भिमजयंती

संपाला न मानता आजपासून काँलेजमधे एफ.वाय बी.काँमची मराठी विषयाची मौखिक (ओरल) परीक्षा घ्यायला सुरुवात केली. तांबोळी नावाच्या हुशार विद्यार्थ्याला समोर आल्यावर नाकतोँड फुटण्याचं कारण विचारलं. आंबेडकर जयंतीची वर्गणी मागणार्या गँगला , एवढ्या लौकर कशाला मागता वर्गणी ? अजून अवकाश आहे की. असं म्हटल्यामुळे , बाबासाहेबांवर दिलो जान्से प्यार करणार्या , नगरसेवकाचे कुणी, राईट कुणी लेफ्ट हँन्ड असलेल्या , दहावी फेल ही उत्तम शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या , हगताना मुतताना राजकारणच डोक्यात असणार्या , आपलं कुणीच शेट सुदीक वाकडं करु शकत नाही अशा जबरी धारणेत वावरणार्या , त्याच्या वस्तीतल्या , बाबासाहेबांच्या दांडग्या चाहत्यांनी विनाविलंब दोनतीन ठोसे लगावून तांबोळीचं लालपाणी काढलं आणि त्याला आधुनिक निळं पाणी दाखवलं.

मला त्याची परीक्षा घ्यावीच वाटेना. त्याला उगीच साँरी म्हणावं वाटलं. पण म्हणू शकलो नाही. डोळ्यासमोर माझ्या लहानपणीची जयंती तरळली . लोक मनाने देतील तेवढीच वर्गणी गोळा करायचा आग्रह धरणारे वडील आठवले . त्यांचं ऎकणारे वस्तीतले अडाणी कार्यकर्ते आठवले. रात्रभर जागून निळ्या पताकांनी आम्ही सजवलेली वस्ती, हरखुन पाहणारे शेजारच्या वस्तीतले लोक आठवले. आई बापांचे आनंदाने फुललेले चेहरे आठवले. शाळा शिकणार्या पोरांचं आपलं तुपलं न बघता जबरदस्त कोडकौतुक करणारी माणसं. झुंडीने पुतळ्याला हार घालण्यासाठी जाणारी माणसं. जीव डोळ्यात आणूण बाबासाहेबांचा पुतळा निरखणार्या वस्तीतल्या अडाणी आया , ताकद मिळवलेली ती नजर पोरांवर उधळून , पोरं बलिष्ठ झाल्याच्या स्वप्नात गुंग होणार्या आया आठवल्या. पोरांच्या नविन कपड्यांसाठी गहाण टाकलेल्या एकुलत्या दागिन्याचा जराही खेद न वाटलेल्या आया झरझर झरझर डोळ्यासमोर येऊ लागल्या. कधी एकदाची सकाळ होतेय आणि नवे कपडे घालतोय या विचारात कधीतरी झोपलेला मी आठवलो. कावळ्याच्या आंघोळीसारखी गडबड आंघोळ करुन नवी कपडे घालून वस्तीत फिरणारी आमची गँग आठवली. चुकत माकत त्रिशरण पंचशील म्हणणारी भाविक अडाणी माणसं आठवली. कटाक्षाने त्या दिवशी दारु न पिलेले वस्तीतले नामचीन लोक आठवले. झडझडून उत्साहाची १४ एप्रीलची सकाळ, दुपार, संध्याकाळ आठवली. दुसर्या दिवशीची वस्तीतली जेवणावळ आठवली. मुसलमान मेहतर बायका पोरांना चार चारदा आग्रहानं बोलावणारी. हातचं काम टाका न् पयलं जेवाय चला म्हणणारी जाणती आठवली. पोळ्यांच्या उडणार्या चवडीकडे समाधानाने बघत हसणारे आणि अय चाचा आ , लै केलंय जेवण. हाणा दाबून असा आग्रह करणारे भिमसैनिक आठवले. जयंतीच्या दिवशी महापुरुषांचं ठळक अस्तित्व जाणवणारे लाखो क्षण आठवले.

वस्तीतली जयंती हळू हळू बदलत गेली. आता वस्तीत बाबासाहेब फक्त तासभर सकाळी रमतात. त्रिशरण पंचशील झालं की नव्या वाडी वस्तीच्या शोधात जातात. वस्तीतला डी.जे. त्यांना सहन होत नाही. नवे कार्यकर्ते वंदनेचा सकाळचा कार्यक्रम लौकर उरकायचा प्रयत्न उघड उघड करतात. चिवटपणे जगलेल्या आणि आरं जेवान कवा हाय ? असं विचारणार्या जुन्या खोडाला एय व्हय बाजूला म्हणतात. शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण डाँ.बाबाचं गातं गुणगान जी जी जी गचक्यात बंद करतात. शिला की जवानी लावतात. पुतळ्यावर जायलाच पाहिजे असं कुठाय ? असं आईला विचारतात. नगरसेवकाचा डेँजर सत्कार करतात. हे सगळं राँग आहे हे त्यांना पटलेलं असतं. पण प्रश्न आन बान शानचा येतो. इज्जतके सवालचा येतो. बाबासाहेबाच्यां जयंतीत जोश नाय ? च्यूत्या ठरु ना भौ आपण. मंग ? जयंती जोशात पाहिजे !!! जयभिम.

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. कमीअधिक फरकाने सर्व जयंत्या-मयंत्यांची हीच गत आहे Sad . आणि अभिनिवेशसुद्धा तसाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरं आहे. जयंत्या, मयंत्याबरोबर गणेशोत्सवही आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

सहमत.. सणवारच नव्हे तर हा कलकलाट घराघरात आढळतो आहे.. अगदी दररोज..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिल्या दुसऱ्या पिढ्या अशा मंतरलेल्या असतात. मग ती जादू ओसरते. नव्या मंत्रांचा प्रभाव पडतो. किंवा कधीकधी सगळ्याच मंत्रांमधली जादू ओसरते वाटते. आणि मग भकास चित्र रहातं. या सगळ्याचं चित्रण छान झालेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख काय आहे हे माहिती नाही. पण आंबेडकरांनंतर किती पिढ्या झाल्या असाव्यात, असा एक प्रश्न पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यापुढे कदाचित वस्तीतच एकाचे दोन उत्सव होतील आणि तुझी स्पीकरची भिंत मोठी का माझी अशी भांडणंही रंगतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भीमजयंती. भीम. उच्चार कसा करतो आपण? भी...म असा दीर्घ करतो की नाही? भीमजयंती.
लेख आवडला. पण आता 'तेंव्हा आणि आता' असे करत बसणे बंद केले पाहिजे. 'Human race is not immortal' हे सांत्वन आहेच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा