गायिले मी गाणे आपुल्या मनात l

चार पाच वर्षांपूर्वी आतल्या उलथापालथेनं नव्यानं जगायला शिकले, म्हणजे कसं असतं,कशा कशांचा निकाल लागायचा, तो लागून झाला की, पुढचा प्रवास सोप्पा. इथं प्रश्न तब्येतीचा होता. शरीर दिसायला ठीक ठाक असलं तरी आत पडझडलेलं , जबाबदारीच्या नशेत सगळ्याकडं सफाईनं दुर्लक्ष झालं, सगळं सगळं साचून एकदाच समोर आलं तेव्हा खरं तर चाळीशी पार करत होते. भलं- बुरं समजलं होतं. आणि ते समजायला ती वर्ष पार करून यावं लागतं तेव्हा ते समजतं हे ही समजलं होतं. आता स्वतःला वेळ दिल्याशिवाय आपलं काही खरं नाही हे मनोमन पटल्यानं स्वतःला बघायला लागले. पण त्या जाणून-बुजून काढलेल्या वेळेनं, रिकाम्या जागा जास्त दिसायला लागल्या, काय होतं जे सारखं सारखं टोचत होतं? नेमकं काय जळून राख झालं होतं की त्याच्या धुरात आजही चाचपडल्यासारखं जगावं.?कशानं ती बोच कमी होईना, महिनोन महिने निराशेत काढल्यावर (म्हणजे नोकरी घरकाम, लायब्ररी, वाचन, चालूच होतं पण मन आनंदी नव्हतं, काही केल्या थुतरावरचा ओशट भाव जाईना, म्हणजे एक दिवस तर असा आला की त्या दिवशी मला कोणी विचारलं नाही ' काय गं बरी आहेस ना? बरं नाही का ? चेहरा असा का ? मुलगा बरा आहे. तेव्हा गळा काढून रडावं वाटलं ) वेगवेगळ्या पद्धतीनं जगणं बदलून,त्यात हेअरस्टाईल पासून कपड्याबुटापर्यंत स्वतःला लखलखीत करूनही खूप काही सुटल्याची जाणीव काही जात नव्हती. अशाच नेमक्या पण निसटत्या क्षणी दुर्गाबाई समोर आल्या. बाईंना जाऊन खूप वर्ष झाली होती, आणि जेव्हा त्या गेल्या तेव्हा मी संसाराच्या प्रश्नात गुरफटलेली होती. 'त्या गेल्या' इतकं वाचून मी पेपर शांतपणे दूर सारून कामाला लागले. त्या संध्याकाळी आठवलं ते त्यांचं 'व्यासपर्व', पण कामाच्या धामधुमीत तेही मागं पडलं. आणि आता कितीतरी वर्षांनी त्यांच्या जाण्याची धूळ झटकून त्या नव्यानं समोर उभ्या राहिल्या. मी खरं तर थोडी ओशाळले. मध्ये एकदा कधी तरी त्यांच्या पुस्तकांचा विषय निघाला तेव्हा ही त्या आठवल्या होत्या, पण लगेचच त्यावर काहीतरी फिरलं आणि त्या तळाशी गेल्या. पण आता त्यांच्या पुस्तकाकडं वळले ती आजही तिथंच उभी आहे. सुरुवातीला 'ऋतुचक्र',' पैस', 'दुपानी', 'व्यासपर्व', 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी',' भावमुद्रा' वाचून झालं होतं तशातच त्यांचं ' आस्वाद आणि आक्षेप' हे पुस्तक हाती आलं. काही नेमक्या पुस्तकांचं परीक्षण होतं ते त्यातल्याच एका प्रकरणातल्या एका ओवीने माझा ताबा घेतला, ती अशी होती.,

गायिले मी गाणे आपुल्या मनात l
गेला नाद जाईच्या बनातll

मनाच्या तळातून आलेल्या या ओवीचा अर्थ लावण्याचा मी असोशीने प्रयत्न करू लागले. ही ओवी सतत गुणगुणणारी मी परकरी पोर होते, तरुणी होते, आई होते, सर्व जाणिवा- नेणिवा काळाच्या भट्टीत तावून- सुलाखून- उजळवून आणणारी पोक्त प्रौढा होते. कोण होते मी ? तीनेक वर्ष माझं व्हॉट्सअप स्टेट्स त्याच ओव्या होतं, माझ्या दिवसांची सुरुवात आणि दिवसाची सांगताही त्याच ओव्यांनी झाली. प्रत्येक वेळी ओव्या भलत्याच अर्थ सांगायच्या. ओव्यांनी माझं अंतरंग ढवळून काढलं. काय होतं हे ?नेहमीच्या गाण्याचा नाद नव्हता तो, मनाच्या तळातून आलेल्या ओवीत मनाच्याच गाण्याला जाईच्या बनात नेण्याचं सामर्थ्य होतं. पहिल्यांदा ओवी वाचली तेव्हा आतापर्यंत पाहिलेलं हजारो जाईचे मांडव, गेटवर, भिंतीवर, कुंड्यात, डबक्यात, वाढलेल्या जाईच्या वेली रांगेने डोळ्यासमोर आल्या पण ती होती त्या त्या वेळी पाहिलेली दृश्य प्रतिमा. सुरुवातीला मला त्या ओव्यांचा लागलेला अर्थ असा होता 'आपला आनंद हा आपल्या मनात असतो, तो इथं वाहू लागला तरी तो गुंजतो दूरवरच्या जाईच्या बनात',. कधी त्यात मला विरह दिसला, नसलेल्याची आठवण आली, तिथं तो आहे असं ही वाटलं, कधी या सगळ्यावर मात करून श्रीकृष्णाचं रूप दिसायचं. त्याच्या मुरलीची धून वेडावल्या सारखी बोलवायची. आभाळातले चुकार ढग, रंगबिरंगी फुलांच्या माळा, जे जे निर्मळ आणि जे जे विभत्स ओंगळ तिथं ही मी या ओव्या म्हणून पाहिल्या. सगळ्या नाद- प्रतिमा, नाद-चित्रं वेगवेगळी येत होती. संभ्रमात टाकणारी होती. नेमकं उत्तर सापडत नव्हतं. कदाचित ती सुरुवात होती सगळं समजण्याची, आतापर्यंत जे समजलं ते आत पोहोचलंही आहे, तरीही जे आतवर जाणवलं आहे त्याच्या भरोशावर पुढचं जगणं नाही पेलवणार याची नांदीही होती. मग विचार केला आता सगळ्या दुर्गाबाई वाचून काढायच्या, कुठं तरी त्यांनी, त्यांना या ओवींचा लागणारा अर्थ लिहून ठेवला असेल. जसजशी दुर्गाबाईंच्या बरोबरीनं पुढं जाऊ लागले तसतसे आपलं (म्हणजे माझ्या स्वतःचे नगन्यपण ठळक होऊ लागलं) सतत ध्यास लागला तो त्यांची पुस्तकं ,मिळविण्याचा. बाई असत्या तर त्यांना भेटलेच असते,पण वेळ पुढं निघून आली होती.

