ऐसी अक्षरे ट्रेडिंग एक्स्चेंज

ऐसी अक्षरे वर वेगळं काय? हे नुकतंच घडलेलं विचारमंथन वाचून आम्हा संपादक (व्यवस्थापक, संपादक, सहसंपादक, श्रेणीदाते, तारकादाते वगैरे सगळ्या असामान्य सदस्यांसाठी शॉर्टफॉर्म) मंडळींमध्ये खळबळ उडाली. लवकरच काही आगळंवेगळं केलं नाही तर महिन्याभरातच 'ऐसी अक्षरे' अल्पायुषी ठरणार काय? असा एखादा लेख येईल अशी खात्री वाटायला लागली. त्या लेखातली काही वाक्यंसुद्धा आमच्या डोळ्यासमोर तरळायला लागली.

"सुरूवात तर चांगली झाली होती - श्रेणी, तारकांच्या सुविधा देऊन, 'समूहाची लोकशाही' वगैरे रौप्यवर्खी शब्द वापरून...."
"मराठी भाषेला संवर्द्धीच्या दिशेने नेऊन जाणारा हा देवदूत सध्या काही इतरत्र प्रकाशित आणि तारकांकित धाग्यांचे तुकडे चघळत पेंगतो आहे की काय असे वाटू लागले आहे. असे का झाले असावे?"
"....दात उगवायच्या आतच अशी कवळी लावल्यासारखी अवस्था 'ऐसी अक्षरे'ला ऐन बालपणात का प्राप्त झाली असावी..."

अशी वाक्यं संपादकांच्या कानात संस्थळाच्या मृत्युघंटेसारखी निनादतात. 'ज्या वयात या संस्थळाने शाळेची घंटाही ऐकलेली नाही, अशा वयात मृत्युघंटा ऐकायची पाळी आली... तर?' हे वाक्य आमच्या डोक्यात 'पण त्या निद्रेलाही स्वप्नं पडू लागली तर?' च्या नटसम्राटी शैलीत घुमायला लागलं. आणि त्या वाक्याने आम्हा सर्व संपादक लोकांचं डोकं भणभणायला लागलं. भणभणणारं डोकं म्हणजे सैतानाचा कारखाना अगदी नसला तरी कुटिरोद्योग वगैरे असतो बहुधा. कारण त्या भणभणीतून, डोक्याच्या गरगरण्यातून अनेक कल्पना चरख्यावर कातलेल्या सुताप्रमाणे बाहेर आल्या. त्यातल्या काही इथे मांडायचा विचार आहे. सदस्यांना त्या कल्पनांनी गुंफलेलं कापड आवडेल ही खात्री आहे. आणि परकीय गिरण्यांमध्ये तयार होणाऱ्या वस्त्रांप्रमाणे ते झुळझुळीत नसलं, जाडंभरडं असलं तरी आपल्या संस्थळभक्तीपोटी त्यांनी हे कापड परिधान करावं असं आवाहन आहे. नाही म्हटलं तरी त्या धाग्यांना संपादकांच्या हातच्या प्रेमाची ऊब आहे.

पहिली कल्पना इथे मांडतो ती म्हणजे एक्स्चेंजची. ती मांडणयाआधी भांडवलशाही व्यवस्था, खाउजा धोरण, ट्रेडिंग वगैरेंविषयी काहीतरी लंबंचवडं लिहायचा विचार होता. पण तो सोडून दिला. कारण साउंडबायटींच्या या जगात एखादा विषय खोलात जाऊन समजावून सांगण्याइतका आणि समजावून घेण्याइतका वेळ कोणाला आहे? आणि अशा गोष्टीत वेळ घालवला तर संस्थळांवर पडीक रहायला कसा वेळ मिळणार? असो. थोडक्यात सांगायचं तर आपल्याकडे जे नाही ते दुसऱ्याकडून विकत घेण्याची जागा म्हणजे बाजार. आपल्याला बाजार माहीत असतो तो वस्तूंचा. पण स्पर्श करता येणार नाहीत अशा गोष्टींचीही खरेदी विक्री करता येते. अशा बाजारांना एक्स्चेंज म्हणतात. म्हणजे स्टॉक एक्स्चेंजवर शेअर घेता विकता येतात तसंच. पूर्वी कंपन्यांचे शेअर घेणं ही मोठी बाब असावी कारण शेअर विकत घेतल्याची सुंदरशी सर्टिफिकेटं मिळत. हा कागद खूप महाग असावा. कारण बऱ्याच शेअर्सच्या बाबतीत 'छ्यः आता त्याची किंमत त्या कागदाइतकीही राहिलेली नाही' असं म्हणायची पाळी आली. ही तुच्छतादर्शक म्हण कंपन्यांना फार बोचायला लागली म्हणूनच की काय आजकाल शेअरचे कागद देणं बंद केलं. सगळे शेअर्स नुसत्या तुमच्या अकाउंटमधल्या आकड्याने दर्शवले जातात. 'छ्यः ते अकाउंट बघण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या किमतीइतकीही किंमत राहिलेली नाही' हा वाक्प्रचार का कोण जाणे एवढ्या आर्थिक अंदाधुंदीनंतरही प्रस्थापित झाला नाही. असो.

स्टॉक एक्स्चेंजमध्ये जशी शेअर्सची खरेदी विक्री होऊ शकते तशीच इतरही एक्स्चेंज असतात, तिथे त्या त्या गोष्टींची खरेदी विक्री होते. उदाहरणार्थ कार्बन ट्रेडिंग. कार्बन डाय ऑक्साइड वायू पर्यावरणाला धोकादायक म्हणून अमेरिकन सरकारने तो निर्माण करण्याच्या बाबतीत कडक निर्बंध घातलेले आहेत. आता हे निर्बंध पाळणं काही कंपन्या उत्तम करतात, तर काही कंपन्यांना ते जमत नाही. मग त्यावर उपाय काय? तर ज्या कंपनीने आपल्या कोट्यापेक्षा कमी कार्बन तयार केलेला आहे त्यांनी आपल्या वाट्याचा कोटा इतरांना विकायचा. ऐसी अक्षरेचे माननीय सदस्य नितिन थत्तेंनी याला एकदा पापाचं ट्रेडिंग म्हटलं होतं. ते पुन्हा एकदा वाचनात आलं. आणि संपादक मंडळापैकी एकाच्या डोक्यावरती एक ढग तयार होऊन त्यात कुठल्याही इलेक्ट्रिक कनेक्शनशिवाय पेटलेला दिवा उत्पन्न झाला. त्याचबरोबर 'टिंग' असा आवाजही झाला.

समजा ऐसी अक्षरेवर पुण्याचं ट्रेडिंग केलं तर? (इथे 'पुण्याचं' हा शब्द 'पुण्ण्याचं' असा उच्चारावा. म्हणजे पु वर अनुस्वार असल्याप्रमाणे. कधीकधी अनुस्वार न लिहिल्यामुळे शुद्धलेखनाची ऐसी की तैसी होऊ शकते असं कुठेतरी वाचलं. हे शब्दांचे उच्चार गमतीदार असतात. काहींना प्रश्न चा उच्चार प्रश्न की प्रश्ण की प्रष्ण असा प्रश्न पडल्याचं आठवतंय. असो. पुणे शहराविषयी, त्यासंबंधित खरेदीविक्रीविषयी इथे कुठलंही विधान करण्याचं आमचं धाडस नाही. इतक्या मोठ्या आणि शक्तिशाली डेमोग्राफिकला दुखावण्याचा बिलकुल हेतू नाही. नाहीतर आत्ताच लोक तो अल्पायुषी वाला लेख टंकायला घेतील. तेव्हा पुणे शहराला एक मानाचा मुजरा ठोकून मी पुढे सरकतो.) ऐसी अक्षरेवर वेगळं काय आहे, याबद्दल बोलताना सगळ्यांनीच श्रेणी सुविधा वेगळी आहे हे मान्य केलंच आहे. या श्रेणीच्या देवाणघेवाणीतून, प्रतिसादांच्या लेखनातून कुठून तरी कसं तरी पुण्य निर्माण होतं आणि खर्च होतं. कसं ते सर्व संपादकांनाही माहीत असेलच याची खात्री नाही. पण ते होतं तयार. आणि का कोण जाणे पण सर्वांना ते फार आकर्षक वाटतं. आणि ते नुसतंच आकर्षक नाही तर उपयुक्त देखील वाटतं. कारण इतरांना श्रेणी देण्यासाठी तुमच्याकडे काही पुण्य असण्याची गरज असते.

