वलय - प्रकरण ४८ ते ५२ (समाप्त)

वलय - प्रकरण ४३ ते ४७ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6524

प्रकरण 48

सुनंदा राजेश सोबत राहायला मुंबईत आपल्या बाळासह आली. राकेशने बाळाचे नाव “अक्षर” ठेवले.

दरम्यान अभिजित श्रीवास्तवसाठी राजेशने लिहिलेल्या स्क्रिप्टमुळे प्रभावित होऊन अमितजींनी राजेशला जो एक गुप्त प्लान सांगितला होता त्याची वेळ येऊन ठेपली होती.

अमित श्रीवास्तव यांचा “मालामाल हो जाओ” या कार्यक्रमाचा नुकताच दहावा सिझन सुरू झालेला होता आणि त्याच्या शुक्रवारच्या खास एपिसोड मध्ये अमितजिंनी सिनेक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या राजेशला निवडले होते. सिने क्षेत्रातील लेखकांसाठी त्याला काहीतरी कामगिरी करायची आहे हा विचार अमितजींना आवडला. आणि नेहमीप्रमाणे डायरेक्ट दहा हजाराच्या प्रश्नापासून सुरुवात केली गेली.

विशेष म्हणजे अमितजींच्या खास विनंतीवरून हा शो लाईव्ह ठेवण्यात आला होता आणि शोचे सर्वेसर्वा "कमलेन्द्र बोस" यांनी अमिताभच्या विनंतीला मान दिला होता.

गेम शो सुरु होण्याआधी -

"राजेश जी, आम्हाला सांगा, तुम्ही येथून एक करोड जिंकलात तर त्या पैशांचे काय करणार आहात?"

"या सिनेसृष्टीत मी अनेक वर्षांपासून फ्री लान्स फिल्म जर्नालिस्ट आणि एक लेखक आणि समीक्षक म्हणून कार्यरत आहे. येथून मी जी काही रक्कम जिंकेन त्यातील काही रक्कम मी या क्षेत्रातील लेखक आणि पत्रकार यांचेसाठी एक संस्था उघडून त्यांना आर्थिक मदत तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वापरेन!"

"धन्यवाद राजेश जी बहोत उमदा विचार ही आपके! तो चलीये खेलते है - मालामाल हो जाओ!"

खेळ सुरु होतो -

"तो राजेश जी, अगला प्रश्न दस हजार रुपये के लिये ये रहा आपके कंप्युटर स्क्रीन के ऊपर!"

इनमेसे कौन "कौन है वह" फिल्म मे भूत नही बना है?
1. राकेश कुमार
2. पवन ममतानी
3. फारुख पटेल
4. अनिता राठी

"सर D अनिता राठी"

"बिलकुल सही जवाब आपका! अगला प्रश्न बिस हजार रुपये के लिये ये रहा!

आपको एक गाना सुनाई देगा आपको बताना है ये किस अभिनेत्री पर चित्रित किया गया है?
"राजाजी का बजा दूंगी मै बाजा, तो फिर नाच नाच, नाच नाच, नाच रे मन मोहना!"
1. शिवानी संध्या
2. मनमित कौर
3. साबरिना सोनाटा
4. मधुमालीनी मेहता

सर "मनमित कौर" पर ठप्पा लगा दो.

मुबारक हो! आप बिस हजार जित गये.

चालीस हजार रुपये के लिये अगला प्रश्न ये रहा!

1983 का वर्ल्ड कप भारत ने जीता तब कप्तान कौन थे?
1. सुनील गावस्कर
2. कपिल देव
3. रवी शास्त्री
4. राणा दुग्गुबाती

सर "कपिल देव" पर ठप्पा लगा दो.

बिलकुल सही जबाब आपका!

अस्सी हजार लिये प्रश्न ये रहा

कौनसे फिल्म मे फिल्म के हिरो राजेंद्र शास्त्री मोबाईल के टॉवर पर चढ जाते है?
1. आग के गोले
2. भोले दोस्त
3. जाली दुश्मन
4. कालिया का बदला

सर "आग के गोले" पर सिक्का मार दो.
अस्सी हजार जित गये आप.
एक लाख साठ हजार के लिये प्रश्न ये रहा.

इनमेसे कौनसी फिल्म पाच साल थिएटर मे चली?
1. भले आदमी दुल्हन चुरा लेंगे
2. ‎हमारी दुल्हनियाँ की मेहंदी
3. मेहंदी वाले हाथो में कंगना खनक खनक जाए
4. चुडियो का चाँद

सर ऑप्शन मेहंदी वाले हाथो पर ठप्पा लगा दो .
आ बिलकुल सही जवाब!
एक लाख साठ हजार जित गये आप.

पुढे आणखी प्रश्न विचारले गेले. तोपर्यंत फक्त एकच चौथी लाईफलाईन उरली होती.
कॉल युवर बडी!
आणि शेवटी एक करोडचा प्रश्न आला.

"किस्मत का खेल" इस फिल्म की कथा किसने लिखी?
1. के. के. सुमन
2. पि. के. सुमन
3. ‎आनंद कुमार
4. ‎संतोष ठाकूर

राजेश मुद्दाम विचारात पडला. त्याला उत्तर माहित नाही असे तो चेहऱ्यावर दाखवू लागला.

"राजेश जी, आप लेखक है और आपको इसका उत्तर मालूम होना चाहिये!"

तरीही राजेश विचारात गढलेला दिसत होता.

"कोई बात नही. अगर उत्तर मालूम नही हो तो अभी भी आपके पास एक लाईफलाईन बची है! कॉल युवर बडी!"

"ठीक है सर! मै लाईफलाईन युज करना चाहूँगा!"

"किसे कॉल लगायेंगे आप?"

"सर मेरा दोस्त! माझे चांगले मित्र आहेत जे आता फिल्म इंडस्ट्री मध्येच कार्यरत आहेत - सारंग सोमैय्या! त्यांना मी कॉल करू इच्छितो!"

"कंप्युटर भैय्या, सारंग जी को फोन लगाया जाय!"

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग

"सारंग सहाब नमस्ते, मैं अमित श्रीवास्तव बोल रहा हूं, मालामाल गेम शो से!"

"सर, नमस्कार कैसे है आप?"

"मैं बढिया हुं, आप बताईए क्या हालचाल है आपके?"

"बस सर! आपके राज मे सब कुछ ठीक चल रहां हैं!"

"अरे अरे ऐसां मत काहिये. मेरे सामने बैठे है राजेश. वे पचास लाख जित गये है और उन्हे जरुरत हैं आपकी मदद की एक करोड के सवाल के जवाब के लिये. वें अब प्रश्न पढेंगे!"

काउन्ट डाऊन सुरू झाले.

राजेश सारंगशी बोलू लागला, "सारंग, किस्मत का खेल या हिंदी चित्रपटाची कथा कुणी लिहिली, मी ऑप्शन वाचतो..!"

राजेशला मध्येच तोडत सारंग म्हणाला, "राजेश अरे, ऑप्शन वाचायची काय गरज आहे? या चित्रपटाची कथा तूच तर लिहिली आहेस राजेश!"

एव्हाना हा कार्यक्रम बघणाऱ्या कुणीतरी पिके आणि केकेला फोन करून टिव्ही लावायला सांगितले आणि मालामाल कार्यक्रम बघायला सांगितले. आतापर्यंत त्या कार्यक्रमात काय काय झाले हे सांगितले.

पिके आणि केकेला आता काहीतरी मोठा घोळ होणार आणि आपण अडकणार आणि आपले बिंग फुटणार याची चाहूल लागली...

"क्या बात कर रहे हो आप सारंग भाई? कृपया राजेश को चार ऑप्शन में से सही जवाब बताईये, समय बीता जा रहा है."

"सर, अब मैं क्या बताऊ आपको, सच हकीकत तो राजेश ही बतायेगा आपको, राजेश जिस पेन से आप कागज पे लिखते हो उस पेन की कसम और जिस कीबोर्ड से आप कंप्युटर पर टाईप करते हो उस कीबोर्ड की कसम, आपको सच बोलना पडेगा!"

राजेश ने विचार केला आणि सूचक नजरेने अमितजी कडे पाहिले आणि शेवटी बोलायला लागला, "हो, अमितजी! किस्मत का खेल या चित्रपटाची कथा ज्यात तुम्ही काम केले होते आणि तो चित्रपट खूप हीट झाला होता, त्याची कथा मी एका दिवाळी अंकात म्हणजे दिवाळीच्या काळात छापले जाणारे मराठी मॅगझिन यात लिहिली असून ती केके सुमनने चोरली आणि स्वतः च्या नावावर खपवली! इसलिये इस सवाल के चार ऑप्शन गलत हैं अमितजी! सही जवाब हैं राजेश, खुद मैं!"

"आप केके जैसे महान हस्ती पर गलत इलजाम लगा रहे हैं राजेश, क्या सबूत हैं आपके पास?"

"सर, अगर आप आज्ञा दे तो मेरे पास एक व्हिडिओ हैं! मोबाईल में. आप कृपया इस बडे परदे पर दिखाईये."

"ये गेम शो एक अजीब मोड पर आकर रुका हैं. मैं इस गेम शो के मालिक "कमलेन्द्र बोस" से मिलकर पाच मिनट मे आता हूं, तब तक आप हॉट सीट पर बैठे रहे!"

दरम्यान या शोने अतिशय वेगळे वळण घेतल्याने भारतात सगळीकडे अनेक लोकांनी एकमेकांना नातेवाईकांना मित्रांना फोन करून करून टीव्हीवर तो प्रोग्राम लावायला सांगितले.

