अस्ताद नावाचे वस्ताद

गावात वस्ताद असायचे. गल्लीत समोर दिसले की दिसले की दरारा वाटायचा. जवळ आले की परत भेटावेसे वाटायचे. एखाद्या घटनेवर त्यांचे भाष्य मोठ्यांना पाह्यजे असायचे. लहानग्यांना त्यांचे ह्ळुवार शब्द हवे असायचे. ज्ञान आणि आस्था यांचा सुरेख संगम म्हणुन मला वस्ताद आज आठवतात. वस्तादांना कुणी ’पंडित’ हे बिरुद नाही लावायचे. बरं झालं. ते इतके जवळचे नसते वाटले. आज आठवण्याचे आणखी एक कारण म्हंजे समकालीन नर्तक आणि नृत्यकार अस्ताद देबू य़ांचे भवताली असणे. साठीतला हा कलाकार नेहमीच मला वस्ताद नावाच्या समृध्द आणि खुल्या ज्ञान परंपरेची याद करुन देतो.

स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षीचा अस्तादांचा जन्म. संगीत नाटक अकादमीचा सन्मान आणि पद्मश्री सन्मान पात्र देबुंचा कला प्रवास सोपा नाहीय. ज्या काळात नृत्यप्रकारांसाठी आणि नृत्यकारांसाठी ’समकालिन’ हा शब्द रुढ नव्हता त्या काळाचे अस्ताद प्रतिनिधी. जेंव्हा ’आंतरराष्ट्रीय’ नृत्यविचार आज एवढा प्रसिध्द नव्ह्ता त्यावेळी देबूंनी जगभरातल्या नृत्य शैली आत्मसात केल्या. सुरुवात भारतीय शास्रीय नृत्य प्रकार शिकण्यातुन झाली. कथक मधले शास्त्रशुध्द शिक्षण पहिल्यांदा जमशेदपुरमधे आणि नंतर कोलकत्यात. आई-वडलांनी पाठिंबा दिला. त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले ते भारतात आलेल्या अमेरिकेच्या मुरे लुई डान्स कंपनीचा अॅुबस्ट्रॅक्ट डान्स बघितल्यानंतर. त्या कलाकारांच्या शरीरातील लवचिकता, कॊणतीही भिड-भाड न बाळगता ते नृत्यातुन जो अवकाश निर्माण करु पाहात होते त्याकडे तरुण वयाचे देबू आकर्षित झाले. राम-कृष्णाच्या आणि राधा-सीतेच्या गोष्टींच्या पलिकडे जाऊन काही एक अवकाश निर्माण करण्याच्या शक्यता त्या डान्स कंपनीने दाखवल्या. नव्या फ़ॉर्मची ओळख झाली. तालमी करतांना शरीर वळवण्याचे वेगवेगळे प्रयोग, कथकच्या भुमितिय तंत्राच्या पलिकडे जाउन, देबु स्वतःच्या नृत्य मांडणीतुन करु लागले. दुसर्या बाजुस भारतात उदय शंकर यांचे प्रयोग असोत वा मणिपुरी आणि कथकलीचे गावोगावचे प्रयोग असोत, सारे देबू चिकित्सकपणे पहात होते. आत्मसात करत होते. दरम्यान, एका टप्प्यावर अस्तादांनी सिनेमात पण छोटी मोठी कामे केली. मनात बरेच होते. काळ बदलत होता. अस्वस्थता होती. व्यक्त व्हायचे होते. आशय आणि रुपाचा शोध सुरु होता. मार्था ग्राहम या नामवंत कंपनीत शिस्तशीर शिक्षण घ्यायचे होते. हातात पैसा नाही. पण, बॅगेत एक धोतर, कथकलीच्या वेशभुषेचे सामान, रेकॉर्ड केलेले काही संगीत आणि त्याकाळच्या हिंदी सिनेमातील शास्त्रीय नृत्य शैली वापरुन गायलेली गेलेली गाणी घेऊन त्यांनी जगाचा प्रवास सुरु केला तो अजुन सुरु आहे.

