नामाचिये बळे

जेवल्यानंतर खरेतर आता पुन्हा शेतात जायचा कंटाळा आला होता.दिवसभर शेतातून नदीवर फेऱ्या घालून मी भयंकर थकला होतो .वीजमंडळाला दिवसभरात भरपूर शिव्या घातल्या होत्या. का नाही शिव्या घालणार , नदी ते शेत दीड किलोमीटर अंतर पंप चालू करून आलो नि पाटाने शेतात पाणी आले नि एखादा वाफा झाला कि लगेच लाईट जायची मग पुन्हा नदीवर जावे लागे. परत पंप चालू करून आलो कि पुन्हा तेच नुसता वैताग आणला होता ह्या लाईट वाल्यांनी शेजारच्या एम आई डी सीत थोडी सुद्धा लाईट जात नव्हती. आणि बाकी गावांनी आठ आठ तास लोड शेडींग, लोड शेडींग मध्ये लाईट अजिबातच नसते पण इतर वेळीही सारखी ये जा चालू असते. साऱ्या पंच क्रोशीतील शेतकरी जाम वैतागले होते.
यंदा सव्वा एकरात कांद्याची लागवड केली होती. कांदे खूपच चांगले आले होते ऐन भरनीला माल होता. वेळच्या वेळी पाणी देणे महत्वाचे होते. खरेतर भरनीला कांदा आलेला असताना पाणी मोकाट सोडणे चांगले नसते. कांदा सडण्याची भीती असते. पण दिवस भराच्या थकव्यामुळे मी शेवटच्या पाडग्यात पाणी सोडून जेवायला घरी आलो होतो . आणि आता जेवून पंप बंद करण्यासाठी शेतात निघाला होतो.
खरे तर रात्रीच्या वेळी बाहेर पडायला मी भीत होतो. भुतांच्या कथा कादंबऱ्या वाचून माझ्या मनात बऱ्याच भुतांनी जन्म घेतलेला होता. सोबतीला कुणी असेल तर काही वाटत नव्हते. पण एकट्याने जायला जरा भीतीच वाटायची त्यात गावाच्या शिवारात कुठे ना कुठे एक एक भूत तरी होते. आणि ह्या भूतांना जन्माला गावातीलच काही व्यक्तींनी घातलेले होते. आता त्या व्यक्ती हयात नव्हत्या म्हणा.त्या व्यक्ती मेल्या पण भूतांना अमर करून.
मी गेले वर्षभर भीती जरा सोडली होती. कारण गेल्या वर्षी माझे वडील वारले होते. आणि घराची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली होती. त्यामुळे शेतात खूप वेळा रात्री जायचा प्रसंग यायचा सुरुवातीला मी कोणाला तरी बरोबर घ्यायाचो पण सारखे सारखे माझ्याबरोबर यायला माझे मित्र कंटाळले. मग मी स्वताच धाडस करून रात्री शेतात जाऊ लागलो. छातीत धडधड व्हायची. पण तसेच देवाचे नाव घेऊन मी भीतीला दूर सारण्याचा प्रयत्न करायचो.
मी एक छोटी ब्याटरी बरोबर घेतली होती. कारण रात्री शेतात पायाखाली बघायला बरे पडते.गावात सर्व बागायती क्षेत्र असल्यामुळे नि गारव्यामुळे सापांची मोठी भीती असायची. म्हणून पायापुरता का होईना ब्याटरीचा चांगलाच उपयोग होई.
रात्री शेतात पायाखाली बघायला बरे पडते.गावात सर्व बागायती क्षेत्र असल्यामुळे नि गारव्यामुळे सापांची मोठी भीती असायची. म्हणून पायापुरता का होईना ब्याटरीचा चांगलाच उपयोग होई. गाव सोडून मी पांदीचा रस्ता पकडला जेमतेम एक बैलगाडी जाईन इतका लहान रस्ता, दोन्ही बाजूंनी दाट झाडी, आणि काळोखी रात्र गावातून फक्त कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज बाकी सारी सामसूम. मी आपला एकटाच वाळलेला पाला तुडवीत चाललेला, एखाद्या ठिकाणी पाल्याचा मोठा आवाज आला तर दचाकायचो पण लगेच मनाची समजूत काढायचो कि हा आपल्याच पायाचा आवाज आहे. नि चालू लागायचो . आता पांदीचा रस्ता संपला नि बांधावरची पायवाट लागली. एका बाजूने शेतातला ऊस नि दुसऱ्या बाजूने बांधावरची दाट झाडी. वार्याने आडवा झालेला ऊस रस्त्यावर आलेला होता. त्यामुळे सरळ चालताच येत नव्हते.

