उगाच सुचलेली कथा

सीएसएमटीला गरीब रथ एक्स्प्रेस ची नुकतीच एन्ट्री झाली. घर सोडताना संसारी माणूस कुलूप लावलं की नाही याची खात्री करतो... अगदी तसच बड्या गोल्डफ्लेकची दोन पाकीट खिशात आहेत की नाही याची त्याने खात्री केली. प्रवास साधारण 4 तासाचा होता. एवढ्यासाठी तिकीट काढण्याची धावपळ करण्यात त्याला रस नव्हता त्यामुळे आवडत्या अंकाच्या डब्यात बसायचं त्याने ठरवलं...
"एस 7. नको... साडेसाती लागायची च्यायला " तो मनाशीच पुटपुटला.." एस 8 ... 8 तारखेला आम्ही पाहिलं किस केलेलं... नको राहू दे.... एस 6, एस 5 , एस 3, एस 2... एस 2.... 2 फेब्रुवारी... तिची जन्म तारीख..." शेवटी तो एस 1 मध्येच शिरला... गाडी लांबच्या पल्ल्याची असल्याने नाशिक पर्यंत साधारण रिकामी असेल असा अंदाज बाळगून त्याने एक सीट निवडली. सीट प्लॅटफॉर्मच्या उलट दिशेला असल्याने त्या बाजूची मोकळी पटरी बघण्याचं त्याच्या नशिबात होतं. त्या मोकळ्या पटरीवर कुणीतरी स्वतःच्या पोटातली पिवळ्या रंगाची निशाणी टाकली होती.
"भेंचोद कितीही संडास बांधले तरी लोकं नको तिथे हागायच सोडणार नाहीत"..
त्याने त्याची बॅग उचलली आणि पुढच्या दिशेला निघाला. दोन तीन सीट सोडून साईड लोअर बर्थ ला त्याला एक रिकामी सीट मिळाली. दुसऱ्या बाजूला एक फॅमिली होती. आई वडील आणि दोन मुलं.... त्याने त्याचं बस्तान तिथे वळवलं. काहीच वेळात चहावाल्याचा आवाज ऐकला. खरंतर या चहाला मुताची चव नसते ही गोष्ट माहित असून देखील तो त्या चहावाल्यावर उदार झाला आणि नाईलाज म्हणून चहा ढोसायला सुरुवात केली...
गाडीचा departure time होऊन साधारण दहा एक मिनिट झाली असावीत. पाय वर घेताना त्याच्या खिशातलं सिगारेटच पाकीट खाली पडलं. बाजूला बसलेल्या गृहस्थाने त्यावर कटाक्ष टाकला. त्याने दोन्ही पाकीट खिशातून बॅगेत ठेवली आणि बॅग मधील जॉर्ज ऑर्वेलला बाहेर काढलं. पुस्तक चाळल तर त्यात दोन चार ठिकाणी पान दुमडून ठेवली. नक्की कुठपर्यंत वाचून झालंय हे पडताळण्यासाठी त्याने पानावरील मजकूर वाचला.. काहीतरी ओळखीचं वाटलं म्हणून पुढच्या पानावर जाऊन पाहिलं. त्याला मागचा काही संदर्भ लागत नव्हता. त्याने कंटाळून पुस्तक ठेवून दिलं. कानात earphon कोंबून प्लेलिस्ट सुरू केली. त्याचं नशीब इतकं गांडू होतं की नेमकं रंजिश ही सही सुरू झालं.
"किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ..!!"
या ओळीला त्याने कानातले earphone देखील ओरबाडून काढले. हा सगळा त्याचा वेडझवेपणा बाजूचा माणूस बघतच होता. हळू हळू गाडी सुरू झाली. त्याने बॅगेतली डायरी बाहेर काढली. पुढच्याच कप्प्यातला एक पेन काढून त्याने लिहायला सुरुवात केली.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