खरेदी विक्री होण्यासाठी नुसती आकर्षकता किंवा उपयुक्तता किंवा दोन्ही पुरेसं नाही. आता हवा उपयुक्त आहे, पण ती सगळ्यांकडेच इतक्या मुबलक प्रमाणात असते की कोणी खरेदी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. खरेदी विक्री होण्यासाठी एखादी वस्तू वेगवेगळ्या लोकांकडे कमीअधिक प्रमाणात उपलब्ध असायला हवी. तसंच त्या वस्तूची गरजदेखील बदलती असली पाहिजे. मग खरी एक्स्चेंज ट्रेडिंगला मजा येते. पुण्याच्या बाबतीत या सर्व गोष्टी लागू होतात. आपण प्रतिसाद देतो, कोणीतरी कधीतरी आपल्याला चांगली श्रेणी देतं, आपलं पुण्य वाढतं. पण लोकांना श्रेणी देऊन देऊन ते संपतं. आणि मग? कधी तरी अशी वेळ येतेच - तुमच्या समोर एक खडूस प्रतिसाद दिसत असतो. त्याला श्रेणी देण्यासाठी तुमचे हात शिवशिवत असतात. एखाद्या वेस्टर्नमध्ये क्लिंट इस्टवुडला समोर हरामखोर व्हिलन दिसले की जसं होतं तसं होतं. तुम्ही आपले डोळे किलकिले पण स्थिर ठेवता. तोंडातला चिरूट तसाच चघळत हलकेच आपली मेक्सिकन शाल खांद्यावर टाकता, आणि पिस्तूलाचा होल्स्टर मोकळा करता. आणि जेव्हा समोर हालचाल दिसते तेव्हा इतक्या वर्षांच्या गनफाइट्सनी धारदार झालेल्या प्रतिक्षिप्त क्रियांवर अवलंबून राहून विजेच्या वेगाने हात होल्स्टरकडे नेता. पण हाय रे दैवा... आणि क्षणभरात तुमच्या हातात पिस्तूल येऊन, तिघांवर थाड् थाड् थाड् गोळ्या उडण्याऐवजी हाताला लगतं रिकामं होल्स्टर. तुम्हाला घामाच्या धारा सुटतात. तुमच्या लक्षात येतं की कुठच्याही क्षणी अंगात गोळी घुसल्याप्रमाणे तुमच्या प्रतिसादाला कैच्याकै श्रेणी मिळू शकेल. आणि त्यावर प्रत्त्युत्तर म्हणून अवांतर, भडकाऊ च्या गोळ्या झाडण्यासाठी तुमच्याकडे पुरेसं पुण्य नाही! अशा वेळी काय करायचं?

त्याच वेळी तुम्हाला आसपास दिसतात पुण्याचे ढीगच्या ढीग घेऊन कुणालाही जज करण्याची इच्छा नसलेले महाभाग. त्यांच्याकडचं पुण्य तुम्हाला मिळवता आलं तर किती बरं झालं असतं? या थोर लोकांनी ढिगांनी मार्मिक, माहितीपूर्ण वगैरे श्रेण्या लाटलेल्या असतात. पण श्रेणीसुविधा वापरण्याची त्यांची बिलकुल इच्छा नसते. आता असलं चांगलंचुंगलं, लांबलचक, विद्वत्ताप्रचूर वगैरे काय तुम्हाला लिहिता येणार नाही का? कदाचित येईलही. पण त्यासाठी लागणारा वेळ का खर्च करावा? जगात इतर अनेक चांगल्या, करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि समजा तुम्हाला येत नसेल म्हणून तुम्ही या सुखापासून वंचितच रहावं का? तुम्हाला घरी साबण बनवता येत नाही म्हणून तुम्ही रोज नुसत्या पाण्यानेच आंघोळ करावी का? छे छे, तुम्ही वाण्याकडे जाऊन साबण घामाच्या पैशाने विकत आणायचा आणि तोच घाम धुवून काढायचा. त्याच न्यायाने तुम्हाला हक्काने पुण्य विकत घेता यायला हवं. बरं ज्यांच्याकडे ढीगभर आहे त्यांचासुद्धा फायदा होईलच की. नुसतंच पडून कुजण्याऐवजी त्यांना ते रास्त बाजारभावाने विकता येईल. एव्हरीबडी विन्स.

हा विचार करूनच आम्ही पुण्याचं ट्रेडिंग एक्स्चेंज उघडायचं ठरवलं आहे. लवकरच तुम्हाला वर 'पुण्याची खरेदी-विक्री' असा टॅब दिसेल. त्या टॅबवर क्लिक केलं की तुम्हाला प्रथम पुष्पगुच्छाचं चित्र दिसेल. पैशाचा मामला म्हटला की हारतुरे देऊन स्वागत करणं जरूरीचंच आहे. दुकानात नाही का हसून स्वागत होत? म्हणजे अर्थातच काही विशिष्ट शहरं वगळता... मग तुमचं पे-पॅल अकाउंट उघडण्याच्या सूचना येतील. तुमच्या क्रेडिटकार्डाची पत तपासून तुम्ही पात्र ठरलात की चेशायर मांजरीचं चित्र दिसेल. ती मांजर या कानापासून त्या कानापर्यंत प्रचंड स्मित देईल, आणि स्वतः विरून गेली तरी ते हास्य स्क्रीनवर खूप काळ पर्यंत शिल्लक राहील. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली तुमच्या अकाउंटमध्ये किती पुण्य आहे ते दिसेल. तसंच पुण्याचा सध्याचा बाजारभाव, दिवसाभरात किंमत कशी बदलली आहे याचा आलेखही दिसेल. तो आलेख कुठच्याही स्टॉकच्या आलेखाप्रमाणेच इंटरऍक्टिव्ह असेल. म्हणजे मागच्या कुठच्याही कालखंडातला किमतीचा चढउतार दिसू शकेल. पुण्याची खरेदी-विक्री बाजारभावाने (अधिक आमचं अत्यल्प कमिशन) दोन सेकंदांच्या आत एक्झेक्यूट केली जाईल. म्हणजे दोन सेकंदांत केवळ हिंदी सिनेमांतच आढळणारी अक्षय गोळयांनी लोडेड पिस्तूल तुमच्या होल्स्टरमध्ये जाऊन बसेल.

हवं तेव्हा वापरण्यासाठी पुण्य विकत घेणं हा खरा महत्त्वाचा हेतू असला तरी या एक्सेंजवर खरा पैसा असणार आहे तो पुण्याच्या डे ट्रेडर्ससाठी. भाव पडलेला असताना भरमसाठ विकत घ्यायचं, आणि चढला की ते विकायचं असा पैसे कमवण्याचा अतिशय सोपा मार्ग उपलब्ध होणार आहे. आणि त्यासाठी पैसे असण्याचीही गरज नाही. तुम्हाला तुमची पत वापरून तुमच्या मार्जिन अकाउंटवर पैसे कर्जाऊ घेण्याची सोय आहेच. किंवा जर पुण्याची किंमत लवकरच पडणार आहे असं वाटलं तर शॉर्ट करण्यासाठी नुसते ऑप्शन्स घेतले की झालं. त्या ऑप्शन्सची किंमत ही अर्थातच प्रत्यक्ष पुण्याच्या युनिट प्राइसपेक्षा खूपच कमी असते. तेव्हा अगदी लहान गुंतवणुकीवर दाबून पैसा कमवण्याची इतकी चांगली संधी कुठे मिळणार?

ऐसी अक्षरे तर्फे दर वर्षी पुण्याची काही मर्यादित युनिट्स काढून विकली जातील. आधीच्या पुण्यहोल्डर्सना त्यात प्राधान्य दिलं जाईल. तेव्हा आत्ताच्या सदस्यांना ही सुवर्णसंधी आहे. संस्थळाच्या पहिल्या सदस्यांची तुलना कोणीतरी मेफ्लॉवर वरून अमेरिकेत आलेल्या पहिल्या वसाहती वसवणाऱ्यांशी केलेली होती. ते खोटं नाही. अमेरिकेसारखा मोठ्ठा प्रदेश हवा तसा वाटून घेण्याची त्यांना संधी मिळाली. तशीच संधी आत्ता तुम्हाला उपलब्ध आहे. कारण एक लक्षात ठेवा, संस्थळांचं संवर्द्धन होणार आहे. मराठी भाषा बोलणाऱ्या दहा कोटी लोकांपैकी पाच टक्के जेव्हा संस्थळांवर यायला लागतील तेव्हा ५० लाख सदस्य असतील. ऐसी अक्षरेवर पुण्याची खरेदी विक्री होते म्हणून पैसे कमवण्यासाठी निश्चितच अधिकतम सदस्य इथे आकृष्ट होतील. अर्थातच अत्यंत मर्यादित स्वरूपात असलेल्या पुण्यगुणांची मागणी प्रचंड वाढणार. मागणी वाढली की किंमत वाढते हे समजायला काही अर्थतज्ञ असायला लागत नाही. हे एक्स्चेंज उघडलं की त्याचबरोबर गुंतवणुक सल्ल्याचा विभागही उघडू. त्यावर विशेष तज्ञांचे तांत्रिक आणि मांत्रिक सल्ले वाचायला मिळतील. नीट सावधपणे गुंतवणुक केली तर वर्षाला अठरा काय एकशेऐशी टक्केही कसे खात्रीलायकपणे मिळवता येतील याबद्दल ज्ञानही होईल.

या सुविधेचा दुसरा फायदा असा की अनेक सदस्य पुण्य निर्माण करण्याच्या मागे लागतील. सामान्य समाजातले मध्यमवर्ग व त्याखालचे वर्ग जसा घाम गाळून पैसे कमावतात तसं. तुम्हाला त्याची काहीच गरज पडणार नाही, कारण तोपर्यंत तुम्ही अल्प किमतीत विकत घेतलेल्या पुण्यगुणांची किंमत आकाशाला भिडलेली असेल. पण समाजात कोणीतरी काम करायलाच हवं तसे हे पांढरपेशे आणि नीळपेशे मध्यम-कनिष्ठवर्गीय काम करून प्रतिसादा-प्रतिसादाने पुण्य जमवत बसतील. आता तुम्ही म्हणाल की नवीन पुण्य निर्माण झालं तर किंमत कमी कमी नाही का होणार? त्याचं सोपं उत्तर आहे. जसजसे लोक अधिकाधिक पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतील तसतसा साइटचा दर्जा सुधारेल, व अधिक वाचक निर्माण होतील. त्यामुळे सप्लाय वाढेल त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात डिमांड वाढेल. तसंच थोडं पुण्य साठलं की आणखीन पुण्य घेण्यासाठी लोकं धडपडतील. केवळ किंमत वाढते आहे म्हणून वेगवेगळ्या वित्तसंस्था गुंतवणुक करतील. आज फक्त ५० रुपयाला मिळणारं पुण्य युनिट काही वर्षात ५०००० ला विकलं गेलं तर मला जराही आश्चर्य वाटणार नाही. (किंवा किंमत योग्य रहाण्यासाठी वेळोवेळी १:२ स्प्लिट्स अनाउन्स केले जातील. पण एकूण हिशोब तोच)

पुढच्या तीन महिन्यात दररोज तीनशे पुण्यगुण याप्रमाणे सुमारे तीन हजार पुण्यगुणांचा आयपीओ होईल. पाच हजार पुण्यगुण ऐसीअक्षरे.कॉम च्या नावे राखून ठेवले जातील. हे करण्याचं कारण असं की चांगल्या लेखकांना व आपलं दैनंदिन व्याप संभाळून संपादनाचं कष्टप्रद करणाऱ्या संपादकांना मोबदला हा या पुण्यगुणांतच दिला जाईल. पुन्हा पुण्यगुण - म्हणजेच पैसे - मिळणार असतील की लेखक चांगलं लेखन करतील आणि संपादक अधिक वेळ देऊ शकतील. श्रेणीदाते व तारकादात्यांनाही नियमित मोबदला दिला जाईल (सध्या महिन्याला २ पुण्यगुण असा विचार चालू आहे). मोबदल्यापोटी काम केल्याने श्रेणीदातेही अधिक चांगलं काम करतील, संस्थळ सुधारेल, अधिक सदस्य होतील, पुण्यगुणांची किंमत वाढेल... हे प्रचंड सुष्टचक्र आहे.

तेव्हा त्वरा करा. ऐसी अक्षरेवर होणाऱ्या घोषणेची वाट पहा आणि ऐसीअक्षरेच्या पुण्यात भागदारक व्हा.

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

मालकांनी सगळेच पुण्य एकाच सिझनमध्ये वरच्या भावात विकले आणि घेणार्‍यांनी घेतले होते. परीणामी बाजार बंद व्हायची वेळ आली होती. असो.
त्यानिमीत्ताने अधून मधून नविन बाजार तयार होतात आणि दिसेनासे होतात.
ट्रेडींग एक्स्चेंजला भरघोस शुभेच्छा.

अवांतर : महाराष्ट्र बँकेच्या एका प्रायोजीत कार्यक्रमाच्या ओळी आठवल्या.वसंतराव देशपांड्यांचा आवाजातल्या या ओळी होत्या.

धन हवे उद्यासाठी । पुण्य भावी जन्मासाठी
याच साठी हे सांगणं । थोडे पुण्य थोडे धन
नित्य करा साठवण । धन हवे उद्यासाठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढं सगळं तुम्हीच लिहिल्यावर आम्ही काय मौजमजा करणार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा विचार करूनच आम्ही पुण्याचं ट्रेडिंग एक्स्चेंज उघडायचं ठरवलं आहे. लवकरच तुम्हाला वर 'पुण्याची खरेदी-विक्री' असा टॅब दिसेल.

अख्खं पुणं विकायला काढलं की काय असं वाटलं होतं थोडा वेळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

संपादकांच्या मर्जीतिल सदस्यांनी इनसायडर ट्रेडिंग करु नये ह्यासाठी काही नियमावली तयार करणे अवश्यक आहे, तसेच स्कोर-सेटलींग, फसवे बैलिश/अस्वली ट्रेडिंग रोखण्यासाठी एक त्रयस्थ नियंत्रण (रेग्युलेटरी) समिती स्थापन करावी, समिती-अहवालाप्रमाणे मार्केट-करेक्शन्स करत राहाव्यात.

पुणे शब्दाशी साधर्म्य असलेला शब्द अनेक वेळा वापरून नेम-जॅकींग करण्याचा प्रयत्न केला आहे, श्रेय-अव्हेर जरी दिले असले तरी पुण्याच्या 'पुण्ण्याचा' फायदा घेतल्याचा निषेध.!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेच स्कोर-सेटलींग, फसवे बैलिश/अस्वली ट्रेडिंग रोखण्यासाठी एक त्रयस्थ नियंत्रण (रेग्युलेटरी) समिती स्थापन करावी, समिती-अहवालाप्रमाणे मार्केट-करेक्शन्स करत राहाव्यात.

या बाबतीत आम्ही पूर्णपणे समूहाची लोकशाही पाळणार आहोत. खरेदी विक्रीच्या बाबतीत सगळ्यांना अधिकार सारखे आहेत. अर्थातच ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांना दुर्दैवाने जास्त अधिकार मिळतात, पण तेवढं सोडलं तर कोणातच काही भेद नाही. तुम्ही संपादक असाल नाहीत तर ट्रोल, खरेदी करताना सगळ्यांचा पैसा सारखाच. नोटांमध्ये काळं गोरं उच्च नीच असं काही नसतं (नोटांवरचे आकडे सोडून)

पुणे शब्दाशी साधर्म्य असलेला शब्द अनेक वेळा वापरून नेम-जॅकींग करण्याचा प्रयत्न केला आहे, श्रेय-अव्हेर जरी दिले असले तरी पुण्याच्या 'पुण्ण्याचा' फायदा घेतल्याचा निषेध.!!

