विक्रमादित्याची दिनचर्या

बरीच वर्षे, रसायन कंपन्यांच्या 'शोध आणि विस्तार' (कसला बोडक्याचा शोध! भारतांत तरी बहुतांशी विस्तारच) विभागात नोकरीची उमेदवारी केल्यावर, नोकरीच गेल्यामुळे, 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार', अर्थात कन्सल्टन्सी करायला लागलो. मूळचा स्वभाव भिडस्त असल्यामुळे, सुरवातीला अनेकांनी फसवलेच. पण तरीही नेटाने काम करत राहिलो. कामे बहुतेक लहान रासायनिक उद्योगातीलच असायची. त्यासाठी, लांबलांबच्या उद्योगसमूहात प्रवास करुन जावे लागे. अशा ठिकाणी, अनेक वेळा, काही वल्ली भेटत. अशाच एका व्यक्तिमत्वाची ही ओळख! यशाची धुंदी वगैरे, आपण कथा-कादंबऱ्या, नाटके, चित्रपट अशा माध्यमातून पहातो. पण व्यावसायिक कामात, असे प्रत्यक्ष अनुभव आले की ते लक्षांत रहातात.

विक्रमादित्याला आज पहाटे पांच वाजताच जाग आली. पूर्वी यावेळेस तो फिरायला जायचा. प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनीच त्याला तसे बजावले होते. सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा फायदा त्याच्या तब्येतीला तर झालाच, शिवाय सकाळी कोणकोण मोठे लोक भेटले आणि मी त्यांनाही कसे सुनावले याच्या कथाही मित्रांना सांगता यायच्या. पण त्याचाही आताशा कंटाळा येऊ लागला होता. डॉक्टरला काय कळतंय, त्याने तर आपल्याला सिगरेट ओढायलाही बंदी घातलीये, असा विचार करून पडल्या पडल्याच विक्रमादित्याने एक सिगारेट शिलगावली. आज कारखान्यांत कोणाला बोलून झोडायचे, कोणाचा पाणउतारा करायचा याचा विचार करता करता दोन सिगरेटी संपल्या देखील!
मग झटक्यात उठून त्याने सगळी आन्हिके उरकली. बायकामुलांवर ताशेरे झाडतच तो तयार झाला. स्टेशनवर जायला लवकर रिक्शा न मिळाल्याचा राग कोणावर काढावा या विचारात आणखी एक सिगरेट चुरगाळली. प्रवासात त्याचा नेहमीचा ग्रुप होताच, त्यांतच तोंडी लावायला एक नवीन पाहुणाही होता. पाहुण्याच्या दुर्दैवाने तो मराठी होता! गाडी सुरू होताच विक्रमादित्याने आपली पोतडी सोडली. आधी मराठी माणसाच्या नाकर्तेपणाबद्दल फैरी झाडल्या. मग आपल्या सोन्यासारख्या देशाची कशी वाट लागली आणि त्याला तुम्हीच सगळे (मी सोडून) कसे जबाबदार आहात हे प्रभावीपणे पटवून दिले. त्यानंतर अमेरिकेचे गुणगान करून सर्व मोठ्ठ्या हस्तींशी माझी कशी ओळख आहे हे बोलण्याच्या ओघात पाव्हण्याला खुबीने सांगितले. बिचाऱ्या पाहुण्याचा वासलेला आ बंदच होत नव्हता. नेहमीच्या ग्रुपला मात्र अजीर्ण झाले होते. त्यांना आतापर्यंत सगळेच डायलॉग तोंडपाठ झाले होते. पाहुण्याला अजून जरा घोळात घ्यावे या धूर्त हेतूने, त्याने दुपारच्या जेवणाचे आमंत्रण दिले.
कारखान्यात पाऊल टाकताक्षणी विक्रमादित्याच्या जणु अंगात संचारले! सलामीला दाराशीच गुरख्याला कडक सलाम कसा ठोकायचा ते सुनावले. सुपरवायझर व अन्य दोनतीन कर्मचाऱ्यांना स्वच्छता न राखल्याबद्दल यथेच्छ शिवीगाळ केली. नंतर एकदोघांना फोन करण्याचा प्रयत्न केला. फोनचे यंत्र नीट चालत नसल्याचा संशय आल्याबरोबर फोनच उचकटून कोपऱ्यात भिरकावला आणि पार्टनरवर जोरात ओरडून एक नवीन फोन आणण्याचे फर्मान सोडले! भेटायला एकदोन ठेकेदार व सप्लायर्स आले होते. त्यांना इतक्या लवकर पैसे मागितल्याबद्दल गुरकावले. अत्यंत अपराधी मुद्रेने ते बिचारे खाली मान घालून चालते झाले. हे सर्व चालू असताना चहापानाचा व धुम्रपानाचा यज्ञ अखंडपणे चाललाच होता. लवकरच विक्रमादित्य कंटाळला. दर पांच मिनिटांनी नवीन काही घडले वा बिघडले नाही की तो असाच कंटाळत असे.
मग त्याने कारखान्यात एक फेरी मारली. विक्रमादित्याच्या कल्पनेची भरारी फार मोठी होती. आजवरचे यश केवळ त्याच्याच सुपीक ‘किडनीतून’ (त्याचा आवडता शब्द) बाहेर पडलेल्या अफाट कल्पनांमुळे मिळाले होते. रूढ प्रथेपेक्षा अनेक वेगळी व नवीन यंत्रे स्वतःच्या डोक्याने बनवून घ्यायची आणि ती चालवून बघायची हा त्याचा आवडता छंद होता. ती चालली तर ठीक नाहीतर त्याची जागा अडगळीत! आज असेच एखादे नवीन यंत्र आणून कुठे ठेवावे या विचारांत असताना त्याला एकदम जाणवले की आता नवीन काही ठेवायला कारखान्यात जागाच नाही! त्यासाठी ताबडतोब एक नवीन कारखाना काढण्याचे नक्की झाले. विक्रमादित्य खुश हुआ! कारण आता निदान सहा महिने तरी त्याच्या किडनीला भरपूर काम मिळणार होते. नवीन जागी प्रायोगिक यंत्रांसाठी खूप जागा ठेवायची. पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्या बुद्धीची चमक दाखवायची!! पैसे काय कोणीही भxx कमावतात. पण सतत काही नवीन करायला अक्कल लागते. आणि ती तर दुसऱ्या कोणाकडेच नाही.
दुपार झाली. पाहुणा जेवायला आला. त्याला नोकरी सोडून व्यवसाय करणे हेच कसे पुरूषार्थाचे लक्षण आहे हे पटवून देण्यात आले. कारखाना आपल्या गतीने चालूच होता. पाहुण्याला सर्व यंत्रे व संयंत्रे दाखवून संमोहित अवस्थेत पाठवून देण्यात आले.
संध्याकाळ झाली. विक्रमादत्य आता फार दमला होता. शरीर थकले होते डोळ्यांवर झापड येत होती. परत जायची वेळ होऊन गेल्यामुळे इतरांची चुळबुळ सुरू झाली. पण आत्ताच आपण निघालो तर इतरांना वेळेवर घरी जाण्याची चटक लागेल या भीतिने विक्रमादित्याने चर्चेचे गुऱ्हाळ चालू केले. अगदीच नाईलाज झाल्यावर त्याने आपली धोकटी उचलून स्टेशनचा रस्ता धरला.
रात्री घरी पोचला तोपर्यंत सर्वजण जेवून टी.व्ही. पहात होते. कसेबसे जेवून घेतल्यावर तो शयनगृहात गेला. सगळे अंगांग दुखत बिछान्यावर पहुडलेला तो पुरुषसिंह फार उदास होता. पण थकूनभागून कसे चालले असते ? उद्या सकाळी उठून परत धांवायचे होते. वेळ कमी होता. कारण या जन्मातही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नव्हता !!!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तिमा आज कर्क राशीला निर्मितीक्षमतेचा ग्रह अनुकूल असावा की तुम्ही आणि मी दोघानी एकेक ललित लिहीले.
__________________
ललित विशेषत: स्वभावाचे निरीक्षण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तारापूर ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तारापूरच असणार ते. नाहीतर विक्रमादित्याला घरी पोचायला रात्र कशी होईल, दररोज.
तिरसिंगराव , उत्तम हो.
पुढचा भाग येउद्या की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तारापूरच! बोरिवली ते बोईसर असा रोजचा प्रवास असायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिलंय तिमा. आणखी येऊ दे तुमच्या र आणि ड कारकिर्दीतले किस्से.

आपण व्यक्ती म्हणून कोण असतो हे बऱ्याच अंशी आपल्या व्यवसायावर अवलंबून असतं असं माझं निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्त लिहिलं आहेत, तिमा.

आबाच्या मागणीला पाठिंबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घरोघरी मातीच्या चुली. सगळे साहेबं एकजात अं अं हरामखोर.
(मुळ शब्द कंट्रोल केला).
तिरशींगराव तिमीराच्या भैर आले. छान लिहिले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

मस्त लेखन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छोटासाच, पण लक्षवेधक लेख. काही मोजक्या, सराइत रेषांनी काढलेलं व्यक्तिचित्र आवडलं. काहीशा कर्तबगार, पण अर्धयशस्वी माणसाची घुसमट कौशल्याने दाखवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0