भूतान - एक झिम्पुकला देश

कुझोझाम्पुला (म्हणजे झोन्खा भाषेत नमस्कार, गुड मॉर्निंग वगैरे)

पश्चिम बंगालमध्ये जयगाव हे भूतान बॉर्डर जवळ आहे.तिथे एक आकर्षक प्रवेशद्वार ओलांडले कि भूतानचे फुन्शिलिंग हे टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. इथे इमिग्रेशनचे सोपस्कार करून आम्ही "इमट्राट"च्या (इंडियन मिलिटरी ट्रेनिंग टीम) जिप्सीने २५० किमी अंतर असलेला ११००० फूट उंच डोंगर चढायला सुरुवात केली. अतिशय खराब आणि सतत वळणा वळणांचा रस्ता आणि जीवाच्या आकांताने अगदी शेंडी तुटो वा पारंबी असा गाडीहाक्या तुफान ड्रायव्हर. मग काय आमच्या हाडामांसाचा एकजीव चिखल तयार झाला. सर्वांगीण हालचालींच्या आत्यंतिक अभावाने सुरुवातीला सगळे अवयव ठणकू लागले. नवल म्हणजे शेंडी, पारंबी आणि पक्व फळेसुद्धा तुटली नाहीत. कालांतराने आम्हाला सुषुम्नावस्था प्राप्त झाली. भारतीय सेनेच्या एका विश्रामगृहात दुपारच्या भोजनासाठी थांबलो. तेव्हा जिप्सीच्या मिक्सरमधून आमचा लगदा बाहेर पडला. जेवण पोटात जाताच भूतानचे सौंदर्य दृष्टीस पडू लागले अन लोकहो जीवन अचानक रमणीय, जगणेबल वाटू लागले!

आपण कॅमेरा सोबत आणल्याची अंधुक आठवण आली. इतक्यात आमची गाडी बदलून आणखी खटारा गाडी आणि खतरनाक डायवर प्राप्त होताच माझ्या डोक्यात घंटानाद होऊ लागला आणि पोटात फुलपाखरे उडू लागली. मी डोळे गच्च मिटले आणि त्या अंतहीन भोवऱ्यात कल्पांतापर्यंत गरगरू लागले. पुढच्या स्टॉप वर कॅप्टन शशांक, आमचा भाचा त्याची होंडा सिटी गाडी घेऊन येणार होता. तो येताच त्याच्या सुंदर गाडीत बसून आम्ही अलगद निघालो पण मला गाडी थांबवून मळमळ अन उलटी साठी उतरावे लागले. नंतर मला चक्क जिवंत असल्याचा साक्षात्कार सुद्धा झाला. भूतानची सुबक, सुंदर राजधानी थीम्पूमध्ये सेनेच्या सुरेख गेस्ट हाउसला आम्ही एकदाचे थांबलो. नंतर थोड्याच वेळात बाहेर जाऊ, असे शशांकने म्हणताच माझ्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले. नंतर बघू काय होईल ते म्हणून कॉटवर अंग टाकताच शरीर मृतवत झाले. "चल गं मामी, जाऊ या. तुला बरे वाटतेय का आता?" असा आवाज आला. तेव्हा कोहम? कोण मी? कुठे आहे, दिवस आहे कि रात्र काही कळेनासे झाले होते. स्थूल-सूक्ष्म, आदी-अंत, स्थलकालातीत संभ्रमावस्था प्राप्त झाली होती. भानावर आले आणि तयार होऊन ताज ताशी या पंचतारांकित हॉटेलात मस्त डिनरसह आम्ही लोकनृत्यांचा आनंद घेतला. लाउंजचे नाव थोन्गसेल होते. उद्या सकाळी भूतान दर्शनाला जायचे होते.

