छोट्या बाल्कनीतलं बागकाम!!!

इथं रहायचं का राहतं घर सोडायचं हा निर्णयचं अनेक वर्ष बासनात गुंडाळल्यानं, घर नको असलेल्या वस्तुंनी गच्च भरलेलं. घरातल्या वस्तूंना डाव्या- उजव्या डोळ्यानं बघायला लागल्यानं नको असलेलं ठळक होत गेलं. हे कशाला हवं ? ते कशाला हवं ? असं होत होत संपूर्ण घरंच रिकामं होईल एव्हढी मोठी यादी तयार झाली. जुने लोखंडी रॅक, कोठ्या, प्लग, होल्डर, वायर, पणत्या, बोळके, जुने आकाशकंदील, जुने कपडे, नको असलेली भांडी- कुंडी, पुस्तकं, फोटो, देवाच्या तसबिरी, दिवाळी गिफ्ट्स. एक टेम्पो भरेल इतकं सामान झालं. सुदैवानं काही फेकायचं म्हणलं की सदैव आडकाठी घेणारे, दूर शिकत असल्यानं, त्यांच्या सगळ्या वस्तू नीट (भांडणाला कारण नको ) एका कपाटात ठेवल्या, चित्रकलेचं सामान, पतंगाचे मांजे, चक्रया, भोवरे, बॅट, बॉल फुटबॉल, जुन्या रिफिल्स,बक्षिसं, टेनिसच्या रॅकेट्स,जुन्या सॅक, (आता असतो काही लोकांना नाद शाळेची दप्तरं पण फेकत नाहीत) कुठून कुठं जमवत आणलेले दगड गोटे, जुनी नाणी, जुनी तिकिटं, कार्टून्स, पेपर्स, शाळेतल्या मित्रांबरोबर साठवलेलं सगळं सगळं पुरातन खात्याच्या नोंदीसारखं क्रमवार बाजूला काढत बैजवार मांडलं. उरलेलं उपयुक्त रोज गाडीत घेऊन हिंडत होते, जे जे गरजू वाटले त्यांना दिलं. रद्दीत विकलं, भंगार वाल्याचं धन केलं.. राहिली पुस्तकं आज ना उद्या ती ही जातील. हे इतकं सामान फेकल्यावर माझंच घर मला मोकळं आणि मोठं वाटायला लागलं. शेवटाला बाल्कनीत आले. बाल्कनी बघून माझी मलाच लाज वाटली. बाल्कनीत काही वर्ष धुणं भांडी केल्यानं,(जुन्या बिल्डिंगला तसा पाईप लावलेला असल्यानं ती सोय होती ) एखाद्या जुनाट वाड्याच्या मोरीचं रूप आलेलं. एक मान टाकलेली तुळस, क्षीण मनीप्लांट,वाकडं तिकडं पसरलेलं ब्रम्हकमळ या पलीकडं काही नव्हतं. हे इतकी वर्ष मला का दिसलं नाही. नाही दिसलं. बाकीचं दिसत होतं. ते पुरं करायचं असल्यानं हे मागं पडलं असा ढोबळ हिशोब लावत मनाची समजूत घालत कामाला लागले. चार दिवस बाल्कनी साफ केली. रंग दिला. बाल्कनी उजळली. भरपूर उजेड, ऊन, खेळती हवा सकारात्मकतेसह घरात प्रवेशली. नवा उत्साह - आनंदानं हातात हात अडकवत मिरवायला सुरवात केल्यानं नकारात्मक मन सुरेल गाण्यात परिवर्तलं.

या पूर्वी झाडं लावली नव्हती असं नाही पण बाल्कनी व एका खिडकीच्या चिमुकल्या पैसात काय उगवून येईल याचा नीटसा अंदाज न आल्यानं, एकदा लावल्यावर त्याकडं पाणी देण्यापेक्षा काही न केल्यानं झाडं फारशी जगत नव्हती. जगली तर फलोनिष्पती वर्षासहामहिन्याला एखादी कळी उगवून तिचं किडकं मिडकं फुल तग धरत उभं असे. वर्षानुवर्षे थंडी वारा पाऊस सहन करत, रिकाम्या कुंड्या टिचल्या, फुटल्या, बुळूबुळू माती गळत कुंड्या ओस पडल्या. रिकाम्या कुंड्यात कबुतरं अंडी घालायला लागल्यावर कुंड्या खाली पटकत दुर्लक्षल्या. आपणच आणलेल्या झाडा - कुंड्याची वासलात स्वतःच लावल्यानं, दुसरं दोषी कटघऱ्यात उभं नव्हतं. नव्यानं झाडं लावायचं ठरल्यावर माहितीची सुरवात युट्यूब वरील छोट्या बाल्कनीचे व्हिडियोनी केली. प्रत्येक शहराचं पाऊसमान वेगळं, पडणारी थंडी, गरम उन्हाळी झळ्या हे सगळं सोसत नेमकी कोणती झाडं आपल्याकडं टिकतील? नेमका अंदाज येत नव्हता. काही बागकाम प्रेमी लोकांच्या भेटी व नर्सरीवाला कंटाळला इतक्या वेळी भेटी देत हिरवं सोनं घरी आणायचं ठरलं तेव्हा नेमकं दक्षिणायन अर्ध्यावर आलेलं. उन्हाचं गणित उलगडत नव्हतं. बघू पुढचं पुढं म्हणत झाडं, कुंड्या, माती, वाळू आणल्यावरही आठवड्यानं मुहूर्तमेढ रचली.

झाडं लावली. नेमकी थंडी सुरु झाली. दोन महिने झाडं आहे त्या परिस्थितीत उभी होती. भरीसभर खिडकीत -बाल्कनीत कसबसं तासभर ऊन रेंगाळू लागलं. थंडगार कुंड्या कोंबटही होईनात, झाडं काय करणार ? तगणार की मरणार? पानांवर उन्हाचा कवडसा स्थिर न झाल्यानं हरितलवके प्रकाशसंश्लेषणातून ऊर्जापरिवर्तक म्हणून काय काम करणार. आधी. नेमकं कधी? दहा बारा वर्षांपूर्वी असं नव्हतं. का नव्हतं? समोर तर बिल्डींग आहे तीच होती. उन्हाला आडकाठी करावं असं कोण आडवं आलं? बाल्कनीत लावलेला पत्रा? तोही नाही? मग कोण? समोर आडव्या उभ्या अंगानं वाढलेल्या फायकसनं 'मै हू नां’ ! म्हणत तोंड उघडलं. मी आणि फायकस एकाच वेळी इथं राहायला आलो. वर्षानुवर्षे माझ्या समोर वाढणारं झाड. कधी माझ्या डोक्यावर बसत चवथ्या मजल्याला टेकलं? कसं लक्षात आलं नाही. काय काय मागं पडतं ना. जबाबदारीला नशेचं रूप दिल्यानं. खूप काही मिळवतांना आपलं अंगणचं परकं होतं. पेलवणं सहज नसतं. अच्छा ! म्हणजे इथं फायकसनं आडमुठं धोरण अवलंबलं तर. सामना फायकसशी. झाडाचं काय करायचं? आपली खुरटी रोपं जगविण्याकरिता झाडाला इजा करायची. पटत नव्हतं. पण दुपारच्या वेळी पौष मार्गशीर्षातलं कोवळं ऊन फायकसनं खुन्नशीत अडवून ठेवल्यानं घर, बाल्कनी, झाडं पर्यायानं मला थंडगार शिरशिरी कवटळे. सतत सतत ऊन अडवल्यानं फायकसचा राग शिगेला पोहोचत, मन गढुळलं, एके सकाळी मनाच्या अंगणात, स्वार्थाचे कोंब ऐसपैस पसरले, डंख मारत राहिले. अखेर फायकसला धडा शिकविण्यासाठी सोसायटीच्या अखत्यारीत महानगरपालिकेत अर्ज दाखल केला तेव्हा डोकं शांत पडलं. अर्ज दिल्याला सहा महिने लोटलेतं. फायकस दिमाखात उभा आहे. दिमाखात उभ्या असलेल्या फायकसनं लळा लावलायं.

आता उत्तरायण शिगेला पोहोचलंय. झाडांवरलं ऊन खिडकी बाल्कनी पार करत घरात घुसतंय. बाल्कनीच्या प्लॅस्टिकच्या पत्र्याला लोखंडी उलथनं तापवत तीन गोल धारे (झरोके) काढल्यानं. वारा, ऊन ढगांचे तुकडे सगळं सगळं घर व्यापतं. झाडं खुश आहेत. आपल्या गैरहजेरीत मालकी हक्कानं ऊन घरभर फसफसत पसरतं. आपल्या येण्याच्या व्यत्ययानं व्हसकन अंगावर येत वाकड्या तोंडानं फिर्याद गुदरवतं . ऊन रागं भरतं. रुसतं. कुरकुरत स्वतःचं खाजगीपण सोडण्यात अडकतं. तोच उतरतीचा वैशाखी रंग फायकसवर आदळतो. वाऱ्याच्या झुळुकां न लाजता- न बुजता खुलेआम फायकसशी लगट करतात. धाऱ्यात मोकाट वारं घुसतं. लुडबुडणाऱ्या फायकसला मुस्काडत, मोकळ्यात काढत, कोऱ्या निळ्याशार आभाळाचे तीन तुकडे घरात पसरतात. उतरत्या उन्हाच्या थेट तिरिपा, सूक्ष्म कणांना छातीशी धरत, घरात शिरत, न अदमास घेता दारावर रेंगाळत चित्रमिती सादर करण्यात स्वतःला गुंतवतातं. बारक्या वेली, खुजी रोपटी सैराट होत, कारल्याच्या लहानखुऱ्या वेलावर उमललेली नाजुक पिवळी फुलं, मधूनच तोंड काढणाऱ्या पानांच्या हिरव्या छटेला दडवीत, बाहेर डोकवत वाऱ्याच्या झोतावर मंत्रमुग्धतेत नाचू लागतात. असं मनोरम जिवंत दृश्य कधीतरीच जाणवतं. रोजचं. पण दुर्लक्षीलेलं. ऊन असतं उतरतीचं. त्यात चैतन्य असतं. आकार असतात. रंग असतात. ते दृश्य बोलकं असतं. बोलकी शांतता असते . खऱ्या अर्थानं आपलंही उत्तरायण सुरु झाल्याचा दाखला असतो ?

झाडं लावल्यावर केलेले/ फसलेले प्रयोग.

१) घरच्या घरी खत तयार करणे

१. ) पहिला प्रयोग केला तो 'मिनी जीवामृतचा'. एक लिटर गाईचं गौमुत्र, ताज्या शेणाचा पो, साधारण एक मोठा मग भरतो. छटाक गूळ. (तुपाची छोटी वाटी. )अर्धी वाटी दाळीचं (बेसन). शेण, गौमुत्र पुण्यात एसएन टीडीटीच्या ,कॅनॉल रोडला लागून गोठे आहेत. तिथं हे सगळं मिळतं. अगदी देशी गाईसुद्धा आहेत. कॉर्नरला आहेत ते गोठे. (गाई म्हशीचं शेण ओळखणं फार अवघड नसतं. मी गावाकडं राहिल्यानं, घरी गाईम्हशीं असल्यानं ते सोपं गेलं) शेण गौमुत्र, गूळ, डाळीचं पीठ तीन लिटर पाण्यात भिजवायचं. तीन दिवस (बहात्तर तास होतील असं )सकाळी संध्याकाळी एकदा सुलट पद्धतीनं तेरा वेळा आणि उलट पद्धतीनं तेरा वेळा ढवळायचं. बहात्तर तास उलटल्यानंतर त्या तीन लिटर द्रावणात अंदाजे वीस पंचवीस लिटर पाणी टाकून झाडांना द्यायचं.

फरक. झाडांचा रंग बदलला. मुडदूसतेनं कात टाकायला सुरवात केली. माती भुसभुशीत झाली. हा मी ज्या रवीनं ढवळण्याचा पराक्रम केला त्या रवीचा वास अजूनही गेला नाही. आता ती फक्त शेणामुतापूरती राहिली आहे.

२) शेणाच्या गोवऱ्याचं खताचं द्रावण.

साधारण दहा गोवऱ्या. एक लिटर गौमुत्र, पावशेर गुळ. मोठी वाटी भरून दाळीचं (बेसन) पीठ. (गूळ-पीठ बॅक्टेरिया जगायला मदत करतं ) वीस लिटर पाण्यात मिसळून ते विरजायला ठेवायचं. एक महिनाभर ते दिवसातून एकदा काठीनं ढवळायचं. मिश्रण विरजायला लावल्यापासून सातव्या दिवशी ते तयार व्हायला सुरवात होते. ते मिश्रण एक लिटर दहा लिटर पाण्यात टाकून झाडांना आठवड्यातून एकदा द्यायचं. उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढवायचं.

फरक :- गेले चार महिने देत असल्यानं पानांची वाढ झपाट्यानं झाली असून, जमिनीचा पोत सुधारला आहे, भरमसाठ गांडुळं तयार झालीत. झाडं किती सशक्त आहेत, होत आहेत,ते आपण लावलेल्या मूळ झाडांचे फोटो पाहिल्यावर कळते.

३)शेणाच्या गोवऱ्या, मोहरीची पेंड, लिंबोळी पेंड खताचं द्रावण.

साधारण दहा गोवऱ्या. एक किलो मोहरीची पेंड, एक किलो लिंबोळी पेंड, एक लिटर गौमुत्र, पावशेर गुळ मोठी वाटी भरून दाळीचं (बेसन) पीठ. (गूळ -पीठ बॅक्टेरिया जगायला मदत करतं ) वीस लिटर पाण्यात मिसळून ते विरजायला ठेवायचं. साधारण एका महिन्यानंतर ते मिश्रण एक लिटर घेऊन दहा लिटर पाण्यात टाकून झाडांना आठवड्यातून एकदा द्यायचं. उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढवायचं. याचा भयानक घाण वास येतो. हे द्रावण वर्षभर टिकतं असं मी यु ट्यूबवर पाहिलेल्या व्हिडिओत होतं. पण प्रत्यक्षात मार्च महिन्याच्या मध्यावर या द्रावणात प्रचंड अळ्या झाल्या. अळ्या झाल्या म्हणून ''साफ'' कीटकनाशक टाकत, सगळं द्रावण एका महिन्यात संपवून टाकत ते परत करायचं नाही म्हणून निकाली काढलेलं आहे. (त्या द्रावणाच्या वासानं घरचे लोकंच काय शेजारीही हाकलतील)

फरक :- त्याचा फरक निश्चित पडला असेल, कारण मार्च नंतर मी कोणतंही द्रावण झाडाला दिलेलं नाही. सगळे द्रावण निकाली काढलेत.

४) केळीच्या सालाचं द्रावण.

केळीची सालं आठ ते दहा दिवस भिजवून ते द्रावण एका लिटरला चार लिटर पाण्याचं प्रमाण घेत जास्वंद, अनंत व गुलाब याला अतिशय उपयुक्त आहे.

भरघोस फुलं आली असा दावा केला असला तरी, अनंत व गुलाब भरात आहे. त्यामानानं जास्वंद अजूनही मनावर घेत नाही. यानं चिलटं फार होतात. आणि उन्हाळ्यात पटकन अळ्या होतात.

५) कंपोस्ट खत तयार करणं. घरच्या घरी ओला कचरा जिरवत कंपोस्ट खत करण्याच्या एका प्रयोगानं फारचं यशस्वी निकाल दिला. भाज्यांची देठं, फळांच्या साली, कांद्याची- लसणाची टरफलं. सुकी पानं. गवऱ्या असं मी सगळं चार महिने साठवलं. विरजवण्याला एक औषध आणलं. त्यानं किड्यांची उत्पती वाढत लवकर कंपोस्ट खत तयार होतं. असं औषध एकदाच वापरलं. एकदाच कचरा जिरवला. त्याचं खत केलं. थंडीत त्याचा वास आला नाही साधारण चार महिन्यात असंख्य परिश्रमानं खत तयार झालं. दुसरा कंपोस्ट डबा भरला. खत होण्याची प्रक्रिया सुरु झाली. कचऱ्याचा प्रचंड वास सुटला. चिलटं वाढली. जे औषध टाकलं. त्यानं प्रचंड किडे तयार झाले. भिंती काळ्याभोर होतील इतकी उत्पती वाढली. एके सकाळी ते सगळं उचललं आणि खाली लावलेल्या झाडात नेऊन ओतलं. आता घरात काहीही प्रयोग करायचे नाही अशी शपथ घेतली आहे.

६) किटकनाशकं व झाडावर फवारण्या

१) कडू लिंबाचा पाला अतिशय उपयुक्त असून, तो आणून चार दिवस बादलीत भिजवून मिक्सर मध्ये वाटून, पातळ कपड्यानं गाळून, त्याची फवारणी झाडावर केल्यानं, मावा, पांढरे चिलटं, कीड सगळं धुतलं जातं. याची फवारणी सतत. आठ पंधरा दिवस करावी तेव्हा कुठं फरक पडतो. तो द्रावण करण्याची प्रक्रिया फार मोठी कटकटीची आहे.त्यात आम्ही पडलो आरंभशूर. त्यामुळं हे सगळं एकाच प्रयोगात बंद पडलंय.

२) कापूराच्या वासानं चिलटं पळाल्यासारखी करतात परत येऊन बसतात.

३) डेटॉल व तत्सम हॅण्डवाश मुळे फरक पडतो.

४) शेवग्याच्या पानांचा रस झाडांना अतिशय उपयुक्त आहे. झाडं चांगली होतात. हा ही प्रयॊग एकाच प्रयत्नात संपला.

५) चहा पावडर, कॉफी सगळे प्रयोग केले. चांगले आहेत. अपाय काहीच नाही. फार फरकही दिसून येत नाही.

६) पालेभाज्यांचं, तांदूळ धुतल्याचं पाणी टाकल्यानं काही फरक पडत नाही. आपण व्यर्थ शिणतो.

७) बेकिंग सोडा वा लिंबू वापरले नाही. जमिनीची आम्लता आहे तशीच आहे.

८) ‘साफ’ नावाचं कीटकनाशक फार चांगलं आहे. स्वस्त आहे. अपाय नाहीत. तेच वापरते.

आता घरात कोणतंही खत तयार होत नाही. ‘समर्थ ऍग्रो’ म्हणून दुकान आहे अलंकार पोलीस चौकीच्या शनिमंदिरासमोर तिथं सगळी खतं मिळतात. बागेचं सगळं सामान मिळतं. लिंबोणी पेंड चाळीस रुपये किलो. गांडूळ खत सव्वाशे रुपयाला पाच किलो. बोनमिल चाळीस रुपये किलो. करंज पेंड पन्नास रुपये किलो. कोथरूड वारजे भागात राहणाऱ्या लोकांना उपयुक्त असू शकतं.शेंगदाणा पेंड वगैरे स्वारगेटला चांगलं आणि रास्त भावात मिळतं

७)लख्खं प्रगटलेलं

सर्पगंधा जास्त पाणी दिल्यानं खराब झालं. ते बाहेर काढलं. मूळ कोरडं केलं. वाळवलं . पंधरा दिवसांनी लावलं. आता दोन अडीच महिन्यांत एका झाडाची चार झाडं झालीत. प्लास्टिक कुंड्या इथल्या ऊन पाऊस व थंडीला काही कामाच्या नाहीत. घरातल्या अडगळी, नको असलेल्या बरण्या, बाटल्या, रिकामी खोके,छोट्या छोट्या बोळक्यात झाडे वाढत असतीलही चांगले दिसत असतीलही, पण माझे ते सारे प्रयोग फसलेत. अपवाद मणीप्लांट,पुदिनाचा. बाकी झाडांना एकपैस अवकाश आवडतो. झाडांना सतत जागा बदलेली चालत नाही. एका जागी ती रमतात. आनंदी असतात. जास्वंद तर शॉकमध्ये जातं. त्याला त्याच्या आजूबाजूला सुद्धा गर्दी चालत नाही. एकलकोंडं झाड आहे. कोलियस वगैरे नाहीच लावू. अगदी सारखं तोळामाश्यात अडकलेलं रोपटं. जरा ऊन दिलं की सुकतं नाही तर फुरंगटतं. सोनचाफा कुंडीत चांगला वाढतो. मोगरा छोट्या कुंडीत जास्त फुलं देतो. टमाटे एका मोठ्या कुंडीत एकच लावावे. अळू मोठ्या खोलगट पसरट कुंडीत ठराविक अंतरावर लावावेत. बी पेरलं रुजतं. रुजतंच पण साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी कोणतंही बी पेरु नये उगवतच नाही.कारलं शेणखतात चांगलं वाढतं. कोणतंही खत देतांना जमीन ओली हवी. थंडीत कुंडीच्या खालच्या ताटल्या काढून टाकाव्या. उन्हाळ्यात खते देणे टाळावं. आलं मनात की झाडं लावली. ती निमूट वाढतात असं होत नाही. ती त्यांच्या सवडीनं वाढतात, फुलतात, फळतात. झाड आकार शिकवतं. झाड उकार शिकवतं. झाड दिशा दाखवतं. झाड वाट पाहणं शिकवतं. रुजणं शिकवतं. फुलून येणं शिकवतं. देणं शिकवतं

झाडं लावल्यापासून जवळपास सहा महिने उलटले आहेत. तुळशीच्या मंजिऱ्या, मोगऱ्याच्या तगाऱ्या, ब्रम्हकमळाचे दांडेरे, पारिजातकाची हिरवट लालसावलेली पानं गोकर्ण कारल्याची तंतुमय वलये, भोपळ्याची पसरट पानं, क्रोटॉनचे पिवळे गुलाबी रंग,, रेड लिपस्टिकची लालसर छटा,जेडचं रसरशीत हिरवंगार पाणी साठवलेलं पान सगळं सगळं एकात एक मिसळलं की आपल्या आत हिरव्यागार लाटा प्रगटतात . अठ्ठेचाळीस झाडं आहेत. त्यात अळू, टमाटे, कारलं, भोपळा, पुदिना, कोथम्बीर आणि पालक ही आहे. कारल्याचा वेल चांगलाच फुलला आहे. एकदा भाजी खाऊन झाली असून सत्तावीस कारली लागली आहेत. कारल्याच्या वेलानं काय शिकवलं. कारल्याचं जहर कडूपण सोडलं तर कारलं वेली भाज्यांच्या सोंदर्य स्पर्धेतलं ' मिस इंडिया.' अलगद लपेटणारी पोपटी तंतुमय वलये. पंचपाकळी महीरपदार हिरवीशार पानं. हरबरा घाटाच्या ठेवणीतल्या बुंदेदार कळ्या, पंचपाकळी फुलं. फुलांतून प्रगटलेला अदृश्याच्या झाकीतला पुंकेसर.फुलांच्या मागं तग धरत हळहळू पुढं जाणारं कोरीव, कातीव डोहाच्या रंगाचं बाळकारलं,दिसामाजी वाढतं तसं फुल सूक्ष्मता गाठतं. फुलाचं फलधारणेचं काम संपतं. फुलाला तिथं बसवत नाही.फूल सुटायला आढेवेढे घेत नाही.बिटुकल्या कारल्याला स्पर्श न करता, त्याला कळू न देता पिकलं फूल हळूच सुटतं. सहज. सुटल्या तुटल्याची खंत बाळगता, तरंगत तरंगत मातीत मिसळतं. सुख- दुःखाच्या गोष्टी करत तिच्याच कुशीत एकरूपतं. किती दिवसांचा जन्म? तो कसा सत्कारणी लावावा? कारल्याचं फुल बसल्याजागी शिकवतं. इकडं वेलीवरचं बाळकारलं बालपण सोडतं. तारुण्यात प्रवेशतं. नटकतं- मुरडतं. नक्षीदार अंगानं बाळसं धरलेलं कारलं.डोळ्यानं प्राण टाकत प्रौढ होतं. जिभा ओलावतं. आज तोडू उद्या तोडू. नाहीच जमत. अखेर कारलंच ठरवतं. ते मनमर्जीचं. त्याच्या मनमर्जीवर तर ही फिदायं. कारल्याला कळलेलं. साथीविना संगाविना. विरक्त.स्वतःच ठरवतं. एका पहाटे गाभुळतं. हिरव्या बरड रेषांची एक रेघ पिवळं पितांबर नेसते. हळू हळू सबंध कारलं पिवळ्याच्या लागणीत रंगतं. चार- आठ दिवसात भगवी छटा अवतरते. एका उतरतीला समोरचं परिपक्वतेतलं कारलं की देवळाआड दडलेल्या बुडत्या सूर्याचा लालबुंद गोळा. कोणतं रूप मोहक. दोन्हीही सारखेच रंग. नाही ठरवता येत. आपलं जगणं कसं ? पिकल्या कारल्यासारखं.म्हणजे चार सहा महिन्याचा अवधी ठेवायचा. का बुडत्या सूर्यासारखं. सकाळी कोवळं. दुपारी दाहक. उतरतीला सौम्य. अर्थ एकचं. फरक फक्त काळाचा.!!!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

इथं रहायचं का राहतं घर सोडायचं हा निर्णयचं अनेक वर्ष बासनात गुंडाळल्यानं, घर नको असलेल्या वस्तुंनी गच्च भरलेलं.

आमच्याकडे तर सगळेच शॉपोहोलिक आहेत. घरात पाय ठेवायला जागा नाही आता. इथलं नवीन शहरातलं घर लहान आहे पहीलं विस्कॉन्सिनमधलं मोठ्ठं होतं. आता फार जीवावर येतय वस्तू टाकणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही पुर्वी सगळं साठवत असे पण त्यातलं फोलपण लक्षात आलं तर काम झालं की फेकणं यावर भर दिला आहे. जमवलेलं फेकणं अवघड असतं. पण त्याला नाईलाज असतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुला प्रतिसाद देतांना एकच comment सतत पडली. मला येत नसल्यानं मी सगळं ललितमध्ये डकवते. बागकामासाठी वेगळा धागा काढता येतो का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो वरीज!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शांत व्हा, कुलकर्णी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुभांगी. हा मोठा धागा आहे. बरं झालं वेगळा काढलास. कारण एवढा मोठा प्रतिसाद तुला आधीच्या बागकाम धाग्यात टाकता आला असता. पण नवीन धागा काढलास तरी हरकत नाही. संपादक मंडळास योग्य वाटल्यास ते हा धागा हलवू शकतात व प्रतिसादात त्याचे रुपांतर करु शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ललीत छान, प्रयोगही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयोग करणं मला फार आवडतं. त्याशिवाय शिकता येत नाही. मी बागकामाला सुरुवात केली तेव्हा चिकार मोकळा वेळ होता, भारंभार खरेदी करून आणायचे आणि मग ती झाडं जगवायला किती कष्ट करावे लागतील ह्याचा विचार करायचे नाही. आता वेळ कमी असतो. त्यामुळे स्थानिक झाडं आणण्याचा उद्योग सुरू केला.

बरं झालं निराळा धागा काढलात ते! त्यानिमित्तानं घरच्या पसाऱ्याबद्दल मला बरं वाटलं. निदान मला कमीत कमी वस्तू विकत आणण्याची सवय लागली आहे. त्या वस्तू आणल्या तरी त्यांचा आनंद लुटायला घरीच नसते. तिर्री मांजरीसाठी खेळणी आणली तर तीही दिवसभर घराबाहेर असते. बरा अर्धा फक्त इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत खरेदीखोरपणा करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण हे ललितच आहे , वेगळा धागा काढला नाही तर बागकाम धाग्याच्या झाडोऱ्यात हरवले असते.
बाकी फायकसला उंबर म्हणत नाहीत का? ( वड/पिंपळ/रबर स्ट्रँगलर/उंबर ही सर्व फायकस यातले कोणते आहे?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वड म्हणजे बनयान ट्री ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, आता येईल वट पौर्णिमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0