कमलेंद्रने अमितजींना अर्थातच व्हिडिओ दाखवण्याची परवानगी दिली कारण हे आधीच ठरलेले होते. हे राजेशलाही माहीत होते. प्रेक्षकांना मात्र हा रियालिटी शो रियल वाटावा म्हणून थोडेसे रियल नाटक केले गेले. राजेशने त्या रात्री रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ प्ले केला आणि केकेचे सगळे बिंग फुटले.

केके ला अस्वस्थ वाटू लागले. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. पिकेने कोर्टात मानहानीचा दावा दाखल करायचे मनोमन ठरवले पण वीणा वाटवेने त्याला रोखले.

मग त्या कार्यक्रमात अनेक प्रेक्षकांचे फोन आले. प्रेक्षकांनी राजेशची सहानुभतीपूर्वक चौकशी केली. अनेक प्रश्न विचारले. अनेक लेखकांचे फोन आले. त्यांनी राजेशला या धाडसी कृत्याबद्दल धन्यवाद दिले. अनेक दिवाळी अंकांच्या लेखकांनी, संपादकांनी कार्यक्रमात फोन केले आणि राजेशचे आभार मानले. केकेच्या कास्टिंग काऊचला बळी पडलेल्या काही जणींनी सुध्दा कार्यक्रमात फोन केला. त्या आजही बॉलीवूड मध्ये काही ना काही दुय्यम भूमिका करत होत्या.

राजेशच्या टीम मधील एकाने एकंदर परिस्थिती पाहता ठरल्याप्रमाणे कोर्टात राजेश तर्फे केकें विरुद्ध केस दाखल केली. केके ला हॉस्पिटल मधून बरे वाटल्यावर पोलिस अटक करणार होते. जवळपास आता केके वर आरोप निश्चिती झाली होती. कोर्टात रितसर आरोप निश्चित होऊन जवळपास के के ला अटक होण्यासारखी परिस्थिती निश्चित होती.

कोर्टात केकेच्या वकिलाने असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला की, राजेशने धोका देऊन केकेच्या असिस्टंटला व्हिडिओ समोर धमकावून खोटे खोटे आणि बळे बळेच केकेला त्याने न केलेला गुन्हा कबूल करायला लावला पण एकंदर कास्टिंग काऊचला बळी पडलेल्या अनेक जणींनी आणि शेवटी मतपरिवर्तन झालेल्या पिकेने केकेच्या विरोधात साक्ष दिल्याने तसेच रत्नाकर रोमदाडेने प्रतीपक्षाच्या वकिलाने केलेल्या प्रश्नांवर पत्करलेली शरणागती आणि त्याची उडालेली भंबेरी आणि शेवटी त्याने कबूल केलेला गुन्हा यामुळे आरोप निश्चिती झाली.

कोर्टाने दोन गुन्ह्यांखली केकेला एकूण दोन शिक्षा सुनावल्या: चार वर्षांचा तुरुंगवास आणि नुकसान भरपाई म्हणून राजेशला पन्नास लाख रुपये देण्याचा आदेश दिला. मालामाल हो जाओ कार्यक्रमात मिळालेले एक कोटी रुपये राजेशने ठरल्याप्रमाणे संस्थेसाठी वापरण्याचे ठरवले आणि पन्नास लाख रुपये त्याला कोर्टाकडून भरपाई म्हणून मिळाले.



प्रकरण 49

फिल्म इंडस्ट्रतील सर्वात प्रतिष्ठेचा आणि सर्वात जुना अवार्ड "मॅडम फिल्म मॅक्सीमा" (MFM) अवार्ड मिळवणे आजही फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी अतिशय सन्मानाचे वाटत असे. मॅडम अवार्ड हे मॅडम अकादमी तर्फे चालवले जात. पूर्वी "फिल्म मॅक्सीमा" मासिकातर्फे चालवत येणारा हा अवार्ड नंतर मॅडम अकादमीने स्पॉन्सर करायला सुरुवात केली होती. या अवार्डसाठी सगळेच आधीपासून तयारीला लागले होते. गेल्या काही वर्षांपासून या अवार्डमध्ये टेलिव्हिजन अवार्ड सुध्दा सामील करण्यात आल्याने जवळपास सर्वच कलाकार या फंक्शनला यायचे. यात मराठी चित्रपट आणि सिरियलचे पण अवार्ड सामील होते.

हा अवार्ड शो वगळता इतरही अनेक संस्था अवार्ड द्यायच्या. असे एकूण जवळपास सोळा ते सतरा वेगवेगळ्या प्रकारचे अवार्ड दरवर्षी दिले जायचे. पण कलाकारांसाठी मॅडम फिल्म मॅक्सीमा हा अवार्ड खूप प्रतिष्ठेचा होता. हॉलीवूडच्या “गोल्डन वर्ल्ड अवार्ड”च्या तोडीचा हा अवार्ड मानला जात होता.

माया माथूरला या वर्षी आश्चर्यकाररीत्या “बेस्ट फीमेल लीड इन कॉमिक रोल” साठी नॉमिनेशन मिळाले होते आणि तिला स्पर्धेला फक्त आणखी एक नटी होती पण मायाच जवळपास तो अवार्ड पटकावणार हे जवळपास निश्चित झाले होते. आपले जुळे मुलं आणि डॉक्टर पती यांच्यासमवेत ती अवार्ड फंक्शनला आली होती. अजूनपर्यंत तिने तिला मिळालेल्या धमकीबद्दल नवऱ्याकडे अवाक्षर सुध्दा काढले नव्हते कारण झालाच तर चित्रपट केल्याचा तिला फायदाच झाला होता पण आताशा काही दिवसांपूर्वी कातील खान तिच्याशी अकारण जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता आणि ते तिला खटकत होते. पण सूरज सोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्याने तिने सूरजला त्याबद्दल तक्रार केली नव्हती. आणि इतक्या उशिरा नवऱ्याला सांगितले तर तो ओरडणार अशा विवंचनेत ती होती. पण चेहऱ्यावर दाखवू शकत नव्हती.

राजेश सुध्दा सुनंदा, त्याची आई आणि त्याच्या मुलासह तेथे उपस्थित होता. सारंग, पिके, वीणा आणि राजेशच्या टीम मधील मंडळी तेथे उपस्थित होती. राजेशचे फिल्मी करियर एकदम सुरळीत सुरू होते. त्याचा कथाचोर सापडला होता त्याला अमितजींच्या मदतीने अटकही झाली होती, त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत राजेशला एक वेगळेच “वलय” प्राप्त झाले होते. त्याचेकडे सगळे लोक आदराने बघत होते. अख्ख्या इंडस्ट्रीतील लेखकांचा त्याला पाठिंबा मिळाला होता. त्याचे पर्सनल लाईफसुध्दा रुळावर आले होते.
पिके आणि वीणा आता रिलेशनशिप मध्ये होते. त्याचे मतपरिवर्तन झाले असले आणि कोर्टात त्याने वडिलांविरोधात साक्ष दिली असल्याने त्याला सगळीकडे सहानुभूती मिळाली असली तरीही मनाच्या कोपऱ्यात एके ठिकाणी त्याला राजेशाबद्दल अढी होतीच. पार्टीत तो जरी सगळ्यांत मिसळत असल्याचे वाटत होते तरीही ते फक्त वरवरचे होते. मनातून त्याला या पार्टीत बिलकूल स्वारस्य नव्हते. त्याचे वडील तुरुंगात होते आणि आई मुंबईतच वडिलांपासून वेगळी रहात होती. केकेला अटक झाल्यानंतर मात्र तिचा फोन त्याला आला होता. त्याची विचारपूस तिने केली होती. आई वडिलांचे वेगळे राहण्यामागचे कारण होते “मिनालिका रेड्डी” ही नटी! तिचे केके सोबत अफेअर होते.

आता वीणा त्याचसोबत त्याच्या घरी राहायला लागली होती. दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. पिके बराच वेळ एका खुर्चीवर बसून शून्य मनाने समोर स्टेजवर काय चालले आहे ते बघत होता. त्याच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन आकाराला येत होता. आपल्या त्या प्लॅनवर त्याच्या गालावर हास्याची लहर उमटली.

अमितजी आजच्या अवार्ड फंक्शन मध्ये राजेशची भेट एका व्यक्तीशी घालून देणार होते ज्यामुळे राजेशला हॉलीवूडच्या चित्रपटासाठी लेखनाची संधी मिळणार होती कारण आजच्या फंक्शनला त्या भव्य हॉलीवूड चित्रपटाची टीम येणार होती.

सध्या राजेशच्या मनात अजून एक कथा घोळत होती. फिल्म इंडस्ट्री मध्ये घडणाऱ्या घटनांवर त्याला एक कथा लिहून त्यावर चित्रपट बनवायचा आणि त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याला स्वतः करायचे होतें. त्यात तो त्याची स्वतःची कथा चोरीची कहाणी आणि इतर काही पात्रांच्या कथा मांडणार होता. थोडे सत्य आणि थोडे काल्पनिक असे मिश्रण त्याच्या कथेत असणार होते. त्याचा प्लॉट त्याच्या मनात तयार होता आणि थोडे थोडे लिखाण त्याने सुरू सुध्दा केले होते पण त्या आधी हॉलीवूडची संधी त्याला घ्यायची होती...

या वर्षी बॉलीवूड मध्ये बॉलीवूडच्याच पार्श्वूमीवर चित्रपट बनला होता: "रांगिला राजन". त्या अनुषंगाने राजेश आणि त्याच्या टीम मध्ये सहज चर्चा चालली होती.

