खजिना (१/८)

~~~सरस्वती लिमये उर्फ सखु~~~

बरोबर सात वाजता मी दार उघडले आणि मला आश्चर्यच वाटले. रोज माझे पहिले काम असे की प्रो.मानकामेंच्या घरी आलं की दारातला पेपर घ्यायचा, चहा बनवायचा, व्यवस्थित टी-कोझी वगैरे जामानिम्यासहित प्रो. मानकामेंना उठवायसाठी त्यांच्या बेडरूमचे दार हलकेच वाजवायचे, त्या आवाजानेही प्रो.मानकामे जागे होत आणि मला आत यायला सांगत, मग त्यांना बेड-टी सर्व्ह करायचा आणि मग इतर घरकाम करून ९ वाजेपर्यंत गावच्या वाचनालयात पोचायचे. मी ते वाचनालय चालवते, माझी नोकरीच आहे ती - ग्रामपंचायतीने दिलेली-पण तिथे येणारे वाचक मोजकेच. एकेकाळी मानकामेंच्याच पुढाकाराने इथे वाचनालय सुरू झाले होते. तर ते असो. आज दारात पेपर तर नव्हताच उलट प्रो. मानकामे अगदी आंघोळ वगैरे करून तयार होऊन चहा पीत हॉलमध्येच बसले होते. टेबलच्या मागे त्यांच्या जुन्या मात्र चकचकीत कर्णा असलेल्या ग्रामोफोनवर कुठल्याशा उस्तादांची गायकी असलेली तबकडी एखाद्या जात्यासारखी एकसारखी फिरत होती आणि त्या तालावर पाय हालत असले तरी एका विचारात गढलेले तरीही उत्सुक डोळे माझ्यासाठी नवे होते.

मानकामे ही आमच्या गावातील एकेकाळची अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती. घरच्या हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन पुढे शहरात जाऊन त्यांनी प्रोफेसर म्हणून नाव कमावले. मात्र त्यांचे करियर ऐन भरात असताना -त्यांचे नाव मोठमोठ्या राष्ट्रीय, एखादवेळी आंतरराष्ट्रीय परिषदांत, घेतले जात असतानाच - आपल्या वयाच्या चाळिशीतच त्यांनी आमच्या गावाला- काळिमापूरला किंबहुना गावापेक्षा गावाबाहेरच्या वस्तीवर- परतण्याचा निर्णय घेतला. आमच्या गावाबाहेरची ही 'वस्ती' म्हणजे काही शतकांपूर्वी विविध गावांनी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांना डांबण्याची / वस्तीची जागा. तिथे तुरुंग नसावे मात्र त्या वस्तीभोवती सगळ्या बाजूने एक खोल खंदक होता त्यात पाणी, मगरी वगैरे सोडले जायचे म्हणतात शिवाय उंच तटबंदी होती आणि आत शिरायला एकच दार आणि त्याच्या आधी मुख्य गावाला जोडणारा पुल. सार्‍या पंचक्रोशीत काळिमा फासणार्‍या व्यक्तींची वस्ती म्हणून, ती वस्ती आणि त्याची राखण करणारे हे आमचे त्याच्या जवळचे हे गाव काळीमापूर नावानेच प्रसिद्ध झाले. आताच्या काळातही या गावाबाहेरच्या वस्तीची ख्याती वाईटच होती. त्या वस्तीभोवती अजगरासारखा विळखाघालून वर्षानुवर्षे पडून राहिलेला तो खंदक, सभोवतीची तटबंदी आणि त्यावरचा गावाला जोडणारा पूल इतके अजूनही उरले होते. मात्र त्या तटबंदीमागे काय आहे याची सध्या हयात असलेल्यांपैकी कोणालाही कल्पना नव्हती. मात्र मानकामेंनी इथे आल्या-आल्या त्या वस्तीत जाऊन राहायची इच्छा घोषित केली आणि लोकांना ते आवडले नाही. इतकेच नाही तर त्यांनी पहिल्या वर्षात दोनदा त्या भागात जायचा दरवाजा - ज्याला काळा दरवाजा म्हणत- तो उघडायचा प्रयत्न केला होता त्यानंतर गावाने जवळजवळ त्यांचे नाव टाकले होते. केवळ हे आमच्या गावचे एकमेव हुशार व्यक्ती आहेत असे मला वाटते म्हणून सकाळी मी सकाळी वाचनालयात जाण्यापूर्वी त्यांच्याकडे दोन-चार पोळ्या, भाजी, भात आणि इतर असेल ते काम करून जाते.

