ढढ्ढाशास्त्री परान्ने: आधुनिकतेचे खाली डोके वर पाय

काळ उघडी करणारी पुस्तके आणि इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना हे लेख वाचून माझ्या आवडत्या पुस्तकाची आठवण झाली. त्या पुस्तकाची ओळख करून देणारा हा लेख मुक्त शब्द मासिकात प्रकाशित झाला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

ढढ्ढाशास्त्री परान्ने

टाईम मशीनने आपण शंभर वर्षे मागे गेलो, आणि उत्तर पेशवाईच्या काळातील एखाद्या व्यक्तीने भविष्याच्या दिशेने शंभर वर्षे प्रवास केला, तर आपण ज्या कालबिंदूवर भेटू, ते जग आपल्याला कसे दिसेल आणि त्या पेशवेकालीन व्यक्तीला कसे दिसेल? वेगळ्या कालजगातून आलेल्या माणसाला भूत किंवा भविष्यातल्या जगात राहायचा प्रसंग आला तर? नाही, कुठल्याही विज्ञानकथेविषयी लिहिण्याचा माझा इरादा नाही. शंभरेक वर्षांपूर्वी म्हणजे १९१३ ते १९१५ या काळात ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने यांचे वैकुंठाहून मृत्युलोकी पुनरागमन’ ही कादंबरी ‘दीनमित्र’ या नियतकालिकात क्रमश: प्रकाशित झाली. आधुनिक युगात भारतीय समाजात जे जादुई परिवर्तन घडले, त्यावर भाष्य करणारी, मुकुंदराव गणपतराव पाटील यांनी लिहिलेली ही कादंबरी १९२७ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तिची ही थोडक्यात ओळख.

पेशवाईचा अंत होण्याच्या काही वर्षे आधी पुण्यात राहत असलेल्या एक ब्राह्मणाला मृत्युसमयी यमदूत वर देतात, की ‘तुला शंभर वर्षांनी परत तुझ्या आवडत्या नगरीत आणून सोडू’. या वरानुसार हा पेशवेकालीन पुणेरी ब्राह्मण अर्थात ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने’ मृत्यूनंतर शंभर वर्षांनी म्हणजे साधारण विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात पुण्यात अवतरतो. एव्हाना नवे युग अवतरलेले असते, आणि ते त्याच्या समजुतीच्या पलीकडचे असते. या नव्या युगाला तोंड देताना त्याची जी भंबेरी उडते त्याचे चित्रण म्हणजे ही कादंबरी. जयंत नारळीकरांची एक प्रसिद्ध विज्ञानकथा आहे, ‘गंगाधरपंतांचे पानिपत’. या कथेतले गंगाधरपंत एका अपघाताने दुसऱ्याच एका परिचित तरी अपरिचित जगात जातात. तेच स्थळ असते, काळही तोच असतो, पण जग वेगळेच असते, इतिहास बदलेला असतो. ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने’ वाचताना गंगाधरपंतांची आठवण येते. इथे शास्त्रीबुवा त्याच स्थळी, मात्र वेगळ्या काळात भूतलावर अवतरतात.

भविष्यकाळात फेरफटका ही संकल्पना मुळात रोचक आहे. एकोणिसावे शतक हा तर महाराष्ट्रात मोठ्याच संक्रमणाचा काळ होता. त्यामुळे आज एकविसाव्या शतकात बसून एकोणिसाव्या शतकातील पात्राच्या नजरेतून विसाव्या शतकातील जग पाहताना फारच मजा येते. पण ही कादंबरी मजा मजा म्हणून लिहिलेली नाही. कादंबरीचे नाव पाहिले तरी लक्षात येईल की तीत उपहास भरलेला आहे. परान्नावर जगणाऱ्या ढढ्ढम अशा भिक्षुक ब्राह्मणाचा उपहास. कालविसंगत होत असणाऱ्या रूढी-परंपरांचा उपहास. परंपरारक्षणाचा आव आणणाऱ्या ब्राह्मणांचा उपहास. जातिव्यवस्थेचा उपहास.

१८१८ साली पेशवाईचा अंत झाला. इंग्रजी राजवट सुरू झाली. त्याबरोबर पश्चिमेकडून आधुनिकतेचे वारे आले आणि आपल्या समाजात घुसळण सुरू झाली. पश्चिमेकडून नवेनवे तंत्रज्ञान आले, नवी यंत्रे आली; नव्या वस्तू, यंत्रनिर्मित उत्पादने आली. रेल्वे, तारव्यवस्था, छपाईचे तंत्र ही नव्या तंत्रज्ञानाची ठळक ठळक उदाहरणे झाली, पण आगकाड्या, काचेच्या बांगड्यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टीही बाहेरून आयात होत होत्या. विष्णुपंत पंडित नामक एका तत्कालीन कवीने वर्णन केल्याप्रमाणे ‘सुई टाचणी चाकु कातरी; टाक लेखणी लाख दोरी’ पासून ‘अरसा वस्त्रा चिमटा आणि सुरी’ अशा नाना विलायती वस्तूंनी घरे भरून गेली. वस्त्रप्रावरणे नवीन आली. खाण्यापिण्याचे नवनवे पदार्थ खाण्यात समाविष्ट झाले. नव्या संस्था आल्या, नव्या भाषा आल्या. या सगळ्यांबरोबरच नवे विचार आले, नवे आचार आले, नव्या जीवनपद्धती, नवी राहणी, नव्या सवयी आल्या. इंग्रजी शिक्षणाने नव्या खिडक्या उघडल्या, त्या प्रकाशात आपल्या धुरिणांना आपले धर्म, समाजव्यवस्था, जातिपाती, परंपरा, रूढी, भाषा तपासून पहाव्या असे वाटू लागले. काहींना सगळ्याच परंपरागत गोष्टी टाकाऊ वाटल्या, तर काहींना त्यांत सुधारणा करण्याची गरज वाटू लागली. काहींना आधुनिकतेचे अतिशय आकर्षण वाटले, काहींनी सटीक, साक्षेपी नजरेने आधुनिकता स्वीकारली. काहींना आपला भूतकाळ अधिक रम्य वाटू लागला, त्याचे पुनरुज्जीवन करावेसे वाटू लागले. नव्या चळवळी, संस्था, ‘मंडळ्या’, विचारसरणी जन्माला आल्या. एकीकडे परंपरांची मूळ चौकट कायम ठेवून त्यात सुधारणा करण्याची खटपट चालू झाली, तशी दुसरीकडे प्रचलित समाजव्यवस्थेला हादरवून समतेचे स्वप्न दाखवणाऱ्या भविष्याकडे वाटचाल सुरू झाली.

