सांगे वडिलांची किर्ती अथवा सूर्याची पिल्ले ?

नुकतेच एका कौटुंबिक समारंभाकरीता कारवार येथे जायचे होते . समारंभ सकाळचा. म्हणजे, अगदी पहिले विमान पकडून गोव्यात गेलो असतो तरीही कारवारला पोहोचेपर्यंत प्रचंड दगदग आणि धावपळ होणारच होती. म्हणून मडगावला मुक्काम करून दुसर्‍या दिवशी कारवार गाठावे असा बेत केला. हाताशी तसा वेळ फार नव्हता आणि यंदा समुद्रकिनार्‍यावर जायचे नाही असे ठरवेलेलेच होते. तेव्हा मडगावच्या जवळपासच थोडे फिरावे असा विचार केला.

मडगावजवळच चांदोर नावाचे एक टुमदार गाव आहे. तेथे ३-४ शतके जुनी अशी बरीच पोर्तुगिझकालीन घरे आहेत. तेव्हा भटकंती तिथेच करावी असे ठरवले.
 
पहिले घर पाहिले, ते होते मेनेझिस ब्रागान्झा हाऊस. सत्तरीकडे झुकलेल्या एका आजीबाईने दरवाजा उघडला आणि स्वागत केले. घर सतराव्या शतकातील. उत्तम फ्लोअरींग, इटालियन झुंबरे, बेल्जियन आरसे, चीन-मकावहून आणलेली पॉटरी, साधारणपणे ८० माणसे बसू शकतील असा मोठा डायनिंग हॉल, चांदीची कटलरी आणि ते ठेवण्यासाठी असलेले सुबक लाकडी कपाट, पाच हजार पुस्तके असलेली खासगी लायब्ररी. जागोजागी लावलेली फॅमिली पोर्ट्रेट्स, खोल्यांमागून खोल्या जातच होत्या. आणि घराच्या अगदी मागच्या बाजूला, छोट्याश्या जागेत, आजीबाई आणि तिचे कुटुंब राहत होते!

a
(ब्रागान्झा हाऊस)
 
दुसरे घारदेखिल चांदोरमधीलच सारा फर्नांडीस यांचे . पहिल्याचा मानाने जरा लहान पण तरीही भव्यच! ही म्हातारीही सत्तरीकडे झुकलेली पण सोबतीला तरुण सून! येथेही तोच प्रकार. भल्या थोरल्या खोल्या, मार्बल फ्लोअरींग, जुने लाकडी फर्निचर, युरोपातून वगैरे आणलेल्या इतर वस्तू इत्यादी इत्यादी. मात्र घरची मंडळीही इथेच राहात होती. आणि स्वतःच्या राहत्या घरातूनच ते पर्यटकांना फिरवीत होते!

खरे तर ही फर्नान्डीस मंडळी पारंपरीक ख्रिस्ती गोमंतकीय खानादेखिल खिलवतात. पण त्यासाठी किमान एक दिवस आधी सुचना द्यावी लागते. ती दिली नव्हती म्हणून तो योग (इथे तरी) हुकला.
 
चांदोराहून निघालो तो जवळच असलेल्या लोटली (Loutolim) गावाकडे. इथे पाहिले अरौजो अल्वारिस यांचे घर. बराचसा मामला पहिल्या दोन घरांसारखाच. एक खास बाब म्हणजे "दिपाजी राणेंच्या गुंडांपासून" (sic), रोख आणि दागिन्यांचे संरक्षण करण्यासाठी बनवलेला मजबूत लोखंडी दरवाजा!

b

(अल्वारीस हाऊस)
 

लोटली गावातच एक छोटेखानी म्युझियम आहे. मुख्य आकर्षण आहे ते संत मीराबाई यांचे १४ मीटर लांब शिल्प. आणि शिल्पकार आहे अल्वारीस नावाचा एक स्थानिक लोटलीकर!
c
(मीराबाईचे शिल्प)

आता ह्या तीनही घरांचा लसावि काढला असता काय दिसते?

