सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)

यापूर्वीचा भागः
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)

---------------------------------------------------------
भाग २:

३. अभिरमन्यु उवाच:

माझ्या पित्याने माझे नाव ‘अभीरमन्यु’ ठेवले - अभिरांचा मुकुटमणि.
अगदी लहानपणी मी अभीर - राज्यातच होतो, परंतु मी पाच-सात वर्षाचा असताना द्वारकेच्या यादवांनी अचानक हल्ला करून शेकडो स्त्रिया आणि लहान मुलांना पळवून नेले, तेंव्हापासून मी द्वारकेत वाढलो. माझी हुशारी आणि चुणचुणीतपणा बघून बलरामाने मला प्रासादात नेले, आणि लहानग्या सुभद्रेचा सवंगडी म्हणून ठेवले. हळूहळू आम्ही मोठे होऊ लागलो, आणि यौवनात शिरल्यावर आम्हाला एकमेकांबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटू लागले.…मात्र कृष्णाच्या पुढाकाराने पुढे सुभद्राहरणाचा प्रसंग घडला, त्यावेळी जो गोंधळ उडाला, त्याचा लाभ घेऊन मी द्वारकेतून निसटलो, आणि दूर जंगलातील आमच्या अभीर-वस्तीत पहुचलो. इतक्या वर्षांनी मी आलेला बघून सर्वांना खूप आनंद झाला.

अर्जुनाकडून सुभद्रेला सोडवून आणण्याचा आणि यादवांचा नायनाट करण्याचा माझा निश्चय होता खरा, पण तेवढे सामर्थ्य आमच्यात नव्हते. यादवांनी पूर्वी आमची हाकालपट्टी करून त्याजागी द्वारका वसवली, तेंव्हा अभिरांच्या निरनिराळ्या टोळ्या दूर-दूरवर पसरल्या, आणि त्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला. त्यांना पुन्हा एकत्र करून अभिरांचे सामर्थ्यशाली राज्य पुन्हा स्थापित करणे गरजेचे होते. माझ्या वयाच्या तरुणांना एकत्र करून मी तेच काम हाती घेतले. मी माझ्या अगदी विश्वासू तरूण-तरुणीना द्वारका, हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थात नट- नर्तक, विदुषक, गणिका, लोहार, सुतार, वनौषधी वा कस्तुरी विकणारे म्हणून पाठवून त्यांच्या मार्फत तिकडली बित्तंबातमी मिळवू लागलो.

आमचे पूर्वज समुद्राचे मीठ काढून ते सर्वांना पुरवत, मात्र यादवांनी आमच्या सर्व मिठागारांवर कब्जा करून ते मीठ अभीरांच्या सुंदर युवतींच्या मोबदल्यातच काय ते देण्याचा नीच उद्योग सुरु केला होता, हेही एक कारण माझ्या यादवांचा संपूर्ण नायनाट करण्याच्या निश्चयामागे होते.

सुभद्रा आणि अर्जुनाच्या वयात खूप फरक होता. तिला जरी मूल झालेले असले, तरी अजुनही तिच्या मनात माझ्याविषयी प्रेमा असेल, असे मला वाटत होते. पुढे तिकडे पांडवांना वनवासात जावे लागले, तेंव्हा मी सुभद्रेची दासी म्हणुन काम करणार्‍या माझ्याच हस्तिकेकरवी तिला निरोप दिला, की तिने आता इकडे माझ्याकडे निघून यावे. यावर तिने दासीला काहीच उत्तर दिले नाही, पण मग लवकरच ती तिच्या मुलाला घेऊन द्वारकेला आली. मला पुन्हा आशा वाटू लागली, की आतातरी माझी सुभद्रा मला मिळेल. त्या दृष्टीने मी एकदा गुप्तपणे द्वारकेत जाऊन तिला भेटलो सुद्धा. पण आता ती पूर्वीची गोड, लाजरी - बुजरी, अल्लड, स्वप्नाळू सुभद्रा राहिलेली नव्हती, आणि तिचा जीव तर तिच्या लहानग्या मुलात पूर्णपणे गुंतलेला होता. मला बघून तिचे डोळे क्षणभर चमकले, आणि लगेच विझले. मी काय ते समजलो. माझी ती अल्लड सुभद्रा मला आता कायमचीच दुरावली होती.… मग मी माझ्या अभीरांच्या एकीकरणाच्या प्रयत्नात असताना योगायोगाने भेटलेल्या एका अभीर मुलीशी लग्न केले. तिचे आधीचे ‘शतगोणी’ हे नाव बदलून ‘अभिराणी’ ठेवले. ती पण माझ्या कार्यात मनापासून समरस झाली.

पांडवांच्या वनवासानंतर त्यांचे दुर्योधनाशी मोठे युद्ध होणार, देशोदेशीचे राजे त्यात सामील होणार अश्या बातम्या येऊ लागल्या. खरेतर सर्वसामान्य लोकांनाच काय,पण देशोदेशीच्या सैनिकांनासुद्धा कौरव-पांडवांच्या भांडणात काहीच स्वारस्थ्य नव्हते. परंतु दुर्योधनाने त्यांच्या राजांना उत्तमोत्तम दासी, जडजवाहीर, धन-संपत्ती देऊन आपल्याकडून लढण्यास राजी करून घेतले. युधिष्ठिराने सुद्धा आपण जर युद्धात जिंकून सम्राट बनलो, तर दुर्योधनापेक्षाही जास्त देण्याचे वचन दिले. अर्थात आत्ता जे काही पदरात पडते आहे, ते भविष्यातल्या जर- तर च्या घबाडापेक्षा मौल्यवान, हे ओळखून जास्त राजे दुर्योधनाकडेच गेले. कृष्ण, सात्यकी वगैरे अर्जुनाचे मित्र पांडवाच्या पक्षात गेले, अन्य यादवप्रमुख मात्र दुर्योधनाच्या घोळात आले.

चित्रः युद्धमग्न अर्जुन, (१६ व्या शतकातील मुगल कला)

अर्जुनाचा सूड घेण्याची ही नामी संधी आहे, हे ओळखून मी बलरामाला भेटलो. तो दुर्योधनाचा गदायुद्धातील गुरु, हे मला ठाऊक होते. आधी मला बघताच तो संतापला, पण जेंव्हा मी माझे अभीर दुर्योधनाकडून लढतील असे सांगितले, तेंव्हा त्याचा राग मावळला. पुढे युद्धाचे वेळी जी यादव सेना दुर्योधनाकडून लढली, ती मुख्यत: आम्हा अभीरांचीच होती. पांडव सेनेचा संहार करण्यात आम्हाला काहीच स्वारस्थ्य नव्हते. आम्ही फक्त अर्जुनाच्या मागावर होतो. मात्र अर्जुनाला ठार करण्याचा माझा बेत काही सफल होण्यासारखा नाही, हे स्पष्ट झाल्यावर मात्र आम्ही एका रात्री गुपचूप कौरव सेनेतून पळ काढून परतलो. आमच्यासारखेच अनेक सैनिक दोन्ही पक्षातून पळ काढून रात्रीच्या अंधारात आपापल्या देशी परत जात होते. त्यांचे राजे वैभवशाली शिबिरातून सुखोपभोगात दंग होते, तर सैनिकांच्या नशिबी धड दोन वेळचे भोजन सुद्धा नव्हते.

शेवटी युद्ध संपले. लाखो सैनिक मृत्युमुखी पडले. जे पळून गेले, ते वाचले. खरेतर एवढा खटाटोप करण्याची काही गरजच नव्हती. सुभद्रेचे जर माझ्याशी लग्न झालेले असते, तर मी पांडवांचा पक्ष घेऊन दुर्योधनाच्या सर्व सेनेचा सहज नायनाट केला असता. पांडवांच्या सेनेला वाहत्या नदीतून पाण्याचा पुरवठा होत होता, तर कौरव सैन्य एका मोठ्या सरोवराच्या साचलेल्या पाण्यावरच अवलंबून होते. त्या पाण्यात आम्ही वनात सहजपणे पकडायचो, त्या अत्यंत जहरी नागांचे विष जर मिसळले असते, तर युद्ध न करताच सर्व कौरव त्यांच्या अकरा अक्षौहिणी सेनेसह मृत्युमुखी पडलले असते.… अर्थात माझे लग्न जर सुभद्रेशी झालेले असते, तरच.
युद्धानंतर पांडवांना राज्य मिळाले खरे, पण भरभराट मात्र यादवाचीच झाली. त्यांनी मिठाचा व्यापार आणि समुद्रावर चांचेगिरी करून अमाप संपत्ती मिळवली. मोठे सैन्य उभारले. अर्थात ही संपत्ती हळू हळू काही मोजक्या धनाढ्यांकडेच एकवटली, आणि सर्वसामान्य यादवांचे जीवन हलाखीचे झाले.
यादवांवर सरळ चाल करून जाणे तर अशक्यच होते. शिवाय आमची खूप माणसे युद्धात दगावली असती. त्यापेक्षा यादवांमधे भेद पाडून त्यांना आपापसातच लढवून मारण्याची कूटनीति अवलंबण्याचे मी ठरवले.
मग ठिकठिकाणच्या अभीर टोळ्यांना भेट देऊन, त्यांच्या गावात ‘अभीर-भैरव’ देवाची स्थापना करून, सर्वांना एक होण्याची निकड मी समजावून सांगितली. आता यादव फार मत्त होऊन वेळोवेळी अभीरांच्या वस्त्यांवर धाड टाकून, पुरुषांना ठार मारून स्त्रियांना पळवून नेऊ लागले होते, त्यामुळे आता सर्वांनी एक होऊन, आपणच पुढाकार घेऊन यादवांना कायमचे संपवणे निकडीचे होते, हे सर्वांना पटले. अर्थात हे सर्व करण्यात अनेक वर्षे खर्ची पडली.

‘अभीर-भैरव’

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३)

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

कथेत रंग भरत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.