आज 42 दिवस होतील आपल्याला वेगळं झालेल्याला... कोण वेगळं झालंय नक्की... तू की मी... की मी माझ्यापासून वेगळा झालोय... ठानपत्ता लागत नाही.. तू गेल्याने तसं फारसं काही घडलं नाही... रोजच्या सिगारेटी तितक्याच जळत आहेत.. उलट कमी झाल्या आहेत.. इतकं डिप्रेशन वगैरे नव्हतं.. पण तरीसुद्धा तू रागावली होतीस म्हणून मी पहिली सिगारेट घेतली होती. आता तू नाहीस म्हणून काउन्ट वाढला नाही... पण ब्रेकअप चा फील यावा म्हणून केस आणि दाढी कापली नाही... असो... कबीर सिंग वगैरे बनायचा माझा प्रयत्न नाही... तो युनिव्हर्सिटीचा टॉपर होता. मला रुईया - रुपारेलमध्ये एफ वाय ला एडमिशन मिळालं नाही म्हणून पाटकर बी ए साठी चांगलं कॉलेज आहे हे जगाला पटवून द्यायचा चुतियप्पा करणारा मी... मुळात कबीर सिंग सारखा पराकोटीचा acceptance माझ्यात नाही... तू गरोदर वगैरे झाल्यावर तुला परत वगैरे बोलवण्याचा चांगुलपणा माझ्याने होणार नाही.... त्यामुळे आहे त्या ठिकाणी योग्य आहे आणि मी माझ्या .....

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

खूप दिवसापासून तो अशी अनेक स्वगत एकट्याने लिहायचा प्रयत्न करायचा. कॉलेजला असताना त्याने एकदा कविता केलेली.. त्याच्या मित्रांनी त्याची थट्टा करत कॉलेज कॅन्टीन मध्ये सगळ्यांना वाचून दाखवली. तरीही त्याने परत कविता करायला घेतली होती.. पण सर्वांसमोर वाचून दाखवण्याचं धाडस काही त्याच्याने झालं नाही... म्हणून डायरी मध्ये तो अशी अनेक स्वगत लिहायचा.. नगरकरांच्या लिहिण्याचा त्याच्यावर फार इफेक्ट पडला होता... "आपण पुढे काय करायचं" हे न कळणाऱ्या लाखों पैकी हा एक .. 11 वीला स्टेटस मुळे सायन्स घेतलं... 12वी ला फिजिक्स झेपलं नाही म्हणून गपगुमाने आर्ट्स ला वळलेला हा... एमपीएससी करून अधिकारी व्हायची झिंग त्या काळात त्याला चढली होती.. नंतर स्वतःची लायकी स्वतः कळल्याने पत्रकारिता वगैरे करण्याचं खुळ त्याच्या मनात आलं.. एक वर्ष रानडे इन्स्टिट्यूट च्या entrance साठी वाया घालवल्यावरही त्याला अक्कल आलेली नव्हती... वाया जाणारं हे त्याचं दुसरं वर्ष होतं...
शेजारच्या काकांनी त्याची चौकशी केली.
"यहाँ जॉब? या पढाई ?"
"नाही जॉब वगैरे नाही. बी ए झालंय... एम ए करायचं ठरवतो आहे"
"एम ए ला तरी कोण विचारतय आजकाल?"
याने मनातल्या मनात काकांसाठी एक नवीन शिवी तयार केली. अशा प्रश्नांची त्याला खरतर सवय झाली होती..
" हे शिक्षण वगैरे घेणं त्या भैयांनाच जमतं... भोसडीचे कुठून काही भेटेल ते काम करतात आणि मग इथे बस्तान टाकतात... मग आमच्या पोरांना कोण विचारतय?"
प्रांतवाद वगैरे गोष्टीवर त्याने मत मांडायच कधीच बंद केलं होतं.
"नाव काय म्हटलात आपलं"
"सारंग"
"आडनाव?"
"कडवे"
हे आडनाव ऐकून सदर व्यक्ती काही सेकंदासाठी तब्ध झाला. त्याचं आडनाव कन्फुसिंग होतं.. ज्यातून त्याची जात कळत नव्हती...
आई वडिलांच्या वासनेपोटी संभोग नावाची क्रिया घडते... त्यातून अब्जावधी शुक्राणू आईच्या गर्भाशयात जातात. वयात आल्यापासून महिन्याला एक अशा पद्धतीने अंडाशयातील एका एका अंड्याला आई शरीरातून बाहेर टाकत असते. वाया गेलेल्या अंड्यांची संख्या आणि शरीरात गेलेले शुक्राणू यातून कितीतरी कोटी अब्जातून एक एवढ्या न्यून संभावतेने एखादा शुक्राणू अंड्याशी फ्युज होतो. मुळात ही क्रिया इतकी तठस्थ साधर्म्याने होते की या माणसाचा वंश वाढण्याच्या दृष्टीने या गोष्टी शिवाय इतर कोणत्याही प्रोसेसला इतकं महत्त्व देता येत नाही. माणसाची जात किंवा धर्म हे या क्रियेला सापेक्ष असतं.. इतकं असूनही माणसाने जन्मानंतर या सर्व गोष्टींचा अभिमान बाळगणे म्हणजे खिडकीतल्या कबुतराच्या विष्ठेवर आपला हक्क आहे म्हणून ओरडण्यासारखच...
म्हणून प्रांतवाद, जातीयवाद आणि धर्मवाद यावर तो शांत बसायचा.
काही काळानंतर संवाद अधिक वाढत होता.
"आमच्या माझगावात दहीहंडी च फार वेड... पाऊस लागला की पोरं हात धुवून मागे लागतात. खरंतर पोरांची हौस असते. पण सध्या या सणाचं पण स्वरूप बदललं आहे हो. मागच्या वेळी दहीहंडी ला सनी लियोनीला बोलावणार म्हणून पोरांच्यात राडे झाले होते."
"राडे कशाला?"
"तिचे धंदे माहित आहेत ना! राडे होणार नाहीतर काय?"
लोकांनी सनी लिओनीला उगाच overrated केलाय. एकतर ती Canadian. भारतीय फक्त नावापुरतीच.. शिवाय तिच्यापेक्षा एकसो एक पॉर्न स्टार्स सध्या trending आहेत.. अँजेला व्हाइट, लेला स्टार अगदी मिया खलिफा सुद्धा.. दोन्ही बाजूंनी अस्सल स्पीड ब्रेकर..... हा स्वतः शीच पुटपुटत होता.
कानात earphone टाकून तो झोपी गेला. इगतपुरी आल्यावर त्याला जाग आली. अजुन टीसी तिकीट check करायला आला नव्हता. नाशिक ला उतरल्यावर अचानक टीसी ने पकडल्यावर मजबूत घोडा लागेल म्हणून तो टीसी ची वाट पाहत होता.
बघता बघता नाशिक आलं. याला उतरायचं होतं. आपली बॅग घेऊन हा दारापाशी आला. दारात उतरण्यासाठी थोडीफार गर्दी होती. उतरताना थोडी धक्काबुक्की झाली.. उतरताना त्याला मागून धक्का देण्यात आला. " आईची ....." म्हणून त्याने तोंडातून ... आजूबाजूला टीसी नाही याची खात्री घेत त्याने बाहेर पळ काढला. बाहेर पोहोचताच त्याला लक्षात आलं की धक्काबुक्की मध्ये त्याचा मोबाईल मारला गेला.....

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

मोबाईल गेलाय... त्यात जवळपास शे दीडशे फोटोंचां आपला अल्बम.. दररोज एक फोटो डिलीट करायचो आणि दुसऱ्या दिवशी trash मधून तो परत रिलोड करायचो. त्यामुळे फोटोंची संख्या constant. प्रेयसी ही जातच विचित्र.. एका नवोदित लेखकाच्या "ट" ची गोष्ट या कथेतला नायक ज्या प्रेयसीच्या प्रेमात पडतो ती उच्च वर्णीय... दोघांच्या अवयवांच मिलन होताना ती त्याला शरीर लांब करायला सांगते. या गोष्टीवरून तो पराकोटीचा विक्षिप्त बनतो आणि त्या घटनेपासून अखंड स्त्री जातीचा तो द्वेष करू लागतो. परिणामी मुंबईतल्या लोकल मधल्या प्रत्येक बाईच्या शरीरावर अश्लील कमेंट करतो. तमाशा सिनेमात वेदच्या सावरण्याला जेवढी तारा जबाबदार असते तेवढीच त्याच्या त्रासालाही... असो...
माझं सावरणं किंवा माझं कोलमडण याला मी तुला जबाबदार धरत नाही....

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-

तिकिटांच्या खर्च वाचल्याने त्याच्या खिशात बऱ्यापैकी पैसे होते. मित्राच्या घरचा पत्ता माहीत नसला तरी त्याला त्याच्या गावचा ठाव ठिकाणा माहित होता. त्याने नाशिक बस स्टँड वरून तो सिन्नर ला जायची बस पकडली. सिन्नर रोडवरून पाष्टे गावी जायला एक फाटा निघतो. सिन्नर ला त्याचं आजोळ होतं. लहानपणी आजोळी असताना त्याच्या मामाने दारू पिऊन त्याच्या आईच्या पर्स मधले पैसे काढायचा प्रयत्न केला होता. सिन्नर वरून घरी जाताना त्याने मामाच्या हाताचा जोरात चावा घेऊन पळ काढला होता. या गोष्टी मामाच्या कित्तेक काळ लक्षात राहिल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी मामाच्या घराशेजारील मुलीला गाडी शिकवायच्या नावाखाली त्याला सइंद्रिय चाळे करताना पकडलं. खरंतर यात पुढाकार त्या मुलीचा होता तरी सुद्धा पूर्वीचा राग काढून त्या मामाने याला चांगलंच बडवलं. त्या आठवणी त्याला चिघळणाऱ्या खरुजी सारख्या बोचत होत्या. तो पाश्टे फाट्यावर उतरला. हायवेवरून जवळपास 4 km अंतरावर पाष्टे गावात त्याचा मित्र राहत होता. नाशिकला उतरल्यावर काही कामासाठी नाशिक ला आलोय असं सांगून त्याच्याकडे जाण्यासाठी त्याला निमित्त हवं होतं. परंतु मोबाईल गेल्याने त्याला ठरवल्या प्रमाणे काही साध्य करता आलं नाही. आता surprise visit देण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. गावाच्या दिशेने त्याने पायपीट सुरू केली. गावात जाणाऱ्या एका मोटार सायकल वाल्याला त्याने हात दाखवला. गावाच्या दिशेने दोघांचा प्रवास सुरू झाला. काही अंतर कापल्यावर याला लघवीला झाली . त्याने गाडी वाल्याला थांबायला सांगितलं आणि रस्त्या शेजारच्या वडा शेजारी धार मारायला सुरुवात केली. तेवढ्यात गाडी वाला ओरडला
" ओ सायेब... देवाची जागा हाय ती... जरा पुढं जाऊन पिचकारी उडवा"
त्याचं ऐकुन याने धार अर्धवट थांबवली. सामान आत घेऊन त्याने त्या झाडाखाली दोन तीन वेळा नाक घासल..
मित्राच्या घरचा रस्ता बऱ्यापैकी त्याच्या ध्यानात होता. त्याचा मित्र कैवल्य मुंबईत एम ए पूर्ण झाल्यावर गावातील कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून रुजू होता. याचे पाय जेव्हा कैवल्यच्या घराला लागले तेव्हा कैवल्य घरी नव्हता. आईने घरी बोलावून त्याची विचारपूस केली. तोवर कैवल्य कॉलेज मधून घरी आला. याच्या चेहऱ्यावरची ओळ आणि ओळ त्याने वाचली. आई आत जाताच कैवल्यने विषय काढला...
"सारंग, काही विशेष"
"नाही.. अरे.. इथे नाशिक ला आलेलो.. एका workshop साठी"
"Workshop?"
"हो,अरे मास मीडिया......."
"कळलं, समुद्राने पोटात कितीही लपवलं तरी लाटा खोटं बोलत नाहीत..."
"अे... थांब च्यायला... गांडीत घाल तुझं तत्वज्ञान.... नव्हतं कोणतं workshop वगैरे.... तुलाच भेटायला आलोय.."
"दोन तीन दिवसांचे कपडे आणलेस ना?"
"हम्म्म"
आईने दोघांना जेवायला बोलावलं.. कैवल्यच्या घरी यायची ही याची पहिलीच वेळ नव्हती. कैवल्यच्या घरी त्याचे आई बाबाच असायचे. वडिलांचं कामानिमित्त नाशिकला जाणं व्हायचं. त्याची बहीण कार्तिकी पुणे विद्ापीठात बी ए सायकॉलॉजी करत होती. हे दोघं समोरा समोर यायची हि पहिलीच वेळ. तिची शरीरयष्टी थोडी काटकच होती. वर्ण सावळा. तिला सिव्ह लेस टॉप खरंतर शोभत नसतील.. पण तरी तिला ते घालायचे होते. यावरून तिचा beyond the limit वाला स्वभाव दिसत होता. नवीन मुलगी पाहिली की 90 % मुलांच्या मेंदूत जे रसायन धावतं ते याच्या मेंदुतही धावलं. जेवताना याच्या तळहाताला लागलेले भाताचे कण पाहून कैवल्यच्या आईने नाक मुरडलं. त्याच्या वाईट सवयींवर दिलेल्या प्रतिक्रियांना हा फाट्यावर मारायचा... जेवून झाल्यावर कैवल्यने याला आराम करायला सांगितला आणि तो कॉलेजला निघून गेला.
संध्याकाळी कॉलेज वरून आल्यावर कैवल्यने बाईक काढली. काही अंतरावर असलेल्या एका पुलावर दोघं थांबले. सूर्यही थोडा नरम झाला होता..
" What about Sara?"
" तिच्या आईची गांड.... तिचा काय सबंध... महिन्यापूर्वीच ते पान माझ्या डायरीतून निघून गेलय.."
"बरं.. त्या नंतर किती पानं आली आहेत"
"एकही नाही"
" दुसऱ्या मजल्यावरच्या सारिकाच काय झालं?"
" ती lust story अजुन सुरू व्हायची आहे.. फक्त physical attraction आहे रे ते.. "
"त्या नंतर साराचा काही msg?"
"कशाला करेल? आणि अपेक्षा ही नाही मला.. तिच्याकडून काही response येईल अशी......"
" Frustrate होतोयस तिच्या मागे?"
" नाय रे ...."
" मग अचानक येणं"
" Change हवा होता जरा.. जरा स्वतःला ही वेळ हवा होता.."
" घरचं वातावरण?"
" माझ्या वरच्या भगवत गीतेच पारायण असतं दररोज... But I don't care... या सगळ्या गोष्टी स्वतःला मॅटर करून नाही घेत.. हा मार्ग निवडण्याचा निर्णय माझाच होता... So I can't blame anyone... ठेविले अनंते तैसेचि रहावे.... ते जाऊदे.. तुझी long distance relationship काय म्हणतेय?"
" चाललंय... पण असह्य होतं काहीवेळा.... वेळ मिळत नाही.. वेळ देता येत नाही.. गैरसमज... लवडा लसूण....."
" ये इश्क नहीं आसान... बस इतना समझ लिजिये..."
" ये आग का दर्या है... और हमें डुब जाना है...."
" नुसरत फार जवळचा वाटायला लागलाय आजकाल.... सारा गेल्यानंतर तुम्हे दिल्लगी रिपीट मोड ला ऐकलंय... सात दिवस...."
" सिगारेट आणली आहेस ?"
" येस बॉस... इथे तुझे वांदे होत असतील ना... कुत्र पण ओळखत असेल तुला इथलं...."
" होय च्यायला..... थांब.. इथे नको काढू... जरा पुढे जाऊ......"
हातातून वाळू निसटून जावी... घरच्या वातावरणाला change हवा म्हणून याने कैवल्यच्या घरची वाट धरली... दिवसा कैवल्य कॉलेजला जात असल्याने याला घरी एकटच रहायला लागत होतं. त्याची आई आणि बहिण घरी असल्याने याला कंफर्टेबल वाटत नव्हतं.. त्या दिवशी त्याची आई सुद्धा बाहेर गेली.. हा घरी एकटाच होता. टीव्ही वरच्या बुक शेल्फमध्ये अल्बर्ट एलिसच पुस्तक त्याला दिसलं.. ते पुस्तक काढायला तो पुढे सरसावणार तेवढ्यात मागून बहिणीने ....
" काही हवंय का?"
" ह्म्म.. ते अल्बर्ट एलिसच "
" वाचायचं आहे का?"
" नाही... नको... फक्त पहायचं होतं"
" असो... तसंही REBT झेपत नाही लोकांना" तिने sarcastically टोमणा मारला .."
" Rational Emotive Behavior Therapy हे वाचण्यापेक्षा मी तुकाराम गाथा prefer करेन"
" REBT आणि तुकाराम... छान दंतकथा असेल.... न्यूटनचे तिन्ही नियम आमच्या वेदात आहेत अशी एक कथा ऐकलेली मी... ते पुरणाला वैज्ञानिक संदर्भ देण्याचा वेडेपणा करण्याला सध्या बाजारात फार स्कोप आहे.. सरकार पण पाठिंबा देईल आता...."
" REBT तुकारामांनी मांडली असं नाही म्हणत.. पण त्यांच्या अभंगांत ती विद्रोही तार्किकता दिसते..."
" Rebelian rationality.... वा!!!"
" तुका म्हणे होय मनाशी संवाद.... एक वेगळा विषय आहे हा... तुकाराम...."
" आहेच... पण त्याला धार्मिक संदर्भ देऊन त्याचा अर्थ बदलला आहे..."
" तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम...... हे खरे तुकाराम....
या व्यक्तीने भाषेची बंधन पाळली नाहीत... पूर्वीच्या syllabus ला तुकारामांचा अभंग होता....
लागलीच तर देऊ कासेची लंगोटी....
" हा माहित आहे... ते खरं गांडीची लंगोटी असं आहे...."
" शेक्सपियर आणि तुकाराम.... विंदांची कविता माहित आहे ना..."
" Yesss.... तुकयाच्या भेटी शेक्सपियर आला......"
" शेक्स्पीअर म्हणे, | "एक ते राहिले ,तुवा जे पाहिले | विटेवरी"||...तुका म्हणे, "बाबा| ते त्वा बरे केले| त्याने तडे गेले| संसाराला || विंदांच कसलं perception असेल ना"
" Perception......!.... लोकं इथेच गंडतात....."
" काही संदर्भ लागला नाही..... Sorry ..."
" लागणारही नाही....."
" मला अशा माणसांचा राग येतो... स्वतःच्या भ्रमात असणाऱ्या"
" आपला जन्मच मुळात भ्रमातून झालाय.... माणूस जन्माला आल्यावर सगळ्यांना जो आनंद होतो... तोही एका प्रकारचा भ्रम आहे... प्रत्येकाच्या भोवती एका भ्रमाच जाळ असतं... आपला भ्रम किती योग्य आहे हे इतरांना सांगण्यात जो यशस्वी झाला... तो लेखक, शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ बनतो... ज्याला नाही सांगता आला तो सर्वसामान्य चुतीया......"
" तुला म्हणायचं आहे... सगळे चूतीया....."
" नाही.... सगळेच तत्वज्ञ"
" सेन्स ऑफ हुमर वाईट आहे तुझा..."
" वेलकम... तुला पाहिल्यावर मला माणिक वर्मांच गाणं आठवतं.
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ....
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी "
" उत्तम फ्लर्ट करतोस तु.... आवडलंय... But I can't entertain you..."
" Entertainment की बात कर रहे हो जनाब... हम भी डार्क नाईट वाले जोकर है...."
" पाहिलास का....? डार्क नाईट...."
" नाही.... जोकर पाहिला आहे...."
" डार्क नाईट न पाहता जोकर..... Hope your death have more cents than your life..."
" शाळेत शिकलेल change the voice अजुन लक्षात आहे तर...."
" ह्म्म्म.. "
" गोलपिठा पण आहे तुझ्याकडे....!!"
" Actually ते एका मित्राने दिलंय... तो दलीत पँथर चा कार्यकर्ता आहे..."
" ढसाळांबद्दल काय मत आहे..."
" मलिका अमर शेख बद्दल मत विचार ना!!!"
" फेमिनिझम..... वाह!!!"
" तशी फारशी फेमिनिस्ट नाही ... पण बाहेर समानतेचे धडे देऊन घरातल्या बाईला बडवायचं... कोणतं लॉजिक आहे यात?"
" Nothing interesting... त्यांच्या दृष्टीने विचार करण्यासाठी मुंबईतल्या कामाठीपुरा मध्ये जन्माला यावं लागतं... गटाराच्या होलात अडकलेल्या उंदरासारख जगावं लागतं... "
" आणि मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे... हे ही म्हणावं लागतं..."
" Anyway.... नेमाडे पण आहेत तुझ्याकडे.... हे सगळं वाचलं आहेस... की उगाच....ठेवायचं म्हणून"
" कोसला मला झेपली नाही... पहिलीच काही पान वाचून बंद केलं..."
" ओ... झेपली नाही.... फेमिनिस्ट विचारवंताकडून मला हे जमलं नाही... असं ऐकायची सवय नाही ... पुरुषांना जमू शकतं मग तुम्हाला का नाही? जाऊदे...leave it... नेमाडे झेपले नाहीत तर जी. ए. वाचल्यावर काय करशील!!"
"काही नाही... पुस्तक बंद करून कपाटात ठेवेन..."
" असो... प्रत्येक डोहाचा तळ गाठावा असं नाही... काही डोह असू द्यावे अथांग"
" वैभव जोशी.....nice....."
" एक होकार दे फार काही नको....
फार काही नको फक्त नाही नको..."
" लेव्हल 2 ....."
" म्हणजे...."
" Nothing special"

या दोघांमधला हा संवाद असाच दिवसभर सुरू असायचा... संवादाचे विषय हे कथा कविता सिनेमे यांचे असल्याने आईचं त्याकडे दुर्लक्ष असायचं... एका संध्याकाळी हा, कैवल्य आणि कार्तिकी तिघेजण त्याच ब्रिजवर मोकळे व्हायला गेले होते. या दोघांमध्ये होणारी जवलीच ही कैवल्यला दिसत होती... परत येताना कार्तिकी याच्या मागे बसली... रस्ता खडबडीत असल्याने गाडी फार हलत होती... तिच्या स्तनांचा नाजुकसा स्पर्श याच्या पाठीला झाला.... नकळत दोघांची नजर एकमेकांकडे गेली.... नजरेतून काही संदेश जाणार तेवढ्यात कैवल्यने जोरात हॉर्न वाजवला......

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

मी नुसरत ऐकणं आता सोडून देणार आहे... तुझी आठवण वगैरे येत नाही हा... तसा तू समज पण करून घेऊ नकोस... फ्लश झाल्यावर संडसातली घाण जशी वाहून जाते तसचं तुझे विचार केव्हाचेच वाहून गेलेत... कोणत्या तरी गटारात.... आता मला ते शोधायचे नाहीत.... तू आलीस... होतीस... गेलीस... होत्या नव्हत्याचां संधिप्रकाश बनून... खिडकीतून घाकोळणारी संध्याकाळची तिरीप जरा बोचरी वाटतेय खरी... पण असू दे..... मला फरक पडत नाही... सवय होऊन गेलीय मला... ही सवयच मुळात वाईट... अशा अनेक सवयी लावल्या आहेस तू मला... सकाळी फोन करून तुझं मला उठवणं... खरंतर ब्रेकअप नंतर दोन चार दिवस मला जागच आली नव्हती.... लोकांची झोप उडून जाते... माझी झोप वाढली होती.... मोबाईल गेला ते एक बरं झालं... आपले जुने फोटो आपले जुने chat... सगळं गेलंय... पण जे मनावर कोरल आहे त्याचं काय करू... एकदा मी तुला उचलून घेतलं होतं.... लाजत माझ्याकडे पहायचं टाकून तू डोळे मिटून पाहत राहिलीस मोकळ्या आकाशाकडे .... त्या क्षणी मी एकटाच तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या आनंदाचा साक्षीदार होतो.. याचा मला अजूनही हेवा वाटतो आहे... मी मध्येच एक कविता करायला घेतलेली....

तुझ्या पापण्यात झकोळत राहत
सूर्याच्या अस्वस्थतेच मळभ
मी त्या क्षणी फार पातळ होतो
अगदी कमोड मध्ये सांडलेल्या
विर्यासारखा..
तू मात्र दुधावरच्याच
खव्या सारखी एकदम घट्ट
जाणिवेतून वास्तवात
वास्तवातून जाणिवेत
प्रवास सुरू असताना
शांत दुपारी कूस बदलत
आपण झोपी गेलो होतो
त्या झाडांखाली
कोणी बघेल न बघेल
याची तमा न राखता
आपण केलेल्या प्रेमाला
या झोपे इतकं natural ठेवता
येईल का तुला?

तुला तेव्हाही ही कविता कळली नव्हती... आताही कळली नसेल...

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

त्या रात्री ते तिघेही गप्पा मारत बसले होते... कैवल्यला दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचं होतं.. तो अगोदर निघून गेला.. हा आणि कार्तिकी दोघेच.. याचा नशिकातील कदाचित तो शेवटचा दिवस होता... सुट्टीचा शेवटचा काळ सुरू झाला की शाळेत जाणाऱ्या पोराला जसं एक temporary नैराश्य येतं तसाच याचा काळ सुरू होता.. कार्तिकी ने संवाद सुरू केला....
" ग्रेस बद्दल काय मत आहे?"
" ग्रेस बद्दल कुणाचं मत बनू शकतं का?"
" ते मतही दुर्बोध ठरवलं जाईल"
" तू हसलीस तेव्हा माझ्या
हृदयात मिसळली जाई
तू दूर तरीही घेते
मज कुशीत संध्यामाई..."
" दर्द है... दर्द....."
" नाही ग.... "
" ह्म््म... किती अफेअर झालेत... वागण्या बोलण्यातून वाटतं तसं......"
" तशी दोनच... But last one was quite serious... We went deep ... Finely physical सुद्धा झालेलो.....
चार दिन रही मुहाब्बत जिंदगी में
रहा चार दिन का असर जिंदगी भर"
" इंटरेस्टिंग..... सेक्स... ?"
" नाही... तेवढं नाही..."
" शिट... सेक्स झालं असतं तर तुझं ब्रेकअप च दुःख कमी असतं...."
" हा हा हा.... "
" Apart from joke... या गोष्टी वाटतात तेवढ्या casual नसतात... "
" नसतातच"
" पण हा स्पर्श विसरता येणारा नसतो... म्हणजे it's depends ki तुम्ही किती deep आहात... हे सर्वांच्या बाबतीत नसतं..."
" तसं असतं तर लोकं रांडेच्या पण प्रेमात पडली असती....."
" मग... अजुन तिच्याच विश्वात जगतो आहेस का?"
" नाही... अजिबात नाही"
" आपलं आयुष्य म्हणजे परमेश्वराला उगाच सुचलेली कथा असते..."
" उगाच सुचलेली...!!"
" हो.. उगाच सुचलेली..."
" पाणचट फिलॉसॉफी आहे तुझी.. काय तर म्हणे परमेश्वराला उगाच सुचलेली कथा.. अशा किती कथा सुचतात तुमच्या परमेश्वराला?"
" अनंत... Infinite ."
" परमेश्वर.... माणसाने स्वतःची केलेली सर्वात मोठी फसवणूक.. "
" फसवणूक!!!"
" वैसे तो दूनियाही झुटी हैं... प्यार बिर सब झुट है रज्जो....."
" किती वेळ स्वतःला फसवणार आहेस...."
" कुणी इतर फसविणारं मिळे पर्यंत....."
" कोणी इतर मिळावं याची आशा आहे तर..."
" दुनिया उम्मीदों पर कायम है जनाब....
अब तक दिल-ए-ख़ुश-फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शमएँ भी बुझाने के लिए आ..!!
" रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ ....."
" क्या बात है...... तसा दिसताना रसिक दिसतो आहेस... मग का गेली ती"
" कुछ नहीं... ऐसे ही आई .. जिंदगी के दो तीन पंनो पर कुछ खुसुर मुसुर कीया... और चली गयी.... चलो..... निंद आ रही है ... कल अपनी मंजिल पर निकलना है.....
इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया
वरना हम भी आदमी काम के थे "
" थांब रे...."
" क्यूं रुका कर थाम रही हो मेरा हात.....
ये हात जो पकडता है वो बेवफां कहलता है....."
"मग तर पकडायचाच आहे हा हात...."
" सोच कर बोलिये मोहतरमा
सवाल जिंदगी का है. "

त्या दोघांच्यात भडकली आग शेकोटीलाही विझवत होती... भूतकाळ, जबाबदारी, प्रेम, विरह, सेक्स, भावना या सगळ्यांनी दिलेले चटके याला कमी पडले असतील कदाचित.. याच्या पोळलेल्या मनाला तिच्या नुकत्याच उमलल्या पाकळीने गोंजारायच ठरवलं होतं... भर दुपारी निजेच्या स्वाधीन झालेल्या हरणाप्रमाणे याने स्वतःला पसरून घेतलं.. एखाद्या वाऱ्याच्या लहरी सारखी ही पण त्यावर स्वार झाली... गर्द काळोखात पेटलेली ही मशाल काही केल्या विझायला तयारी नव्हती... दोघांच्याही भावनांच तेल त्यावर पडत होतं. दोन ओठ एकमेकांना समांतर झाले इतर दोन ओठांनी स्वतःला साधारण 60 अंशात वळवलं... चारही ओठांचा एकमेकांना स्पर्श होणार तेवढ्यात.........
कैवल्यने याची कॉलर धरली .......
" इथेही लफडी करायला आलास का रे भडव्या"
पुढचा संवाद हा न सांगितलेलाच बरा... सकाळी 4 च्या सुमारास हा नाशिक स्टेशनला पोहोचला.... स्टेशन वर पुस्तकांच्या दुकानाच्या खालच्या बाजूस एका मासिकाच कवर फाटलेल. कव्हर वर अर्धनग्न बाईचं एक कार्टून होतं... अर्थात ते मासिक वेगळ्याच कॅटेगरी मधलं होतं... त्याने ते मासिक उचललं आणि शेजारच्या सार्वजनिक संडासाच्या दिशेने निघाला... काऊंटरवाल्याने त्याच्याकडे पैसे मागितले.याने खिशातून पाच रुपये बाहेर काढले आणि त्याचा हातावर टेकवले.... त्या बॅग बाहेर ठेवली आणि मासिकाच ते कव्हर घेऊन तो आत जायला निघाला.... त्या काउंटर वाल्याला त्याचा संशय आलाच... त्याने त्याची मानगुटी धरली आणि त्याला बाहेर भिरकटवल .....
" लिंग पिसाट कुठले... भोसडीचे... हलवायला जागा हव्यात यांना... काय घाण करायची आहे ती घरी करा ना...."

याने मातीत मळकटलेली ती बॅग उचलली... मुंबईच्या उलट दिशेने जाणारी गाडी पकडून निघाला.. त्याच्या आयुष्याची उगाच सुचलेली कथा पूर्ण करायला....

( To be always continued)

- कप्रघा

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी पूर्ण गोष्ट वाचायची आहे, पण सुरूवात आवडली आहे.
-----------
आवडली आहे कथा.

तिकिटांच्या खर्च वाचल्याने त्याच्या खिशात बऱ्यापैकी पैसे असतात. मित्राच्या घरचा पत्ता माहीत नसला तरी त्याला त्याच्या गावचा ठाव ठिकाणा माहित असतो. नाशिक बस स्टँड वरून तो सिन्नर ला जायची बस पकडतो.

इथे काळ थोडा हुकला आहे - भूतकाळाऐवजी चालू वर्तमान आहे तेव्ढा खटकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Okkk

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0