टायगर हिल

भूतान हा डोंगरदऱ्यात वसलेला चिमुकला बौद्ध देश आहे. हा देश सायप्रसच्या अनंत झाडांनी अलंकृत असून सायप्रस हा तिथला राष्ट्रीय वृक्ष आहे. मेघांशी लपाछपी खेळणारे हिरवे, निळे, जांभळे डोंगर, थंडगार बोचरे वारे अन संध्याकाळी बहुदा पाऊस असतो. हिवाळ्यात बर्फवृष्टी आणि उणे तापमान असते. इथे विपुल पाणी असल्याने वीजनिर्मिती करून काही वीज भारतातसुद्धा पुरविली जाते. चू म्हणजे नदी ज्या गावातून ती जातेय त्या गावाच्या नावाची नदी. पारो गावातून जाणारी नदी म्हणजे पारो चू. भूतानची लोकसंख्या १० लाख, त्यातले २ लाख लोकं राजधानी थीम्पू मध्ये रहातात. ही जगातली एकमेव राजधानी आहे जिथे ट्रॅफिक सिग्नल्स नाहीत. इंटरनॅशनल एअरपोर्ट पारो इथे आहे. द्रुक एअरवेजची दोन विमाने आहेत. वाहतुकीची साधने म्हणजे सगळ्या प्रकारच्या कार, टॅक्सीज आणि बसेस आहेत. या देशाची प्रजा आनंदी, फारसे कष्ट न करणारी आहे. मोकळे वातावरण अन सर्रास घटस्फोट अन पुनर्विवाह होतात. प्रत्येकाला ३-४ तरी मुले असतात. एकत्र कुटुंब पद्धती आहे. इथे बटर चहा याकच्या दुधाचा पितात आणि गायीचे दूध चीज, लोणीसाठी वापरतात. राईस वाईन आणि बिअर पितात. तंबाखूवर बंदी आहे. सडकी आंबवलेली सुपारी खात रहातात. या सुपारीचा त्यांच्या दुकानातही एक चमत्कारिक वास येत असतो. पोर्क, बीफ, याकचे मटण खातात. स्पायसी, तिखट जेवतात. चीज आणि बटर विपुल असते. त्यांच्या उदासीन वृत्तीमुळे देश पर्यटनाच्या दृष्टीने फारसा विकसित झाला नाही. दुकानातून तुम्हाला हवी तर वस्तू घ्या नाहीतर नका घेऊ ते मुळीच लक्ष देत नाहीत. कधीही फटकन दुकाने बंद करतात. (पुणेरी मराठी दुकानदारांची आठवण आली का?) बकरीचे तोंड अन बैलाचे धड असलेला "टाकीन" हा राष्ट्रीय प्राणी आहे. हा सुद्धा लोकं आवडीने खातात त्यामुळे नष्ट होत चालला आहे. त्यासाठी अभयारण्ये केली आहेत. आम्हाला भरपूर याक दिसले. भूतानीज पुरुष घो (ghu) नावाचा रॅपर सारखा गुडघ्यापर्यंतचा ड्रेस घालतात. खाली विजार वगैरे काही नाही डायरेक्ट बूट मोजे असतात. बायका किरा घालतात, खाली लुंगी सदृश स्कर्ट असतो. बहुतांश नागरिक याच पोशाखात असतात. अगदी लहान मुलेसुद्धा.

आर्चरी हा राष्ट्रीय खेळ आहे. जी काही लोकनृत्ये आहेत ती अगदी कमीतकमी हालचाली अन मंद संगीत ,धांगडधिंगा नाहीच. कुन्सेल हा झोन्खा भाषेत आणि इंग्लिश मध्ये निघणारा सरकारी पेपर आहे. भूतान ऑबझर्वर आणि भूतान टुडे हे खाजगी पेपर आहेत. १९७३ मध्ये भूतान रेडिओ सुरु झाला आणि टीवी १९९९ मध्ये सुरु झाला. डिश आणि केबल टीवी आहेत. एक टेक्निकल कॉलेज आहे. मेडिकल अन इतर शिक्षणासाठी भारतात राखीव जागा आहेत. शिक्षणाचा दर्जा साधारण आहे. कार्बन क्रेडीटसाठी इतर देशांकडून आर्थिक मदत मिळते. इथे सफरचंद अन् थोडेबहुत तांदूळ पिकतात. बाकी सर्व गोष्टी भारतातूनच येतात. भारतीय चलन स्वीकारले जाते. किंमत सारखीच आहे. भाषा Dzonkha, उच्चार "झोन्खा", लिपी चीनी भाषेशी साम्य असलेली आहे.

