कोल्लापुरी भाषेसाठी सर्वात चांगली लिपी कोणती ?

नमस्कार,

आमचे आदरणीय प.पु. श्री.श्री.श्री. १०,००१ स्वप्नीगुरुमहाराज माऊली (कोल्लापुरीचे ते पुराणपुरुष ! ) यांच्या प्रसादरूप आदेशानुसार; आज पर्यंत त्यांच्या कोल्लापुरी भाषेला मराठी भाषेपेक्षा सातत्याने दुय्यामस्थान मिळाले असून कोल्लापुरी बोलणार्‍या लोकांवर मोठा अन्याय होत आला आहे. ज्या संस्कृतभाषेने अन्याय केला त्यांची नागरी लिपी, कोल्लापुरची गादी स्वतंत्र असतानाही, सातारच्या गादीच्या प्रधानांची भाषा प्रमाणभाषा म्हणून लादणे आणि इंग्रजांनी कोल्लापुरीचे स्वातंत्र्य कमी केले होते म्हणून रोमनलिपीने कोल्लापुरी आणि कोल्लापुरी भाषेवर अन्याय झाला असून हि न'वी' बाजू लक्षात घेऊन कोल्लापुरच्या गादीवर, गडांवर, देवीवर श्रद्धा आणि आदर असलेल्या मंडळींनी देवनागरी आणि रोमन लिपी सोडून तिसर्‍या लिपीची निवडकरून कोल्लापुरकरांवरील आणि कोल्लापुरी भाषेवरील अन्याय दूर करावा असे आवाहन आहे !

* पर्यायांचे स्पष्टीकरण

* तमीळ लिपी सर्वात अदिम आणि नैसर्गीक रित्या निर्मीत भाषा बोलणार्‍यांची लिपी असल्यामुळे
* तेलगू लिपी तिरुपतीचे देवस्थान तेलगू प्रदेशात असल्यामुळे
* मल्याळम लिपी कोल्लापुरला समुद्र किनारा नाही आणि मल्याळम प्रदेशाला तो तसा उपलब्ध असल्या मुळे
* कन्नड लिपी कोल्लापुरी भाषेची शेजारीण भाषा असल्यामुळे
* गुजराथी लिपी देवनागरी लिपी प्रमाणे शब्दांवर शिरोरेखा न काढता स्वतःचा जाज्वल्य अभिमान जपल्यामुळे
* गुरुमुखी लिपी : आदरणीय गुरूंद्वारा उपयोग झालेली असल्यामुळे
* उर्दू लिपी गुरुमुखी लिपीच्या उत्तर आणि पश्चिमेस प्रचलीत असून कोल्लापुरच्या राजकीय लोकांना मते मिळण्यात कदाचीत उपयूक्त ठरण्याची शक्यता असल्यामुळे.
* बंगाली लिपी कोल्लापुरला समुद्र किनारा नाही आणि बंगाल प्रदेशाला तो तसा उपलब्ध असल्या मुळे
* ओरीया लिपी ओरियो नावाची बिस्कीटे हल्लीच्या मुलांना अधिक आवडतात त्यामुळे नव्या पिढीत लवकर प्रचलीत होण्याची क्षमता असल्यामुळे
* कोल्हापुरी चित्रलिपी- लिपी तज्ञांच्या मते चित्रलिपी वाचण्यास सर्वात वेगवान असतात आणि कोल्लापुरात मिसळपाव, कोल्लापुरी रस्से, साखरकारखाने, गड, राजवाडे आणि मंदीरे दागीने इत्यादींची लै भारी चित्रे उपलब्ध होऊ शकत असल्यामुळे कोल्लापुरच अजून एक प्रतीक राहिलय पण ते वजनाला हलकं आणि र्‍हदयाला लागायला जड असल्यामुळे ते सोडून इतर सर्व प्रतीके वापरूनची कोल्लापुरी चित्रलिपी, प्रतिके कमी पडल्यास कोल्लापुरीच्या मा. आजीमाजी समाजसेवी कारखानदार स्वामींची चित्रेही वापरण्याची संधी उपलब्ध आहे. सोबतच तरूण मतदारांची संख्या वाढल्यामुळे तरुणांचा नव्या लिपीस वाढता पाठींबा मिळावा म्हणून कोल्लापुरच्या झाडावर युगूलांनी काढलेल्या चित्रांचाही चित्रलिपीत समावेश करण्याचा कोल्लापुरी चित्रलिपीतज्ञांनी विचार करावा.

नागरी आणि रोमनचा प्रभाव टाळण्यासाठी सर्व लिपी उजवीकडून डावीकडे लिहाव्यात आणि कोल्लापुरच्या राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय द्यावा असा आमचे आदरणीय प.पु. श्री.श्री.श्री. १०,००१ स्वप्नीगुरुमहाराज माऊली (कोल्लापुरीचे ते पुराणपुरुष ! ) यांच्या प्रसादरूप सल्ला आहे पण बंधन कारक नाही त्यामुळे जास्तीत्जास्त मतदानाने कोल्लापुराचा आदर करणार्‍या आदरवंतांनी आदर्श नवलिपीची निवड करावी. मतदान करणार्‍यांवर आमचे आदरणीय प.पु. श्री.श्री.श्री. १०,००१ स्वप्नीगुरुमहाराज माऊली (कोल्लापुरीचे ते पुराणपुरुष ! ) यांची आशिर्वाद, देवी महालक्ष्मीची कृपा आणि गडवाड्यातील कोल्लापुरकरांच्या शुभेच्छा प्राप्त होतील.

