थोडेसे गीतेबद्दल ...
अनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे दोन लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे.
चूकभूल द्यावी घ्यावी! त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल!! - निमिष सोनार
* * * || लेख क्र १ || * * *
कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्याचे अर्जुनाने नाकारले तेव्हा त्याला समजावताना आणि विविध वैदिक उपदेश करतांना म्हणजेच "भगवदगीता" सांगताना एका क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,
"कर्म कर पण ते करतांना फलाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे त्या फलाशी तू बांधला जाऊन तुला ते फळ भोगावे लागणार नाही! म्हणून फळाची अपेक्षा न करता युद्ध (करण्याचे कर्म) कर जे कोणत्याही क्षत्रियाचे कर्तव्य असते! कारण आपल्याला नेमून दिलेले कर्तव्य करावेच लागते. त्याशिवाय आपला आत्मा ज्या शरीरात सध्या वास करत आहे त्या शरीराचा उदर निर्वाह तू कसा करणार?"
अर्जुन म्हणाला,
"पण युद्धाच्या कर्माने मी बांधलो नाही का जाणार? कितीही केले तरी कर्म आले की त्याचे फळ आलेच! आणि या युध्दात माझे नातेवाईक आणि अन्य लाखो लोक माझे हातून मारले जाऊन मला पाप नाही का लागणार?"
श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले,
"हे सगळे लोक विविध अविनाशी आत्मे आहेत, जे शरीर धारण करून समोर उभे राहिले आहेत. त्यांची येथे फक्त शरीरे मरतील, आत्मे नाही.
पण आत्मे मुक्त होतील. त्याची शरीरे मारण्याचे तुला पाप तेव्हाच लागेल जेव्हा तू युद्ध करताना युद्धाच्या फळावर नजर ठेऊन असशील जे चूक असेल. फळावर नजर म्हणजे उदाहरणार्थ - जिंकलास तर सुख आणि अहंकार, तसेच जर तू स्वतःचा काहीतरी स्वार्थ किंवा फायदा बघशील आणि आणखी जास्त जग जिंकण्याची इच्छा धरशील आणि हरलास तर दुःख आणि निराशा तुला घेरतील असा (फळाचा) विचार करत युद्ध करू नकोस!!
त्याऐवजी निष्काम भावनेने कर्म (युद्ध) कर.
मनात युद्धाच्या कोणत्याच भावी परिणामांची चिंता न करता तटस्थ भावनेने युद्ध कर, म्हणजे त्याच्या फळाच्या परिणामांपासून तू मुक्त राहशील!"
अर्जुन म्हणाला,
"पण काहीही केलं तरी कर्माने आपण बांधले जातो म्हणून त्यापेक्षा मी सगळे कर्म करणे यापुढे थांबवून, हे जग त्यागून सन्यास घेतला तर ते युद्ध करण्यापेक्षा चांगले नाही का होणार?"
श्रीकृष्ण म्हणाले,
"अरे पार्थ, असे तुझ्यासारखे धर्माच्या बाजूने असणारे लोक जेव्हा असा कर्म आणि संसार त्यागण्याचा विचार करतात तेव्हा मग दुर्योधनासारखे अधर्मी लोक आपले दुष्कर्म करायला मोकाट सुटतात!
तुझा कर्म त्यागण्याचा विचार म्हणजे जिभेला स्वाद घेऊ द्यायचा नाही म्हणून जेवणच करणे बंद करणाऱ्या माणसासारखे आहे. असा जेवण बंद करणारा माणूस जितके दिवस जेवण बंद करेल तितके दिवस त्याला मनात त्या स्वादाची आठवण पुन्हा पुन्हा जास्त तीव्रतेने येत राहील!!
म्हणजे न जेवताही स्वादाची इच्छा त्याला कर्म फलात बांधते आहे.
त्यापेक्षा त्या माणसाने स्वादाची इच्छाच मनातून नाहीशी केली तर?
त्याचप्रमाणे कर्म हे फळ निर्माण करतात म्हणून कर्मच करणे बंद करून टाकण्यापेक्षा कर्माच्या परिणामांच्या इच्छा (सकारात्मक किंवा नकारात्मक भावी फळाच्या अपेक्षा) मनातून नष्ट करणे योग्य नाही का?
असे कर्म केल्याने त्याचे फळ निर्माण झाले तरी ते भोगण्यापासून तू मुक्त असशील, म्हणजे ते तुला भोगावे लागणार नाही! त्या कर्मफळाच्या पाप पुण्यापासून तू मुक्त राहशील!"
पण अर्जुनाने आणखी एक शंका उपस्थित केली,
"पण माधव, आपली संस्कृती दया आणि करुणा शिकवते. हे सगळे अधर्मी आत्मे अज्ञानात आहेत. ते अज्ञान असे की सर्व सृष्टी व्यापून उरलेल्या परमात्म्याचे आपण अंश आहोत हे त्याना ज्ञात नाही आणि अधर्म करून आपण परमात्म्याला विसरून त्याचेपासून दूर जात आहोत हे त्यांचे लक्षात सुद्धा येत नाही आहे! मग अशांना मारण्यापेक्षा त्याचे अज्ञान दूर करून त्याचेवर दया दाखवणे योग्य नाही का?"
यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले,
"या सगळ्यांनी तुझ्यासोबतच शिक्षण घेतले आहे, त्यांनाही तुझ्यासोबत हे वेदज्ञान मिळाले आहे (आत्मा परमात्मा याबद्दल). त्यामुळे असे समजू नकोस की ते अज्ञानात आहेत! त्यांना सगळे ठाऊक आहे! म्हणजे ज्ञानी असूनही मुद्दाम अधर्म करत राहणाऱ्यांना दंड देणे हीच एक प्रकारची त्यांना दाखवलेली दया आहे.
लक्षात ठेव - तीन गुणांच्या कमी अधिक मिश्रणाने व्यक्ती बनतो.
"तामसिक" म्हणजे कोणतेही ज्ञान मुद्दाम दुर्लक्षित करून अविचाराने कृत्य करत राहाणे जसे की दुर्योधन, दुःशासन वगैरे.
"सात्विक" म्हणजे हे सगळे वैदिक ज्ञान अंगिकारून त्याप्रमाणे धर्माच्या मार्गावर चालणारे लोक जसा तू, युधिष्ठिर वगैरे.
आणि कळत असून वळत नसणारे मधले लोकं म्हणजे "रजासिक" जसा की कर्ण!
यांचे सगळ्यांचे अज्ञान पुन्हा दूर करण्याची वेळ आता कधीच निघून गेली आहे.
आता युद्ध करून त्यांना दंड दिल्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे मी स्वतः परमात्मा म्हणजे भगवंत तूला सांगतो आहे.
तेव्हा हे अर्जुना, युद्ध कर!"
(वरील संवाद स्टार प्लस वरील 2013 साली गाजलेल्या महाभारतातील गीतेच्या उपदेशावर आधारित आहे)
* * * || लेख क्र २ || * * *
गीतेबद्दल थोडेसे ... - निमिष सोनार
यापूर्वी अनेक विद्वानांनी गीतेवर छान भाष्ये केली आहेत. माझ्यासारख्या सामान्य माणसाला गीता पूर्णपणे समजणे आणि ती मी तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगणे अशक्य गोष्ट आहे. पण मला वाचून जेवढे काही आणि जसे काही थोडेफार समजले आहे, उमगले आहे ते मी तुमच्यापुढे मांडतो आहे. हा लेख वाचल्यानंतर भगवदगीता वाचण्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली तर माझ्या लेखाचा उद्देश्य सफल झाला असे मी समजेन.
चूक भूल द्यावी घ्यावी.
भगवंतानी सांगितलेल्या गीतेनुसार पुनर्जन्माला मान्यता असून, मागील जन्माचे काही कर्म ज्यांचे फळ त्या जन्मात मिळाले नव्हते ते प्रारब्ध बनून या जन्मात सोबत येते. त्यालाच आपण नशीब म्हणतो. आपल्या मागील जन्माच्या कर्माच्या प्रारब्धा नुसारच आपला जन्म कुठे आणि कुणाच्या पोटी व्हावा हे ठरत असते.
मानव तीन वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतो.
त्यापैकी काही कर्म याच जन्मात लगेच फळ देतात.
काही कर्म याच जन्मात पण काही काळानंतर फळ देतात.
तर काही कर्म पुढील मानव जन्म मिळेपर्यंत (अनेक प्राण्यांच्या योनीतून तसेच स्वर्ग नरक यातून काही कर्म भोगून झाल्यावर उरलेले) तुमचे प्रारब्ध बनून तुमच्या सोबत पुढच्या मानव जन्मापर्यंत येतात.
अर्थात ते मागच्या जन्मीचे कर्म आपल्याला आठवत नाहीत म्हणुन त्याचे फळ या जन्मी मिळाल्यावर आपण आश्चर्यचकीत होतो की, आपल्यासोबत इतके टोकाचे चांगले/वाईट का घडले? पूर्ण गीता वाचल्यास आणखी यासारख्या आणि इतर अनेक गोष्टी स्पष्ट होतात.
येथे एक लक्षात घ्या: भगवान किंवा भगवंत किंवा परमेश्वर हे समानार्थी शब्द आहेत.
परम + ईश्वर = सुपर गॉड जे सगळ्या देव देवतांचे बॉस असतात. भगवंत!!
परमेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेतील काही श्लोकात सांगतात की, परमेश्वर म्हणजे ते स्वतः आणि इतर देव देवता यात फरक आहे.
इतर देव देवता यांना तुम्ही काहीही मागाल (नवस, वरदान वगैरे) तरीही ते देव देवता तुमच्या मागील जन्माच्या चांगल्या कर्माच्या शिल्लक असलेल्या (संचित) नुसारच फक्त तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाध्य असतात.
बॅलंस नसेल तर कितीही पूजा करा काहीच उपयोग होत नाही.
जसे बॅंकेतील जमा असलेले पैसे आपण थोडे थोडे वापरले तर जास्त कालावधीसाठी पुरतात आणि एकदम रक्कम काढून घेतली तर तेवढ्यापुरता फायदा होतो पण नंतर च्या काळासाठी रक्कम रहात नाही! अगदी तसेच!!
"भगवंतांच्या मर्जीविरूध्द कोणतेही देव देवता कोणाही मानवाला वरदान देऊ शकत नाहीत", असे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः गीतेत एका श्लोकाद्वरे सांगितले आहे.
देव देवतांची "पूजा" केली जाते आणि ती आपल्या काहीतरी "भौतिक इच्छांची पूर्ती" करण्यासाठी असते पण भगवंतांची मात्र "भक्ती" केली जाते किंवा नामस्मरण केले जाते ते आपली "अंतिम अध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी"!
देव देवतांच्या पूजेसंदर्भात असलेल्या मंत्रांचे, जापाचे स्थळ काळा विषयी काही नियम असतात पण भगवंतांचे नाव मात्र कुणीही कधीही आणि केव्हाही घेऊ शकतो. त्याला कोणतेही बंधने नाहीत.
भगवंत या ब्रम्हांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत असतात. तसेच ते प्रत्येक सजीव प्राणीमात्रात आणि मनुष्यात परमात्म्याच्या रुपात स्थित असतात. तेच देव देवतांच्या शरीरात सुध्दा परमात्मा रूपाने वास करतात.
प्रत्येक सजीवात एक आत्मा (भगवंतांचे अलिप्त आणि स्वतंत्र रूप) आणि एक परमात्मा (भगवंतांचे रूप) असतात.
भगवंताचे नामस्मरण करून आणि भक्ती करून आपण काहीही मागू नये. फक्त त्याला विनंती करावी की आपल्या आत्म्याची जन्म मरणाच्या फेऱ्यातून आणि विविध योनीतून फिरत राहण्याच्या चक्रापासून सुटका करावी. यालाच "आत्म्याची मुक्ती" असे म्हणतात. मुक्ती म्हणजे आत्म्याची अशी स्थिती ज्यात तो आत्मा पुढे कोणतेही शरीर धारण करण्यास बाध्य होत नाही आणि तो आत्मा परमधामात किंवा वैकुंठात भगवंतांच्या सान्निध्यात कायम रहायला जातो पण त्याचे स्वतंत्र अस्तित्व मात्र कायम रहाते.
यावर कुणी सहज प्रश्न विचारेल की शेवटी आपण भगवंताला सुध्दा काहीतरी मागतोच आहे (जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका आणि आत्म्याची मुक्ती) मग हे मागणे देव देवतांना मागितलेल्या गोष्टींसारखेच नाही का झाले? मग फरक काय राहिला?
याचे उत्तर असे आहे की प्रत्येक आत्म्याची या भौतिक जगतातून मुक्ती व्हावी आणि तो आत्मा कायम भगवंताकडे राहण्यास यावा ही मुळात भगवंतांचीच इच्छा असून यात आपण भगवंतांकडे मानव जन्मातील भौतिक इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीची मागणी करत नाही आहोत. म्हणूनच या इच्छेला अध्यात्मिक इच्छा म्हणतात जी भगवंत (परमेश्वर) पूर्ण करतात.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष नुसार मानव जन्माचा अंतिम उद्देश्य मुक्ती हाच आहे (अध्यात्मिक इच्छा).
आत्मा मुक्ती मिळवून कायम भगवंताकडे जाणे यालाच आपण "आत्मा हा परमात्म्यात विलीन झाला" असे म्हणतो!