झोंग म्हणजे मध्ये पूजास्थान असलेले आणि चारी बाजूंनी एक दोन मजली इमारत असलेले ऑफिस. बौद्ध धर्म अन राजेशाही असल्याने काही गोंधळ ,गडबड नाही. भारतीय सेना रस्ते बांधणी, दवाखाने, किराणासामान वाजवी दरात देणे या गुडविल कार्यक्रमासोबत रॉयल आर्मीला ट्रेनिंग सारखी फुटकळ(!) कामे सुद्धा करते. इथल्या नागरिकांना नेहरू आवडतात आणि इंदिरा गांधीने त्यांच्या राजाचे इतर दावेदार वारस ठार मारले म्हणून ती आवडत नाही. तिने एकाच राजाच्या घराण्यात सत्ता सोपविली. त्या घराण्यात गांधी कुटुंबियांना मान आहे. तिथल्या नागरिकांचे भारतीयांविषयी मत चांगले आहे

थीम्पू. भूतानची राजधानी. इथे जास्तीत जास्त पाच सहा मजली ऑफव्हाईट रंगाच्या सुंदर सुबक इमारती आहेत. पॅगोडा सारखे छप्पर असते. प्रत्येक इमारतीवर ड्रॅगन, पक्षी, प्राणी आणि फुलापानांची सुरेख रंगीत वेलबुट्टी असते. डोंगराळ चढउताराचे गुळगुळीत रस्ते आहेत आणि मधूनच ऐकू येणारा थीम्पू चू - नदीचा सुरेल खळखळाट. राजधानीतला अतिशय देखणा विशाल राजवाडा हे थीम्पुचे प्रमुख आकर्षण. त्यांचा अगदी तरुण राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक फक्त तिशीतला आहे. त्यांच्या राणीला आशी म्हणतात. भूतानमध्ये सगळीकडे लाकडाची घरे अन घरात बुखारी (लाकूड पेटवून करायची शेकोटी) मग निष्काळजीपणामुळे आगी लागतात. विझवायची व्यवस्था नाही. सगळे जळून खाक होते. भारतीय सेना आपले लोकं पाठवून आगी विझवतात.राजा स्वतः जाऊन नागरिकांना रागावतो, नीट काळजीने रहायला सांगतो.

बौद्ध मोनॅस्ट्री:

एक अप्रतिम नक्षीकाम असलेले भव्य स्टेडीयम पाहून आम्ही मंत्रमुग्ध झालो. तिथे रविवारचा दिवस असल्याने लोकं आर्चरी किंवा डार्ट खेळण्यात दंग होते. आपल्याकडे फक्त वयस्क किंवा साधू लोकं जपमाळ ओढताना दिसतात.इथे अगदी दारुड्यासकट कोणीही प्रार्थना लिहिलेले व्हील फिरवताना आढळले. व्हील फिरवताच प्रार्थना आपोआप वातावरणात पसरून सगळ्यांचे कल्याण होणार असते. लाल ऱ्होडोडेन्ड्रॉनची फुले, जांभळ्या नाजूक जॅकरांडाच्या फुलांनी बहरलेली झाडे आणि सफरचंदाची गुलाबी फुलांचा गच्च बहर थीम्पूच्या सौंदर्यात भर घालत होता. आम्ही तिथून ढोचुला या गावी गेलो. तिथे १०८ चोरटनस आहेत म्हणजे स्मारके. चिमुकली १०८ स्मारके. उत्कृष्ट रंगवलेली स्वच्छ, सुरेख, शांत स्थळे पाहून मन प्रसन्न होते. आपल्या इथे जपमाळेत १०८ चे महत्व असते तसे तिथे आहे. तिथे एक अगदी रंगीबेरंगी, सुबक बौद्ध मोनॅस्ट्री आहे. तिथून डोंगर, दर्‍या आणि अगदी आपल्या आजूबाजूला कापूस पिंजलेले मेघ असे विहंगम दृश्य संमोहित करते. थंडगार बोचरी हवा झुळझुळत असते. थीम्पुला आलो आणि थकेपर्यंत भटकलो. ब्रोकेड कापड खरेदी केले. ते चीन मधून येते. व्हाया हॉंगकॉंग. मी दुकानात सहजच एक कापड रॉयल दिसते म्हटले. कॅप्टन शशांक म्हणे, "हा शब्द इथे वापरू नकोस राजेशाही आहे ना!" "ओह, मी तर विसरलेच होते". ते अडीच मीटर कापड साडे सात हजार रुपयांचे होते. वस्तू महाग होत्या कारण तिथे काहीच तयार होत नाही. मॉल संस्कृती नाही. मला भाजीबाजार बघायला नाही मिळाला याचे वाईट वाटते. ढोचुला आणि थीम्पू पाहून झाल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पारो गावाकडे निघालो.

