हौसेने उन्हाचा भिमाशंकर होणे.

छायाचित्रांसाहित हा लेख येथे वाचता येईल. http://sagarshivade07.blogspot.in

खांडस मार्गे भीमाशंकर

"हौसेने उन्हाचा भीमाशंकर होणे" हा सागर बाबांनी मराठी भाषेला बहाल केलेला वाक्रप्रचार आहे. पू.ल. च्या 'अंतू बर्वा' मध्ये जसे "दातांचा अण्णू गोगटे होणे" म्हणजे "पडणे" तसे सागर बाबांच्या लेखी "उन्हाचा भीमाशंकर होणे" म्हणजे " भर उन्हात 'हौसेने' अजस्त्र अश्या ट्रेक ला जाऊन डी- हायड्रेशन होऊन मेल्यासारखे पडणे" असा आहे.

आता "भर उन्हात हौसेने डी- हायड्रेशन होऊन पडणे" हे जरी साधे सोपे वाटत असले तरी जशी विशेषणे लावू तशी परिस्थिती गंभीर होत जाते.तसेच हा वाक्रप्रचार आपण कसा 'उच्चारतो' यावर या परिस्थिती ची जहालता अवलंबून आहे.

या मध्ये जीवाची किंमत तर कळतेच आणि अनेक अर्थ लागून जातात. जसे की ,

"अती हुशारी करून भर उन्हात ट्रेकिंग ला जाणे", "बऱ्याचं दिवसात काहीही शारीरिक श्रम तर सोडाच पण इकडची काडी तिकडेही न करणाऱ्याने आपल्या हिशोबानुसार ( थोडक्यात लायकीनुसार) ट्रेक न करता डायरेक्ट 'खांडस मार्गे भीमाशंकर' ट्रेक निवडणे., पाठीवर काही किलोची वजने आणि सुटलेले पोट घेऊन सहा - सात तास चालत सुटणे, भर दुपारी जळता सूर्य डोक्यावर घेऊन २ तास वाट चुकून अतिरिक्त पायपीट करणे, या सर्वावर कडी म्हणून पाण्याच्या(च) बाटल्या(च) घ्यायला(च) विसरणे(च), ब्रेड बरोबर खायला म्हणून कडकडे लाडू घेऊन येणे, जरा कुठे सावली दिसली की तिथेच मेल्यासारखे पडून राहणे, उत्तरार्धात घनदाट जंगल लागणे, त्यातच माकडांनी हल्लाबोल करणे, मग त्यांच्याशी फाइट करून, सामान आणि जीव वाचवीत अंगात जीव नसताना पळत सुटणे, मग माकडाला आपले हे successor बघून अतीव complex येणे . ४ ग्लुकोन डी चे पुडे, अर्धा डझन काकड्या, ६ लीटर पाणी पूर्णपणे संपून जाऊन स्वतःच संपून पडणे" आणि इतर बरेच काही.

२ वर्षापूर्वी माहुली ला गेलो असताना आईचे काका भेटले होते. ते तेव्हा ८० वर्षाचे होते. त्यांना आम्ही ट्रेकिंग करतो… ह्याव करतो … त्याव करतो. अश्या गप्पा टाकल्यावर ते म्हणाले की 'खांडस मार्गे भीमाशंकर' केला नाहीस ना अजून? मग काय तू ट्रेकर? ५० वर्षापूर्वी ते गेले होते याच ट्रेक ला तेव्हा अक्षरशः अंगावरचे कपडे फाटले होते. आणि २-३ लोक चक्कर येऊन पडली होती म्हणे. त्यांचा हा वृत्तात ऐकून तेव्हाच ठरवले होते की पावसाळ्यात ठीक पण हा ट्रेक उन्हाळ्यातच करायचा.

आता मात्र हौस फिटली.

तरीही, आता परत भीमाशंकर ला पाऊल ठेवायचे नाही. असा त्यावेळी केलेला निर्धार डळमळीत होऊ लागलाय आणि पावसाळ्याची चाहूल लागताच परत जाऊन येईन म्हणतो.

पौराणिक संदर्भ:
द्वादशा ज्योतिर्लिंगापैकी हे एक स्थान.सहावे ज्योतिर्लिंग. भगवान श्री शंकराने भीमरूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला तेव्हा त्याच्या तपामुळे निर्माण झालेल्या घर्मधारातून भीमा नदीचा उगम झाला. म्हणूनच या स्थानास भीमाशंकर नाव पडले.

ऐतिहासिक संदर्भ :
१७७३ मध्ये नाना फडणविसांनी शिखरासह मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.त्यावेळी ५ टन वजनाची घंटा त्यांनी दान केली होती. आजही ती मंदिराच्या समोर पाहावयास मिळते.

भौगोलिक संदर्भ :

पुणे, ठाणे, रायगड अशा तीन जिल्ह्यात पसरलेले हे अभयारण्य १९८५ साली संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. १३० चौ. की.मी. क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्याचे प्रमुख क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव या तालुक्यांत येते. समुद्रसपाटीपासून हे स्थान सुमारे २५०० फूट उंचीवर आहे.

भीमा नदीचे उगमस्थान, पुढे पंढरपूर मध्ये हि नदी चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. पुढे रायचूर,कर्नाटक येथे हि नदी कृष्ण नदीस जाऊन मिळते.

खांडस हे गाव रायगड जिल्ह्यात येते तर भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात. फक्त २ अजस्त्र डोंगर चढून जाऊन आपण जिल्हा बदलतो. आजही स्थानिक गावकरी, तसेच आदिवासी याच मार्गाचा अवलंब करतात.

येण्याजाण्याच्या वाटा:

गाडीमार्गे :
पुणे, रायगड, जुन्नर व इतर सर्व स्थानकावरून बस ने तसेच स्वतःच्या गाडीने येता येते.पुण्यापासून १४७ किमी असून मंचर मार्गे तसेच चासकमान धरणामार्गे जाता येते.

पदभ्रमण :
कर्जत पासून २० किमी कशेळे गावापर्यंत जावे. हे बऱ्यापैकी मोठे गाव असून आवश्यक ती खरेदी येथेच करावी. येथून १२ किमी खांडस हे गाव असून कशेळे पासून खाजगी गाड्या उपलब्ध आहेत.

कर्जत ते कशेळे ST बस ९ वाजता असून ती ९:४५ पर्यंत पोहोचते. तिकीट २६ रु. तेथून पुढे खांडस अर्धा तास. खाजगी गाड्या खांडस पर्यंत प्रती सीट २० रु. घेतात. शिडी घाटाच्या थोडे पुढे जायचे असल्यास १०० रु जादा आकारतात.मोठा ग्रुप असेल तर हेच बरे पडते.

गणेश घाट मार्गे
हा रस्ता लांबचा असून या मार्गाने उन्हाळ्यात ६ ते ७ तास लागतात. हा मार्ग पदर गडावरून लांब वळसा घालून येत असल्याने अफाट पायपीट होते.

शिडी घाट मार्गे
हा मार्ग जास्त चढाई चा असून मार्गात २ शिड्या लागतात. पहिली शिडी खूप मोठी असून त्याची स्थिती आता चांगली नाही. येथे अनेक अपघात हि घडलेले आहेत. या मार्गाने उन्हाळ्यात ५ ते ६, तर इतर वेळी ४ - ५ तास लागतात.

आमचा ट्रेक अनुभव :
सकाळी ६:१२ ची सिंहगड पकडून मी कर्जत ला रवाना झालो.चक्क कर्जत पर्यंत बसून प्रवास झाला.बाकी दोघे कल्याणचे मित्र तेथे हजरच होते. लगेच ९ वाजताची ST पकडून आम्ही कशेळे ला रवाना झालो. सव्वा नऊ ला कशेळे ला पोहोचलो आणी मग थोडी खरेदी केली.

संदेश ने ब्रेड आणला होता म्हणून काही घेतले नव्हते. नंतर कळले की की ब्रेड बरोबर खायला जाम, सॉस न घेता त्याने कडकडे लाडू घेतले होते. आता प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते न तुटणारे लाडू तो ब्रेड बरोबर कसे खाणार होता कुणास ठाऊक. "तू सांगितले नाहीस, तू फक्त ब्रेड म्हणालास" असे तो म्हणाल्यावर त्याला आम्ही बाकीचे समान आणायला पिटाळले. कशेळे गावभर हिंडून त्याला काही मिळेना. शेवटी अमूल बटर घेऊ आला. त्याची फ्रेंच दाढी बघून गावकऱ्यांना परदेशी पाहुणा आल्याचा भास झाला आणि त्यांचे कुतूहल वाढले. मग जेव्हा हॉटेलात "मी घरीच चाय पिली" असे टिपीकल मुंबईकराचे वाक्य टाकल्यावर "शेठीया चा कोट पांघरलेला हा घाटिया" आहे अशी लोकांची खात्री पटली.

तेवढ्यात भूषण ने रिक्षावाल्यांकडून सगळी यथासांग माहिती मिळवली. आणि आमच्या जागा पकडून ठेवल्या.

हेच ते कडकडे लाडू. एक खायला सुरवात केली, म्हणजे प्रयत्न केला, पण माझ्या दातांनी सपशेल शरणागती पत्करली. मग ते लाडू सांभाळून ठेवले कारण पुढे घनदाट जंगल लागणार होते आणि त्यात ते अभयारण्य. कुठला प्राणी आला अंगावर तर हेच लाडू फेकून मारता येतील म्हणून. माकडे मागे लागली तर हे लाडू देऊ, त्यांची दातखिळी बसेल असा मानस होता.

एक डोंगर ओलांडून गेल्यावर एक छोटी वस्ती दिसली. संदेश ने मग ते लाडू तिथे एक मुलगा उभा होता त्याला दिले. त्याच्या हातात कुत्रे होते. त्याने अत्यंत करुण भावाने ते लाडू घेतले. आणि एक खाल्ला. मग त्याचा आविर्भाव काय बदलला देव जाणे, त्याने डायरेक्ट कुत्रे संदेश कडे दिले आणि याला घेऊन जा म्हणाला.
इथे आमचाच जीव आम्हाला जड झालेला , अजून हे कुत्रे घेऊन काय करा? म्हणून आम्ही तेथून सटकलो.
आता आमचा ट्रेक चालू झाला. थोडे अंतर चालून गेल्यावर अजस्त्र अशी डोंगर रंग दृष्टीस पडली.
थोडे अंतर चालून गेल्यावर सुकलेली नदी लागली. पावसाळ्या मध्ये हा ट्रेक म्हणजे खरंच जन्नत असते. तेव्हा हि नदी दुथडी भरून वाहत असते. या एका ट्रेक मध्येच आपल्याला तीव्र चढाई, रीवर क्रॉसिंग, राप्लिंग सगळे अनुभव येतात.

आता शिडी घाटाचा मार्ग दृष्टिपथात आला होता.

खांडस मध्ये न उतरता आम्ही थोडे पुढे उतरलो आणि त्यामुळे पाऊण तासाची उन्हातली पायपीट वाचली होती. पुढे मार्गात शिडी दिसेल म्हणून आमची स्वारी जोषातच निघाली.

२-३ वेळा छोट्या पायवाटा चुकून आम्ही योग्य मार्गास लागलो.

पदारगडा चे नयनरम्य दृश्य नजरेस पडले. गणेश घाटातून जाणार मार्ग पदारगडा वरून जातो.

सुरवातीपासूनच घनदाट झाडी सुरू झाली. अभयारण्यात आल्याचा फील आला.

सूर्य डोक्यावर येऊन ठेपला होता. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी लवकरात लवकर चढाई करणे गरजेचे होते. पण ११ वाजताच इतके राक्षशी ऊन होते की आता काही आपले खरे नाही हे समजूनच चुकले होते.

सुमारे २ तास चढाई केल्यानंतर आम्हाला पहिली आणि सगळ्यात मोठी अशी शिडी दिसली. अश्या दुर्गम भागात अश्या शिड्या लावायला कोण येते हा प्रश्न पडतानाच आम्ही त्याचे मनोमन आभार मानले.

ती शिडी अश्या ठिकाणी होती की तो कडा कोणत्याही प्रकारे चढणे शक्य नव्हते. सगळ्यांनी जर वेळ विश्रांती घेतली आणि दुसऱ्या शिडीची ताणलेली उत्सुकता शमवण्यासाठी पुढे निघालो.
येथे बरेच अपघात झालेले आहेत. शिडी ची स्थिती आता फार चांगली नाही बऱ्याचं ठिकाणचे वेल्डिंग तुटून गेलेलं आहे. साखळीने बांधलेल्या ठिकाणी फार भीती वाटते.
तरीही आमचे तिथेही फोटोसेशन चालू झाले.
थोडे अजून अर्धा तास चालून गेल्यावर दुसरी शिडी लागली. येथून पुढे खूप तीव्र चढण आणि रॉक प्याच चालू झाले. तापलेल्या उन्हाने दगडही तापले होते. आणि खाली बघितले तर खूपच खोल दिसत होते.

हा सगळ्यात अवघड असा पट्टा होता. तापलेल्या दगडांवर हात ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आम्ही तो सर केलाच.

आता येथे येईपर्यंत पोटातील अन्न आणि पाणी दोन्ही संपले होते. भूषण पाण्याच्या बाटल्या विसरून आल्याने पाणी तर कमी होतेच.या शिडीच्या शेजारीच असलेल्या गुहेमध्ये थंडगार सावली पाहून आम्ही आमचा ८ वा हॉल्ट घेतला.

आता पाणी नसल्याने भूषण ने "पॉवर सेल्स" म्हणजे काकड्या काढल्या. त्याची साले काढून, तिखट मीठ लावून, कापून त्याने काकड्या दिल्या. तिथेच मी त्याला सांगितले की "तू पुढील आयुष्यात भयंकर, भयाण, खतरनाक प्रगती करणार आहेस. जो माणूस अंगातला जीव गेला असताना दुसऱ्यांना काकड्या साले काढून, तिखट मीठ लावून, कापून देतो तो जगात काहीही करू शकतो."

संदेश पुढे जाऊन वरच्या शिडीवर जाऊन बसला होता. आणि त्याला खाली उतरता पण येत नव्हते. म्हणून आम्ही दोघेच खाऊन घेऊन पुढे निघालो. तो वरून ओरडून, हातवारे करून शिव्यांची लाखोली वाहत असावा.

तिथून १ तास चालून गेल्यावर एक डोंगर आम्ही पार केला. तिथे छोटी वस्ती म्हणजे ५-६ घरे होती. त्यांची घरे डौलदार होती.

तिथल्या लहान मुलाचा पांगुळगाडा ही खेळून झाला.

देवासारख्या भेटलेल्या तेथील माणसांबरोबर थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर त्याने आम्हाला पाणी दिले. आम्ही एकाच बाटली भरून घेतली आणि हुशारी करून म्हणालो की,

"तुम्हाला खूप दुरून आणावे लागते असेल, आम्ही करू काहीतरी"

नको, घेऊनच जा पाणी, तुम्हाला अंदाज नाहीये, पुढे फार वाईट हाल होतील.

असे ऐकल्यावर आधीच अर्धमेले झालेले आम्ही भर उन्हात गार पडलो. पुढे काय वाढून ठेवले आहे याची आम्हांस कल्पना यायला लागली.

आता बऱ्यापैकी वर आल्याने आजूबाजूचा परिसर दिसू लागला. पदारगडा च्या मागून कोथळीगडाने दर्शन दिले.

येथे परत वाट चुकून आम्ही परत घरांपाशी आलो. तेथे एक आजी होत्या त्यांनी सांगितलेली वाट काही केल्या आम्हाला समजेना. भर उन्हात १ तास वाया घालवून आम्ही परत वाटेस लागलो. केव्हा वर पोहोचून अंग टाकतोय असे झालेले असताना भूषण मात्र फोटो काढण्यात मग्न होता.

बरेच अंतर चालून आल्यावर घनदाट असे जंगल लागले. सगळे अबर चबर खाऊन झालेच होते. तरी बेकार भूक लागली होती. म्हणून परत जेवायला बसलो. घनदाट जंगलामुळे गार वाऱ्याची झुळूक आली की मस्त तजेलदार वाटत होते . सगळे एकमेकांना अजून किती चालायचे आहे ? अरे केव्हा येणार मंदिर? असे फालतू प्रश्न विचारात होते. जेवण करूनही अंगात जीव नव्हता. आता पुढेही चालवत नाही आणी परत मागेही जाता येणार नाही अशी स्थिती झाली होती. काकड्या, ग्लुकॉन डी गोळ्या सगळे काही खाऊन झाले होते. मग जर मोठे डेरेदार झाड पाहून पाठ झोकून दिली. पुढचे दहा मिनिटे व्हीव्हळण्यात गेली. कारण काट्याच्या झाडातच पडलो होतो.

थोडी विश्रांती झाली, घनदाट जंगलामुळे आता ऊन हि जाणवत नव्हते. एव्हाना तीन वाजून गेले होते. आता मात्र वेग वाढवून पोहोचणे गरजेचे होते. भीमाशंकर वरून संध्याकाळी ६ वाजता पुण्याला जाणारी शेवटची बस होती. ती सुटली तर वरतीच राहायला लागले असते. म्हणून ५ च्या आत पोहोचणे क्रमप्राप्त झाले होते. म्हणजे पुढील एक तासात भीमाशंकर मंदिर हि बघून घेता आले असते.

५ तासांच्या अथक चढाई करूनही आमचे टार्गेट काही येत नव्हते. जंगलामधून सावली असल्याने आम्ही आमचा वेग वाढवला.

आता जरा मन:स्थिती बरी होती. बऱ्याच वेळ कोणी कोणाशी बोलताही नव्हते, आता सगळ्यांची तोंड चालू झाली. पुढच्या १० मिनटात शांत अश्या अभयारण्यात गप्पांचा फड जमला.

भूषण सगळ्यांत पुढे चालत होत. त्या मागे संदेश आणि सगळ्यात शेवटी मी. गर्द अश्या झाडींमध्ये आम्ही प्रवेश केला तोच संदेश च्या शेजारी काहीतरी थबकले. त्याला काही कळायच्या आताच एका माकडाने त्याच्यावर झडप टाकली. भूषण पुढे असल्याने त्याला काही कळलेच नाही. पण मला सावध होण्यास वेळ मिळाला. संदेश वर माकडाने झडप टाकताच तो दुसऱ्या बाजूच्या झाडत जाऊन पडला. त्याच्या सॅक मध्ये चिवडा ठेवला होता आणि तोच पटकावण्यासाठी माकडाची खटाटोप चालू झाली. संदेश ने सॅक सोडून दिली, अन तोच माकडाने सॅक उचलून घेऊन जायचं जायचा प्रयत्न चालू केला. संदेशचे पाकीट आणि सगळे सामान त्या सॅक होते. ती भलतीच जड असल्याने माकडाला ती उचलली नाही. मग त्याने ती फरफटत नेऊ लागला.

आता मात्र मी सरसावलो. झाडीत जोरदार जंप टाकून मी ती सॅक पकडली. आणि माझे आणि माकडाचे तुंबळ युद्ध जुंपले. काही मिनिटाच्या हातघाई नंतर मी चिवडा बाजूला काढून फेकून देऊन सॅक माझ्या ताब्यात मिळवली. माझे हे प्रताप आणि रौद्र रूप पाहून त्याने पुढच्या जन्माला प्रोमोशन मिळून "माणूस" होण्यापेक्षा डिमोशन होऊन दुसरे काही तरी बनू असा विचार केला असणार. त्याला आपले हे successor बघून अतीव complex आला असावा.

माकडाला दिलेल्या चिवड्या मध्ये मिरच्या जास्त असल्याने, त्याची वाट लागून तो परत आपल्या मागे पाणी मागायला येईल. आणि पाणीही आता शेवटची बाटली शिल्लक आहे. या विचाराने आम्ही तिथून धूम ठोकली.

या सगळ्या प्रकाराने संदेश मात्र उत्साही झाला, आणि पुढे पळतच सुटला.

शेवटचा टप्पा म्हणत म्हणत तब्बल ६ तास झाले होते. काही केल्या वरती काय पोहोचतच नव्हतो. परत आयुष्यात येथे पाऊल हि ठेवायचे नाही या विचाराने परत एकदा झाडात जाऊन बसलो.

संदेश मात्र पुढे जातच होता. ५ मिनिटाने त्याच्या बोंबा ऐकू यायला लागल्या की "अरे लवकर या पोहोचलोच आपण".

देवाचे नाव घेऊन त्याच्या शब्दावर शेवटचा विश्वास ठेवू म्हणालो आणि चालू लागलो. ५ मिनिटात तुफान झाडी मधून चालत जाऊन पुढे बघतो तर काय? समोरच हनुमान तलाव. वास्को द गामा ला पूर्ण आफ्रिका फिरून भारतात ( अरेरे !) आल्यावर जेवढा आनंद झाला असेल त्या आनंदाने आम्ही तलावात जवळ जवळ डुबकी मारायलाच निघालो.

आता आनंद अनावर होत होता. सरते शेवटी साडे सहा तासांच्या जीवघेण्या पायपिटी नंतर आम्ही आमच्या लक्ष्या पर्यंत पोहोचलो होतो.

एव्हाना साडे चार वाजत आले होते. सकाळी दहा वाजता सुरू केलेला ट्रेक साडे चार वाजले तेव्हा दृष्टी पथात आला होता.खरेतर येथेच आमचा ट्रेक यशस्वी झाला होता. पुढे मंदिरात नसतो गेलो तरी चालले असते. आम्ही तसे नास्तिक नाही पण देवांचा केलेला बाजार कुठेतरी मनात टोचतो.

साडे सहा तासांच्या पायपिटी नंतर आम्ही आमच्या लक्षापर्यंत पोहोचलो होतो. जिंकल्यासारखे वाटत होते. मनातील एक सुप्त इच्छा पूर्ण झाली होती. आणि स्वतः वरचा विश्वासही द्विगुणित झाला होता. खरेच, कधी विसरता येणार नाही असा अनुभव होता. उन्हाने जीव काढला असला तरी एकूण अनुभव छानच होता.

हनुमान तलावामध्ये फ्रेश होऊन मंदिराकडे कूच केले.

जशी २ अजस्त्र डोंगर ओलांडून गेल्यावर जिल्हा बदल झाला तसेच वातावरण हि बदलले. रणरणत्या उन्हात चढताना का होई ना, पण आम्ही निसर्गाच्या सानिध्यात होतो. कसलाही आवाज आणि फालतुगिरी नव्हती. आता जसे मंदिर जवळ येऊ लागले तसे ध्वनी प्रदूषण वाढले. अनेक चालक लोक गाड्यांची दारे उघडी टाकून फालतू गाणी ऐकण्यात गुंतली होती. सगळा परिसर बकाल झाला होता. एका शाळेची सहल आली होती. ती मुले जमेल तेवढी टुकार गिरी करण्यात धन्यता मानत होती. जागोजागी लिंबू सरबत विकणारी मंडळी गस्त घालत होती. दुकानदारांनी त्यांचा लुटायचा ऐवज म्हणजे लोकांना लुटायचे साधन म्हणजेच फुलाची परडी आम्हाला देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.

चिखलातून कमळ घेणारे आम्ही, या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो.

आता आम्ही ज्योतिर्लिंग मंदिराकडे प्रयाण केले.

आणि १४०० च्या शतकातल्या आणि स्थापत्य कलेतील उत्कृष्ट नमुना असलेल्या ज्योतिर्लिंग मंदिराचे आम्हाला प्रथम दर्शन घडले.

५ टन वजनाची हि घंटा चिमाजी आप्पा पेशवे यांनी १७२९ साली वसई हून आणलेली होती असा उल्लेख आढळतो. प्रवेश द्वारापाशीच दुसरी एक भलीमोठी घंटा लावली होती. नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता तेव्हा भेट दिली होती.

मंदिराच्या चारही बाजूस हे कुत्र्याचे शिल्प कोरले आहे. कलशाची दगडी सुवर्णरेखा उजळून निघाली होती.

काळ्याभोर अश्या कोरीव कातळावर सूर्याची मावळतीची किरणे पडल्यामुळे सुवर्ण झळाळी आल्यासारखे दिसत होते.

मंदिराच्या कळस वरील कोरीव शिल्पे लक्ष वेधून घेत होती.

संपूर्ण कोरीवकाम एकाच कातळात केले आहे असा उल्लेख येथे आढळतो.

संपूर्ण मंदिराचे छायाचित्रण केल्यानंतर कॅमेरा ठेवून दिला आणि महादेवाच्या दर्शनास गेलो. उज्जैन वरून काही योगी ( ???) आले होते. अत्यंत गचाळ अश्या कपड्यात ते कित्येक दिवस अंघोळ न करताच आलेले वाटत होते. आणि हौशी लोक त्याच्या पायात लोळण घेत पडत होते. ( असतीलही योगी… पण कशाचे ते माहीत नाही Smile ) काही लोक आपल्या श्रद्धेची पोचपावती म्हणून "पावती फाडत" होते. लोकांनी आणलेल्या फुलाची परडी देवाऱ्यामधूनच कचऱ्यात जात होती.

भाविकांच्या(??) चेहऱ्यावर मात्र "आपली अनेक पाप धुतली गेली, आता नवीन पाप करायला आम्ही मोकळे" असे तर काहीच्या चेहऱ्यावर "सुटलो बाबा, झाले एकदाचे दर्शन" असे भाव.

दर्शन घेऊन आजूबाजूला हिंडत बसलो. फुल टू बाजार झालेले देवस्थान आमच्यासाठी नवीन नव्हते. त्यामुळे आपण किती फालतू (लोकांच्या) देशात राहतो हि दरवेळी वाटणारी लाज तेव्हा जरा कमी वाटली.

हनुमान तलाव, महादेव मंदिर आणि गुप्तलिंग ही पाहण्याचे ठिकाणे होती, गुप्तलिंग बघायचे तर डोंगर उतरून खाली जावे लागते असे कळल्यावर आम्ही तो नाद सोडला.

सहाची पुण्याची बस पकडण्यासाठी आम्ही थांब्यावर पोहोचलो. मी पुण्याला जाणार होतो तर भूषण, संदेश मुंबई ला जाणार होते. आम्ही कसे जायचे हि सगळी माहिती विचारून विचारून मिळवली.

आता पाय बेकार दुखत होते म्हणून मी थांब्यावरच मांडी घालून बसून घेतले. काळा पडलेला चेहरा, मिळेल तिथे विश्रांती साठी बसल्याने मळलेले कपडे, अस्ताव्यस्त केस अश्या अवतारात मी मांडी घालून बसलो होतो. लोकांना मी फारच डाउन मार्केट वाटत होतो.

तेवढ्यात मुंबईच्या मुलींचा एक ग्रुप आला . त्यांनी भूषण ला मुंबईला बस नाही मग कसे जायचे असा एक प्रश्न विचारला. त्याचे भूषण इतके यथासांग उत्तर दिले की सगळ्या मुलींनी त्याला अक्षरशः घेराव घातला आणि आपले आपले एरिया सांगून मी किती वाजता पोहोचेन? मग रिक्षा मिळेल का? ह्याव होईल का त्याव होईल का? असे असंख्य प्रश्नाचा भडिमार केला. तो अक्षरशः बमबर्डींग होता. पण भूषण कोणत्याही मुलीला नाराज न करता धीरानं उत्तर देत होता. आता अंगात अजिबात जीव नव्हता. तरी त्याचा उत्तरे देण्याचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

कॉलेज मध्ये याने आमच्या गहन अश्या प्रश्नांना कधी उत्तरे दिली नाहीत. आणि इथे तो सप्त सुरात नहात होता. शेवटी मी एक दोन हेवी वाक्ये टाकली. तर त्यांना काय टुकार पब्लिक आहे असे वाटून त्यांचा जमाव पांगला.

६ ची बस ७ ला आली आणि लगेच निघाली. मी आणि भूषण गप्पांच्या सागरात बुडलो. पुढे मंचरला मुंबई कर उतरून गेले. मी १० वाजता पोहोचलो पण मुंबई करांचे अशक्य हाल झाले. ते पहाटे ३ वाजता पोहोचले.

निसर्गाच्या कुशीतून माणसांच्या साम्राज्यात आलो आणि लोक मंदिरात शोधायला येतात ती मनःशांती गमावली. असंख्य यातना झाल्या, भर उन्हात शरीराचे हाल करत, पण वरती आल्यावर बाजारू प्रवृत्तीने झालेले शंकराचे हाल काही बघवले नाहीत. निसर्गाच्या अविरत गोडीचा आस्वाद घेऊन आल्यावर, वरती मंदिरात न येत तसेच गेलो असतो तरी चालले असते अशी आमची भावना झाली.

वर येताना "तुम्हाला परत पाणी मिळणार नाही, आणि उन्हाचा त्रास होईल म्हणून आम्हाला पाणी भरून देणारा तो गावकरी. गावकरी कसला देव माणूसच. आणि इथे पूजेचे समान घेतल्यावर चप्पल सांभाळू अशी ऑफर देणारे कथित महादेव भक्त.

आता शंकराने तिसरा डोळा जरी उघडला तरी त्याला पाहायचे काय? तर भावनांचा बाजार, श्रद्धेचा लिलाव, विकतचे पुण्य आणि लुच्चेगिरीच ना ?

आमची सुटका झाली २ तासात, पण तो देवांचा देव महादेव, त्याच यातना भोगतोय… वर्षानुवर्षे … त्याची सुटका कोण करणार हे "देवच" जाणे.

सागर

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त..
सुरवातीला लेखाचे ओझरते दर्शन देऊन उत्सूकता वाढवून मग तपशिलवार लाहिती देण्याची 'इश्टाईल' आवडली.

आणि हो! ऐसी अक्षरेवर स्वागत!
येत रहा .. लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नैसर्गिक शैलीत, मनोरंजक टिप्पण्ण्या करत लिहिलेला लेख आवडला. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप आवडला ट्रेकचा वृत्तांत ! ब्लॉगवर फोटो पाहिले. सुंदर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!
मजेदार भाषेत लिहीलय.
फोटोदेखील छान आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले. (इथे फोटो न चढवण्याचं काही खास कारण आहे का?)

शिडीघाटामार्गे भीमाशंकर हा मी केलेला पहिला ट्रेक. भरपूर पाऊस होता, खाद्यपदार्थ होते तरीही मला चढायला सहा तास लागले होते. उतरताना आम्ही गणेश घाटातून उतरलो. मध्येच एक ब्रेक घेतला-न-घेतला, वरून कोणीतरी मधमाश्यांचं पोळं फुटल्याचा आवाज दिला. मग जे धूम पळत सुटलो, तीन तासात खाली. तेव्हा पाऊस आणि प्रचंड दमणूकीमुळे मंदीर बघितलंच नाही. तसेही आम्ही नास्तिकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छानच करून घेतला आहे तुम्ही उन्हाचा भिमाशंकर ! सर्व व्यवस्थित माहिती घेऊन चोखपणे पार पाडलेला अथवा उरकलेला ट्ररेक नंतर अजिबात आठवत नाही .असं काहितरी डाउनमार्केट करत राहावे .तिथल्या गावकऱ्यांचे जीवन कळते .कठीण प्रसंगी आपल्या शारिरिक आणि मित्रांच्या नवीन मानसिक पैलुंची ओळख होते .पेढे तरी आठवणीने घेतलेत ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उन्हाळ्यात भिमाशंकर करायचा झाल्यास दुपारी तीनला खांडसहून गणपती घाटाने चढावे .ऊन मागच्या बाजूने असते सैकमुळे जाणवत नाही .आणि कमीकमी होत जाते .साडेचारला ताक/चहा विकणाऱ्याच्या झोपडीपर्यंत त्रास न होता पोहोचतो .वरती साडेसहाला आरामात पोहोचतो .उन्हाळयात पाउणे आठ पर्यंत उजेड असतो . रात्री तिकडेच राहून सकाळी साक्षिविनायक गुप्त भिमाशंकर करून साडे अकरा अथवा साडे बाराच्या पुणे बसने परत जाता येईल .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0