एखाद्या घराण्यात एक -दोन कर्तुत्ववान व्यक्ती निपजतात. त्या एक मोठे साम्राज्य उभे करतात. पुढील पिढ्या मात्र सामान्य वकुबाच्या निघतात. आहे त्या ऐश्वर्यात भर टाकणे त्यांच्या कुवती बाहेरचे असते. पण ही मंडळी ते फूकून टाकत नाहीत. काही उरले आहे ते जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मग त्यासाठी आपली राहते घर आणि मालमत्ता प्रदर्शानात का मांडावी लागेना!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फोटो-क‌था आव‌ड‌ली. जुन्या भ‌व्य‌ स्थाव‌राची देख‌भाल अलीक‌ड‌च्या काळात अत्य‌ंत‌ क‌ठिण होऊन ब‌स‌ली आहे. राजे र‌ज‌वाडे, स‌र‌दार, द‌र‌क‌दार, शेठ‍साव‌कार, यांच्या पिढ्यान पिढ्या ज‌प‌लेल्या ग‌ढ्या, ह‌वेल्या ढास‌ळ‌ताहेत किवा त्यांचे हॉटेल्स, म्यूझिय‌म यांम‌ध्ये रूपांत‌र होते आहे ते याच‌ कार‌णाने.
' सा र‌म्या न‌ग‌री.... स‌र्व‌ं य‌स्य‌ व‌शाद‌गात् स्मृतिप‌थ‌ं कालाय त‌स्मै न‌म:' व‌गैरे.
अलाहाबाद‌च्या आन‌ंद‌भ‌व‌नाविष‌यीचे आन‌ंद‌भ‌व‌नाच्या छायेत, गाय‌त्रीदेवींचे आत्म‌क‌थ‌न, स‌रोजिनी वैद्य यांच्या आई स‌र‌स्व‌तीबाई अक‌लूज‌क‌र यांचे स‌रोजिनीबाईंनीच श‌ब्द‌ब‌द्ध‌ केलेले आत्म‌च‌रित्र‌ इत्यादि पुस्त‌के वाच‌ताना याचा प्र‌त्य‌य येतो. ग‌त‌वैभ‌व आणि स‌द्य‌स्थिती पाहून त्यात‌ली अट‌ळ‌ता स‌म‌जून‌ही विष‌ण्ण‌ता येते. आन‌ंद‌भ‌व‌न अर्थात देशार्प‌ण केले गेल्याने त्याची देख‌भाल होते. प‌ण त्यात जिव‌ंत‌प‌णा नाही.
बाय द‌ वे, मेनेझिस ब्र‌गांझा या नावाचे एक उत्त‌म स‌भागृह‌ प‌ण‌जीत आहे ते याच‌ ब्र‌गांझा कुटुंबियांचे दातृत्व‌ आणि स्मृती यामुळे आहे का? लुइ मेनेझिस ब्र‌गांझा हे गोवास्वात‌ंत्र्य‌ च‌ळ‌व‌ळीत‌ले एक मोठे नाव होते आणि त्यांच्या नावाने पुन‌र्नामांक‌न केली गेलेली स‌ंस्था भाषिक आदान‌प्र‌दान, अनुवाद अशा क्षेत्रात कार्य‌र‌त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

मराठेशाहीच्या दोनशे वर्षांत महाराष्ट्रातदेखिल मुबलक पैसा आला. गावा-गावात गढ्या उभारल्या गेल्या. बहुधा पुण्यातील वाडेही त्याच काळातील. पण आज त्यांची काय अवस्था आहे? नंतरच्या पिढ्यांनी ते टिकवण्यासाठी काय केले? बहुतेकांनी फुंकूनच टाकले.

त्या पार्श्वभूमीवर ह्या मंडळीची धडपड मला उल्लेखनीय वाटली.

लुई मेनेझिस ब्रागान्झा याच घराण्यातील. "गोमंतकीय राष्ट्रवादाचा जनक" असलेल्या ह्या व्यक्तीसंबंधीत बातमी आलेले एक वर्तमानपत्रीय कात्रण त्या आजीबाईने दाखवले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख‌ वाचून‌ श्याम‌ बेनेग‌ल‍-दिग्द‌र्शित‌ 'त्रिकाल‌' ह्या जुन्या चित्र‌प‌टाची आठ‌व‌ण‌ झाली.

१९८५-८६ साल‌च्या ह्या चित्र‌प‌टाची क‌था गोव्याम‌ध्ये गोवामुक्तिकाळान‌ंत‌र‌ ल‌गेच‌च‌ घ‌ड‌ते. पोर्तुगीज‌ काळातील‌ खान‌दानी कुटुंब‌, त्यांची व‌डिलोपार्जित‌ वास्तु ह्यांचे काळाच्या रेट्यापुढे काय‌ होते असे चित्र‌ण‌ चित्र‌प‌टात‌ आहे. १९८६ साल‌च्या National Film Awards म‌ध्ये चित्र‌प‌टाला स‌र्वोत्त‌म‌ दिग्द‌र्शनाचे पारितोषिक‌हि मिळाले होते.

चित्र‌प‌टाची अन्य‌ अनेक‌ वैशिष्ट्ये आहेत‌. त्याचे चित्रीक‌र‌ण‌ प्र‌ख्यात‌ व्य‌ंग‌चित्र‌कार‌ मारिओ मिरांडा ह्यांच्या लोट‌लीम‌धील‌ कुटुंबाच्या जुन्या वाड्यात‌ झालेले आहे. (धागाक‌र्त्याने पाहिलेले घ‌र‌ हेच‌ त‌र‌ नाही ना?) लीला नाय‌डू 'अनुराधा', 'Householder' अशा गाज‌लेल्या जुन्या चित्र‌प‌टांन‌ंत‌र‌ ब‌रेच‌ व‌र्षांनी 'त्रिकाल‌'म‌ध्ये 'दोन्या मारिआ सूझा-सुआरेस‌' ह्या मोठ्या भूमिकेत‌ दिस‌तात‌. नीना गुप्ता, दिलीप‌ ताहिल‌, के.के. रैना, ज‌य‌न्त‌ कृप‌लानी, न‌सीरुद्दीन‌ शाह‌ असे Art Cinema म‌ध्ये दिस‌णारे 'नेह‌मीचे य‌श‌स्वी' येथेहि उप‌स्थित‌ आहेत‌. राण्यांच्या ब‌ंडाचा आणि फाशी गेलेल्या कोण्या राणेच्या शापाचा उल्लेख‌हि सिनेमात‌ आहे कार‌ण‌ ब‌ंड‌खोर‌ राणेला प‌क‌ड‌ण्यात‌ कोणा सूझा-सुआरेस‌चा पूर्वी हात‌ होता.

हा चित्र‌प‌ट‌ एकेकाळी यूट्यूब‌व‌र‌ होता प‌ण‌ आता दिस‌त‌ नाही. त्याऐव‌जी ह्या २० मिनिटांच्या तुक‌ड्याव‌र‌ स‌माधान‌ मानावे लागेल‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

'त्रिकाल"ची झलक पाहिली. आता संपूर्ण चित्रपट मिळवून पहावाच लागेल!

मी पाहिलेले घर हे अरौजो अल्वारीस यांचे. मारियो मिरांडा यांचे नव्हे. पण लोटलीतील त्या म्युझियममध्ये मिरांडा यांच्या कलाकृती आहेत. त्यांच्या प्रतिकृती विकतही मिळतात. मी काही घेतल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद योग्य ठिकाणी हलवण्यात आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि प्रतिसाद, दोन्ही रोचक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.