आमचे आदरणीय प.पु. श्री.श्री.श्री. १०,००१ स्वप्नीगुरुमहाराज माऊली (कोल्लापुरीचे ते पुराणपुरुष ! ) यांच्या आदेशानुसार उपरोक्त लेखाचा कोल्लापुरीभाषेत कोल्लापुरीकरांसाठी अनुवाद करून देण्यात यावा अशी माऊलींची कोल्लापुरीकरांकडून प्रसादरुप अपेक्षा आहे. आणि कोल्लापुरीभाषा ऐसीअक्षरे संकेतस्थळावरील सर्वात मोठी मायनॉरिटी असल्यामुळे ऐसीअक्षरे प्रबंधकांनी कोल्लापुरीभाषेच्या नव्या लिपीच्या वापरासाठी विशेष सुविधा देऊन दुष्ठ देवनागरी उपयोगकर्त्यांपासून त्यांचे रक्षणाची विशेष तजविज करावी.

(मौजमजा)

प्रतिक्रिया

कुल्हापुरी ही एक मराठी भाषेतील बोली आहे .गोव्याकडचे लोक कोकणी बोली लिहितांना रोमन ,कन्नड आणि देवनागरी लिपी वापरतात तसे कुल्हापुरकरांनीही करावे .

माफकरा लेखाचा उद्देश कोल्लापुरकरांना अथवा त्यांच्या भाषेला लक्ष करणे असा नाही. कोल्हापुरजिल्ह्यात बर्‍याच उपबोली आहेत आणि कोणत्याही मर्यादीत प्रदेशात प्रत्येक उपबोलीने/भाषेने स्वतंत्र लिपी निवडली तर कोणते चित्र समोर उभे टाकते ते डोळ्यापुढे आणणे आहे. मर्यादीत प्रदेशात वेगवेगळ्या लिपींच समर्थन करताना केल्या जाणार्‍या तार्कीक उणीवा असलेल्या युक्तीवादांची किंचीतशी थट्टाकरून मर्यादा पुढे आणणे हा लेखाचा उद्देश आहे. माझ्या स्वतःच्याही एखाद दुसर्‍या तर्काच यात अप्रत्यक्ष विडंबन सुद्धा आहे

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

त्यापेक्षा कोल्लापुरी जन्तेने लेखन आड्यो (सातारच्या मराठीत हा शब्द ऑडिओ असा लिहितात) स्वरूपातच करावे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...असा पर्याय नसल्याने मत दिलेले नाही. त्याऐवजी मत खाली शब्दांत सविस्तर मांडणे भाग पडते.

प्राप्त परिस्थितीत, कोल्लापुरी बोलीच्या भाषकांपुढे वस्तुतः दोन(च) पर्याय आहेत. (एलेमेंटरी, इ.इ.)

- कोल्लापुरी बोलीसाठी जी कोठली लिपी तूर्तास वापरात असेल, ती वापरणे चालू ठेवावे.

- ती लिपी वापरणे काही कारणांस्तव चालू ठेवायचे नसल्यास, अथवा कोल्लापुरी बोलीकरिता तूर्तास कोणतीही लिपी वापरात नसल्यास, जे काही मनास येईल, ते करावे. (ही कोल्लापुरी-बोली-भाषकांची खाजगी डोकेदुखी आहे. ती सोडविण्याकरिता, ज्यांचा कोल्लापुरी बोलीशी काहीही संबंध नाही - अथवा ज्यांस कोल्लापुरी बोलीच्या लिपीशी घेणेदेणे असण्याचे काहीही कारण नाही - अशा बहुतकरून बिगरकोल्लापुरी आम जनतेत असले सार्वजनिक कौल काढून त्यांना नसती 'न'वी डोकेदुखी देण्यात काय हशील? (आपस में मिटा लो, यार!))

(उदाहरणादाखल) नायजीरियातील हौसा भाषेकरिता कोणती लिपी वापरावी, त्या दृष्टीने सर्वात चांगली लिपी कोणती, यावर (पुन्हा, उदाहरणादाखल) 'न'वी बाजू, बॅटमॅन, अरुणजोशी, मेघना भुस्कुटे, टिंकरबेल आणि गब्बरसिंग यांच्यात कौल घेऊन त्यांची मते ग्राह्य धरावीत काय? (या सर्व मंडळींचा या विषयी काही बरे, वाईट अथवा महागाढवासारखे मत असण्याचा अधिकार अर्थातच प्रश्नांकित नाही; सबब, त्यांच्या या विषयी मत असण्यास प्रत्यवाय नाही. प्रश्न आहे, तो लोकस स्टॅण्डायचा, अत एव त्यांच्या मताच्या ग्राह्यतेचा.)