Cold Blooded - २

Cold Blooded - Final - २

"हॅलो, वरळी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पे. महाडीक बोलतोय..."

"गुड मॉर्निंग ऑफीसर! मी डॉ. सदानंद देशपांडे बोलतो आहे. इथे वरळी सी फेसवर एका मुलीची डेडबॉडी पडलेली आहे. तुम्ही ताबडतोब इथे या!"

"ठीक आहे डॉक्टरसाहेब! आम्ही लगेच येतो आहोत. फक्तं आम्ही तिथे येईपर्यंत कोणालाही बॉडीला हात लावू देवू नका, आणि तुम्ही तिथेच थांबा!"

"ओके ऑफीसर!"

भल्या सकाळी सहाच्या सुमाराला आपल्यासमोर अशी काही भानगड येईल याची महाडीकांना अजिबात अपेक्षा नव्हती, त्यामुळे त्यांची तारांबळच उडाली. परंतु या प्रकरणाचे पुढचे सोपस्कार त्यांनाच आटपावे लागणार होत.

"शिंदे, ताबडतोब निघण्याची तयारी करा!" फोन खाली ठेवतच महाडीकांनी हेड कॉन्स्टेबल शिंदेना सूचना दिली, "बाहेर कोण कोण आहेत ते बघा. डिटेक्शनवाले बघा. मी तावडेसाहेबांना खबर देतो!"

अवघ्या दहा मिनिटांत इन्स्पेक्टर तावडे, सब् इन्स्पेक्टर महाडीक, हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि चार शिपाई यांच्यासह सायरनचा आवाज करत पोलीस जीप वरळी सी फेसवर येवून पोहोचली. मृतदेहाभोवती जमा झालेल्या गर्दीमुळे मृतदेह आढळलेलं नेमकं ठिकाण ओळखण्यास पोलीसांना एक मिनिटही लागलं नाही. सी फेसच्या फूटपाथवरच त्या दुर्दैवी तरुणीचा मृतदेह पडलेला होता. शिंदे आणि इतर शिपाई बघ्यांची गर्दी मागे हटवत असतानाच तावडे आणि महाडीकांनी मृतदेहाचं निरीक्षण करण्यास सुरवात केली.

ती मृत तरुणी सुमारे २३ - २४ वर्षांची असावी. गोरापान रंग आणि कोणीही वळून पाहवं असं रुप तिला लाभलं होतं. मृत्यूनंतरही तिच्या नैसर्गिक सौंदर्यात कोणतीही उणीव भासत नव्हती. जीन्स - टी-शर्ट आणि त्यावर जॅकेट तिच्या देहावर होता. पायात स्पोर्ट्स शूज होते. मनगटावर घड्याळ होतं. तिच्या एकंदर पेहरावावरुन ती उच्चभ्रू आणि सधन घरातली असावी असा सहज अंदाज बांधता येत होता.

"डॉ. देशपांडे?" तावडे मृतदेहाचं निरीक्षण करत असतानाच महाडीकांनी गर्दीकडे पाहत प्रश्नं केला.

"येस ऑफीसर!" सुमारे पन्नाशीचे डॉ. देशपांडे पुढे आले.

"बोला डॉ. देशपांडे! नक्की काय झालं?"

"मी इथे स्टेट बँकेच्या मागच्या गल्लीत राहतो." डॉ. देशपांडें म्हणाले, "रोज पहाटे मी आणि माझी मिसेस इथे मॉर्निंग वॉकला येतो. रोजच्याप्रमाणे आजही आलो तेव्हा ही मुलगी इथे पडलेली दिसली. तिची पल्स चेक केली पण पल्स लागत नव्हती. पल्स लागत नाहीत असं पाहिल्यावर मिसेसनी हार्टबीट्स चेक केले, पण ते देखिल लागेनात तेव्हा ती मेली आहे हे आमच्या लक्षात आलं आणि मी तुम्हाला फोन केला."

"तुम्ही बॉडी पाहिलीत तेव्हा ती याच अवस्थेत होती?"

"अ‍ॅब्सूल्यूटली! मी फक्तं तिच्या हाताला स्पर्श केला होता आणि मिसेसनी छातीला, बट वी डिड नॉट हॅव टू चेंज बॉडी पोझीशन."

"ऑलराईट! माने, डॉक्टरांचं आणि मॅडमचं स्टेटमेंट लिहून घ्या!"

सब् इन्स्पेक्टर महाडीक डॉ. देशपांडेंशी बोलत असतानाच पोलिस फोटोग्राफर, फिंगर प्रिंट एक्सपर्ट वगैरे मंडळी तिथे पोहोचली होती. एव्हाना इन्स्पेक्टर तावडेंनी मृतदेहाचं निरीक्षण संपवलं होतं. दोन हवालदारांनी तिचा मृतदेह एका चादरीवर आणून ठेवला होता. दोन महिला कॉन्स्टेबलनी तिच्या जीन्सचे खिसे उलटेपालटे करुन पाहिले, पण एका फाटक्या कागदाव्यतिरिक्तं काहीही बाहेर आलं नव्हतं. तावडेंनी तो कागद निरखून पाहिला. त्या कागदावर काहीतरी अक्षरं आणि आकडे छापलेले असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं होतं, पण त्यावरुन काहीच अर्थबोध होत नव्हता. ते महाडीकांना पुढच्या तपासाच्या सूचना देत असतानाच.....

"गुड मॉर्निंग तावडे...." खणखणीत आवाजातली हाक तावडेंच्या कानावर आली.

तावडेंनी मागे वळून पाहीलं आणि समोरच्या व्यक्तीला पाहताच खाडकन सॅल्यूट ठोकला. तावडेंनी सॅल्यूट ठोकला म्हटल्यावर पाठोपाठ महाडीक, हेड कॉन्स्टेबल माने आणि इतरांनीही सॅल्यूट मारले.

सिनीयर इन्स्पेक्टर रोहित प्रधान!

पोलीस स्टेशनमधून निघण्यापूर्वीच महाडीकांनी या मृतदेहाची बातमी पोलीस कंट्रोलरुमला कळवली होती. तिथून ती मुंबईतल्या सगळ्या पोलीस स्टेशन्सना आणि वायरलेस व्हॅन्सना फ्लॅश होणार होती आणि त्याबरोबरच क्राईम ब्रँचलाही कळवली जाणार होती. तावडेंना ही प्रोसिजर पूर्णपणे पाठ होती. क्राईम ब्रँचचा एखादा ऑफीसर दुपारनंतर या केसची माहिती घेण्यासाठी वरळी पोलीस स्टेशनला येईल असा त्यांचा अंदाज होता, पण अवघ्या तासाभरात खुद्दं प्रधानसाहेब इथे धडकतील याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती.

"काय झालं तावडे? काही बोलली ही मुलगी? अशी का झोपली आहे?"

"अजून तरी काही नाही सर! बॉडीवर कोणतीही जखम नाही. फर्स्ट इंप्रेशनप्रमाणे गळा दाबल्याच्याही काही खुणा नाहीत."

"आय सी... लेट्स हॅव अ लुक...."

रोहितने काळजीपूर्वक सर्व बाजूंनी मृतदेहाचं निरीक्षण केलं. मध्येच गुडघ्यांवर बसून त्याने तिचे केसही हुंगून पाहीले. मध्येच तो डोळे मिटून स्वत:शीच काहितरी विचार करत होता. एकदा तर तो तिच्या चेहर्‍यावर इतका झुकला की तो आता तिचं चुंबन घेतो की काय अशी भलतीच शंका सगळ्यांना आली, पण त्याचं तिकडे लक्षंच नव्हतं. तो आपल्या कामात मग्नं होता. तिच्या पायातल्या सँडल्स त्याने फार बारकाईने तपासून पाहिल्या. पण खरा कळस झाला तो सर्वात शेवटी त्याने चक्कं तिच्याशी शेकहँड केला तेव्हा! काही क्षण तिचा हात हातात घेऊन तपासल्यावर त्याने अचानक प्रश्नं केला,

"तावडे, वाजले किती?"

"अं..." या अनपेक्षित प्रश्नामुळे तावडे एकदम गोंधळून गेले. "नऊ वाजून गेले सर!"

"नऊ..." तो स्वत:शीच विचार करत म्हणाला, "हिच्यापाशी काही सापडलं? पर्स वगैरे? कॅश? मोबाईल?"

"काही नाही सर! फक्तं हे चिटोरं सापडलं."

"काय आहे त्यात?"

"मी अजून पाहीलं नाही सर." आपल्याला काही कळलेलं नाही हे त्याला कळू नये या हेतूने तावडे म्हणाले.

रोहित काहीच बोलला नाही. तो अत्यंत बारकाईने त्या कागदाचं निरीक्षण करत होता. सुमारे पंधरा मिनिटांनी त्याने तो कागद घडी करुन आपल्या खिशात टाकला.

"एक काम करा महाडीक ..." समुद्रकिनार्‍यावर बांधलेल्या कट्ट्याकडे खूण करत तो म्हणाला, "रात्री इथे कट्ट्यावर झोपणारे भिकारी आणि उशीरापर्यंत धंदा करणारे भेळपुरी आणि इतर गाडीवाले वगैरे सगळ्यांकडे नीट इन्क्वायरी करा. रात्री उशीरा एखादी गाडी इथे थांबली होती का आणि थांबली असल्यास किती वेळ थांबली याची काही माहिती मिळते का ते तपासा. स्पेसिफीकली रात्री एक नंतर!"

"रात्री एक नंतर?" तावडे गोंधळून रोहितकडे पाहत राहिले, "काही खास कारण सर?"

"तावडे, आता सकाळचे नऊ वाजलेत. या मुलीचा मृत्यू झाल्याला किमान सहा ते सात तास झालेत.... कदाचित आठ... कारण रिगर मॉर्टीसची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली आहे. याचा अर्थ काल रात्री एक ते दीड नंतर ही निश्चितच जिवंत नव्हती! आता एवढ्या रात्री ही इथे आली कशी? आणि कोणाबरोबर? हिचं लग्नं झाल्याची कोणतीही खूण दिसत नाही, याचा अर्थ नवर्‍याबरोबर नक्कीच आली नसावी. रात्री एक वाजता घरातल्या इतर कोणाबरोबर आली असण्याची शक्यता जवळपास नाही. स्ट्रगल झाल्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहित, सगळे कपडे व्यवस्थित आहेत, याचा अर्थ रेप केस नक्कीच नाही. इन दॅट केस, द ओन्ली पॉसिबलीटी इज बॉयफ्रेंड! पण बॉयफ्रेंडबरोबर एखाद्या पब किंवा डिस्कोत जाण्याऐवजी ही इथे कशाला आली असेल? हिच्यापाशी पर्स किंवा एक नया पैसाही कॅश सापडली नाही. मुंबईत अशी कोणती मुलगी असेल जी काहीही न घेता रात्री घराबाहेर पडेल? याचा अर्थ एकतर हिच्याबरोबर जो कोणी आला होता तो हिची पर्स वगैरे घेऊन गेला किंवा केवळ बॉडी इथे टाकून गेला असावा!"

तावडे चकीत होऊन त्याच्याकडे पाहत राहीले. 'इतक्या तर्कशुद्ध पद्धतीने आपण कधीच विचार करु शकणार नाही' त्यांच्या मनात आलं.

"बाय द वे, बॉडी सर्वप्रथम कोणी पाहिली?"

महाडिकांनी डॉ. देशपांडे आणि त्यांच्या पत्नीला रोहितसमोर उभं केलं. डॉ. देशपांडेंनी तावडेंना सांगितलेली सर्व माहिती पुन्हा त्याला तपशीलवारपणे सांगितली. त्यांचं सगळं बोलणं पूर्ण ऐकून घेतल्यावर रोहितने त्यांना मोजकेच प्रश्नं विचारले. त्यांच्याकडून आणखीन काही कळणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने देशपांडे पती - पत्नींना घरी पाठवून दिलं.

"तावडे, या मुलीची बॉडी पोस्टमॉर्टेमला पाठवाल तेव्हा पीएम स्वत: डॉ. भरुचांनी करावं अशी माझी रिक्वेस्ट आहे अशी चिठी पाठवण्यास विसरु नका. हिचे फिंगरप्रिंट्सही घ्या आणि आपल्या डेटाबेसमध्ये आणि सेंट्रल डेटाबेसला पाठवून द्या. ही जर रेकॉर्डवरची गुन्हेगार असेल तर ट्रेस लागेल. हिच्या एकंदर अ‍ॅपिअरन्सवरुन मला त्याची शक्यता कमीच वाटते, बट यू मे नेव्हर नो. आणखीन एक...." मृतदेहावर सापडलेला कागदाचा तुकडा खिशातून काढत रोहित म्हणाला, "या मुलीने गेल्या चार ते पाच दिवसांत रात्री हॉटेलमध्ये जेवण घेतलेलं आहे. बहुतेक चर्चगेट स्टेशनजवळच्या गेलॉर्ड हॉटेलमध्ये! पेमेंट क्रेडीट कार्डने केलेलं आहे आणि ज्या व्यक्तीच्या कार्डवरुन हे पेमेंट केलेलं आहे त्याचं आडनाव वेदी... बहुतेक द्विवेदी, त्रिवेदी किंवा चतुर्वेदी किंवा त्या प्रकारचं एखादं आडनाव असावं! आता हे हिचं आडनाव असेल किंवा हिच्याबरोबर जो कोणी होता, त्याचंही असू शकेल..."

तावडे आणि महाडीक आ SS वासून त्याच्याकडे पाहतच राहिले. त्या फाटक्या चिटोर्‍यावरुन त्याने हा अंदाज कसा बांधला असावा हे विचार करुनही त्यांच्या डोक्यात येत नव्हतं! ते पुढे काही बोलणार तोच रोहीतचा मोबाईल वाजला.

"हॅलो... बोला कदम.... येस! मी त्याच इन्व्हेस्टीगेशनमध्ये आहे स्पॉटवर. ऑलमोस्ट निघालोच आहे आता....एक काम करा कदम...." घड्याळावर नजर टाकत तो म्हणाला, "तुम्ही, नाईक आणि देशपांडे मॅडम तासाभरात मला चर्चगेट स्टेशनच्या कॉर्नरला भेटा. आज गेलॉर्डचं चिकन खाण्याचा मूड आहे! आणि हो, युनिफॉर्म नको! सिव्हील ड्रेसमध्ये या तुम्ही!"

जेमतेम अर्ध्या - पाऊण तासात रोहित चर्चगेट स्टेशनपाशी पोहोचला. सब् इन्स्पे. संजय कदम, श्रद्धा देशपांडे आणि हेड कॉन्स्टेबल मधुकर नाईक त्याची वाटच पाहत होते. तिघेही गेल्या तीन - साडेतीन वर्षांपासून त्याच्या हाताखाली काम करत होते. कित्येक केसेसच्या तपासामध्ये त्यांनी त्याच्याबरोबर भाग घेतला होता. त्याच्या तालमीत राहून ते तिघंही कोणत्याही केसचा सर्वांगाने विचार करण्यास आणि प्रत्येक शक्यता आजमावून पाहण्यास शिकले होते. त्याने मुद्दाम सिव्हील डेसमध्ये येण्याचं बजावलं आहे याचा अर्थ त्याला नक्कीच कोणता तरी क्लू लागला आहे हे तिघांच्याही ध्यानात आलं होतं. चौघंजणं गेलॉर्डमध्ये शिरल्यावर आणि वेटर ऑर्डर घेवून गेल्यावर त्याने तिघांनाही केसची सविस्तर माहिती दिली. तिघंही लक्षपूर्वक त्याचं बोलणं ऐकत होते. वेटरने ऑर्डर सर्व्ह केल्यावर जेवतानाही त्यांची केसच्या संदर्भात चर्चा सुरु होती.

"पण या सगळ्याशी या हॉटेलचा काय संबंध सर?" अखेर कदमांनी मुद्द्याचा प्रश्नं विचारला.

रोहितने काहीही न बोलता वेटरला बिल आणण्याची खूण केली. वेटरने बिल आणि क्रेडीट कार्डची रिसीट आणून त्याच्यासमोर ठेवली. एक शब्दही न बोलता त्याने क्रेडीट कार्डची रिसीट आणि वरळी सी फेसवर आढळलेल्या त्या तरुणीच्या जीन्सच्या खिशात मिळालेला कागदाचा तुकडा त्यांच्यासमोर धरला. सुमारे पाच - दहा मिनिटं दोन्हीचं निरीक्षण केल्यावर तिघंही थक्कं होऊन त्याच्याकडे पाहात राहिले!

"सर हे बिल.... म्हणजे, डेड बॉडीजवळ सापडलेलं बिल आणि आताचं...." कदमांचा गोंधळ उडाला.

"एक्झॅक्टली कदम!" तो खेळकर स्वरात म्हणाला, "डेडबॉडीजवळ सापडलेला कागद या हॉटेलच्या बिलाचाच तुकडा आहे! पहिल्या लाईनवर उमटलेली 'एल ओ आर डी' ही ही चार अक्षरं पाहिल्यावरच मला हा डाऊट आला होता. बिलावर २२:१३ ही वेळही दिसते आहे. याचा अर्थ रात्रीचं डिनर इथे घेतलं गेलं असावं. पेमेंट क्रेडीट कार्डने केलेलं आहे. कार्डवरचे शेवटचे चार आकडे दिसत आहेत आणि त्यापूर्वीचे कागदावरचे तीन आकडे एक्स मार्क केलेले आहेत. ज्या कोणाच्या नावाचं हे कार्ड आहे त्याच्या आडनावाची शेवटची चार अक्षरं आहेत 'व्ही ई डी आय'... मी तावडेंना म्हटल्याप्रमाणे द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी किंवा तसंच एखादं आडनाव असावं! कदाचित त्या मुलीचं आडनाव असेल किंवा ज्याच्याबरोबर ती इथे डिनरला आली होती त्याचं किंवा तिचं नाव असेल!"

चौघंजणं मॅनेजरच्या केबिनमध्ये आले. मॅनेजरने प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिलं. बहुतेक बिलाच्या संदर्भात काहीतरी गडबड झाली असावी असा त्याचा अंदाज होता. रोहितने आपलं कार्ड त्याच्यासमोर धरताच मॅनेजर एकदम दचकला आणि उठून उभा राहिला.

"हे बिल तुमच्याच हॉटेलचं असावं असा माझा अंदाज आहे. रात्री १०:१३ चं पेमेंट आहे आणि ते पण क्रेडीट कार्डने. हे बिल पे करणार्‍याचं नाव आणि क्रेडीट कार्ड नंबर आम्हाला हवा आहे. तुमच्याकडे हे रेकॉर्ड असेल ना?"

"सर! बिलवर डेट दिसत नाही, फक्तं टाईम आहे तसंच कार्डचे फक्तं शेवटचे चार डिजीट्स दिसत आहेत. आय विल सर्च पण आय डाऊट मला नेमकं बिल शोधता येईल."

"तुम्ही मिळतील तेवढी रेकॉर्डस् काढा, बाकीचं आम्ही पाहून घेऊ! गेल्या १५ दिवसांतली तरी रेकॉर्ड्स चेक करा! फक्तं रात्री दहानंतर बिल पे केल्याची आणि ते देखिल क्रेडीट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केलं असेल तरच!"

सुमारे दहा मिनीटांत मॅनेजरने सुमारे चाळीसेक बिलांची एक यादी त्याच्यासमोर ठेवली. यादीतली नावं काळजीपूर्वक तपासून पाहिल्यावर रोहितने ४ नावांसमोर खूण केली आणि यादी मॅनेजरकडे दिली.

"या ४ बिलांच्या क्रेडीट कार्ड रिसीट्सच्या कॉपीज द्या!"

पाच - दहा मिनिटातच मॅनेजरने रिसीट्सच्या कॉपी हजर केल्या. पहिलं बिल कोणा संजय चतुर्वेदीच्या नावाचं होतं. दहा दिवसांपूर्वी तो इथे आला होता. दुसरं बिल होतं चेतना त्रिवेदी या नावावर. ती आणि चतुर्वेदी एकाच दिवशी आलेले दिसत होते. तिसर्‍या रिसीटवर नाव होतं. पूर्वा त्रिवेदी. ही पूर्वा सुमारे आठवडाभरापूर्वी इथे येवून गेलेली होती. चौथं नाव होतं रेशमी द्विवेदी. ही रेशमी अवघ्या तीन दिवसांपूर्वी डिनरला आलेली होती. चारही रिसीट्स स्वत:जवळच्या फाटक्या रिसीटशी पडताळून पाहिल्यावर रोहितच्या चेहर्‍यावर समाधानाचं स्मित झळकलं.

"मला या रिसीटच्या - या रेशमी द्विवेदीच्या - क्रेडीट कार्डचे डिटेल्स द्या!

मॅनेजरने दिलेले क्रेडीट कार्डचे डीटेल्स ताब्यात घेऊन चौघंही बाहेर पडले. क्राईम ब्रँचमध्ये पोहोचताच रोहितने रेशमीच्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स लिहीलेला कागद कदमांच्या हाती दिला. पुढे काय करायचं हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नव्हती. वरळी पोलिस स्टेशनवरुन केसचे सगळे पेपर्स मागवून घेण्याची त्याने नाईकना सूचना दिली. दोघंही निघून गेल्यावर त्याने शांतपणे विचार करण्यास सुरवात केली....

एक २३ - २४ वर्षांची तरुणी वरळी सी फेसवर मृतावस्थेत सापडते....
बॉडीवर कोणतंही आयडेंटीफिकेशन नाही....
जबरदस्ती झाल्याची कोणतीही चिन्हं नाहीत त्यामुळे रेप केस असण्याची शक्यता नाही....
रिगर मॉर्टीस सेट झालेला आहे याचा अर्थ ती जास्तीत जास्तं रात्री एक ते दीड पर्यंत जिवंत असावी....
रात्री एक नंतर ही वरळी बीचवर आली कधी, कशी आणि कोणाबरोबर?
जास्तं शक्यता बॉडी इथे आणून टाकण्याचीच....
केवळ एक हॉटेलच्या बिलाव्यतिरीक्त तिच्यापाशी काहीही सापडत नाही....
हॉटेलचं बिल कोणा रेशमी द्विवेदीच्या नावावर आहे....
या रेशमीचा या मुलीशी काय संबंध आहे?
का ही स्वत:च रेशमी द्विवेदी आहे?

"जयहिंद सर!" नाईकांच्या आवाजामुळे रोहितची तंद्री भंग पावली.

"जयहिंद! बोला नाईक, वरळीहून पेपर्स आले?"

"होय सर!" नाईकनी फाईल त्याच्यासमोर ठेवली, "वरळी पोलीसांनी एका चहावाल्याचं स्टेटमेंट घेतलं आहे. रात्री साडेअकरापर्यंत तो आपला धंदा करत होता, तोपर्यंत तरी काहीही संशयास्पद आढळलेलं नाही. समुद्रकिनार्‍याच्या कट्ट्यावर झोपणार्‍या भिकार्‍यांपैकी एकानेही बॉडी टाकताना प्रत्यक्षात पाहिलेलं नाही, पण रात्री बर्‍याच उशिरा म्युन्सिपालटीच्या शाळेसमोर एक गाडी बराच वेळ उभी असलेली विरुद्ध बाजूला एका बसस्टॉपवर झोपलेल्या भिकार्‍याने पाहिली होती. त्या मुलीची बॉडी सापडली त्याच्या बरोबर सरळ रेषेत ही गाडी उभी होती. गाडीचे कोणतेही डिटेल्स - नंबर, रंग किंवा कोणतं मॉडेल होतं वगैरे काहीही कळलेलं नाही. ही गाडी नंतर सी-लिंकच्या दिशेने निघून गेली असं त्या भिकार्‍याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे."

"सी-लिंक....." रोहित विचार करत म्हणाला, "सी-लिंकच्या टोल बूथवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण नेमकी वेळ कळल्याशिवाय त्यांचा काहीही उपयोग होण्याची शक्यता कमीच वाटते. टाईम एलिमेंटचा विचार केला तर रात्री साडेअकरानंतर - चहावाला आपला धंदा बंद करुन गेल्यावर ते पहाटे साडेपाच - पावणेसहाच्या दरम्यान डॉ. देशपांडेंना बॉडी आढळून येईपर्यंत सहा - सात तासांत कधीतरी त्या मुलीची बॉडी तिथे आणून टाकली आहे हे उघड आहे. रिगर मॉर्टीसचा विचार केला तर एक किंवा जास्तीत जास्तं दीड वाजेपर्यंत ती जिवंत असावी. त्यानंतर बॉडी दुसरीकडून इथे आणून टाकली असं मानलं, तर इथे येईपर्यंत लागणारा वेळ आणि बॉडी टाकून सहजपणे निसटून जाता येईल याबद्दल खुनी व्यक्तीची असलेली खात्री हे सगळे फॅक्टर्स ध्यानात घेतले तर रात्री दोन ते पहाटे पाचच्या दरम्यान बॉडी इथे टाकण्यात आली असं आपण गृहीत धरु शकतो. सी-लिंकचा विचार केला तर इतक्या रात्रीही अनेक गाड्या इथून गेल्या असणार हे नक्की.... एक काम करा नाईक, रात्री एक ते सकाळी साडेपाच या वेळेतलं सी-लिंकच्या सीसीटीव्हीचं फुटेज मागवून घ्या. आता लगेच त्याचा उपयोग झाला नाही, तरी पुढेमागे नक्कीच होईल! बाय द वे, कदमांचा रिपोर्ट आला? त्या रेशमी द्विवेदीचा पत्ता सापडला?"

रोहित बोलत असतानाच कदम केबिनमध्ये शिरले आणि त्याला सॅल्यूट ठोकून उभे राहिले.

"जयहिंद सर!"

"जयहिंद! शंभर वर्ष आयुष्यं आहे तुम्हाला कदम! रेशमीचा पत्ता सापडला?"

"येस सर!" कदमनी एक एन्व्हलप त्याच्यासमोर ठेवलं, "हे क्रेडीट कार्ड वर्षभरापूर्वी रेशमी द्विवेदीच्या नावावर इश्यू झालं आहे. हे कार्ड तिला तिच्या वडिलांच्या कार्डवर देण्यात आलेलं 'अ‍ॅड ऑन' कार्ड आहे सर! ही रेशमी २३ वर्षांची आहे आणि अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहते."

"२३ वर्ष.... वरळी सी फेसवर मिळालेली ती बॉडी कदाचित या रेशमीचीच असणाची शक्यता आहे." रोहित दीर्घ नि:श्वास सोडत म्हणाला, "आय हेट धिस कदम... आपल्या प्रोफेशनमधलं सर्वात त्रासदायक काम म्हणजे आई-वडीलांना तरूण मुलाच्या किंवा मुलीच्या मृत्यूची बातमी देणं! अनफॉर्च्युनेटली, वी हॅव नो चॉईस! चला, रेशमीच्या घरी जावंच लागेल आपल्याला."

रेशमी लोखंडवाला काँप्लेक्समधल्या एका पॉश कॉलनीत राहत होती. अत्यंत सधन आणि उच्चभ्रू लोकांचा या कॉलनीत भरणा होता. पार्कींग लॉटमध्ये उभ्या असलेल्या महागड्या कार्सवरुन सहजपणे इथे राहणार्‍या लोकांच्या आर्थिक संपन्नतेची कल्पना करता येत होती. मधूनच एखादी इंपोर्टेड कार ये-जा करत होती. कॉलनीतल्या गार्डनमध्ये अनेक वेगवेगळ्या वयाची मुलं बागडत होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे काहीजण आपल्या कुत्र्यांना फिरवण्यास बाहेर पडले होते. या अशा वातावरणात पोलिस जीप तिथे शिरलेली पाहताच गेटवर असलेल्या वॉचमनची तारांबळ उडाली नसली तरच नवल! रोहित खाली उतरत असतानाच वॉचमनने धावत येऊन सलाम ठोकला.

"नाव काय तुझं?"

"दयाशंकर... दयाशंकर पांडे साहेब!"

"द्विवेदीसाहेबांचा फ्लॅट कोणता आहे?"

"सी विंगमध्ये - बाराव्या मजल्यावर. काय झालं साहेब?"

वॉचमनला उत्तर देण्याच्या भानगडीत न पडता कदम आणि नाईकांसह रोहित लिफ्टने बाराव्या मजल्यावर आला. प्रत्येक मजल्यावर केवळ दोन फ्लॅट्स होते. दोन्ही फ्लॅट्सची दारं लिफ्टपासून काहीशी दूर कॉरीडॉरच्या दोन टोकांना होती. लिफ्टच्या उजव्या हाताला असलेल्या फ्लॅटच्या दारावर मल्होत्रांच्या नावाची पाटी होती तर डाव्या बाजूच्या फ्लॅटवर नाव होतं महेंद्रप्रताप द्विवेदी!

रोहितने फ्लॅटच्या दारावरची बेल वाजवली. काही क्षणांतच सुमारे पन्नाशीच्या एका गृहस्थांनी दार उघडलं. आपल्या दारात युनिफॉर्ममधल्या पोलिसांना पाहून ते एकदम गोंधळून गेले.

"मि. द्विवेदी?"

"येस?" द्विवेदींनी प्रश्नार्थक चेहर्‍याने त्याच्याकडे पाहिलं.

"सिनीयर इन्स्पेक्टर रोहित प्रधान, क्राईम ब्रँच." आपलं आयकार्ड द्विवेदींसमोर धरत तो म्हणाला, "हे माझे सहकारी सब् इन्स्पे. कदम, सब् इन्स्पे. देशपांडे आणि हेड कॉन्स्टेबल नाईक! मला तुमच्याकडून थोडी माहीती हवी आहे."

"माझ्याकडून?" द्विवेदी चकीतच झाले, "कशाबद्द्ल?"

"आपण आत बसून बोललो तर चालेल?"

"ओह! आय अ‍ॅम सॉरी! प्लीज डू कम इन!"

सर्वजण फ्लॅटमध्ये शिरले. फ्लॅटचं इंटीरिअर द्विवेदींच्या श्रीमंती आणि उच्चं अभिरुचीची साक्षं देत होतं.

"बोला मि. प्रधान, माझ्याकडे काय काम काढलंत?" सोफ्यात आरामशीरपणे बसत द्विवेदींनी विचारलं.

"मि. द्विवेदी, रेशमी ही तुमची मुलगी?" रोहितने थेट मुद्द्याला हात घातला.

"येस! तिचं काय?"

"ती आता नेमकी कुठे आहे सांगू शकाल?"

"तिच्या रुममध्ये आहे!" द्विवेदी अगदी सहजपणे म्हणाले.

"व्हॉट?"

रोहितचा क्षणभर आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. रेशमी घरी आपल्या स्वत:च्या रुममध्ये आहे? मग वरळी सी फेसवर आपल्याला सापडलेली डेडबॉडी कोणाची आहे? आणि रेशमीच्या क्रेडीट कार्डची रिसीट तिच्याकडे कशी आली?

"मि. द्विवेदी, आर यू शुअर?" रोहितने स्वत:ला सावरत प्रश्नं केला, "रेशमी तिच्या रुममध्ये आहे?"

"व्हॉट डू यू मिन मि. प्रधान?" द्विवेदींनी गोंधळून विचारलं.

"इफ यू डोन्ट माईन्ड, कॅन वी मीट हर?"

"शुअर!" द्विवेदींनी आतल्या रुमच्या दिशेने आवाज दिला, "रेशमी, जरा बाहेर ये!"

काही सेकंदातच एक तरुणी बाहेर आली. अचानक समोर पोलिसांना पाहून ती एकदम गांगरली.

"मि. प्रधान, ही माझी मुलगी रेशमी! नाऊ, कॅन यू प्लीज एक्स्प्लेन, व्हॉट इज द इश्यू? माझ्या मुलीने असं काय केलं आहे की तुम्ही तिला शोधत माझ्या घरापर्यंत आलेले आहात?"

रोहितने दीर्घ नि:श्वास सोडला. ज्या रेशमी द्विवेदीच्या मृत्यूची बातमी सांगण्यासाठी तो आला होता, ती रेशमी त्याच्यासमोर ठणठणीत जिवंत उभी होती! ही रेशमी असेल तर मग वरळी सी फेसवर..... त्याने कदम, देशपांडे आणि नाईकांकडे एक कटाक्ष टाकला. तिघंही अद्याप त्या धक्क्यातून सावरलेले नव्हते.

"मि. द्विवेदी, एका केसच्या संदर्भात आम्हाला रेशमीकडून थोडी इन्फॉर्मेशन हवी आहे!" रोहितने पवित्रा बदलला, "आय हॅव अ फिलींग, शी कॅन बी अ ग्रेट हेल्प टू सॉल्व्ह अ‍ॅन इम्पॉर्टंट मिस्ट्री! इफ यू डोन्ट माईन्ड?"

द्विवेदींनी काही न बोलता होकारार्थी मान हलवली.

"रेशमी, दोन-तीन दिवसांपूर्वी तू चर्चगेटच्या गेलॉर्डमध्ये डिनरला गेली होतीस?"

"येस सर!"

"कोणाबरोबर?"

"मी, पप्पा, शेखरदा, चारुदी आणि रोशनी!"

"आय सी! हा शेखर कोण आहे?"

"शेखरदा इज माय कझिन! चारुदी इज हिस वाइफ. ते दोघंही यूएसहून आले होते आणि काल बँगलोरला जाणार होते म्हणून आम्ही डिनरला गेलो होतो."

"आणि रोशनी?"

"रोशनी...." रेशमी थोडीशी अडखळली आणि द्विवेदींकडे पाहत राहिली.

"गो अहेड रेशमी.... रोशनी?"

"रोशनी पपांची पहिली मुलगी! माय स्टेप सिस्टर!"

"ओह आय सी! डिनर झाल्यावर बिल पे करताना तुझं क्रेडीट कार्ड वापरलं होतंस?"

"येस सर! पपांचं वॉलेट नेमकं कारमध्ये राहिलं होतं त्या दिवशी, म्हणून माझ्या कार्डने पेमेंट केलं होतं!"

"ऑलराईट! यू मे गो! थँक्स अ लॉट!"

रेशमी आत निघून गेली.

"मि. प्रधान, हा काय प्रकार आहे? तुम्ही नेमकी कसली इन्क्वायरी करत आहात?"

"आय विल कम टू दॅट मि. द्विवेदी!" रोहित शांतपणे उत्तरला, "तुमची मोठी मुलगी.... रोशनी राईट? ती कुठे आहे सध्या?"

"ती काल सकाळीच तिच्या फ्रेंड्सबरोबर सेल्वासला गेली आहे. तसा तिचा मेसेज आला होता!"

"मेसेज?" रोहितने आश्चर्याने विचारलं, "ती गेली तेव्हा तुम्ही घरी नव्हता?"

"नाही! मी काल सकाळी एका बिझनेस मिटींगसाठी पुण्याला गेलो होतो, तो आज संध्याकाळी परत आलो. मि. प्रधान, कॅन यू टेल मी व्हॉट इज द मॅटर? तुम्ही ही सगळी इन्क्वायरी का करत आहात? नेमकं काय झालं आहे?"

"मि. द्विवेदी, तुमच्याकडे रोशनीचा एखादा फोटो आहे?"

हा प्रश्नं द्विवेदींना अगदीच अनपेक्षित होता. ते एकदम गोंधळूनच गेले. पण काही न बोलता त्यांनी आपल्या मोबाईलमधला एक फोटो त्याच्यासमोर धरला. तो फोटो पाहताच रोहित कमालीचा गंभीर झाला. द्विवेदींच्या फोनमधल्या रोशनीचा फोटो काळजीपूर्वक पाहिल्यावर त्याने आपल्या मोबाईलमधला वरळी सी फेसवर आढळलेल्या त्या तरुणीच्या मृतदेहाचा फोटो काढून त्याचं निरीक्षण केलं. वरळीला सापडलेला मृतदेह रोशनीचाच आहे याबद्दल त्याच्यातल्या अनुभवी पोलिस अधिकार्‍याला कोणतीही शंका नव्हती. त्याच्याशी नजरानजर होताच काय झालं असावं याचा इतरांना अंदाज आला.

"मि. द्विवेदी, तुम्ही या मुलीला ओळखता?" द्विवेदींसमोर आपला मोबाईल धरत रोहितने शांतपणे विचारलं.

द्विवेदींनी तो फोटो पाहिला मात्रं.....

"हे.... हे कसं शक्यं आहे? इट्स इम्पॉसिबल! ओह गॉड! ओह नो.... रोशनी...." द्विवेदी इतक्या मोठ्याने ओरडले की रेशमी धावत बाहेर आली. नेमकं काय झालं हे तिला कळेना.

"आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली सॉरी मि. द्विवेदी, बट अनफॉर्च्युनेटली इट्स ट्रू! आज सकाळी वरळी सी फेसवर आम्हाला रोशनीची डेडबॉडी मिळाली आहे!"

"पण... पण हे असं कसं झालं ऑफीसर? केवळ सहा महिन्यांपूर्वी ती आमच्याबरोबर राहण्यासाठी आली होती आणि आता हे असं... ओह गॉड! रोशनी...."

"द्विवेदीसाहेब, आतातरी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला माझ्यापाशी उत्तर नाही. केवळ स्वत:ला सांभाळा इतकंच मी तुम्हाला सांगू शकतो. आम्ही सर्वजण तुमच्या दु:खात सहभागी आहोत, पण सहानुभूतीच्या कोरड्या शब्दांनी तुमचं दु:खं कणभरही कमी होणार नाही हे मला माहीत आहे. शेवटी हा नशिबाचा भाग आहे! प्लीज ट्राय टू पुल युवरसेल्फ अ‍ॅन्ड युवर डॉटर सर! आय रिस्पेक्ट युवर फिलिंग्ज, पण आम्हाला प्रोसिजर फॉलो करावी लागते. तुम्हाला किंवा रेशमीला उद्या सकाळी मॉर्गमध्ये यावं लागेल बॉडी आयडेंटीफिकेशनसाठी! अगेन आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली सॉरी!"

दरम्यान हेड कॉन्स्टेबल नाईकांनी द्विवेदींचे शेजारी मल्होत्रांना गाठून सारा प्रकार त्यांच्या कानावर घातला होता. मल्होत्रा ताबडतोब आपल्या पत्नीसह वर्मांच्या फ्लॅटवर आले. मिसेस मल्होत्रा रेशमीला सावरत आत घेऊन गेल्या. मल्होत्रांनी कॉलनीतल्या जवळच्या स्नेह्यांना फोन करुन द्विवेदींच्या फ्लॅटवर बोलावलं. द्विवेदी दोन्ही हातात डोकं गच्च धरुन बसले होते. आतल्या बेडरुममधून रेशमीच्या मुसमुसण्याचा आवाज कानावर येत होता. रोहित आपल्या सहकार्‍यांसह फ्लॅटमधून खाली उतरला आणि गेटपाशी आला.

"तुझं नाव काय म्हणालास? दयाशंकर ना?"

"हो साहेब! दयाशंकर पांडे."

"तू एकटाच वॉचमन आहेस इथे?"

"नाही साहेब! माझी ड्यूटी रात्री नऊ वाजेपर्यंत असते. नऊनंतर उमाप्रसाद म्हणून दुसरा वॉचमन आहे तो येतो आणि सकाळी नऊपर्यंत असतो. आता येईलच तो!"

रोहितने आपल्या रिस्टवॉचवर नजर टाकली. पावणेनऊ वाजत आले होते. दुसरा वॉचमन आल्यावर दोघांनाही एकदमच प्रश्नं विचारावेत या हिशोबाने त्याने वाट पाहण्याचा निर्णय घेतला. पाच मिनिटांतच दुसरा वॉचमन - उमाप्रसाद - हजर झाला. रोहितने नाईकना सर्वांसाठी चहा मागविण्याची सूचना दिली आणि तो दोघा वॉचमनकडे वळला.

"तुम्ही दोघंही द्विवेदींना आणि त्यांच्या फॅमिलीला ओळखता?"

"होय साहेब!" उमाप्रसाद उत्तरला, "द्विवेदीसाब पंधरा - सोळा वर्षांपासून राहतात इथे. एकदम देवमाणूस आहे साहेब. कधीही पैशाचा गर्व करत नाहीत इतर लोकांसारखा!"

"आणि त्यांच्या मुली?"

"रेशमी बेबीला मी लहानपणापासून पाहतोय साहेब." दयाशंकर म्हणाला, "ती पण द्विवेदीसाहेबांसारखी मोठ्या मनाची आहे. त्यांच्या दुसर्‍या मुलीबद्दल मात्रं मला फारसं काही माहित नाही. ती गेल्या पाच - सहा महिन्यांपासूनच इथे राहायला आली आहे. त्यापूर्वी कुठे होती, काय करत होती काही कल्पना नाही साहेब!"

"काल दिवसभरात द्विवेदीसाहेब किंवा इतर कोणी बाहेर गेलं होतं किंवा त्यांच्याकडे कोणी आलं होतं?"

"द्विवेदीसाहेब काल सकाळी आठच्या सुमाराला आपली कार घेवून गेले ते रात्री नऊपर्यंत तरी परत आले नव्हते साहेब! आज सकाळपासून मी त्यांना बाहेर पडताना पाहिलं नाही, पण आज संध्याकाळी सहाच्या सुमाराला ते परत आले."

"द्विवेदी रात्री परत आले होते?" हा प्रश्नं अर्थातच उमाप्रसादला उद्देशून होता.

"नाही साब! द्विवेदीसाब काल रात्रभरात परत आले नाहीत आणि आज सकाळी बाहेरही पडले नाहीत!"

"आणि रेशमी?"

"रेशमी बेबी काल दुपारी दोनच्या सुमाराला एक बॅग घेऊन बाहेर पडली ती रात्री पर्यंत परत आली नव्हती. दिवसभरात मी तिला पाहिलं नाही, मात्रं आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला ती घरी आली. द्विवेदीसाहेब परत येण्याच्या पंधरा - वीस मिनिटं आधी!"

"रेशमी काल रात्री घरी आली होती?"

"नाही साब!"

"अच्छा? आणि द्विवेदींची दुसरी मुलगी? रोशनी?"

"ती काल दिवसभर घरीच होती साहेब. पण रात्री आठच्या सुमाराला ती टॅक्सीत बसून गेली! त्यानंतर तिला परत आलेली पाहिली नाही साहेब!"

"रात्री आठ वाजता....." रोहित विचार करत म्हणाला, "आणि द्विवेदींचा पुतण्या शेखर? तो आणि त्याची बायको कधी गेले?"

"ते दोघं संध्याकाळी पाचच्या सुमाराला गेले साब! त्यांच्याकडे दोन - तीन मोठ्या बॅग्ज आणि लहानमोठं सामान होतं. त्यांनी एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी मागवली होती. रोशनी त्यांना सोडण्यासाठी खाली आलेली पाहिली साब!"

"मला सांगा, या रोशनीचं कोणाशी काही भांडण वगैरे झालं होतं कधी?

"नाही साहेब. ती तशी अबोलच होती. कॉलनीतही फारशी कोणाशी बोलायची नाही."

"रेशमीचे आणि तिचे संबंध कसे होते?"

"चांगले असावेत साहेब. दोघी बर्‍याचदा एकत्रं बाहेर जात असत!"

रोहितने दोघांना आणखीन बरेच प्रश्नं विचारुन मिळेल तेवढी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्नं केला, पण द्विवेदींच्या मालकीच्या दोन कार्स असून द्विवेदी आणि रेशमी दोघंही कार ड्राईव्ह करतात याव्यतिरिक्त त्याच्या हाती फारसं काही लागलं नाही. रोशनीला मात्रं दोघांपैकी कोणीही ड्रायव्हींग करताना पाहिलेलं नव्हतं. कॉलनीतून बाहेर पडण्यापूर्वी रोहितने सहज द्विवेदींच्या फ्लॅटकडे नजर टाकली. तिथे एव्हाना बरीच माणसं जमा झालेली त्याच्या दृष्टीस पडली.

"बोला नाईक, तुमचा काय अंदाज आहे?" कॉलनीतून बाहेर पडताच त्याने प्रश्नं केला.

"अजून तरी काहीच नाही सर! पोस्ट मॉर्टेमचा रिपोर्ट येईपर्यंत मी तरी काहीच अंदाज बांधू शकत नाही."

"कदम?"

"सर, रोशनी गेल्या सहा महिन्यांपासून द्विवेदींच्या घरी राहण्यास आली होती. त्यापूर्वी ती कुठे होती? कोणाबरोबर राहत होती? ती काल टॅक्सीने गेली असं वॉचमनने सांगितलं. तो टॅक्सीवाला ट्रेस झाला तर ती नेमकी कुठे गेली हे कळू शकेल. आणि महत्वाचं म्हणजे तिचा मृत्यू नेमका कसा झाला आणि कुठे?"

"देशपांडे मॅम?"

"रोशनी रात्री आठ वाजता बाहेर पडली असं वॉचमनचं स्टेटमेंट आहे. तिची डेडबॉडी सकाळी वरळीला सापडली. या मधल्या काळात ती कुठे होती? आणि कोणाबरोबर? तुम्हाला काय वाटतं सर?"

"एक अत्यंत इंट्रेस्टींग गोष्टं.... रोशनी आपली सावत्रं बहीण आहे असा रेशमीने मुद्दाम उल्लेख का केला? तो देखिल द्विवेदींसमोर? तिला त्यातून नेमकं काय सूचित करायचं होतं? एक काम करा कदम, या रोशनीचा सगळा इतिहास खणून काढा. द्विवेदींच्या घरी राहायला येण्यापूर्वी ती कुठे होती? काय करत होती? मुंबईतच होती का आणखीन कुठे होती? तिथे तिचे मित्रं-मैत्रिणी कोण होते? इथे आल्यापासून ती कोणाकोणाला भेटत होती? कुठे जात होती? या सगळ्याचा शोध घ्या. तिच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डस् चेक करा. आय हॅव अ गट फिलींग, ही नक्कीच काहीतरी मोठी भानगड आहे!

********

रात्री दीडचा सुमार....

मुंबईतल्या वडाळा परिसरातल्या एका गोडाऊनचा नाईट शिफ्टचा अटेंडंट रामाश्रय यादव मोबाईलवर गाणी ऐकत आपल्या खुर्चीत बसून होता. गोडाऊन म्हटलं म्हणजे एखादी बैठी जुनी इमारत, आतमध्ये असलेला एकच एक मोठा हॉल आणि त्यामध्ये रचून ठेवलेलं सामान हे नेहमी डोळ्यासमोर उभं राहणारं चित्रं आणि हे गोडाऊन यांचा मात्रं काही संबंध नव्हता. हे गोडाऊन म्हणजे चांगली तीन मजल्यांची बिल्डींग होती. प्रत्येक मजल्यावर अनेक खोल्या बांधलेल्या होत्या. या खोल्या भाड्याने देण्यात येत होत्या. अनेक वेगवेगळ्या कंपन्या आणि सामान्यं लोकही त्या स्टोरेज रुम्सचा सामान ठेवण्यासाठी उपयोग करत होते. गोडाऊन चोवीस तास उघडं असल्यामुळे तीन शिफ्टमध्ये इथला कारभार चालत होता.

लिफ्टचं दार उघडलं तसा रामाश्रयच्या गाणी ऐकण्यात व्यत्यय आला. एक माणूस लिफ्टच्या दारातून बाहेर पडत होता. त्याने अंगात मोठ ओव्हरकोट घातला होता. कोटाची कॉलर दुमडण्याऐवजी उभी करुन मानेवर ओढून घेतली होती. हे कमी होतं म्हणून की काय त्याने गळ्याभोवती लोकरीचा मफलर गुंडाळला होता. त्या मफलरमुळे त्याचा अर्धा चेहराही झाकला गेला होता. डोक्यावर घातलेली ब्रिमची काळी हॅटही त्याने चेहर्‍यावर ओढली होती! हे सगळं कमी होतं म्हणून की काय, रात्रीची वेळ असूनही त्याच्या चेहर्‍यावर गॉगल होता! सुमारे अडीच - तीन तासांपूर्वी हाच माणूस गोडाऊनमध्ये आल्याचं रामाश्रयला आठवलं.

रामाश्रयच्या टेबलपाशी येत त्याने आपल्या हातातली रिसीट त्याच्या पुढ्यात ठेवली. रामाश्रयने आपल्या समोर असलेलं एक रजिस्टर उघडलं आणि त्या रिसीटचा नंबर आणि रजिस्टरमधली नोंद ताडून पाहिली.

"पाठक अ‍ॅन्ड सन्स?"

त्या माणसाने फक्तं होकारार्थी मान हलवली. रामाश्रयने रजिस्टरमधल्या बॅगेच्या नोंदीसमोर बॅग नेल्याची तारीख, वेळ टिपून त्या माणसासमोर रजिस्टर सहीसाठी सरकवत सहजपणे विचारलं.

"काय आहे सूटकेसमध्ये?"

"दगड!" तो माणूस अगदी मख्खपणे म्हणाला, "अपने काम से काम रखो! उगाच फालतू चौकशा करु नकोस!"

"अरे साब! हमने तो ऐसेही पूछा था! आप पत्थर रखो या सोना, हमें क्या फर्क पडने वाला है?"

रामाश्रयला उत्तर देण्याची तसदी न घेता त्या माणसाने सूटकेसचं हँडल धरलं आणि ओढत तो गोडाऊनच्या बाहेर पडला. गोडाऊनच्या प्रवेशद्वाराशेजारी दोन ट्रक उभे होते. त्यांच्याशेजारी एक छोटा टेम्पोही होता. त्या टेम्पोपलीकडे एक लाल रंगाची डिझायर उभी होती. त्या माणसाने दोन्ही हातांनी ती बॅग डिझायरच्या डिकीत टाकली आणि एकदा सहजच गोडाऊनकडे नजर टाकून तो डिझायरच्या ड्रायव्हर सीटवर बसला. काही क्षणांतच डिझायरने गल्लीच्या टोकाशी असलेल्या चौकात टर्न मारला आणि ती खोदादाद सर्कलच्या दिशेने धावू लागली.

सुमारे वीस-पंचवीस मिनिटांत ती कार वरळी सी फेसवरच्या खान अब्दुल गफार खान रोडवर आली. रात्री दोनची वेळ असल्याने सगळा परिसर सुनसान होता. सी फेसच्या कट्ट्यावर रात्र घालवणारे भिकारी कधीच झोपेच्या आधीन झाले होते. अगदीच तुरळक एखादी कार जाताना दिसत होती. स्टेट बँकेच्या बिल्डींगवर असलेली मोठी निऑन साईन रात्रीच्या अंधारात जास्तंच चमकत होती. ती निऑन साईन आणि त्याच्याबाजूला काही अंतरावर असलेल्या सिल्व्हरन्स टेरेसच्या गेटवर असलेले दोन लाईट्स सोडले तर सर्वत्रं अंधाराचं साम्राज्य होतं. अर्ध्या किमीवर असलेला बांद्रा - वरळी सी लिंक मात्रं झगझगीत प्रकाशात चमकत होता, पण वरळी सी फेसच्या रस्त्यावरचे दिवे मात्रं काही अनाकलनीय कारणांनी बंद होते.

नेमकी हीच गोष्टं त्याच्या फायद्याची ठरणार होती!

सिल्व्हरन्स टेरेसपासून काही अंतरावर सी-लिंककडे तोंड करुन त्याने रस्त्याच्या कडेला आपली कार पार्क केली आणि कारचे हेडलाईट्स बंद केले. काही क्षण कारमध्येच बसून कानोसा घेतल्यावर कमीत कमी आवाज होईल याची दक्षता घेत तो कारमधून खाली उतरला आणि डिक्की उघडून त्याने ती सूटकेस बाहेर काढली. डिक्की तशीच उघडी ठेवून तो कारपासून सी-लिंकच्या विरुद्ध दिशेला दहा - पंधरा पावलं चालत गेला. एकदा चौफेर नजर टाकत त्याने ती भलीमोठी सूटकेस खाली ठेवली. पुन्हा एकदा कोणीही आपल्याकडे पाहत नाही याची खात्री केल्यावर त्याने त्या सूटकेसची चेन उघडली आणि क्षणाचाही विलंब न करता सगळी ताकद एकवटून ती उलटी केली....

सूटकेसमध्ये कसाबसा कोंबलेला एका तरुणीचा मृतदेह आता फूटपाथवर अस्ताव्यस्त पसरला होता!

सूटकेस रिकामी होताच एक सेकंदही न दडवता त्याने ती उचलली आणि जवळपास धावतच आपली कार गाठली. सूटकेस डिक्कीत टाकून त्याने डिक्कीचं दार आपटलं आणि काही सेकंदातच त्याची कार भरवेगाने सी-लिंकच्या दिशेने निघून गेली!

********

रोशनीच्या मृत्यूची बातमी कळताच आदल्याच दिवशी बँगलोरला गेलेल्या शेखरने पत्नी चारुलतासह मिळालेल्या पहिल्या फ्लाईटने मुंबई गाठली होती. चारुला रेशमीजवळ घरी सोडून तो द्विवेदींबरोबर क्राईम ब्रँचच्या ऑफीसमध्ये पोहोचला होता. कदमनी त्या दोघांनाही नाईकांसह शवागरात पाठवून दिलं. रोशनीचं पोस्ट मॉर्टेम आटपलं होतं, पण डॉ. भरुचांनी अधिक तपासणीसाठी तिचा व्हिसेरा राखून ठेवला होता. हे अप्रिय काम उरकल्यावर नाईक नुकतेच क्राईम ब्रँचमध्ये परतले होते.

"जयहिंद सर!"

"जयहिंद! बोला नाईक! द्विवेदींनी बॉडी ओळखली?"

"येस सर! द्विवेदी आणि शेखर आले होते. त्यांनी बॉडीची ओळख पटवली आहे. कदमसाहेब त्यांचं स्टेटमेंट घेत आहेत. त्यानंतर ते फ्यूनरलसाठी बॉडी नेणार आहेत."

"हं...! द्विवेदी ठीक आहेत?"

"तसे ठीक वाटले सर, पण खरं सांगू का? अशी वेळ कोणावरही येऊ नये असं वाटतं!"

"कोणाच्या नशिबात काय लिहीलं असेल ते आपल्या हाती थोडंच आहे? बाय द वे, रोशनीचं फ्यूनरल आज आहे?"

"आजच उरकतील असा माझा अंदाज आहे सर!"

"एक काम करा नाईक... आपल्या काही लोकांना फ्यूनरलला पाठवा सिव्हील ड्रेसमध्ये. त्यांना काय सांगायचं हे तुम्हाला माहीत आहेच!"

नाईकांनी मानेनेच होकार दिला आणि सॅल्यूट ठोकून ते बाहेर पडत असतानाच टेबलवरचा फोन वाजला.

"हॅलो! येस डॉ. भरुचा... व्हॉट? आर यू शुअर डॉक? माय गॉड... शुअर सर! आय विल बी देअर अ‍ॅट वन्स!"

रोहित डॉ. भरुचांना भेटून आपल्या ऑफीसमध्ये परतला तेव्हा कमालीचा गंभीर झाला होता. डॉ. भरुचांनी लिहीलेला पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट त्याने दोन वेळा वाचून काढला होता. डॉ. भरुचांचा अनुभव आणि त्यांच्या ज्ञान वादातीत होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून ते फॉरेन्सिक डॉक्टर म्हणून कार्यरत होते. रहस्यमय वाटणार्‍या अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास त्यांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मोलाचा ठरला होता. परंतु या केसमध्ये डॉ. भरुचा देखिल चक्रावले होते. रोशनीच्या मृत्यूचं जे कारण त्यांना आढळलं होतं, त्याबद्दल त्यांना स्वत:लाच शंका वाटत होती. त्यामुळेच त्यांनी तिचा व्हिसेरा हैद्राबादच्या लॅबमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. भरुचांच्या अंदाजाप्रमाणे रोशनीचा मृत्यू रात्री बारा ते दोनच्या दरम्यान झाला होता. तिच्या पोस्टमॉर्टेममध्ये आणखीनही एक गोष्ट उजेडात आली होती ज्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं होतं. रोहित आपल्या विचारात हरवलेला असतानाच कदम केबिनमध्ये शिरले.

"बोला कदम!" त्यांना खुर्चीत बसण्याची खूण करत तो म्हणाला, "काय अपडेट?"

"सर. परवा रात्री घरातून बाहेर पडल्यावर रोशनी टॅक्सीने वडाळ्याला गेली होती. टॅक्सीत ती सतत कोणाशी तरी फोनवर बोलत होती. वडाळ्याला एक गोडाऊन आहे. रेल्वे स्टेशनवर क्लोक रुम असते ना सर, त्या पद्धतीने या गोडाऊनचं काम चालतं. हे गोडाऊन चोवीस तास उघडं असतं. तिथे मंथली बेसिसवर सामान स्टोअर करण्यासाठी रुम्स मिळतात. द्विवेदींच्या घरी राहण्यास आल्यानंतर पंधरा दिवसांनी रोशनीने तिथे एक स्टोरेज रुम भाड्याने घेतलेली आहे. या स्टोरेज रुममध्ये तिच्याबरोबर अनेकदा एक तरुणही येत असतो. स्टोरेज रुममध्ये राहण्याची परमिशन नाही, पण दिवसभरातून कितीही वेळा तिथे जाता येतं आणि कितीही वेळ थांबता येतं. कोणीही काही चौकशी करत नाही. फक्तं बाहेर पडताना काही सामान असेल त्याची रिसीट दाखवावी लागते. परवा रात्री साडेनऊच्या सुमाराला रोशनी तिथे गेली तेव्हा तिच्याबरोबर तो तरुणही होता. रात्री अकराच्या सुमाराला दोघं एकत्रंच तिथून बाहेर पडले, पण जेमतेम अर्ध्या - पाऊण तासाने - पावणेबाराच्या सुमाराला रोशनी परत तिथे आली होती. मात्रं त्यानंतर रात्रंभरात आपण तिला तिथून बाहेर पडताना पाहिलेलं नाही असं वॉचमनने शपथेवर सांगितलं!"

"तो तरुण कोण होता? त्याचा काही ट्रेस लागला?"

"नाही सर!"

"रुममध्ये काही सापडलं?"

"एक सतरंजी, ब्रेडचं पॅकेट आणि बटर तसंच काही खाणं बांधून आणलेले कागदही सापडले. त्या कागदांना तेलाचे डाग होते. आपला एक माणूस मी तिथे वॉचवर ठेवला आहे."

"बाकीच्या कस्टमर्सबद्दल काही कळलं? काही आयडी वगैरे?"

"मी सगळ्या कस्टमर्सची लिस्ट आणि आयडीच्या कॉपीज आणल्यात सर!" कदमनी एक फाईल त्याच्यासमोर ठेवली. "रोशनीच्या रुमच्या एका बाजूची रुम दोन वर्षांपासून अहमदाबादच्या एका कंपनीच्या नावावर आहे. त्यांचे लोक अनेकदा तिथे जात - येत असतात. दुसर्‍या बाजूची रुम आठ दिवसांपूर्वीच महिन्याभरासाठी बुक करण्यात आली होती. पाठक अ‍ॅन्ड सन्स नावाची नाशिकची कंपनी आहे. रुम भाड्याने घेणार्‍या माणसाने राजेंद्रप्रसाद पाठक असं आपलं नाव दिलं होतं. अर्थात तो स्वत: मात्रं आला नव्हता. त्याच्या कंपनीत काम करणार्‍या भगवतीनंदन चौबे या ड्रायव्हरने रुम ताब्यात घेतली होती. रुम ताब्यात घेतल्यावर तिथे एक मोठी सुटकेस आणि लाकडाचा एक मोठा बॉक्स ठेवण्यात आला होता. परवा रात्री दीडच्या सुमाराला एक माणूस रिसीट दाखवून पाठक अ‍ॅन्ड सन्सच्या रुममधली सुटकेस घेवून गेला! वॉचमन त्याचं वर्णन करु शकला नाही सर कारण त्याने आपली ओळख लपवण्यासाठी त्याने डोक्यावर हॅट घातली होती, मफलरने चेहरा झाकला होता आणि रात्रं असूनही भला मोठा गॉगल लावला होता. सूटकेस घेऊन तो कारने निघून गेला, पण त्याच्या कारचा नंबर मिळालेला नाही."

"व्हेरी इंट्रेस्टिंग! या पाठक अ‍ॅन्ड सन्सची पूर्ण चौकशी करा कदम! ती स्टोरेज रुम ताब्यात घेणारा ड्रायव्हर चौबे आणि सूटकेस नेणारा माणूस कोण याचा ट्रेस घ्या! रोशनी सहा महिन्यांपूर्वी द्विवेदींच्या घरी राहण्यास येते. आल्यानंतर पंधरा दिवसानीच वडाळ्याच्या गोडाऊनमधली स्टोरेज रुम हायर करते, तिथे रेग्युलरली एका तरुणाला भेटते आणि एक दिवस वरळी सी फेसवर तिची डेडबॉडी सापडते.... रोशनीचा मृत्यू कसा झाला कल्पना आहे?"

"कसा सर?"

"शी हॅड अ कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट!"

"सर...?" कदम आ SS वासून त्याच्याकडे पाहतच राहिले.

"येस कदम! कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट! डॉ. भरुचांचं निदान अचूक असणार यात अजिबात शंका नाही, पण एवढ्या तरूण वयात, हार्डली पंचवीशीत कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने मृत्यू येतो? अ‍ॅट लिस्ट मी तरी यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही! नॉट ओन्ली दॅट कदम, पोस्ट मॉर्टेंममध्ये आणखीन एक गोष्ट उजेडात आली आहे..."

रोहित बोलताबोलता मध्येच थांबला. कदम अपेक्षेने त्याच्याकडे पाहत होते.

"रोशनी वॉज प्रेग्नंट!"

"काय?" कदम उडालेच!

"येस! शी वॉज अ‍ॅटलिस्ट सिक्स टू सेवन विक्स इनटू प्रेग्नन्सी!"

"माय गॉड सर!"

"कदम, ही केस सुरवातीला वाटली तेवढी सरळ नाही हे निश्चित! एक २३ - २४ वर्षांची मुलगी रात्री घराबाहेर पडते, एका तरुणाबरोबर वडाळ्याच्या गोडाऊन कम क्लोकरुममध्ये जाते, त्याच्याबरोबरच तिथून बाहेर पडते पण काही कारणाने तिथे परत येते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी बीचवर मृतावस्थेत आढळते..... आणि पीएममध्ये ती प्रेग्नंट असल्याचं निष्पन्न होतं! हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे! समथिंग इज फिशी कदम! एक्स्ट्रीमली फिशी!"

********

रोशनीचा अंत्यसंस्कार आटपल्यावर दोन दिवसांनी रोहितच्या सूचनेवरुन द्विवेदी, रेशमी, शेखर आणि चारुलता त्याच्या ऑफीसमध्ये आलेले होते. खरंतर त्यांना इतक्या घाईने बोलावण्याची त्याची इच्छा नव्हती, पण शेखर आणि चारुलता बँगलोरला राहत होते. केवळ इन्क्वायरी आणि स्टेटमेंटसाठी त्यांना पुन्हा बँगलोरहून मुंबईला बोलावणं त्याला प्रशस्तं वाटत नव्हतं. रोशनीच्या अंत्ययात्रेत नाईकांनी पाठवलेल्या खबर्‍यांकडून फारसं काहीच हाती लागलेलं नव्हतं. गेल्या सहा महिन्यांपासून द्विवेदींच्या घरी राहण्यास आल्यानंतरही रोशनीची कोणाशीही फारशी जवळीक नव्हती. द्विवेदींचे शेजारी असलेल्या मल्होत्रांकडून तिच्याबद्दल थोडीफार माहिती मिळाली होती. मुंबईला येण्यापूर्वी आपण सिमल्याला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि दर वर्षी पंधरा - वीस दिवस आपली आई भेटण्यास येत असे असा तिच्या बोलण्यात उल्लेख आला होता, पण मुंबईत ती काय करते, कोणाला भेटते याबद्दल मात्रं कोणालाही काहीही माहित नव्हतं.

"मि. द्विवेदी, खरंतर अशा वेळी तुम्हाला त्रास देण्याची माझी इच्छा नव्हती, पण माझा नाईलाज आहे. मला तुमच्याकडून थोडी इन्फॉर्मेशन हवी आहे जी या केसच्या दृष्टीने फार महत्वाची आहे, इफ यू डोन्ट माईंड!"

द्विवेदींनी काही न बोलता फक्तं होकारार्थी मान हलवली.

"मि. द्विवेदी, मला रोशनीबद्दल माहिती देऊ शकाल? मुंबईत येण्यापूर्वी ती सिमल्याला शिकत होती, राईट?"

"मि. प्रधान, रोशनीबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिमला नाही, दिल्लीपासून सुरवात करावी लागेल!"

"ऑलराईट, गो अहेड!"

"मी स्वत: मूळचा दिल्लीचा आहे. लहानपणापासून दिल्लीतच वाढलो. शिक्षणात मला फारसा इंट्रेस्ट नव्हता, पण वडीलांच्या आग्रहाखातर कॉमर्स ग्रॅज्युएट झालो आणि एका एक्स्पोर्ट कंपनीत नोकरी पकडली. पाच वर्षे नोकरीत काढल्यावर बँकेकडून लोन घेऊन मी स्वत:चा इम्पोर्ट - एक्सपोर्टचा बिझनेस सुरु केला. आता दिल्लीसारख्या ठिकाणी एक्सपोर्टचं लायसन्स मिळवण्यासाठी आणि बिझनेस मिळवण्यासाठी आवश्यक त्या लोकांना आवश्यक ते 'कमिशन' देण्याशिवाय मला पर्याय नव्हता आणि मी ते दिलंही! माझा मोठा भाऊ सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये ऑफीसर असल्याचाही मला बराच फायदा झाला. बिझनेसमध्ये बर्‍यापैकी सेटल होत असतानाच माझं लग्नं झालं आणि दोन वर्षांनी माझ्या पत्नीने - मेघनाने - एका मुलीला जन्मं दिला तीच रोशनी!

रोशनीच्या जन्मानंतर मेघनाचा सर्व वेळ तिच्यामध्येच जात होता. रोशनी वर्षाची झाल्यावर मी मुंबईतही माझ्य कंपनीची ब्रँच उघडली आणि माझ्या मुंबई - दिल्ली अशा सतत फेर्‍या सुरु झाल्या. मेघनाच्या मदतीला माझी आईच घरी असल्याने मला फारशी काळजी नव्हती. सगळं व्यवस्थित सुरु असताना एका फॅमिली फंक्शनमध्ये त्या नतद्रष्ट माणसाशी माझी गाठ पडली आणि माझ्या संसाराला ग्रहण लागलं!"

"नतद्रष्टं माणूस?"

"दॅट बास्टर्ड नेम जवाहर कौल!" द्विवेदी तिरस्काराने उद्गारले, "माझ्या मोठ्या भावाचा तो मित्रं होता. दिसायला एकदम स्मार्ट आणि तितकाच बोलबच्चन! प्रथमदर्शनीच कोणावरही छाप पडावी असं त्याचं व्यक्तिमत्वं होतं आणि त्याचा पुरेपूर वापर करण्याची कलाही त्याला अवगत होती. अर्थात मला हे लक्षात आलं तेव्हा फार उशीर झाला होता. ओळख झाल्यावर तो अधूनमधून घरी येत असे. याच काळात माझ्या बिझनेसच्या कामात आणि सतत दिल्ली - मुंबई चकरा मारण्यात मी इतका बिझी राहू लागलो की घराकडे माझं काही प्रमाणात दुर्लक्षं होवू लागलं आणि याचाच त्याने बरोबर फायदा घेतला. सुरवातीला मला भेटायला म्हणून येणारा जवाहर आता माझ्या अपरोक्षं मेघनाला भेटू लागला. माझं मुंबईमध्ये दुसर्‍या बाईशी लफडं आहे आणि म्हणून बिझनेसच्या निमित्ताने तिला भेटण्यासाठी मी सतत मुंबईला जात असतो असं त्याने तिच्या मनात भरवून दिलं होतं! घरी आईची अडचण होत असल्यामुळे तो मेघनाला बाहेर भेटत असे. तिला पद्धतशीरपणे भुलवून त्याने तिच्याशी अनैतिक संबंधही प्रस्थापित केले! हा प्रकार माझ्या ध्यानात येताच मला धक्काच बसला. तरीही शेवटची संधी म्हणून रोशनीसाठी मी मेघनाला समजावण्याचा खूप प्रयत्नं केला, पण त्या नीच माणसाने तिला पूर्णपणे आपल्या जाळ्यात खेचलं होतं. माझ्याविरुद्ध त्याने तिला इतकं भडकावलं होतं, की एक दिवस रोशनीला घेऊन ती घर सोडून निघून गेली आणि निर्लज्जपणे त्याच्याबरोबर राहू लागली! अगदी राजरोस!

गोष्टी या थराला जाऊन पोहोचल्यावर मी कोर्टात डिव्होर्स आणि रोशनीची कस्टडी मिळावी म्हणून केस दाखल केली. कोर्टाने मला डिव्होर्स मंजूर केला, पण रोशनीची कस्टडी मात्रं मेघनाला देण्यात आली. पण एवढ्यावरही त्या हलकटाचं समाधान झालं नाही. मेघनाला पोटगी म्हणून भरभक्कम पैसे त्याने माझ्याकडून घेतलेच पण तिला वाट्टेल त्या गोष्टी पढवून आणि आपल्या ओळखी वापरुन वकिलांच्या सहाय्याने मी मेघना आणि रोशनीला मारहाण करतो आणि माझ्यापासून दोघींना धोका आहे असं त्याने कोर्टात सिद्धं केलं आणि स्वत:च्या मुलीला भेटण्यापासून मला मनाई करणारी कोर्टाची ऑर्डर मिळवली!"

द्विवेदींच्या शब्दाशब्दांतून जवाहर बद्दलचा संताप जाणवत होता. रोहित शांतपणे त्यांची कहाणी ऐकत होता. ग्लासभर पाणी पिऊन त्यांनी पुढे बोलण्यास सुरवात केली,

"आय वॉज अ कंप्लीटली ब्रोकन मॅन! या सगळ्या परिस्थितीचा माझ्या बिझनेसवरही परिणाम झाला. माझ्या दृष्टीने दिल्लीत राहणं म्हणजे स्वत:ला आधीच होत असलेल्या मनस्तापात आणखीन भर घालण्यासारखं होतं. कुठे ना कुठे, कधी ना कधी रोशनी माझ्यासमोर येत होती, पण स्वत:च्या मुलीशी दोन शब्द बोलण्याचीही मला परवानगी नव्हती. या सगळ्यामुळे माझ्या आईने आधीच हाय खाल्लेली होती. मेघना रोशनीसह घर सोडून गेल्यावर सहा महिन्यातच ती गेली. हे सगळं असह्यं झाल्यावर मी दिल्ली कायमची सोडून मुंबईला आलो आणि स्वत:ला पूर्णपणे बिझनेसला वाहून घेतलं. दिवसभरात इतकी ढोर मेहनत मी करत होतो की इतर कोणताही विचारच डोक्यात येत नसे आणि रात्री बेडवर पाठ टेकताक्षणी दमल्यामुळे मला झोप लागत होती. खरंतर म्हणूनच मी दिवसभर दमत होतो.

मुंबईला आल्यावर एका मित्राच्या घरी माझी लेखाशी ओळख झाली. लेखाचा नवरा अ‍ॅक्सिडेंटमध्ये गेला होता. तिला अडीच वर्षांची एक मुलगी होती. रेशमी! आम्हाला दोघांनाही आधाराची गरज होती त्यामुळे असेल किंवा नैसर्गिक आकर्षणामुळे असेल पण आम्ही एकमेकांना नियमितपणे भेटत राहिलो आणि अखेर आम्ही लग्नं केलं. रेशमी तेव्हा चार वर्षांची होती."

रोहितने रेशमीकडे दृष्टीक्षेप टाकला. ती द्विवेदींचं बोलणं शांतपणे ऐकत होती. रोशनीचा तिने 'सावत्र बहिण' असा मुद्दामहून का उल्लेख केला असावा याची त्याला कल्पना आली.

"लेखाशी लग्नं झाल्यावर हळूहळू आमच्या आयुष्याची गाडी पुन्हा पूर्वपदावर येत होती. दिल्ली सोडून मी मुंबईला आलेलो असलो तरी दिल्लीतले काही फॅमिली फ्रेंड्स अद्यापही माझ्या संपर्कात होते. त्यांच्याकडून अधूनमधून मेघना आणि रोशनीबद्दल काही ना काही कानावर येत असे. मेघनाबद्दल माझ्या मनात असलाच तर केवळ तिरस्कारच होता, पण रोशनीच्या आठवणीने मात्रं मी अधूनमधून अस्वस्थं होत असे. अर्थात ना त्याचा आमच्या संसारावर परिणाम झाला किंवा माझ्या आणि रेशमीच्या रिलेशनवर! पण जेमतेम वर्षभराने माझा मोठा भाऊ, वहिनी आणि लेखा या तिघांचाही एअर क्रॅशमध्ये मृत्यू झाला. या आघातामुळे मी पार उध्वस्तं झालो होतो, पण स्वत:साठी नाही तरी रेशमी आणि शेखर या दोघांसाठी सगळं दु:ख पचवून ठामपणे उभं राहण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता!

आणि आठ - नऊ महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा जवाहर कौल नामक कीड माझ्या आयुष्यात परत आली....

एक दिवस ऑफीसमध्ये मला जवाहरचा फोन आला. खरंतर त्याच्याशी एक शब्दंही बोलण्याची माझी इच्छा नव्हती, पण त्याने रोशनीचा विषय काढल्यावर माझा नाईलाज झाला. मेघना मरण पावली होती आणि आता रोशनीला सांभाळणं त्याला परवडणार नाही आणि मी तिची जबाबदारी घ्यावी असं त्याने निर्लज्जपणे मला सांगून टाकलं! माझी अर्थातच या गोष्टीला ना नव्हती, पण इतक्या सहजासहजी रोशनीचा ठावठिकाणा सांगितला तर तो जवाहर कसला? गेली जवळपास वीस वर्ष तिला आणि मेघनाला सांभाळण्याची त्या हरामखोर माणसाला किंमत हवी होती! वर्षाला तीन लाख या हिशोबाने साठ लाख रुपये! मी पैसे दिले नाहीत तर आपण हे पैसे रोशनीकडून वाट्टेल त्या मार्गाने वसूल करुन घेऊ असंही त्याने निगरगट्टपणे मला ऐकवलं! यूसलेस बास्टर्ड!"

द्विवेदींच्या डोळ्यात अंगार फुलला होता. या क्षणी जवाहर कौल त्यांच्या समोर आला तर ते त्याच्या नरडीचा घोट घेण्यासही कमी करणार नाहीत याची रोहितला कल्पना आली.

"पुढे काय झालं?"

"कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी रेशमीला या सगळ्या प्रकाराची कल्पना दिली. रोशनी घरी येण्यास सर्वात जास्तं विरोध तिच्याकडूनच होण्याची शक्यता होती, पण तिने हे सगळं खूप सहजपणे स्वीकारलं. आय अ‍ॅम प्राऊड ऑफ हर!

जवाहरचा पुन्हा फोन आल्यावर मी त्याला पैसे देण्याचं मान्यं केलं आणि दिल्लीला गेलो. त्याने आधी साठ लाखांचा चेक ताब्यात घेतला आणि तो कॅश झाल्यावरच रोशनी सिमल्याला असल्याचं सांगून तिचा पत्ता दिला. सिमल्याला पोहोचल्यावर आणि रोशनीला भेटल्यावर सुरवातीला ती माझ्याशी बोलण्यासही तयार नव्हती. मी तिचा बाप महेंद्रप्रताप द्विवेदी आहे हे मानण्यासच तिने ठाम नकार दिला! मेघनाबरोबर माझ्या लग्नाचे फोटो दाखवल्यावर मीच तिचा बाप आहे अशी तिची खात्री पटली पण तरीही माझ्याबरोबर येण्यास तिचा नकार कायम होता. अखेर नाईलाजाने मी जवाहरला फोन लावला आणि रोशनीला समजावण्याची त्याला रिक्वेस्ट केली. त्याच्याशी फोनवर बोलल्यावर अखेर ती माझ्याबरोबर मुंबईला येण्यास तयार झाली. पुन्हा कधीही आमच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क न ठेवण्याची मी जवाहरला फोन करुन ताकीद दिली आणि रोशनीसह मुंबईला परतलो. अर्थात एकदा साठ लाख पदरी पडल्यावर जवाहर पुन्हा मला त्रास देणार नाही याबद्दल मला खात्री होती!

मुंबईला आल्यानंतर रोशनी सुरवातीला खूपच अबोल होती. माझ्याशी तर ती फारशी बोलायचीही नाही. एकतर सहा - सात वर्षांची असल्यापासून ती हॉस्टेलवर राहिलेली होती, त्यामुळे फॅमिलीबरोबर राहण्याची अशी तिला सवयच नव्हती. वर्षातून कधीतरी एखादा मेघना आठ - दहा दिवस तिला भेटायला सिमल्याला जात असे तेवढा अपवाद सोडला तर उरलेले दिवस हॉस्टेलची रुम हेच तिचं विश्वं होतं. त्यातच जवाहरने माझ्याबद्दल तिच्या मनात अगदी पद्धतशीरपणे विष कालवलेलं होतं त्यामुळे माझ्याशी ती फटकूनच वागत असे. सिमल्याहून आल्यावर महिन्याभरानंतर एक दिवस विषय निघाल्यावर मी तिला वस्तुस्थितीची स्पष्टं शब्दात जाणिव करुन दिल्यावर आणि माझ्यापाशी असलेले डिव्होर्स केसचे सगळे पेपर्स तिच्या पुढ्यात टाकले आणि जवाहरला दिलेल्या साठ लाखांच्या चेकची रिसीटही दाखवली. जवाहरचं खरं रुप पुराव्यानिशी समोर आल्यावर मात्रं ती अंतर्बाह्य बदलून गेली!"

"आय सी! मि. द्विवेदी, तुमच्या डिव्होर्सनंतर मेघनाच्या रिलेटिव्हजशी तुमचा काही कॉन्टॅक्ट होता?"

"मेघना घर सोडून गेल्यानंतर मी तिच्या आई - वडीलांना आणि भावाला या सर्व परिस्थितीची स्पष्टपणे कल्पना दिली होती, परंतु मेघनाप्रमाणे त्यांनीही या सगळ्या प्रकरणात मलाच दोषी ठरवलं. त्यानंतर माझा त्यांच्याशी कोणताही संबंध आला नाही. तिच्या आईवडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर आली होती, पण तिचा भाऊ कुठे असतो काही माहित नाही."

"अ‍ॅन्ड व्हॉट अबाऊट युवर सेकंड वाईफ्स रिलेटिव्हज्?"

"एक्स्ट्रीमली रफ! लेखा कलकत्त्याच्या एका अत्यंत कर्मठ आणि परंपरावादी बंगाली ब्राम्हण फॅमिलीतली होती. ती आपलं घर सोडून मुंबई आली होती आणि इथे जॉब करत होती हे तिच्या वडिलांना आणि विशेषत: भावाला अजिबात पसंत नव्हतं. त्यांनी तिच्याशी सगळे संबंध तोडून टाकले! रेशमीच्या जन्मानंतर किंवा लेखाचा नवरा गेल्यानंतर तिची कोणी साधी चौकशीही केली नाही तेव्हा तिनेही त्यांचं नाव टाकलं! आम्ही लग्नं केल्यावर आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या हिश्श्याची तिने पत्राद्वारे मागणी केली तेव्हा तुला एक पैसाही देणार नाही असं तिच्या वडीलांनी ठणकावलं! भडकलेल्या लेखाने त्यांच्यावर कोर्टात केस ठोकली! मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्नं केला. त्यांच्या एक पैशाचीही आम्हाला जरुर नव्हती, पण लेखाच्या दृष्टीने हा तिच्या आणि रेशमीच्या हक्काचा प्रश्नं होता! ती अद्यापही कलकत्त्याच्या कोर्टात ती केस सुरु आहे!"

"रेशमी, तुझे आणि रोशनीचे रिलेशन्स कसे होते?" रोहितने अगदी सहजपणे प्रश्नं केला.

"सुरवातीला खूपच टेन्स! पपांनी म्हटल्याप्रमाणे ते त्या दोघींना सोडून मुंबईला आले होते असं तिला सांगण्यात आलं होतं. माझ्या ममाशी अफेअर असल्यामुळे पपांनी तिला आणि तिच्या मम्मीला खूप त्रास दिल्याचीही तिची समजूत करुन देण्यात आली होती. स्वत: रोशनीनेच नंतर हे सगळं काही आम्हाला सांगितलं होतं. सुरवातीला ती माझ्याशी अत्यंत तुसडेपणाने वागत असे, पण सगळ्या फॅक्ट्स क्लीअर झाल्यावर मात्रं शी वॉज व्हेरी अ‍ॅपोलोजेटीक! आफ्टर दॅट आमची खूप चांगली मैत्री झाली! बर्‍याचदा आम्ही एकत्र भटकायला, शॉपिंगला, डिनरला जात होतो. इनफॅक्ट महिना - दीड महिन्यापूर्वी मी हॉस्पिटलाईज्ड होते, तेव्हा तर तिने माझी खूप काळजी घेतली. सगळा दिवसभर ती हॉस्पिटलमध्ये माझ्यापाशी बसून राहत होती! आय वॉज ऑलमोस्ट ऑन द डेथबेड, बट् शी नर्स्ड मी बॅक टू हेल्थ! माझ्या बहुतेक सर्व फ्रेंड्सचीही तिच्याशी छान ओळख झाली होती. आमच्या ग्रूपमध्ये ती अगदी सहज मिसळून गेली होती."

"रोशनी तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींबद्दल कधी बोलली होती? त्यांच्यापैकी कोणी मुंबईत होतं?"

"तिला कॉलेजमध्ये खूप फ्रेंड्स होते. त्यांच्या खूप वेगवेगळ्या स्टोरीज् सांगायची ती. पण तिचे बहुतेक सर्व फ्रेंड्स चंदीगड - दिल्ली - अमृतसर वगैरे नॉर्थ इंडीयातलेच होते. एक शिरीन म्हणून पारशी फ्रेंड होती मुंबईची, पण रोशनी मुंबईला येण्यापूर्वीच ती युएसला गेल्याचं तिच्याकडून कळलं होतं. आणखीन एक रॉनी म्हणून फ्रेंड होता तिचा इथला. त्याचं खरं नाव रुपेश सिंघानिया. त्याला मात्रं नेहमी भेटायची ती."

"मि. शेखर, प्लीज डोन्ट माईन्ड मी आस्किंग धिस, पण आपण काय करता? आय मिन युवर प्रोफेशन?"

"मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सर! बँगलोरला एका प्रसिद्ध आयटी फर्म मध्ये टेक्निकल लीड म्हणून काम करतो. कामाच्या निमित्ताने अनेकदा युरोप आणि युनायटेड स्टेट्समध्ये जात असतो. आता नुकताच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मी दीड महिना यूएसमध्ये होतो. तिथून येताना अंकलना भेटण्यासाठी म्हणून मुंबईत हॉल्ट घेतला होता."

"अ‍ॅन्ड व्हॉट अबाऊट यू मॅम?"

"मी फार्मासिटीकल्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे." चारु उत्तरली, "सध्या पीएचडीच्या थिसीसवर काम करते आहे. अ‍ॅट द सेम टाईम, जॉबही करते आहे."

"शेखर, तुमचे आणि रोशनीचे रिलेशन्स कसे होते?"

"रोशनीला मी खूप लहानपणी पाहिलं आहे. अंकलचा डिव्होर्स होण्यापूर्वी! त्यावेळी मी पाच - सहा वर्षांचा असेन. माझ्या आई - वडीलांच्या मृत्यूनंतर मी बारा वर्ष युकेमध्ये होतो. भारतात परतल्यानंतर बर्‍याच वर्षांनी मी रोशनीला पाहिलं ते अंकलबरोबर सिमल्याहून परत आल्यानंतर! अंकलनीच त्यावेळेस आम्हाला मुद्दाम मुंबईला बोलावून घेतलं होतं. त्यावेळी ती खूपच रिझर्व्हड् होती. फारशी कोणाशीच बोलत नव्हती. लाईक रेशमी सेड, यात मिसअंडरस्टँडींगचा भाग जास्तं असावा. वन्स थिंग्ज वेअर सॉर्टेड आऊट, अंकलना फोन केला की तिच्याशी बोलणं होत असे. यूएसहून परतल्यावर आम्ही चार दिवस मुंबईला राहिलो होतो तेव्हा ती आमच्याबरोबर खूपच मिक्सप झाली होती. अ‍ॅन्ड देन धिस हॅपन्ड!"

"आय अ‍ॅम सॉरी शेखर! अ‍ॅन्ड व्हॉट अबाऊट यू मॅम?"

"शेखर म्हणाला तसं पहिल्यांदा आमची भेट झाली तेव्हा शी वॉज टू मच अलूफ! पण लास्ट वीकमध्ये आम्ही यू एसहून परत आलो त्यावेळेस मात्रं शी वॉज अ टोटली डिफरंट पर्सन! त्या चार दिवसातला अर्ध्यापेक्षा जास्तं वेळ ती माझ्याबरोबर होती. कितीतरी विषयांवर आमच्या गप्पा झाल्या. माझ्या रिसर्चच्या कामात तिला खासकरुन खूप इंट्रेस्ट होता. त्यावेळेस असं काही होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं!"

"आय रिस्पेक्ट युवर फिलींग्ज मॅम! दॅट रिमाईंड्स मी...." अचानक काहीतरी आठवल्यासारखं रोहितने विचारलं, "रेशमी, रोशनीचा कॉलेजमधला मित्रं... रुपेश सिंघानिया काय करतो? कुठे राहतोतू कधी भेटली आहेस त्याला?"

"मी रुपेशला फक्तं दोनदा भेटले आहे सर! हॉस्पिटलमध्ये तो रोशनीबरोबर मला भेटायला आला होता आणि त्यानंतर तिच्याबरोबरच माझ्या मैत्रिणीच्या - निधीच्या - बर्थडे पार्टीला आला होता. तो नेमका कुठे राहतो हे मला माहित नाही, पण तो खारला कुठेतरी राहतो आणि सध्या जॉब शोधतो आहे असं रोशनीच एकदा बोलली होती!"

"आय सी! रोशनीकडे या रुपेश आणि तिच्या इतर फ्रेंड्सपैकी कोणाचे फोटो होते? बाय एनी चान्स, इफ यू हॅव वन? तुझ्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला वगैरे काढलेला?"

"तिच्या फ्रेंड्सपैकी तर कोणाचाही फोटो माझ्याकडे नाही सर! रोशनी त्यांचे किस्से रंगवून रंगवून सांगायची, पण तिच्याकडे एकाचाही फोटो नव्हता. ऑल्सो दॅट रिमाईंड्स मी सर, रुपेश इज व्हेरी रिलक्टंट अबाऊट फोटोग्राफ्स! निधीच्या बर्थडेला त्याचा फोटो काढल्यावर तो खूप अपसेट झाला होता. पार्टी सोडून तो रागारागाने निघून गेला. रोशनीही त्याच्या पाठोपाठ गेली होती!"

"व्हेरी इंट्रेस्टींग! धिस इज अ व्हेरी पर्सनल क्वेश्चन, बट टेल मी ऑनेस्टली, रोशनी आणि रुपेश केवळ मित्रं होते का त्यांच्यात प्रेमसंबंध होते? ते दोघं डेटींग करत होते? रोशनी कधी बोलली याबद्दल तुझ्याजवळ?"

रोहितच्या या प्रश्नावर द्विवेदींच्या कपाळाला आठ्या पडल्या, पण त्याचं त्यांच्याकडे लक्षंही नव्हतं.

"आय डोन्ट नो सर!" रेशमी पूर्वीच्याच शांतपणे म्हणाली, "रोशनी रुपेशशी फोनवर तासन् तास गप्पा मारायची. बर्‍याचदा त्याला भेटायला जायची. अनेकदा दोघं मूव्हीला, डिस्कोत जात होते. दे मे बी हॅविंग अ‍ॅन अफेयर.... मे बी नॉट, पण ती या विषयावर कधीच बोलली नाही आणि मी कधीच तिला विचारलं नाही."

"ऑलराईट! मि. द्विवेदी, आय नो धिस इज अ टफ क्वेश्चन बट आय हॅव टू आस्क, तुम्ही रोशनीला शेवटचे कधी भेटलात?"

"रोशनीचा मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी... ८ तारखेला सकाळी! एका महत्वाच्या बिझनेस मिटींगसाठी त्या दिवशी सकाळीच मी पुण्याला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलो. खरंतर शेखर आणि चारु त्याच्य दिवशी संध्याकाळी बँगलोरला जाणार होते, त्यामुळे मी पुण्याची ट्रीप पोस्टपोन करण्याचा प्रयत्नं करत होतो, पण ते शक्यं झालं नाही. पुण्याला पोहोचल्यावर मिटींग आटपून संध्याकाळी सहाच्या सुमाराला मी हॉटेलवर परतलो. मी घरी फोन केला तेव्हा रोशनी घरीच होती, आमचं फोनवर बोलणंही झालं. ती रुपेशबरोबर डिनरला जात असल्याचं तिने मला फोनवर सांगितलं. त्यानंतर मात्रं मी मॉर्गमध्ये तिची डेडबॉडीच पाहिली...." द्विवेदींचा स्वर कातर झाला.

"व्हॉट अबाऊट यू रेशमी?"

"पपा पुण्याला गेले त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमाराला मी माझ्या ग्रूपबरोबर मढ आयलंडला पिकनिकला जाण्यासाठी बाहेर पडले. रात्री तिथे राहण्याचा आमचा प्लॅन होता. मी रोशनीला येण्याविषयी विचारलं होतं, पण तिने नकार दिला. दुसर्‍या दिवशी पहाटे रुपेश बरोबर सेल्वासला जात असल्याचा तिचा मेसेज आला होता. तिच्या कॉलेजचे काही फ्रेंड्स परस्पर तिकडे येणार होते. मी सकाळी उठल्यावर तो मेसेज पाहिला. दुपारी चारनंतर आम्ही सर्वजण तिथून परत निघालो. त्याच्य दिवशी रात्री तुम्ही घरी आल्यानंतर ती एक्स्पायर झाल्याचं कळलं सर!"

"पहाटे मेसेज आला होता? तुझ्या मोबाईलमध्ये तो मेसेज आहे अजून?"

रेशमीने आपल्या मोबाईलमधला तो मेसेज रोहितला दाखवला. त्याने मेसेज काळजीपूर्वक वाचला. मेसेजचे डीटेल्स पाहताना त्याच्या चाणाक्ष नजरेने एक गोष्टं टिपली होती, पण कोणतीही प्रतिक्रीया न देता त्याने मोबाईल तिला परत दिला.

"अ‍ॅन्ड व्हॉट अबाऊट यू शेखर?"

"मी आणि चारु संध्याकळी पाचच्या सुमाराला एअरपोर्टवर जाण्यासाठी बाहेर पडलो. आमची ७.४५ ची फ्लाईट होती. रोशनी आम्हाला खाली टॅक्सीपर्यंत सोडण्यासाठी आली होती. अनफॉर्च्युनेटली आमची फ्लाईट नेमकी कॅन्सल झाली. आणि त्यानंतरची ९.४५ ची फ्लाईट फुल्ल असल्याने आम्हाला दुसर्‍या दिवशी सकाळच्या फ्लाईटला कन्फर्म सीट्स मिळाल्या. एनीवे अंकल आणि रेशमी दोघंही घरी नव्हतेच, त्यामुळे सगळ्या लगेजसकट पुन्हा अंधेरीला परत येण्याऐवजी आम्ही एअरपोर्टजवळच्याच एका हॉटेलमध्ये चेक-इन केलं आणि सकाळच्या फ्लाईटने बँगलोरला गेलो."

रोहित काहीच बोलला नाही. द्विवेदी, रेशमी आणि शेखर तिघांचंही स्टेटमेंट वॉचमन दयाशंकर आणि उमाप्रसादच्या स्टेटमेंटशी तंतोतंत जुळत होतं.

"मि. प्रधान, हा सगळा काय प्रकार आहे? माझ्या मुलीच्या अशा मृत्यूला कोण जबाबदार आहे?" द्विवेदींनी विचारलं.

"आय विश आय कुड टेल यू एनिथिंग मि. द्विवेदी, पण जोपर्यंत इन्क्वायरी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही!"

"इफ यू डोन्ट माईन्ड, रोशनीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे सर?" चारुने उत्सुकतेने विचारलं.

"पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची कॉपी तुम्हाला मिळेलच, बट जस्ट टू लेट यू नो, रोशनी हॅड अ कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट!"

चौघंही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले.

"पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वाचल्यावर तुम्हाला आता बसला आहे तसाच शॉक मलाही बसला होता. आय अ‍ॅम स्टील नॉट कन्व्हीन्स्ड अबाऊट इट! लेट्स सी व्हॉट कम्स आऊट ऑफ इट! बाय द वे, रुपेश रोशनीच्या फ्यूनरलला आला होता? तिच्या मृत्यूनंतर त्याने तुमच्यापैकी कोणाला कॉन्टॅक्ट केला होता? त्याचा किंवा तिच्या इतर मित्र-मैत्रिणींपैकी कोणाचा फोननंबर आहे तुमच्याकडे?"

"नो सर! रुपेश रोशनीच्या फ्यूनरललाही आला नाही आणि त्याने आम्हाला साधा फोन किंवा मेसेजही केला नाही! आय डोन्ट हॅव एनी नंबर्स आयदर सर!"

"ऑलराईट! रेशमी, तुझ्या मैत्रिणीकडे असलेला रुपेशचा फोटो तिच्याकडून मागून घे आणि आम्हाला पाठवून दे. धिस इज अर्जंट! नॉट ओन्ली दॅट, रोशनीच्या सोशल नेटवर्कींग साईट्स - फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सर्व प्रोफाईल्सचे डिटेल्स आणि ती सिमल्याला ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजची सगळी इन्फॉर्मेशन तिथले तिचे सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला हवे आहेत. मी आमचा एक माणूस तुमच्याबरोबर पाठवतो. हे सगळे पेपर्स त्याच्याबरोबर पाठवून द्या!"

"रोशनी सोशल मिडीया वापरत नव्हती सर! एकाही सोशल मिडीया साईटवर तिचं अकाऊंट नाही! पपांकडून तिच्याबद्दल कळल्यावर मी तिला सोशल मिडीयावर शोधण्याचा प्रयत्नं केला. तिच्या नावाची बरी प्रोफाईल्स सापडली, पण ती प्रत्यक्षात वेगळ्याच मुलींची निघाली! मुंबईला आल्यावर तिला कोणतीही पर्सनल गोष्टं शेअर करायला आवडत नसल्याने ती सोशल मिडीया साईट्सपासून दूर राहत असल्याचं तिने सांगितलं होतं सर!"

"इंट्रेस्टींग! ऑलराईट मि. द्विवेदी! यू मे गो नाउ! अगेन, आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर युवर लॉस!"

द्विवेदी कुटुंबिय निघून गेले. क्राईम ब्रँचचा एक कॉन्स्टेबलही त्यांच्याबरोबर गेला होता.

"सर, ही तर एखाद्या सिनेमाची किंवा सिरीयलची स्टोरी निघाली!" कदम न राहवून म्हणाले, "पहिल्या बायकोची मुलगी, दुसर्‍या बायकोची मुलगी, पहिल्या बायकोचं दुसर्‍या माणसाबरोबर लफडं.... अगदी एकता कपूर स्टाईल!"

"आणि रोशनी प्रेग्नंट होती म्हणजे नाजायज बेटा पण!" देशपांडेनी सिक्सर ठोकली.

"जोक्स अपार्ट, पण हे प्रकरण आता अधिकच कॉम्लिकेटेड होत चाललं आहे! रोशनीच्या मोबाईलचा ट्रेस लागला?"

"फोनचा ट्रेस नाही लागला सर, पण तिचं कॉल रेकॉर्ड मिळालं आहे. ८ तारखेला दिवसभर रोशनीचा मोबाईल घरीच होता. त्याच दिवशी रात्री सव्वाआठपासून वडाळ्याला पोहोचेपर्यंत जवळपास पाऊण तास ती एकाच नंबरवर बोलत होती. हा नंबर बहुतेक त्या रुपेश सिंघानियाचा असावा सर, कारण तिच्या मोबाईलवरुन डायल केलेले आणि तिला आलेले सर्वात जास्तं कॉल्स या नंबरवरुनच आले आहेत. रात्री साडेनऊ ते अकराच्या दरम्यान तिचा फोन वडाळ्याच्या त्या गोडाऊनच्या एरीयातच आहे. त्यानंतर ती बहुतेक घरी परत येण्यासाठी निघाली असावी, पण रात्री अकरा वाजून बावीस मिनिटांनी तिला गोडाऊनच्या बाहेर असलेल्या पब्लिक फोनवरुन एक फोन आला आहे. त्यानंतर ती बहुतेक परत फिरली असावी, कारण रात्री पावणेबाराच्या सुमाराला तिच्या फोनचं लोकेशन गोडाऊनच्या परिसरात दाखवतं आहे. त्यानंतर रात्री दीड वाजेपर्यंत तिचा मोबाईल तिथेच होता, पण दीड वाजल्यावर तो स्विच्ड ऑफ झाला आहे. मात्रं पहाटे साडेतीनच्या सुमाराला तिचा फोन पुन्हा ऑन झाला आहे आणि तिच्या फोनवरुन रेशमी आणि द्विवेदींना मेसेज पाठवण्यात आला आहे. यावेळेस तिच्या फोनचं लोकेशन आहे कल्याण बायपास रोड जंक्शन!"

"कल्याण बायपास रोड.... " रोहित विचार करत म्हणाला, "आणि रोशनीच्या कॉल रेकॉर्डमधल्या त्या दुसर्‍या नंबरचं काय?"

"त्या नंबरचेही कॉल डिटेल्स मिळाले सर! हा नंबर कोणा जॉन पिंटोच्या नावावर आहे. बोरीवलीच्या आय सी कॉलनीचा अ‍ॅड्रेस आहे, पण तो अ‍ॅड्रेस बोगस आहे! हा नंबरही ८ तारखेला रात्री साडेदहापर्यंत वडाळ्याच्या एरीयात होता. त्यानंतर तो जो स्विच्ड ऑफ झाला आहे तो थेट दुसर्‍या दिवशी - ९ तारखेच्या सकाळी सहा वाजता सुरु झाला आहे आणि त्यावेळेस हा नंबर साकीनाका भागात आहे. त्यानंतर दिवसभर तो मुंबईभर फिरत होता. रात्री नऊ वाजता बाँबे सेंट्रल स्टेशनवर तो स्विच्ड ऑफ झाला आहे. तेव्हापासून हा नंबर बंदच आहे सर!"

"बाँबे सेंट्रल स्टेशन.... याचा अर्थ हा जॉन पिंटो उर्फ रुपेश मुंबईबाहेर पळाला असावा!"

"कदम, काहिही करुन या रुपेशचा लवकरात लवकर पत्ता लावा! या सगळ्या भानगडीत हा रुपेशच की प्लेयर असावा असा माझा अंदाज आहे. रोशनीबरोबर त्या गोडाऊनमध्ये नियमितपणे जाणारा तरुण हा रुपेशच असणार! रोशनी त्याच्यापासूनच प्रेग्नंट राहिली असावी. हे लफडं गळ्यात येतं आहे असं दिसून येताच त्यानेच तिचा काटा काढला असावा! पण.... तिचा मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने झाला आहे यावर डॉ. भरुचा फर्म आहेत आणि त्याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही पण.... काहितरी.... कुठेतरी कनेक्ट होत नाही... सम पीस ऑफ द पझल इज मिसिंग! आणि ते नेमकं काय आहे हे आपल्याला शोधून काढावं लागणार आहे."

"वन मोअर थिंग," कदम बाहेर जाण्यासाठी वळले तोच रोहित म्हणाला, "द्विवेदी परिवाराच्या स्टेटमेंट्सप्रमाणे रोशनीचा मृत्यू झाला त्या रात्री द्विवेदी पुण्यात, रेशमी मढ आयलंडला आणि शेखर आणि चारुलता एअरपोर्टजवळच्या हॉटेलमध्ये होते. यापैकी प्रत्येकजण संपूर्ण रात्रंभर तिथेच होता का हे जरा क्रॉसचेक करुन कन्फर्म करा! इन केस जर या चौघांपैकी कोणीही रात्रभरात बाहेर पडलेलं असलंच, तर ते नेमके कुठे गेले होते आणि तिथे किती काळ होते याचाही जरा ट्रेस घ्या! बँगलोरला जाणारं विमान खरंच कॅन्सल झालं होतं का हे चेक करण्यास विसरु नका! दुसरं म्हणजे या प्रत्येकाचा मोबाईल नंबर ट्रेस करा. खासकरुन ८ आणि ९ तारखेला यांच्यापैकी प्रत्येकाच्या मोबाईलचं लोकेशन चेक करा!"

"सर...?" कदमनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.

"कदम, रोशनीच्या मृत्यूचा शेखर आणि रेशमी या दोघांना सर्वात जास्तं फायदा होणार आहे! द्विवेदींचा बिझनेस आणि त्यांची प्रॉपर्टी यातला एक वाटेकरी आपसूकच कमी झाला आहे. त्या दोघांपैकी कोणी या प्रकरणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही! त्या शेखरची बायको फार्मसिस्ट आहे आणि रोशनीचा मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने झाला आहे! यामध्येही काही लिंक असण्याची शक्यता नाकारता येत नाही! वी कॅन नॉट लिव्ह एनी स्टोन अनटर्न्ड!"

कदम आणि नाईक रोहितच्या केबिनमधून बाहेर पडले तेव्हा त्याच्या डोक्यात विचारचक्रं सुरु होतं....

रोशनीचा मृत्यू झाला त्या रात्री द्विवेदी कुटुंबियांपैकी स्वत: द्विवेदी सोडल्यास रेशमी, शेखर आणि चारु मुंबईतच होते....
शेखर आणि चारु खरोखरच एअरपोर्टजवळच्या हॉटेलमध्ये उतरले होते का?
गोडाऊनबाहेरच्या पब्लिक फोनवरुन रोशनीला फोन करणारी व्यक्ती कोण?
फोनवर असं नेमकं काय बोलणं झालं की रोशनी पुन्हा गोडाऊनला परतली?
रात्री पावणेबाराला गोडाऊनमध्ये परतलेली रोशनी दीड वाजेपर्यंत तिथे काय करत होती?
डॉ. भरुचांच्या रिपोर्टप्रमाणे रोशनीचा मृत्यू रात्री एक ते दोनच्या दरम्यान झाला आहे.
तिचा मृत्यू गोडाऊनमधल्या स्टोरेज रुममध्येच झाला की दुसरीकडे?
रोशनीचा मृतदेह वरळी सी फेसवर कोणी आणला? रुपेशने की पाठक अ‍ॅन्ड सन्सच्या त्या माणसाने?
रोशनीच्या मृत्यूनंतरही ती जिवंत होती हे दाखवण्यासाठी रेशमी आणि द्विवेदींना मेसेज का करण्यात आले?
रोशनीचा मोबाईल कल्याण् बायपास रोडला कसा पोहोचला?
कल्याण बायपास रोडच्या जंक्शनवरुन नाशिक, कल्याण आणि भिवंडीकडे तीन मार्ग जातात....
रोशनीच्या बाजूच्या रुमचा ताबा असलेल्या पाठक अ‍ॅन्ड सन्स कंपनीचा पत्ता नाशिकचा आहे!
रेशमी, शेखर किंवा चारुलता या तिघांपैकी कोणाचा या कंपनीशी काही संबंध आहे का?

********

"नहीं साब! ये बहोत मुष्कील काम है! मैने ऐसा काम आजतक नहीं किया!"

"तुला हवे तेवढे पैसे घे, पण काही झालं तरी मला हे सामान बनवून हवं आहे! तू मागशील ते पैसे मी देईन!"

काही क्षण त्याने विचार केला. ऑर्डर अगदीच विचित्रं होती, पण त्याला ते अशक्यं नव्हतं!

"साब, पैसा बहोत लगेगा ......"

"......"

"ठीक है साब! अ‍ॅडव्हान्स मिलनेपर मै काम शुरु करुंगा! उसके बाद तीन दीनका वक्त लगेगा!"

********

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारी चाललीये कथा..
पुभाप्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

नेहमीप्रमाणेच कथा उत्तम. ओघवती आणि उत्कंठावर्धक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0