समकालिन असणे ही फ़ॅशन नव्हती त्या काळात परंपरागत नृत्य प्रकारांना अस्ताद देबुंनी वाकवुन समकालिन नृत्य प्रकाराची बीजे रोवली. समकालिनपण येण्यामागे कलात्म कारणे असतात तेवढीच पारंपारिकतेतील ’पंडित’पणाची बंदिस्त चौकट कारणीभुत असते. धर्माची आणि त्या काळाला आणि कलाकाराला जवळची न वाटणारी कारणे असु शकतात. काळानुसार समाज बदलला तशी मानवी नात्यातले संबध पण बदलले. रामायण आणि महाभारतातल्या गोष्टींचा पुनर्शोध घेण्याची गरज त्यातुन निर्माण झाली.

समकालिन नृत्य किंवा नृत्य मांडणी ज्याला इंग्रजी मधे त्याला कंटेमपररी डान्स किंवा कोरिओग्राफ़ी म्हणतो त्याचा भारतातील इतिहास अगदी अलिकडचा आहे. मागच्या शतकाच्या सुरुवातीला उदय शंकर यांच्या कामापासुन त्याची सुरुवात दाखवता येईल. पण, खरी गती मिळाली ती ऐंशीच्या दशकानंतर. चंद्रलेखा, दक्षा सेठ, मल्लिका साराभाई वगैरे.

समकालिन नृत्य वा नृत्य मांडणी प्रक्रियेवर भर देताना, आंतर शाखीय बलस्थानांचा शॊध घेणे इथे मुलभुत मानले जाते. अर्थात, अस्ताद देबुंसारखा समकालीन कलाकार परंपरागत शैलीत आणि रुपात चालत आलेल्या नृत्य प्रकारांना ’समकालीन’ असण्या मागचा मुलस्त्रोत मानतात. याचा अर्थ, समकालीन असणे म्हंजे पारंपारिक नसणे नव्हे. पारंपारिकपणाचा, त्यातल्या दयान व्यवस्थांचे नीट आकलन करुन त्याकडे चिकीत्सक नजरेने पाहाणे यामधे समकालीन असण्याचे बल सामावलेले असते. समकालिन होतो म्हणुन कोणी समकालिन होत नाही. त्याप्रमाणे आस्ताद देबूंची नृत्य शैली त्यांच्या कथकच्या आणि कथकलीच्या नृत्याभ्यासातुन, साधनेतुन आली आहे. समकालिन जगण्यातुन त्यांचे भान बदलत गेले आणि एका टप्यावर परंपरागत नृत्यशैलींना प्रश्न विचारत त्या शैलीतुनच देबूंनी आपली स्वतःची नृत्यभाषा विकसित केली.


ऐंशीच्या दशकात अस्ताद देबूंच्या कामात पण मह्त्वाचा बदल घडुन आलेला दिसतो. यामध्ये प्रामुख्याने, त्यानी केलेले जगभरातल्या वेगवेगळ्या नृत्यशैलींमधे केलेले काम आणि भारतात रंगमंच आणि कठपुतळी कलाकारां बरोबर केलेले काम यामुळे त्याच्या नृत्य मांडणी मधे एक नाविण्य आले. देबुंचा अनुभव इथल्या गुरु-शिष्य परंपरेतला. शिकण्याच्या प्रक्रियेत एक भावनिक बैठक देणारी ही व्यवस्था. पाश्च्यात्य पध्दतीत अशी व्यवस्था नसते. तिथे काम आधिक प्रक्रिया केंद्रित. पिना बाउश्च यांच्या नृत्य-नाट्य शैलीने जगभरात नवी नृत्य-भाषा आणली. विशेष करुन, बाउश्च पध्दत सहभागी नृत्यकारांच्या निर्मिती प्रक्रियेला महत्व देते. पिना बाउश्च या जर्मनच्या विदुषी नर्तिके बरोबरचा देबूंचा अनुभव त्याच्या साठी बरेच काही शिकविणारा होता.जगभराताल्या कलाकारांबरोबर काम करतानाच भारतात दादी पदुमजी या कठपुतळी कलाकारा बरोबर, मणिपुरच्या कलाकारांबरोबर, चेन्नईच्या मुक-बधिर कलाकारांबरोबर काम करत असताना देबुं जे नृत्यावकाष निर्माण करतात ते थक्क करणारे असतात. असेच महत्वाचे काम त्यांनी नाट्य दिग्दर्शक सुनिल शानबाग आणि प्रकाश योजनाकार रतन बाटलीबाय यांच्या बरोबर केलेय.