पुनाखा येथील झोंग म्हणजे ऑफिस
ढोचुला येथील १०८ chortans म्हणजे स्मारके

इथे भूतानचा चिमुकला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अगदी रमणीय स्थळ आहे. सुंदर वेलबुट्टीने सजलेल्या देखण्या बैठ्या इमारती अन एक विमान उभे होते. द्रुक एरवेज हि त्यांची विमानसेवा आहे. दोन विमाने आहेत. छोट्याश्या रनवे जवळ कंपाउंडच्या बाहेरून पारो चू ही नदी खळखळ हसत नागमोडी धावते. विमानाचे उड्डाण आणि लँडिंग बघता आल असतं तर मजा आली असती. इथे एक प्राचीन बुद्ध " किचू मॉनेस्ट्री" बघितली. इथे बाराही महिने भरपूर फळे देणारे एक संत्र्याचे झाड आहे. अतिशय नशीबवान माणसाच्या डोक्यावर एखाद संत्र पडत म्हणे. आम्ही उभे राहून पाहिले, पण अं हं! नवरा म्हणे, "तू उभी रहा मी झाड गदागदा हलवतो. मग कदाचित तुझे नशीब फळफळेल". एकदा एका भारतीय आर्मी ऑफिसरच्या डोक्यावर पडलं म्हणे संत्र. पण पुढे काही आश्चर्यजनक मात्र काही घडलेच नाही.

इथे लोण्यापासून तयार केलेल्या फुले आदी सजावटीने मॉनेस्ट्री अलंकृत असतात. थंडी इतकी असते कि त्या लोण्याच्या शोभेच्या वस्तू वितळत नाहीत. पारो गावाच्या बाजारात फेरफटका मारला आणि आम्ही आमच्या मुक्कामाच्या गावी निघालो. हिरव्यागार टेकड्यान्च्या कुशीत वसलेले "हा" नावाचे गाव आणि त्यातून वहाणारी हा चू ही नदी. हे गाव ११००० फूट उंचावर आहे. इथे तीन अगदी एकसारख्या टेकड्या आहेत. त्या पाहून एक बुद्ध माँक "हाऽऽ" असे म्हणाला म्हणून या गावाचे नाव "हा" असे पडले म्हणे. इम्ट्राट (इंडिअन मिलिटरी ट्रेनिंग टीम) च्या वसाहतीत ३०० आर्मी पर्सन्स रहातात. इथे गोल्फ, जिम, सर्व प्रकारचे इनडोअर खेळ, सिनेमा / नाटकासाठी झक्कास हॉल इत्यादी सर्व सुखसोयी आहेत. इथे भूतानच्या सेनेसाठी ट्रेनिंग कॉलेज आहे. चारशे बेडसची सोय असलेला मोठ्ठा दवाखाना आहे. तिथे गुडविल म्हणून फुकट औषधे आणि उपचार मिळतात स्थानिक रहिवाश्यांना. इथल्या स्टोअरमधून रास्त दरात वस्तू मिळतात. आम्ही चार दिवस या निसर्गरम्य गावात आनंदात राहिलो आणि आर्मीचा यथेच्छ पाहुणचार झोडला.

तिथून ३ दिवस लांबलचक थकवणारा प्रवास करून भर उन्हाळ्यात लौटके बुद्ध घरको आये.

ताशिदेलेक (म्हणजे थँक्स, बेस्ट लक वगैरे)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वा ! माजा आली वाचायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. भूतानची प्राथमिक माहिती चांगली मिळाली. तिथे भारतीय रेस्टॉरेंटस आहेत का ? स्थानिक लोकांशी संभाषण कुठल्या भाषेत करता येते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिथे हिंदी भाषा समजते . ताज ताशी हे आपलेच ताज ग्रुपचे होटेल आहे . थीम्पूला
चेन वाली काही हॉटेल्स आहेत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचताना मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लिखाण अतिशय रंजक आहे. कुठेही कंटाळा आला नाही. प्रकाशचित्रेही सुरेख आहेत.

असेच भरपूर प्रवास घडोत. आणि त्या प्रवासांबद्दलच "ऐसीच अक्षरे" लिहून होवोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तुमच्या खास शैलीतल्या टिप्पण्यांसह लेख आवडला.
<<<जिप्सीच्या मिक्सरमधून आमचा लगदा बाहेर पडला>>>
<<<आमची गाडी बदलून आणखी खटारा गाडी आणि खतरनाक डायवर प्राप्त होताच माझ्या डोक्यात घंटानाद होऊ लागला आणि पोटात फुलपाखरे उडू लागली. मी डोळे गच्च मिटले आणि त्या अंतहीन भोवऱ्यात कल्पांतापर्यंत गरगरू लागले.>>>>
वगैरे वाक्ये विशेष आवडली आणि ही वर्णने वाचून 'बट द मेल कोच ड्रायव्हर' ची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन आवडले. खूप निसर्गरम्य दिसतोय हा देश.
ती प्राथना म्हणजे "ओम मणि पद्मे हुम" हा मंत्र. या मंत्राच्या त्रिकोणी पताकाही असतात. असा समज आहे की या पताका फडकल्याने मंत्रशांती हवेत दूरवर पोचते.

आता कोणीतरी खोदून खोदून विचारणार की ही माहीती कुठुन मिळाली किंवा ती कशी खोटी आहे याबद्दल फ*** अँग्झायटी देणार. त्या खास लोकांकरता - http://www.yowangdu.com/tibetan-buddhism/om-mani-padme-hum.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ*** अँग्झायटी

तार्‍यांचा हिशेब लागला नाही.

आणि, अँग्झायटी???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुन्दर लेख. भुतानला एकदातरी भेट द्यावी असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भुतानला एकदातरी भेट द्यावी असे वाटले.

'भुतानला' नव्हे. 'भुतांना'.

'भुतानला' हे काही बोलींत योग्य रूप होत असले, तरी प्रमाणभाषेत लिहिताना चूक आहे. प्रमाणभाषेत लिहिताना 'भुतांना' असेच लिहिणे इष्ट.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Gross National Product (GNP)च्या जागी Gross National Happiness (GNH) वाढविणे हे अधिकृत धोरण असलेला हा भारताचा शेजारी. अन्य शेजार्‍यांबरोबर थोडयाफार कटकटी असणे ह्याची भारताला सवय आहे पण सर्वात कमी कटकटी असलेला देश असे भूतानला म्हणता येईल.

ह्याचे कारण म्हणजे देशाच्या आधुनिकीकरणामध्ये स्वारस्य असलेले राजघराणे. भूतानमध्ये आधुनिकीकरण, लोकशाही अशी मूल्ये येत आहेत तेथील राजघराण्याच्या नेतृत्वामुळे.

जिग्मे सिंग्ये वांगचुक ह्यांनी देशामध्ये राज्यघटना निर्माण करणे, निवडणुका घेणे आणि मन्त्रिमंडळाकडे सत्ता सोपविणे ह्या गोष्टी आपणहून केल्या आणि हे कार्य केल्यावर वयाच्या ५३व्या वर्षी स्वेच्छेने निवृत्ति स्वीकारून पुढच्या पिढीकडे सत्ता सोपवली.