याउलट इतर देव देवतांना मागितलेल्या इच्छा या अध्यात्मिक नसून भौतिक प्रकारच्या असतात ज्या कर्म फळ यांची साखळी निर्माण करून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या योनीच्या रूपात आपल्याला भौतिक जगात जन्म घ्यायला भाग पाडतात.
कृष्ण सांगतात की आपला आत्मा सनातन असतो, तो कधीही मरत नाही, एकतर तो मुक्त होतो किंवा अनंतपणे आपल्या कर्मानुसार विविध शरीर प्राप्त करत जातो.
म्हणून भगवंत म्हणतात की -
"जर जन्म मरणाच्या 84 लक्ष्य योनीच्या अनंत सुरु असणाऱ्या चक्रात अडकायचेे असले तर देव देवतांची पूजा करा आणि त्या चक्रातून सुटका हवी असेल तर भगवंतांची "भक्ती" करा. नामस्मरण करा. त्याला काहीही भौतिक इच्छा मागू नका!"
आता प्रश्न पडतो की मनुष्य भगवंताचा अंश आहे आणि भगवंत परमात्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या शरीरात रहात असतात मग तो वेगवेगळी चांगली वाईट कर्मे का करतो?
याचे उत्तर गीतेनुसर असे देता येईल की -
"कोणत्याही मनुष्यावर भगवंतांनी निर्माण केलेल्या रजो, तमो आणि सत्व या तीन गुणांचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव असतो. हे गुण देऊन भगवंतांनी मनुष्याला आंशिक स्वातंत्र्य बहाल केले आहे. यातील कोणताही गुण निवडून मनुष्य त्याला पाहिजे तसा वागू शकतो. भगवंत त्यात हस्तक्षेप करत नाहीत. पण त्या वागण्यातून निर्माण होणाऱ्या कर्माच्या फलातून मात्र त्याची सुटका नाही. ते फळ केव्हा, कसे, कधी मिळेल हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मानवाला नाही. तसेच नमके कोणते कर्म चांगले (पुण्य) आणि कोणते वाईट (पाप) हे ठरवण्याचा अधिकार मानवाला नाही. कारण कोणतेही कर्म व्यक्तीसापेक्ष असते. जेव्हा मनुष्य वाईट वागत असतो तेव्हा परमात्मा (ज्याला आपण आपला आतला आवाज म्हणतो) आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतच असतो. आपण अनेकदा याचा अनुभव घेतला असेलच!"
थोडक्यात, या तीन गुणांच्या प्रभावामुळेच या भौतिक जगतात कोणताही मनुष्य चांगले वाईट कर्म करत असतो. इतर प्राण्यांना मात्र कर्माचे नियम लागू नसतात, म्हणूनच कोर्टात सुध्दा कायद्याने आपण माणसाला खाल्ल्याबद्दल वाघाला खुनाच्या शिक्षेखाली अटक करू शकत नाही!!
ब्रम्हा हे रजो गुणाचे, विष्णू हे सत्व गुणाचे आणि शंकर हे तमो गुणाचे प्रतिनिधी आहेत.
भगवंत वगळता इतर सर्व प्राणी, मनुष्य आणि देव देवता सुध्दा कर्माच्या नियमांनी बांधले आहेत कारण सर्व देव देवता सुध्दा तीन गुणांच्या प्रभावाखाली येतात.
एकूण 84 लक्ष्य योनीमध्ये देव देवता सुध्दा अंतर्भूत असतात.
मात्र भगवंत स्वतः (श्रीकृष्ण) मात्र त्रिगुणातीत आहेत म्हणजे या तीन गुणांच्या प्रभावापलीकडे आहेत.
मानवाला पुढे कोणताच जन्म मिळू नये यासाठी तीन गुणांचा आपल्यावरील प्रभाव नष्ट करावा लागतो. त्यासाठी भगवंतांनी एक मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे या मानव जन्मातील कर्मे अलिप्तपणे करावी म्हणजे फळाची अपेक्षा न करता! (मनाने अलिप्त किंवा विरक्त होऊन) तसेच सुखात आनंद आणि दुःखात शोक करू नये, म्हणजे तटस्थ राहावे!
पण फक्त हाच एकमेव मार्ग नाही. भगवंतांनी इतरही अनेक मार्ग सांगितले आहेत ज्याद्वारे आपण तटस्थपणे कर्म करू शकतो किंवा कर्मांचा त्याग करू शकतो आणि मुक्ती मिळवू शकतो. उदाहरणार्थ - भक्तीयोग!
हा आणि इतर सगळे मार्ग कोणते हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण गीता वाचणे योग्य होईल.
धन्यवाद!!!
प्रतिक्रिया
हे सर्व तत्त्वज्ञान अगदी
हे सर्व तत्त्वज्ञान अगदी लहानपणापासून पटलेले नाही. प्रत्येकजण मला समजलेली गीता सांगण्याचा प्रयत्न करतो तरीही काहीही पटत नाहीच. निरनिराळी उदाहरणे देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्ञानेश्वरांना माहित नसलेली अशी. तरीही दुर्योधनासारखे अधर्मी लोक म्हणजे काय ते सांगता येत नाही. उलट हीच गीता दुर्योधनाने पचवली आहे हेच अधोरेखित होते.
हल्लीचे दोन नवीन शब्द पॅाझटिव/नेगटिव एनर्जी वापरण्याची तर फ्यासनच आली आहे. असो.
बाकी पापी लोक पुढच्या जन्मी स्त्री/शूद्र होतील असा एक श्लोक म्हणजे फारच अतिरेक आहे.
- अचरट थिअरीमधून.
दुर्योधन अतिशय योग्य प्रकारे
दुर्योधन अतिशय योग्य प्रकारे आणि धर्मानी राज्य करत आहे, असा उल्लेख महाभारतात आहे.
----------------
ह्यात काय अतिरेकी वाटले? म्हणजे स्त्री आणि शुद्र असे जातिय आणि सेक्सिस्ट शब्द अतिरेकी वाटले की अजुन दुसरे काही?
प्रत्येकजण मला समजलेली गीता
अचरटबाबा, तुम्हाला काहीच पटत नाही ह्याचे कारण तुम्हाला वाळवंटी पुस्तकासारखे "तू काय करु नकोस/काय कर" असे सांगणारे पुस्तक अपेक्षीत आहे. म्हणजे चोरी करु नकोस, व्याज घेणे पाप आहे, दारु आणि संगित टाळ, शेजाऱ्याच्या बायकॉवर डोळा ठेऊ नकोस, काफिरांना मारुन टाक वगैरे वगैरे.
दुर्दैवाने गीतेत तुम्हाला असे काही मिळत नसल्यामुळे तुम्हाला पटत नाही.
गब्बु तर बरीच वर्ष गीतेच्या पुस्तकात गीता बालीचे फोटो असतात अश्या समजुतीत होता.
गब्बु तर बरीच वर्ष गीतेच्या
गब्बर बडा नादान.
