हाडळीचा मुका

हाडळीचा मुका

मानसं मस जमलि व्हति. म्हनजि तसं कारनच घडलं व्हतं. शुंगार टेलर वाल्या का़का टेलरचं पोरगं घर सोडुन गेल्तं. काका टेलर अन त्याच्या बायकुचं रोजचं कडाक्याचं भांडान असायचं म्हनुन कोनच त्येंच्या घरच्या भानगडित पडायचं नाय. पण काल रातच्याल काकीचा लैच येगळा आवाज आला अन तिनं हांबरडा फोडला का, तवाच पब्लिक जमा झालं.

पोरगं लैच कटाळलं अन म्हनुन घर सोडुन गेलं असं समदं म्हनत व्हतं. पन ते ज्या दिसंला गेलं असं पुजारी म्हनला त्ये आइकूनच काकाचं अवसान गळुनशान पडलं व्हतं. पोरगं घरातुन गेलं तवा भांडान रंगात आलं व्हतं. काका अन काकी एकमेकात बोलत नव्हतं. बोलायचं तेबी फकस्त भांडायला. बाकि समदं इशा-या इशा-यात चालयचं. त्येंच्या खानाखुना बघुन गावच्या पोरांची लै करमनुक व्हायचि. पन त्येंच्या अशा वागन्यानं पोटच्या पोराला लैच चिडवायची गावातली पोरं.

पुजा-यानं पोरगं जंगलाकडं जाताना पाहिलं तवा त्येची आरती अन प्रसादाचि तयारि चाललि व्हती. पोरगं घर सोडुन चाललं आसल म्हनुन त्येला तरी काय कल्पना ? जात असंल हितंच कुटं दोन नंबरला नायतर रात्रिचं आंबं पाडायला चाललं असंल असं त्येला बी वाटलं. नायतर रातिच त्येनं अडवलं असतं. पन सकाळ्च्याला बोम्ब झाल्याचं कानावर आलं अन पोरगं काय घरला आलं नाहि हे जवा त्याच्यापत्तुर आलं का, तवाच त्येच्या मनात बी घबराट झालि.

पोरगं जंगलाच्या दिशेनं गेलेलं त्यानं बघितलंच व्हतं. रातच्याला कोनतरी इचारायला आल्तं तवा सांगितलं बी व्हतं. जंगलात गेलं असंल तर काय नाय, पन जंगलातल्या वाड्यात गेलं तर काय हाच इचार आत्ताच्याला समद्यांच्या मनात व्हता. पोराला शोधुन काय बी उपेग नाही असं जे ते म्हनत व्हतं. पन बापाचं आतडं गप्प बसंल व्हय ? बसलं तरी आयचं आतडं त्या आतड्याला बसुं देनार व्हय ? काका टेलर गुमान उठला अन सकाळच्यालाच जंगलाकडं चालाय लागला. तसं काकाला आमि तुज्या सोबत हाय म्हननारं समदं मागं सरकलं. काका शेवटाला एकलाच -हाईला अन जंगलची वाट चालु लागला.

रानातल्या वाड्यात कोनबी जात नव्हतं. त्या वाटेनं बी कोन येत जात नव्हतं. पन पोराटोरांचं काय सांगावं ? दर सालाला कोन ना कोन तिकडं जायाचं अन वापस येतच नव्हतं. वाड्यातल्या हाडळीनं त्यांना खाल्लं असं जुनी मानसं म्हनायची.

हाडळ लैच पॉवरबाज व्हती. वाड्याजवल गवत बी उग्वत नव्हतं. साप, इंचू, किडा, मुंगी कायबी तिथं जित्तं राहत नव्हतं. कुनाची बकरी गेली कि वापस येत नव्हती.

काका जंगलाची वाट चालत व्हता. सोत्तालाच लई कोसत व्हता. बायकुला लैच तरास दिला असं सोत्ताला सांगत व्हता. सोत्ताच्या बायकुला बी त्यो हाडळ म्हनायचा. बायकुबी त्येला न्हाई न्हाई त्ये बोलायचि. तुझ्यापरिस येक से येक लाईनमधि उभं व्हतं म्हनायचि. तसं म्हनलं कि काकाचं डोस्कं औट व्हायचं. मग त्यो सौताच्या पोरावरुन तिला नाय नाय ते बोलायचा. हाडळीचं पोर म्हनायचा. भान्डत नसली कि मग घर शान्त असायचं. पोराच्या कानावर कधिच मम्मी डॅडी चा आवाज पडायचा नाय. फकस्त खानाखुना. मंग त्ये बी तसंच करायचं. गावातल्या पोरांना लैच मज्जा यायचि.

पोराला लैच भोगावं लागलं असं काका मनात म्हनत व्हता. इचारात जंगल कधि चालु झालं समजलंच नाय. काकानं झाड न झाड बघाय सुरुवात केली. पोराला हाका मारत मारत शोध चालला व्हता. हिकडं काकीनं रडून रडून आकांत मांडला . माजं पोरगं गेलं आता धनीबी गेला असं वरडत रडत ती ज्येला त्येला सांग्त व्हती. कुना येकाला असं न्हाईच, पन तिचा नुस्ताच आकांत चालला व्हता. आता तिला लैच पस्तावा झाला व्हता. आपन त्येला लैच टोचुन बोललु हे आठवुन सौताल कोसत व्हती. असं टोचुन बोलल्यावर कुठला गडी जित्ता -हाईल असं मोठमोठ्यानं वरडत व्हती. तिच्या असल्या वरडन्यानं त्या प्रसंगातबी गडीमानसांना हसाय येत व्हतं अन ते बिडी माराय निघुन जात व्हते. बायामानसं त्वांडाला पदर लावत व्हत्या. त्यामुळं त्या हसत्यात का रडत्यात कायबि समजत नव्हतं.

येक म्हातारं म्हनलं, काकाच्या मदतिला का जात न्हाई, तर म्हाद्या मनला तु का नाई जात म्हाता-या ? बायामानसं बी म्हाता-याला वरडल्या. तुजी लाकडं मसनात गेली, तुला हडळीनं धरलं तरी काय बी फरक पडत नाई, दोन दिसानी जायचं ते आज जाशीला म्हनु लागल्या. पन आपल्या घरातल्या गडीमानसाला हाडळ धरंल असं त्यांना पक्कं वाटत व्हतं. काय काय नटव्या बायांना बी गावात हडळच म्हनायच्या गावातल्या बायका. त्या हाडळीबी गडीमानसांना झपाटतात असं नळावर पानी भराय जाताना बाया म्हनायच्या. जंगलातल्या हाडळीकडं मातर कुनीच कुनाला जाऊ दिलं नसतं.

काकानं जंगल शोधुन शोधुन बसकन मारली. भुक, तहान अन पोराची काळजि यानं त्याला काय करावं अन काय नाय हे सुचत नव्हतं. अंधार व्हायला आला व्हता. अंधारात वाडा काळाजर्द सावलीसारखा दिसत व्हता. आता कसलं काय म्हनत काकानं वाड्याचा रस्ता धरला.

वाड्याभवती लईच जुनाट झाडि व्हती. ही कशी टिकली ते काकाला उमगंना. या झाडावर बसुन हाडळ झोकं घेत असंल असं त्येला वाटलं. त्यानं फाटक ढकललं तर केव्हडा आवाज झाला. घुबडं बी उडाली घाबरुन. डोईवर आत्ताच्याला चांदनं येत निघालं हतं. काकानं वाड्याच्या दरवाजावर हात टेकला अन मोठ्ठा आवाज करत दार आत गेलं. लै मोठ्ठा आवाज झाला अन आतल्या बाजूला घुमला. त्या आवाजानं काकाच्या पोटात खड्डा पडला. आतनं वागळं फडफड करत भाईर आली तवा काका घाबरलाच.

पन पोरापायी त्यानं आत पाऊल टाकलं. वाड्यातली हाडळ वाश्याला लटकली व्हती. फाटक उघडल्याचा आवाज कानात गेल्याबरुबर तिनं कानुसा घ्यायला सुरुवात केलि. या रस्त्यानं जानारं येक बी सावज तिनं आजवर सोडल्यालं नाहि असं मानसं म्हनायचि हे तिला बि म्हाईत व्हतं. हाडळ हाडळीसारखीच व्हती. पन लैच साजुक इचारांचि व्हती. तिच्या काळात मानसं लैच धर्मानं आचरन करत व्हती. जित्ती असतान तिनं कधिच वंगाळ इचार मनात येऊं दिलं नव्हतं. आजबि तेच सात्विक सन्स्कार तिच्यावर व्हतं. पन ति हाडळ असल्यानं तिची लैच बदनामि झालि व्हती. पन तिला सौत्ताला तिचं कॅरेक्टर म्हाईत व्हतं. ती म्हराटि पिक्चरमधल्या अलका कुबल सारखी धुतल्या तान्दलासारखि व्हती. हिन्दी पिक्चरमधल्या हिरविनीगत पान्याखालि धुतल्यासारखि नव्हति. तिनं तिच्या आयुष्यात येकच हिन्दी पिक्चर बगितला व्हता. सत्यम शिवम सुन्दरम. देवाधर्माचा असल्यानं बगितला व्हता. अन जत्रंतल्या खेळात जय सन्तोषि मा बघितला व्हता. बास. बाकि तिच्या आयुश्याचा सगळा म्हराटी पिक्चर व्हता.

पन तिच्यावर सन्शय घिउन तिच्या नव-यानं तिला येकदा इतकी झोडलि कि ती आजारिच पडलि. तवा त्यानं घाबरुन तिला रानातल्या या वाड्यात आनुन ठिवली. पन तिथंच तिचा जीव गेला अनं ती हाडळ झाली. हाडळ झाल्यावर तिला दिवस दिवस मानुस दिसायचं नाय. मंग कोन वळखीचं मानुस आलं कि ती त्येला वळख दावाय जायची पन त्ये मानुस घाबरुन हातातलं असंल नसंल ते खालि टाकुन पळत सुटायचं. कधी कधी तिला त्यात खायला भेटायचं. मंग तिला मज्जाच वाटाय लागली. मानसं बी आता घाबराय लागली व्हती. काहि काहि तर इतकी घाबरायची की छाती फुटुन मरायची.

काका वाड्यात पोराला शोधु लागला तसं हाडळीच्या चेह-यावर हासु उमटलं. लै दिसानी मानुस हितपर्यंत आलं व्हतं. आता याला वळख दावाय लागल असं मनात म्हनत व्हती. पन त्यो काय करतु त्ये बी तिला बगाय्चं व्हतं. आलेला मानुस दारामागं, खिडकीतून बाहेर काइतरी शोधत व्हता. हाका मारत व्हता. हाडळीला वाटलं आता मज्जा कराय पायजे.

हिकडं काका जेरिस आला व्हता. पोरगं काय ओ देईना. त्ये देवु बी शकलं नसतं. खरं म्हन्जी भूक, तहान अन काळजीनं त्येचं डोकं औट झालं व्हतं. पोराचं नाव मस हानम्या ठिवलं व्हतं. पन ते गावक-यांशी बोलतानाचं वापरलं जायचं. काकीला काका जवा बोलायचा तवाच पोराशीबी बोलायचा. ते बी भाडनातच. दोगं बोलत नव्हति म्हनुन पोराला बि बोलता येत नव्हतं म्हनुन समदी त्येला मुका म्हनायची तवा काकाबी त्येला हाडळीचा पोर न म्हनता हाडळीचा मुकाच म्हनाय लागला व्हता. काकाला आता हे समदं आठवलं.

हाडळीनं वरून हवेत सूर मारला अन काकाच्या फुड्यात येऊन ठाकली त्याच वक्ताला काका हाक मारत व्हता हाडळीचा मुका ...अन पुढंचा शीन बघून त्याची दातखिळच बस्ली. हिकडं हाडळीची अवस्था बी मेल्याहून मेल्यागत झाली. देवदेवाच्या पिक्चरमधल्या आशा काळेला कोनि मुका मागितला तर तिची अ‍ॅक्टिंग कशी असल डिक्टो तशिच तिचीबी झालि.

हिकडं काका घाबरला व्हता. पन पोराच्या काळजीनं त्येला भानावर आनलं अन त्यो हाडळीच्या पाया पडू लागला.
मला फकस्त हाडळीचा मुका घेऊन जाऊ दि म्हनाय लागला. त्याबरुबर हाडळीनं त्वांड फिरवुन घितलं. आता घाबरायची पाळि तिची व्हती. तिच्या गालावर गुलाबि रन्ग चडला असं अंधाराला वाटत व्हतं. काका इरंला पेटून मला हाडळीचा मुकाच पायजे असं म्हनत व्हता. त्याबरुबर हाडळ पळाय लागली अन काका तिच्यामागं. मला काय नकु, फक्त हाडळीचा मुका दी... पायजे तर नंतर माझा जीव घि पर मला आत्ता मुका दी असं काका रडत रडत वरडत व्हता अन हाडळ हादरली व्हती. ती आता धर्मसंकटात सापडली. तिच्या आख्या आयुष्यानंतर असा प्रसन्ग तिनं पायला नव्हता. अशा वक्ताला काय करायचं तिला ठाऊक नव्हतं. हा मानुस काय चान्गला नाय. जनमभर जे जपलं. ज्येच्यापायी जीव सोडला पन पाऊल वाकडं पडून दिलं न्हाय त्ये आत्ताच कसं काय पडूं द्यायचं या इचारानं तिनं आपली इज्जत वाचवायची ठरवलं अन वाड्याच्या भाईर पडून ती पळाय लागली.

हिकडं काकाला वाटलं, ती पोराकडं निघाली म्हनुन त्यो बी जोरात तिच्या मागं लागला. हाडळीचा मुका दी, माझ्या हाडळीचा मुका दी असं म्हनत त्यो जोरात निगाला, तशी हाडळ बी वरडत पळायला लागली. हाडळीला कायबी समजंना तसं काकालाबी. हितक्यात काकाचा पाय एका दगडावरुन घसरुन त्यो उडाला अन उतारावरून खाली गडगडत गेला. दगडांचा लैच आवाज झाला. हाडळीनं मागं न बघताच जी धूम ठोकली ती बोंब मारत जंगल सोडूनच निघून गेली.

काका पडला अन तिथंच शुद्ध गेली. सकाळच्याला कुनीतरी तोन्डावर पानी मारलं तसा काका जागा झाला. तोन्डावर कुनी पानी मारलं म्हनुन बगतुय तर त्येचा हाडळीचा मुका !! मग त्यानं आनंदानं येडा व्हत त्येला छातीला आवळलं अन त्येचे मुके घ्यायाला सुरुवात केली.

रातच्याला म्हाता-याच्या शिव्या ऐकुन दोनचार तरुन गडी जंगलाकडं निगाले व्हते. काकाचा आवाज आला म्हनुन त्येंनी लांबुनच पायलं तर काय काका मागं हाडळ पुढ, काका मागं हाडळ पुडं. त्यो शीन बगून त्येंची बोबडीच वळली. पन त्या वक्तालाबी काकाच्या हिमतीला दाद देत मंडळी जागच्या जगीच हुभी -हायली. हडळीला पाय लावुन पळताना समद्यांनीच बघितलं. ती जंगल सोडून गेली हे बी त्यांनी पायलं. पन अचानक काका गायब झाला. अन मग त्याची शोधाधोध सुरू झाली. काकाला आवाज दिला तर आवाज बी येईना.

काकाचं पोरगं लैच उदास झालं व्हतं. मुकं असल्यानं बोलता बी यायचं न्हाय. त्यात दोघंबी लै भांडायची. न्हाईतर अबोला चालु असायचा. गावातली पोरं लै म्हंजी लैच चिडवायची. परवा भांडान सुरू झालं तवाच कनाटाळुन त्येनं घर सोडलं. येका पिशवीत दोन मैन्ह्यामागचं दिवाळीचं उरलेलं समदं भरून जंगलाची वाट धरली. पन जंगलात शिरल्यावर त्येला रस्ताच सुधरंना. त्यात हाडळीच्या गोष्टी आइकून भीतीच वाटाय लागली म्हनुन येका वडाच्या झाडावर मोठी ढोली पाहून त्यात शिरून बसला. सकाळच्याला पाच सहा करन्ज्या हानल्यावर जवळच पानी मिळालं. आनि पुन्यांदा येऊन तो झोपला. काका त्या झाडाजवळुन गेला तरी त्येला काहि हा पोरगा दिसला नाहि. आनि मंग रातच्याला गोंधळ झाला तवा काकाचा आवाज ऐकुन मुका उठला. आपल्यालाच हाका मारतुय म्हनुन त्यो बी तिकडं पळाय लागला. त्येला ओ देता येत नव्हती म्हनुन काकाला हात लावुन साण्गायचा इचार त्यानं केला. अचानक काका उडालेला दिसला अन नंतर गायब झाला तसा मुका त्याला शोधाय लागला. सकाळच्याला काका दिसल्यावर त्येनी पानी आनलं आनि पुढचं आपन पायलंच.

आनि मंग गावात काकाचं लैच जंगी स्वागत झालं, हाडळीला पळवुन लावल्याबद्दल सत्कार बी झाला. काका आता गावात मोठा मानुस झाला. त्येच्या पोराला बी आता कोन चिडवत नाय. काकी आता नीट वागति.टोचुन बोलत नाय. आता दोगं बी बोलत्यात. गावातली लोकं काकाचं नाव काडत्यात. जवळच्या रस्त्यानं आता जाता येतंय. वाड्यातली हाडळ आता निघुन गेलीय. काका काकीला हाडळ म्हनत नाय. घरात दोगं बोलाय लागल्यावर मुक्याला बॉ बोलावं वाटु लागलंय. आता बाबा, दादा म्हनतंय. शिकंल त्ये बोलायला.

आता हाडळीचा मुका घ्यायला काकाला कुटं जायला लागनार नाय.

- बाबुराव

( नाव बि घातलं अन काय काय मिष्ट्येकच्या चुका व्हत्या त्या बी दुरुस्त केल्या )
कॉपी मारु नये ही इनंती. अन मारलीच तर आमचं नाव घाला वं त्यात समजून उमजून.

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

गावरान कथा आवडली!

- (हडळीचा 'मुका' कसा असेल ह्याचा चिचार करणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL माबोवर वाचली होती. परत वाचताना पण तेवढीच मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

भन्नाट.
योगायोगानं, अगदि काल परवाच मिरासदारांचा कथासंग्रह आणि पाठोपाठ रत्नाकर मतकरींचं "वटवट सावित्री" हे विनोदी नाटक पुन्हा वाचण्यात आलं.
ह्या दोन्ही भन्नाट लेखकांची शैली आपसात अगदि घट्ट मिसळून गेल्यावर जी फक्कड लस्सी बनेल ना, तशी ही कथा शैली आहे.
भन्नाट.
मिरासदारांच्या कथेत गावाकडली बेरकी पण मिश्किल माणसं असतात. मी अलिकडे वाचलेल्या कथेत टोकाचे कंजुष पण त्याहून अधिक , अत्याधिक आलशी आणि फुकटे व दरिद्री असे जोडपे दाखवले होते.
घरातील व स्मशानातील "तू दोन खा, मी तीन खातो" ही त्यातली पंच लाइन खासच.
ते सर्व ही एक कथा वाचून आटह्वले. मस्त कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दमा हे मराठीतले माझे सर्वात आवडते लेखक. व्यंकूची शिकवणी, शिवाजीचे हस्ताक्षर, नाना चेंगट, गणामास्तर, शिवा जमदाडेंच्या कथा या ऑल टाईम फेव्हरीट. पण तू दोन खा मी तीन खाईन ही कथा वाचली नि थोडा धक्का बसला. कारण लहानपणापासून ही कथा ऐकत आलोय. खूपच जुनी कथा आहे. दमांनी ती कधी लिहीली ते माहीत नाही. पण मी पहिल्यांदा १९७३ साली लहान असताना ऐकली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

'मुका'ट्याने वाचताच येणार नाही अशी कथा.
प्रसंगी आलेल्या खुमासदार वाक्यांनी हाफिसात असूनही मोठ्याने हसू आले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाबूरावांनी आपल्या सर्वांना धन्यवाद कळवले आहेत. तसच ऐसी अक्षरे च्या सर्व सदस्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

हसून हसून पुरेवाट झाली. फारच मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी वाचली होती, तरी पुन्हा वाचताना मजा आली. विशेषत: अलका कुबल, आशा काळे चे रेफरन्स झकास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा लई भारी लिवलीय. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैच इनोदी ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||