दिवाळीतले फटाके

नुकतीच दिवाळी होऊन गेली, त्यानिमित्य लोकांनी मनसोक्त फटाके उडवून घेतले असतील. हे फटाके म्हणजे काय असतात याबद्दल कोणी विचारही केला असेल. मीही केला आणि जे जाणवले ते एका लहानशा लेखात लिहून काढले.

आश्विन अमावास्येच्या काळोखात दिव्यांच्या रांगा लावून 'दीपावली' साजरी करण्याची परंपरा 'दिवाळी' या सणाने सुरू झाली. त्याला शेकडो वर्षांचा काळ उलटून गेला. आजही धार्मिक परंपरा किंवा शास्त्र म्हणून दिवाळीमध्ये रोज संध्याकाळी घरोघरी तेलाच्या पणत्या लावल्या जातातच. पण विजेच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश मिळण्याची सोय झाल्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे आकाशकंदील आणि झगमगणार्‍या दिव्यांच्या माळांनी अत्यंत नेत्रदीपक अशी रोषणाई करणे सुरू झाले. आज कोणत्याही शहरात एक फेरफटका मारून पाहिल्यास त्याची प्रचीती येईल. लहान मुलांनी विजेशी खेळणे सुरक्षित नसते आणि त्यांना ते करणे शक्यही नसते म्हणून बहुतेक घरी हे काम मोठी माणसेच करतात. दिवाळीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे फराळ. पूर्वीप्रमाणे आता सगळे खाद्य पदार्थ घरी तयार करण्याची खटपट केली जात नाही. मोठ्या शहरात तर मिठायांचे इतके वेगवेगळे प्रकार आता मिळतात आणि ते आकर्षक वेष्टनांमध्ये विक्रीसाठी मांडून ठेवले जातात की दिवाळीसाठी तेच मोठ्या प्रमाणात आणले जातात. हल्लीच्या काळात वर्षभरच चांगले चुंगले खाऊन जिभेचे चोचले पुरवणे चाललेले असते. त्यामुळे दिवाळीच्या फराळाची पूर्वीसारखी अपूर्वाई राहिली नाही. या सगळ्यांच्या तुलनेत दिवाळी म्हंटले की लहान मुलांना लगेच कशाची आठवण प्रकर्षाने येत असेल तर ती फटाक्यांचीच !

पुराणातल्या कहाण्यांमध्ये फुलापानांच्या माळा, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या वगैरे इतर प्रकारच्या सजावटीचे उल्लेख सापडतात, दीपज्योती तर कुठल्याही मंगल प्रसंगी आवश्यकच असते, पण गंमत म्हणून धडाडधूम आवाज करणारे फटाके उडवणे दिसत नाही. स्फोटकांचा शोध चीनमध्ये लागला आणि फटाक्यांचा उपयोगही सर्वात आधी म्हणजे सातव्या शतकात चीनमध्ये सुरू झाला. त्याचे तंत्रज्ञान तिकडून युरोपमध्ये गेले आणि त्यांनी त्यात प्रचंड प्रगती आणि सुधारणा केली. ब्रिटीशांच्या काळात त्याची भारतात आवक झाली आणि फटाके उडवणे हा कोठल्याही उत्सवाचा अविभाज्य भाग झाला. इतर समारंभ एका कुटुंबापुरते किंवा एका समूहापुरते मर्यादित असतात, पण दिवाळी हा सर्वांचाच सण असल्याने त्याचे कानठळ्या बसवणारे आवाज एकाच वेळी सगळ्या बाजूने येत राहतात.

प्रकाश आणि ध्वनि यांच्या निर्मितीमधून काही धमाल उडवण्याचा प्रयत्न दिवाळीत उडवायच्या दारूमधून केला जातो. त्यामुळे लहान किंवा मोठा आवाज करणारे फटाके आणि निरनिराळे प्रकाश उत्पन्न करणारी उत्पादने असे दोन मुख्य प्रकार यात असतात. याशिवाय आकाशात उडणारे अग्निबाण असतात, तसेच यांना एकत्र आणणारे फटाके असतात. कशात आधी अग्निबाण आकाशात उडतो आणि वर गेल्यानंतर त्याचा स्फोट होऊन धमाका होतो किंवा त्यातून चमकदार ठिणग्यांचा वर्षाव होतो. लहानशा फटाकडीपासून सुतळी बाँबसारख्या मोठ्या फटाक्यापर्यंत त्यात अनेक प्रकार असतात, तसेच फुलबाजी, भुईचक्र आणि कारंजे वगैरे निरनिराळ्या प्रकाराने प्रकाशाची आतिशबाजी केली जाते. त्यातही एकाच रंगाच्या किंवा विविध रंगांच्या ठिणग्या उडवल्या जातात.