मी विचार करत चाललो होतो. सलग तीन वर्षे कांदे काढले पण फायदा असा झालाच नाही फक्त समाधान एवढंच कि खर्च निघाला. या वर्षी तरी बाजार भेटूदे नि सारं कर्ज चुकतं होऊदे असा विचार करून मनोमन देवाला साकडं घालत होतो. विचारांच्या तंद्रीत अचानक बाजूला खसपसलं नि ब्याटरीचा झोत तिकडे टाकला , नि माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. छातीतली धडधड प्रचंड वाढली. आठ फुटी नाग फना काढून सळसळत येत होता.नाग अगदीच जवळ असल्यामुळे मी पटकन उडी मारली नि पळू लागलो. पण मला जास्त पळताच आले नाही कारण तिथे खूपच अडचण होती.दोन तीन पावले टाकताच माझा पाय उसाच्या कांडाला आणि नि रापकन पाटात पडलो. हातातील ब्याटरी नेमकी पाण्यात पडली नि विझली. सगळीकडे गच्च अंधार काहीवेळ तर मला काहीच दिसेना पण थांबताही येत नव्हते. नाग जवळच असल्यामुळे ब्याटरी उचलण्याच्या फंदात न पडता तसाच धडपडत उठलो नि पळू लागलो भेलकांडत, उसाच्या कांडाला अडखळत पळत कसातरी बांध संपविला. मोकळ्या जागेत येऊन थांबलो. छाती जोरजोरात वरखाली होत होती. तिथेच एका छोट्या खडकावर टेकलो . तरी कावऱ्याबावर्या नजरेने अंधारात चोहीकडे नजर फिरवत होतो. अजूनही नाग कोणीकडून येतो कि काय हे पाहत होतो .थोडा वेळ बसल्यानंतर जरा बरं वाटलं पण आता पुढे जाण्यासाठी मन कचरू लागले. कारण कांद्याच्या वावरात जायचे तेथून परत नदीला जाऊन मोटार पंप बंद करायचा आणि शेवटी गावात जाताना स्मशानाशेजारून जायचे तिथे जाई पर्यंत नेमके बारा वाजायचे हे लक्षात येताच माझी छाती पुन्हा धडधडू लागली. ब्याटरी किती महत्वाची होती हे मला आता जाणवायला लागले. पुन्हा अंधारात ब्याटरी आणायला जायला धाडस होत नव्हते. कारण मगाच्या नागाजवळच ब्याटरी पडली होती. शिवाय ती बंद झाली होती. तिचा काही उपयोग नव्हता.

ब्याटरी घ्यायचा विचार बादच करून टाकला. कारण तिथे जायचे धाडस होत नव्हते. पंप बंद करायला नदीवर तर जावेच लागणार होते.नाहीतर सर्व कांद्याचे वाफे पुन्हा तुंबणार नि कांदा खराब होणार, कांदा खराब होणे मला परवडणारे नव्हते. चार महिने खूप कष्ट घेतले होते. नि खर्चही खूप झाला होता. चला कितीही भीती वाटली तरी आपल्याला पंप बंद करायलाच पाहिजे असा विचार करून मी उठलो. डोळे आता जरा अंधाराला सरावले होते.तरीपण सावधपणे पाहत चालत होतो . रस्त्यात उसाचे एखादे वाळलेले दांडके जरी दिसले तरी छातीत धस्स होत होते. मग तो थोडी वाकडी वाट करून पुढे होई नि हळूहळू पाहत जवळ जाई, ते साप नसून उसाचे दांडके आहे हे लक्षात येताच स्वताच्या घाबरण्याचा नि मूर्खपणाचा मला राग येई.

असाच घाबरत,बिचकत कांद्याच्या वावरात आलो. तर अजून एक ओळ म्हणजे वीस बावीस वाफे भिजायचे शिल्लक होते. म्हणजे अजून पाऊन तास तरी लागणार होता. इथे पाऊन तास म्हणजे पंप बंद करून घरी जायला दीड तास लागणार नि नेमके स्मशानाशेजारी बाराचा टायीम होणार हे लक्षात येताच माझ्या छातीत पुन्हा धस्स झाले. तरी पण याला काही इलाज नाही असे म्हणून मी पाटात उतरलो नि बारयावर पाणी देऊ लागलो .

पाणी देत होतो सापाची भीती अजूनही मनात होती. ती कमी झाली कि काय म्हणून मनात नको असताना भूताचेच विचार येऊ लागले.कारण सु . शिरवळकरांच्या बाबुराव अर्नाळकरांच्या भुतांच्या कादंबर्या कथा भरपूर वाचल्या होत्या. आता इथे दाट अंधारात एक एक भूत माझ्या मनात प्रकट होऊ लागले होते . ते विचार टाळण्याकरिता मी मोठ्याने अभंग म्हणू लागलो . तरीपण अभंग थांबल्यावर पुन्हा विचार घुसायचे ते टाळण्याकरिता पुन्हा मी अभंग म्हणायचो.
मनात येणाऱ्या विचारांना थोपवत, अभंग ,भक्तीगीत असे काहीबाही म्हणत कसेबसे भिजवणे पूर्ण केले. झाले एकदाचे म्हणत पाटातच हात पाय धुतले. आता एवढे थकल्यानंतर जवळ बोजा नको म्हणून खोरेही तिथेच जाळवंडात फेकले नि झरझर नदीच्या दिशेने निघालो . आता पटकन पंप बंद करून घरी जावूया नि पडी मारुया, च्यायला ह्या लायीट वाल्यांमुळे एव्हढा थकवा नि आशी रात्रीरुत्रीच एकट्याला मरायची पाळी येते.

जसजशी नदी जवळ येऊ लागली, छातीची धडधड थोडी थोडी वाढू लागली.आतापर्यंत बाजूला गेलेले विचार पुन्हा डोकाऊ लागले. सगळीकडे दाट अंधार नि विलक्षण शांतता, काय तो फक्त माझ्याच पायांचा तेवढा आवाज यायचा. त्या आवाजानेच कधी कधी दचकायचो गाव माझ्यापासून जवळ जवळ दोन किलोमीटरवर होते.नदी जवळ आली नि मला एकदम आठवले.मी स्वताच्या मनालाच शिव्या घातल्या कारण नको तेच मनात येत होते. त्याला गेल्या वर्षी पंपालाच करंट बसून मेलेल्या बजाबाची आठवण झाली. रिटर्न वालच्या तिथे पाणी भरायला गेलेला बजाबा जबर करंट बसून मेला होता. नि त्याचा काळा निळा पडलेला चेहरा मी पहिला होता.आणि आता तोच चेहरा प्रयन्त करूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता.

नदीच्या जवळ आलो नि माझी छाती जोरात धडधडू लागली. अजून पंपापर्यंत जायला तीस चाळीस फुटांचे अंतर होते. जरा थांबलो मोठा श्वास घेतला आणि मनात देवाला म्हणालो देवा कसली हि वेळ आणली माझ्यावर आख्खं गाव निवांत शांतपणे झोपलाय नि मी इथं भुतासारख भटकतोय, भुतासारख हा शब्द मनात येताच पुन्हा दचकलो .पंप बंद करायला जावे कि न जावे असा विचार करू लागलो पण आता काही झाले तरी पंप बंद केलाच पाहिजे. न्हायतर चुलता ओरडेल नि रात्रभर पाणी सोडायचे कुठे? शिवाय इतक्या जवळ येऊन पंप बंद न करता जाने हा निव्वळ मूर्खपणा ठरेल. असा विचार करत मी * हळू हळू पुढे सरकत होतो . मनात एक आधार म्हणून राम राम म्हणत होतो .पण राम राम एकसारखे म्हणन सुद्धा मला जमत नव्हते.कारण डोळ्यासमोर बजाबाचा काळा निळा चेहरा सारखा येत होता. तरीही प्रयन्त करून मी डोळ्यासमोर श्री रामाचे रूप आठवायचो , स्टार्टर बॉक्सच्या जवळ आलो आता नदीच्या बाजूला म्हणजे पंपाच्या बाजूला बघायचेच नाही.कारण बारा वाजले होते न जाणो तिथ बजाबा झोपलेला असायचा,बजाबाचा विचार येताच छातीतील धडधड वाढली. नजर तिकडे न्यायची नाही असे ठरवून देखील पंपाजवळ काही आहे का?ते तो काण्या नजरेने पाहत होतो .स्टार्टर वर हात ठेवून पंप बंद केला. पंप बंद केला नि विलक्षण शांतता पसरली.आतापर्यंत पंपाच्या आवाजामुळे काही वाटत नव्हते पण पंप बंद होताच त्या घनदाट अंधाऱ्या रात्रीची अंगावर काटा आणणारी ती भयाण शांतता जाणवताच स्टार्टर बॉक्सचे दार व कुलूप न लावताच मी पळत सुटलो.

बरेच अंतर पळल्यानंतर एका ठिकाणी थांबलो लोहाराच्या भात्यावणी छाती वरखाली होत होती.थांबून दम खायला सुद्धा नको वाटत होतं कारण भीती खूपच वाटायला लागली होती. दम लागला होता तरीपण मी झपझपा चाललो होतो. लवकरात लवकर घर गाठायचा प्रयन्त करत होतो. बरेच अंतर विचारात चाललो. नि खटकन एका जाग्यावर थांबलो. कारण माझी आता खरी कसोटी होती. स्मशान अवघे अर्ध्या किलोमीटरवर होते. स्मशानाचा विचार डोक्यात येताच छातीतील धडधड पुन्हा वाढायला लागली. काय करावं हे हळू हळू चालता चालता च ठरवत होतो. कारण एका जागी थांबून विचार करायचे धाडस नव्हते.स्मशान चुकवून जायचे म्हटले तर खूप मोठा वेढा घालून जावे लागणार होते. शिवाय तो रस्ता खूप अडचणीचा दाट झाडीतून जाणारा होता . कोल्ही नि रान डुकरांचा सूळसुळाट होता.माझ्यापुढे स्मशाना शेजारून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

दोनच मिनिटे एका जागी शांत थांबलो डोके शांत करण्याचा प्रयन्त करू लागलो. थोडा विचार केला कि काही झाले तरी आपल्याला तिथून जायचेच आहे मग कितीही भीती वाटली तरी त्याला पर्याय नाही. आणि नशिबात जे लिहिले आहे ते घडणारच मग भिण्यात काय अर्थ आहे. घाबरलो आणि नाही घाबरलो तरी जे घडायचे आहे ते घडणारच चला काय व्हायचे असेल ते होऊदे असा विचार केला. शिवाय दुसरा एक विचार असा डोक्यात आला कि भूत श्रीरामाला घाबरते त्याचे नाव घेतेले तरी ते रस्त्यातून बाजूला होते. हा विचार डोक्यात आला नि जरा आधार वाटला. मी लगेच 'श्रीराम जय राम जय जय राम' असा जप चालू केला. नि हळू हळू निघालो मनातून श्रीरामाचा जप चालू होता पण नजर लांबूनच स्मशानाकडे काही दिसते का ते पहात होती.

रात्री साडे बारा ते पावणे एक ची वेळ घनदाट अंधार, स्मशानाशेजारीच असल्यामुळे स्मशान शांतता फक्त माझ्या रामनाम जपाचा आवाज, त्या आवाजामुळेच कि काय मला जास्त एकाकी वाटत नव्हते. भीती जरी गेली नव्हती तरी रामनामाचा खूप आधार वाटत होता. स्मशानाच्या अगदी जवळ आलो. जपाची नि आवाजाची तीव्रता वाढली. मोठ्याने जप करतच स्मशानाकडे पहिले थोडा थांबलो जप करतच विचार केला. जरी आता एखादे भूत दिसले. आणि त्याने मला मारून टाकले तरी फिकीर नाही कारण मरताना देवाचे नाम मुखी आहे. "अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तरी त्याच्या सुखा पार नाही".हे संतवचन आठवले नि सारी भीती कुठल्या कुठे पळाली.

राम नाम जपत तिथेच दोन मिनिटे थांबलो नि निघालो. स्मशान ओलांडून थोड्याच वेळात गावात प्रवेश केला. राम नामाच्या बळावर का होईना रात्री साडे बारा वाजता स्मशानातून आलो ह्याचा मला अभिमान वाटला. विठ्ठलाचे मंदिर येताच हात जोडून मनोभावे नमस्कार केला नि म्हटले देवा खरोखर तुझ्या नामाचा महिमा अगाध आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

तशी साधीशीच घटना पण बारीक सारीक वर्णनांतून छान फुलवली आहे!
लिहित रहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद, ॠषिकेशजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0