प्रीतगीता की ना जानेपहचान....रे
.
आचरट बाबा थोर आहेत . हे सगळं
आचरट बाबा थोर आहेत . हे सगळं शेवटपर्यंत वाचू शकले .
वरील जे काही आहे त्यातील "विविध वैदिक उपदेश करतांना"याचा अर्थ उलगडून सांगाल का ?
वेदांत सांगितलेलंच अंतिम
वेदांत सांगितलेलंच अंतिम मानलं तर ती एक चौकट होते. त्या चौकटीतलं सर्व खरं ,शिरसावंद्य मानायचं. आत्मा - परमात्मा - जन्म - पुनर्जन्म - मोक्ष वगैरे. आता जिवाजिवातली असमानता याचे उत्तर देण्यासाठीचे तर्क म्हणजे कर्म. अवेळी अवकाळी वाइट आणि चांगल्या गोष्टी का घडतात त्याचे उत्तर म्हणजे प्राक्तन. फारच विचार करूनही उलगडा होत नसेल तर इतर मार्ग म्हणजे जप कर, व्रत कर,संतुष्टपणात भले आहे हे मनाला समजावत राहा,अथवा दुसरा सोपा उपाय म्हणजे मेंदूच बथ्थड करणारे अफु,मद्य ग्रहण कर.
खरे उत्तर कुणालाच माहित नाही फक्त शब्दबंबाळ मलमपट्ट्या.
सहमत
अगदि सहमत.
बाकी चौकट मोडाया ग्रु ठाकुर है ना
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
किती तो दुर्बोध
किती तो दुर्बोध विषय आणि किती सोपे करुन सांगितलेले त्याचे हे स्पष्टीकरण!
म्हणूनच मी बाजारातून फळे आणून डायनिंग टेबलावर ठेवून देतो. स्वत:हून कधीच खात नाही. घरातल्या कोणी हातात आणून दिले, तर हेच प्राक्तन आहे, असे समजून खातो. पण पुन्हा दुसऱ्या फळाची मागणीच काय, इच्छाही ठेवत नाही.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
प्राक्तन
तुम्ही असा प्रतिसाद देणार हे ही प्राक्तनात लिहून ठेवले होते.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
प्राक्तन
त्यावर मी असा प्रतिसाद देणार हे ही प्राक्तनात होते.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
प्राक्तन
प्राक्तनाचे रिकर्शन हे ही प्राक्तनच आहे.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
प्राक्तन
प्राक्तनाच्या रिकर्शनचे हे दर्शन आहे. नववे.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
थंडीत फळे खायला मजा येत नाही.
थंडीत फळे खायला मजा येत नाही. पेरु,सिताफळं येतात तेव्हा तर मुंबईत बदाबदा पाऊस कोसळत असतो. मार्च एप्रल बरे.
बाकी लहान मुलांनी प्रश्न विचारलेले मोठ्यांना आवडत नाहीत. हो म्हणणारा शाणा मुग्गा(मुग्गीसुद्धा) आवडतात.
तसं म्हणायला गेलं तर किसनराव
तसं म्हणायला गेलं तर किसनराव जरा चुकलेच म्हणा .
असो....
किसनरावांनी जे सांगितलं ते
किसनरावांनी जे सांगितलं ते अमलात आणणारे लोक अगोदरपासूनच होते.
किसनराव्
किसनरावांनी लहानपणी गोपींबरोबर पण हाच, 'कर्मण्येवाधिकारास्ते' हा सिद्धांत वापरला का ?
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
नाही.
नाही.
आलिया भोगासि असावे सादर हा सिद्धांत.
गीतेतील मला गम्य काय आहे?
आम्हाला SYBA च्या वर्गामध्ये संस्कृत विषयासाठी Religious Text म्हणून संपूर्ण गीता अभ्यासाला होती आणि डॉ.टी.जी.माईणकर हे आमचे आवडते आणि विद्वान प्राध्यापक ती शिकवायला होते. त्यांच्या शिकविण्यातून नोट्स मी काढल्या होत्या आणि त्यांच्या आधाराने मी उत्तम रीत्या परीक्षेतून पसारहि झालो.
तरीपण अखेरपर्यंत गीतेतील काही नित्य आचरणात आणावे असे मला कधीच जाणवले नाही ह्याचे कारण म्हणजे गीतेच्या मूलभूत ध्येयाबाबत माझ्या मनातील संपूर्ण अश्रद्धा आणि अरुचि. गीतेमधील आत्म्याचे अविनाशित्व मला भावते आणि पटते कारण भौतिक शरीरापलीकडे विचार-भावना-संवेदनायुक्त असा जो मी आहे तो मृत्यूनंतर कोठेतरी भंगार होऊन नष्ट होतो ह्यापेक्षा तो दुसऱ्या देहात संक्रमित होतो हे मला योग्य वाटते कारण विश्वामध्ये कोठलीच गोष्ट पूर्णत: नष्ट होत नाही, ती दुसऱ्या कशाततरी संक्रमित होते ह्या स्वत:सिद्ध तत्त्वाशी ते मिळतेजुळते आहे. पण त्यापुढे जाऊन कर्म-ज्ञान-भक्ति अशा कोठल्यातरी मार्गाने 'जन्ममृत्युबंधनातून सुटणे' हे जे गीतेचे अन्तिम ध्येय आहे त्याच्याशी माझी सहानुभूति नाही. 'पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनं' हे आचार्यपूज्यपाद शंकराचार्यांना इतके अप्रिय का वाटावे हे मला कळत नाही. 'कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: | जन्मबन्धविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम् || ह्याचे मला आकर्षण वाटत नाही कारण असे 'अनामय पद' कोठे आहे काय ह्याचीच मला खात्री नाही. असे 'अनामय पद' मी पाहिले आहे असे छातीठोकपणे सांगणारा एकहि व्यक्ति अस्तित्वात नव्हता आणि नाही. असा एखादा असता तर 'आप्तवाक्य' असे मानून मी त्याच्यावर विश्वास टाकलाहि असता पण असा कोणीहि नाही ही वस्तुस्थिति मला दिसत आहे.
पहिले सहा अध्याय सोडल्यास
पहिले सहा अध्याय सोडल्यास बाकीचे नंतरचे आहेत असं इरावतीबाई म्हणतात. भक्ती-मोक्ष ह्या नंतरच्या कल्पनांनी गिता उगाचच अपग्रेड केली गेली आणि एक सिंपल फिलॉसॉफी चार्म हरवून बसली.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
??? (मोठ्यांची छोटी वचने?)
ते सहा अध्याय जर "पहिले" असतील, तर बाकीचे (व्याख्येनेच) "नंतरचे" असणार, नाही काय?
मग इरावतीबाईंनी यात विशेष असे काय सांगितले?
