ऐसा भी होता है!

सर्व टीव्ही चॅनेल्सवर दिवसभर ‘रोपण माणसा’चीच चर्चा होत होती. मुळात त्याचे नाव सुभाष सारेपाटील असे होते. परंतु चॅनेल्सवर तो ‘रोपण माणूस’ म्हणूनच ओळखला जात होता. मुंबईच्या एका नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या वेळी ‘अल्पशी चूक’ झाल्यामुळे त्याच्या जनुकांमध्ये – विशेषकरून stem cell मध्ये – काही बदल झाले होते. हे जनुकं आता त्याच्या शरीरातील कुठल्याही अवयवातील मृत पेशींना ताबडतोब जिवंत करत होत्या. त्याची प्रत्यक्षरित्या खात्री करून घेणेसुद्धा शक्य झाले होते. त्याचे एखादे बोट कापले तरी 2-3 दिवसात त्या जागी दुसरे बोट तयार होऊन तुटलेल्या बोटाची जागा भरून काढत होती. एक हात कापून ठेवला तरी महिन्याच्या आत तेथे नवीन हात उगवत होता. हात कापल्याचे वा नवीन हात आल्याच्या खुणासुद्धा तेथे दिसत नव्हत्या. टीव्ही प्रेक्षकांना हे सर्व मजेशीर वाटत होते.

काही दिवसांनी सुभाषचे शरीर या जनुकांना साथ देईनासे झाले. बघता बघता त्याचे एकेक अवयव निकामी होऊ लागले. डॉक्टरांना फार काळजी वाटू लागली. त्याला वाचवण्याचा शेवटचा उपाय म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यातील मेंदूला अलगद बाहेर काढून दुसऱ्या एका मृतशरीरामध्ये रोपण केले. या ऑपरेशनच्या वेळीसुद्धा झालेल्या घोर चुकीमुळे त्याच्या मेंदूचे दोन भाग झाले. डावा मेंदू उजव्या मेंदूपासून वेगळा झाला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या दोन्ही मेंदूंचे दोन मृतशरीरात रोपण करून सुभाषचे ‘जीव’ वाचविले.

ऑपरेशननंतर हा सुभाष दोन्ही शरीरात होता. या दोन्ही शरीरातील मेंदूतही बदल/वाढ होऊन प्रत्येक शरीरात स्वतंत्रपणे मेंदू कार्य करू लागले. परंतु आता एक सुभाषऐवजी दोन सुभाष आपल्यासमोर उभे होते. दिसण्यात जुळ्या भावासारखे नसले तरी त्यांची मानसिक अवस्था (अंकुर वा जुडवा चित्रपटातील) जुळ्या भावासारखीच होती. सुभाषच्या शारीरिक हालचाली, त्याचे स्वभाव विशेष, त्याच्या गतकालच्या आठवणी, इतराशी वर्तणूक हे सर्व या दोन्ही शरीरात तंतोतंत जुळत होत्या. सुभाषच्या मित्र-मैत्रिणी वा नातलगांनी कितीही खोदून विचारले तरी हे दोन्ही ‘सुभाष’ ऑपरेशन पूर्वीच्या खऱ्याखुऱ्या ‘सुभाष’सारखे उत्तरं देत होते. संशयाला अजिबात जागा नव्हती.

याच सुमारास काही कायदेशीर बाबी समोर आल्या. हिंदू वारसा कायद्यानुसार सुभाष सारेपाटिलाला काही मालमत्ता मिळणार होती. जमीनीत वाटा मिळणार होता. परंतु या दोन ‘सुभाष’पैकी कुणाच्या नावे या संपत्तीची नोंद करायची? यातला खरा सुभाष कोण? दोघेही खरे असण्याची शक्यता नाही. परंतु कदाचित असतील का?
(Reasons and Persons – Derek Parfit)
** ** **
शेर्लाक होम्ससारख्या गुप्तहेराप्रमाणे आपण प्रथम येथे नेमके काय झाले, घटना कशा घडत गेल्या, व फॅक्ट्स काय आहेत याचा शोध घेणे गरजेचे ठरेल. आपल्या समोर दोन सुभाष आहेत – हवे असल्यास त्यातील एकाला - ज्याच्यात उजवा मेंदू आहे त्याला - उजवा सुभाष व दुसऱ्याला - ज्याच्यात डावा मेंदू आहे त्याला - डावा सुभाष असे आपण म्हणू शकतो. यापैकी खरा सुभाष कोण याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे.

दोघेही सुभाष नाहीत हे मात्र नक्की. कारण मेंदूचे दोन भाग झाल्यानंतर त्या मेंदूचे दोन शरीरात रोपण झाले आहे. जर उजवा सुभाषचा काही कारणामुळे मृत्यु झाल्यास व डावा सुभाष जिवंत असल्यास सुभाष जिवंत आहे असे म्हणता येईल का? एकाच वेळी माणूस जिवंतही असू शकतो व मृतही असे होऊ शकत नाही. त्यामुळे खरा सुभाष हा डावा-उजवा सुभाष यातला होऊ शकत नाही.

उदाहरणार्थ ऑपरेशनच्या वेळी उजवा मेंदू जिवंत व डावा मेंदू मृतावस्थेत असता तर उजवा सुभाषच मूळ सुभाष असे गृहित धरून सर्व मालमत्ता त्याच्या नावे केल्यास कुणीही हरकत घेतली नसती. परंतु डाव्या मेंदूची पुनर्निमिती झालेली असल्यामुळे आपल्याला डावा – उजवा सुभाषमध्ये मूळ सुभाष कोण हे ओळखता येईनासे झाले आहे. कदाचित डावा वा उजवा सुभाष हे मूळ सुभाषच नाहीत असेही आपण दावा करू शकतो. परंतु हे जरा विचित्रच वाटेल. मूळ सुभाषच्या शरीराच्या बाहेर काही तरी अघटित घडल्यामुळे कुणालाही मालमत्ता देऊ नये हा निर्णय योग्य ठरणार नाही.

फार फार तर (छाप-काटा टाकून) आपणच - डावा किंवा उजवा सुभाष - यापैकी एकाची खरा सुभाष म्हणून निवड करून त्याच्या नावे मालमत्ता करून हे प्रकरण मिटवायचे (दाबायचे) असेही ठरवू शकतो. परंतु असे करणे दुसऱ्या सुभाषवर अन्यायकारक ठरेल. कारण यातील प्रत्येकाची सुभाष म्हणूनच ओळख निःसंशयपणे सिद्ध झाली आहे. व ही ओळख मनमानी नव्हती याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. त्यामुळे दोघेही वा यापैकी एक जण, किंवा यापैकी कोणीही नाही या शक्यता असून या तिन्ही शक्यता चुकीच्या आहेत असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे. परंतु यातील एक तरी बरोबर आहे व त्याला पर्याय नाही.

एखाद्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरापैकी एकही उत्तर पुरेसे ठरत नसेल तर आपण चुकीचे प्रश्न विचारत आहोत की काय असे म्हणता येईल. तुम्ही तुमच्या बायकोला रोज मारायचे हे कधी थांबवलात? या प्रश्नाला होय किंवा नाही हे उत्तर पुरेसे ठरत नाही. कारण होय म्हटल्यास मी रोज मारत होतो व अलीकडेच मारणे थांबवले आहे असा अर्थ ध्वनित होऊ शकतो. किंवा नाही म्हटल्यास मी अजूनही बायकोला मारतो अशी कबूली दिल्यासारखे होईल. परंतु बायकोला कधीच मारत नव्हता अशा व्यक्तीचे उत्तर काय असू शकेल?

या रोपण माणसाच्या संदर्भातील प्रश्नामध्ये आपण त्याची ओळख यापूर्वीच्या गतकाळातील घटनाक्रमावरून व त्याच्या सत्यतेवरून खचित केली होती. परंतु ओळख नेहमीच बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे. केवळ भूतकाळावरून आपण व्यक्तित्वाला जोखत असल्यास ते पुरेसे ठरणार नाही. भूतकालापेक्षा वर्तमान व भविष्य यातील सातत्य टिकवण्यातच आपले व्यक्तित्व उभारून येत असते. त्यामुळे या प्रकरणात सातत्याच्या संदर्भातील प्रश्न विचारून निर्णय घेणे शक्य झाले असते.

सातत्यात नेमके काय हवे? आपले शरीर? आपला मेंदू? आपली चेतना? आपल्यातील आत्मभान? की आणखी काही तरी....

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मूळ सुभाषे आधार बघा.ठसा कोणता मॅच होतो ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

खेळाडू स्त्री का पुरुष हे ठरवण्याची वेळ आली तर त्यांची गुणसूत्रं तपासतात. मालमत्ता वारसाहक्कानं देण्यामागे गुणसूत्रं पुढे नेणं असा विचार असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आधारकार्ड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0