पुण्याच्या पुण्ण्याचा फायदा?!? अहो, तुम्हाला आमची आणि पुणे शहराची खरेदी विक्री बाबतची हिस्टरी माहीत नाहीसं दिसतंय. पुस्तकं नकोत, पण मालक आवर.. ही म्हण माहीत आहे का तुम्हाला? नाही ना? मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकं नकोत, पण मालक आवर.. ही म्हण माहीत आहे का तुम्हाला? नाही ना? मग?

हॅ हॅ हॅ...उगाच नाय बॉर्डर बंद झालं आणि बार्न्स सारखे गादिचे पुस्तकवाले नूक वगैरे विकून खळगी भरतायत् Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कालच "स्मार्टेस्ट गाइज इन द रूम" बघत होतो. त्यातले बरेच संदर्भ आज नव्यानं कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कल्पना फार्फार आवडली आहे. (निर्णयात सामील असलेल्या लोकांनी सामील नव्हतो असे दाखवून प्रतिसाद दिल्याने निर्णयाची 'पापी'ल्यारीटी वाढते असे ऐकून आहे)

मराठी माणूस तसा धंद्यात मागेच हे जगजाहीर असताना समस्त मराठी सभासदांना धंद्याला लावण्यात (हा वाकप्रचार वाईट अर्थाने घेतल्यास तुमच्या मनात पाप आहे) घेतलेला पुढाकार पाहून 'ऐसी अक्षरेवर वेगळं काय?' असे विचारणार्‍यांच्या तोंडाला कूलूप तर लागेलच पण पाणीही सुटेल!

बाकी, ते पुष्पगुच्छाच्या चित्राबरोबरच वाढदिवसाच्या शुभेच्छा असेही दिसेल अशी सोय निवडक सभासदांसाठी करता येईल काय? Wink ह्या पुण्याचा भावही (शेअर्सप्रमाणे) डिमांडबेस्ड असावा. (म्हणजे घासकड्वींचं पुण्य रुप्पायाला १० तर निळ्याचं पुण्य १० रुप्पायल एक वगैरे) कोणाचं पुण्य कितीला विकतंय हे ही दिसायची सोय असावी.(मराठी माणसाने सुद्धा हर्षद मेहता सारखा मोठा घोटाळा करून महाराष्ट्राचं नाव जगात गाजवावं अशी आमची फारा दिवसांची मनोकामना आहे!)

घासकडींवी आम्हाला श्रेणी देऊन आमचा पुण्याचा साठा वाढावा या करता:
लेख एकदम झ्याक झालाय बरं का गुर्जी!! पहिले दोन-तीन पॅरे तर क्या केहने!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

एवढे टेक्नीकल अ‍ॅनॅलिसीस काही लक्षात आले नाही. आम्ही सरळसरळ ब्रोकर असेल त्याला पकडू अन मग डे ट्रेडींग करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