जाईच्या मांडवाची एक थोडी वेगळी आठवण आहे ती अशी.' खूप वर्षापूर्वी जाईच्या बहरल्या मांडवाखालची कबर पाहिली होती. उन्हं उतरतीला लागली होती, आजूबाजूला असलेलं निर्मनुष्य रान, चालत जाईपर्यंत धुपाचा मंद सुगंध येत होता, अलीकडं पायधुनी होती, पाय धुवून आत प्रवेश केला,तो पांढरा शुभ्र चौथरा, त्यावरती कबर, कबरीवरला सावली धरलेला जाईचा मंडप बघूनच जीव शांत झाला. पण गर्द हिरव्या चादरीवर अचेतन पहुडलेली, बारीक चणीची चिमुकली फुलं पाहून मन हिरमुसलं. इथं धूप उग्र झाल्यानं ,त्यात जाईचा गंध मावळून गेला, आणि कबरीला राखण असणाऱ्यांच्या विशिष्ट अट्टहासाने ते दृश्य खूप सुंदर असूनही, मृतात्म्यासाठी सगळ्यांना वेठीस धरल्यासारखं वाटलं. तिथं ती जाईची नेहमीची सुगंधी कळ नव्हती. खरं तर इथं असणारीचं, उगवनारींचं प्राक्तन धुंद-फुंद होऊन बहरायचं नव्हतं. इथं गांभीर्य होतं, विरक्ती होती, मृत्यू होता, शोक होता.त्यामुळं ती आठवण तशीच निमाली. तेव्हा वय लहान होतं. उगवतीचा सूर्य आतापर्यन्त सुखाची किरणं घेऊन उगवला होता. पण आता त्या सगळ्याकडं पाहतांना तिथं वेगळं दिसतं. नवं काही सांगू पाहतंय. वाटलं नव्यानं त्या कबरीला भेट द्यावी. एक मन तिथं जा असं सांगत असतांना दुसरं मन त्याला तिथंच सोडून दे सांगत होतं, दुसऱ्या मनाचं सांगणं होतं ' आता तो परिसर तसा राहिलाही नसेल, ते शांतवणारं वातावरण तिथं असणार नाही. कदाचित ती कबर तिथं नसेलही आणि असली तरी गेल्या चोवीस वर्षाच्या फरकानं तिला आहे तसं ठेवलं नसेल. तू इथूनच तिथं पहा. मनात वारंवार ते दृश्य आण. दुसऱ्या मनाचा आवाज ऐकला तो अर्थ माझ्या मुक्तीचा होता,(खरं तर अर्थ नव्यानं समजणं समजून घेणं म्हणजेच मुक्ती हे खरं आहे. एका भाजीवाल्यांमला ते संदर्भ दाखवून पटवून दिलं आणि त्याचं सांगणं मला तेव्हाही पटलं आणि आज नव्यानं समजलं) त्या दृश्यानं चोवीस वर्षांपूर्वीच मला सावध केलं होतं. पण मी दुर्लक्षलं. तेव्हा ते कळलं असतं की आपल्याला हवं असणं आणि त्यासाठी जीव- जीवन खर्ची घालणं फोल आहे, नगण्य आहे. हे ही फार खरं आहे मागचं हवं असलेलं आत्ता कवडी मोलाचं ठरतं, जे आता हातात आहे ते सोडून मन दुसऱ्या ' हव्या' कडं धावयत. जे हातात आहे आहे आणि ज्या पाठीमागं धावून ते मिळवूनही ते मातीत मिसळणार आहे आणि मातीत मिसळतांना पूर्णत्वाला मिळण्याचं प्रत्येकाचं प्राक्तन वेगळं आहे. खरं तर इथंच जगण्याच्या हजारो वेगळ्या वाटा फुटल्या असत्या. पण असो तेव्हा ते व्हायचं नव्हतं. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन जगणं समृद्ध होतं तेच खरं असलं तरी ती वेळ यावी लागती तेही खरं.

ऑफिस समोरच्या बंगल्यातल्या जाईच्या वेलानं उन्मत होऊन सरळसोट कॅशियाला विळखा घातला, वरवर झेपावणारी ती पोपटी तंतुमय वलये, आधार न शोधता स्वैर वाढलेल्या त्या नाजूक कोवळ्या फांद्या वाऱ्याच्या झोतांवर तरंगतांना अवखळ फुलचुख्या झोका घेतात. आकाशाकडं झेपावणारी पांढरीशुभ्र फुलं डोकावतात, कधी कळ्या दिसतात, कधी पूर्ण उमललेलं फुल अलवार तरंगत खाली येतं. पाऊस पडल्यावर, आभाळ दाटलेलं असताना, कोवळ्या उन्हात, भर दुपारी, संध्याकाळी वर्षानुवर्षे ही प्रतिमा समोर आहे, निरखत आहे. पण इथं मनात ते गाणं उमटलं नाही,इथं नादानं नकार दिला.

मागच्या वर्षी एव्हढ्यात घरी पोहोचू म्हणून गाडी दामटूनही पावसानं एरंडवण्यात गाठलं. कडकडणाऱ्या वीजा, बेफाम वारं सुटलं. गाडी चालवणं शक्य नाही म्हणून अंगावर रेनकोट चढवून मोठ्या शिरीशाच्या झाडालाही उभारले. तसा तो एकांत असलेला परिसर, तुरळक गर्दी ही कमी झाली. काही वेळानं शुकशुकाट झाला. भर दुपारी अंधारलं आणि दणादणा पावसाला सुरुवात झाली. त्या झाडाखालून त्याच्या काळ्याजर्द खोडावरून, त्याच्या फांद्या फांद्यातुन सरळ - आडवा चिंब करणारा पाऊस मी मनमुराद भोगला. त्या स्वच्छ एकांतात किती काही धुवून निघालं. किती काही येऊन मिळालं. तासभरानं उघडलं ते लक्ख ऊनच पडलं. सूर्याची गुलाबी प्रकाश किरणं आभाळभर पसरली होती.उरल्या सुरल्या ढगांनी सुळकांड्या मारल्या आणि अवघा आसमंत गर्द केशरी प्रकाशानं न्हाऊन निघाला. खूप विलोभनीय दृश्य होतं ते. पक्षांच्या फडफडीने समोर लक्ष गेलं तर समोरच्या गेटवरची जाई फुलून आली होती. मी झाड, पाऊस, सूर्यानं शिंपलेला आभाळभरचा केशरी सडा आणि समोर फुललेली जाई सगळं एकरूप झालं. इथं जाईच्या बनाचा नाद आला, गाणं आतून आलं जाईच्या बनाच्या साथीनं आलं. तिथं उभी असलेली मी दुसरीच कोणी होते.त्या दृश्यानं मला अंतर्मुख केलं.

महिन्याभरापूर्वी हॉटेल वेस्टीनला चित्रप्रदर्शन होते, एम एफ हुसेन ते अबिन्द्रनाथ टागोरपर्यंत बहुतेक सगळ्या चित्रकारांची गाजलेली पेंटीग्स होती, जेमिनी रॉय यांचे बहुचर्चित तीन पुजारनीचं पेंटिंग होतं. दुसऱ्या दिवशी त्या सर्व पेंटिंगचा मुंबई येथे हॉटेल ताज मध्ये लिलाव होता. हातात होती ती शेवटची संधी होती, काहीही करून प्रदर्शन पाहायचं पक्कं केलं. प्रदर्शनात __________________________एका चित्राने माझा ताबा घेतला. ते चित्र होतं आईचं आणि तिच्या मुलाचं. संबंध चित्रात फक्त लाल साडीतली आई आणि तिचं गोंडस मूल. मुल नागडं. आणि आईच्या अंगावर पोलकं नव्हतं.ती दोघे समोर आणि त्यांच्या पाठीमागं लांबवर किणकिणनाऱ्या नाजुकशा घंटा इतकंच ते चित्र होतं.संध्याकाळच्या गडद रंगाची छटा चित्रभर उमटली होती. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर आलेल्या त्या घंटांचा आवाज म्हणजेच त्या आई आणि मुलाचं एकमेकांत रमलेलं, भवताल विसरलेलं चित्र खूप पूर्ण होतं. आईच्या आणि मुलाच्या नात्याला त्या किनऱ्या घंटानादाची प्रतिमा साकारून चित्रकारानं त्या संबंध अवकाशात आई आणि मुलाचं एकमेकांत आनंदानं गुंग होऊन जाणं, त्यांच्या मनातला तो नाद, ( खरतर तर रांगणाऱ्या आठ नऊ महिन्याच्या मुलाला आपल्या आईशिवायचं जग माहित नसतं आणि आईलाही कधी एकदा त्या मुलाला जवळ घेईल असं होतं. ते दोघचं असतात तिथं तिसरं कोणी असलं तरी त्याचं अस्तित्व पुसून टाकण्याचं सामर्थ्य त्या नात्यात असतं.) वाऱ्याच्या झोतानं हलणाऱ्या घंटांच्या आवाजातून, चित्रकारानं त्याचं मन ओतून त्यातले रंग, गंध, सूर, आकार आपल्यापर्यंत पोहोचवले होते. चित्रकाराचा क्षणभर हेवा वाटला. कितीवेळा ते चित्र पाहिलं, मनाला व्यापून टाकणारं दृश्यआजही माझ्या मोबाईल मध्ये आहे, कॉम्प्युटर मध्ये आहे. तिथं मी स्तब्ध होऊन गेले. ती मौनी अवस्था होती. इतर कोणीही नसलेल्या त्या चित्रात खूप भाव लपला होता. तिथं शब्दांची गरज उरली नव्हती. प्रदर्शनातल्या सगळ्या चित्रांची वलये मनात उमटत होती, पण आई मुलाच्या नात्याचा गंध, रंग घंटीचास्वर वाऱ्याच्या झुळुकेबरोबर शरीराला, मनाला बिलगत होता,त्या मौनी अवस्थेनं मला वेगळ्या अर्थानं वरच्या ओळी कळल्या गेल्या वीस- बावीस वर्षाच्या काळात, (कठीण प्रसंगात )माझं मन आनंदानं फुलून राहिलं ते मुलाच्या डोळ्यातल्या जगण्याच्या लालसेने, त्याच्या स्वप्नांनी, त्याच्या अनेक मागण्याना पुरतं होताना मिळणारं समाधान, नव्यानं बळ मिळवताना माझं मन जाईचं बन होत असल्यानं मला तो अवघड घाट पार करता आला. ह्या ओवीच्या नव्या अर्थानं मला खूप समाधान दिलं

पुलाजवळच्या काटेसावरीनं घातलेल्या, हिरव्या - पोपटी पानांच्या झग्यावर,धूळमातीची साय चढून काटेसावर काळपटली. त्या काळपटल्या पोपटी शेंड्यावर एका चुकल्या लालबुंद फुलानं कितीतरी दिवस तग धरून राहायचं ठरवलं होतं, पण परवा पडलेल्या वळवाच्या सरीने त्या फुलाचं स्वप्न फुलू दिलं नाही. फुलाला झाडावरून ओघळून पार तिकडं रस्त्याच्या कडेला मूठमाती मिळाली होती. फुलाच्या वियोगात सकाळचं देखणं झाड नजरेआड झालं. रोज दिवसानं उगवायचं नाहीतर कुठं जायचं. या भाबड्या प्रश्नाचं उत्तर शोधता- शोधता पन्नाशीला दोन अडीच वर्ष उरलीत. उत्तर सापडलं नाहीच, पण दिवसाचे अट्ठेचाळीस तास व्हावेत असा स्वार्थी कोंब मनात वळवळतोय.जसजसं पुढं सरकतीय तसतसं पूर्वी जे कधीही समजलं नाही, ज्याचा अर्थ जाणून घेण्यात व्यर्थ जीव आंबवला, रात्री जागवल्या दिवसांची माथेफोड केली, ते सगळे प्रश्न चुटकीसरशे निकाली निघत आहेत. जगण्याचे संदर्भ नव्याने लागत आहे. अगदी सोप्या शब्दात सांगू ' आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त आपल्याजवळ आहे,हे ज्यादिवशी कळलं त्या दिवशीपासून व्यर्थ तंगडतोड सपंली. आतापर्यंत लोकांना घसा फुटेपर्यंत सांगून, आक्रस्ताळानं रडून-भेकून, भांडून तंडून, अपमान करून- करवून, प्रसंगी तहानभूक विसरून- नाहीतर भरपेट हादडून, कधी मनासारखं तर कधी मनाविरुद्ध जगून, जागून भारंभार पुस्तकं वाचून, योगा- मनशांती शिबिरं करून जे हातातून निसटत होतं ते अचानक लक्ख प्रकाशासारखं समोर आलं. ' बाई गं! जे कळायला तुला पन्नाशीपर्यंत यावं लागलं, त्या ज्ञानेश्वरांना ते अवघ्या चौदा पंधराव्या वर्षी कळलं, ते कळून त्यांनी स्वतःला कमळवून (कमळवणं हा शब्द बाईंचा )जग सोडलं, आणि गेली कित्येक शतकं ते इतरांच्या बुद्धीपालटाची वाट पाहत आहेत,. तू काय केलं? सुरुवातीलाच जे पळत सुटली ती वाटेत थांबणंच नाही. सोळा सतराव्या वर्षी काय काय डोक्यात होतं ते पूर्ण करेपर्यंत पन्नाशीचं बोट धरायची वेळ आल्यावर तुला सगळ्या काथ्याकूटाचा अर्थ लागला आणि आज मागं वळून पाहताना घडलं ते सगळं फोल वाटतं. होतं बाई असंच होतं शहाणपण हे असं हातभर लांब असतं आणि आपण गाव पालथं घालतो. तर मुख्य मुद्दा होता झाड आणि फुलं. अलीकडं हे असं होत आहे. मूळ विषय बाजूलाच राहतो आणि भलतेच फाटे फुटतात.तर परवाच्या वळिवानं झाडमाथ्यावरलं फुल नेलं असलं तरी हिरव्या रंगानी रंगलेल्या , पावसाच्या सरींनी तकाकलेल्या आनंदी झाडावर सूर्यास्ताच्या गुलाबी प्रकाशाचं पांघरून पाहून मनाची मरगळ मुकाट्यानं चालती झाली. झाडाखाली टेकून जोरदार सुटलेला वारा अंगाला लागल्यावर जरा हुरूप आल्यावर विचाराला लागले. महिन्या दीड महिन्यापूर्वी जेव्हा झाड गच्च फुलांनी बहरलं होतं, सकाळच्या कोवळ्या उन्हात, चुटपुटत्या थंडीत देखणं दिसायचं, लेकाला दहादा विनवून ही झालं की फोटो काढ, लेक म्हणाला 'रोज सकाळ संध्याकाळ तर तिथं उभी असते, परवा मित्रानं मला विचारलं', ' कारे आई बरी आहे ना'? झाडाला टेकून उभी होती म्हणून विचारतो. मित्राला मी चुकवला. तुलाही काही म्हंटल नाही ते पुरेसे नाही का ? मी मान हलवली. मुलाच्या म्हणण्याला न बोलता मान हलवण्याचे क्षण आले की समजावं आपण त्या टोकावरून या टोकावर आलो आहे. त्याच्या जन्मापासून ते आता त्याचं लग्न लाऊन द्यायच्या वयापर्यंत येतानाच्या प्रवासात आई आणि मुलगा दोघही पुढं निघून आलो. तुम्ही म्हणाल त्यात काय वेगळं आम्ही पण गेलोच की तुमच्या पेक्षा वेगळं, तुमच्या पेक्षा अडचणीत आनंदात. प्रत्येक बाईचं 'आईपण' वेगळं असतं. मुलं जन्माला येतात, वाढतात, मोठी होतात मार्गी लागतात. या सगळ्या प्रवासात दिसामाजी 'आई' बदलत जाते. कोण असते 'आई' इथं स्वामी तिन्ही जगाचा, आणि प्रेमस्वरूप आई यापेक्षा आपल्यात दडलेली वेगळी 'आई' मला शोधता आली. . मला या आईपणाच्या प्रवासात कळलं की आईच शिक्षित अशिक्षित असण्यापेक्षा आईनं सुज्ञ असणं वेगळं ते मुलाला जास्त हिताचं.

आता परत 'दुर्गाबाई, बाईंचं बहुतेक लेखन वाचून झालं आहे, काही कायमस्वरूपी झेरॉक्स करून स्वतःजवळ ठेवलं आहे, काही पुस्तकं विकत घेतली, काही रद्दीतून मिळवली आणि सगळ्यात मोठं ऋण आहे ते पुणे नगर वाचनालयाचं. पुस्तक वाचायचं राहिलं ते त्यांनी अनुवाद केलेलं थोरोचं पुस्तक . पुणे मराठी ग्रंथालय(शनिवार पेठ ) इथं रेफरन्स साठीची आवृत्ती, आहे. पण अर्ध्या तासापेक्षा जास्त तिथं बसून वाचता येणार नाही. नोट्स काढता येणार नाही.एका पानाची झेरॉक्स दहा रुपये. पुस्तकाची पाने जवळ जवळ अडीचशे -पाऊणे तीनशे (देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मणी मन विचार करून काय करणार जवळपास सत्ताविसशे रुपये एका पुस्तकासाठी खर्च करायचे धाडस होईना ) ग्रन्थपाल बाईंनी त्यांना शक्य तितका अपमान केल्यावर मी तो नाद सोडला, म्हणजे फक्त त्या लायब्ररी पुरता, ते पुस्तक मी मिळवणार आहेच. योग थोडा लांबला आहे इतकंच. ही संपूर्ण चार वर्ष मी बाईमय झाले. मी ती उरली नाही. जी यापूर्वी होते. मी मलाच अनोळखी झाले आहे. लौकिक अर्थानं मी आहे (जिवंत आहे , कर्तव्ये आहेत पूर्ण करायची आहेत पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं असं काही मला सापडलं आहे ती दिशा मला बाई देत आहेत. वारंवार देत आहेत) परवा ७ मे बाईंचा स्मृतिदिन, त्यादिवशी बाई सकाळी स्वप्नांत आल्या. वाचून दाखवत होत्या,काहीतरी शोधत होत्या. हे वाचून बघ, ते सांगतांना ती आकृती धूसर झाली. मी फक्त मुलाला सांगितलं, मुलगा म्हणाला बाईंच्या पुस्तकांसाठी वणवणत होती, ती आस लागलेली व्यर्थ गेली नाही बाई भेटल्या तुला.

परवा रीमाताई गेल्या. कोणी लागत नव्हत्या.पण कसं असतं कोणी लांबवर जगण्याला दोन हात करतं. ते आपल्यासारखं आपल्याला वाटतं मग ते लांब असूनही आपल्या जवळचं होऊन जातं. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं "दुर्गा बाईंना मी भेटले होते, तशा आता त्या माझ्या सोबत आहेत, निराशेच्या क्षणी मी त्यांची पुस्तकं वाचते जगण्याचं बळ येतं". हे खरंच आहे रीमाताई दुसऱ्यांदा तुमची मुलाखत ऐकतांना मी तुम्ही आणि दुर्गाबाई एका समेवर आलोत.तुम्ही असतांना जे सांगणं शक्य झालं नाही. पण आता मला काय वाटतं हे तुम्ही दोघी जिथं आहात तिथं नक्की पोहोचलं.

सुमारे चार वर्ष पानंनपान वाचून काढल्यावर, प्रसंगी धीर सुटल्यावर आता काही तिथपर्यंत मी पोहोचत नाही असं वाटल्यावर. ' प्रासंगिका' त बाईच्या या ओव्या मूळ स्वरूपात भेटल्या. त्यांना लागलेल्या ओव्यांच्या मूळ अर्थाच्या जवळपास मी पोहोचले होते. त्या ओव्या अशा होत्या
गाणं मी गायिलं I आपुल्या मन्नात II
जाईच्या बन्नात I नाद गेला II

चाल परिचित. पण मनातल्या पालटून आलेल्या त्या गाण्याचा नाद जाईच्या बनात गेल्याचे ते वर्णन ऐकून नादाची आणखी एक प्रतिमा मनात साकारली. नादाला हिरवा रंग आला. त्यानंतर त्यांचा रंग पांढरा पांढरा होत चालला, हिरव्या नादाच्या तंतूंना पांढरी जरतार लाभली. मध्ये मध्ये जाईची पाने, वेलांट्या नि पांढरी नाजूक फुले उठली फुलांचा गंध घमघमला. नादाला रंग, रूप आलं. ध्वनीचा कायापालट झाला. इथं गाता गळा दुय्य्यम होता. जे कुणी ही ओवी म्हणेल त्याला या नादातून अनेक प्रतिमा मिळणार होत्या. चित्रं मिळणार होती. पहिली होती नाद - प्रतिमा, दुसरे होते नाद चित्र. पहिली गोष्ट मला अप्राप्य होती पण रंजवणारी होती. दुसरी मला रंजविणारी नव्हती. कारण मीच तिच्यात शिरून तिचा अर्क घेऊ शकत होते. गातागाता वेगळी चित्रं तिच्यातून मिळवीत होते.'' गाणारी मुलगी. एकटी. चाहूल घेते. उन्ह असते दुपारचे, ते ती मानीत नाही. कारण जाईच्या कळ्या आता फ़ुलूफुलु करत असतात. जाईच्या वेलांट्या खाली- वर होतात. पाने हिरवी होतात. उन्हाने सोनेरी दिसतात. मुलीला जाईच्या त्या बनात कुणीतरी असावेसे वाटते. मनात ती गाणे रचते, ओठ ते म्हणून जातात. मुलगी जाणते की तो मनातला नाद जाईच्या बनत पोहोचला आहे. आणि -आणि - आणि ? इथं अगणित पर्याय निघतात, प्रीतीचे, रतीचे आणि दीर्घ विरहाचे. निराशेचे, मृत्यूचे आणि स्मृतीचे की सारी चित्रांची वलये गाण्यातल्या गाद- प्रतिमेला धरून राहिली.

या लेखाचा शेवट करताना नाद निर्मितीचा संबंध शिवाच्या पिंडीशी आणि डमरूशी जोडला तो असा " शिवाच्या स्थाणुरूप पिंडीत जसे निर्मितीचे रहस्य असते. तसेच नादाचे रहस्य गूढ स्तब्धतेत असते. बाई पुढं म्हणतात ' शिव नटेश्वर म्हणजे नृत्याचा प्रवर्तक आहे. संगीतशास्त्राचाही तोच प्रणेता आहे असे आमची कलापरंपरा सांगते. जेव्हा 'प्रणवा' ची म्हणजे आद्यतम नादबिंदूची कल्पना शिवाशी संलग्न होते. जेव्हा बिंदू आणि कला याच्या आकृती त्या प्रणवाशी उर्फ ओंकाराशी भिडतात. तेव्हा माझ्या मनात समग्र भाषा- संगीताशी सर्वसमावेशक नादतत्व व नादप्रतिमा उभी राहते. ती अशी शिव तांडवनृत्य करतो आहे. विलय आणि नवउत्पत्ती यांच्या मधली अवस्था आहे. शिवाच्या हातात डमरू आहे. हेच नादबिंदूचे प्रतीक, डमरू चा आकार दोन्ही बाजूंनी पसरट, कुठल्याही कलेपर्यंत पसरत जाईल इतका अमाप पसरत आहे. मधला भाग बिंदुमात्र निमुळता आहे. हाच ध्वनीचा स्थितीकाळातील आकार.

डमरू हलते ते अर्धवर्तुळाकृतीत, चंद्रकोरीच्या आकृतीत, ते हलले की एक नाद होतो. तो मरतो आणि फिरुनी दुसरा नाद उठतो. तो मारतो असे सतत नादाचे जनन- मरण आवर्तनात चालू राहते. गतीमुळे आवर्तन जुळतात, नादाचा संकेत होतो. एक ध्वनी उमटून नाहीसा झाल्याशिवाय दुसरा ध्वनी जनमत नाही. अशा आवर्तनातून केवळ नादानुसंधानाने शब्द जन्म घेतो. एक शब्द मारतो तेव्हा दुसरा शब्द तयार होतो. शब्दाच्या मरणाने अर्थानुसंधान भंगत नाही. म्हणून वाक्य जन्माला येते. वाक्यांच्या जननमरणातून भाषा तयार होते. स्थिरावते . हाच चलाचा व स्थाणूचा डमरूत भरलेला नादसंभव गाण्यालाही लागू पडतो. संगीतात अर्थाहून भावानुसंधान व माधुर्यव्यंजन हे अधिक बलवत्तर असते. म्हणूनच नादाची आमच्या संस्कृतीतली सर्वात समर्पक आकृती डमरूची आहे. समर्पक म्हणण्याचे कारण डमरू हे वाद्य नाद व ठेका असलेल्या वाद्यांत आदिम म्हणायला हरकत नाही. कारण त्यात नाद, गती ताल, त्याचप्रमाणे उत्पती, स्थिती, लय या अवस्थांचेही प्रतीक सामावते. ध्वनीच्या प्रतिमेचे जनक डमरूच म्हणायला हरकत नाही आणि समस्त नादक्रियेचा प्रवर्तक म्हणून शिवाचा आकृतीबंध सार्थ ठरतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काही सुविचारांचे अर्थ अचानक मनात तेजाळतात - हे सत्य आहे. माझ्याकरता रुमीचा एक सुंदर विचार असच नवा अर्थ हृदयात प्रकटवुन गेला होता.

“Somewhere beyond right and wrong, there is a place. I will meet you there.” ― Rumi

याचा काही वर्षांपुर्वी मी लावलेला अर्थ असा होता की एक स्थूल किंवा सूक्ष्म जागा आहे, जिथे योग्य-अयोग्य असे द्वंद्व नाही. मृत्योपरांत त्या जागी तू आणि मी भेटणार आहोत.
काही वर्षांनी मला जो अर्थ लागला तो असा होता - ती जागा बाहेर कुठेही नसून, आपल्यातच आहे. कल्पनेत तर आपण भेटू शकतो. आणि कल्पनेच्या फँटसीच्या जगात कुठे असते योग्य-अयोग्य! तिथे आपल्याला हवे तसे जीवन जगण्याचा पूर्ण हक्क असतो. आपण कल्पनेमध्ये भेटू.
.
मला निदान ७५-८० वर्षे जगायचे आहे ते शरीराचे चोचले पुरवायला नाही तर नवेनवे अर्थ जाणून घ्यायला, १० वर्षात आपल्यात किती बेफाम फरक पडतो. किती तरी प्रगल्भ होतो आपण.
माझी सध्याची फिलॉसॉफी आहे - 'वहाते रहा. साचलेपणा हे पाप आहे. कुठेही अडकू नकोस. वहाती रहा.'
.
तुमचे मनस्वी चिंतन फार आवडले. खूपच सुंदर लिहीले आहेत. विशेषत: नादाचे रहस्य स्तब्धतेमध्ये आहे हे किती खरे आहे. जर एक विराम, मौन, शांतता नसती तर फक्त नादच नाद कानावर कोसळत राहीला असता आणि मग कशालाच काही सुसंगती लागली नसती. फक्त एक गोंगाट, कोलाहल माजला असता. २ शब्दांमध्ये ठहराव आहे तिथे अर्थपूर्णता आहे.

त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वशट्‌कारः स्वरात्मिका ।
सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता| अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषत

- दुर्गा सप्तशती
हे शिवे, तुझे वास्तव्य विशेषत: , न उच्चारलेल्या गूढ शांततेमध्ये, ॐ काराच्या बिंदूमध्ये आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह.... किती सुंदर अर्थ लावलाय.शुचि आपल्याला प्रगटवून व उजळवून टाकणारं असतं हे सारं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक असाच विचार मनाला शांती देउन गेलेला होता - की प्रत्येक व्यक्ती , आपल्याहून भिन्न जीव हा आपण असू शकलो असतो. तो आपला निसटलेला पर्याय आहे. I could very well have been that person. मग आपण न्यायनिवाडा करणारे कोण?
.
पण अजुन या माझ्याच विचाराच्या तळाशी पोचायचे आहे. मला अजुन हा विचार तसा संदिग्धच आहे. उदाहरणार्थ एक मन विचारते - पण त्या व्यक्तीने निवडलेले पर्याय तू निवडले असतेस का? - बलात्कार. मॉलेस्टेशन, खून .... मग तू कशी काय माफ करु शकतेस, तू कसे काय म्हणु शकतेस की तू त्या व्यक्तीच्या जागी असतीस? ती व्यक्ती आणि तू समान पातळीवरच्या कशा? दुसरे मन म्हणते - पण जर तू ती व्यक्ती असतीस, तर, बुद्धी, मन, कर्म, गुणसूत्रे यानुसार तुही तशीच वागली असतीस की. पण मग मी त्या विचाराला विरोध करते ............
मला सांगता येत नाही पण हा सुष्ट-दुष्ट झगडा मनात फार चालतो. या जजमेंटल विचरांमधुन सुटकाच नाही. द्वंद्वाचा वीट येतो. का नाही शांती मिळत असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा व्यक्तींनी निवडलेले पर्याय जेव्हा आपल्यासमोर काम म्हणून येतात तेव्हा ते फार वेगळं असतं. व्यक्तीनं गुन्हा केला आहे म्हणून त्याच्याकडं केवळ गुन्हेगार म्हणून पाहता येत नाही, त्याच्या गुन्हा करण्याच्या प्रवृत्तीला आधी कित्येकांनी खतपाणी घातलेलं असतं, बलात्कार मॉलस्टेशन, खून हे पर्याय म्हणून सहज स्वीकारता येतात का ? नाही मुळीच नाही अशा अनेक व्यक्तींची कहाणी फाईल म्हणून वाचायची असते तेव्हा फक्त हळहळ उरते, त्या क्षणी जर तोल गेला नसता, किंवा धीर ठेवला असता तर. नाही होत असे व्यक्ती अगतिकत होतो रते. ? थोडंसं विषयांतर होत आहे पण विषय निघाला म्हणून राहवत नाही, सतरा वर्षाच्या मुलीची फाईल माझ्याकडं आली होती, एखादी ब्ल्यू फिल्म बरी इतकं सगळं ओंगळ होत ते, साध्या घरातल्या मुलीचे, सगळ्यांबरोबर संबंध होते, त्यात आत्येमामे भाऊ,मावसा, काका, मामा, जिमचे शिक्षक, घरचे नोकर, ड्रायव्हर, सगळे मुलगी नुकतीच दहावी झाली, आणि तिचं समाजातल्या चालीरुढी प्रमाणे लग्न झाले. सहा महिने लग्न ठिकलं प्रकरण न्यायालयात गेलं, कौन्सलिंगची पूर्व तयारी म्हणून तिचा माझा सहवास आला, तेव्हा ती म्हणाली हे इतकं सगळं चालू राहिलं ते माझ्या आई वडिलांमुळं माझी आई आणि वडील त्यांच्या वेगवगळ्या पार्टनरला घेऊन घरी येत असत. मग मी केलं तर काय बिघडलं. शरीरसुख फक्त एकाची मक्तेदारी आहे का ? मी निरुत्तर. तिला मिळालेलं सासर, मुलगा खूप साधी माणसं. मुलगा माझ्याकडं आला त्यानं लिहून दिलेलं भयावह होतं. इथं मी सुद्धा तुझ्यासारखा विचार केला. मी हा पर्याय स्वीकारला असता का ? इतकं दुर्लक्ष माझ्याकडे झालेलं असताना, मला बाहेर प्रेम मिळत असेल तर आलेलं उत्तर संधिग्ध होतं. नाही येत माफ करता ही बाजू खरी असली तरी दुसरी बाजू खूप वेगळी असते. अन्याय करणारा हा अन्याय सोसणाऱ्या पेक्षा अगतिक असतो. असं मला वाटतं. बलात्काराच्या एका कृतींला समोर जाऊन किंवा करून आरोपीच्या पुढच्या आयुष्याचं काय हा प्रश्न उरतोच. तरीही त्यानं हा पर्याय स्वीकारायला नको होता आपण त्या जागी असतो तर केवळ फासे पलटले आणि आपण अलीकडच्या घरात आहोत.असे आरोपी आतून हललेले असतात, चुकीचा भार सोसवत नसतो, आयुष्य नरक झालेलं असतं ' आ अब लौट चले' असं कोण म्हणणार. मग अशातूनच मग्रुरी येते, एकामागोमाग अनेक गुन्हे घडत जातात. होतं ते निरागस पण पहिल्याच कृत्यात जळून राख होते. बाकी यावर एखादं पुस्तक लिहून होईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरच!! जर गुन्हेगार आतून नरक झालेला असेल तर मला फार फार आवडेल. अतिशय आनंद होइल. 'हिट & रन' या ज्या मोकाट सुटलेल्या पशूतुल्य लोकांंचे जीवन बर्बाद झालेल असेल तर छानच. हां आता त्या गुन्हेगाराला कशातून जावं लागलं आणि म्हणून तो गुन्हेगार झाला - याच्याशी खरच कर्तव्य नाही. कर्तव्य नाही असे मी म्हणू शकते कारण तुम्ही म्हणता तसे खरच माझ्यासमोर काहीही (फाइल आदि) आलेले नाही. पण माझी मन:शांती ज्या व्यक्तीमुळे कायमची हरवली, ती सडत असेल तर उत्तमच..
त्या मुलीची कथा दारुण आहे मात्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुभांगी लेख लिही तुझ्या व्यवसायातील अनुभवांवर. खूप पोटेन्शिअल आहे व तुला लिहीण्याचे तंत्र/कला अवगत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोप्पं काम सांगितले हा तू.... पण तू मी लिहीलेलं.वाचतेस याचा मला आनंद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile सगळेजण वाचत असतील मी व्यक्त होते शुभांगी. पण हळूहळू प्रतिसाद देतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुभांगी हा लेख वाच - https://www.misalpav.com/node/24897 ( मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने - दशानन)