देबूंचे आज मुंबईत घर आहे. पण, अथक भटकंती ही देबुंची खासीयत. जगभरात तासंतास प्रवास करुन परत येतात आणि सहजतेने परत नृत्याच्या तालमीला ते उभे राहु शकतात. लीलया अंग वळवु शकतात. ज्या सहजतेने ते मणिपुरच्या संकिर्तन परंपरेतील कलाकारांबरोबर काम नवीन नृत्यशैली विकसित करतात तितक्याच सहजतेने एखाद्या पाश्चात्य कलाकाराबरोबर राहुन कार्य करु शकतात. भारतातल्या परंपरांचे त्यांचे भान जेवढे सशक्त आहे तेवढेच ते जगभरातल्या सर्जनशील कलापरंपरांशी जोडुन घेण्याची लवचिकता त्यांनी आपल्या कार्यातुन विकसित केली आहे. त्यांच्या एकुण कामाचा आवाका पाहुन कुणीही आवाक व्हावे.

गर्दीपासुन अस्ताद नेहमीच दुर. चार एक वर्षे नृत्य शिकल्यावर समकालीन नृत्यप्रकारांवर भाषणे ठोकणार्यांपासुन अस्ताद नेहमीच दुर. पण, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणार्यां साठी वस्ताद देबु उत्साहाचा झरा असतात. पुर्णवेळ कला ही संकल्पना प्रचलित नव्हती तेंव्हा देबुंनी पुर्ण वेळ नर्तक आणि नृत्यकार हा पेशा निवडला. नोकरी करुन वेळ मिळेल तेंव्हा तालमी करणे अशा सुरक्षित जीवन शैलीचा अंगीकार देबुंनी केला नाही. वयाच्या या टप्प्यावरही नृत्य परंपरेत मुलभुत काम केल्यानंतर ही देबुंना स्पॉन्सरर्सचा सपोरटर्सचा शोध घ्यावा लागतो! समकालीन नृत्यात आज नवी पिढी आली आहे. काही जण आश्वासक काम करतायत. पण, बरेच जण आंतरराष्ट्रीय पातळीवर ’कोलॅबोरेशन’ च्या संधी शोधत तपश्चर्या नावाचे काही एक प्रकरण असते आणि त्यासाठी खडतर कष्टांची गरज असते हे ते विसरतायत. किंवा, प्रस्थापित होण्याच्या प्रयत्नात जाणीवपुर्वक विसर ताहेत. “समकालिन” हे बिरुद स्वत:च्या नावांआधी लावताना परंपरेचे आकलन आणि भान असणे महत्वाचे असते हे कलाकार विसरतात. अशावेळी वस्तादांची परंपरा आपल्याला दNन्यान परंपरेचे आणि तपश्चर्येचे भान देतात. वस्तादांना समाज विसरत चाललाय. पण, अस्ताद भवताली आहेत तवर आपण वस्ताद परंपरेला पुर्णपणे विसरु नाही शकणार.

आशुतोष पोतदार

(पुर्वप्रसिध्दी: महाराष्ट्र टाईम्स, आक्टोबर २, २०११)

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

एका वेगळ्या विषयावर लेख प्रकाशित केल्याबद्दल आशुतोष यांचे आभार आणि 'ऐसी अक्षरे'वर स्वागत.

राम-कृष्णाच्या आणि राधा-सीतेच्या गोष्टींच्या पलिकडे जाऊन काही एक अवकाश निर्माण करण्याच्या शक्यता त्या डान्स कंपनीने दाखवल्या. नव्या फ़ॉर्मची ओळख झाली.