हे सारे फटाके कोणत्या तत्वावर काम करतात हे अनेकांना ठाऊक नसते पण ते जाणून घ्यायची इच्छा असते. त्यांचे कुतूहल शमवण्याचा एक लहानसा प्रयत्न या लेखात केला आहे. आपण साधा कागद किंवा लाकडाचा तुकडा जाळतो तेंव्हा त्यांच्यामधील मुख्यतः कार्बन व हैड्रोजनच्या अणूंचा हवेमधील प्राणवायूच्या अणूंशी संयोग होऊन कार्बन डायॉक्साईड वायू आणि पाण्याची वाफ तयार होते आणि त्या रासायनिक क्रियेत या पदार्थांमधून ऊष्णता बाहेर पडते. त्यामुळे त्या ठिकाणचे तपमान वाढते आणि त्यातून निघालेल्या प्रकाशकिरणांमुळे आपल्याला जाळ दिसतो, तसेच त्यात हात घातल्यास हाताला चटका बसतो. या जळण्यात कागद किंवा लाकडामधील काही कण जळत नाहीत, त्यातले सूक्ष्म कण हवेत पसरल्यामुळे त्यातून धूर तयार होतो आणि काही कण राखेच्या रूपाने खाली राहतात. ज्वलनाची क्रिया होण्यासाठी जळणारा पदार्थ आणि प्राणवायू यांची आवश्यकता असते आणि ही क्रिया उच्च तपमानालाच होऊ शकते. यामुळे वातावरणाच्या तपमानात (रूम टेंपरेचरला) कागद किंवा कपडे ठेवल्या जागी आपोआप पेट घेत नाहीत.

गंधक, कापूर यासारखे ज्वालाग्राही पदार्थ पटकन पेटतात आणि भुरूभुरू जळतात. काही रासायनिक पदार्थांमध्ये जादा प्राणवायू असतो आणि उच्च तापमानाला तो त्यांच्यामधून बाहेर पडतो. अशी रसायने आणि ज्वालाग्राही पदार्थ यांचे मिश्रण स्फोटक बनते. त्यांचे ज्वलन होण्यासाठी बाहेरील हवेमधील प्राणवायूची आवश्यकता नसते. एका ठिणगीने त्यांच कण पेटवले की त्यांच्या ज्वलनामधून अधिकाधिक ऊष्णता बाहेर पडत जाते आणि ते जळत जातात. बंदुका व तोफा यांना उडवण्यासाठी लागणारी किंवा सुरुंगाची दारू या प्रकारची असते. दिवाळीच्या फटाक्यांमध्ये याच प्रकारची दारू सौम्य रूपात वापरली जाते.

फटाका तयार करतांना कागदाची जाड गुंडाळी करून त्यात ही दारू भरतात आणि त्याला जोडलेली एक कागदाची वात बाहेरपर्यंत ठेवली जाते. या वातीवर दारूचा पातळसा थर दिलेला असतो. ती पेटवली की हळूहळू आतपर्यंत जळत जाते. यामुळे पेटवणार्‍याला दूर पळायला वेळ मिळतो. कागदाच्या गुंडाळीच्या आतील दारू बाहेरील हवेशिवायच पेट घेते. त्यांच्या ज्वलनातून जे वायू बाहेर पडतात त्यांचे आकारमान मूळ स्थितीच्या शेकडो पटीने जास्त असते आणि त्यांना व्यापण्यासाठी फटाक्याच्या आत पुरेशी जागा नसल्यामुळे त्या वायूचा दाब वाढत जातो. कागदाचे वेष्टण आतल्या बाजूने जळत जाऊन कमकुवत होत जाते. अखेर आतला दाब सहन न झाल्यामुळे ते टराटरा फाटते आणि आतील वायू सर्व बाजूंनी वेगाने बाहेर पडतो. त्यामुळे हवेत कंपने निर्माण होऊन मोठा ध्वनि निघतो. हे सगळे क्षणार्धात होते. फटाक्यामधील दारूचा प्रकार आणि प्रमाण यानुसार लहान किंवा मोठा स्फोट होऊन थोडा किंवा कानठळ्या बसवणारा आवाज निघतो. अगदी लहानशा कागदाच्या दोन गोल तुकड्यांमध्ये कणभर दारू ठेवून टिकली तयार होते. ती खेळातल्या पिस्तुलात ठेऊन तिचा घोडा ओढला की पिस्तुलातला खटका दाणकन टिकलीवर आदळून तिच्यातल्या दारूचा लहानसा स्फोट होतो. अनेक फटाके एकमेकांना जोडून त्यांची माळ तयार करतात आणि त्यातले सारे फटाके एकदम न उडता ते एकामागोमाग एक करून उडावेत अशी त्यांची रचना केली असल्यामुळे ती माळ काही सेकंद किंवा मिनिटे तडतडत राहते.

फटाक्याच्या वेष्टनाची गुंडाळी करतांना तिच्या एका बाजूला मोकळी वाट ठेवली तर ज्वलनामुळे आत निर्माण झालेले वायू त्यातून वेगाने बाहेर पडतात आणि न्यूटनच्या तिस-या नियमानुसार त्याच्या प्रतिक्रियेमुळे तो फटाका उलट बाजूने दूर फेकला जातो. अग्निबाणामधील फटाक्याला खालच्या बाजूने मोकळी वाट असते. त्यातून हे ऊष्ण वायू बाहेर पडतात आणि काडीला जोडलेला फटाका आभाळात उड्डाण करतो. त्याच फटाक्यातल्या दुसर्‍या कप्प्यात आणखी थोडी दारू भरलेली असते. बाण आकाशात उंच उडल्यानंतर ती दारू पेटते आणि तिचा स्फोट होतो.

शोभेच्या दारूला जाड वेष्टण नसते. तिचा एकदम स्फोट होऊ नये म्हणून तिच्यात काही न जळणारी रसायने किंवा धातूंचा भुगा मिसळतात. त्यांना तापवल्यावर उच्च तपमानाला त्यांचा रंग बदलतो. उदाहरणार्थ कॅल्शियमचा रंग केशरी होतो तर सोडियमचा पिवळा, तांब्याचा निळा तर बेरियमचा हिरवा. पांढरा शुभ्र प्रकाशासाठी मुख्यतः मॅग्नेशियम किंवा अॅल्युमिमियमचा वापर होतो. मॅग्नेशियम धातू स्वतःच ज्वालाग्राही असल्यामुळे त्यातूनच अत्यंत चमकदार अशा ठिणग्या पडतात. फुलबाजी पेटवली की तिच्या काडीला चिकटवलेली दारू किंवा मॅग्नेशियमची पूड जळत राहते. त्याचबरोबर या भुग्याचे कण तापून चमकतात आणि त्यांच्यामधून रंगीबेरंगी प्रकाशकिरण बाहेर पडतात. भुईचक्र तयार करण्यासाठी ही शोभेची दारू एका कागदात गुंडाळून तिचे वेटोळे लहानशा भिंगरीला चिकटवतात. त्यामुळे ती प्रकाशाचे झोत टाकत स्वतःभोवती गोल गोल फिरत राहते. एका कोनिकल आकाराच्या वेष्टनात बरीच दारू भरून ठेवली तर त्याचे झाड किंवा कारंजे होते.

फटाके तयार करतांना त्यातून होणारे स्फोट विध्वंसक होऊ नयेत इतपत लहान ठेवले असतात, पण माणसाला धाडसाचे वेड असल्यामुळे तो त्याचा आकार वाढवत जातो. असे मोठ्या आकाराचे फटाके उडवतांना पुरेशी काळजी घेतली नाही आणि कोणी त्या फटाक्याच्या अगदी जवळ आला तर स्फोटाच्या धक्क्याने त्याला इजा होऊ शकते. ढिले किंवा ज्वालाग्राही कपडे पेट घेऊन तो माणूस भाजू शकतो. फार मोठ्या आवाजाने त्याचे कान बधीर होऊ शकतात. एकादी ठिणगी डोळ्यात गेल्यास अंधत्व येऊ शकते. लहान मुले आणि वृध्द लोकांची सहनशक्ती कमी असते. त्यामुळे जो प्रखर उजेड किंवा आवाज मोठे लोक सहन करू शकतात, त्यांच्यामुळे लहान मुलांना किंवा वृध्दांना इजा होऊ शकते. पर्यावरण हा एक नवा मुद्दा अलीकडे अधिकाधिक महत्वाचा होत चालला आहे. दिवाळीनिमित्य फार मोठ्या प्रमाणात फटाके उडवले गेल्यामुळे त्यांच्या ज्वलनामधून निघालेले विषारी वायू हवेत मिसळतात आणि त्रासदायक ठरतात. ज्या लोकांची श्वसनसंस्था कमकुवत असते अशा लोकांना श्वास घेणेसुध्दा जड जाऊन त्यांचा जीव व्याकूळ होतो. या सगळ्यांचा विचार करून केवळ मौज म्हणून फटाक्यांवर कमी भर देणेच योग्य आहे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सोप्या शैलीत सांगितलेली फटाक्यांची माहिती आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे बरेच माहिती करून घ्यायचे होते. बरं झालं, तुम्ही लिहिलंत. फटाके उडतात कसे, हा प्रश्न सुटला एकदाचा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेखनासाठी धन्यवाद.

'केपा' किंवा 'आपटीबार' या प्रकारात तापमान वाढ होऊन स्फोट होतो का ?
की केवळ 'क्षणार्धात दाबात बदल' झाल्याने स्फोट होणे शक्य आहे ? (यान्त्रिक उर्जा तात्काळ कुठल्या उर्जेत रुपान्तरित होते ?)

चकमकीचे दगड घासून ठिणगी पडू शकते. तसे काही 'केपा'न्त असेल असे प्रथमदर्शनी वाटत नाही. 'आपटीबार' उघडून पाहिला तर केवळ फटाक्याची दारू आणि छोटे खडे एकत्र बान्धलेले दिसतात. तिथे ठिणगी पडण्यास वाव आहे. पण निश्चित स्पष्टीकरण मिळाल्यास बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गंधक, कापूर यासारखे ज्वालाग्राही पदार्थ पटकन पेटतात आणि भुरूभुरू जळतात. काही रासायनिक पदार्थांमध्ये जादा प्राणवायू असतो आणि उच्च तापमानाला तो त्यांच्यामधून बाहेर पडतो. अशी रसायने आणि ज्वालाग्राही पदार्थ यांचे मिश्रण स्फोटक बनते. त्यांचे ज्वलन होण्यासाठी बाहेरील हवेमधील प्राणवायूची आवश्यकता नसते. एका ठिणगीने त्यांच कण पेटवले की त्यांच्या ज्वलनामधून अधिकाधिक ऊष्णता बाहेर पडत जाते आणि ते जळत जातात.'
हे मी माझ्या लेखात लिहिलेले आहे. केपा, आपटीबार वगैरेंमध्ये असेच मिश्रण असते. आपटण्याच्या क्रियेमधील मेकॅनिकल एनर्जीचे रूपांतर ऊष्णतेत होऊन ठिणगी पडते. त्यामुळे स्फोटक मिश्रणाचे क्षणार्धात ज्वलन होते आणि त्यामध्ये असलेली केमिकल पोटेन्शियल एनर्जी स्फोटाच्या रूपात बाहेर पडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लेखन
लहानपणी 'नाग / साप' अश्या नावाच्या काही गोळ्या मिळत.. त्या जाळल्या की त्यातून जळलेल्या काजळीचे 'नाग' बाहेर पडत.. धूर खुप होई पण हे इतर फटाक्यांपेक्षा वेगळे होते. हे कसे होत असावे हे मात्र समजले नाही - कल्पना आहे काय?.

बाकी,(घारेसर फेम Wink ) आकृत्या लेखात असत्या तर लेख अधिक प्रकाशमान झाला असता असे वाटून गेले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धूर कशामुळे होतो हे मी एका वाक्यात असे दिले आहे, "या जळण्यात कागद किंवा लाकडामधील काही कण जळत नाहीत, त्यातले सूक्ष्म कण हवेत पसरल्यामुळे त्यातून धूर तयार होतो आणि काही कण राखेच्या रूपाने खाली राहतात."
उदबत्ती, धूप वगैरेंमध्ये मंदगतीने ज्वलन होत असते. (जाळ नसतो) त्यात न जळलेले सूक्ष्म कण हवेत पसरतात आणि त्यांच्यासोबतीने त्यात मिसळलेल्या सुगंधी द्रव्यांची वाफही पसरते. नाग साप वगैरेंमध्ये त्वरेने जळणारी आणि मुळीच न जळणारी रसायने मिसळलेली असतात. त्वरेने जळणारी रसायने ऊष्णता निर्माण करतात आणि न जळणार्‍या रसायनांमधून धूर आणि राख निघतात. त्यांचे आकारमान (व्हॉल्यूम) मूळ द्रव्यांच्या अनेकपट असल्यामुळे आपल्याला गोळीमधून साप बाहेर पडल्यासारखे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नको फटाक्याची वात लावू विवेकाची ज्योत
वाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/