मैं तुझे फ़िर मिलूंगी
कहाँ किस तरह पता नही
शायद तेरी तख्यिल की चिंगारी बन
तेरे केनवास पर उतरुंगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
खामोश तुझे देखती रहूंगी

यामध्ये मीलन, उत्कटता, प्रेम आदि सुरेखच निरुपण दशानन यांनी केलेले आहे. हा लेख मी वाचला आणि मला अतोनात आवड्ला होता/आहे.
पण जेव्हा तू प्रोजेक्शन म्हणजे आरोपणाची, जंगिअन व्याख्या वाचशील -= Projection. An automatic process whereby contents of one’s own unconscious are perceived to be in others.
तुला लक्षात येइल, की नात्यामध्ये समोरची व्यक्ती ही कॅनव्हासच असते आणि चित्रकार आपणच असतो. आपलेच अमूर्त मन, त्यातील इच्छा, वासना, आकांक्षा या नानाविध रंगांचे आपण चित्र रेखाटत असतो. आपल्याच अतृप्त इच्छा आपण कदाचित त्या व्यक्तीवरती आरोपित (आरोपण) करत असतो. जरी अगदी जुजबी वाचले असले तरी जे काही जंगिअन फिलॉसॉफि बद्दल मी वाचलेले आहे (नॅन्सी फ्रायडेची पुस्तके - माय मदर & मी, किंवा आंजावरचे लेख किंवा जंगचे एक बायोग्राफिकल पुस्तक), मला त्यांची फिलॉसॉफी पटते.

अमूर्त मन हे अथांग असते. याचा ज्योतिषातील कारक आहे नेपच्युन. नेपच्युन अमर्यादता, अथांगता, इगोच्या मर्यादा विरघळणे आदिचा कारक आहे. त्यामुळे - मेडिटेशन, कला, सिनेमा, ड्रग्ज आदिंचा तो कारक आहे, ज्यात व्यक्ती स्वत:ला विसरुन जाते. कविमनाची अमृता स्वत:च्या अमूर्त मनाशी किती संलग्न होती ते या उदाहरणावरुन कळून यावे.

.
पण या कवितेचा अर्थ कळायला, ४६ वर्षे जावी लागली खरी. असो. आज सहीत हीच व्याख्या दिलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वाचते... पण या कवितेचा अर्थ कळायला, ४६ वर्षे जावी लागली खरी. असो. आज सहीत हीच व्याख्या दिलेली आहे. ......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0