आमच्या गावाचाच नाही तर आजूबाजूच्या सगळ्यांचा असा समज आहे की ती शापित वस्ती आहे. लौकिकार्थाने आता ती ओसाड असली तरी तिथे त्यावेळच्या गुंडांची, अतृप्त आत्म्यांची वस्ती आहे. त्या वस्तीत दरवर्षी एका व्यक्तीची बळी म्हणून पाठवणी सुद्धा होते. मात्र स्वत: सायकॉलॉजीचे प्रोफेसर असणार्‍या मानकाम्यांचा यावर विश्वास अर्थातच नाही. त्यांना स्वतः त्या वस्तीत राहून बघायचे होते. मात्र गावकर्‍यांचा विरोध आणि आल्या आल्या आपले मनसुबे उघड बोलण्याची केलेली चूक यामुळे गावकर्‍यांनी तलाठ्यातर्फे त्यांच्यावर कायदेशीर बंधने आणवली होती. गेल्या वर्षीच मानकामेंनी कोर्टात केलेल्या अपिलाचा निकाल लागला आणि मानकामेंना या भागात 'संशोधनासाठी' जाण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र गावकर्‍यांच्या विनंतीवरून त्यांनी त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आणि स्वतः या वर्षीचा 'नरबळी' म्हणून त्या 'वस्तीत' जायची गावकर्‍यांची 'ऑफर' स्वीकारली आहे. गावकरीसुद्धा आश्चर्यचकित झाले तरी आपला नंबर वाचला या आनंदात तयार झाले.

आज होळीच्या आधीचा तिसरा दिवस आहे आणि म्हणूनच मानकामेंच्या चेहर्‍यावरचा तजेला बघून मनात चर्रही झाले आणि त्याहून अधिक आश्चर्य वाटले होते. माझ्या चेहर्‍यावरचे भाव बदलत असतानाच प्रो. मानकामे म्हणाले "सखु, सरपंचांना सांगावा धाड, की आज संध्याकाळी सगळ्या ज्येष्ठ मंडळींना माझ्याकडे मीटिंगला बोलावले आहे म्हणून. त्या वस्तीवर जाण्याच्या प्लॅनमध्ये थोडा बदल करायचा आहे" मी निरोप ऐकूनच थक्क झाले. मनात एक आशेचा किरणही दिसू लागला. मात्र मला त्यांचा स्वभाव बराच माहीत झाला होता. आत्ता मानकाम्यांशी एकही शब्द न बोलता फक्त एक होकारार्थी हुंकार दिला आणि घरकामाला लागले. काही वेळातच दारावरची घंटी वाजली. दार उघडले तर समोर सहाएक फूट उंच, टीशर्ट आणि जीन्स घातलेला, उत्तम शरीरयष्टीचा साधारण चाळिशीचा एक माणूस उभा होता. मी काही विचारणार इतक्यात प्रो. मानकामे मागून जवळजवळ पळतच आले "अरे साळवी! अगदी वेळेवर आलास! सैन्याची शिस्त आहे म्हणा! बरं का सखु हा साळवी माझा कॉलेजातील मित्र आणि आता आर्मीतून रिटायर्ड. जा चार चहा टाक"
"चार?"
"हो, ह्यालाच दोन कप लागेल आणि मंदार येत असेलच"
मी आत गेले तरी त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं
"मंदार कोण?" एखाद्या वाघाने म्याव करावे तसे त्यांच्या आवाजाने मला झाले. त्यांच्या इतक्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या मानाने आवाज अगदीच सामान्य होता.
"अरे मंदार माझ्या कॉलेजातील एक विद्यार्थी होता. २००८ ची ब्याच."
"तुझ्यासारखा सायको?"
"नाही नाही. तो इतिहासाचा विद्यार्थी. पुढे आर्किओलॉजीत विशेष शिक्षण घेऊन पुरातत्त्वखात्यात नोकरीसाठी प्रयत्न करत होता. अरे बाकी बोलायला बराच वेळ आहे. ती वरची खोली तुम्हा दोघांची, चहा-नाश्ता होतोय तोवर फ्रेश होऊन ये. त्या खोलीत दिव्याचा होल्डरच बिघडलाय. २-३ दिवसांचा तर प्रश्न आहे म्हणून नाही दुरुस्त करत बसत आता, कर अ‍ॅडजेस्ट."
"ते ठीक आहे, त्या वस्तीबद्दल बोलायचे होते" बॅग उचलता उचलता साळवी म्हणत होते "तुझे पत्र मिळाल्यावर लगेच निघालो, पण त्या जागेबद्दल बर्‍याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत."
मानकामे दबक्या आवाजात म्हणाले तेही मी ऐकलं "त्यावर मग बोलू सखुला जाऊ दे"

एखाद्या ढगाळ दिवशी उगाचच वाटत तसं मला अचानक भयाण, एकटं वाटू लागलं.