हे अगदी खरं आहे. मला कथक, ओडिसी किंवा इतर भारतीय नृत्यप्रकार आवडतात, पण अनेकदा नव्या पिढीची मुलंमुली अजूनही त्याच त्याच गिरवलेल्या गिरक्या (अन् त्यादेखील विशेष नजाकतीशिवाय) घेत राहतात आणि त्यातच अडकतात असं वाटतं. त्यात अस्तादसारख्यांनी निश्चित नवे प्रयोग केले.

पिना बाउश्च या जर्मनच्या विदुषी नर्तिके बरोबरचा देबूंचा अनुभव त्याच्या साठी बरेच काही शिकविणारा होता.

हे माहीत नव्हतं आणि मार्मिक वाटलं. त्याचं तात्कालिक कारण म्हणजे नुकताच विम वेंडर्सचा 'पिना' हा चित्रपट पाहण्यात आला. त्यातल्या अनेक रचना पाहताना असं लक्षात आलं की ते चित्तवेधक वाटतं खरं, पण त्याचं त्याहून अधिक काहीतरी व्हायचं मात्र राहून जातं - कारण त्यात एक कोरडेपणा जाणवतो. हाच कोरडेपणा पूर्वी अस्तादच्या नृत्यरचनांत जाणवला होता. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती मार्मिक वाटली.

त्या तुलनेत पाश्चिमात्य समकालीन नृत्यप्रकारांतले काही अजिबात कोरडे न वाटणारे नृत्यबंध कार्लोस सोरा यांच्या 'इबेरिया'मध्ये पाहायला मिळतात. नव्या-जुन्या नृत्यशैलींचा मेळ घालणारी त्यातली ही एक रचना उदाहरणादाखल पाहा:

कदाचित हा उत्तरेकडचा थंड जर्मनी आणि दक्षिणेकडचा उबदार स्पेन यांच्यातला सांस्कृतिक फरक असेल आणि एक भारतीय म्हणून मला दक्षिणेकडची उब अधिक भावत असेल! असो. एका रोचक धाग्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आशुतोष यांचे ऐसीअक्षरेवर स्वागत आणि दमदार आगमनाबद्दल अभिनंदन!
अस्ताद देबू यांची ओळख करून देण्याचे शिवधनुष्य उत्तम पेलले आहे. परंपरेची व त्याहीपेक्षा परंपरावाद्यांची चौकट भेदणे हे किती कठीण काम आहे हे अनेक क्षेत्रात ऐकू येतेच मात्र त्याची सर्वाधिक झळ कलाकारांनी सोसली आहे याबद्दल दुमत नसावे.

अस्ताद देबुंच्या नृत्याची झलक युट्युब वर बघितली आहे मात्र त्यामागच्या कष्टाची (जाणीव असली व कष्ट दिसत असले तरी) माहिती नव्हती. शिवाय पारांपरीक नृत्याविष्कारांच्या मांडीला मांडी लाऊन बसायला लावण्यामागची हि तपश्चर्या इथे जाणवून दिल्याबद्दल आभार!

येऊ दे असंच काहितरी दमदार!!

(श्री देबु यांचे एखादे प्रताधिकार मुक्त चित्र असल्यास ते लेखात चढवता यावे)
अस्ताद यांचे एक फोटोफिचर इथे रेडीफवर मिळाले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेष आणि चिंतातुर जंतु,

लगेचच दिलेल्या प्रतिक्रिया वाचुन छान वाटलं. बरंही वाटलं की मी इथे हा लेख ठेवला.

आपण सुचवल्याप्रमाणं एक फ़ोटो ठेवलाय इथं पण उतरवताना काईतरी गडबड झालीय वाटतं.

