्रेम वा लग्न या भानगडीत न पडता वा त्यासाठी विशेष प्रयत्न न करता जोडीदाराविना आयुष्य काढण्यास का हरकत असावी हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. परंतु अनेकांच्या मते एकटेपणाची ही अवस्था अनैसर्गिक आहे. लैंगिक आकर्षण ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ते पूर्ण करण्यासाठी त्यासोबत येणारी जबाबदारी प्रत्येकानी पेलायला हवी असा एक अलिखित नियम समाजात रूढ आहे. मुळात एखादी व्यक्ती लग्न न करता का राहू इच्छिते याबद्दल विचार करण्याची मानसिकताच समाजात नसते.

एक मात्र खरे की कुटुंब संस्थेमुळे संतती वाढ होत गेली व त्या त्या कालखंडातील प्रगतीमुळे लोकसंख्येत वाढ होवू लागली. प्रत्येक पिढी प्रगतीत भर घालत आली. त्या त्या समाजातील सृजनशील व प्रतिभावंत व्यक्तींच्या प्रयत्नामुळे सामाजिक जीवन सुखकर होत गेले. जगाच्या प्रारंभापासून जोडीदाराची निवड, जोडीदारापासून संतती व प्रत्येक पिढीमुळे होत असलेली लोकसंख्या वाढ यामुळे आपण इथपर्यंत पोचलो आहोत. एवढी प्रगती केली व करत आहोत व एवढ्या मोठ्या प्रमाणातील जगड्व्याळ व्यवस्था संभाळत आहोत, याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नसावे. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेत सामील न झाल्यास त्या व्यक्तीत काही तरी उणीव आहे असा एक समज सर्व जगभरच्या समाजात पसरलेला आहे. कदाचित अपवाद म्हणून सेलिब्रिटींच्याकडे पाहिले जात असावे.

जेव्हा एखादी सेलिब्रिटी विवाह बंधनाच्या बाहेर असते तेव्हा मात्र समाज कुठलीही नाराजी व्यक्त न करता त्यांचा स्वीकार करते. मुळात विवाह बंधनात अडकलेल्या व्यक्तीला एकटे असलेल्यांच्या व एकटे असलेल्या व्यक्तीला लग्न झालेल्यांच्याबद्दल सुप्त आकर्षण असते. परंतु येथे घी देखा लेकिन बडगा नही देखा या म्हणीची आठवण येते. नित्शे या तत्वज्ञाच्या मते कुठल्याही तत्वज्ञाला अर्थपूर्ण जीवनासाठी लाइफ पार्टनरला पर्याय नाही. परंतु याच नित्शेला हेराक्लिटस, प्लेटो, देकार्ते, स्पिनोझा, लेब्निट्झ, कांट, शोपेनहॉर, लॉक, ह्यूम, विटगेन्स्टाइन, यापैकी कुणीही लग्न केले नव्हते याचा विसर पडलेला दिसतो. अगदी अलिकडील यादी तपासल्यास जेन ऑस्टिन, आयझ्याक न्यूटन, निकोला टेस्ला, लुई मे स्कॉट, फ्लॉरेन्स नायटिंगेल, राइट ब्रदर्स, व्होल्टेर, हेन्ऱी डेव्हिड थोरो, काफ्का, बीथोव्हन, ब्राँटे सिस्टर्स, ऑफ्रा विनफ्रे, ही नावेसुद्धा एकांडे शिलेदार म्हणून घेता येईल. भारतातील यादी तपासल्यास रतन टाटा, होमी भाभा, अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, अण्णा हजारे, कामराज, विश्वेश्वरय्या, राम मनोहर लोहिया, जय ललिता, लतादीदी, ममता बॅनर्जी, मायादेवी इत्यादींची नावे डोळ्यासमोर येतील. परंतु यांना अपवाद समजून नित्शेच्या विधानाची सार्वत्रिकता तपासावी लागेल. सॉक्रेटिस, बर्ट्रांड रसेल, आणि जीन पॉल सार्त्र यांचा मोठेपणा त्यांच्या पत्नीमुळे उठून दिसतो. मेरी क्यूरीला पियरे क्यूरीची जीवनभरची साथ होती. त्यामुळे तिचे जीवन सार्थकपूर्ण झाले. एखाद्या विकृत तत्वज्ञाने रागाच्या भरात पत्नीचा खूनही केला असेल. परंतु त्याकडे विकृत माणूस वा तत्वज्ञ हा एक विचित्र प्राणी म्हणून दुर्लक्ष करणे सोईचे ठरेल. समाज सेलिब्रिटीजना एक वेगळा न्याय व सर्वसामान्यांच्या बाबतीत वेगळा न्याय अशा दुजाभावाने वागते. सामान्यांचे नातलग, मित्र-मैत्रिणी जोडीदाराविना आयुष्य काढत असल्याबद्दल नको त्या शंका उपस्थित करतात व नेहमीच नाराजी व्यक्त करत असतात.