राजेश म्हणाला, "एक मात्र नक्की! इतर विविध क्षेत्रातील घडामोडींवर काल्पनिक कथा लिहून आपण बॉलीवूडवाले त्यात खूप ड्रामा भरतो. काही वास्तववादी चित्रपट सोडले तर अशा नाट्यपूर्ण चित्रपटात जसे दाखवतात तशा घटना त्या त्या क्षेत्रातील लोकांच्या जीवनात कधी खरोखर घडत नाहीत, पण पडद्यावर ते नाट्य आपल्याला बघायला आवडते, नाही का? आणि कथानक पूर्ण काल्पनिक असेल तर त्या क्षेत्रातील फारसे कुणी ऑब्जेक्शन घेत नाहीत. कारण त्यांनीही तो पडद्यावरचा ड्रामा मनातून आवडत असतोच!"

"बरोबर आहे राजेश, त्यामुळेच तर ते चित्रपट चालतात कारण त्यात मसाला असतो, ड्रामा असतो, सगळं लार्जर दॅन लाईफ असतं. जे खऱ्या जीवनात त्या त्या क्षेत्रात कधी घडू शकत नाही."

"मग फिल्मी क्षेत्रावर जर असे अनेक मसालेदार, नाट्यपूर्ण घडामोडी असलेले चित्रपट बनवले तर काय बिघडले? आणि कुणी लेखकाने चित्रपट सृष्टीवर अशी नाट्यपूर्ण कथा लिहिली तर काय बिघडलं? मी तर लिहिणार आहे! माझ्यासोबत घडलेल्या कथाचोरी बद्दल मी एक चित्रपटाची कथा लिहिणार! स्वत: प्रोड्यूस करणार!!"

ही चर्चा मन लावून आणि कान टवकारून बाजूला गप्पा उभा असलेला संदीप पटेल हा निर्माता बऱ्याच वेळेपासून ऐकत होता. तो “हिरेश रासिलीया” या प्रसिद्ध संगीतकाराशी बोलत होता. हा संगीतकार नंतर गायला सुद्धा लागला होता पण त्याचे “गाणे” फारसे लोकांनी पसंत केले नाही तरीही तो गातच सुटला होता. नंतर त्याही पुढे जाऊन त्याने अक्षरश: अभिनय करायला सुरुवात केली, जे लोकांना त्याच्या आवाजापेक्षाही जास्त असह्य होऊ लागले पण त्याने प्रयत्न करणे काही सोडले नव्हते. प्रत्येक अवार्ड शो मध्ये हा संगीतकार आवर्जून डायरेक्टर, प्रोड्युसर तसेच कास्टिंग डायरेक्टर वगैरे मंडळीना भेटत राहायचा जेणेकरून कुणीतरी त्याला “अभिनय” करायला देईल! गाणे आणि अभिनय या हट्टापायी त्याच्यातला संगीतकार मात्र कुठेतरी हरवत चालला होता पण त्याला त्याचेशी काही घेणे देणे नव्हते!

इकडे राजेश आणि टीममध्ये गप्पा चालूच होत्या.

"मुळीच काहीच नाही बिघडलं. लिही बिनधास्त राजेश. लिहित रहा, लिखाण एन्जॉय करत रहा! आम्ही सर्व तुझ्या कायम पाठीशी आहोत."

"धन्यवाद माय डियर टीम!" राजेश म्हणाला.

आणि मग त्यांनी आपापले ग्लास उंचावत चीयर्स केले.

हा चियर्सचा जल्लोष बघून संदीप पटेल हिरेशला एक्स्क्यूज मी करून त्या टीमजवळ आला आणि राजेशला म्हणाला,

“राजेश, आप बडे लेखक हो, पत्रकार हो, बडे बडे लोगों मी उठना बसना है आपका! अच्छी बात है! लेकीन सर जी, फिल्म इंडस्ट्री में रहके फिल्म इंडस्ट्री के ही बारे में या फिर इंडस्ट्री के लोगों के बारे में भला बुरा लिखना नाही चाहिये राजेस बाबू!”

राजेश म्हणाला, “क्यो? आपको ऐसा क्यों लागता है?”

संदीप म्हणाला, “देखो राजेस भाई! ये बात तो ऐसी हो गयी ना की पानी में रहके मछली से बैर! पहले ही आपने केके सुमन जैसी हस्ती से पंगा ले लिया है, तो क्यो बार बार अपनीही घरकी मछली से पंगा लेना? है ना? क्युं भाई सारंग सोमैय्या जी ? सही कहां न मैने?”

सारंग म्हणाला, “छोडो ना मोटा भाई! आप पार्टी एन्जॉय करो! राजेस भाई देख लेंगे क्या करना है! क्युं राजेस?” असे म्हणून सारंगने डोळा मिचकावला आणि सगळी टीम खळाळून हसायला लागली. या प्रकाराने अपमान वाटून संदीपने चिडून तेथून काढता पाय घेतला आणि हिरेश सोबत जॉईन झाला.

भव्य 4K हॉलीवूड चित्रपट निर्माण करणार असलेल्या त्या हॉलीवूड टीमला आजच्या या अवार्ड फंक्शनच्या आधारे एका दगडात अनेक पक्षी मारायचे होते, त्यापैकी महत्त्वाचा पक्षी म्हणजे प्रदर्शनाआधीच त्या चित्रपटाची जबरदस्त हवा आणि पब्लिसिटी भारतात करायची!! भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात चित्रपट हिट झाला तरी निर्मात्याचे अर्धे पैसे वसूल होणार होते.

आता फक्त उत्सुकता होती त्या व्यक्तीला भेटण्याची जी राजेशला हॉलीवूड लेखनासाठी चान्स देण्याची शक्यता होती आणि जिथे अमितजी सारखा कलाकार राजेशची शिफारस करणार तिथे नाही म्हणण्याची कुणाची मजाल? या संधीसाठी राजेशने अनेक हिंदी मराठी चित्रपट निर्मात्यांची ऑफर नाकारली होती. कारण त्याला आता हॉलीवूडसाठी लेखनाचा अनुभव घेऊन बघायची उत्सुकता होती. दरम्यान त्याची फिल्मी पत्रकारिता थोड्या प्रमाणात सुरूच होती.

आजच्या कार्यक्रमातला राजेशच्या जीवनातला विशेष “अवार्ड विनिंग सीन” म्हणजे सुनंदा आणि मोहिनी अवार्डच्या ठिकाणी अगदी हसत खेळत एकमेकांशी बोलत उभ्या होत्या. एकमेकांना काय हवं नको ते विचारत होत्या. पूर्वी मोहिनीमुळे निर्माण झालेल्या गैरसमजामुळे जो गोंधळ उडाला होता ते आठवून आठवून हसत होत्या त्या दोघी!!

राजेशने स्वतःला एक चिमटा काढला आणि हे सगळे सत्य आहे याची खात्री करून घेतलीं. हॉलीवूडची टीम अजून अवार्ड नाईट मध्ये यायची बाकी होती. ते एक सरप्राइज असणार होते. ती टीम अवार्ड नाईटच्या आधी फक्त ठराविक लोकांनाच भेटली होती.

अवार्ड नाईट मध्ये अभिनेत्री रिताशा सुध्दा भूषण ग्रोवर सोबत आनंदाने बागडत असतांना दिसत होती. त्या दोघांनी लग्न केले होते...

सोनी बनकर मात्र कुठेच दिसत नव्हती. सुभाष भट सोबत तिने केलेला एकच सिनेमा बऱ्यापैकी हीट झाला होता पण नंतर भूषण ग्रोवर सोबत तिचे संबंध ताणले गेल्याने आणि नंतर त्याने तिला घटस्फोट दिल्याने ती मनातून पूर्ण कोलमडून गेली होती. नंतर तिने कोणत्याही चित्रपट किंवा टिव्ही निर्मात्याची ऑफर स्वीकारली नाही. घटस्फोटानंतर ती मुंबई शहरातून दिसेनाशी झाली. कुणाच पत्रकाराला किंवा तिच्या ओळखीच्या लोकांना माहिती नव्हतं की सोनी नेमकी गेली कुठे?

आयुष्यात बालपणी अनेक सुख दुःखाचे चढ उतार पाहिल्यानंतर, ती मुंबईत आली आणि होती आणि आईशी खोटे बोलून तिने “मॅडम अॅकॅडमी” जॉईन केली. मग साकेतच्या रूपाने तिला मित्र मिळाला पण तोही सोडून गेला. कालांतराने सेल्फी प्रकरणाचे निमित्त होऊन आईने तिच्याशी संबंध तोडले पण तिच्या शिक्षणावर तिच्या काकांनी केलेल्या खर्चाची भरपाई तिला महिन्याला पैसे गावी पाठवून करावी लागली.

पण जमेची बाजू म्हणजे तिच्या आवडीच्या क्षेत्रात चांगले काम मिळवून लग्न झाले आणि थोडा सुखी संसार सुरू झाला असतांना आणि नवऱ्याकडून प्रेम मिळू लागले असताना अचानक नवऱ्याकडून अनपेक्षितरित्या दुसऱ्या स्त्रीसाठी घटस्फोटाची नोटीस सोनीला मिळाली आणि तिने ती शेवटी स्वीकारली.

पण या सर्व प्रकारामुळे ती खूप कोलमडून पडली. आई सुद्धा पारखी झाली होती आणि वडील तर नव्हते. साकेत सारखा मित्र पण तिच्या जवळ नव्हता.

फिल्मी जगतात मिळाला तर एकदम वलयांकित झगमगाट मिळतो नाहीतर मग टोकाचे दुःख काहींच्या वाट्याला येतं. तिला हे ब्रेकअप, हे दुःख सहन झाले नाही. अनेक महिने काम न मिळाल्याने आणि जे काही मिळाले ते काम तिने दुःखाच्या भरात न स्वीकारल्याने तिला पैशांची चणचण भासू लागली होती. मग शहरात अक्षरशः ती केस विस्कलेल्या स्थितीत आणि विमनस्क अवस्थेत कुणी ओळखू नये म्हणुन अंगावरून आणि चेहऱ्यावरून शाल पांघरून इकडे तिकडे फिरू लागली.

काही दिवस अक्षरशः फूटपाथवर झोपली आणि मग जे काही थोडे पैसे होते त्याद्वारे ती तिच्या मूळ गावी गेली. तेथे तिला कुणीही ओळखले नाही. पुन्हा आई आणि गाववाले आपल्याला स्वीकारणार नाहीत हे तिला मनोमन पटले होते. आईने स्वीकारले तरी तिचे काका काहीतरी गडबड घोटाळा करणार आणि तिला सुखाने जगू देणार नाही हे तिला कळून चुकले होते.

नेहमी काहीतरी सनसनाटी बातम्या हव्या असणाऱ्या काही ठराविक न्यूज चॅनल्सनी तिच्या गायब होण्यावर अनेक कार्यक्रम बनवले. काही मराठी चॅनल्सनी सुध्दा तसे कार्यक्रम बनवले. सोनी गायब होण्यामागे तिचा घटस्फोट हेच एक प्रबळ कारण असावे असे चॅनलवाले वारंवार ओरडून सांगत होते.

रात्र झालेली होती. सोनीच्या मूळ गावात असाच एक कार्यक्रम सोनीची आई बघत होती आणि तिला सोनीची खूप आठवण आणि दया आली. ती रडू लागली. तिच्या स्वत:च्या घराच्या आसपास फिरत असताना सोनीला खिडकीतून तो टिव्ही आणि तो प्रोग्राम दिसले. आई आणि काका तो प्रोग्राम बघत होते. आईला रडताना बघून तिला वाईट वाटले. त्या गावात सोनीला कोणीही ओळखले नाही. असेल कुणी एक वेडी भिकारीण म्हणून लोकांनी दुर्लक्ष केले.

एक क्षण सोनीला वाटले की पुन्हा आईच्या कुशीत शिरावे, रडावे आणि आईसोबत राहावे..

सोनीच्या वडिलांच्या हार घातलेल्या फोटोखाली असलेल्या पलंगावर बसून टिव्ही बघता बघता डोळे पुसत सोनीची आई तिच्या काकाला म्हणाली, "पोरगी लई वाया गेली! बरं झालं तिला धडा मिळाला! सटवी कुठली! कुठे मरून गेली असेल तर निदान तिच्या जीवाले शांती भेटेन!"

"आन आपल्या बी!" डोळे मिचकावत काका म्हणाला आणि तिच्या आईला त्याने कमरेभोवती हात घालून जवळ ओढून घेतले. सोनीच्या वडलांच्या फोटोला घातलेला हार थोडासा हलल्यासारखा वाटला. जणू काही तिचे वडील तिला आपल्या दु:खाची जाणीव करून देत होते.

हे बघून आणि ऐकुन हुंदका आवरत सोनी तेथून तडक पळतच निघाली आणि गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या पुलावर चालत गेली. पुलावरून कठड्याला टेकून खालच्या नदीतल्या अंधाऱ्या पाण्याकडे तिने बघितले.

काळाकुट्ट अंधार! आणि नदीपात्रातले काळेशार भीतीदायक पाणी! त्या पाण्याकडे ती बघत राहिली आणि रडत राहिली.

अचानक त्या पाण्यात तिला उजेड जाणवला आणि त्या उजेडात तिला तिचे वडील दिसले.

या क्षणी तिला वडलांची जास्त आठवण आली. तिचे वडील तिच्या फार लहानपणीच वारले होते, पण थोडी थोडी आठवण तिच्या मनात शिल्लक होती. तिला पुसटसे आठवत होते की वडील तिला मांडीवर घेत, तिचे कौतुक करीत, तिला अंगाखांद्यावर खेळवीत. वडील घरी आले की ती पळत पळत त्यांचेकडे जाऊन त्यांना बिलगत असे...

आताही तिच्या वडिलांनी अंधाऱ्या नदीतल्या पाण्यातून तिला कडेवर घेण्यासाठी हात पुढे केले. सोनीला लहान झाल्यासारखे वाटले. ती लहान मुलीसारखी हसू लागली. पुलावर आता एकही वाहन नव्हते. गावातली पुलावराची वाहतूक रात्री जवळपास बंद व्हायची. एखाद दुसरी बाईक गेली तर गेली! गावाबाहेरच्या अंधाऱ्या जागेतील त्या अंधाऱ्या पुलावर एकटी उभी राहून ती हसत होती. वेड लागल्यासारखी ती मोठमोठ्याने हसायला लागली. बॉलीवूड मधील एक वलय एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं होतं..

तिने हसणं अचानक थांबवलं. पाण्यात दिसणाऱ्या त्या वडिलांना भेटायला ती अधीर आली आणि नदीच्या प्रवाहात तिने उडी टाकली. तिचे वलय पाण्यात पडताच विझले होते आणि प्रवाहासोबत वाहत गेले...

सोनीने पाण्यात उडी टाकल्यानंतर पाणी वेगाने वर उसळले आणि इकडे रिताशाने भूषणच्या ड्रिंक्सच्या ग्लास मध्ये बर्फ टाकल्याने त्यातील दारू वर उडाली होती. ग्लास रिचवत अवार्ड नाईट मध्ये ती भूषण सोबत एन्जॉय करत होती. तिला अनेक नव्या निर्मात्यांनी पुन्हा ऑफर दिल्या कारण तिचा टिव्ही शो हीट झाल्याने ती पुन्हा फॉर्म मध्ये आली. मात्र एकीचे वलय विझून दुसरीचे विझलेले वलय पुन्हा निर्माण झाले होते.

आजच्या या अवार्ड मध्ये दिनकर सिंग, त्यांची पत्नी हे सुद्धा आलेले होते. पण ते सूरजला भेटले नाहीत आणि सूरज सुद्धा त्यांना भेटला नाही. सिंग यांचेशी नजरानजर झाल्यानंतर सूरजच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू दिसत होते. एकंदरीत रीताशा आणि सिंग यांची सिरीयल हिट झाली होती. मात्र सिंग यांना एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे रीताशा आणि भूषणचे जमलेले सूत आणि त्यासाठी सोनी बनकरला भूषण ने दिलेला घटस्फोट आणि सोनी मुंबईतून गायब होण्याबाद्दलच्या उलटसुलट अफवा! पण याबद्दल फार काही खोलात रिताशाला विचारणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे आहे हे त्याना माहित होते! म्हणून त्यांनी फार काही त्यात लक्ष घातले नाही.

अवार्ड शो सुरू झाला.

सगळीकडे डिस्को लाईटस चमचमत होते. ते फिल्मी तारे तारकांच्या अंगावरून फिरत होते. आकाशातले तारे सुध्दा त्या दिवशी या जमिनीवरच्या ताऱ्यांचा हेवा करत होते. सुपरस्टार निखिल कुमार, जोरावर खान हे सूत्र संचालन करत होते. त्यांच्या जोडीला काव्या कुमारी पण होती. एकमेकांवर आणि प्रेक्षकांत बसलेल्या बॉलीवूड मधील मंडळींवर ते विविध प्रकारचे जोक्स करत होते. महा सुपरस्टार अमित श्रीवास्तव हे त्यांची पत्नी आणि मुलगा, सून यांचेसह हजर होते.

एक हरहुन्नरी अभिनेता जो एका वर्षी एकाच चित्रपट करायचा तो मात्र नेहमीप्रमाणे अवार्ड शो मध्ये आला नव्हता कारण म्हणे त्याचा अशा अवार्ड्सवर विश्वास नव्हता.

उमंग कुमार या रबरासारखी बॉडी असलेल्या कलाकाराने स्टेजवर जबरदस्त नाच सुरु केला.

"मैं हुं सबसे प्यारा, डिस्को दिवाना...!"

प्रेक्षक टाळ्यांवर टाळ्या देत होते. मग बेस्ट स्पेशल इफेक्ट, तसेच बेस्ट गायक, बेस्ट स्टंट वगैरे असे पुरस्कार मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटासाठी क्रमाने दिले गेले.

मग धनिका दास या अभिनेत्रीने एका आयटम साँगवर डान्स चालू केला. तिच्या दिलखेचक नृत्याने प्रेक्षकांत बसलेल्या भल्या भल्या मंडळींचा काळजाचा ठोका चुकला.

स्टार्टर्स आणि काही ड्रिंक्स पोटात गेल्याने बरेच जण आता रिलॅक्स होते.



प्रकरण 50
माया माथूर आपल्या दोन मुलांना पतीकडे सोपवून वॉशरुमकडे निघाली. वॉशरुममध्ये आरश्यात केस आणि मेकप नीटनेटका करत असताना ती थोडी चिंतेत दिसत होती कारण आताशा कातिल तिच्याशी जास्त सलगी करायला लागला होता. तिला खटकेल अशा रीतीने. तिने बरेचदा हसून वेळ मारून नेलेली होती पण आता थोडे जास्त होते आहे असे तिला वाटायला लागले होते. आरशासमोर विचार करता करता बराच वेळ ती शून्य मनाने मेकप सावरत होती. तिला जास्त चिंता याची होती की तिने आपल्या पती पासून सुरुवातीपासून सगळे लपवले होते आणि आता एकदम अती झाल्यानंतर सांगितल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल?

विचारांत असताना समोरच्या काचेवर वाफ जमा झालेली तिला दिसली आणि त्यावर बोटाने इंग्लिश मधून लिहिले जात होते, "टूडे इज युवर लास्ट डे ऑफ वरी!" (आज तुझ्या काळजीचा शेवटचा दिवस आहे!")

ती अचानक दचकली आणि घाबरून ओरडणार एवढ्यात समोरचे ते लिखाण नष्ट होऊन स्वच्छ आरसा दिसत होता.

आपल्या मनातले विचार कुणाला आणि कसे काय कळले आणि अचानक काचेवर कुणी लिहिले आणि माझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस? हे काय होते? मला हे कसले भास होत आहेत? अती काळजीमुळे तर नाही ना असे होत?

ती तडक वॉशरुम मधून घाईघाईने निघून अवार्ड शो सुरू असलेल्या ठिकाणी आपले सीट शोधत आली.

तिचे दोन्ही जुळे मुलं कंटाळल्याचे दिसत होते. कारण मायाला जाऊन बराच वेळ झाला होता.

एव्हाना हॉलीवूडची टीम अवार्ड नाईट मध्ये आलेली होती आणि त्यांची चित्रपटाबद्दल जाहिरात करून झाली होती. मात्र काही जण बाहेर व्हॅनीटी व्हॅन मध्येच थांबले होते. त्यांना अशा नाच गाण्यांत इंटरेस्ट नसावा!

स्टेजवर दोन आघाडीच्या अभिनेत्री ज्यांनी हॉलीवूड मध्ये आपले बस्तान बसवले होते त्या आपल्या एकत्र डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होत्या. आजूबाजूला दहा पुरुष आणि स्त्री नर्तक त्यांच्या स्टेप्स डान्स स्टेप्सला फॉलो करत त्यांना मनापासून साथ देत होते. स्टेजवर कॉन्फेटी म्हणजे रंगीबेरंगी कागदांचे तुकडे इकडे तिकडे उधळले जात होते. शो ऐन रंगात आला होता. मग गाणे संपता संपता प्रेक्षकांत बसलेला हॉलीवूडचा एक आघाडीचा अँक्शन हिरो टॉम टींसेल स्टेज वर आला आणि दोघींना डान्स मध्ये जॉईन झाला. प्रेक्षकांत टाळ्यांचा भरपूर कडकडाट झाला.

गाणे संपल्यावर त्याने जोरावर खान कडून माईक घेतला आणि म्हणाला, "आय जस्ट लव्ह धीस डान्स अँड साँग्ज पार्ट इन बॉलीवूड मुव्हीज. सुरुवातीला आम्ही हॉलीवूडवाले तुमच्या या सिनेमात असणाऱ्या डान्स आणि लीप सिंक असणाऱ्या गाण्यांना नावे ठेवायचो, कमी लेखत होतो पण आज? .. आज हॉलीवूड मधील अनेक असे सिनेमे आहेत जे आता चित्रपटांचे थीम साँग बनवायला लागले आहेत, काही चित्रपटांमध्ये तर एखाद दुसरे गाणे पण दिसायला लागले आहे. काही चित्रपटात तर तुमच्या बॉलीवूड मूव्ही सारखा ड्रामा सुध्दा आता दिसतो. आम्हाला वाटायचे तुम्ही आमच्या चित्रपटांची कॉपी करता, पण नाही तुम्हीच नाही आम्ही पण तुमच्या चित्रपटांतील अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींची कॉपी करतच असतो. कुणी आजपर्यंत हे उघडपणे मान्य नव्हतं करत पण हे खरं आहे!"

मग टॉमची फिरकी घेण्यासाठी जोरावर खान म्हणाला, "सो टॉम, व्हॉट डू यू थिंक अबाऊट अॅक्टींग इन लीड रोल इन 'भले आदमी दुल्हन चुरा लेंगे' सिक्वेल? (‘भले आदमी दुल्हन चुरा लेंगे' या चित्रपटाच्या पुढच्या भागात हिरो म्हणून काम करशील का?")

यावर हसत टॉम म्हणाला, "अरे यार, तुम्हारी जनता टकलू हिरो को पसंद नही करेंगी!"

जोरावर म्हणाला, "तो विग लगा लेंगे यार, व्हॉट्स द बिग डील?"

यावर टॉम आणि प्रेक्षक हसायला लागले.

स्टेजच्या मागच्या बाजूला सूरज तयारी करत होता. बेस्ट फिल्म अवार्ड त्यालाच मिळणार होता. तयारी करून प्रेक्षकांत पुढच्या रांगेत बसायचे आणि अवार्डची अनाउन्समेंट झाली की तो घ्याला स्टेजवर जायचे असा प्लॅन होता. कपडे बदलून येण्याआधी तो वॉशरुम कडे जायला निघाला. लॉन मधून तो वॉशरुम कडे जात होता. आता हळूहळू स्टेजवरील मोठ्ठा आवाज कमी कमी होत गेला. आता बरीच शांतता होती.

कोण जाणे त्याला मनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली. तसं पाहिलं तर त्याच्या मनाप्रमाणे सगळं चाललं होतं. ओलिव्हीया आणि व्हेरिनिका या दोघींनाही तो एकाच वेळेस मॅनेज करत होता. त्याचा फूडचेनचा बिझिनेस आणि त्याच्या आडून चालणारा ड्रगचा बिझिनेस व्यवस्थित चालू होता.

रागिणीला मार्गातून मोकळे करण्यात त्याला यश आलेले होते आणि पोलिस, कोर्ट काहीही सिद्ध करू नव्हती आणि तिची आत्महत्या सिद्ध झाली होती. अनेक फ्लॅट आणि एक बंगला मुंबईसारख्या शहरात त्याच्या मालकीचा होता. करोडो रुपये त्याने कमावले होते. त्याचे चित्रपट हीट होत होते आणि आता तर आज त्याच्या चित्रपटाला अवार्ड मिळणार होता. सुख म्हणतात ते हेच का?

वॉशरुम मध्ये गेल्यावर त्याने आरशात पाहिले. त्याने आपली बॉडी चांगली मेंटेन केली होती. एकदा आरशात आपले सिक्स पॅक एब बघायचा मोह त्याला आवरला नाही. त्याने वरचे कपडे काढले आणि आरशासमोर टॉपलेस झाला.

परदेशात असताना त्याच्या ठराविक गर्लफ्रेंड व्यतिरिक्त ब्राझिलमधील बिझिनेस निमित्ताने त्याच्या संपर्कात येणाऱ्या अनेक श्रीमंत मुलींनी फक्त त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर आणि विशेष म्हणजे त्याच्या सिक्स पॅकवर फिदा होऊन एका रात्रीसाठी तरी त्यांच्यासोबत त्याने सेक्स करावा अशी विनंती केली होती आणि त्यासाठी त्या पैसे मोजायला सुध्दा तयार होत्या. त्यामुळे सुखावून त्याने चारेक जणींची ऑफर स्वीकारली सुध्दा होती आणि इच्छा एकेका दिवशी पूर्ण केली होती. मात्र नंतर नंतर त्याने अशा गोष्टी बंद केल्या.

हे सगळे आठवून तो सुखावला आणि एकटक स्वतःकडे आरशात बघत उभा राहिला.

त्याच्या सिक्स पॅकवर केस मोकळे सोडलेल्या रागिनीचा पुसट चेहरा आकार घेऊ लागला आणि तेव्हा मात्र तो दचकला आणि मागे सरकला. सिक्स पॅक वर जणू काही तो चेहरा गोंदला जात होता. हा चेहरा अचानक असा कसा गोंदला गेला? तो चेहरा हसायला लागला. कुत्सितपणे त्यांचेकडे बघायला लागला आणि गायब झाला.

घाबरून पूर्ण चेहरा घामाने भरल्यानंतर त्याने पटापट घाईने कपडे अंगावर चढवले आणि वेगाने तो अवार्ड फंक्शनच्या ठिकाणी जायला निघाला.

"सुबहा दिवानी दिवानी दिवानी
शाम सुहानी सुहानी सुहानी
रात शराबी शराबी शराबी
हो जाती है,
जब तुम
जब तुम
जब तुम
मेरे साथ
होती हो हो हो ss"

या गाण्यावर एक नवी नटवी नटी नाचत होती. तिचा या वर्षी पहिलाच चित्रपट रिलीज झाला होता त्यामुळे ती खूप फॉर्मात होती. इथे चांगला परफॉर्मन्स केला तर आणखी चित्रपट मिळतील हे तिला माहित होते.

डान्स संपल्यानंतर लगेचच सूरजच्या अवार्डची अनाउन्समेंट झाली. थोड्या घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या स्थितीतच तो स्टेजवर चढला आणि त्याने अवार्ड घेतला.

जोरावर खान म्हणाला, "सर आप रागिणी के बारे मे कुछ कहना चाहेंगे? आज आपके साथ वो होती तो उन्हे कैसा लागता आपके इस अवार्ड के बारें में?"

सूरजचे लक्ष नव्हते. समोर प्रेक्षकांत त्याला प्रत्येक सीटवर रागिणी बसली आहे असे दिसू लागले. जोरावरला उत्तर न देताच तो खाली उतरला आणि आपल्या चेहऱ्यावरील अस्वस्थता लपवण्यासाठी अगदी शेवटी एका रिकाम्या असलेल्या रांगेत रिकाम्या खुर्चीवर घाईघाईने जाऊन बसला.

अवार्डकडे बघत असताना त्याला बाजूला रिकाम्या खुर्चीवर रागिणी बसली असल्याचे दिसले. तिचा चेहरा खूप भेसूर होता. तिने त्याच्या नजरेत नजर धरली. ती नजर खूप जहरी होती. तिच्या अशा अवताराने सूरजला घाम फुटलेला असतांना रागिणीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता...
***
अमितजी राजेशला सोबत घेऊन स्टेजजवळ असलेल्या हॉलीवूड अभिनेत्यांच्या व्हॅनीटी व्हॅन मधे घेऊन गेले.

फ्रांको बोनुकीशी राजेशची लेखक म्हणून ओळख करून दिल्यानंतर ते एका लेडीच्या येण्याची वाट बघू लागले कारण या हॉलीवूड चित्रपटाच्या भारतातील विभागाची ती प्रमुख होती.

कोणत्या कामाकरता कुणाकुणाला निवडायचे, कुणाला नाही हे ठरवण्याचे अधिकार तिला होते.

थोड्याच वेळात ती व्हॅनमध्ये आली.

"राजेश, प्लीज मीट मिसेस प्रीसिला बोनुकी! प्रोजेक्ट हेड!"

तिच्याकडे बघताच राजेशच्या अंगात अचानक वीज चमकल्यासारखे झाले. ही नक्की सुप्रिया आहे, मी चुकणार नाही ओळखतांना तिला!! क्षणभर तो अवाक होऊन बघत राहिला. सुप्रिया उर्फ प्रिसिलाच्या डोळ्यात राजेशबद्दल स्पष्टपणे द्वेष जाणवत होता. अर्थात त्यांच्या या क्षणभराच्या नजरकैदेबद्दल अमितजी आणि फ्रँको याला शंका यायला काही कारण नव्हते, कारण त्यांना काहीही माहिती नव्हते! तिच्या डोळ्यातील अंगार बघून आणि तिची एकूण नजर पाहून राजेश तेथेच गर्भगळीत झाला...

त्याला आठवले, ब्रेकपच्या वेळेस सुप्रिया म्हणाली होती:

“पण, हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल! आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल!”

आणि तिचा हा नियम पहिल्यांदा तिनेच मोडला होता, सिरीयल सोडून देऊन आणि राजेश पासून दूर निघून जाऊन! पण आता त्याने पाहिलेली सुप्रिया काहीतरी वेगळीच होती!!! मध्यंतरी एका स्थानिक वर्तमानपत्रात सुप्रियाच्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल त्याने छोटीशी बातमी वाचली होती. हिचे नाव प्रीसिला बोनुकी म्हणजे इटालियन माणसाशी हिने लग्न केले? आणि तेही फ्रांको बोनुकी याचेशी?

अमितजीच्या विनंतीला फ्रँकोने तर लगेच होकार दिला पण प्रिसिला म्हणाली, "मी दोन दिवसात निर्णय कळवते!" तिचा इंग्लिशचा उच्चार पण थोडा थोडा भारतीयच वाटत होता, म्हणजे ही नक्की सुप्रिया आहे, यात वादच नाही! मात्र तिच्या वेशभूषेत आणि केशभूषेत अमुलाग्र बदल झालेला दिसत होता. इतका बदल की जवळचे नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी वगळले तर तिला कुणीही युरोपियन समजणार हे नक्की!

उद्यापासून हॉलीवूडच्या त्या भव्य चित्रपटासाठी मॅडम अकादमी मध्ये ऑडिशन सुरू होणार होते आणि त्याची सुध्दा प्रमुख सुप्रियाच होती. असे कसे घडले? नियतीचा हा कसला डाव? राजेश भीतीयुक्त विचारात पडला.

जुजबी बोलून आणि चेहऱ्यावरील अस्वस्थता लपवत अमिताजींसोबत शक्य तितक्या लवकर व्हॅनीटी व्हॅन मधून राजेश बाहेर पडला. तो बाहेर पडेपर्यंत आणि पूर्ण परत जाईपर्यंत प्रिसिला त्याचेकडे एकटक नजरेने बघतच राहिली होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारचा अंगार दिसत होता. कसलीतरी गरम ठिणगी दिसत होती.

राजेश परत येऊन नंतर सुनंदाच्या बाजूला येऊन बसला आणि कार्यक्रम पाहू लागला.

काही वेळानंतर कार्यक्रम संपला. सगळे अवार्ड देऊन झाले होते. आयोजक आता पटापट आवरा आवर करुन जाण्याची तयारी करत होते. प्रेक्षक उठून निघून गेले. मात्र शेवटच्या रांगेत प्रेक्षकांत एकजण निश्चल बसूनच आहे असे हिरो उमंग कुमारच्या लक्षात आले. त्या व्यक्तीच्या पेहरावावरून दुरूनच त्याने ओळखले की तो सूरज असावा!

उमंग कुमार त्याचेकडे पोहोचत होता तरीही सूरज खुर्चीवरून अद्याप उठला नव्हता आणि अगदी हालचाल न करता निश्चल पडून होता त्यामुळे उमंग कुमारला कसलीतरी अभद्र शंका आली. त्याला उठवायला म्हणून उमंग कुमार त्याच्या खुर्चीजवळ गेला तेव्हा अवार्ड पायाजवळ खाली पडून त्याचे दोन तुकडे झालेले त्याला दिसले. उमंगला आश्चर्य वाटले!

"ज्या धातूचा हा अवार्ड बनवला आहे तो धातू, अवार्ड नुसता खाली पडल्यावर फुटला कसा? कमाल आहे!"

असे म्हणून त्याने सूरजला हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हाताच्या थोड्याशा धक्क्याने सूरज खुर्ची वरून खाली कोसळला...
ही बातमी कळताच घरी जायला निघालेले अनेकजण परत आले. दिनकर सिंग आणि त्यांची पत्नी यांना हे ऐकून शॉक बसला . ते पळत पळतच तेथे आले. सूरजचा असा अंत झालेला पाहून त्या दोघांना अपार दु:ख झाले. रिताशाला सुद्धा रडू येत होते.

नंतरच्या डॉक्टर आणि पोलिस यांच्या एकूण तपासानंतर सूरज हार्ट अटॅकने मेल्याचे सिद्ध झाले. काहीतरी अनपेक्षित बघून मनावर अचानक सहन न करण्याजोगे प्रचंड दडपण आल्याने मृत्यू झाला असे डॉक्टर म्हणाले. बऱ्याच जणांना वाटले की अवार्ड मिळण्याच्या आनंदामुळे असे झाले तर काहींना एका वाईट माणसाचा अंत झाल्याने आनंद वाटला.

काही दिवसानंतर कातील खान काही काळाकरता तडाफडकी परदेशात निघून गेला त्यामुळे माया माथूरला आनंद झाला. तसेच अवार्डच्या रात्री आरशात तिला मिळालेला मेसेज शेवटी खरा ठरला आणि मायाची धारणा पक्की झाली की सूरजच्या मृत्यूसंदर्भात नक्की मेलेल्या रागीणीच्या आत्म्याचा संबंध असावा!

प्रकरण 51

काही महिन्यानंतर -

शहरापासून दूर समुद्रकिनारी राजेशने एक बंगला विकत घेतला जेथे वीकेंडला किंवा कामापासून सुटी घेतल्यानंतर येता येईल आणि फॅमिली सह राहता येईल. तसेच निसर्गाच्या सानिध्यात, पक्ष्यांची किलबिल चालू असताना आणि समोर समुद्राचे पाणी असतांना लिखाण करायचे राजेशचे खूप वर्षांपासूनच मनात होते ते आता प्रत्यक्षात अवतरत होते. अधून मधून समुद्रकिनारी येऊन त्याने अनेक कथा लिहिल्या होत्या. अशा नैसर्गिक वातावरणात त्याची प्रतिभाशक्ती आणि कल्पनाशक्ती उफाळून यायची आणि कीबोर्ड द्वारे कॉम्प्युटर मधल्या कागदावर धडाधड उतरायची. त्याचा अगोदरचा फ्लॅट शहरात होताच.

आठ दिवस सुट्टी घेऊन तो येथे आला होता. हा बंगला नुकताच विकत घेतलेला होता. अर्धे पैसे आधीच दिले होते आणि अर्ध्या पैशांचे कर्ज काढले होते. एक दोनदा सुनंदा आणि अक्षर तेथे येऊन गेले होते पण तो बंगला पूर्णपणे राहण्यायोग्य बनला नव्हता. त्यासाठीच राजेश आठ दिवस येथे आलेला होता. एकटा. सुनंदा आणि अक्षर जवळ फ्लॅट मध्ये त्याची आई आलेली होती, काही दिवसांसाठी!

या आठ दिवसात बंगल्यातील फर्निचर तसेच समोरची छोटीशी बाग आणि इतर काही गोष्टी त्याला मार्गी लावायच्या होत्या आणि त्याचबरोबर थोडेसे लिखाणही करायचे होते.

आजूबाजूला दूर दूर अंतरावर छोटे छोटे बंगले होते पण त्यापैकी एखाद दुसऱ्याच बंगल्यात फक्त एक दोन माणसे दिसायची. इतर बंगले बंद राहायचे किंवा कुणीतरी एकटा दुकटा गडी दिवसभर देखभाल करायला तेथे थांबायचा. छोटे बंगले आणि काही मानवी वस्ती आणि तुरळक शेती, दुकाने, छोटी मोठी सरकारी कार्यालये आणि शाळा असे मिळून ते एक छोटेसे गांव होते.

आज सकाळपासूनच तेथे सुतारकाम करणारे, प्लंबर तसेच साफ सफाई करणारे कामगार आलेले होते. राजेशच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये गेल्या एक महिन्यापासून घरकाम आणि स्वयंपाक करायला कायम गावाकडून आणलेला एक विश्वासू माणूस "गौरव देव" हा राजेश सोबत बंगल्यात आलेला होता आणि एकूणच इथल्या सगळ्या कामांवर देखरेख ठेवणार होता.