मी वाचल्याप्रमाणे तेथे टूरिस्ट म्हणून जाणे मात्र सोपे नाही कारण वर्षाकाठी किती प्रवाशांना टूरिस्ट वीजा द्यायचा ह्यावर काही निर्बंध आहेत असे ऐकले आहे. ते खरे आहे काय? ह्या छोटया देशाच्या पर्यावरणावर प्रवाशांच्या संख्येमुळे फार ताण पडू नये असा ह्याचा हेतु आहे अशी समजूत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वाचल्याप्रमाणे तेथे टूरिस्ट म्हणून जाणे मात्र सोपे नाही कारण वर्षाकाठी किती प्रवाशांना टूरिस्ट वीजा द्यायचा ह्यावर काही निर्बंध आहेत असे ऐकले आहे. ते खरे आहे काय?

काही निर्बंध आहेत खरे.

(येथे थोडीबहुत अधिकृत माहिती सापडते. त्यानुसार, वीज़ाच्या वार्षिक संख्येस मर्यादा नाही, परंतु प्रवासपूर्व वीज़ा क्लियरन्स, अधिकृत सरकारमान्य टूर-ऑपरेटराकरवी प्रवासकार्यक्रमाचे संपूर्ण पूर्वआयोजन करण्याची अट, प्रतिदिनी किमान २००/२५० डॉ. खर्च करण्याची अट/तसे प्याकेज, असे काही निर्बंध आहेत, असे दिसते. थोडक्यात, तुम्ही आपलेआपले आणि तुम्हांस हवे तसे आणि हवे तेथे हिंडू शकत नाही; कार्यक्रमाप्रमाणे आणि गाइडबरोबर जावे लागते, असे दिसते.)

मात्र, (वरील दुव्यावरील माहितीप्रमाणे) भारतीय नागरिकांस हे निर्बंध लागू नाहीत. (देशात प्रवेश करण्याकरिता भारतीय पासपोर्ट अथवा भारतीय मतदार ओळखपत्र यांपैकी एक दस्तऐवज जवळ बाळगणे पुरेसे आहे.) बांग्लादेश आणि मालदीवच्या नागरिकांवरही असे कोणतेही निर्बंध नाहीत, असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान ओळख करून दिलीत भुतानची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान ओळख करून दिलीत भुतानची.

?????? कुठे??????

मला तरी आख्ख्या कथेत एकाही भुताची ओळख तर सोडाच, पण साधे एखादे भूत पात्रही सापडले नाही. तुम्हाला ओळख कुठे दिसली बुवा?

(नाही म्हणायला, 'शशांक', 'मामी', 'मामीचा नवरा' अशी काही तुरळक पात्रे आढळतात, परंतु ती भूत योनीतील (ईईईईईक्स!) असावीत, असे, का कोण जाणे, पण वाटत नाही. त्यामुळे, बहुधा आपणांस ती अभिप्रेत (च्यायला! ही भुते नाहीतर प्रेते जिथेतिथे का बरे कडमडतात?) नसावीत, असा अंदाज मांडण्याचे धाडस करावेसे वाटते. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL दोन ड्रायव्हर विसरलात काय ? बाकि तुमची कोमेन्ट
अद"भुत" आहे Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'वी बाजू --^--

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

फोटो जास्त आवडले का खास 'उसंत सखू' स्टायलीतली वाक्य, हे सांगणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवडला, टायगर हिलच्या कोपर्‍यावरच्या घरात रहाताना मजा येत असणार, खिडकीत बसून मस्त पेय घेत एखादं झकास पुस्तक वाचत बसायला ग्रेट जागा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिडकीत बसून मस्त पेय घेत एखादं झकास पुस्तक वाचत बसायला ग्रेट जागा आहे.

खिडकीतून कोणालातरी खाली ढकलून द्यायला सुंदर जागा आहे.

(तिथे गाडी कशी जात असेल, ती भूतानची प्रजावळच जाणे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिथे चढून जायला फक्त अडीच तास Smile ते चार तास तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार लागतात . Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला परिच्छेद खास उ.स. टच. परिचय उत्तम जमला आहे. स्मरणरंजन झाले.
आमची भूतान वारी इथे वाचता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमचे लेख सखोल माहिति देणारे आणि उत्तम आहेत . Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भुतान म्हंजी फारेन ना? अन झिम्पुकला म्हंजे काय वो? चिमूकला ह्या शब्दाचे नविन रूपांतर का तो एक भुतानी(!) भाषेतील शब्द आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही