शाहू मोडकांशी वार्तालाप- एक आठवण

शाहू मोडकांशी वार्तालाप

पुण्यात सुभाषनगर मधून चाललो होतो तेवढ्यात एक जुन्या पिढीतले वयस्कर गृहस्थ भेटले. अशीच ज्योतिषाच्या सर्व्हेनिमित्त ओळख. "तुम्ही परवा शाहू मोडकांच्या व्याख्यानाला आला होतात का? " मी नाही म्हणालो. मुंबईत होतो मी. " फार सुंदर झाले व्याख्या्न. काय गाढा व्यासंग! त्यांनी बोलाव आणि महाभारतातल्या श्रीकृष्णाने ऐकावं. ज्योतिषशास्त्राचं फार चांगलं विवेचन केलं. अध्यात्माची जोड हवीच तरच ते ज्योतिषशास्त्र. तुम्ही भेटा की मुंबईत. शिवाजी पार्कला राहतात. " मी नाही म्हणलं तरी भारावून गेलो. " हं आणि फोनवर अपॉइंटमेंट घ्या. त्यांना वेळ नसतो. " मी बरं म्हणालो. " आणि डायरेक्ट क्रॉस करू नका. त्यांनाच बोलू द्या. नाही तर तुम्ही सुरुवातीलाच तुमचे मुद्दे मांडाल. " मी ठीक आहे म्हणालो आणि त्यांचा निरोप घेतला.

मुंबईत आल्यावर बसल्या बसल्या फोन मारला. या म्हणाले उद्या अकरा / बारा वाजता. महापौर निवासाजवळ राहतो मी. गेलो दुसऱ्या दिवशी. घुसलो आत. "या! तुम्हीच का? प्रकाश घाटपांडे? " मी हो म्हणालो. "बसा! आलोच मी. " असं म्हणून आत गेले. मला वाटलं चहा वगैरे काही सांगताहेत की काय? पण तसं काही घडलं नाही. हात पुसतं बाहेर आले. मला ही तसा उन्हाचं चहा नकोच होता म्हणा!

सुरवात कशी करावी समजेना. मी म्हणालो " परवा तुमचे पुण्यात व्याख्यान झालं. जमलं नाही मला यायला. म्हटलं तुम्हालाच भेटावं. तुमच्या कडं ज्योतिष शास्त्र आहे अशा दृष्टीने काही प्लस पॉईंटस आहेत का? असं बघावं. बहुचर्चित विषय आहे ना? "

ते जरा गूढपणे खाकरले. " अहो हे काय विचारणं झालं? ते शास्त्रच आहे. तुम्ही विज्ञानयुगात वावरता. मंगळावरचं यान तुम्ही पृथ्वीवरून कंट्रोल करता. करता की नाही? ’ मी मान डोलावली.

" पृथ्वी, ग्रह सगळे सूर्याभोवती फिरतात. अणूंचं पण तसंच आहे. केंद्रा भोवती इलेक्ट्रॉन फिरतात. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड. रिलेटिव्हीटी फार थोड्या लोकांना कळली आहे. ही सर्व आदिशक्ती आहे. आणि भाग्य भाग्य म्हणजे तरी काय हो? " तुमचे नशीब मी म्हणालो. " अहो नशीब काय नशीब? "

मी एव्हाना काही म्हणण्यासाठी आलेलो नाही याची मला जाणीव झाली.

" तुमची पूर्वकर्मानुसार असलेली नियतीची साथ. मी एवढे प्रयत्न करतो पण मला प्रयत्नाप्रमाणे यश येत नाही. तो साला माझ्यापेक्षा कमी प्रयत्न करून माझ्या पुढं जातो. जातो की नाही? मी प्रयत्न केले नाहीत का? "

"पण परिस्थितीवर अवलंबून असतं ना? " मी म्हणालो.

"परिस्थिती म्हणजे तरी काय? " मी आता गप्प राहायचे ठरवले होते. कारण परिस्थितीनुसार मला तेवढाच पर्याय होता.

"तो अन मी समजा एकाच धंद्यात आहोत. परिस्थिती एकच आहे. धंद्यात डिमांड एकच आहे. मी त्याच्या पेक्षा वेगळे काही करत नाही. पण तो पुढं जातो. शेवटी तुमच्या प्रयत्नांना काहीतरी लिमिटेशन्स असतातच ना! नाही तर सगळेच किंग झाले असते. हेच तुमचे नशीब. कर्मगती...

" मघाशी तुम्ही ज्योतिषशास्त्राच्या शास्त्रत्वाच्या पुराव्या बाबत काहीतरी सांगणार होतात. " मी आपलं मध्येच बोलण्याचा दुबळा प्रयत्न केला.

" पुरावा? बरोबर! तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. डोळस वाद स्वीकारला पाहिजे. तुम्हाला उदाहरण देतो बसा. "

मी बसलेलोच होतो. ते आत गेले. आतून ’धर्मयुग’ चा जुना अंक आणला. झेरॉक्स कॉपी पण आणली. ती माझ्या हातात दिली. "वाचा इथून".

ते आत गेले. मी वाचत बसलो. त्यात अनेक ज्योतिषांनी इंदिरा गांधींच्या भविष्या बाबत लिहिलं होतं. काहींनी लिहिले होते की अनिष्ट काळ. आता इंदिरा गांधीचं राजकीय आयुष्य संपलं. एस के केळकरांनी लिहिले होते की निवडून आल्या तरी परत सत्तेवर येणे अशक्य. शाहू मोडकांनी लिहिले होते त्या परत सत्तेवर येणार हा काही काळ अनिष्ट आहे एवढेच. मी वाचून बसलो होतो. थोड्या वेळाने ते आले. मी मख्ख पणे बसलो होतो. वाचलंत? मी हो म्हणालो. "वाचलंत! " माझ्यावर नाही म्हटलं तरी उखडलेच होते. मी आपलं काय वाचलं ते सांगितलं.

" हॅ! तुम्ही वाचलंच नाही. तुमच्या चेहऱ्या वरून लगेच कळाल असतं. (खरं तर त्यांना थोबाडावरून असं म्हणायचं असावं पण आपल्या शिष्टाचाराच्या मर्यादा! ) तुम्ही वाचलं असतं तर ताडकन उठून कॉंग्रॅच्युलेशन दिली असती. ग्रेट म्हणाला असतात. नववी दहावीला असाल ना त्यावेळी? "

मी हो म्हणालो.

"म्हणजे समजत होतं. " " हे एक उदाहरण झालं पण.. " मी काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला. "उदाहरणं" परत उखडले. याच महत्त्व तुम्हाला कळालच नाही. अहो हा प्रुफ आहे प्रुफ. ज्या काळात बाईला कुणी ही फाशी द्यावं अशी परिस्थिती होती त्या काळात मी असं भविष्य वर्तवलं हे काय उदाहरण झालं? धिस इज ग्रेटेस्ट मिरॅकल इन धिस सेंच्युरी. काय परिस्थिती होती त्या काळात हे भविष्य बरोबर येण्याची? " बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण समजा एखाद्या सामान्य माणासाने कुंडली दिली अन विचारल की.. " "समजा अन एखाद्याच कशाला तुमचं बोला? "

"बर ठीक आहे मी माझी कुंडली देतो त्यावरून तुम्ही ढोबळ मानाने वर्तमान काळ सांगा" मी म्हणालो.

" तुम्ही कोण? अहो एवढ्या मोठ्या बाई! देशाच्या पंतप्रधान. त्यांच भविष्य हा एवढा मोठा प्रुफ असताना तुम्ही कोण? माझ भविष्य बरोबर आलं इतरांच चुकलं. का चुकलं? माझ का बरोबर आलं? काहीतरी विलक्षण पद्धत असली पाहिजे ना? तुम्ही असं विचारायला पाहिजे होतं की तुम्ही कुठली पद्धत वापरली? "

" बरं तसं विचारतो. एस के केळकर किंवा इतर मोठे ज्योतिषी सायन पद्धती वापरतात. काही निरयन वापरतात. तुमची.. "

" परत तेच! अहो कसलं सायन निरयन घेउन बसलात? माझी पद्धतच वेगळी. ग्रह नक्षत्रांची ओळख असायला पाहिजे. तुम्ही खूप तयारी करायला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. " तुम्ही सांगातर खरं तेवढी ज्योतिषाची पार्श्वभुमी मला आहे. मी म्हणालो. " कुंडलीनी! नाही समजायचं! फार मोठा अन वेगळा विषय आहे. "

मग त्यानंतर थोडी स्तब्धता! मग मी ज्योतिषाच्या आव्हानाबाबतचा विषय काढला. "कुंडली वरून स्त्री का पुरुष? जिवंत का मृत? या आव्हानाबद्दल तुमचे मत काय? "

"परत तेच! अहो काय स्त्री अन पुरुष घेउन बसलात? मी तुम्हाला एवढा मोठा प्रूफ दिला. खरतरं तुमचे प्रश्न तिथेच संपायला हवेत. "

त्यांच्या मते मी यावर किंकर्तव्यमूढ, कमीत कमी दिग्मूढ तरी व्हायला पाहिजे होतं. पण मी नुसताच मूढ ठरलो.

" अहो मी तुम्हाला सोन देतोय अन तुम्ही पितळ मागताय? एवढा मोठा प्रुफ तुम्हाला कोणी देईल का? "

"तुम्ही लोकसत्तात यावर लिहिलं होतं ना? "इति मी.

" लिहिलं म्हणजे उत्तर दिलं होतं त्या नरेंद्र दाभोलकराला. पन्नास कुंडल्या विश्लेषण करत बसायला मला काय उद्योग नाहीत का? " पन्नास नाही हो फक्त दहाच, हे काय माझ्याकडे त्या लेखाचे मुद्दे आहेत ना? " मी पोतडीतून लेख काढायचा प्रयत्न करू लागलो.

" राहू द्या तुमच्याच कडे! त्यांना म्हणाव तुमचे नसलेले पॉईंट पण सांगतो व त्याची उत्तरे पण देतो. काही तरी चाईल्डीश लिहायचं आपलं झालं"

"बरं ते तुमचे इंदिरा गांधीचं भाकित केलंत ती पद्धत तर काही सांगाल की नाही? " इति मी.

" सिक्रेट! ते सिक्रेट आहे म्हणून तर माझी पद्धत वेगळी! "

" मग ते सिक्रेट तुमच्याच बरोबर ठेवण्याचा विचार आहे का? इतरांना त्याचा लाभ नको का? " इति मी.

" तसं नाही! मी त्यावर लिहिणार आहे सवड मिळाली की पुस्तक काढणार आहे. माणसाला काहीना काही चिंता असतात. इच्छा असतात. त्याप्रमाणे घडतेच असं नाही. तेव्हा भाग्याची साथ कितपत आहे अस बघायला लोक ज्योतिषाचा सल्ला विचारायला येतात. हात म्हणजे interpretation of your cerebellum. हे तुम्हाला कुठल्या धर्म ग्रंथात किंवा पुस्तकात सापडणार नाही.you are lucky. म्हणून तुम्हाला हे माझ्याकडून ऐकायला मिळतय. बरं तुमचा हात बघू"

मी माझा हात त्यांच्या ताब्यात देउन टाकला. त्यांनी थोडावेळ तो बघितला आणि माझा हात मला परत देउन टाकला.

" आलं लक्षात सारं! "

काय आलं लक्षात मी आपलं भांबाउन विचारलं. "हेच एकंदरीत तुमच्या बद्दल.

" काही तरी सांगाल की नाही तुमची आठवण म्हणून. "

" अहो मी प्रोफेशनल आहे. सांगतो त्या वेळेचे पैसे आकारतो. तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर भेटा मला"

" छे! छे! काही प्रॉब्लेम वगैरे नाही मला. " मी म्हणालो.

"काहीच नाही? एखाद्या मुलीवर प्रेम वगैरे.. "

" छे छे तसलं काही नाही "मी ओशाळून म्हणालो.

"पुरुष ना तुम्ही? " मी चमकून बघितले. " तुमचा हक्कच आहे प्रेम करण्याचा! अन वय काय तुमचं? एकही मुलगी आवडली नाही तुम्हाला? "

"तशा खुप आवडतात हो पण आवडून काय उपयोग सगळा आपला एकतर्फी मामला" मी जरा धिटावलो.

" हं हेच ते. एखाद्या तरी मुलीशी फ्रेंडशिप असावी. ती का बोलत नाही हे तरी जाणून घ्यावं"

"चालायचंच, बरं मी निघतो आता फार वेळ घेतला तुमचा. आपल्या चर्चेबद्दल अत्यंत आभारी आहे"

" ठिक आहे या पुढच्या वेळेला कधी तरी"

"ओके"

field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

वाचून फारच मजा आली. बेष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

वर्षानुवर्षे देवाचा रोल केल्यामुळे आपण सर्वज्ञ आहोत असे वाटणे स्वाभाविक आहे.
अवांतरः माझ्या आठवणीप्रमाणे इंदिरा गांधींचे नांव न घेता त्यांच्या मृत्युच्या एक वर्ष आधी, चित्रलेखा' या गुजराथी साप्ताहिकात ऑक्टोबर ८४ ला एका अतिमहत्वाच्या नेत्याचा खून होणार आहे अशा प्रकारचे भविष्य प्रकाशित झाले होते. त्याची आमच्यात चर्चाही झाली होती. ३१ ऑक्टोबर ८४ ला सकाळी ८ वाजता कंपनीच्या कँटीन मधे चहा घेत असताना माझे मित्र माझी चेष्टा करत होते, 'आज महिनेका आखरी दिन है, कुss च बी हुवा नै!' असं माझा एक सौदी मित्र म्हणाला सुद्धा ! नंतर त्याचाच इंटरकॉम वर फोन आला. तेरा बविष सच हुआ रे! आणि आम्ही सुन्न झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही केंव्हाची गोष्ट आहे? (वर्षानुवर्षे देवाचा रोल केलेले) अभिनेते शाहू मोडक यांचे निधन होऊन एकोणीस - वीस वर्षे झाली. की हे शाहू मोडक वेगळे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही जुनी आठवण आहे. साधारण १९८७ च्या आसपास ची गोष्ट आहे. अभिनेते शाहू मोडक हेच भविष्यवेत्ते होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पकाकाका जेव्हा वयाने तरूण होते तेव्हा बर्‍या(च) मुलींव्यतिरिक्त अशा रोचक व्यक्तींनाही भेटायचे हे वाचुन मजा आली Wink

बाकी असे प्रसंग आता करमणूक करणारे वाटत असले तरी ८०-९०च्या दशकांमधे यांचे फार स्तोम होते असे अनेक लेखांवरून वाटते. आता ज्योतिष्यांची जागा बाबा-बुवांनी पुन्हा बळकावली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हात म्हणजे interpretation of your cerebellum

सूडोसायन्स कसं तयार करतात हे लक्षात येतंय आता.

काही वर्षांपूर्वी एका आजोबांनी "आपण मराठी लोकंच संपूर्ण हिंदुस्थानात चांगलं इंग्लिश बोलू शकतो" यावरून मला छळलं होतं त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.