याच काळात महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळ उभी राहिली. या चळवळीचे अग्रणी जोतीराव फुले यांनी ब्राह्मणांच्या भोंदूगिरीवर, दुटप्पीपणावर, मनुस्मृतीसारख्या ग्रंथांवर, ब्राह्मणी दैवते आणि भाकड पुराणकथांवर असुडाचे फटकारे ओढले. ब्राह्मण स्वत:च्या कष्टाचे खात नाहीत, अडाणी शेतकऱ्यांना धर्माच्या मिषाने लुबाडतात, ऐपत नसलेल्या शेतकऱ्यांकडूनही सणावारी यथेच्छ जेवणावळी उपटतात असा त्यांच्या टीकेचा रोख होता. आर्य भटांनी या देशावर आक्रमण करून मूळ रहिवाशांना पराभूत केले आणि जातिव्यवस्थेच्या आधारे जितांना कायमचे गुलामीत ठेवले, असा सिद्धान्त त्यांनी मांडला. ब्रिटिश राज्यात शिक्षणाचा फायदा सर्वात आधी उच्चवर्णीयांनी घेतला, परिणामी सरकारी नोकऱ्याही बहुतेक करून त्यांनाच मिळाल्या. लहानमोठ्या सरकारी पदांवरचे ब्राह्मण बहुजनांना कसे पीडतात, गोरगरिबांची सरकारदरबारी दाद लागू देत नाहीत; सरकारी शाळांत शिक्षक म्हणून लागलेले ब्राह्मण शूद्रांच्या मुलांना शिकवायला कांकू करतात याकडे फुल्यांनी लक्ष वेधले. शूद्रातिशूद्रांची गुलामगिरी, शेतकऱ्यांची दु:स्थिती, स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांची अविद्या कशी नाहीशी होईल याविषयी नुसते विचार मांडून ते थांबले नाहीत तर त्या दिशेने ठोस कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून मोठी चळवळ उभारली. ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने...’ या कादंबरीचे लेखक मुकुंदराव गणपतराव पाटील हे सत्यशोधक चळवळीशी संलग्न होते. फुल्यांच्या विचारांचा नेमका अर्क त्यांच्या या कादंबरीत उतरलेला दिसतो.
‘कलकत्तेकरां’शी केवळ तोंडओळख असणारे ढढ्ढाशास्त्री जेव्हा मृत्यूनंतर शंभर वर्षांनी भूतलावर अवतरतात, तेव्हा पेशव्यांच्या राजधानीत कलकत्तेकरांचे राज्य प्रस्थापित झाले आहे. बावरलेले ढढ्ढाशास्त्री आपले जुने घर शोधून काढतात. तिथे आता त्यांच्या चुलतभावाचा नातू सपरिवार राहत असतो. परंपरेचा, धर्मनिष्ठतेचा आत्यंतिक अभिमान बाळगणाऱ्या, ‘आपले घराणे कधीही पूर्वपरंपरा सोडणार नाही’ असा वाद स्वर्गी ब्रह्मदेवाशी घालणाऱ्या ढढ्ढाशास्त्रींचा नातू असतो सुधारक! त्याच्या घरी राहत असताना जे जे म्हणून त्यांना बघावे, अनुभवावे लागते, ते त्यांना अप्रिय वाटते. नव्या वस्तू, नव्या संस्था, नवे आचार, नवे विचार, नवी यंत्रे, नवी भाषा यांचा अर्थ समजून घेता घेता त्यांची पुरेवाट होते. कधी ते नव्या युगानुसार वागण्याचा प्रयत्न करतात, पण बऱ्याच गोष्टी त्यांव्या एकतर आकलनापलीकडच्या असतात, किंवा त्यांना अजिबात पटत नाहीत. परिणामी एक वर्ष पृथ्वीवर राहायचे वरदान त्यांना शापासारखे वाटू लागते, असे काहीसे या कादंबरीचे कथासूत्र आहे.

कादंबरीचा आणि पर्यायाने ढढ्ढाशास्त्रींच्या अवतरणाचा काळ साधारण १९१३-१५ हा आहे. वर म्हटल्याप्रमाणे, १९१५ च्या पुण्यात यंत्रक्रांतीचे, यांत्रिकीकरणाचे पडसाद उमटत आहेत. परिणामी, १९१५ च्या पुण्यात (ढढ्ढाशास्त्रींच्या निरीक्षणानुसार – ) नाणी प्रमाणशीर, हुबेहूब आहेत, औषधे फारच गुणकारी आहेत, धोतरे लांबरुंद-हलकी-मृदू आहेत, वेगवान आणि गुळगुळीत धावांचे टांगे आहेत, रविवर्म्याची छापील चित्रे घरांत टांगलेली आहेत, विजेचे दिवे आहेत, एकसारखी एक दिसणारी चविष्ट बिस्किटे आहेत, अतिशय सुगंधी साबण आहे, बाटल्यांत ‘आधण येणारे पाणी’ (सोडावॉटर) आहे, घरांत स्टो आहे, फोनोचा कर्णा आहे. या सगळ्या गोष्टी शास्त्रीबुवांना आश्चर्यकारक वाटतात. त्या पाहून ते दचकतात, बुचकळ्यात पडतात. त्यांना नवीन युगातील माणसाचा हेवा वाटतो. त्याने केलेल्या भौतिक प्रगतीचे कौतुक वाटते. सुबत्तेचे नवल वाटते. ‘वैकुंठातसुद्धा असे चमत्कारिक वाहन नाही’ (सायकल), ‘स्वर्गात इंद्राचा रथदेखील असा आश्चर्यकारक नाही’ (मोटार), ‘येथील सगळे लोक देवच झाले म्हणायचे’ असे उद्गार ते वारंवार काढतात. मोटार हा एक प्रकारचा रथ आहे हे त्यांना कळते, पण ही कुठली सिद्धी मनुष्याला प्राप्त झाली आहे हे त्यांना कळत नाही. फोनोतील गायनाची करामत हा पैशाच्चिक खेळ असावा असे त्यांना वाटते. तसबिरी, हंड्याझुंबरे, गालिचा, कुंड्या वगैरेंनी शृंगारलेला लग्नमंडप, सुवासिक साबण, मुलायम धोतरे अशा गोष्टी पूर्वी दुर्लभ होत्या, त्या फक्त पेशव्यांकडे किंवा सरदारांकडे असत, त्या जिकडेतिकडे दिसू लागल्याचे नवल ते बोलून दाखवतात. सायकली, घड्याळे, वर्तमानपत्रे, नव्या पद्धतीचे संडास, पोलिस, त्यांची ‘ग्याटी’, विधवाश्रम, हॉटेले, खानावळी अशा नवनवीन वस्तू, संस्थांचा अर्थ लावायला त्यांना बरेच प्रयास पडतात. चहा बिस्किटांसारख्या गोष्टींचे कुतूहल वाटते.

पण त्यांना सगळ्यात मोठ धक्का बसतो तो जातीपातीचे निर्बंध शिथिल होत चालल्याचा. हॉटेलात न्हाव्याचे येणे, त्याने ब्राह्मण हॉटेलवाल्याशी सलगी करणे, न्हाव्याचे गायत्रीमंत्र म्हणणे, टांग्याने प्रवास करणे, इतर ‘उच्च’ जातीच्या लोकांनी त्याच्याबरोबर टांग्यात बसणे, ‘नीच’ जातीतील लोकांनी चांगले कपडे घालणे, ‘अंत्यजा’च्या पोराने गीता म्हणणे, त्यांच्या मांडीवर बसणे या गोष्टींनी त्यांना परमावधीचा संताप येतो. उच्चनीचतेच्या उतरंडीला आव्हान देणारे हे बदल होते त्यांना अजिबात पसंत पडत नाहीत. जातीजातींच्या ज्या विशिष्ट पद्धती, रूढी होत्या, त्या बदलत चालल्याचे वैषम्य त्यांना वाटते. ब्राह्मण स्त्रियांनी वेणीऐवजी अंबाडा घालणे, पुरुषांनी कोकी (लहानशी पगडी) घालणे त्यांच्या मनास उतरत नाही. पुरुषांचे इंग्रजी पोशाख, स्त्रियांनी चोळ्यांऐवजी पोलकी घालणे, हाती छत्री बाळगणे अशी साहेबी ‘सोंगेढोंगे’ ‘सशास्त्र व सधर्म’ नाहीत, म्हणून त्यांना आवडत नाहीत. जेवताना सोवळे नेसावे वगैरे विधिनिषेध नवी पिढी पाळत नसल्याचे अपार दु:ख त्यांना होते.

मन्वंतराचा ‘ताप’ सहन न होऊन शास्त्रीबुवा देवाचा धावा करतात आणि स्वर्गी परत फिरतात. पण कादंबरी इथेच संपत नाही. खरी मेख पुढेच आहे. स्वर्गात गेल्यावर आपल्या मृत्युलोकभेटीचा वृत्तांन्त ते श्रीकृष्णाला कथन करतात, तेव्हा तो म्हणतो,
"ब्राह्मणाच्या पायापासून तो शेंडीपर्यंत व देवदारापासून शौचकुपापर्यंत सर्वच काही पालटले आहे हे तुला आता कळून आले. असेच इतरांनी वर्तन केल्यास, त्यांच्यावर ब्राह्मणांनी धर्म बुडाला म्हणून दात का खायाचे? त्यांच्यावर भटकी हक्कांच्या फिर्यादी काय म्हणून लावायच्या?"
हे ब्राह्मणांना समजावून सांगण्यासाठी श्रीकृष्ण त्यांना परत एकदा पृथ्वीतलावर पाठवायचे ठरवतो!

ढढ्ढाशास्त्रींच्या पृथ्वीभेटीचा गंमतीशीर वृत्तान्त असे वरवरचे स्वरूप असलेल्या या कादंबरीचा मथितार्थ श्रीकृष्णाच्या ह्या विधानात सामावलेला आहे. ढढ्ढाशास्त्री जुन्या काळातून आलेली एक विशिष्ट व्यक्ती नाही, ते जुनाट विचारांचे प्रतीक आहेत. अश्मीभूत झालेल्या रूढींचे प्रतीक. जुन्या सवयींना, पद्धतींना विनाकारण चिकटून राहणाऱ्या समाजाचे प्रतीक. बदल अटळ असतो हे माहीत असूनही सहजासहजी बदल स्वीकारायला कोणीच तयार नसते. विशेषत: समाजातल्या प्रस्थापित वर्गाला त्यांच्या स्थानाला, संपत्तीला, फायद्यांना धक्का पोचवणारे बदल नको असतात. ढढ्ढाशास्त्री हे ‘जैसे थे’ स्थिती हवीशी असणाऱ्या प्रस्थापितांचे प्रतीक आहेत.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकातला एकीकडे सुधारणांना नाके मुरडणारा वर्ग दुसरीकडे नव्या शिक्षणाचा, सरकारी नोकऱ्यांचा, नव्या वस्तूंचा आणि सोयीसुविधांचा फायदा घ्यायला कचरत नव्हता. आपल्याला सोयीचे असतील ते बदल कवटाळायचे, पण दुसरे तसे वागले की त्यांच्या नावाने शंख करायचा अशा दुटप्पी वागण्याचा निषेध जोतीरावांनी वारंवार केला आहे - राज्यकर्ते परधर्मी, परदेशी असूनही त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करण्यात ब्राह्मणांना कुठलाही विधिनिषेध वाटला नाही, पण आपल्याच देशातल्या, आपल्याच धर्मातल्या काही लोकांच्या सावलीचासुद्धा ब्राह्मणांनी विटाळ मानला. ब्राह्मणेतर जातीच्या लोकांना मांसाहार करतात म्हणून त्यांनी दूर लोटले, पण प्रसंग पडताच इंग्रजांच्या राज्यात त्यांच्या बरोबर हेच पदार्थ खाणे वर्ज्य मानले नाही. ढढ्ढाशास्त्री या दुटप्पी उच्चवर्णीयांचे प्रतिनिधी आहेत.
एकेका जातीच्या म्हणून ज्या रूढी प्रचलित होत्या, त्या पेशवेकाळात अधिकच घट्ट होत गेल्या. रूढीबाह्य वर्तनाला कडक शिक्षा केली जाई. पुढे इंग्रजी राज्य आल्यावर हे बंद झाले, म्हणून अनेक ब्राह्मण हळहळले. (१८३१ साली गणपत कृष्णाजींनी आपल्या छापखान्यात पंचांग छापले तेव्हा शिंपी जातीच्या मनुष्याने बनवलेले पंचांग भंडारी जातीच्या गृहस्थाने छापले म्हणून तत्कालीन अनेक ब्राह्मण कुरकुरले. पण ‘स्थल पडले मुंबई व राज्य पडले इंग्रजांचे’ म्हणून त्यांना गप्प बसावे लागले. तरीही ‘हे पंचांग वर्तविणारे ज्योतिषी व त्यांचे पुरस्कर्ते छापखान्याचे मालक यांचे आमच्या कर्मठ राजांच्या कारकीर्दीत खचित हात कलम केले असते’ असे उद्गार काढायला त्यांनी कमी केले नाही.) कोणी कसे गंध लावावे, कोणी कशा प्रकारची पगडी घालावी, कोणी कासोटा घालावा, कोणी पदर कसा घ्यावा या - आज क्षुल्लक, वैयक्तिक आवडीचा भाग वाटतील अशा - बाबीही जातिनिहाय नियमांनी बद्ध होत्या. एखादी व्यक्ती कुठल्या जातीची आहे, हे त्यावरून लगेच कळत असे. वेगवेगळ्या जातीतल्या लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती एवढाच या वैविध्यपूर्ण रूढींचा अर्थ नव्हता. खालच्या समजलेल्या जातींतील लोकांविषयी स्वत:ला उच्च समजणाऱ्या लोकांच्या मनात पराकोटीची तुच्छता होती. या तुच्छतेने गाठलेले टोक म्हणजे नीच जातीच्या लोकांनी चांगलेचुंगले कपडे, दागिने घालू नयेत, सभ्य, आदरणीय दिसू नये अशी उच्चवर्णीयांची इच्छा आणि त्यानुसार असलेले निर्बंध. उदाहरणार्थ, दक्षिण भारतात एके ठिकाणी ‘खालच्या’ जातीतील स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे उत्तरवस्त्र घालायला मनाई होती. ढढ्ढाशास्त्री या उच्चवर्णीय मानसिकतेचे प्रतीक आहेत. स्त्रीपुरुषांचे बदललेले पोशाख बघून ते गोंधळात पडतात, पगड्या, साड्या नेसण्याच्या पद्धती वगैरे पाहून कोण कुठल्या जातीचे त्यांना समजत नाही. ‘हा ब्राह्मण, हा महार हे तर आता ओळखण्याची सोयच राहिली नाही’, म्हणून त्यांना फारच वाईट वाटते. पांढरा सदरा, फेटा, कलाबतूचा जोडा, बोटात अंगठी असा पेहराव केलेल्या एका मनुष्याला पाहून शास्त्री म्हणतात,
"शौचकुप स्वच्छ करणारा आन तो एवढ्या थाटानं राहतो! आन उर्मटपणानं कोणाच्याही शेजारी बसतो!.....लेकानं काहीतरी पायरीनंच राहिलं पाहिजे का नको?.....म्हणजे असं, काही तरी जातीचा विचार करून."
त्यावर त्यांचा सहप्रवासी उत्तरतो,
"जात तरी कसली? तुमच्यापेक्षा त्याचे कान आखूड आहेत का त्याच्यापेक्षा तुमचे कान लांब आहेत? तुम्ही आणि तो माकड बैलाप्रमाणे वेगळ्या जातीचे आहा असे ओळखावे तरी कसे?"
जातिसंस्था इंग्रजांच्या राजवटीत हळुहळू मोडायला सुरुवात झाली होती, आणि शास्त्रीबुवांसारखे कित्येक लोक त्याच्या विरोधात होते. अन्यायी परंपरांची वकिली करणाऱ्या या विचारसरणीचा ही कादंबरी चंगला समाचार घेते. जातिव्यवस्था ही शुद्धाशुद्धतेच्या संकल्पनांशी निगडित आहे. त्यांतल्या त्यात ब्राह्मणांत सोवळ्याओवळ्याचे तर फारच प्रस्थ होते. आगरकर, लोकहितवादींनी सोवळ्याओवळ्याच्या निरर्थक कल्पनांवर सडकून टीका केलेली आहे. ही कादंबरीही सोवळ्याओवळ्याच्या रूढींमधला पोकळपणा दाखवून देते.

स्त्रियांचे समाजातले दुय्यम स्थान जातिव्यवस्थेने बळकट केले. जातिधर्माच्या रूढींच्या नावाखाली स्त्रियांवर नाना निर्बंध लादण्यात आले. स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचा विडा त्याकाळच्या अनेक सुधारकांनी उचलला होता. केशवपन, विधवा पुनर्विवाह इ. मुद्द्यांवरून मोठाच गदारोळ भारतभर उडत होता. पुण्याच्या ब्राह्मणांत त्यावरून तट पडले होते. ढढ्ढाशास्त्री अर्थातच ’स्त्रीसुधारणे’च्या विरोधी आहेत, आणि विधवा स्त्रीचे मन चळू नये (!), तिचा पाय घसरू नये (!) म्हणून तिला चांगलेचुंगले खायला, ल्यायला देऊ नये या मनुवादी पक्षातले आहेत. सकेशा (म्हणून ओवळ्या), कुंकू लावणाऱ्या, मंगलकार्यात उपस्थित राहिलेल्या, पुरुषांच्या बरोबरीने वावरणाऱ्या विधवा स्त्रिया पाहून त्यांचा संताप संताप होतो. स्त्रियांची अब्रू बहुतांशी त्या त्या समाजाचा मानबिंदू समजला जातो. अब्रूरक्षणाच्या नावाखाली स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवणे हे काम तथाकथित नागरी समाज चोख करत असतात. ढढ्ढाशास्त्री या नागरी समाजाचे प्रतिनिधी आहेत.

ढढ्ढाशास्त्रींना त्यांचे नातू आणि पाणरंगे शास्त्री चहाची महती सांगतात तो प्रसंग या कादंबरीतला बहारीचा प्रसंग आहे. शास्त्रींनी हॉटेलात एका रांगेत बसून चहा पिणारे पुष्कळसे लोक पाहिलेले असतात. कप, चमचे आणि चहाचे घोट पिणे हे त्यांच्या ब्राह्मणी नजरेला पंचपात्र, पळी आणि आचमने असे दिसते, त्यामुळे एकत्र चहा पिणे ही संध्येची कवायत असावी, ही उष्णोदकाने करायची संध्या असावी असा त्याचा अर्थ ते लावतात. त्यांचे नातू त्यांना चहा हा एक प्रकारचा काढा, औषध असल्याचे सांगतात तर त्यापुढे जाऊन पाणरंगे शास्त्री चहाला सोमरसाचा दर्जा बहाल करत चहादेवी ही नवी देवता असल्याचे पटवून देतात. एवढेच नव्हे, ’चायनावासिनी, मधुगंधा, कपसासरभूषिता, बिस्कुटप्रिया, उष्णबाष्पध्वजधरा’ अशा चहादेवीचे चहिकापुराणातले स्तोत्र ऐकवायलाही ते कमी करत नाहीत. हे सात कडव्यांचे स्तोत्र स्वतंत्रपणे उत्कृष्ट विडंबनकाव्य तर आहेच, पण पुराणे, स्तोत्रे, महात्म्ये रचून अब्राह्मणी दैवतांचा अपहार करून टाकण्याच्या ब्राह्मणांच्या लकबीचाही तो उपहास आहे. वेगवेगळ्या समूहांच्या, बहुजनसमाजाच्या, तसेच स्थानिक दैवतांच्या ’उन्नयना’चे अनेक दाखले रा. चिं. ढेऱ्यांनी दिलेले आहेत. बहुजनांच्या दैवतांचे ब्राह्मणी दैवताशी सात्म्य मानून, त्यांना ब्राह्मणी देवतापरिवारात स्थान देऊन त्यांचे वेगळेपण किंवा मोठेपण नाहीसे करून टाकणे ही ब्राह्मणांची खासियत होती. बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून बुद्धधर्माच्या आव्हानाची धग कमी करण्याचा प्रयत्न जसा त्यांनी केला, तसा
‘अस्मल्लां इलल्ले मित्रावरुणा दिव्यानिधत्ते;
इलल्ले वरुणो राजा पुनर्ददु:’
असे अल्लोपनिषद रचून अल्ला हा वेदप्रतिपाद्य आहे असे भासवण्याचा (अयशस्वी) खटाटोपही काही ब्राह्मणांनी केला.१० वारा येईल तशी पाठ फिरवणाऱ्या ब्राह्मणांच्या धूर्तपणाचे खासे विडंबन चहादेवीच्या स्तोत्राच्या रूपाने केलेले आहे.

