भाग तीन: वृक्षवल्ली आम्हा सोयरी

आमचा पहिला आठवडा फक्त प्लॉट स्वच्छ करण्यात गेला, तर आमचे अनुभवी शेजाऱ्यांची बाग दृष्ट लागण्यासारखी नटून सजून तयार झाली. ससे/पाखरांनी भाजी खाऊ नये म्हणून चोहीकडे कुंपण, कुंपणाला मधोमध छोटंसं सुबक दार दोन्हीकडे भाज्यांचे वाफे, आणि मधून विटांची पायवाट वगैरे सुंदर रचना होती. बरं, उन्हात काम करून दमायला झालं, तर खुर्च्या, छत्री, बर्फाच्या डब्यात थंड पेय वगैरे घेऊन दोघे दादा-वाहिनी सकाळपासून उन्हं माथ्यावर येईतोवर राब-राब राबत!

दुसरीकडे मात्र, एक मावशी एकटीच, एकदाच बिया लावून गेली. नंतर कधी दिसली नाही.. पण तीन चार आठवड्यात तिच्या प्लॉटभर पुरुषभर उंचीची सूर्यफ़ुलंच सूर्यफुलं झुलू लागली आणि आमचा कोपरा गजबजून गेला. मग उरल्या सुरल्या जागेत तिने मुळे लावले. कधी कधी तण वाढू नये म्हणून मोकळी जागा ठेवत नाहीत, त्यापैकी. एरवी तिच्या मनात 'मुळ्या' ला फारसं 'मोल' नसावं. झाडं वाढत वाढत त्याला 'ढिंगऱ्या' लागल्या तरी त्या काढायचं तिच्या मनात नसावं. एकदा मी सहज म्हंटलं,"ह्या शेंगांची आम्ही भाजी करतो." तर लगेच म्हणाली, "मग घेऊन जा न सगळ्या!"

माझ्या पोराला त्या दिवशी शेंगा तोडायला इतकी मजा आली, की आमच्या प्लॉटचं भाडं तेव्हाच वसूल झालं! "माझे हात छोटे आहेत, म्हणून मी कोपऱ्यातल्या शेंगा पण तोडू शकतो!" वगैरे 'डिंगऱ्या' तोडतांना 'डिंग' मारून पण झाली Smile तण उपटतांना एक गांडूळ दिसलं, आणि हा कार्टा हर्षवायूने जे किंचाळला, की सगळे शेतकरी आपल्या आपल्या पेरणी/कापणीतून माना वर करून बघू लागले Smile

पण आमच्या प्लॉटला सांभाळायला आमचे तीन हात कमी पडू लागले. तरी बरं, इथे शेतात 'नांगरणी' करायची गरजच नव्हती. पहिल्याच 'माहितीसत्रात' सांगितलं गेलं, की गेल्या मोसमातल्या झाडाच्या मुळाचंच ह्या मोसमात सडून खत झालेलं असतं. शिवाय शेतकरीमित्र गांडुळं वगैरे मातीत राहत असल्यामुळे, नांगरणी करू नका. पुष्कळ फळभाज्यांच्या बियांना एक पेरभर खोल खड्डा सुद्धा पुरतो.

तरीही, तांबडं फुटल्यावर जितके लवकर बागेत पोचू तितकं ऊन व्हायच्या आत परतता येईल, हे कळायलाही थोडे दिवस गेले. सहसा विकेंडला सकाळी उठायचेच वांधे होते, म्हणून शेवटी 'कलत्या उन्हात' दुपारी संध्याकाळी जाऊ लागलो. तण उपटण्याचे कामच मोठे होते. कारण दुर्लक्षित बाग झाली, तर आपला प्लॉट रद्द होण्याची भीती... असे काही आठवडे गेले. डाव्या कोपऱ्यात मुळे, मध्ये भेंडी आणि झुकिनी, उजवीकडे पालक/लेट्युस आणि पायवाटेकडे झेंडूची फुलं यायला लागली. एकाच वेळी सगळं उगवू लागल्यावर तर तण कुठलं आणि पानं कुठली तेही कळेनासं झालं Smile मटारचे वेल चढवायला जाळी लागते, किंवा टोमॅटोची/भोपळी मिरचीची झाडं वाढायला वेळ लागतो हे आम्हाला माहिती नव्हते.

पण घरी येऊन मग स्वयंपाक कोण करणार! खाली बसून पाठ आणि पाय दुखले आणि नखातली माती अंघोळ करूनही जाता जाईना झाली! शेतात उगवली भाजी, पण आम्ही खातोय टेक-आऊट! हा दैवदुर्विलास शेवटी आई-बाबा आल्यावर संपला. बाप्यांनी शेतावर जावं, इकडे मी आणि आईने भरली वांगी वगैरे रांधवी- असं माती-मुळांशी जवळ जाणारं कामकरी जीवन सुरु झालं- असं मी म्हणणार होते, पण......... खरं तर 'पास्ता विथ बेसिल अँड रोस्टेड गार्डन व्हेजीस' सुद्धा शेतात घाम गाळून आल्यावर इतकं रुचकर लागायचं, की आम्हालाच आम्ही 'साधी माणसं' आहोत असं वाटायला लागलं Smile

पहिल्या झाडाची पहिली मिरची!
पहिल्या लेट्युसचं पाहिलंच पान!
ह्याचं आपल्याला जितकं कौतुक असतं, तितकं फोटोत ते काही वेगळं दिसत नाही, असा साक्षात्कार झाला Smile

तरीही, कुठलीही अतिशयोक्ती न करता सांगते, जो आनंद 'घरच्या', 'स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडावरून तोडलेले मटार तिथल्या तिथे फस्त करण्यात आहे, तो विकत घेता येत नसतो. सुपरमार्केट मध्ये येणाऱ्या 'मॅडम तुसाद' च्या मेणाच्या भाज्या खाऊन खाऊन, शेतात ह्यापेक्षा चांगलं काय लागणारे? असा भ्रम होता, तो दूर करण्याची ताकद त्या मटारच्या पहिल्या दाण्यातच जाणवली.

'भारतात भाज्या छान लागतात' वगैरे टिपिकल अमेरिकन अनुभव पूर्वी घेतलेले असले तरी, जंतुनाशके न मारलेल्या टोणग्या भेंड्यासुद्धा इतक्या कोवळ्या, इतक्या गोड, आणि त्यांची तार नसलेली भाजी होते,हा अनुभव माझ्यासारख्या 'झाडंमारी' साठी इतका आश्वासक होता, की दिवसभर काम करूनही आठवड्यातून दोन तीनदा "शेतावर काय लागलं असेल?" म्हणून चक्कर टाकायची सवय झाली.

ह्याच सुमारास मी एक 'लोखंडी पॅन' घेतलं होतं, त्यात शेतातल्या ताज्या भाज्या परतून खरोखर इतक्या सुंदर लागत होत्या, की डिंगऱ्या, भेंड्याच नव्हे, तर summer squash, चपटे मटार, कांदे, बटाटे, बेसिल असे घालून Frittata सुद्धा चटकन आणि चविष्ट झाला. झुकिनी तर इतक्या भरभर आणि भरपूर आल्या, की त्या आजूबाजूला वाटूनही संपेनात! मग झुकिनीची थालिपीठं, झुकिनीचे वडे, झुकिनीची भाजी, झुकिनीचे पराठे, असा झुकिनी-सप्ताह संपन्न झाला!

पण शेती म्हणजे फक्त उगवणे, खाणे, इतकंच नव्हतं...... तर दिवसभर लॅपटॉप, टीव्ही बघून दमलेल्या डोळ्यांना विसावा देणारा खऱ्या, वेड्यावाकड्या, पण तजेलदार भोपळी मिरच्यांचा हिरवा रंग होता.., मुलाला मातीत हात घालण्याची सूटच नव्हे, तर पानांची हिरवी लव मातीत उगवल्यावर हलकेच पाणी घालायची जबाबदारी होती........ ऍमेझॉनचं खोकं घरी यायची वाट पाहण्या ऐवजी भेंडी मोठी होण्याची वाट पाहणे होते, बागेत येणाऱ्या पक्ष्यांचे किलबिल स्वर ऐकणे होते. आणि वृक्षवल्लींशी नाते सांगणे होते.

कदाचित अमेरिकेत राहिल्यामुळे माझ्या मुलाला काका, मामा ही नाती कळणार नाहीत, पण त्याचं मातीशी असलेलं नातं तरी मी त्याला देऊ शकले, हे समाधान होतं. म्हणूनच, बाहेरच्या बर्फातही, माझ्या हिरव्या स्वप्नांमध्ये 'लाल माठ', रेषांचा 'दोडका', मोहरी वगैरे पेरणी कधीच सुरु झाली आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भाज्यांचा मळा करण्याचा प्रयोग नाविन्यपूर्ण आहे.

-- अनुभव चांगल्या तऱ्हेने शब्दबद्ध केलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

धन्यवाद! 'मळा' हा शब्द मला का सुचला नाही?
सगळीकडे 'शेत' ऐवजी 'मळा' असं करते आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो टाका की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फोटो डायरेक्ट अपलोड करायची सोय दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे व्वा!!
तुमच्या ब्लॉगमधून लिंकस काढून -

फोटो १

फोटो।२

फोटो।३

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही घरच्या घरी कंपोस्ट करायला सुरुवात केलीत का?