त्यांना ते प्रक्षिप्त का
त्यांना ते प्रक्षिप्त का कायसेसे म्हणायचं असणार.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(No subject)
मयाहुर: तुम्हाला म्हटलं ना?
इथून
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
---
---
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
गीतेबाबत थोडी मूलभूत माहिती.
गीता महाभारतातील क्र. ६ च्या भीष्मपर्वात अध्याय २३ ते ४० अशा अठरा अध्यायांमध्ये दिसते. एकून महाभारताची रचना इसवीसनाच्या अलीकडे पलीकडे २०० वर्षांमधील असून प्रत्यक्ष भारतीय युद्धात, जे इसपूर्व ३००० च्या पुढेमागे झाले असे मानले जाते, कृष्णाने अर्जुनास हे सगळे ८०० श्लोक जागीच म्हणून दाखविले हे विश्वासार्ह नाही. कोणातरी नंतरच्या लेखकाने आपली ही कृति कृष्णाच्या तोंडून वदविली हे अधिक शक्य वाटते.
गीतेला मिळालेले पूज्यत्व हे तिच्या निर्मितीच्या बरेचसे नंतरचे असावे. शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयीमध्ये १) उपनिषदे आणि २) ब्रह्मसूत्र ह्याबरोबरच ३) गीतामहाभाष्य लिहिल्यामुळे हे १८ अध्याय लोकांच्या पुढे आले आणि त्यांना सध्याचे महत्त्व प्राप्त झाले असे म्हणता येईल.
यात श्रेणीदात्याला काय
यात श्रेणीदात्याला काय निरर्थक दिसले असावे बरे?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
रोचक
कोल्हटकर सर ही माहिती फार रोचक आहे. म्हणजे शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य लिहिले नसते तर ती एक ग्रंथ म्हणून तितकीशी प्रचलित झाली नसती असे शक्य होते का ?
महाभारतात अशी किती रत्ने असतील मग याचा विचार करतोय.
अध्याय २१ मध्ये (गीतेच्या
अध्याय २१ मध्ये (गीतेच्या आधीच्या २ अध्यायांपूर्वी) खुद्द युधिष्ठिराला कौरवांचे प्रचंड सैन्य पाहून युद्ध करण्याविषयी विषाद उत्पन्न होतो व खिन्नमनस्क युधिष्ठिराची समजूत अर्जुनाकडूनच घातली जाते व तो युधिष्ठिरास युद्धास प्रवृत्त करतो. असे असताना लगेचच पुढे अर्जुनास स्वत:स विषाद उत्पन्न व्हावा हे गीता संपूर्णपणे प्रक्षिप्त असल्याचेच दर्शवते. कुरुंदकर ह्यांनी इरावतीबाईंचे बाईंचे मुद्दे खोडत ह्यावर उकृष्ट विवेचन केले होते.
किसनरावांनी लै काई स्टोरी
किसनरावांनी लै काई स्टोरी लावलीच नसणारे.
"अर्जुना लका, तू म्हणतुयास तसं काही नसतं, मी सांगतुया न्हवं, घे धनुक्ष आन हान बाण" एवढ्यात झिपगीता आटापली असणार.
http://www.misalpav.com/node
http://www.misalpav.com/node/6610
Embrace your inner sloth.
जे रॉबर्ट ओपेनहायमर : अपराधीपणा कमी करण्यासाठी चांगले उपयोगी
स्वतःची सदसद्विवेकबुद्धी गहाण टाकून कोणत्यातरी 'धर्म" नावाच्या गारुडाच्या प्रभावाखाली निष्पापपणे प्रचंड मानव-संहार घडवून आणण्याचे हे तत्वज्ञान अणुबॉम्बचा अमेरिकन जनक जे रॉबर्ट ओपेनहायमर याला स्वतःचा अपराधीपणा कमी करण्यासाठी चांगले उपयोगी पडले होते!
ओपेनहायमरचे अन्तर्द्वन्द्व
अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रकल्पाचा प्रमुख आणि धारणेने अणुशस्त्रविरोधी ओपेनहायमर ह्याच्या मनातील अन्तर्द्वन्द्वावर ह्या लेखात प्रकाश टाकण्याचा काही प्रयत्न केला आहे. जिज्ञासा असल्यास पहा.
नाझी अणुबाँब-शास्त्रद्न्यही अशाच "निर्मम" बुद्धीने काम करत होते
Thanks! "येथे गीतेने त्यांना सांगितले की तुझे शास्त्रज्ञ म्हणून नियत कर्तव्य अणुशस्त्रनिर्मिति हेच आहे. त्या अणुशस्त्रांचा पुढे कसा सदुपयोग वा दुरुपयोग होईल हे ठरविण्याचे कर्तव्य हे तुझ्या शासकीय वरिष्ठांचे आणि राजकारणी पुरुषांचे आहे, त्या क्षेत्रामध्ये तुझा काही अधिकार नाही. तेव्हा त्याचा विचार न करता तू तुझे नियत कर्तव्य निर्मम बुद्धीने करावेस. त्याच्या परिणामांची चिन्ता करण्याचे तुला कारण नाही.": वाहवा ! नाझी अणुबाँब-शास्त्रद्न्यही अशाच "निर्मम" बुद्धीने काम करत होते याची मला खात्री आहे. युरोपियन भाषांमध्ये गीतेचे प्रथम भाषांतर जर्मन मध्ये झाले हा मुद्दाही इथे थोडाफार प्रस्तुत ठरेल.
स्वतःची सदसद्विवेकबुद्धी गहाण
काय ओ मिलिंदराव, व्यक्तीच्या सदसदविवेकबुद्धी चा विकास धर्माच्या अनुपस्थितीत होऊ शकतो का ? जगात कोणताही धर्म अस्तित्वात नसता तर मानवाची सदसदविवेकबुद्धी विकसित झाली असती का ?
अफाट धार्मिकता आणि दुसरीकडे अफाट भ्रष्टाचार
बरेचसे प्रस्थापित धर्म बघता याचे उत्तर "हो" असेच द्यावे लागेल. उदा. हिंदू धर्मातील सती , मुसलमान धर्मातील शत्रूच्या बायकांवर बलात्कार करायची परवानगी, ख्रिश्चन धर्मप्रसारातील माणसांना जिवंत जाळणे इत्यादी गोष्टी या धर्म कसा सद्सद्विवेक गहाण टाकायलाच शिकवितो याची उदाहरणे आहेत. नशिबाने मानवजात धर्मांच्या असल्या शिकवणुकीला ठोकरण्यास शिकली आहे! भारतातही एकीकडे अफाट धार्मिकता आणि दुसरीकडे त्याच माणसांनी चालवलेला अफाट भ्रष्टाचार याची सांगड कशी घालणार?
खरा योगेश कृष्ण म्हणता येणार
खरा योगेश कृष्ण म्हणता येणार नाही. महाभारतातला कृष्ण नंतर अंगठ्याला पारध्याचा बाण लागून मरतो. ज्ञानेश्वराने तरुणपणी योगमार्गाने प्राणत्याग केला. हाच खरा योगेश.
(मागे एकदा समाधित कॅम्रा सोडून खरोखरच पद्मासन घातलेला हाडाचा अवशेष आहे का पाहण्याची कोणी अनुमति मागितली होती. तसं खरोखरच दिसलं असतं तर मोठा पुरावा झाला असता.)
अचरटबाबा, तुम्ही असे
अचरटबाबा, तुम्ही असे हतोत्साहीत करणारे प्रतिसाद लिहिता म्हणुन गोल्डमॅन टाळतो लिहायचे. नाहितर आत्तापर्यंत दुसरा भाग आला असता धाग्याचा
गीतेला धर्माशी जोडणाऱ्या
गीतेला धर्माशी जोडणाऱ्या लोकांच्या द्न्यानाबद्दल मला कौतुक वाटते.
मला हे ही कळत नाही की गीता म्हणली की आत्मा वगैरे सोडुन काही दिसत नाही.
------------
खालच्या सारखे काही श्लोक म्हणजे गीतेचे सार आहे. विकारांची निर्मीती कशी होते हे मानसशास्त्र लाखो शब्द लिहुन सांगते ते २ श्लोकात सांगितले आहे.
ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते ।
संगात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥
----------------
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
ह्या श्लोकाबद्दल पण कायम इंटुक लोकांमधे चेष्टेने बोलले जाते. पण बऱ्याचवेळेला सायकोथेरपी हेच वेगळ्या शब्द्दात गोलगोल सांगते.
निरनिराळ्या लोकांची गीतेवरची
निरनिराळ्या लोकांची गीतेवरची भाष्ये वाचणे हा फार सुंदर अनुभव असतो. निरनिराळ्या परिप्रेक्ष्यातून गीता निराळी भासते. शंकराचार्य, द्न्यानोबा माऊली, ओशो, गांधीजी, टिळक, विनोबा, राधाकृष्णन, इस्कॉनवाले, गीता प्रेस, गोरखपूरवाले प्रत्येकाची गीता निराळी. अभिनिवेश बाजूला ठेवला तर एकाच घटनेकडे, तत्वद्न्यानाकडे किती भिन्न दृष्टीने पाहता येते हे कळते. विनोबा अन ओशो यांच्या गीता माझ्या विशेष आवडीच्या आहेत. ओशोची भाषेमुळे अन विनोबांची कळकळीमुळे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
पुनर्जन्म
मानला तरच गीतेची चिरेबंदी (इतक्या वर्षांत सर्व फटी बुजवलेली) इमारत उभी राहू शकते, नाहीतर ती ढासळते. दुर्दैवाने ही गोष्ट अनुभवाने सिध्द करता येत नाही. त्यामुळे गीता ही केवळ अाणि केवळ श्रध्दा ठेऊनच वाचणे शक्य अाहे. यामुळे अभ्यास सुरू ठेऊ शकलो नाही.
अनुराव म्हणतात ते बरोबर आहे.
अनुराव म्हणतात ते बरोबर आहे. हतोत्साहित करणारे प्रतिसाद नकोच. अथवा अगदी पहिला नकोच. शंभरेक इतर झाल्यावर लिहिले पाहिजेत. अरविंद कोल्हटकर मुद्याचे चांगले लिहितात. गीता म्हणजे काय,त्यात काय सांगितले आहे वगैरे. अभ्यासुपणात आपली मते मी घुसडतो ते बरोबर नाही.
वर सांगितलेल्या नावांत एक चिन्मयानंद राहिले ते फार ओघवत्या इंग्रजित लिहायचे. पुस्तके आहेतच शिवाय पेपरमध्ये येत असे. दुसरे एक नाव म्हणजे 'मदर इंडिया' नियतकालिक चालवणारे बाबुराव पटेल. सरकार,राजकारणींवर खरमरीत { आणि शिवराळही}टीका करणारे गीतेचे इंग्रजी काव्यात उत्तम भाषांतर करतील असे कुणाला वाटले नव्हते.
असो.
निमिष सोनार, माझ्या प्रतिसादाने जे काही स्पीडब्रेकर लागले आहेत ते या प्रतिसादाने बुलडोजर मारून सरळ करत आहे. येऊ द्या भराभर पुढचे भाग.
खूप पूर्वी स्वामी
खूप पूर्वी स्वामी चिन्मयानंदांचे गीतेवरचे पुस्तक वाचले आहे आणि ते मला खूप आवडले होते. त्या पुस्तकाचं नाव आठवत नाहीये पण मला आता. माहित असल्यास कृपया सांगाल का ? पुन्हा मिळवून वाचावंसं वाटतंय. विनोबांचं 'गीता प्रवचने' खूप सुंदर पुस्तक आहे. तेही आवडते. त्याखेरीज मला आवडणारं गीतेवरचं पुस्तक पांडुरंगशास्त्री आठवलेंचं ' गीतेचे पंचप्राण ' हे आहे. मला हे छोटेखानी पुस्तक वाढदिवसाला भेट मिळालेले आणि नंतर ते मला इतके आवडले कि मी ते बऱ्याच लोकांना वाढदिवसाला भेट म्हणून दिले.
प्रसादे सर्वदु:खानां हानिरस्योपजायते |
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि: पर्यवतिष्ठते || 65||
हा गीतेतला माझा आवडता श्लोक आहे.
अरे हो. पांडुरंगशास्त्रींचे
अरे हो. पांडुरंगशास्त्रींचे 'गीतेचे पंचप्राण' मीही वाचले आहे. आमच्या आजी स्वाध्याय परीवारातील होत्या. खरोखर फार सुंदर पुस्तक आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
Holy Geeta
स्वामी चिन्मयानंदाची गीतेवर अनेक पुस्तके अाहेत. ‘Holy Geeta’ हे मी वाचलेले अाहे. खूप भारावून टाकणारे पण नंतर शब्दफुलोरा, अलंकारिकता व संपूर्ण भक्तीरसाने अोथंबलेले वाटू लागले. त्यामानाने नंतर वाचलेली स्वामी दयानंदांची पुस्तके काहीशी वस्तुनिष्ठ वाटली. पण ती पूर्ण वाचू शकलो नाही.
माझ्याकडे चिन्मयानंदस्वामिंचा
माझ्याकडे चिन्मयानंदस्वामिंचा अठरावा अध्याय(१५०पाने) आहे त्याच्या शेवटच्या पानावरून -
READ coMMENTARIES BY
H. H. SWAMI cHINMAYANANDA
ON
1. Atma Bodham of Adi Sankara.
2. Bhaja Govindam of Adi Sankara.
3. Vivekachudamani of
4. Vakya Vritti of Adi Sai
5. Holy Geeta
6. Vishnusahasranamam.
7 Upanishads : a Kena, Katha,
Mundaka,Prasna,Kaivalya,Taitareya.
Mandukya & Karika.
हारून पंत , आवडलेलं आहे . आणि
हारून पंत , आवडलेलं आहे . आणि शिवाय तुम्ही काही लोकांची गोची केली आहेत ते अजून आवडलेलं आहे .
आपण गीतेच्या वाट्याला इयत्ता सातवी नंतर कधीही गेलो नाही . ( सातवीपर्यंत सुद्धा स्वेच्छेने कधी गेलो नव्हतो )
आपण गीतेच्या वाट्याला इयत्ता
आपण गीतेच्या वाट्याला इयत्ता सातवी नंतर कधीही गेलो नाही . ( सातवीपर्यंत सुद्धा स्वेच्छेने कधी गेलो नव्हतो ) >> लॉल
आपणपण शाळेत असतानाच प्रार्थनेला गीता म्हणायचो. तेपण फक्त १२ आणि १५ वा अध्याय. काय म्हणायचो आठवत नाही. त्याचा अर्थ तेव्हादेखील कळायचा नाही; आतादेखील जाणून घेण्याची इच्छा नाही....
हारुनपंत LOL
बापटअण्णा मी पण स्वेच्छेने गीतेच्या वाटेला गेलो असं नाही. आमच्या शाळेत 'गीता प्रतिष्ठानाच्या' गीता पाठांतराच्या परीक्षा व्हायच्या त्या पास केल्या कि सुंदर लाल नक्षी असलेली प्रमाणपत्रं मिळायची. त्यावेळी गीतेपेक्षाही त्या सर्टिफिकिटांचं आम्हाला फार आकर्षण असायचं. ती सर्टिफिकिटं मिळवायची म्हणून मग पंधरावा अध्याय घोकून पाठ करायचो आम्ही ( सातवीपर्यंत विनोबांच्या गीताईमधला पंधरावा अध्याय असे आणि मग आठवीपासून पुढच्या इयत्तांना गीतेतला पंधरावा अध्याय पाठ करायचा असे).
शिवाय वर्गात सकाळी आल्याबरोबर गीतेतला दुसरा अध्याय म्हणावा लागे. त्यामुळे हे दोन्ही अध्याय पाठ झाले. अजुनही आहेत.
हे शाळेचं, पुढे हातात येईल ते वाचून काढायच्या वयात मग गीतेवरही काही ना काही वाचन झालंच. जे आवडलं ते लक्ष्यात राहिलंय. गीता भारतीय तत्वज्ञानातलं महत्वाचं पुस्तक आहे असं माझं मत झालेलं ते अजुनही कायम आहे. असो अवांतर होतंय त्याबद्दल क्षमस्व.
काळाची चौकट
गीता काय किंवा अन्य कोणतीही धार्मिक पोथ्यापुस्तके काय, ती त्यांच्या त्यांच्या काळातल्या मूल्यचौकटीनुसारच लिहिली गेली. त्यातले सगळेच आता किंवा केव्हाही संपूर्णपणे कालोचित असेल असे नाही. किंबहुना तसे ते नसतेच. पण प्रत्येक देशकालस्थलातल्या परिस्थितीला आणि प्रत्येक मानसिकतेला सुसंगत आणि ग्राह्य असे बरेचसे काही ना काहीतरी त्यात असतेच. प्रत्येकाने आपापल्या विवेकशक्तीनुसार जे काही साजेसे असेल ते घ्यावे असे मला वाटते. शेवटी सगळे इंटरप्रिटेशन स्वत:च्या कुवती आणि कलानुसारच होणार. तिसऱ्या अध्यायात एक श्लोक आहे, 'पण्डित लोक हे विद्याविनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, श्वान आणि चाण्डाल या सर्वांकडे समदृष्टीने पाहातात." म्हणजे गीतालेखनाच्या काळात चांडाल हा नीच समजला जात होता, पण खरे ज्ञानी तसे समजत नव्हते. पण यावरून जर कोणी असा निष्कर्ष काढला की गीतेत चांडाल हा सर्वसामान्यांसाठी नीच होता असे सूचित केले आहे, तर ते अर्धसत्य ठरेल कारण गीतेची शिकवण चाण्डालाला नीच मानण्याची नाही.
गीतेतले काही श्लोक विशेषत: सांख्ययोगातले, कुठल्यातरी उपनिषदात वाचले आहेत. बहुधा योगवासिष्ठ्यातही एखाददोन असावेत. (आता आठवत नाही. जाणत्यांनी भर घालावी.)
गीतेतले काही श्लोक मला अतिशय आवडतात. 'कर्मण्येवाधिकारस्ते', योगस्थ: कुरु कर्माणि', 'क्रोधाद्भवति संमोह:',(सर्व दुसरा अध्याय) 'नियतम् कुरु कर्म त्वम' 'न बुद्धिभेदं जनयेत अज्ञानां कर्मसङ्गिनाम'धूमेनाव्रियते वह्निर्यथा आदर्शो मलेन च' (तिसरा), उद्धरेत् आत्मानं आत्मा, युक्ताहारविहारश्च', 'यथा दीपो निवातस्थो' वगैरे.
असो.
तुमच्याइतके वाचनीय प्रतिसाद
तुमच्याइतके वाचनीय प्रतिसाद अक्ख्या आंतरजालावर फार कमी लोक लिहितात
धन्यवाद.
मनापासून धन्यवाद. आपलेही प्रतिसाद नेहमीच आवडतात आणि 'अबा'नी म्हटल्याप्रमाणे काहीजणांची अभावितपणे गोची करणारे असतात.(जे आवडते.)
+१
तुमचे रूप आणि त्यांचा आवाज, दोन्ही खरोखरच गोग्गोड आहेत.१ वशिला असता, तर दोघेही मंत्री, नाहीतर पोपच्या खालोखालच्या दर्जाचे अधिकारीदेखील झाला असतात.२
..........
तळटीपा:
१ संदर्भ: एक जुने तथा सुपरिचित संस्कृत सुभाषित.१अ
१अ दोन्ही मूळ स्तुत्योक्ती आपापल्या परीने कितीही यथोचित आणि तथ्यास धरून असल्या, तरीही. मग हे असले प्रतिसाद यायचेच.१अ१
१अ१ नाही म्हणजे, हारूनपंतांबद्दल आम्हांस आदर आहे. आपल्याबद्दलही आहे. परंतु हा पब्लिक डिस्प्ले ऑफ (म्यूच्युअल) अफेक्शन(/अॅडमिरेशन) कशासाठी? मग हे असले प्रतिसाद यायचेच.१अ१अ
१अ१अ 'गौराक्का' हा आमचा डुआयडी नाही, हे या निमित्ताने स्पष्ट करू इच्छितो.
