आमच्या कुटुंबातल्या भाषा-भेळीचा स्वाद आणि त्याची रेसिपी!

आमच्या कुटुंबातल्या भाषा-भेळीचा स्वाद आणि त्याची रेसिपी!

पार्श्वभूमी : मी गेली दहा वर्षे बार्बारा ( अर्थात बाशा ) या माझ्या ( कजाग !!! Wink ) पोलिश बायकोबरोबर (कसाबसा ) संसार करीत असून , आम्हाला जुळी मुले आहेत. पोलंड अशा एका अत्यंत “एकच भाषा , एकच संस्कृती , एकच तथाकथित धर्म वगैरे असलेल्या “मोनो” देशाने आम्हाला हे जबरी स्टिरीओ का बरे द्यावे याचा विचार मी कायमच करीत असतो ! तर आजवर आमच्या घरात जी भाषिक भेळ आम्ही बनवत आहोत त्यामध्ये खमंग असे पोलिश चुरमुरे ( की मुरमुरे ?) , तोंडीलावणीला जर्मन कोथिंबीर , झकास मराठी मसाला आणि घोळ ( मराठी आणि त्यातूनही मी म्हणल्यावर घोळ आलाच !) , संस्कृत चे भाजलेले दाणे आणि इतरही स्वादवर्धन करणारे पदार्थ उदा : हिंदी , भोजपुरी , गुजराती , कधी शेजारी देशातून आणलेलं चेक किंवा युक्रेनियन असे पदार्थ वापरत आहोत. या भाषिक भेळेची रेसिपी सांगण्याचा हा प्रयत्न:

माझी आणि बाशाची ओळख एका इंटरनेट फोरम मुळे झाली (साधारण २००३/४ साली). त्या फोरमवर मला जगभरात इतरही अनेक मित्र-मैत्रिणी होते. फोरमवर स्वतःविषयी जुजबी माहिती , आपल्या आवडी निवडी , पत्ता वगैरे इतकंच लोक लिहीत असत , असं मला आठवतंय ! तिथे chatting वगैरे भानगड नव्हती, आणि पुष्कळ लोकांशी मी जर्मन भाषेतून “कागदी पत्रव्यवहार” करीत असे. पत्र पाठवल्याचं मेल करून सांगणे इतकाच मेलचा यामध्ये सहभाग होता. ( हे आज कदाचित बावळटपणाचं किंवा चमत्कारिक/आऊटडेटेड वाटू शकतं ). अनपेक्षितपणे आमचा पत्रव्यवहार निरनिराळी वळणं घेत इथपर्यंत आला. तर अशा प्रकारे माझा या देशात प्रवेश झाला. पोलंड या देशाबद्दल आपण फारसं कधी ऐकत नाही, अर्थातच दुसऱ्या महायुद्धाचा एक जोरदार उल्लेख हा तेवढा आपल्या लक्षात असतो असं म्हणलं तर वावगं होणार नाही. तर या देशाची भाषा ऐकण्याचं , त्याबद्दल फारशी बैजवार माहिती असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.

भाषिक पार्श्वभूमी : भाषा -एक ऐकणे !

माझी आणि माझ्या बायकोची भाषिक पार्श्वभूमी अर्थातच खूप वेगळी आहे. मी जरी नारायण पेठेत वाढलो असलो तरी माझ्याभोवती मराठीच्याच अनेक बोली , किंवा मराठीचे अनेक लहेजे अस्तित्वात होते, शेजारीपाजारी हिंदी , पंजाबी , गुजराती ही होत्या. मी स्वतः कधीच भाषिक भेदभाव किंवा भाषिक उतरंड मानणारा नव्हतो , म्हणजे मला तसं कधीच जाणवलं नाही. “पुणेरी मराठी/शुद्ध मराठी” म्हणजेच उच्च मराठी असा भाव माझ्या मनात कधीच नव्हता, त्यामुळे भाषेचे अनेक लहेजे किंवा बोली; उदा : जळगावी , नागपुरी , देशी , दख्खनी , कोल्हापुरी , मालवणी इत्यादी- असे अनेक लहेजे ऐकणे हे मला खूप आवडत असे, आजही आवडते. भाषा ही आपण सुरुवातीला ऐकतो आणि म्हणूनच ‘भाषा ऐकणे’ हा माझ्यासाठी आजही अत्यन्त गूढ , रहस्यमय प्रांत आहे, आपण नक्की कसे “ऐकतो” हाच माझ्या आयुष्यभराच्या कुतूहलाचा , औत्सुक्याचा , संशोधनाचा विषय आहे. आपल्या भोवताली असलेल्या भाषा आपण नक्की कशा ऐकतो याबद्दल आपण काय सांगू शकतो ? माझ्या अनुभवातून मी भाषेचे दोन थेट भाग केले आहेत. एक आहे सांगाडा वाला भाग , म्हणजे भाषाशास्त्रीय भाग , त्यात अर्थातच - वाक्यविचार , क्रियापदांची रचना इत्यादी सर्व मुद्दे आले. नंतर येतो तो भाषेच्या व्यक्तिमत्वाचा , तिच्या आत्म्याचा आणि तिच्या सांगीतिक /ध्वनीशी संबंधित रचनेचा , चित्राचा भाग. म्हणजे असं पहा- क्वचित काही अपवाद वगळता जगातील तमाम पुरुषांचे सांगाडे एकसारखेच आहेत , आणि स्त्रियांचे एकसारखेच आहेत. फरक असेल तर वस्तुमानामध्ये , आकारामध्ये, उंचीमध्ये वगैरे असेल, परंतु सांगाड्याची मूळ रचना तीच आहे. परंतु आपल्या जीवनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण एक मनुष्य म्हणून ओळखतो , त्याचे बरेवाईट गुण असतील त्यानुसार ओळखतो. आपली प्रिय व्यक्ती म्हणजे फक्त एक सांगाडा आहे अशी कल्पना करून पहा बरं ! फार मुश्किल , आल्मोस्ट नामुमकिन !!! तद्वतच भाषेची माझी ओळख तिच्या ध्वनी/सांगीतिक गुणांमुळे होते. भाषाशास्त्रीय गोष्टी मी अर्थातच वाचत असतो , त्यावर कधी चर्चा वगैरे ही करतो , पण त्यात माझा आत्मा नाहीच. असो तर मुद्दा इतकाच आहे , की आजही मी अनेक भाषा , बोली , लहेजे लक्षपूर्वक ‘ऐकतो’, कधी बोलण्याचा , आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी भाषा-ध्वनी-संगीत हे एकाच तत्वाचे विविध पैलू आहेत.

बाशाच्या बाबतीत खूपच निराळी भाषिक पार्श्वभूमी आहे. मुळात पोलिश भाषेमध्ये खूप जास्त बोली/लहेजे नाहीत. आणि जे आहेत त्यातही मोठा फरक जाणवतो असंही नाही. तेव्हा मुळातच पोलिश मनुष्याचा कान या बारीकी ऐकायला तयार नाही/नसतो. शाळेत इंग्लिश शिकलेली असून देखील माझी बायको देखील आजही फारसं इंग्लिश बोलू शकत नाही, किंवा समजू शकत नाही. यात नुसतंच वैयक्तिक (अ)क्षमते बद्दल बोलायचं नाही , तर एकूण पोलिश मानसिकतेचा आणि शैक्षणिक इतिहासाचा पुष्कळ भाग आहे यामध्ये. ९० नंतर हा देश खुला झाला आणि आजघडीला इथल्या रस्त्यांवर बऱ्यापैकी भाषा-वैविध्य ‘ऐकायला’ मिळतं, परंतु ९० पर्यंत एकचएक भाषा , शाळेत जबरदस्तीच्या रशियन किंवा जर्मन भाषा यापलीकडे ‘भाषा-वैविध्य’ अस्तित्वातच नव्हतं. पुन्हा ७०/८०/९० च्या पोलिश पिढीमध्ये ( आणि जवळजवळ आजही) एक फार मोठा सामाजिक प्रॉब्लेम दिसतो , तो म्हणजे खुल्या दिलाने न गाण्याचा ! तासनतास भसाड्या आवाजात खुल्लमखुल्ला अंताक्षरी गाण्याचं अतिरेकी प्रस्थ भारत देशात आहे , तर पोलिश माणसाला सक्तमजुरीच्या शिक्षेची धमकी दिली तरी तो गायला तयार होईल की नाही ही शंकाच आहे. इथले लोक मजेत एखादं गाणं गुणगुणत आहेत असं चित्र देखील फार क्वचित दिसलं आहे मला. याउलट आपल्या भारतीय स्त्रिया, आज्या , मावश्या , काकवा किती सुरेख गुणगुणतात! अशा गुणगुणणाऱ्या, गाणाऱ्या गुणी पोलिश स्त्रिया या जास्तकरून पूर्व पोलंड मध्ये सापडतात. माझ्या निरीक्षणाप्रमाणे तथाकथित ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माने इथल्या माणसाच्या मनात जे अनेक घोळ घातले आहेत त्यात गाण्यावर, त्यातही खुलेपणाने गाण्यावर घाला घातला आहे. इथले मूळ स्लाव्हिक लोक आणि हे अत्यंत खुश राहणारे आणि मजेत नाचगाणं करणारे आहेत. इथली जुनी स्थानिक लोकगीतं फार अप्रतिम आहेत ! असो ! तर इथला मनुष्य आजही टीव्ही वर इंग्लिश पिक्चर - लेकतोर - च्या सोबत ऐकतो , म्हणजे कल्पना करा की मनोहारी शय्येवर कमीतकमी कपड्यात असलेली निकोल किडमन मादकपणे कुणाला म्हणते आहे , “चल ना आता !” तर पोलिश लेकतोर त्याच्या अत्यंत सपाट अशा आवाजात याचं पोलिश भाषांतर वाचतो; पुढच्या प्रसंगात एखादा नट हात चाकू/पिस्तूल घेऊन खुनी आवेशात ओरडतो आहे “मी तुझा खून करेन !” तर याचं देखील पोलिश भाषांतर पोलिश लेकतोर आधीच्याच निकोल किडमनच्या मादक प्रसंगाला जो स्वर दिला होता त्याच सुरात ऐकवतो! आणि जवळजवळ ९८ % पोलंड देश गेली अनेक पिढ्या अशा प्रकारे इंग्रजी सिनेमे पाहतो/ऐकतो आहे. यात दुसरी भाषा ‘ऐकण्याचा’ सवालच येत नाही.भारतीय मनुष्याकडे विविध भाषा , लहेजे , संगीत ‘ऐकण्याची’ फार मोठी क्षमता आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज आम्ही १० वर्षे एकत्र राहत असलो तरी माझ्या बायकोला मराठी भाषा फारशी समजत नाही , तिला हिंदी-मराठी मध्ये फरक करता येतो हे मात्र विशेष. तसेच तिला मराठी गाण्यांबद्दल वगैरे जास्त माहिती नाही, मी मात्र ५० च्या दशकापासून ते आजपर्यंत चे अनेक पोलिश गायक/गायिका ऐकत असतो. त्यांच्या गाणी वाचतो , त्यावर प्रश्न विचारतो वगैरे वगैरे ! मी नियमित पोलिश रेडिओ ऐकतो , अनेकवेळा मी ज्या पोलिश गायकाची गाणी ऐकलेली असतात ती माझ्या बायकोला माहीत नसतात.