नित्शेचे यासंबंधातील अजून एक विधान उद्बोधक आहे. प्रत्येक मनुष्य जीव आपल्या इष्टतम फायद्यासाठी प्रयत्न करत असते. त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावते. आणि आपण किती बलशाली आहोत ही भावना आयुष्यभर जोपासत असते. जरी नित्शेच्या शक्तीबद्दलचे विधान बाजूला सारले तरी जगाच्या पाठीवरील माणसं सुख समाधानाच्या प्राप्तीसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. काही वेळा त्यात यश येते, काही वेळा निराशा पदरी पडते., हे मात्र तितकेच खरे.

प्रेमाप्रमाणे जीवनात यशस्वी होण्यासाठी कमिटमेंट असणे गरजेचे आहे. व कमिटमेंट हा एक धोकाच असतो. जेव्हा रिलेशनशिपमध्ये आपण गुंतत जातो तेव्हा हा धोका पत्करावा लागतो. रिलेशनशिपमध्ये समर्पणवृत्ती (dedication) असावी लागते. व समर्पणासाठी त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणूनच पुरातन काळातील तपस्वी, ऋषी-मुनी, चर्चमधील पाद्री व नन्स, वा कट्टर धर्मोपासक, विवाह बंधनापासून दूर रहात होते. जरी त्यांना लैंगिकसुख हवेहवेसे वाटत असले तरी जोडीदाराबद्दल समर्पणवृत्ती व परमेश्वराबद्दल भक्ती (devotion) हे एकाच वेळी न जमणाऱ्या गोष्टी होत्या. म्हणून त्यांनी विवाह बंधन नाकारून परमेश्वराचा स्वीकार केला.

नित्शेच्या विधानातील इष्टतम फायदा हा सुख-समाधानाचा मार्ग नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवे. विटगेन्स्टाइन हा तत्वज्ञ एकटाच होता. वरवरून तो अत्यंत कष्टी जीवन जगत होता. कुठल्यातरी एकांत ठिकाणी त्याला मृत्यु आला. मुत्युशय्येवर असताना मी एक चांगले जीवन जगलो म्हणून सर्वाना सांग असे म्हणत त्यांनी जीव सोडले. कदाचित हा अपवाद असू शकेल. चांगले जीवन जगण्यासाठी लाइफ पार्टनर हवा व चांगल्या लाइफ पार्टनरच्या शोधातच खरेखुरे सुख आहे असे बहुतेक जण मानतात.

मुळात (बुद्ध्यापुरस्कर) एकट्याने जीवन काढणाऱ्यांकडे लग्न झालेल्या चष्म्यातून बघत असल्यामुळे एकट्याने राहणाऱे म्हणजे जगण्यास नालायक असा शिक्का पडलेला असावा. एकट्याने राहणाऱ्यांच्या बाबतीतला खालील प्रकारचा अनुभव नेहमीच येत असतोः
• एकट्याने राहतो/ते यामागे काहीतरी काळेबेरे असावे हा संशय का असतो?
• एकट्याने राहिल्यामुळे (भविष्यातील) भीती त्यांना वाटत नाही का?
• ‘बिचारा/री’ असे करुणापूर्ण दृष्टिकोनातून त्याच्याकडे का बघितले जाते?
• एकट्याने राहणाऱ्यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण असे काही गुण असू शकतात का?
• लग्न हेच आयुष्याचे उद्दिष्ट का नसावे?
• एकट्याने राहिल्यामुळे भोगत असलेले स्वातंत्र्य विवाहोत्तर आयुष्यात मिळत नसेल का?