पंचहौद मिशनचे चहा प्रकरण एके काळी पुण्यात फार गाजले होते. मिशनऱ्यांच्या हातचा चहा प्यायला म्हणून केवढा वाद निर्माण झाला होता! हाच चहा काही वर्षांतच लोकमान्य आणि लोकप्रिय बनला. कॉफीच्या प्रवासाचे उदाहरणही इथे देण्यासारखे आहे. तामिळनाडूमध्ये जेव्हा कॉफी या नव्या पेयाचा शिरकाव झाला, तेव्हा अर्थातच कर्मठ ब्राह्मणांनी त्याला कडाडून विरोध केला. पारंपरिक ‘नीरगरम’ पिण्याऐवजी लोक हे मादक पेय पित आहेत हे त्यांना आवडले नाही. हेच पेय पुढे तमिळ ब्राह्मणांचे आवडते पेय बनले, आणि सुगृहिणीने घरी दळलेल्या कॉफी पावडरची, गाईचे दूध घालून केलेली कॉफी पाहुण्यांना देणे हा उत्तम पाहुणचाराचा एक निकष ठरला. संस्कृतीचा भाग म्हणून कॉफीचा स्वीकार झाला.११ अशा पार्श्वभूमीवर या कादंबरीतील चहाप्रकरण रंजक आहे, तसे विचार करायला लावणारेही आहे.

संस्कृती प्रवाही असते. आज ज्याला आपण आमचे आचार, आमच्या जीवनपद्धती, आमच्या परंपरा म्हणून कवटाळून धरतो, त्या उद्या बदलणार असतात. कुठलीच संस्कृती एकदा ठरली की ठरली, कायमची वज्रलेप झाली असे होत नाही. आपल्या समाजाने अनेक चांगल्यावाईट रूढी काळाच्या ओघात टाकल्या किंवा नव्याने स्वीकारल्या. काही परंपरा, रूढींना मात्र आपण चिकटून बसलो, बसतो. कुठलीच संस्कृती एकसंधही नसते, तिच्यात अनेक उपप्रवाह असतात. कधी त्यातला एखादा प्रवाह वरचढ होतो, कधी तो कालौघात नाहीसा होऊन जातो, किंवा अप्रतिष्ठित होऊन बसतो. तेव्हा अमुक एक करणे, अमुक एका प्रकारे वागणे, अमुक एका गोष्टीचे पालन करणे ही आमची संस्कृती आहे असे म्हणण्यात काही हशील नसते. अमुक एक गोष्ट आमच्या संस्कृतीचा आवश्यक भाग आहे असे म्हणण्याला काही अर्थ नसतो. संस्कृतीच्या प्रवाहीपणाचे आपल्याला भान नसते. निरर्थक, बाष्कळ, भेदभाव करणाऱ्या रूढी आपण त्यागल्या तरी लगेच आपला धर्म किंवा संस्कृती बुडणार नसते. किंबहुना, सोयीचे वाटेल तेव्हा आपण तसे करतोच. पण काही काही परंपरा टाकण्याचे, त्या चुकीच्या असल्या तरी, आपल्याला जीवावर येते. आपण उगाचच समाजाची भीती वाटून घेतो. आपल्या रूढी आपल्याला तपासूनही पाहाव्याशा वाटत नाहीत.

एकोणिसावे-विसावे शतक हा भारतातल्या आधुनिकतेच्या प्रारंभाचा काळ होता. आपण ही आधुनिकता पूर्णांशाने स्वीकारली का? भौतिक सुखसोयी पटकन उचलल्या, पण तर्कशुद्ध विचार अंगीकारायला मात्र टाळाटाळ केली. या दांभिक आधुनिकपणावर बोट ठेवण्याचे काम ही कादंबरी करते. उच्चवर्णीयांनी तांत्रिक प्रगतीचा, नवनव्या यंत्रांचा, आधुनिक यंत्रणांचा फायदा घ्यावा, पण वंचितांनी मात्र पुराण्या चौकटीतच राहावे, या दुटप्पीपणाची टर उडवते. कादंबरीला विसाव्या शतकातील महाराष्ट्राचा संदर्भ असला तरी त्यातील युक्तिवाद दुर्दैवाने आजही कालबाह्य ठरलेला नाही. भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात रस असणाऱ्या अभ्यासकाने तर हे पुस्तक वाचलंच पाहिजे, पण ज्यांना मनोरंजन म्हणून पुस्तके वाचायची आहेत, अशा वाचकांनाही झपाटून टाकेल असं पुस्तक आहे हे!

१. पाटील, मुकुंदराव गणपतराव (२००९) ढढ्ढाशास्त्री परान्ने, मुंबई: लोकवाङ्मय गृह.
२. नारळीकर, जयंत (2001) यक्षांची देणगी, मुंबई: मौज प्रकाशनगृह.
३. वऱ्हाड समाचार, २ नोव्हेंबर १८७३.
४. Parekh, Bhikhu C. (1999) Colonialism, Tradition, and Reform: An Analysis of Gandhi's Political Discourse, New Delhi: Sage.
५. पाटील, ढढ्ढाशास्त्री, पान क्र. ११९
६. विविधज्ञानविस्तार, वर्ष २४ (अंक ६), १८९२
७. पाटील, ढढ्ढाशास्त्री, पान क्र. ११४
८. तत्रस्थ
९. ढेरे, रा. चिं. (२०१२) श्रीविठ्ठल: एक महासमन्वय, पुणे: पद्मगंधा प्रकाशन.
१०. वऱ्हाड समाचार, २ ऑक्टोबर १८४८.
११. Venkatachalapathy, A. R. (2002) " 'In those days there was no coffee': Coffee-drinking and middle- class culture in colonial Tamilnadu", The Indian Economic & Social History Review, Vol. 39, No. 2-3, pp. 301- 316

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय तपशीलवार आणि उत्तम लेख. तत्कालीन ब्राह्मणेतर डिस्कोर्सचे पैलू संगतवार उलगडून सांगणारा. आवडला!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फारच छान लेख. पुस्तक वाचायलाच पाहिजे आता!

बादवे हे 'भटकी हक्कांच्या फिर्यादी' काय प्रकरण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख या आवडला.
भट की म्हणजे भटजीगिरी करण्याचे कॉन्ट्रॅक्ट, स्पेसिफिक पिरियड साठी असे असेल का ?
अनेक देवस्थानांमध्ये आजही वार्षिक पुजारीपण लिलाव होतो. पारंपरिक हक्काचे पुजारीपण असलेल्या आणि आता कुटुंबाचा विस्तार झाल्यानन्तर दरवर्षी फिरून एकेका कुटुंबातील छोट्या घटकाला वार्षिक हक्क मिळतो. बऱ्याच वेळी ते दुसऱ्या नोकरी व्यवसायात गेलेले असतात, अशा वेळी ते चक्क लिलाव करतात त्या हक्काचा. कुटुंबातील दुसरे कुणी किंवा बाहेरील ब्राह्मण कुटुंब तो मक्ता घेतात व स्वतः तो धंदा चालवतात ... टोल कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे.
तसे काही असावे बहुधा.
चार्वी या सांगू शकतील का ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्यशोधक समाजाने पुरोहितांशिवाय लग्ने आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचा पुरस्कार केला. हे भिक्षुक ब्राह्मणांना आवडले नाही. गावातली जी जी घरे परंपरेने ब्राह्मणांची यजमान घरे होती त्या घरांत पुरोहितांशिवाय कार्य झाले तरी दक्षिणा मिळावी अशा फिर्यादी ब्राह्मणांनी केल्या होत्या. याचाच उल्लेख भटकी हक्कांच्या फिर्यादी केला असावा असा माझा अंदाज आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हेरी इंटरेस्टिंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्कृष्ट लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्वप्रथम, लेख, लेखातील माहिती, लेखावरील प्रतिसाद आणि त्या देवाणघेवाणीतून बाहेर पडणारी माहिती, हे सर्वच रोचक तथा उद्बोधकही. हॅविंग गॉटन दॅट औट ऑफ द वे...

ढढ्ढाशास्त्री पुण्यात परत येतात, त्यावेळी पुण्यात त्यांनी हे जग सोडल्यापासूनच्या काळात आमूलाग्र बदल झालेले असतात, इथवर ठीक. समजण्यासारखे आहे. पण यात त्यांना आश्चर्य का वाटावे? किंवा धक्का का बसावा?

म्हणजे, स्वर्गातसुद्धा मध्यंतरी असे काही संक्रमण झाले नाही काय? सामाजिक सुधारणा मरोत, निदान भौतिक सुविधांच्या बाबतीत तरी? स्वर्गात तारा, आगगाड्या, झालेच तर मोटारी आल्या नाहीत? फार कशाला, साधी भज्यांची हाटेले, झालेच तर चहाची दुकानेसुद्धा आली नाहीत? अगदी अमृततुल्यसुद्धा? (इराण्यांची तर बातच करत नाही.) थोडक्यात, स्वर्ग मधल्या काळात स्टॅग्नेट होऊन राहिला? फ्रोझन इन सम आर्बिट्ररी इपोक इन टाइमसारखा?

आणि हे नक्की कधीपासून? म्हणजे, टू एक्स्ट्रापोलेट बॅकवर्ड इन टाइम, ढढ्ढाशास्त्रींच्या प्रथम स्वर्गारोहणाच्या कित्येक शतके, युगे किंवा मन्वंतरे अगोदरच्या अतिप्रिमिटिव काळात फ्रीझ झाला असला तर? मग तुमचेआमचे तर जाऊ द्या, पण खुद्द ढढ्ढाशास्त्रींना स्वर्गात गेल्यावर प्रचंड कल्चरल शॉक बसला नसेल काय? कारण ढढ्ढाशास्त्रींचा काळ(सुद्धा) त्या तुलनेत नक्कीच खूपच प्रगत असणार. (तुमच्याआमच्या काळाची तर बातच सोडा.)

आणि मग, असल्या या स्वर्गात जाण्याकरिता लोक नक्की का मरतात? (लिटरली?)

..........

('स्वर्गातसुद्धा जातिभेद, शिवाशीव वगैरे प्रकार होते की काय?' असले एक्सेसिवली बेसिक प्रश्न विचारणार नाही. ज्याअर्थी जातीपातीचे निर्बंध शिथिल होत चालल्याचा धक्का ढढ्ढाशास्त्रींना बसला, त्याअर्थी स्वर्गात ही बंधने मध्यंतरी शिथिल झालेली नव्हती, आणि त्यामुळेच ढढ्ढाशास्त्रींना त्याची सवय नव्हती, हे उघड आहे. किंबहुना, जातपात, शिवाशीव, सोवळेओवळे या भानगडी स्वर्गात जोरात चालत असाव्यात, हे उघड आहे. आणि परधर्मीयांना तर मज्जाव असावा. किंबहुना, आजतागायत केवळ दोनच मुसलमानांना स्वर्गात प्रवेश मिळाल्याचे ऐकलेले आहे, आणि तेही एका मुस्लिमद्वेष्ट्या कुत्सितविनोदात. त्यामुळे असोच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

नवी (जुन्या काळची) माहिती मिळाली. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक पुस्तकाची ओळख आवडली. पुस्तक अजूनही मिळते का? मिळत असल्या कुठे मिळेल? (या आळशी प्रश्नांचीही उत्तरे कृपया द्यावीत.)

संपादन: बुकगंगावर इ-बूक उपलब्ध आहे असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सुरेखच!!! पुस्तकाची ओळख अफाट आवडली.

ढढ्ढाशास्त्री जुन्या काळातून आलेली एक विशिष्ट व्यक्ती नाही, ते जुनाट विचारांचे प्रतीक आहेत. अश्मीभूत झालेल्या रूढींचे प्रतीक. जुन्या सवयींना, पद्धतींना विनाकारण चिकटून राहणाऱ्या समाजाचे प्रतीक. बदल अटळ असतो हे माहीत असूनही सहजासहजी बदल स्वीकारायला कोणीच तयार नसते. विशेषत: समाजातल्या प्रस्थापित वर्गाला त्यांच्या स्थानाला, संपत्तीला, फायद्यांना धक्का पोचवणारे बदल नको असतात. ढढ्ढाशास्त्री हे ‘जैसे थे’ स्थिती हवीशी असणाऱ्या प्रस्थापितांचे प्रतीक आहेत.

लेखिकेची/लेखकाची (चार्वी कोण आहेत हे माहीत नाही) ही मिमांसा मस्तच आहे.
.

स्त्रियांचे समाजातले दुय्यम स्थान जातिव्यवस्थेने बळकट केले. जातिधर्माच्या रूढींच्या नावाखाली स्त्रियांवर नाना निर्बंध लादण्यात आले. स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचा विडा त्याकाळच्या अनेक सुधारकांनी उचलला होता. केशवपन, विधवा पुनर्विवाह इ. मुद्द्यांवरून मोठाच गदारोळ भारतभर उडत होता. पुण्याच्या ब्राह्मणांत त्यावरून तट पडले होते. ढढ्ढाशास्त्री अर्थातच ’स्त्रीसुधारणे’च्या विरोधी आहेत, आणि विधवा स्त्रीचे मन चळू नये (!), तिचा पाय घसरू नये (!) म्हणून तिला चांगलेचुंगले खायला, ल्यायला देऊ नये या मनुवादी पक्षातले आहेत. सकेशा (म्हणून ओवळ्या), कुंकू लावणाऱ्या, मंगलकार्यात उपस्थित राहिलेल्या, पुरुषांच्या बरोबरीने वावरणाऱ्या विधवा स्त्रिया पाहून त्यांचा संताप संताप होतो. स्त्रियांची अब्रू बहुतांशी त्या त्या समाजाचा मानबिंदू समजला जातो. अब्रूरक्षणाच्या नावाखाली स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवणे हे काम तथाकथित नागरी समाज चोख करत असतात. ढढ्ढाशास्त्री या नागरी समाजाचे प्रतिनिधी आहेत.

टाळ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुर्मीळ पुस्तकाचा सुंदर परीचय अावडला. असेच गावगाडा हे अात्रे यांचे पुस्तक बहुमोल अाहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुर्मीळ पुस्तकाचा सुंदर परीचय अावडला. असेच गावगाडा हे अात्रे यांचे पुस्तक बहुमोल अाहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असलं पुस्तक १९२७ साली लिहिलं होतं हे बेष्ट आहे. वाचायला पाहिजे.
ओळख करून दिल्याबद्दल थ्यांक्स!
---------
१९००->२००० असं आयुष्य जगलेल्यांना किती मोठ्या संक्रमणाचे साक्षीदार होता आलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच छान लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचायचं तर निवांत म्हणून ठेवलेला हा लेख आज वाचला. खुप आवडला. इतर ऐसीकरांकरिता वर काढत आहे.
पुस्तक येथे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

वरच्या जातीचे लोक ( स्त्रियाही) खालच्या जातीच्या लोकांना भेटल्यास काय करतात - कसे आचरण असते ते भित्तीचित्रेरूपांत (म्युरल्स) ओरछा येथील राजा महालातील एका दालनात आहेत. तीन वर्षांपुर्वी गेलो तेव्हा पाहिली होती चित्रे. आता २०१९ ओक्टोबरात गेलो तेव्हा ते दालन कुलुपबंद केलेले होते.

#- ओरछा मप्रदेशात आहे. झाशी (उप्रदेश)पासून १८ किमि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0