भारतात असताना मी कधीही भेंडी आवडीनं खाल्ली नव्हती. अगदी सुरण किंवा कारल्याएवढी दुश्मनी नव्हती. पण मुद्दाम भेंडी विकत घेऊन मी खात नव्हते.

अमेरिकेत आल्यावर काही वर्षं भेंडीशिवाय गेली. मग एका उन्हाळ्यात फार्मर्स मार्केटात गेल्यावर भेंडी दिसली. किंचित लाल रंगाची. मग उगाच स्मरणरंजनावस्था जागृत झाली म्हणून भेंडी आणली. मी स्वतः काही शिजवलंय आणि मलाच आवडलंय असं अगदी मोजक्या वेळेला झालंय, तसं त्या भेंडीचं झालं. आता रीतसर बी पेरून भेंडी लावते. या वर्षी तीन झाडं लावायचा विचार आहे. उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा भेंडी जेवता येईल.

आता भेंडी घेताना काटेरी आहे ना, वगैरे रीतसर तपासून विकत घेते. फ्रोजन भेंडी सोडाच, अमेरिकी वाण्यांच्या दुकानांतली भेंडीही घेत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कॉम्पोस्ट करत नाही, कारण गेल्या वर्षी बाग लावणे हाच नवीन अनुभव होता.
भेंडीची झाडं किती मोठी असतात ह्याची मला कल्पनाच नव्हती, त्यामुळे मी पण एकाच कोपऱ्यात ५-६ बिया टाकल्या (शिवाय, येतील न येतील ची शक्यता गृहीत धरून) त्यामुळे पुष्कळ भेंड्या झाल्या.

खुडायला दोन दिवसही उशीर झाला, तेव्हा मात्र चांगल्या टणटणीत झाल्या, आणि सॉलीड काटे आले. तरी इतक्या प्रेमाने लावलेली भेंडी मला वाया घालावे ना.....मग चौकशी केली.....एका सुगरण मावशीकडून कळलं कि अशा भेंड्यांच्या बिया काढून घेऊन चटणी करतात... Smile तितका उरक मला येऊ शकला नाही, पण चटणी उत्तमच लागत असणार! देशी वाण्याकडे सुद्धा भेंडी भयंकर महागच पडते त्यामुळे ह्यावर्षी पण नक्कीच लावणार.

झाडावर सुकलेल्या भेंडीच्या बिया पुढच्या वर्षीसाठी साठवता सुद्धा येतात. न्यू जर्सीत मात्र तसं झालं नाही कारण उन्हाळ्यानंतर गारठा एकदम वाढतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ही बऱ्याच गोष्टी हळूहळू, अनुभवातून शिकत गेले. आता चौथं वर्षं बागकामाचं.

उरक मलाही फार नाही; कारण मुळात स्वयंपाकाची आणि चवीढवीनं खाण्याची आवड नाही. त्यामुळे फार कष्ट न करता रांधता येतात आणि दोघंही कटकट न करता खातो, अशाच भाज्या मी लावते.

आमच्या टेक्सन उन्हाळ्यात, जुलै-ऑगस्टात मिरच्या, टोमॅटो, वांगी काहीही धरत नाही. पण भेंडी चिकार लागते. त्यामुळे उन्हाळ्यात धीर धरता यावा, बाहेर बघितल्यावर अगदीच भकास वाटू नये म्हणून भेंडी पेरलीच पाहिजे.

दुसरं, फार्मर्स मार्केटात गावठी वाणाचे, गोड आणि रवाळ नसलेले टोमॅटो मिळाले. त्यांच्या बिया जपून ठेवल्यात. आता फक्त तेच टोमॅटो लावते. माझ्याकडे उपलब्ध वेळ आणि जागा मर्यादित. साधे टोमॅटो विकतही आणता येतात. लावायचे तर फक्त हेच.

आमच्याकडे तुमच्यापेक्षा हवा बरीच चांगली असली तरी आवारात ऊन येणारे भाग फार कमी आहेत. भाज्यांसाठी आहेत ती झाडं काढणं जिवावर येतं, कारण पुन्हा टेक्सन उन्हाळा. त्यामुळे आहेत त्या जागेचा विचार करून, उपलब्ध वेळ आणि पाण्याचाही विचार करून या वर्षी ही दोनच पीकंच काढायची ठरवली आहेत. या वर्षीच्या अनुभवातून पुढच्या वर्षी आणखी ठरवेन.

कंपोस्टही करून पाहा. मी बहुतेकदा मिरवताना 'आमच्याकडे आठवड्याला चार लिटरपेक्षा जास्त कचरा होत नाही' हे मिरवते. आपल्यासारख्या हौशी माळ्यांच्या समाजात यातून फारच कूल पॉइंट्स मिळतात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.