चिंतातुर, आपण वेंडर्सची पिना पाहिलीय हे मला छान वाटले. आपले मत "त्यातल्या अनेक रचना पाहताना असं लक्षात आलं की ते चित्तवेधक वाटतं खरं, पण त्याचं त्याहून अधिक काहीतरी व्हायचं मात्र राहून जातं - कारण त्यात एक कोरडेपणा जाणवतो. हाच कोरडेपणा पूर्वी अस्तादच्या नृत्यरचनांत जाणवला होता" समकालिन नृत्य प्रकारावर प्रकाश टाकते.

मला वाटते की समकालिन नृत्य प्रकाराचे, त्याच्या इतर वैशिष्ट्यांबरोबर, ‘कोरडे’पणा हेही एक वैशिष्ट्य असावे. आपल्या मनात ओलावा निर्माण करेल असा सहभागी अवकाश समकालिनत्व निर्माण करु शकत नाही याचे एक कारण मला असे वाटते की ते आत्यंतिक व्यक्तिगत होत असते. एखाद्या भावनेला हात घालण्यापेक्षा ते भावनेला प्रतिसाद देण्यात समकालिन नृत्यप्रकार धन्यता मान्यता असावेत. याअर्थाने, ‘क्लासिकल’ वा ‘भारावुन’ टाकणार्या नृत्यशैलींना असणारा त्यांचा तीव्र प्रतिसाद म्हणुन ही आपल्याला कोरडेपणाकडे पहाता येईल. दुसरे कारण म्हंजे, मान्यता पावलेल्या प्रातिनिधिकत्व (रिप्रेझेंटशनल) कलाप्रकारांपासुन ते फ़ारकत घेऊ पाहातात. तिसरे कारण, रुप, रचना, आणि मांडणी याला ते प्राधान्य देत असावेत.

याचा अर्थ, मी कोरडेपणाचे मी समर्थन करतोय असे मुळीच नाही. तर, त्याचे काय कंगोरे असतील याचा स्वतःशी विचार करून इथे मांडतो आहे. असा विचार करायला मला आपण प्रवृत्त केले याबद्दल मी आपले आभार मानतो! दुर्देवाने, बरेच समकालीन कलाकार यरोपियन समकालिनपणाचे कोरडेपणापुरतेच अनुकरण करताना दिसतात. पण ज्या तर्हेने, पिना बाउश्च वा बाकीच्या प्रभ्रॄतींनी तिथल्या सांस्कॄतिक आणि सामाजिक भवतालात आपली कला:आशय आणि आभिव्यक्ती घडवली त्यादिशेने होणारे प्रयोग इथे क्वचितच दिसताता. यापार्श्वभुमीवर अस्तादांसारख्यांचे प्रयोग महत्वाचे ठरतात.

आशुतोष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ज्या तर्हेने, पिना बाउश्च वा बाकीच्या प्रभ्रॄतींनी तिथल्या सांस्कॄतिक आणि सामाजिक भवतालात आपली कला:आशय आणि आभिव्यक्ती घडवली त्यादिशेने होणारे प्रयोग इथे क्वचितच दिसताता

तुमचा हा आवडता विषय किंवा अभ्यासाचा विषय आहे असे दिसते. तेव्हा या कलाप्रकाराची सोप्या शब्दात ओळख, इतर तत्सम प्रकारच्या अविष्कारांशी तुलना, वर विषद केलेल्या युरोपियन प्रयोगांची माहिती वगैरे अंतर्भूत असलेला लेख किंवा लेखमालिका वाचायला नक्कीच आवडेल. मराठीत अश्या विषयावर सोप्या भाषेत जितकी माहिती तितकी चांगलीच.. तेवढीच आमच्यासारख्याच्या ज्ञानात भर Smile

याच बरोबर भारतात केवळ कंटेपररीच नाहि तर (काहि नाचावरील कार्यक्रमामुळे) अचानक प्रसिद्धीझोतात आलेले विविध नृत्यप्रकार बघतो. त्यांच्याबदल ढोबळ फरक कळतात पण आमचे एरवी बघणे आणि तोच अविष्कार तज्ञाने समजावल्यानंतरचे सुजाण बघणे यांतील फरक आनंददायक असतो. तेव्हा या विषयावरही काहि लिहिलेत तर आवडेल

(खरं तर आल्या आल्या अश्या (काहिश्या आगाऊ) सुचवण्या करतो आहे त्याबद्द्ल माफी मागतो पण नव्या विषयावरचं अतिशय सुबोध लेखन वाचल्यावर रहावलं नाही.. अर्थातच वेळ मिळेल तसे लिहा घाई नाहीच)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समकालिन होतो म्हणुन कोणी समकालिन होत नाही.

हे वाक्य किती सोपं वाटतं!

एकूणच नृत्याबद्दल अजिबात काही माहिती नसतानाही मूळ लेख रंजक आणि रोचक वाटला. जंतू आणि आशुतोष यांच्या प्रतिसादांमधूनही थोडी अधिक माहिती समजली. आशुतोष, ऐसीअक्षरेवर तुमचं स्वागत आणि अधिक लिहा ही विनंतीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<< राम-कृष्णाच्या आणि राधा-सीतेच्या गोष्टींच्या पलिकडे जाऊन काही एक अवकाश निर्माण करण्याच्या शक्यता

ओह! याच्याशी तर मी फार फार सुपरिचित आहे. आमचं कथ्थक अजूनही तांडव, पनिहारी, कालियादमन, ठुमरी याच्या पलीकडे पोहोचू शकले नाहीये. अगदी विशारदच्या परिक्षेला 'द्रौपदी वस्त्रहरण' करावं लागणे म्हणजे बुरसटलेपणाचा कहरच. आपली पारंपारिक नृत्यं खूप देखणी आहेत, ग्रेसफुल आहेत, त्यापाठचा इतिहासही फार मोठा आहे पण ती दुर्दैवाने 'इव्हॉल्व्ह' होत नाहीत. तेच तेचते दळण आपण पुन्हा पुन्हा कांडत राहतो.
आजच्या जमान्यात वेणी-फणी करुन प्रियकराची वाट बघणारी विरहोत्कंठिता नायिका करताना त्याच्याशी रिलेट करता यायचंच नाही, फार हसू यायचं, होपलेस वाटायचं.
उदयशंकरांचे बॅले त्यामानाने खूप प्रयोगशील.
इथे देबूंनी काय केलं हे पाहणं मला महत्वाचं वाटतं. साल्सा, फ्लेमिंगो, टँगो, वॉल्ट्झ, बॅले अशा अनेक नृत्य प्रकारांमधून, किंवा त्यांच्या ब्लेंडमधून स्वतःला एक्स्प्रेस येऊ शकतं (नव्हे, करता येतंच) हे देबू दाखवतात. शास्त्रीय नृत्य आणि त्या ओघाने येणारं बरंच काही जुनं-पानं म्हणजेच काहीतरी ऑथेंटीक हा समज पुसायला मदत होईल असं मला वाटतं, त्यामुळे हा माणूस मला भारी वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

कलेतील कर्मठपणा या काहीशा व्यापक विषयावर चर्चा सुरू झाल्याने हा व त्याखालील प्रतिसाद चर्चास्वरूपात इथे मांडले आहेत.
- संपादक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नृत्याच्या बाबतीत साधारणपणे चांगलं वाईट इतपतच कळणाऱ्या मला हा लेख आणि त्यावरची चर्चा त्यामागच्या विचाराची एक झलक देऊन गेला. समकालीन हा शब्द सुरूवातीला एक तांत्रिक शब्द (टेक्निकल टर्म) आहे हे कळलं नाही, पण नंतर केलेल्या मांडणीतून अंदाज यायला लागला. या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्यांची ओळख करून दिल्याबरोबर धन्यवाद.

त्याचबरोबर 'समकालीन' विषयी, आणि एकंदरीतच नृत्यकलेतल्या वैचारिक प्रवाहांविषयी अधिक लिहावं ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा (सध्या इतकेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती. वर ऋषिकेष आणि अदिती यांनी म्हटल्याप्रमाणे या विषयावर अधिक माहिती आवडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या वर्षी, साधारण या आठवड्यात हा ही धागा आला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.