२ संदर्भ: पु.ल.. 'खुरच्याऽऽऽऽऽऽ'. (आम्ही तरी देऊन देऊन दुसरे कोठले दाखले देणार? चालायचेच!)
चांगल्या प्रतिसादाबद्दल कौतुक
चांगल्या प्रतिसादाबद्दल कौतुक केलं हो न.बा. अर्थात तुम्ही म्हणता तेही बरोबरच आहे म्हणा मी त्यांना खरड टाकायला हवी होती किंवा व्यनि करायला हवा होता, म्हणजे माझ्या चुकीमुळे तुमचा प्रसाद उगीचच्या उगीच त्यांनाही मिळालाय तसे झाले नसते. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.
:D
ते ठीकच. पण एकंदरीत या देवाणघेवाणीचा इफेक्ट मोठा कॉमिकल वाटू लागला होता, म्हणून हा प्र(ति)साद१.
जौद्याहो एवढे कुठे मनाला लावून घेता? आणि नाहीतर मग सकाळीसकाळी मला तरी माझे हात मोकळे करायची संधी कुठून मिळाली असती? त्याबद्दल खरे तर तुमचेच आभार मानायला हवेत.
मला त्रास कसला? (उलट इष्टापत्ती!) आणि दिलगिरी कसली? (उलट, वर म्हटल्याप्रमाणे, या सुवर्णसंधीबद्दल तुमचेच आभार.)
..........
तळटीप:
१ या ठिकाणी खरे तर 'प्रतिसादप्रपंच' असे लिहिण्याची जनरीत आहे, जी मी कटाक्षाने टाळतो. प्रतिसादाचा प्रपंच कसला? म्हणजे, प्रतिसादाचे लग्नबिग्न होऊन त्यास पोरेबाळे/पिलावळ होणे अपेक्षित असावे काय?
कायदेशीर पोरं?
प्रतिसादाचे लग्न होऊन त्याला पोरं झाली तर त्यांना तळटीपा म्हणतात का? (बेकायदेशीर पोरं - श्रेणी)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गाळीव
तळटीपांना कायदेशीर पोरं कसं म्हणता येईल ? त्यापेक्षा तळटीपा 'गाळीव रत्ने' वाटतात. निरोध फेल झाल्यासारखी!
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
उत्सवमूर्ती?
यावर उत्सवमूर्ती 'न'वी बाजूंचं मत ऐकायला आवडेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अगा जे वापरिलेचि नाही...
...ते फेल व्हावे कैसे?
काय की ब्वॉ.
काय की ब्वॉ.
पोरांच्या स्टेटसच्या नामाभिधानाबद्दल ठाऊक नाही, पण लग्न झाल्याखेरीज प्रतिसादाचा 'प्रपंच' म्हणता येणार नाही, एवढे निश्चित.
सन्याशाने केला तो प्रपंच।
सन्याशाने केला तो प्रपंच।
पोरांनी भोगली फळे।
गीतेवर केले भाष्य जरी
चौकट मोठी होईना
रेडा म्हटला वेदसुक्ते।
तोही त्यातून जाइना।
भीमा कृष्णा इंद्रायणी
सुकल्या त्या काठावरी।
कारण्
तुमच्याइतके वाचनीय प्रतिसाद अक्ख्या आंतरजालावर फार कमी लोक लिहितात
कारण ते स्वत: राही लिहित असले तरी खरे ते हिरा आहेत.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
अहो काय हे!
माझे मायबोलीवरचे नाव हीरा आहे हे बाकी खरे आहे.
बाकी फारसे काही नाही. ('बाकी शून्य' म्हणावेसे वाटत होते, पण फारच नाटकी झाले असते.)
सीरियसली घेऊ नका :
सीरियसली घेऊ नका :
सत्या रुक्मी भामा
सब मिल चिल्लाई
श्याम श्याम
देख घर को
कुरुक्षेत्र मैदान
गीता दबाए
भगलिए घनश्याम
लेख छान आहे. तीन तारका दिल्या
लेख छान आहे. तीन तारका दिल्या आहेत.
लोकांना विरोधी बोललेलं आवडत
लोकांना विरोधी बोललेलं आवडत नाही. छानछान म्हणून गप्प बसायचं.
निमित्तमात्र.
लेखातले प्रतिपादन एलिमेंटरी आहे. पण या निमित्ताने 'ऐसी'वर गीतेविषयी चर्चा झाली हेही नसे थोडके.
('ऐसी'वर अशी चर्चा होणे हे 'ऐसी'चे प्राक्तन होते. लेख निमित्तमात्र.)
थोडक्यात...
...कालचा गोंधळ बरा होता?
'द्येवाचे गोंधळी'
ऐसीवरचे सगळे जर 'द्येवाचे गोंधळी' असतील तर (कालचा) गोंधळ बराच मानावा लागेल.
देवाची ऐसी आणि चोराची ऐसी अशी दोन ठाणी नसावीत बहुधा ऐसीवर. ('ठाणी' या शब्दामुळे ठाणेकरांच्या भावना दुखत असतील तर....तर त्यांनी प्यारासेटामॉलची गोळी घ्यावी.)
गोंधळावर पाणी टाकले आहे,
गोंधळावर पाणी टाकले आहे, पुढचे भाग टाका.
कठोपनिषद्
कठोपनिषदातले हे दोन श्लोक गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातल्या श्लोकांशी मिळतेजुळते आहेत. :
न जायते म्रियते वा विपश्चिन नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित्
अजो नित्य: शाश्वतोsयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे II
हन्ता चेन्मन्यते हन्तुम हतश्चेन्मन्यते हतम्
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते II
अर्थ काय आहे राही?
अर्थ काय आहे राही?
Embrace your inner sloth.
अर्थ- मला समजला तसा:
१.२.१८ : हा ज्ञानी (आत्मा) जन्मला जात नाही, (जन्मत नाही), मारला जात नाही, (मरत नाही.), तो कशातूनही निघालेला नाही किंवा तो काहीही बनलेला (झालेला) नाही. (अर्थात त्याने कोणतेही रूप धारण केलेले नाही). तो अजन्मा (न जन्मणारा) आहे. तो नित्य, प्राचीन आणि शाश्वत आहे. देहाचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही.
१.२.१९ : मारणारे जर मानत असतील (की मी याला) मारीन ,[मारणारे जर (याला) मारू पाहात असतील] आणि मृत जर म्हणत असेल की (मी) मेलो आहे, तर हे दोघेही जाणत नाहीत की हा (कुणाला) मारीतही नाही आणि (कुणाकडून) मारलाही जात नाही.
मी सध्या देवदत्त पट्टनाइकांचे
मी सध्या देवदत्त पट्टनाइकांचे 'माय गीता' आणि इरावतीबाईंचे 'युगांत'चे हिंदी भाषांतर वाचत आहे. फार भिन्न दृष्टीकोनातून गीतेकडे पाहणे होत आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************