जोडीदाराच्या संबंधातील समस्यांना उत्तरं शोधण्यासाठी समुपदेशक वा मनोविश्लेषक यांच्याकडे जाणाऱ्यांची संख्या काही कमी नसेल. प्रेमाची भाषा समजणारा/री लाइफ पार्टनर कन्सल्टिंग रूममध्ये मिळू शकेल याबद्दल शंका असली तरी नंतरचा धोका टाळण्यासाठी समुपदेशन घेतलेले बरे म्हणून तेथे ते जात असावेत. एक मात्र खरे की तुमचे करीअर, तुमची संपत्ती, तुमची श्रीमंती वा तुमची प्रसिद्धी यापेक्षा committed relationship तुमच्या सुखात भर घालू शकते. सुख-दुःखाच्या प्रसंगात जवळचा माणूस नसणे नक्कीच तापदायक ठरते, ही विधानं दगडावरची रेघ असेच मानले जाते. परंतु ही विधानं माहित आहेत म्हणून आपला पुढचा मार्ग सुकर होतो याला काही अर्थ नाही. यासाठी नेमके काय करायला हवे हा आपल्या समोरचा प्रश्न आहे.

एक चांगले अढळ असे रिलेशनशिप असल्याशिवाय आपण सुखी होणार नाही हे कदाचित चुकीचे असू शकेल. बहुतेकांच्या बाबतीत व बहुतेक वेळा याची प्रचीती आलेली असली तरी हे काही वैश्विक सत्य होऊ शकत नाही. शेवटी हा निष्कर्ष ‘सामान्यपणे’ या सदरातच मोडतो. सामान्यपणे सामान्य लोकांना या लाँग टर्म रिलेशनशिपमुळे त्यातल्या त्यात समाधान मिळतही असेल व सुख मानण्यातच आहे असा युक्तीवादही करता येईल. परंतु एकट्याने आयुष्य काढण्यासाठी आसुसलेल्यांची संख्याही कमी नाही, हेही लक्षात ठेवावी लागेल.

Loving relationship मध्ये दोघाही जोडीदारांचे उद्दिष्ट सारखे असणे हा निव्वळ योगायोग असू शकेल. या संबंधी प्रयोग करून बघायला हरकत नसावी. जोडीदाराच्या उद्दिष्टापेक्षा वेगळ्या उद्धिष्टासाठी प्रयत्न करण्याची भाषा केल्यास व त्यासाठीच्या संधीच्या शोधात असल्यास या रिलेशनशिपचे खरेखुरे स्वरूप कळेल. त्यामुळे Loving relationshipमध्ये अडकून पडल्यास तो एक निव्वळ योगायोग म्हणून स्वीकारायला हरकत नसावी. परंतु अशा प्रकारचे लाँग टर्म रोमँटिक अट्याचमेंट नसतानासुद्धा एकटे राहून आयुष्यात सुखसमाधानाने राहता येते याचेही भान ठेवावे. एकटे असूनसुद्धा इतरांबरोबर चांगले संबंध ठेवून आयुष्य काढता येते, याची अनेक उदाहरणं नक्कीच सापडतील. त्यामुळे एकटेच जीवन जगण्याचा निर्धार केल्यास त्यात न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. आपली जीवनशैली कशी असावी हे स्वातंत्र्य नक्कीच प्रत्येकाला आहे. व त्याचा दुरुपयोग होणार नाही याची खात्री असल्यास जोडीदाराशिवाय जगण्याची मजा और असते.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

एक‌ट्याने राह‌णारा माणुस‌ हा स‌माजाचा घ‌ट‌क‌ अस‌तो. त्यामुळे त‌सा तो एक‌टा न‌स‌तोच‌. त‌सेच‌ माण‌सांच्या ज‌ंजाळात‌ राहून‌ही एक‌टीच‌ अस‌णारी माण‌स‌ ही अस‌तात‌. ल‌ग्न‌ न‌ क‌र‌ता एक‌टी अस‌णारी माण‌से ही स‌माजात‌ टक्केवारीने खुप‌च‌ क‌मी अस‌ल्याने त्यांच्याक‌डे विशेष न‌ज‌रेने पाहिले जाते इत‌कच‌. तो स्व‌खुशीने एक‌टा राह‌त‌ अस‌ला त‌री तो नाईलाजाने एक‌टा राहतो आहे असे मानून‌ आप‌ली काही म‌द‌त‌ होते का हे प‌हाण्यासाठी काहि हितचिंत‌क‌ चाच‌प‌त‌ अस‌तात‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/