मुले , मुले आणि मुळाक्षरे
तर २००९ मध्ये आम्हाला जुळी मुले झाली. जुळी मुले म्हणजे काय धांदल असते याची काही लोकांना कल्पना असेल. आई , आजी आजोबा आणि आजूबाजूचे अनेक लोक हे या मुलांशी पोलिश बोलणार हे स्वाभाविकच होतं. माझं काय ? मला पोलिश ठीकठाक बोलता येत असलं , तरी ती माझी अभिव्यक्तीची भाषा नाही. माझ्यासाठी अगदी सहज असणारी अर्थातच मराठी आणि मग इंग्रजी , संस्कृत , हिंदी अशी अनेक भाषांची भेळ असलेली भाषा. मुलं जन्मल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून मी त्यांच्याशी मराठी मध्ये बोलतो आहे, त्यांना अनेक गोष्टी सांगतो आहे, त्यांना मराठी फिल्म , विडिओ , क्लिप्स आणि मुलांना मराठी पुष्कळ समजतं. हा एका अर्थाने चमत्कार आहे, कारण त्यांच्याशी मराठी मध्ये बोलणारा मी एकटाच आहे, आजूबाजूला मी बोलत असलेल्या गोष्टींचे अर्थ तुलनेने पडताळून पाहायला मराठी बोलणारं कोणीच नाही. आमची मुलं अगदी लहान असताना नक्की कशा प्रकारे मराठी ऐकत होती , आणि आजही ऐकतात याची कल्पना करण्याचा प्रयत्न करतो , पण करता येत नाही. सुदैवाने आमच्याकडे कायमच जगभरातून लोक येतात, आम्हा दोघांनाही असंख्य मित्र-मैत्रिणी आहेत. त्यामुळे मुलांना या भाषिक भेळेची सवय आहे. सर्वसाधारण पोलिश मुलापेक्षा त्यांच्या आजूबाजूला पुष्कळच भाषिक विविधता आहे आणि ती तशी ठेवण्याचा आम्ही बऱ्यापैकी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतो. मी आणि बायको जर्मन मध्ये बोलतो , बायको आणि मुले पोलिश मध्ये बोलतात , मी मुलांशी मराठी ( तसेच किंचित इतर भा. भा. ) मध्ये बोलतो, मुलं माझ्याशी पोलिश मध्ये , आणि तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात, अशी आमच्याकडच्या संवादाची संरचना आहे, तरीही आमचं जीवन चालू आहे. आणि माझ्या आणि बायकोच्या संवाद-विसंवादाबद्दल बोलायचं झालं तर समान मातृभाषा असलेल्या जोडप्यांत “ अखेरचा शब्द हा बायकोचाच असतो” अशा त्रिकालाबाधित सत्याचा साक्षात्कार जबरदस्त निरीक्षण शक्ती असल्याने मला लहानपणीच झाला आहे , तद्वत हा अखेरचा शब्द दुसऱ्या भाषेत आला तर त्यानिमित्ताने आपल्याला दुसरी भाषा तरी शिकता येईल अशी सूज्ञ दूरदृष्टी माझ्यामध्ये होतीच Wink

माध्यमे , पुस्तके इत्यादी :

भाषा शिकणाऱ्या किंवा भाषेशी संपर्क ठेवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी इंटरनेट आणि इतर दृक-श्राव्य माध्यमे ही मोलाची देणगी आहे. मुलं लहान असल्यापासून किमान चार भाषांमधले रेडिओ ऐकत आहेत. साडेतीन-चार वर्षाची असल्यापासून त्यांना अधूनमधून काही छोट्या मराठी क्लिप्स , बालगीते ऐकवायला सुरुवात केली. अर्थात मुलं अनेक भाषांत पारंगत व्हावीत यासाठी हा अट्टाहास अजिबातच नाही. परंतु अनेकविध भाषा ऐकून , जगात अजूनही काही भाषा आहेत याचं भान येणे आणि मुळात त्याची भीती ना वाटणे हे फार महत्वाचं आहे. इथल्या स्थानिक लोकांचं निरीक्षण केल्यावर माझ्या लगेच लक्षात आलं, की इथला मनुष्य ‘परदेशी/अज्ञात’ गोष्टींना फारच बुजतो. या पार्श्वभूमीवर भारतीय लोकांनी “इंडियन इंग्लिश लिटरेचर” निर्माण करावं ही फार मोठी ताकद आहे. परदेशी भाषेमध्ये ताकदीची , गहिरी अभिव्यक्ती करता येणं ही क्षमता खास भारतीय असावी !

मुलांना मी कायम सांगत असतो , की त्यांना मुद्दाम, मारुनमुटकून भाषांची आवड लागावी असं माझं बिलकुल म्हणणं नाही , पण जर अनेक भाषा ऐकणं , त्यांचा आनंद घेणं शक्य असेल तर का नाही , आणि मुळात दुसऱ्या भाषेची भीती असायला नको. आज आमची मुलं चिंटू सारखे मराठी चित्रपट आवडीनं पाहतात , त्यांचा आनंद घेतात, आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यातल्या भाषिक विनोदांना हसतात. ससस सुट्टी… हे त्यांचं आवडतं गाणं आहे. त्यांना , खासकरून रॉयला विनोदाची चांगली समज आणि आवड आहे. त्यामुळे तो मराठी-पोलिश अशा ही विनोदाच्या काही खास जागा शोधतो, मजेदार असे पोलिश-मराठी शाब्दिक खेळ/कोट्या शोधतो - आणि माझ्या माहितीत तरी असे विनोद समजणारा आमचा तीनच लोकांचा ग्रुप पृथ्वीतलावर असावा! विनोद समजणे हा भाषा समजण्यातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्यातही फालतू विनोद समजणे , कोट्या समजणे हाही! उदाहरणार्थ - अर्थात यात इतर सामाजिक-सांस्कृतिक समज जी असते ती माझ्या मुलांना अनुभवाशिवाय येणारच नाही. उदा : झाडावर प्रेम करा , झाडाखाली करू नका - या ( मुळात अत्यंत टुकार) विनोदी स्लोगन वर ती हसतील नक्कीच , त्यांना -झाडावर प्रेम करा यात कोणावर तरी प्रेम करणे - हा मूळ वाक्प्रचार माहित आहे, परंतु यामागची भारतीय सांस्कृतिक पार्श्वभूमी माहित नाही. दुसरा मुलगा निरंजन खूप ऐकतो. सुदैवाने पोलिश रेडिओ वर मुलांसाठी म्हणून खास चॅनेल असतो, इतकंच नाही तर मुलांसाठी रेडिओ नाट्याचा इतका मोठा खजिना आहे, की काय सांगायचं ! ऑनलाईन देखील काही चांगली पोर्टल आहेत. स्नॉवेल ने मराठी कथा/कविता ध्वनी रूपात आणल्यामुळे त्याचे काही तुकडे त्याला ऐकायला फार आवडतात. स्नॉवेल सारखे उपक्रम जाणीवपूर्वक राबवले आणि वयोगटानुसार नवीन नवीन रेडिओ ( ध्वनी ) नाट्ये /कथा-कविता वाचन आपण निर्माण करीत राहिलो तर त्याचा भाषिक , सांस्कृतिक वगैरे पातळ्यांवर फायदाच फायदा होईल.

पुस्तके : माधुरी पुरंदरे यांनी अप्रतिम स्केचेस वाली अप्रतिम पुस्तके लहानग्यांसाठी लिहून फार भारी काम करून ठेवलं आहे. शाळेत जायचं या पुस्तकांपासून सुरु झालेला आमचा प्रवास आजही सुरु आहे. यासोबतच मुलांना मी इतरही अनेक गोष्टी वाचून दाखवतो/ऐकवतो; त्यात महाभारत , रामायण , पुराणकथा असं सर्व काही आलं. विक्रम-वेताळ हे तर प्रचंड आवडतं आहे. वेताळ पंचविशी चं १९५५ सालचं एक अप्रतिम पोलिश भाषांतर उपलब्ध आहे, पण मुलं म्हणतात की मराठीतच कथा ऐकव ! मी त्यांच्यासमोर पुस्तक उघडून या कथा वाचून न दाखवता स्वतःच्या शब्दात सांगतो. पुस्तकी मराठी त्यांना फारशी माहित नाही. तरीही -पराक्रमी राजा , सत्यनिष्ठ हरिश्चंद्र - अशा प्रकारची शब्दावली त्यांना समजते. वेताळाचे प्रश्न मी आधी त्यांना विचारतो आणि नंतर पुस्तकातलं उत्तर देतो. यावर पुष्कळ सविस्तर लिहिता येईल , पण थोडक्यात इतकंच सांगू शकतो की विचार करण्याचा , एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा प्राचीन दृष्टिकोन हा आजच्या नवीन प्रकारे पाहण्याला/दृष्टिकोनाला , त्यातही मुलांच्या , खूप प्रेरणा देऊ शकतो आणि त्याच्या पायावर नवीन प्रकारे विचार करण्याची , नवीन प्रकारे पाहण्याची शक्यता मिळू शकते. मुलांची आवडती भारतीय पात्रे म्हणजे अकबर-बिरबल , तेनालीराम , भीष्म , हरिश्चंद्र , प्रल्हाद , बाळकृष्ण, राम इत्यादी.

आजीने पाहिलेला चोर (व्यंकटेश माडगूळकर ) ही कथा आजवर त्यांना दहा वेळा तरी वाचून दाखवली असेल. ती कथा ऐकताना ते ज्याप्रकारे हसतात त्याचा व्हिडीओ केला तर टॉप टेन व्हायरल मध्ये जाईल हे नक्की ! ऐक टोले पडताहेत यातल्या गूढ कथा , भुतांच्या काही सांगीवांगी च्या कथा , काही पारंपरिक भुतांचे अनुभव हे देखील त्यांच्या भाषिक विश्वाचा एक भाग आहेत ( अशा प्रकारच्या कथा पोलिश भाषिक विश्वात , आणि त्यातही मुलांच्या भाषिक विश्वात फारशा येत नाहीत याची नोंद घ्यावी !)

याला जोडूनच येणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे -मुले, मुलांची पुस्तके आणि चित्रवाचन संस्कृती! याबद्दल भाषा आणि तिचे दृश्य स्वरूप यामध्ये अधिक लिहितो आहे.

भाषा : उच्चारण आणि पट्टी/ पिच ( pitch )

पोलिश भाषेमध्ये ‘ट’ वर्गीय वर्ण नाहीत , पुन्हा ‘ण’ नाही , तसेच - अ आणि आ - ( ज्याला इथले लोक long a अँड short a असं म्हणतात ) देखील नाहीत. हे फरक आजूबाजूला ध्वनी स्वरूपात उपलब्ध नसल्याने ते यांनी कधी ‘ऐकलेलेच; नाहीत , आणि त्यामुळे यातल्या उच्चारणाचा फरक पोलिश मुखातून येत नाही. आमची मुलं लहानपणापासून मराठी ऐकत आलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या - त , ट , ठ , ड , ढ … इत्यादी - उच्चारणात तुलनेनं पुष्कळ शुद्धता आहे! आणि मुळात ड , ढ , ध - अशा अनेक उच्चारांमध्ये फरक करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आता या क्षमतेमुळे तुमच्यासमोर कोणते छोटे छोटे आनंद खुले होतात तर -लहान मुलांचे बोबडे बोल , विनोदी कथांमध्ये चुकीचे उच्चार करून धमाल उडवून देणारी पात्रं या प्रकारच्या गोष्टींचा आस्वाद तुम्ही या क्षमतेमुळे घेऊ शकता. अर्थातच त्या त्या ठिकाणच्या सामाजिक , सांस्कृतिक संदर्भांची माहिती जितकी अधिक तितका आपला समजण्याचा आवाका वाढत जातो हे आहेच. परंतु आमची मुलं अजून लहान आहेत , पुढेमागे जर त्यांना यात रुची वाटू लागली तर कदाचित ते - चला हवा येऊ द्या - ( पुष्कळसा टुकार ...पण तरीही विनोदीच ) सारखा तथाकथित विनोदी कार्यक्रम पाहू शकतील. त्यांचं पोलिश भाषेचं उच्चारण देखील उत्तम आहे.

आता मुद्दा येतो तो पट्टी चा अर्थात पिच चा. भारतीय लोक सर्वसाधारणपणे वरच्या पट्टीत बोलतात , त्यातही स्त्रिया जास्तच. आपल्याकडे खालच्या पट्टीत गाणाऱ्या गायिका अगदीच कमी आहेत आणि याउलट स्थिती इथे आहे. माझ्या निरीक्षणानुसार दैंनदिन भाषा बोलण्याचा आपला एक - लघुत्तम सामाजिक पिच -असतो आणि तो देखील अर्थातच काळानुसार बदलत असतो. या लसापी चा वापर हा नाटकांमध्ये , कार्यक्रमांमध्ये गंभीर/विनोदी इत्यादी वातावरणनिर्मितीसाठी होतो , तसेच टीव्ही, रेडिओ वर बातम्या देणारे देखील जाणता-अजाणता या लसापि च्या आजूबाजूचे आवाज असणारेच घेतले जातात. उदा : ४०/५० च्या दशकातला बीबीसी आणि अमेरिकन रेडिओवरचा आवाज आठवून पहा. विविध भारती वरील गेल्या तीन दशकांमधले उद्घोषक आठवून पहा. अनेकदा मराठी सिनेमे पाहताना हा उंच पिच माझ्या मुलांना त्रास देतो.

भाषा आणि तिचे दृश्य स्वरूप : पाश्चात्य जगात एकूणातच दृश्य तत्वाला फार महत्व आहे. इथल्या लहान मुलाला ए , बी , सी , डी ( त्या त्या भाषेतली मुळाक्षरे ) हे ठिकठिकाणी दृश्य स्वरूपात दिसतं. यात नूडल , मॅकरोनी , बिस्किटं असे खाद्यप्रकार पण आले. एकूण भारतीय जीवनात एक मुळाक्षरांचा तक्ता सोडला तर आपल्याला आपली अक्षरे कुठे कुठे दृश्य स्वरुपात आणि तीदेखील सुबक , सुरेख , क्रिएटिव्ह स्वरूपात दिसतात हा प्रश्न विचारला पाहिजे. वरणफळं , पोळ्या बनवताना त्यात अक्षरे कोरून , त्या त्या अक्षराच्या आकारात बनवून दिली तर ? हा प्रयोग मी करून पहिला आहे , अर्थात फार वेळा नाही !

उत्तम रेखाटने लहान मुलांची असणारी पुस्तके ही मराठीमध्ये आताशा निघू लागली आहेत हे फार सुदैवाचं आहे. तरीही अकबर बिरबल, विक्रम-वेताळ वगैरे मराठी/हिंदी पुस्तके , कॉमिक्स यामधली रेखाटनं ही सुरेख, सुबक , उत्तम दर्जाची नसतात. त्याचं प्रिंटिंग करताना योग्य ती खबरदारी घेत नाहीत. रॉय या रेखाटनांमधल्या त्यांच्या कलर स्कीम मधल्या अनेक चुका वेळोवेळी काढत असतो.
मराठी मध्ये ( एकूणात देवनागरी वापरून ) भाषिक खेळ फारसे नाहीत , नवीन काळानुसार असे खेळ बनवले पाहिजेत. मुलांसाठी भाषिक खेळ बनवणारा एक विभागच पप्रत्येक शहरात /शाळेत तयार केला पाहिजे !

मातृभाषा - परदेशी भाषा - संपर्क भाषा : आजची गणिते

मराठी ही माझ्या मुलांसाठी मातृभाषा आहे का हा मोठा मजेशीर प्रश्न आहे. माझ्यामते ती आहे पण आणि नाही पण. आपल्या भाषिक केंद्रामध्ये दिवसेंदिवस होणारा ( प्रामुख्याने जागतिकीकरणामुळे होणारा ) बदल दाखवणारी ही नवीन पिढी आहे. आमचं घर , कुटुंब हेच मुळी एक फ्युजन आहे , किंवा संकर म्हणूया ! संकराचे फायदे तोटे दोन्ही आम्हाला मिळणार आहेत. आणि जागतिकीकरणाचा वेग , त्याच्या दिशा पाहता, जगभरात आजवर न अनुभवायला न मिळालेली भाषिक कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये वाढ होत जाईल. सर्वसामान्य भारतीय मनुष्याचं भाषिक केंद्र ( नुक्लियस ) हे कमीतकमी द्विभाषी असतंच. परंतु मिश्र कुटुंबातल्या , मग ती कुटुंबे एकाच देशातली परंतु भिन्न भाषी आई बाबांची असली तरी मुलांची भाषिक केंद्रे ही निराळी असतात , आणि जगभरात अशी भाषिक केंद्रे असलेली मुलं हळू हळू वाढतच जातील असा माझा अंदाज आहे. या संदर्भात आपली भाषा आपण आज कशी शिकवतो , आणि शिकवली पाहिजे याचा जाणीवपूर्वक शोध घेतला पाहिजे आणि तसे प्रयोग ही करून पहिले पाहिजेत.

विभूतियोगामध्ये “अक्षराणाम अकारोस्मि” असं गुडाकेशाला सांगणारे भगवान श्रीकृष्ण आज कदाचित म्हणतील की , “ हे अर्जुना , पहा इथे तिथे पसरलेल्या विशिष्ट काली जन्म पावणाऱ्या , हळूहळू विकसित होणाऱ्या आणि लयाला जाणाऱ्या या अनेक भाषा/बोली, आजच्या क्षणाला प्रगतीकडे, अधोगतीकडे वाटचाल करणारे हे ध्वनीसमूह माझ्याच विभूती आहेत”.

आज इतना ही !! Wink
( ता. क. : वास्तविक खूप खूप लिहावं , सांगावं असं वाटतं , अगदी बैजवार ! पण किती लिहिणार , किती बोलणार ! कधी जर यात रुची असणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष याबद्दल गप्पा मारता आल्या, त्यांचे अनुभव जाणून घेता आले तर मजा येईल आणि कदाचित उपयोग ही होईल )

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

फारच सुंदर आणि दुर्मीळ विषयावरचा लेख आहे.

माझा एक पोलिश मित्र आहे; आम्ही तीन वर्षं एकाच घरात राहिलो. भारतात एवढ्या भाषा आहेत, आणि मी इंग्लिश त्याच्यापेक्षा बरंच बरं बोलते, याबद्दल त्याला फार कुतूहल वाटत असे. वैषम्य नाही, कुतूहल, आश्चर्यच. पोलिश एकसुरीपणा मला जाणवला तो त्याची एक मैत्रीण आमच्या संस्थेत कामाला आली तेव्हा. कारण तिच्याही बऱ्याच प्रतिक्रिया या मित्रासारख्याच होत्या. नवीन भाषेला, उच्चारांना बुजणं त्याच्यासारखंच. हा मित्र महिनाभर अमेरिकेत राहून आल्यावरही त्याचे इंग्लिशचे हेल बदलायचे नाहीत; मात्र आठवडाभर पोलंडला जाऊन आला की त्याचं इंग्लिश समजायला प्रयत्न करावे लागायचे, हे आम्ही बरेचदा म्हणायचो.

तुला पूर्ण कादंबरी दिसत राहते, मला सिनेमाचं ट्रेलर दिसलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फार सुंदर लेख. तुमचं आणि तुमच्या मुलांचं कौतुक वाटतं.
पोलिश भाषेत बोलींचे खूप वैविध्य नसण्याचे कारण काय असावे? प्रमाणीकरण बऱ्याच आधी झालेले असणे व एकाच राज्यसत्तेखाली खूप काळासाठी असणे की इतर बोलीगटांनी हळूहळू प्रतिष्ठित मुख्यबोलीचा स्वीकार करणे की इतर काही?
आवाजाच्या पट्टीचा मुद्दाही रोचक आहे आणि आधी लक्षात आलेला आहे. माझे अनेक अमेरिकन मित्र माझ्यापेक्षा बऱ्याच खालच्या पट्टीत बोलतात. विशेषतः एखादे फॉर्मल प्रेझेंटेशन देताना त्यांचा आवाज अजूनच खालच्या पट्टीत जातो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोलिश बोलींचा भाषाशास्त्रीय "अधिकृत" इतिहास मला देखील ठाऊक नाही. मुळात या देशाचा इतिहास फारच कॉम्प्लिकेटेड आहे. साधारण १२० वर्षे ( बहुधा १७६१ नंतर) हा देश जगाच्या नकाशावर नव्हताच. रशियन , ऑस्ट्रियन आणि जर्मन असे तीन झोन्स होते. काही लोकांच्या सांगण्याप्रमाणे शंभरएक वर्षांपूर्वी या देशात आजच्या तुलनेने पुष्कळ भाषिक-सांस्कृतिक विविधता होती. एक दंतकथा सांगतो. असं म्हणतात की कोणी प्रोफेसर बाई जुन्या बोलींचा अभ्यास करून त्यांचं रेकॉर्डिंग करण्यासाठी गावागावात हिंडत होत्या, तर युद्धामुळे यातले जुन्या बोली बोलणारे लोक अचानक एका रात्रीच्या बॉम्बिंग मुळे पृथ्वीतलावरून नष्टच झाले आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. नष्ट झालेले आवाज की बोली असं एक पुस्तक ही त्यांनी लिहिलं आहे बहुधा ! हे सर्व मी दुसऱ्याच एका प्रोफेसर बाईंकडून ऐकलं आहे. तर याबद्दल अधिक काही 'अधिकृत' माहिती मिळाली तर त्यावर लिहीनच !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

मस्त लिखाण. तुमचे अनुभव आणि त्याकडे तुमचं बघणं... आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त लेखन, अतिशय दुर्मिळ परिस्थितीतले अनुभव झकास मांडले आहेत. लय आवडलं. तुमचं वाचून जस्ट फॉर इट्स ओन सेक एखादी स्लाव्हिक भाषा शिकावीशी वाटू लागलीय...

(बहुभाषी हॉटपॉटप्रेमी) बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा ! जरूर शिका Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

अगदी सहज म्हणून ! मी ऑगस्ट-सप्टेंबर भारतात ( पुणे-तळेगाव) असणार आहे. जर एखादा "ऐसी-पोलिश कट्टा" जमवता आला तर पोलिश भाषेच्या काही गमतीजमती शिकवायला/सांगायला आवडतील Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

मला आवडेल यायला ऐसी-पोलिश कट्ट्यावर. कोणतीही संध्याकाळ किंवा रविवारी सकाळीसुद्धा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विभूतियोगामध्ये “अक्षराणाम अकारोस्मि” असं गुडाकेशाला सांगणारे भगवान श्रीकृष्ण

येशू ख्रिस्त म्हणतो, "I am the Alpha and the Omega". यशोदेचा कृष्ण (फक्त) म्हणतो, "अक्षराणाम् अकारोस्मि". कोण मोठा?

यशोदेच्या कृष्णाने "ज्ञ"वरसुद्धा क्लेम केला नाही, याचे कारण उर्वरित तेहेतीस कोटी वजा एकपैकी दुसऱ्याच कोणाला तरी ज्ञकार अॅलॉट झाला, हे असावे काय?

एकेश्वरवादाचे फायदे हे असे असतात! (बोले तो, देवाला/देवपुरुषाला. आम्हा काय त्याचे?)

..........

बाकी, लेख छान. तूर्तास वरवरच वाचला; सवडीने सविस्तर वाचेन म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...श्रीकृष्णाचा रोख असा काही असू शकेल काय, की बाबा अकार म्हणजे सुरुवात आणि ज्ञकार म्हणजे शेवट. आता, मी अकार म्हणजे सुरुवात तर आहेच, परंतु तिच्यामारी आमचे विश्वच (बोले तो त्याची व्याप्ती) इतके मोठे आहे, की ज्ञकारापर्यंत म्हणजे शेवटापर्यंत पोहोचणे खुद्द मलासुद्धा शक्य नाही, सबब मी ज्ञकार असू शकत नाही. ते आल्फा नि ओमेगा वगैरे म्हणणे येशू ख्रिस्ताला सोपे आहे; त्याला माझी अडचण ती काय कळणार?

(अतिअवांतर: यावरून एक विनोद आठवला. जुन्या काळातली गोष्ट आहे. पूर्व युरोपातल्या कोठल्यातरी कम्युनिस्ट राष्ट्रातला शेतकरी अमेरिकेस मायग्रेट होतो, नि थेट टेक्सासात पोहोचतो. तिथला त्याचा नवीन शेजारी त्याला शोऑफ करत असतो. आमच्या अमेरिकेत कसे सगळे मोठे असते, नि यंव नि त्यंव. एकदा त्याला आपली रँच दाखवायला घेऊन जातो, नि सांगतो, "ही पहा माझी रँच! इथे मी भल्या पहाटे माझा पिकप ट्रक घेऊन एका टोकावरून निघालो, तर दुसऱ्या टोकाला पोहोचेपर्यंत सूर्यास्त झालेला असतो."

पूर्व युरोपीय शेतकरी समजूतदारपणे मान डोलावतो. "युगोस्लावियात (किंवा जेथे कोठे असेल तेथे) माझ्याकडेसुद्धा तसलीच कार होती.")

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अतिशय आवडला. विशेषत: अक्षरं दृश्य स्वरुपात फारशी न आढळणं, भाषिक खेळ आणि पुस्तकांतील रेखाटनं यांबाबतची निरीक्षणं अगदी नेमकी आहेत.

त्यामुळे मुलांना या भाषिक भेळेची सवय आहे. सर्वसाधारण पोलिश मुलापेक्षा त्यांच्या आजूबाजूला पुष्कळच भाषिक विविधता आहे आणि ती तशी ठेवण्याचा आम्ही बऱ्यापैकी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतो. मी आणि बायको जर्मन मध्ये बोलतो , बायको आणि मुले पोलिश मध्ये बोलतात , मी मुलांशी मराठी ( तसेच किंचित इतर भा. भा. ) मध्ये बोलतो, मुलं माझ्याशी पोलिश मध्ये , आणि तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात, अशी आमच्याकडच्या संवादाची संरचना आहे, तरीही आमचं जीवन चालू आहे.

--- भाषिक भेळेवरून नात्यातलं एक मराठी-सिंधी कुटुंब आठवलं. त्यातली स्त्री आपल्या सासऱ्यांशी सिंधीतून, नवऱ्याशी हिंदीतून, मुलांशी (बव्हंशी) इंग्रजीतून, तिच्या आईसोबत किंवा सख्ख्या भावंडांशी मालवणीतून आणि माहेरच्या अन्य नातेवाईकांशी मराठीतून संवाद साधत असे. एखाद्या समारंभात गोतावळा जमला असताना तिच्या संभाषणाची गाडी भाषेचे रुळ ज्या सफाईने बदले; त्याला Code-switching म्हणतात हे नंतर समजलं. (दुवा)

वानगीदाखल हा एक 'फ्रेंच - इंग्लिश - बहासा इंडोनेशिया'मधला, कौटुंबिक वातावरणातला व्हिडिओ:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला, आपणही आवडलात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमचं इतर लेखनही आवडतंच. हे लिखाण विशेष आवडलं.
हा आवडीचा विषय आहे, त्यामुळे पुन्हा नीट वाचून काही बोलेन. मिहिरने विचारलेले प्रश्न मलाही पडलेच.
--
कालच बहुभाषिकता ह्या पुस्तकाविषयी वाचलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे प्रयत्न आणि निरीक्षणं आवडली.
सलाम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"वास्तविक खूप खूप लिहावं , सांगावं असं वाटतं , अगदी बैजवार ! पण किती लिहिणार , किती बोलणार ! कधी जर यात रुची असणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष याबद्दल गप्पा मारता आल्या, त्यांचे अनुभव जाणून घेता आले तर मजा येईल आणि कदाचित उपयोग ही होईल"

आवडलं.
मला लहानपणापासून वाटायचं की बय्राच भाषा याव्यात. पण फारशी प्रगती झाली नाही. गुजराती सहावीत वाचायला शिकलो चंदामामा वाचून. मग पेपर मासिकं वाचता येऊ लागली. चित्रलेखातलं तारक मेहतानो उंधो चष्मा आवडीने वाचत असे. मराठी चित्रलेखा नंतर आलं.
इतर भाषांचेही प्रयत्न सुरूच ठेवणार आहे.

तुमच्या मुलांचंही कौतुक आहे.

बय्राच वर्षांनी एक चांगला लेख वाचायला मिळाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणी भाषा शिकण्याची क्षमताही चांगली असते आणि सजग प्रयत्नांना यश येतेच.
माझ्याही माहितीत एक आगळे कुटुंब आहे. ते तेव्हा तरी पॅरीसमधे होते. अभय शुक्ल. त्यांची बायको इटालिअन. एकमेकांशी फ्रेंच आणि इंग्लिश. मुलांशी दोघंही आपापाल्या भाषा मुद्दाम बोलत. एकाआड एक दिवशी रात्री झोपताना एकेका भाषेत गोष्ट सांगत. मुलांना चारही भाषा येत होत्या.
तुमचे अभिनंदन व शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अतिशय आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फार सुंदर लिहिलय तुम्ही. वा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय जबरदस्त लेख आहे... मस्त मस्त मस्त...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.