~~~साळवी~~~

समोर मानकामेला बघितलं आणि चकीत झालो. "कॉलेजात कसा होता आणि आता काय झालाय! साला तेव्हा तीन तीन पोरींना वेगवेगळ्या वेळी गाठून पॅरलली फिरवायचा, रोज माझ्याबरोबर सकाळी तासभर पळायला यायचा. आता त्याने तसंच करावं असं नाही पण आत तो अगदीच खालावला आहे. पण डोळ्यात तीच चमक आहे." गरम पाण्याच्या शॉवरखाली अंगाला शेक देत असताना विचार चालू होता.
इतक्यात खाली घंटी वाजल्याचा आवाज झाला. मघाशी ज्या बाईने दार उघडलं तिनेच उघडलं असावं.. मला आवाज ऐकू येत होते. दोन पुरुषांचे आणि एका बाईचा. मगाशी जी बाई होती तिचा आवाज मी नीटसा ऐकला नव्हता त्यामुळे तीच बोलत असेल असा अंदाज केला. दुसरा आवाज कोण तो मंदार आहे त्याचा असावा असे वाटले. बाथरूम मधून बाहेर आलो, समोरची खिडकी उघडली. बरेच वर्षे उघडली नसावी. बिजागर गंजलेली होती. काही अंतरावरच एक पुरातन तटबंदी दिसत होती. बरीच उंच होती आणि मी जिथे उभा होतो तिथून आत काय असेल त्याचा अंदाज करणे कठीण होते. तटबंदी इतकी जुनी असूनही बरीचशी शाबूत होती. काही ठिकाणी उगवलेले चुकार पिंपळ सोडले तर फारसे गवतही नव्हते. तटबंदीला झरोके होते, शिवाय बुरुजासारख्या गोलाकार भागावर तर बसायसाठी, टेहळणीसाठी सज्जा होता. मी त्या सज्ज्याकडे पाहत असतानाच तेथून काहीतरी चमकले, एखादा आरशावरून रिफ्लेक्शनने कवडसा पडावा तसे. एखादा क्षणच. मी डोळे फाडून पुन्हा तिथे पाहू लागलो पण तसे काहीच दिसेना.
इतक्यात मागे कोनीतरी उभे आहे असा भास झाला
"अगबाई.. सॉरी हा!"
मागे बघितलं तर एक तरुण-तरुणी उभे होते. मला सॉरी का म्हणताहेत याचा विचार करेपर्यंत लक्षात आले की फक्त पंचात त्यांच्यासमोर उभा आहे.
"ओह इट्स ऑल राइट, मी आता कपडे घालून आलो. तू मंदार ना!? आलोच मी."
मी बॅगेतून कपड्यांचा जोड घेऊन पुन्हा बाथरूममध्ये गेलो. दोन दिवसाच्या प्रवासानंतर स्वच्छ करकरीत कपडे घालून प्रफुल्ल वाटू लागले होते. बाहेर आलो तरी मंदार आणि ती तरुणी गोंघळून तिथेच उभे होते. मी पुढे होऊन त्या तरुणाशी हस्तांदोलन केले
"अरे बी कंफर्ट्रेबल. मी आंजनेय साळवी!"
"होय सरांनी तुमच्याबद्दल माहिती दिली होती. मी मंदार. मंदार गोडसे. आणि ही फातिमा, माझी प्रेयसी आणि ह्या मिशन मधली आपली कंपॅनियनही"
"मिशन? मला तर प्रा. मानकामे म्हणाले होते.."
"येस मिशन.. तुला मी मुद्दामच नीट कल्पना दिली नव्हती. आताच सखु आपल्या चार जणांचं जेवण आटपून गेलीये तेव्हा आपण मोकळेपणाने बोलू शकतो" मानकामे रूममध्ये शिरता शिरता बोलत होता "हे एक मिशनच असेल. त्या आधी मंदार, फातिमा तुम्हा दोघांसाठी शेजारची खोली उघडूनच आलो आहे. तिथे ठेवा सामान. मला माहीत नव्हतं फातिमालाही येणं जमेल. पण बरं झालं आलीस. केमिस्ट्री शिकत असली तरी उत्तम गातेस याचं मला जास्त कौतुक आहे."
थोडं फार जुजबी बोलून मंदार आणि फातिमा त्यांच्या खोलीत फ्रेश व्हायला गेले. मी पूर्ण गोंधळलो होतो. ते जाताच मी प्रश्न सुरूच केले
"मिशन? अरे काय मिशन? कसलं मिशन? तू तर मला सांगितलंस की त्या बंद तटबंदीच्या मागे तुला संशोधनासाठी जायची परवानगी मिळाली आहे. त्यासाठी मदत म्हणून निघून ये. इथे हे दोघं, तू, मी असे मिळून काय करणार आहोत?"
"अरे हो हो सांगतो. आधी बस इथे." मी खिडकी शेजारच्या खुर्चीत बसलो. समोरच्या खुर्चीत मानकामे बसता बसता सांगू लागला "हे बघ मला परवानगी कशी मिळाली हे तर मी सांगितलेच आहे. गावकर्‍यांना वाटते आहे की मी एकटाच आत जाणार आहे, मात्र तुम्हालाही यायचे आहे हे मी आज रात्री गावकर्‍यांना सांगेन, पटवून देईन. तुला प्रश्न असा असेल की नक्की इतके जण कशाला? आपण काय करणार आहोत? तर त्या आधी या 'वस्ती'चा तुला थोडा इतिहास सांगतो. ही तटबंदी, मुळात एक भुईकोट किल्ला असून तो बहामनी साम्राज्याच्यावेळी बांधला गेला असावा असा अंदाज आहे. हा किल्ला नक्की कोणी बांधला हे सांगता येणे कठीण असले तरी 'अल्लाउद्दीन अहमद शहा बहामनी' च्या दस्तऐवजांत या किल्ल्याचा उल्लेख मिळतो. अश्तूर-ए-हिंद ने जंगलात बांधलेल्या किल्ल्याचे उद्घाटन किंवा नामकरण करायचे आहे त्याचा खर्च किती येईल असा प्रश्न या राजाने आपल्या प्रधानाला विचारलेला आढळतो. मात्र हा किल्ला त्याआधीच बांधलेला असला पाहिजे. अश्तूरला पहिल्या अहमद शहाची कबर आहे तिचा उरूसही दरवर्षी असतो, तेव्हा हा किल्ला अहमद शहाने किंवा त्याआधीच्या राजाने बांधायला सुरवात केली असावी. प्रश्न असा की इथे आजूबाजूला कोणतेही मोठे शहर नाही, तीन बाजूला डोंगर आहेत, आजूबाजूला झाडी आहेत, अश्या ठिकाणी किल्ला बांधायचे प्रयोजनच काय? गावकर्‍यांचा समज आहे की इथे तत्कालीन राजाचे जेल होते. आजूबाजूच्या जंगलात असणारी हिंस्र श्वापदे, कोणत्याही नागरी भागापासून सुदूर असे हे ठिकाण कैदखाना असूही शकतो पण मला तसे वाटत नाही."
आमचे बोलणे चालू असताना मंदार आणि फातिमाही खोलीत आले आणि आमच्या बोलण्यात व्यत्यय येणार नाही अश्या बेताने आरामखुर्च्या उघडून बसले. फातिमा आपले प्रवासाने शिणलेले अंग लोटून आमचे बोलणे डोळे मिटून ऐकू लागली, तर मंदार एकीकडे मोबाइलशी चाळा करत आमचे बोलणे ऐकत होता. मानकामे एखादा क्षण थांबले आणि पुढे सांगू लागले
"तर मला तो कैदखाना असेल असे वाटत नाही. आता मंदार आला आहे तो यावर विस्ताराने काही गोष्टी सांगेलच. पण माझा तर्क आधी सांगतो. कैदखान्यासाठी इतकी सुदूर जागा असली तरी इथे येण्यासाठी कोणतीही सोपी वाट उपलब्ध ठेवलेली नाही. आताच्या काळातही इथे वाहनतळ नाही की कोणतेही वाहन येत नाही. खंडोबाच्या डोंगरापल्याड एस्टी किंवा वाहनाने येऊन डोंगर, माळरान तुडवत गावाला पोहचावे लागते हे तु पाहिलेसच. त्या काळच्या परिस्थितीचा तर विचारच केलेला बरा. अशा परिस्थितीत कैद्यांना आणणे, नेणे याची सोय दिसत नाही. दुसरे असे की कैदखान्यांना टेहळणीसाठी प्रत्येक कोपर्‍यावर बुरूज असायला हवा, जेणेकरून कैद्यांच्या मुव्हमेन्टवर लक्ष ठेवता येईल. मात्र इथे एकतर तटबंदी अतिशय उंच आहेच परंतू दरवाज्याच्या जवळचा सज्ज्याचे दोन बुरूज सोडले तर अन्यत्र टेहळणी बुरूज नाही. "
"सर!" मंदार बोलू लागला "अजून एक गोष्ट येताना दिसली ती म्हणजे खंडोबाच्या डोंगरावरूनही तटबंदी मागे काय आहे हे दिसत नाही इतकी तटबंदी उंच आहे. त्या काळाचे किल्ले किंवा कैदखाने इतके उंच कधीच नसत. शिवाय हा कैदखाना असता तर त्याचा उल्लेख नंतरच्या जमाखर्चांच्या नोंदीमध्ये किमान सैनिकांना पाठवलेल्या राजपत्र, दंडपत्रांमध्ये असायला हवा होता पण नवाब'अल्लाउद्दीन'नंतर या ठिकाणाचा उल्लेखही कुठे दिसत नाही. अर्थात असा माझा कालपर्यंत समज होता "
"म्हणजे?" मी आणि मानकामे दोघेही कोरसमध्ये विचारले.
"आतापर्यंत आपण जेवढे बोलत होतो तितकीच माहिती मला कालपर्यंत होती. मात्र काल इथे यायला निघायच्या आधी आमच्याकडे फातिमाचे काका अहमदमियाँ तिला भेटायला आले होते. त्यांनी जे सांगितले ते अत्यंत रोचक आहे"
"अरे मग सांग लगेच, वी आर ऑल इयर्स" मलाही आता या सगळ्यात इंटरेस्ट वाटु लागला होता.
"तर हे चाचाजान शिया पंथीय असून व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि त्यांचा भारतीय मुस्लिम इतिहासाचा गाढा अभ्यास आहे. त्यांना याच कारणामुळे बराच मानही आहे आणि बर्‍याच 'क्लासिफाईड' विभागांकडे अ‍ॅक्सेसही आहे. ते गेल्या वर्षी हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये उपलब्ध असलेल्या दस्तऐवजांचा अभ्यास करत असताना पहिल्या अहमदशहाच्या सोन्याच्या खजिन्याबद्दल त्याच्या वाचण्यात आले. हे माहीत आहेच की पहिल्या अहमदशहाचा काळ अत्यंत शांततेत गेला. कोणतेही मोठे युद्ध या काळात झाले नाही. अर्थातच या काळात कलेचा मोठा विकास झालेला आढळतो. त्याने इराणहून बर्‍याच कलाकारांना भारतात आणल्याचे सांगितले जाते. त्याच बरोबर त्याने इराणच्या राजाच्या दोन मुलींशी निकाह केला आणि तो झाल्यावर राज्यात तीन ठिकाणी सोन्याच्या खाणी मिळाल्याचा उल्लेख मिळतो. त्यांना इतके सोने मिळाल्याचे इतर राजांना कळू नये म्हणून लगोलग एका नव्या किल्ल्यात हालवल्याचे सांगितले जाते. आणि मला संशय आहे की तो किल्ला हाच आहे. त्या दस्तऐवजात असलेल्या किल्ल्याच्या नकाशाचे पान त्यांनी चोरून बाहेर आणले आहे ते आणतो थांबा"

माझ्या सकट सगळे स्तब्ध होऊन डोळे विस्फारून ऐकत होते तशाच स्थितीत बसून रहिले होते. मंदार नकाशा घेऊन परत आला..

(क्रमशः)
इतर भागांचे दुवे: - - - - - - -
श्रेयअव्हेरः सदर कथेतील पात्रे, स्थळे ही पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती अथवा स्थळांशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

पुढील प्रत्येक भाग अधिकाधिक रंजक होत जाइल अशी अपेक्षा.
कथेविषयी काही आडाखे बांधतो आहे, बघूयात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रोचक आहे. पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या वर्षात ठरवलेला संकल्प मोडला., समाप्त आधी बघायचे आणि मग वाचायला सुरुवात करायची Sad
तुम्ही लोकं पण अश्या ठिकाणी भाग पडता की काय आता बोलायचे !!!!!!!!

पुभाअप्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! मानकामे तर फुल्टू इंडियाना जोन्स दिसताहेत एकदम Smile मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुरुवात रोचक आहे आणि पुढच्या कथेबद्दल उत्सुकताही वाटत आहे.

(आधीच ८ भाग आहेत हे नक्की झालंय म्हणजे पुढचे भाग पटापट येतील अशी आशा वाटतेय ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

पुभाप्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग रोचक आहे. पु. भा. प्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मस्तच....

ऋ पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहेच. लवकर टाक. मोठी मालिका आहे Smile

सखू आणि साळवी तर मस्तपैकी घर करत आहेत. मानकामे ची हिश्ट्री जेम्स बाँड ची आठवण देऊन गेली Wink

रोचक आहे ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋ.. पुढं काय???????????????????????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार! आठ भागांची रुपरेषा डोक्यात आहे त्यामुळे त्यामुळे वेळ लागणार नाही. मात्र टंकनाला वेळ गवसेल तसे पुढिल भाग येत जातील.
क्रमशः वाचणे मलाही पसंत नसले तरी इतक्या मोठ्या स्केलची कथा आजवर लिहिली नसल्याने एक प्रयोग म्हणून याकडे बघत आहे.

या व पुढील विकांताला वेळ उपलब्ध नसल्याने कार्यालयीन कामकाजातून वेळ काढून टंकन करत आहे. Wink तथा होणार्‍या दिरंगाईबद्दल क्षमस्व!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिला भाग आवडला. सुरुवात उत्तम झाली आहे, पुढील भागांची वाट पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम सुरूवात. पुढच्या भागांची वाट पहाते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.