फर्निचरचे काम सुरू झाले.

"गौरव दा, मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांवर देखरेख करा. कामे करवून घ्या. मी तश्या त्यांना तुमच्यासमोर सूचना दिल्या आहेतच, पण तरीही आता तुम्ही जातीने त्यांचेकडून कामे करवून घ्या. मी आता घराजवळच्या बागेत गवतावर बसून लॅपटॉपवर थोडे लिहायला बसतो आहे. काही लागलं तर सांगा मला!"

"हा राज साहेब. नक्की. तुम्ही काय बी काळजी नगा करू. म्या पाहतो सगळं. तुम्ही तुमचं लिव्हा!"

"बरं, गौरव दा आणखी एक करा. दहा मिनिटांत माझ्यासाठी गरमागरम डार्क कॉफी घेऊन या!"

कॉफी पिल्यानंतर राजेश लिहायला बसला. बराच वेळ तो लिहित होता. कामं पटापट आणि व्यवस्थित होत होती. घरातील खिडकीत ठोकठाक चा आवाज येत होता.

खिडकीत उभा राहून इलेक्ट्रिक करवतीने काम करणारा एक कामगार बराच वेळ बागेत बसलेल्या राजेश कडे एकटक बघत होता.

"ए, गड्या, काय बघतूया समोर? काम कर की आपलं!"

"आरं, मी ईचार करतूया की आपलं साह्यब एवढं काय लिवत्यात त्या ल्यापताप वर? नुसती खट खट खट बटण दाबत असत्यात. बोटं लई झर झर चालत्यात त्यांची न्हाई!"

"चालत्यात! आता तू बी आपली बोटं चालव. लेखक आहेत ते साह्येब. लै लोक वाचतात त्यासनी लीवलेलं!"

नंतर तो करवतवाला राजेश साह्यबाकडं एकटक पहात लाकडे कापत राहिला...

"काय गप्पा मारता रे! पटापट उरका तुमची कामं, टाईम पास नगा करू!" असे म्हणत गौरव देव तेथे आला आणि दोघांना तंबी देऊन गेला.

संध्याकाळी बरेच कामगार निघून गेले. रात्री आठ पर्यंत दोन जण होते ते सुध्दा नंतर निघून गेले.

"गौरव दा, माझ्यासाठी गरम फुलके आणि फोडणीचे वरण करा. आणि हो, थोडा भात पण टाका गरमागरम!"

"होय राज साहेब!"

मग राजेशने घरातल्या टेबलावर ठेवलेली त्याची लाल रंगाच्या कव्हरची फाईल उचलली. त्यात त्याची जुनी कादंबरी होती. ती कादंबरी पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकात छापण्याची तयारी दहा आघाडीच्या दिवाळी अंकांनी तयारी दर्शवली होती. दहा दिवाळी अंकांत एकच कादंबरी छापली जाण्याची ही पहिलीच वेळ असणार होती. त्या कादंबरीला स्वतः अमितजी प्रस्तावना लिहिणार होते.

फिल्मी क्षेत्रावर आधारित कादंबरी राजेशने आधीच लिहायला सुरू केली होती. हा चित्रपट राजेश मराठीत बनवणार होता आणि स्वतः प्रोड्युस करणार होता आणि समिरण डायरेक्ट करणार होता! तसेच समिरण आणि राजेशने मिळून अनेक मराठी चित्रपट निर्मिती करायचे ठरवले होते. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय गोल्डन डॉल पुरस्कार मिळवून द्यायचा हेच एकमेव लक्ष्य दोघांनी ठेवले होते. फक्त एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा! मराठी साहित्यिक आणि चित्रपट टिव्ही क्षेत्रात लिखाण करण्याची इच्छा असलेल्या नवोदित लेखकांना सर्वतोपरी मदत करायचे हे त्याने ठरवून टाकले होते. तसेच दरवर्षी दिवाळी अंकासाठी तो खास एक कादंबरी लिहून देणार होता, एक कृतज्ञता म्हणून!

बॉलीवूड मध्ये तर तो स्थिरावला होताच पण हॉलीवूडच्या टीम सोबत काम करून त्याचा अनुभव घेऊन ते सगळे तंत्र मराठीत वापरायचे हा त्याचा उद्देश होता. मात्र काही महिने उलटल्यानंतरही अजून प्रिसीला कडून हॉलीवूड चित्रपटात राजेशच्या लेखनासाठी होकार आलेला नव्हता. मागील महिन्यापासून प्रिसीला आणि इतर हॉलीवूड टीम "ग्रँड पर्पल" या सेव्हन स्टार हॉटेलमध्ये उतरली होती.

"एकदा मला प्रीसिला म्हणजे सुप्रियाला एकांतात भेटायला बोलवलं पाहिजे म्हणजे तिच्या मनात नेमके काय आहे ते कळेल!" असा विचार राजेश करत होता. पण पुन्हा वैवाहिक जीवनात यामुळे वादळ तर निर्माण होणार नाही ना? तो द्विधा मनस्थितीत सापडला. हॉलीवूडसाठी मिळालेली आयती लेखनाची संधी त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायची नव्हती.

राजेशने अभिजितसाठी लिहिलेल्या स्क्रिप्टवर चित्रपट शूट करून झाला होता फक्त रिलीज व्हायचा बाकी होता.

मागील काही महिन्यांत राजेशने ऐकले होते की सूरजच्या मृत्यूनंतर त्याची फूड चेन आणि त्याच्या फ्लॅटची जप्ती करण्यात आली कारण त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आणि टोळीशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना आढळले आणि रागिणीच्या आत्महत्येची फाईल पुन्हा उघडली गेली. पोलिस तपास जोरात सुरू होता. सध्या पत्रकारिता थोडी कमी केली असली तरी त्याची टीम त्याला सगळ्या खबरी देत होतीच.

त्याच्या टीमकडून त्याला आणखी एक गोष्ट कळली होती ती म्हणजे वीणा वाटवे आणि पिके यांच्यात अलीकडे भांडणे वाढली होती. त्यांचा ब्रेकअप होऊ नये यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न सारंग करत होता. त्यांच्या भांडणाचे कारण आणि मूळ हे केके विरूध्द राजेशने आणि एकूण टीमने चालवलेल्या एकूण अभियानात होते.

तसेच सोनी बनकरच्या मुंबईतून अचानक गायब होण्यामागचे गूढ अजून उलगडले नव्हते. राजेश आणि त्याची पत्रकार टीम शोधून थकली पण सोनीचा ठावठीकाणा लागला नाही.

तिने पाण्यात उडी मारल्याचे कुणालाही माहिती नव्हते कारण तिचे प्रेत अजूनही कुणालाच सापडले नव्हते म्हणून गायब झालेले किंवा हरवलेले व्यक्ती यांच्या लिस्टमध्ये तिचे नाव पोलिस स्टेशन मध्ये लिहिलेले होते.

घरी अक्षर हळूहळू मोठा होत चालला होता. कधी कधी तो हवी ती वस्तू मिळवण्यासाठी खोटे खोटे रडण्याची अशी काही अॅक्टिंग करायचा की राजेशला वाटायचे की याचे नांव अक्षर न ठेवता अभिनय ठेवायला हवे होते.

"साहेब, हे घ्या, गरम फुलके आणि वरण. मग भात सुध्दा आणतो!"

गौरव देवच्या या वाक्याने विचार करता करता राजेश भानावर आला. त्याने गरमागरम जेवण करून घेतले. मग सुनंदा आणि आई तसेच अक्षर याचेशी तो फोनवर बोलला.

रात्री -

"साहेब, मी निघतो आता. परवा दुपारी येतो. माझ्या काकांकडे जाऊन येतो. त्यांनी बोलवलं आहे कधीचं! त्यांना थोडं महत्वाचं काम आहे."

"ठीक आहे, गौरव दा. हरकत नाही. या तुम्ही! आता उद्या मला सगळं बघावं लागणार पण हरकत नाही, एकाच दिवसाची तर गोष्ट आहे. मी करून घेऊन अॅडजस्ट!"

गौरव देव निघून गेला.

रात्री राजेशने बरेच लिखाण केले. रोज तो दिवसभरात लिहिलेले सगळे लिखाण ऑनलाइन गुगल ड्राईव्हवर सेव्ह करून ठेवायचा. आज मात्र त्याला कंटाळा आला आणि झोप पण खूप येत होती. लॅपटॉप बंद करून तो जवळच्या बेडवर गेला आणि झोपेच्या अधीन झाला.

&&&&

प्रकरण 52

"मुंबईतच काय, मी म्हणतो पूर्ण आशिया खंडात कुठेही अशा प्रकारचे लेखकांसाठी असलेले थीम पार्क नसावे!" श्री. वामनराव विभुते म्हणाले.

"खरे आहे तुम्ही म्हणता ते! मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या थीम पार्क मध्ये बसून महिन्याची फक्त माफक नाममात्र फी भरून कुणीही नवोदित लेखक अगदी शांततेत लिखाण करू शकतो. काहींना लिहिण्यासाठी लॅपटॉप सुध्दा मोफत उपलब्ध करून दिले जाईल किंवा ज्यांना कागदावर लिहायचे आहे त्यांना वह्या पेन दिले जातील. विशेषत: फिल्म क्षेत्रात लिहिणाऱ्या लेखकांना प्राधान्य दिले जाईल!" राजेश म्हणाला.

"वा! कल्पना आवडली तुमची. काही आणखी मदत लागली तर सांगा मला!" विभुते.

राजेश पुढे म्हणाला, "धन्यवाद सर! शेजारच्या या दोन मजली बिल्डिंगमध्ये मुंबई बाहेरच्या नवोदित लेखकांना माफक पैशांत राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे! वरच्या मजल्यावर एक मोफत लायब्ररी आहे! आणि फक्त लेखकच नाही तर ज्यांना शांततेत वाचन करायचे आहे अशा पुस्तक प्रेमी मंडळींसाठी सुद्धा हे थीम पार्क एक पर्वणी आहे."

त्या थीम पार्क मध्ये छोटेसे तळे, छोटी हॉटेल्स, हिरवेगार गवत, हिरवीगार झाडे, फुलझाडे लावलेली होती. तसेच काही ठिकाणी झाडाऐवजी खोडाच्या आकाराएवढ्या उभ्या पेन्सिल्स आणि त्यांच्या अणीच्या टोकांवर फांद्या उगवून पसरलेल्या होत्या पण फांद्यांवर पाने फळे यांच्या ऐवजी कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या किज (कीबोर्डची बटणे) जोडलेली होती आणि पारंब्यांच्या ऐवजी फिल्म स्ट्रीपस लटकावलेली होती. ही अशी पेन्सिल झाडे एकत्र ओळीने लावली होती. झाडांच्या बाजूला अनेक खोडरबर ओळीने पेरून त्यांना जाळीने बांधून त्याचे कुंपण केले होते. तसेच रस्त्याने अनेक बाके ठेवलेली होती. खाली हिरवळीवर बसण्याची व्यवस्था होती.

हे बघून विभुते म्हणाले, "राजेश, तुमच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद द्यावीशी वाटते!"

"धन्यवाद!" राजेश म्हणाला.

अचानक तेथे अंधार झाल्याचे राजेशला दिसले. विभुते कुठे दिसत नव्हते. आता त्या थीम पार्कमध्ये विभुतेच काय तर इतर दुसरे कुणी चिटपाखरूसुध्दा नव्हते! पक्ष्यांची किलबिल अचानक थांबली. पानांची सळसळ बंद झाली. कुठे गेले सगळे? असा विचार करून राजेश त्याच्या जवळ असलेल्या मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात पुढे पुढे सरकू लागला. वर आकाशात चंद्र सुध्दा नव्हता!

दूरच्या एका पेन्सिल झाडाजवळ ठक ठक असा आवाज येत होता. कुणीतरी पाठमोरा माणूस पेंसिलीच्या झाडावर कुऱ्हाडीने घाव घालत होता. राजेशला ते सहन झाले नाही. तो टॉर्चच्या उजेडात त्या माणसाजवळ जाऊ लागला. खाली कीबोर्डचे बटणं इकडे तिकडे विखुरलेले होते.

"ए! कोण आहेस तू?" राजेशने त्याच्या जवळ जात दरडावून विचारले.

तो अद्याप पाठमोराच होता. कुऱ्हाडीचा घाव घालणे त्याने चालूच ठेवले. त्या घावांमुळे पटापट कीबोर्डचे बटन खाली पडत होते. त्या फिल्म स्ट्रीप खाली कोसळत होत्या.

"मी तुला विचारतोय माणसा! कोण आहेस तू? काय करतोयस येथे? कुणाच्या परवानगीने अलास? ही झाडे का तोडतोयस?" राजेश एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

तो माणूस घाव घालायचे थांबवून हसायला लागला. अजून पाठमोरा होता तो!

"मी कोण? हा हा हा हा! मी आहे विमा! विचारांचा मारेकरी!" अजूनही तो पाठमोरा होता.

"विचारांचा मारेकरी? म्हणजे नेमका कोण आहेस तू?"

"एखादा विचार आवडला नाही तर मी त्या विचारांना नष्ट करतो आणि ते विचार निर्माण करणाऱ्या लोकांना सुध्दा!" असे म्हणून त्याने आपली मान 360 डिग्री कोनातून स्वतःच्या पाठीमागे म्हणजे समोर राजेशकडे फिरवली आणि जबरदस्त घाम येऊन राजेश स्वप्नातून जागा झाला..

"बापरे! काय भयंकर स्वप्न!" असे म्हणून बघतो तो काय पूर्ण बंगल्यातील लाईट गेलेले होते. त्याने मोबाईलची बॅटरी लावली आणि तो पाण्याचा ग्लास शोधू लागला. रात्रीचे दोन वाजले होते.

पाण्याचा ग्लास शोधत असताना त्याला त्याचा लॅपटॉप चालू असलेला दिसला पण तो टेबलापासून थोड्या वर उंचीवर होता. पाणी प्यायचे सोडून तो टेबलजवळ गेला तर त्याला एक काळा कोट घातलेला माणूस दिसला ज्याचा चेहरा कोटाच्या टोपीमुळे डोळ्यापर्यंत झाकलेला होता! आणि अंधार सुध्दा असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता.

त्या माणसाने राजेशचा लॅपटॉप एका हातात धरला होता आणि दुसऱ्या हातात लाकडे कापायची करवत होती. लॅपटॉपला चार्जिंगची वायर तशीच जोडलेली होती.

स्वप्न आठवून राजेशला अजून जास्त भीती वाटली.

"क क कोण आहेस तू?" राजेशने गर्भगळीत होऊन विचारले आणि त्या माणसाकडे जाऊ लागला.

"मी कोण? हा हा हा हा!" असे म्हणून त्याने राजेशच्या लॅपटॉपला हवेत जोराने छताकडे भिरकावले. जोराच्या झटक्याने प्लग सॉकेट मधून निघाला आणि लॅपटॉप छताला वेगाने आपटून फुटला आणि सीलिंग फॅन वर जाऊन अर्धा उलटा हवेत लटकला. वायर एका पात्यात आणि लॅपटॉप एका पात्यामध्ये अडकून हवेत लटकू लागला.

अचानक झालेल्या या विचित्र घटनेने राजेश घाबरला. त्या माणसाने वेगाने राजेशच्या हाताला झटका दिला आणि राजेशच्या हातातला मोबाईल खाली पडला. मग बुटाने तो मोबाईल त्याने तोडला आणि तो माणूस आता ती इलेक्ट्रिक करवत (पण लाईट नसल्याने बंद असलेली) दोन्ही हातात घेऊन राजेशकडे येऊ लागला. राजेश मागे सरकला आणि त्याचा धक्का लागून लटकणारा लॅपटॉप खाली पडून आणखी फुटला आणि राजेश बेडवर पडला. त्या माणसाने वेगाने बेडवर मुसंडी मारली आणि राजेशचा उजवा हात एका हाताने दाबून धरला आणि त्याच्या हाताची बोटे करवतीने कापायला सुरुवात केली. अंगठा जवळपास अर्धा कापला गेल्याने वेदनेने राजेश ओरडला आणि त्याने त्या माणसाच्या पोटात जोराची लाथ हाणली.

तो माणूस भेलकांडून दूर झाला तोपर्यंत राजेश बेडवरून उठला. राजेशने पाण्याचा काचेचा जग उचलला आणि त्या माणसाच्या डोक्यावर भिरकावला. तो त्याच्या टाळक्यावर आदळला आणि थोडेसे रक्त आले आणि खाली पडून काचेचे तुकडे झाले. त्यामुळे तो बावचळला आणि खवळला.

त्याने खालचा लॅपटॉप उचलला आणि राजेशच्या डोक्यावर नेम धरून फेकला पण राजेश बाजूला झाला आणि लॅपटॉप खाली पडला. पण राजेशच्या पायात त्या फुटलेल्या काचेचे तुकडे गेले आणि तो विव्हळू लागला. मात्र त्या माणसाच्या पायात बूट असल्याने त्या काचेच्या तुकड्यांवरून तो पुढे राजेश कडे येऊ लागला.

त्याने राजेशचा उजवा हात एका हाताने पुन्हा दाबून धरला आणि त्याच्या हाताची बोटे करवतीने कापायला सुरुवात केली. अंगठ्या जवळची बोटे कापली जाऊ लागली. राजेश वेदनेने ओरडू लागला आणि डाव्या हाताने राजेशने त्याच्या गळ्याला नख लावून कुरताडले. त्या माणसाच्या नरड्यातून रक्त वाहू लागले तसा तो बिथरला आणि करवत फेकून देऊन त्याने राजेशच्या कानाफडात दोन थपडा लगावल्या आणि राजेशला तो एका पाठोपाठ एक तोंडावर बुक्के मारत राहिला आणि म्हणाला, "साल्या, तुझी दहा पैकी दहा बोटे तोडल्याशिवाय मी राहणार नाही!"

मग दोघेही एकमेकांना भिडले. जवळपास कुस्ती खेळतात तसे ते एकमेकांना उचलून हवेत फेकू लागले. तो माणूस करवत पडली होती तिथे जायला निघाला तर जमिनीवर पडलेल्या राजेशने दुखणाऱ्या हातानेच त्याचे पाय जोराने ओढले आणि तो माणूस तोंडावर आपटला. मग तितक्याच त्वेषाने तो उठला आणि त्याने राजेशच्या छातीवर बुटाची लाथ मारली आणि पुन्हा पुन्हा मारू लागला. राजेशने त्याला जोराने ढकलले. तो पडला!!

बराच वेळ त्या अंधाऱ्या एकाकी बंगल्यात हे द्वंद्व सुरू होते. मग काही वेळाने त्या बंगल्यातून एक जोराची किंकाळी ऐकू आली...!!

(समाप्त)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

संपवल्याबद्दल आभार्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....सोनारकी इक खुशालकी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0