ऐसी अक्षरे अल्पायुषी ठरणार काय? या प्रश्नामागची प्रेरणा ध्यानात आल्याने ही मौजमजा/ प्रस्ताव आधी घाईघाईने व मग सावकाश वाचला. गाडीतले डिझेल (डिझेलच- पेट्रोल नव्हे, गॅस तर नव्हेच नव्हे - गॅस आमच्याकडे पोटात होतो) संपत आल्यावर गाडी जशी आचके देते तसे 'आत्ता हसू येईल, मग हसू येईल' असे आचके बसत होते. त्यात 'पण त्या निद्रेलाही स्वप्नं पडू लागली तर?' च्या नटसम्राटी शैलीत घुमायला लागलं. हे वाक्य आल्याने आणि त्याआधी 'बेफिकीर' आणि आडकित्ता यांची दुसर्‍या एका धाग्यावरची रोचक चर्चा नुकतीच वाचली असल्याने 'तरुण आहात तुम्ही म्हणून करता येतो तुम्हाला संभोग माणसांच्या माद्यांशी...' हेही वाक्य मनात घुमायला लागलं. कुसुमाग्रजांचा गर्जा जयजयकार! त्यातून प्रस्तावच इतका मोठा तर त्यावर प्रतिसाद आले तर हे केवढं दांडगं प्रकरण होईल या विचाराने काल रात्रीच्या वारुणीचा दर्प असलेली एक करपट ढेकर आली. एकूण बेफिकीर आणि त्याच्या वारुण्या हे प्रकरण अचानकच फार महत्त्वाचे होऊन बसले आहे. एकूण काय, आजचा दिवस काही आपला नाही, हे ध्यानात आले....
पण इथे काहीतरी देवाणघेवाण चाललेली आहे हे ध्यानात येते आहे. देवाणघेवाण म्हटल्यावर आम्हाला आपले 'उपक्रम' आठवते. पण देवाणघेवाण ही फक्त विचारांची नसून 'दोन देणे, चार घेणे' अशीही असते हे कळाल्यानंतर ती कुठल्याही संकेतस्थळावर होऊ शकते हेही लक्षात आले. पुण्य किंवा पुण्ण्य किंवा पुंण्य याच्याशी आपला सुतराम की काय म्हणतात तो संबंध नसल्याने आम्ही तूर्त आमच्या खालील गोष्टी ट्रेडिंगसाठी उपलब्द्ध केलेल्या आहेत. इच्छुकांनी खरडवहीतून किंवा व्यक्तिगत निरोपांतून संपर्क साधावा. किंवा खरे तर कशाला नसत्या भानगडीत पडता?
१. आमच्या असंख्य मित्रमैत्रिणींनी आम्हाला जालावर दिलेले शिव्याशाप. यात डुकराची एक फार गाजलेली उपमा ते 'मढं उचललं मेल्याचं..' पर्यंत सगळे काही आहे. इच्छुकांनी आमचे जाललेखन , प्रतिसाद आणि खरडवह्या पहाव्यात,किंवा खरे तर कशाला नसत्या भानगडीत पडता?
२. आमची काही अत्यंत गाजलेली पण चाराच्या वर प्रतिसाद न आलेली विडंबने, आमच्या मते फार्फार उच्च दर्जाची पण (निर्बुद्ध) वाचकांच्या आणि (हलकट) टीकाकारांच्या मते सपशेल फसलेली भाषांतरे आणि आमचे आत्म्यानंदार्थ केलेले अन्य लेखन. ही खरे तर लूट आहे. कुछ भी उठाओ, सब डेढ रुपया. रस्ते का माल सस्तेमे. इच्छुकांनी तपशीला साठी संपर्क साधावा.किंवा खरे तर कशाला नसत्या भानगडीत पडता?
३. आमच्या यैजमान्याखाली (या शब्दामागची प्रेरणा- दिगम्भा) साकार झालेले काही कट्टे - कट्टा या श्ब्दाचा अर्थ मराठीत ज्याला 'गेट टुगेदर' असे म्हणतात तो आहे. कट्टा नावाचे एक शस्त्रही असते म्हणे. त्याचा याच्याशी काही संबंध नाही. या कट्ट्यांत मीर-गालिबच्या मयफिलींपासून (वाचकांनी या कोटीला कोटीकोटी टाळ्या द्याव्यात!) 'आयचा घो या संपादकाच्या' पर्यंत बरेच काही आहे. इच्छुकांनी तपशीला साठी संपर्क साधावा.किंवा खरे तर कशाला नसत्या भानगडीत पडता?
४.शुद्धलेखन आणि निरिश्वरवाद यांवरील काही ताठर आणि अताठर भूमिका. ताठर व अताठर या शब्दांचे कृपया शुद्ध वरणभाततूपमीठलिंबू अर्थ घ्यावेत. हो, या बेफिकीराची मते वाचून कुणाला काय वाटेल सांगता येत नाही. शुद्धलेखनाचे सगळे वाद विकत घेणार्‍यांना एक रावले तर निरिश्वरवादावरील सगळे वाद विकत घेणार्‍यांना एक घारे फुकट मिळतील. रावले नको असतील तर शुभानन गांगल आणि घारे नको असतील तर यनावाला किंवा नानावटी, किंवा अर्धे यना आणि अर्धे नाना म्हणजे यनानाना असा पर्याय आहे.
तूर्त आम्ही इतकेच देवाणघेवाणीसाठी उपलब्द्ध केलेले आहे. बोली कुणाची आणि कितीची लागते यावर पुढील लॉट जाहीर करण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा