चावडीवरच्या गप्पा - 'आप'आपली मते

chawadee

“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.

“वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी! विशेष म्हणजे तुमच्या त्या केजरीवालांचेही पितळ उघडे केले आहे?”, बारामतीकर अभिमानाने.

“ह्म्म्म, आमचे केजरीवाल!”, (आमचे वर जोर देत) नारुतात्या.

“दिल्लीकरांनी अजून पाच सहा जागा देऊन आम आदमी  पक्षाला सरकार बनविण्याची संधी द्यायला हवी होती म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झाले असते असे साहेब म्हणाले, परखडपणे”, बारामतीकर.

“अहो, पवार बोलणारच! त्यांच्या 'कांद्याचे भाव'  ह्या वर्मावर केजरीवालांनी ‘कांद्यांचे भाव निम्मे करून दाखवू’ असे म्हणत बोट ठेवले होते ना!”, इति चिंतोपंत.

“अहो शेती आणि शेतीची जाण हाच तर साहेबांचा हुकुमाचा एक्का आहे! त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की  या भावांवर राज्यांचे काहीच नियंत्रण नसते. उत्पादनावर आधारित दरांचे चढउतार होत असतात  हेच वास्तव आहे.”, बारामतीकर एकदम भावुक होत.

“कसला शिंचा हुकुमाचा एक्का आणि कसली शिंची ती जाण! अहो ह्या कृषिप्रधान देशाच्या शेतीचा पार चुथडा केला आहे ह्या कृषिमंत्र्याने.”, घारुअण्णा लालबुंद होत.

“घारुअण्णा उगाच काहीही बरळू नका, तुम्हाला काय कळते हो शेतीतले?”, शामराव बारामतीकर घुश्शात.

“नसेल मला शेतीतले काही कळत, पण तुमचे सो कॉल्ड साहेब काय करताहेत ते मात्र कळते आहे बरं! भारी शेतकर्‍यांतचा पुळका त्यांना! अहो आपल्या पुण्यातलीच किती एकर लागवडीखालची जागा ‘डेव्हलपमेंट’च्या नावाखाली बरबाद केली? आणि त्यातून कोणाची ‘डेव्हलपमेंट’ झाली हे ही कळते हो! असे केल्यावर कसे वाढणार उत्पन्न आणि कशा होणार किमती कमी?”, घारुअण्णा रागाने.

“अरे पवार काय म्हणाले आणि तुम्ही कुठे चाललात! पवारांनी एकंदरीत आढावा घेतला आहे निवडणूक निकालांचा. सर्वांनाच कानपिचक्या दिल्या आहेत त्यांनी!”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“धन्यवाद बहुजनहृदयसम्राट, नेमके हेच म्हणायचे होते मला.”, बारामतीकर हसत.

“पण साहेबांनी केजरीवालांवर केलेला हल्ला जरा अतीच होता. दिल्ली निकालानंतर तर काय सगळेच केजरीवालांचे भविष्य आपल्यालाच कळल्याच्या थाटात मते सांडत सुटले आहेत? ”, इति भुजबळकाका.

“म्हणजे? स्पष्ट बोला असे मोघम नको.”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“अहो, लोकसत्तेच्या अग्रलेखात माननीय संपादकांनी काय तारे तोडलेत ते वाचले नाहीत का?”, भुजबळकाका.

“नाही ब्वॉ, काय म्हणतोय लोकसत्तेचा अग्रलेख?”, इति घारूअण्णा.

“ज्या क्षणी 'आम आदमी पक्ष' आपली राजकीय भूमिका स्पष्ट करेल तो क्षण आम आदमी पक्षाच्या शेवटाची सुरुवात असेल असे भविष्य त्यांनी वर्तवले आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“आम आदमी पक्ष वा त्या पक्षाचे रोमॅंटिक समर्थक यांनी हुरळून न जाणे बरे असा फुकटचा न मागितलेला सल्ला ही दिला आहे बरं का!”, चिंतोपंत.

“च्यामारी, त्या बिचार्‍या केरजीवालाचे यश कोणालाच बघवेनासे झालेले दिसतेय!”, नारुतात्या जोरात हसत.

“हो ना, अण्णांनी पण मौन सोडलेले दिसतेय. अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पक्षाचा प्रचार दिल्लीतल्या घरा-घरात झाला असे आता अण्णा म्हणताहेत.”, चिंतोपंत.

“पण हेच अण्णा केजरीवालांची खिल्ली उडवत होते ना पक्ष स्थापनेनंतर?”, नारुतात्या.

“अहो, केजरीवालांचे यश बघून त्यांचे संतपण ही गळून पडलेले दिसतेय, परत उपोषणाची घोषणा केली आहे त्यांनी! किती ती शिंची अॅलर्जी म्हणावी, खीsssखीsssखीsss”, घारुअण्णा खो खो हसत.

“त्या किरण बेदीही निवडणूक प्रचाराच्या वेळी कुठेही नव्हत्या, पण निकालानंतर मात्र एकदम आप आणि भाजपा यांच्यात समेट करायला रिंगणात!”, चिंतोपंत.

“अहो भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच! दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुका होतात की नाही बघा! साहेबांचेही खाजगीतले हेच मत आहे.”, बारामतीकर.

“त्याचा फायदा भाजपालाच होईल, केजरीवालांना काही फायदा होईलसे वाटत नाही.”, चिंतोपंत.

“काहीही असो, पण केजरीवालांनी मिळवलेल्या यशाने बहुतेकांना अनपेक्षिततेचा धक्का जरा जास्तच बसलेला दिसतोय!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो केजरीवालांना कोणी खिजगणतीतच धरले नव्हते! काँग्रेस राहुल गांधी आणि भाजपा नरेंद्र मोदी यांच्याच नादात होते. केजरीवाल एकदम 28 जागांवर कब्जा मिळवतील हे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल. त्यामुळे हा धक्काच आहे सर्वांसाठी!”, सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, खरे आहे तुमचे?”, नारुतात्या.

“सद्य राजकीय अनागोंदीच्या आणि भ्रष्ट सरकारी पार्श्वभूमीवर हा निकाल पॉझिटिव्ह आणि प्रॉमिसिंग ठरावा. अण्णांच्या आंदोलनाने जन-जागृती झाली होती पण त्या जन-आंदोलनात भरीव काहीही नव्हते. त्यावेळी झालेल्या जन-आंदोलनाने समजा जर क्रांती होऊन सत्ताधार्‍यांना सत्तेवरून हाकलून लावले असते, ट्युनेशिया क्रांतीसारखे, तर पर्यायी सरकारची व्यवस्था काय होती अण्णांकडे? नुसते जनलोकपाल बील पास करून घेण्यासाठीच झालेल्या जन-जागृतीचा आणि जन-आंदोलनाचा भर ताबडतोब विरून गेला कारण ठोस अजेंडाच काही नव्हता. व्यवस्थेला बदलण्यासाठी व्यवस्थेचा भाग असणे गरजेचे असते, केजरीवालांनी नेमके हेच जाणून घेतले आणि आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यावेळी अण्णांची त्यातून माघार घेतली खरी पण आता त्यांचीही गोची झालेली दिसतेय कारण केलरीवालांचे हे यश कोणालाच अपेक्षित नव्हते.

सद्य स्थितीत, कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष सत्तेवर येण्यापेक्षा एका नवीन, फ्रेश पर्यायाची भारताला गरज आहे. ‘आप’च्या रूपात केजरीवालांनी तो पर्याय दाखवला आहे आणि दिल्लीतील त्यांच्या विजयाने जनतेने त्या पर्यायाला स्वीकारलेले दिसते आहे. आता केजरीवाल आणि त्यांचे आमदार कसे आहेत ते लवकर कळेलच. त्यामुळे दिल्ली हा ‘आप’ची धोरणे समजून घेण्यासाठी उपलब्ध झालेला एक प्लॅटफॉर्म ठरावा. एवढ्यातच कुठल्याही निष्कर्षावर पोहोचणे हे जरा आततायी होईल. सो, वेट अॅन्ड वॉच!”, सोकाजीनाना मंद हसत.

“काय पटते आहे का? जाऊद्या चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आम आदमी पार्टीच्या केजरीवालांना काही प्रश्न

(१) भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित लढाई लढणार्‍या अरविंद केजरीवाल व त्यांच्या पत्नीची दिल्लीतून एकदाही बदली झाली नाही. पण अशोक खेमका व दुर्गा शक्ती यांच्या सारखी त्यांच्यावर एकदाही कारवाई झालेली नाही असे का?

(२) प्रशांत भूषण यांच्या टिप्पण्यांच्या संदर्भात आपची काश्मीर, भारतीय सेना, व तथाकथित हिंदू दहशतवाद यांच्या विषयी काय मते आहेत?

(३) आम आदमी पक्षाची रामजन्मभूमी या प्रश्नावर काय भूमिका आहे?

(४) बाटला हाऊस एनकाउंटरमधे हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्या हौतात्म्याविषयी आपचे काय मत आहे?

(५) आप केंद्रात सत्तेवर आल्यावर शीखविरोधी दंगलींतल्या आरोपींचे काय करणार?

(६) बिनायक सेन हा कोर्टाने शिक्षा सुनावलेला माओवादी नेता आप मधे कसा?

(७) भारतात इस्लामी सत्ता यावी म्हणून जाहीरपणे बोंबलणारा आणि ज्याच्या विरोधात डझनावारी वॉरंट्स आहेत अशा इमाम बुखारी या इसमासोबत केजरीवाल अनेक वेळा दिसलेले आहेत. यावर त्यांचे काय म्हणणे आहे? त्या दोघांतल्या संबंधांबाबत केजरीवाल यांच्याकडे काय स्पष्टीकरण आहे?

(८) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले पवन बन्सल आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात केजरीवाल काहीच कसे बोलत नाहीत?

(९) उपोषणादि कार्यक्रमात आधी भारतमातेचे चित्र लावणार्‍या आपने नंतरच्या आपल्या कार्यक्रमांतून ते चित्र अचानक का गायब केले?

(१०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीच्या एका उपोषणाच्या कार्यक्रमात अन्न वाढण्याच्या प्रकाराबद्दल केजरीवाल यांना विचारले असता मीडियाला बाईट देताना म्हणाले "आम्हाला जातीयवादी (communal) लोकांकडून समर्थन नको". मग याच आम आदमी पार्टीचे लोक उत्तराखंड कधे बाबा रामदेवांच्या लोकांनी चालवलेल्या रिलीफ कँपमधे (जे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होते) ते जेवण हादडताना दिसले होते, त्याचे काय? फुकटचे गिळताना रामदेव बाबा सेक्युलर झाले का?

(११) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विरोधातल्या अनेक गंभीर आरोपांबद्दल केजरीवाल शांत का?

(१२) बाटला हाऊस एनकाउंटर हा फेक होता आणि इशरत जहां अगदी गोड गोजिरी लाज लाजिरी अशी भोळीभाबडी मुलगी होती आणि तो एनकाउंटरही फेक होता असे एका पत्रात केजरीवाल यांनी मुसलमान संघटनांना लिहीण्याचे काय कारण?

(१३) दहशतवाद विरोधी एनकाउंटरांची यादी देताना केजरीवाल यांना नेहमी गुजरात कसे आठवते? आणि तेही हे सत्य असताना की काँग्रेसशासित महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश तसेच पूर्वोत्तर राज्ये आणि उत्तर प्रदेश यांत हा आकडा/यादी कितीतरी मोठी आहे.

(१४) उत्तर प्रदेशातल्या दंगलींबाबत बोलताना केजरीवाल यांनी मोदी आणि अमित शहा यांचा ठळक उल्लेख करुन समाजवादी पक्षाचा अगदी जाता जाता पुसटसा उल्लेख का केला? या दोघांचा आणि उत्तर प्रदेशातल्या दंगलींचा काय संबंध? आणि तेही हे सत्य असताना की २ काँग्रेसचे माजी खासदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि काही बसपा आणि सपा खासदारांवर दंगली भडकावल्यचा आरोप आहे. काँग्रेसविषयी इतका सॉफ्ट कॉर्नर का?

(१५) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मयंक गांधी आणि दमानिया या आम आदमी पार्टीच्या सदस्यांची चौ़कशी करायला केजरीवाल यांनी अंतर्गत लोकपाल नियुक्त करणे आणि सीबीआयने काँग्रेसची चौ़कशी करणे यात विनोदाचा भाग वगळला तर फरक काय?

(१६) सरकारी सेवेत असताना जास्त पगार लाटल्याचा केजरीवाल यांच्यावर आरोप होता. आपण कोणताही भ्रष्टाचार केला नाही असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यांनी अतिरिक्त पगार परत केला. त्यांनी बेकायदेशीररित्या जास्त पगार ढापला नव्हता तर त्यांनी तो जास्तीचा पगार परत का केला?

(१७) माहिती अधिकाराचा डंका पिटणार्‍या आम आदमी पार्टीच्या Core Reforms team मधल्या सदस्यांवरच भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन अनेक माहिती अधिकारात अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांना आप उत्तर द्यायला टाळाटाळ का करत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin गप्पा आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आप'च्या आमदारावर विनयभंगाचा गुन्हा

नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्र सिंह कोली यांच्या विरोधात पराभूत कॉंग्रेस उमेदवाराच्या पत्नीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेल्कम टु गोवा, सिंघम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं