विष्णुध्वज नावाचा लोहस्तंभ

विष्णुध्वज नावाचा लोहस्तंभ

लेखक - अरविंद कोल्हटकर

दिल्लीला भेट देणारा प्रत्येक प्रवासी, प्रख्यात कुतुब मिनार, त्याच्याजवळील कुव्वत-उल-इस्लाम ही आता पडझड झालेली मशीद आणि तिच्या प्रांगणातील लोहस्तंभाला भेट दिल्याशिवाय राहात नाही. ह्यांपैकी कुतुब मिनार आणि मशीद ह्यांचा इतिहास पुरेसा स्पष्ट आहे, परन्तु लोहस्तंभाकडे पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. हा स्तंभ कोणी आणि का निर्माण केला, तो पहिल्यापासून येथेच आहे की आधी तो अन्य कोठे होता आणि तेथून येथे आणला गेला आहे, अन्य अनेक स्तंभांप्रमाणे हाहि बाहेरून येथे आणला गेला असेल तर त्याचे मूळ स्थान काय असावे ह्याविषयी तो विचार करू लागतो. हा स्तंभ सुमारे सोळाशे वर्षांचा जुना आहे हे समजल्यावर इतकी वर्षे न गंजता वा हवापाण्याचा त्याच्यावर कसलाच दृश्य परिणाम न होता तो कसा टिकून आहे, तो कोठल्या तन्त्राने निर्माण केला गेला आहे आणि त्यावरील लेख कोणी आणि कसा कोरला असावा हेहि कोडे त्याला पडते. सुमारे १८३० सालापासून प्रारंभी ब्रिटिश आणि तदनंतर भारतीय आणि अन्यदेशीय अभ्यासकांच्या अभ्यासामधून काही ठोस उत्तरे आणि काही पुष्कळसे पटण्याजोगे तर्क अशा प्रश्नांची उत्तरे म्हणून बांधण्यात आले आहेत. त्या तर्कांपैकी हा स्तंभ मूळ कोठे असावा ह्याचे अभ्यासकांना सापडलेले एक तर्कप्राप्त उत्तर हा या लेखाचा प्रमुख विषय आहे. त्याच्या अनुषंगाने अन्य प्रश्नांची उत्तरेहि शोधण्यात येतील.

प्रथम आत्ता समोर दिसणाऱ्या स्तंभाचे वर्णन पाहू. १९६१ साली भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शताब्दिवर्षात हा लोखंडी स्तंभ जागेवरून संपूर्ण काढून तो नीट टिकावा म्हणून त्याच्यावर रासायनिक संस्करण केले गेले आणि तो पुन: मूळ स्थानी जसा होता तसा उभारला गेला. त्यावेळी त्याची मोजमापेहि घेतली गेली ती अशी: स्तंभाची एकूण उंची: २३’ ६" (तेवीस फूट, सहा इंच), स्तंभाच्या जमिनीतील टोकापासून स्तंभाभोवती बांधलेल्या संरक्षक चबुतऱ्याच्या वरील पातळीपर्यंत लांबी: ३’ १". त्यावरचा सिलिंडर: १७’, त्यावरील स्तंभशीर्ष: ३’ ५", चबुतऱ्यापाशी सिलिंडरचा व्यास १’ ४.७", स्तंभशीर्षाच्या वरील बाजूचा व्यास: ११.८५". स्तंभाचे वजन सुमारे सहा टन आहे.

लोहस्तंभावरील प्रमुख लेख, आणि त्या लेखाचे शेजारीच भिंतीत लावून ठेवलेले वाचन (श्रेय - विकिपीडिया)
---

स्तंभावरती उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या काळांतील अनेक लेखांमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा असा सहा ओळींचा, गुप्तकालीन ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला एक लेख आहे. धातूवर कोरला गेल्यामुळे त्यातील अक्षरे स्पष्ट आहेत आणि १८३८ मध्ये Journal of the Asiatic Society of Bengal, Vol VII, 1838, p.629 येथे प्रसिद्ध झालेल्या जेम्स प्रिन्सेपच्या वाचनापासून अनेक अभ्यासकांनी त्याची वाचने केली आहेत. त्यांपैकी जे. एफ. फ्लीट ह्यांचे (Corpus Inscriptionum Indicarum, Vol.III, p. 139) वाचन असे आहे:

यस्योद्वर्तयत: प्रतीपमुरसा शत्रून्समेत्यागतान्।
वङ्गेष्वाहववर्तिनोऽभिलिखिता खड्गेन कीर्तिर्भुजे।
तीर्त्वा सप्तमुखानि येन समरे सिन्धोर्जिता वाह्लिका:।
यस्याद्याप्यधिवास्यते जलनिधिर्वीर्यानिलैर्दक्षिण:॥
खिन्नस्येव विसृज्य गां नरपतेर्गामाश्रितस्येतराम्।
मूर्त्या कर्मजितावनिं गतवत: कीर्त्या स्थितस्य क्षितौ॥
शान्तस्येव महावने हुतभुजो यस्य प्रतापो महान्।
नाद्याप्युत्सृजति प्रणाशितरिपोर्यत्नस्य शेष: क्षितिम्॥
प्राप्तेन स्वभुजार्जितञ्च सुचिरन्नैकाधिराज्यं क्षितौ।
चन्द्राह्वेनसमग्रचन्द्रसदृशीं वक्त्रश्रियं बिभ्रता।
तेनायं प्रणिधाय भूमिपतिना भावेन विष्णौ मतिम्।
प्रांशुर्विष्णुपदे गिरौ भगवतो विष्णोर्ध्वज: स्थापित:॥

अर्थ

  • वंग प्रदेशामध्ये युद्धात एकत्रितपणे समोर आलेल्या शत्रूंना आपल्या छातीने परतवल्यामुळे ज्या (नरपति)च्या भुजावर खड्गाने कीर्तिलेख लिहिला गेला,
  • सिंधूची सात मुखे पार करून ज्याने युद्धामध्ये वाह्लिकांना जिंकले,
  • ज्याच्या पराक्रमाच्या वायूंनी अद्यापि दक्षिणसागर सुवासित आहे,
  • (ह्या श्रमांनी) थकल्यामुळे जो नरपति हे जग सोडून आपल्या (उत्तम) कर्मांचे फल म्हणून मिळविलेल्या दुसऱ्या जगात वसतीसाठी जो गेला आहे आणि तरीहि जो कीर्तिरूपाने पृथ्वीवर उपस्थित आहे,
  • महारण्यामध्ये आता शान्त झालेल्या वणव्याप्रमाणे शत्रूंचा नाश करणाऱ्या ज्याचा महान पराक्रमशेष अद्यापिहि पृथ्वी सोडत नाही,
  • ज्याने आपल्या बाहूंनी पृथ्वीवर चिरकाल सार्वभौमत्व मिळविले,
  • ज्याचे मुखवैभव पूर्णचन्द्राप्रमाणे आहे,
  • अशा ’चन्द्र’ हे नाव धारण करणाऱ्या त्या भूमिपालाने
  • विष्णूवर मति स्थिर करून हा उंच असा विष्णूचा ध्वज 'विष्णुपद’ नावाच्या गिरीवर स्थापन केला.

ह्या लेखावरून स्तंभाविषयी पुढील स्पष्ट माहिती मिळते. ’चन्द्र’ हे नाव धारण करणारा (चन्द्राह्व) पराक्रमी आणि एकछत्री राज्य स्थापन करणारा राजा ह्या स्तंभाचा निर्माता आहे. त्याने दक्षिणसागर, वंगभूमि आणि सिंधूपलीकडील प्रदेशात संचार करून शत्रूंवर विजय मिळविले. तो विष्णुभक्त होता. स्तंभ विष्णूचा ध्वज आहे आणि विष्णुपदगिरि अशा नावाच्या उंच जागी त्याची मूळ स्थापना झाली होती. लेखाच्या भाषेविषयी असे म्हणता येते की ती उच्च प्रतीची विदग्ध संस्कृत असून लेखकाचे काव्यनिर्मितीवर आणि भाषेवर चांगले प्रभुत्व होते.

आता प्रश्न असा उभा राहतो की हा पराक्रमी, चन्द्र असे नाव धारण करणारा, आणि वंग, दक्षिणसागर, सिंधुपार येथेपर्यंत वर्चस्व निर्माण करणारा राजा कोण असावा? येथे आपल्यासमोर तीन नावे उभी राहतात, ती म्हणजे अलाहाबाद किल्ल्यातील अशोक स्तंभावर दिसणाऱ्या गुप्तकालीन लेखामध्ये उल्लेखिलेला समुद्रगुप्त, त्याचा पिता चन्द्रगुप्त आणि समुद्रगुप्ताचा पुत्र चन्द्रगुप्त दुसरा (ज्याला विक्रमादित्य असेहि उपपद आहे). ह्या तीनहि नावांचे आणि अन्य काही नावांचेहि प्रतिपादक विद्वान् आहेत, पण बहुतेकांचा कौल चन्द्रगुप्त दुसरा अर्थात् चन्द्रगुप्त विक्रमादित्य (इ.स. ३७८-४१३ सुमारे) ह्याच्या पक्षात आहे. (ह्या विषयाचे पूर्ण विवेचन आणि निर्णय Rise and Fall of the Imperial Guptas ह्या अश्विनी अग्रवाललिखित ग्रंथामध्ये पृ.१८३ येथे पाहण्यास मिळेल.) चन्द्रगुप्त विक्रमादित्य हा आपल्या पित्याच्या कारकीर्दीत मालवप्रान्तातील (माळवा) उज्जयिनीचा शासक नेमला गेला होता, आणि तो स्वत: राज्यावर आल्यावर आपली राजधानी पुरातन पाटलिपुत्रातून हलवून उज्जयिनी येथे आणली होती हेहि माहीत आहे.

दुसरा चन्द्रगुप्त हा मोठा विष्णुभक्त होता, कारण तसा स्पष्ट उल्लेख त्याची कन्या प्रभावतीदेवी हिच्या - जिचा विवाह वाकाटककुलामध्ये रुद्रसेन दुसरा ह्याच्याशी झाला होता - 'Poona Plates' ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ताम्रपटामध्ये (Corpus Inscriptionum Indicarum, Vol V, p. 5) मिळतो. ताम्रपटात चन्द्रगुप्ताचा उल्लेख ’परमभागवत’ असा करण्यात आला आहे. एकूणातच गुप्त घराणे विष्णुभक्त होते, हे चन्द्रगुप्त विक्रमादित्याचा पुत्र कुमारगुप्त ह्याच्या काळातील रेशीम-विणकरांच्या श्रेणीचा मंदसोर येथील लेख (Corpus Inscriptionum Indicarum, Vol III, पृ. ७९), तसेच चन्द्रगुप्त विक्रमादित्याचा पौत्र बुधगुप्त ह्याच्या काळात सागर जिल्ह्यातील एरण येथे महाराज मातृविष्णु आणि महाराज धन्यविष्णु ह्या दोघा भावांनी जनार्दनाच्या नावाने अर्पण केलेला जो ध्वजस्तंभ उभारला त्यावरील लेख इत्यादिवरून स्पष्ट होते (Corpus Inscriptionum Indicarum, Vol III, पृ. ८८).

---

चन्द्रगुप्त विक्रमादित्याच्या विष्णुभक्तीचा आणखी स्पष्ट पुरावा पाहण्यासाठी आपणास सध्याच्या मध्य प्रदेशातील विदिशा गावाच्या (२३० ३१' ७९.९" उत्तर, ७७० ४८' ३५.३" पूर्व) जवळच पश्चिम दिशेकडे २-३ कि.मी. वर असलेल्या ’उदयगिरि’ नामक छोटया टेकडीकडे जावे लागेल. हा पुरावा पाहण्यापूर्वी ’उदयगिरी’चा परिचय करून घेऊ.

विख्यात सांची स्तूप, हेलिओडोरसचा बेसनगर येथील गरुडध्वज, ऐतिहासिक विदिशा नगरी (जिचा आणि जिच्या ’दशार्ण’ (म्हणजे दहा नद्या असणाऱ्या) प्रदेशाचा कालिदासाने मेघदूतामध्ये विशेष उल्लेख केला आहे), ह्या सर्वांच्या ८-१० कि.मी. च्या परिघामध्ये ’उदयगिरि’ ह्या नावाने सध्या ओळखली जाणारी ही टेकडी आहे. चन्द्रगुप्ताची राजधानी उज्जयिनी ह्या टेकडीपासून फार दूर नाही. टेकडी तशी छोटीच आहे. आसपासच्या शेतजमिनीपासून तिची उंची ३००-३५० फुटांहून अधिक नाही. तिच्या टेकडीच्या पश्चिमेस बेस नदी वाहते तर पूर्वेस बेटवा नदी (हीच कालिदासाची वेत्रवती नदी). दोघींचा संगम टेकडीच्या उत्तरेस दिसतो. टेकडी उत्तर-पूर्वेकडून दक्षिण-पश्चिमेकडे पसरली असून तिचा पूर्व-पश्चिम विस्तार कमी आहे. उत्तरेस ती अधिक उंच असून दक्षिणेकडे कमी उंच आहे. ह्या दोन्ही उंचवट्यांच्या मधोमध खोलगट भाग आहे. उदयगिरि लेणी ह्या नावाने ओळखली जाणारी जी अनेक लेणी ह्या टेकडीवर आहेत, त्यांचा पहिला उल्लेख जनरल अलेक्झांडर कनिंगहम ह्यांच्या ’Bhilsa Topes' ह्या १८५४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये सापडतो. ('Tope' हे स्तूप/थूपो ह्याचे इंग्रजी आमदानीतले रूप आहे.) त्यांनी ह्या लेण्यांना १८५०-५१ च्या सुमाराला भेट दिली होती, आणि लेण्यांचे त्रोटक वर्णन केले होते. तदनंतर अनेक अभ्यासकांनी ही लेणी, त्यांतील शिल्पे आणि शिलालेख ह्यांचा अभ्यास केला आहे. कनिंगहम ह्यांनीहि हे सर्व वर्णन नंतर अधिक विस्तृतपणे Archaeological Survey of India Report, Vol X, 1874-75 and 1876-77 मध्ये पृ. ४५-५६ येथे केले आहे. सध्याचे ’विदिशा’ - स्वातन्त्र्यपूर्व काळातील नाव भिलसा - गाव टेकडीच्या पूर्वेस २-३ किमीवर आहे. गुप्तकालातील विदिशानगरी बेस आणि बेटवा ह्यांच्या संगमावर होती पण नद्यांच्या पुरामुळे केव्हातरी (८ व्या किंवा ९ व्या शतकामध्ये) तेथील वस्ती उठून सध्याच्या भिलसा-विदिशा येथे स्थिरावली असा तर्क करण्यात आला आहे. टेकडीवर एकूण २० लेणी पुढील आकृतीनुसार दिसतात. त्यापैकी काही वैष्णव, काही शैव आणि अन्य काही जैन सम्प्रदायातील आहेत. दोन्ही उंचवट्यांवर शुंग काळापासूनचे, म्हणजे इ.स.पूर्व काळातले काही अवशेष मिळाले आहेत.

श्रेय क्र. १

ह्या लेण्यांपैकी क्र.५ वराह लेणे आणि क्र. १३ अनन्तशयन लेणे ह्या लेण्यांकडे विशेष लक्ष देऊ. ह्यामधील प्रमुख शिल्पे अशी आहेत.

(श्रेय विकिपीडिया)

चार्ल्स वेड क्रम्प ह्यांनी १९व्या शतकाच्या मध्यात काढलेले वराह लेण्याचे हे जलरंगातील चित्र पहा.

श्रेय क्र. २

वराह शिल्पामध्ये वराह अवतारातील सामर्थ्यवान् विष्णु समुद्रामधून पृथ्वीला बाहेर काढून आपल्या सुळ्यावर उचलून धरत आहे असे दिसते. अनन्तशयन विष्णूच्या शिल्पामध्ये शेषनागावर शयन करणारा विष्णु दिसत आहे. वराहाच्या चित्रामध्ये शेषनागामागे दोन व्यक्ति वराहापुढे नमस्कार करतांना दिसतात. अनन्तशयन विष्णूच्या शिल्पामध्येहि अशाच दोन व्यक्ति मूर्तीच्या पायाशी दिसतात.

क्र.७ (तवा लेणे) ह्या लेण्यामध्ये चन्द्रगुप्ताच्या वीरसेन नामक मन्त्र्याचा खालील शिलालेख आहे. (Corpus Inscriptionum Indicarum, Vol III, p. 34):

सिद्धम् । यदन्तर्ज्योतिरर्काभमुर्व्यां — चन्द्रगुप्ताख्यमद्भुतम्
विक्रमावक्रयक्रीता दास्यन्यग्भूतपार्थिवा — मन: संरक्तधर्मा —
तस्यराजाधिराजर्षेरचिन्त्यो — र्मन: अन्वयप्राप्तसाचिव्यो व्यापृत: सन्धिविग्रह: ।
कौत्सशाब इति ख्यातो वीरसेन: कुलाख्यया शब्दार्थन्यायलोकज्ञ: कवि: पाटलिपुत्रक: ।
कृत्स्नपृथ्वीजयार्थेन राज्ञा — संगत: भक्त्या भगवत: शम्भोर्गृहमेतमकारयत् ।

ह्याचा सारांशरूपाने अर्थ असा:

सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि अद्भुत अशा चन्द्रगुप्ताचा कौत्स गोत्रोत्पन्न वीरसेन शाब नावाचा कौटुंबिक परम्परेने नेमलेला विद्वान, पाटलिपुत्रनिवासी आणि युद्ध आणि शान्ति विभागाचा मन्त्री (सान्धिविग्रहिक) पृथ्वी जिंकण्यासाठी बाहेर पडलेल्या राजासह येथे आला आणि त्याने भगवान् शम्भूचे हे गृह निर्माण केले

---

चन्द्रगुप्ताची अशा प्रकारे सिद्ध झालेली ह्या ठिकाणची उपस्थिति आणि त्याची सर्वज्ञात विष्णुभक्ति ह्यांवरून असे म्हणता येते की वराहाच्या आणि अनन्तशयनाच्या पायाशी बसलेल्या दोन व्यक्ति म्हणजे स्वत: चन्द्रगुप्त आणि आणि कोणी त्याच्या विश्वासातील निकटचा - उदाहरणार्थ त्याचा मन्त्री वीरसेन शाब - हेच असावेत. विष्णूच्या पायापाशी चन्द्रगुप्त बसलेला दाखविला आहे ह्यावरून त्याच्या काळात त्याच्या इच्छेवरून ह्या टेकडीस ’विष्णुपदगिरि’ असे म्हणत असावेत असा तर्क करता येतो. विष्णुपदगिरीच्या पायथ्यापाशी असलेल्या बेटवा-बेस नद्यांच्या संगमावर ’चरणतीर्थ’ नावाची जागा आहे ह्या गोष्टीवरून ह्या तर्कास बळ मिळते.

ही लेणी कोरली जाण्याचा काळ इ.स.चारशेच्या पुढेमागे चन्द्रगुप्ताच्या काळातील असावा. वर उल्लेखिलेले क्र. ७ चे लेणे, तसेच क्र. ५ आणि १३ ही लेणी त्यांचा चन्द्रगुप्ताशी वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्याच्या राज्यकालात निर्माण झालेली दिसतात. क्र. ६ च्या लेण्यात पुढील अंशत: उर्वरित लेख आहे. ह्या लेखात उल्लेखिलेला ’सनकानिक’ नावाचा प्रदेश मालव प्रान्ताबरोबरच समुद्रगुप्ताच्या वर्चस्वाखाली असल्याचा उल्लेख अलाहाबाद अशोक स्तंभावरील समुद्रगुप्ताच्या लेखामध्ये मिळतो. (Corpus Inscriptionum Indicarum, Vol. III, Inscriptions, p. 1):

सिद्धम्। संवत्सरे ८२ आषाढमासशुक्लैकादस्यां परमभट्टारक महाराजाधिराज श्री चन्द्रगुप्त पादानुध्यातस्य महाराज चगलिगपौत्रस्य महाराज विष्णुदासपुत्रस्य सनकानिकस्य महा...।

ह्याचा अर्थ:

चन्द्रगुप्ताचा (कोणीएक - नाव तुटले आहे) मांडलिक, जो मालव प्रान्तातील सनकानिक प्रदेशाचा अधिपति होता आणि जो महाराज चगलिगाचा पौत्र आणि महाराज विष्णुदासाचा पुत्र होता त्याने (गुप्त) संवत्सराच्या ८२व्या वर्षी आषाढाच्या शुक्ल एकादशीला (लेण्याचे दान केले).

अल्बेरुणीने शकसंवत्सर आणि गुप्त संवत्सर ह्यांमध्ये २४१ वर्षांचे अन्तर आहे असे जे विधान केले आहे त्याच्या आधारे गुप्तसंवत्सर इ.स. ३२० ला प्रारम्भ झाला असे म्हणता येते. (History of the Guptas, रा.ना. दांडेकर पृ. १०-२५). ह्या मार्गाने गुप्तसंवत्सर ८२ हा इ.स. ४०२ ह्या वर्षाशी जुळतो आणि लेणे क्र. ६ चा निर्माणकाल ते वर्ष आहे. त्याच्याहि पुढे जाऊन तिथींच्या सूक्ष्म गणितावरून असेहि दाखविण्यात आले आहे की ह्या लेखात वर्णिलेला दिवस (आषाढाची शुक्ल एकादशी) २६ जून ४०२ आहे.५ दक्षिणायनाच्या प्रारम्भाला म्हणजे २१ जूनला हा दिवस अगदी जवळ आहे. ह्याचेहि महत्त्व ह्यानंतरच्या विवेचनावर स्पष्ट होईल.

---

कालिदासाला ही टेकडी ’नीचै:’ ह्या नावाने माहीत होती आणि तेथे लेणी आहेत ह्याचीहि त्याला कल्पना होती. ह्या टेकडीला ’उदयगिरि’ असे नाव त्याच्या काळात पडले नसावे, अन्यथा त्याने ते अवश्य वापरले असते. स्थानिक सर्वसामान्य लोक अर्थातच त्या टेकडीला ’नीचै:’ ह्या संस्कृत नावाने ओळखत नसणार. त्यांच्या प्रचलित प्राकृत लोकभाषेमध्ये तिचे नाव ’छोटी डोंगरी’ असे काहीसे असणार आणि कालिदासाने त्याचे ’नीचै:’ असे संस्कृतामध्ये भाषान्तर केलेले दिसते. मेघदूतातील दशार्ण देश, वेत्रवती (बेटवा) नदी, नीचै: गिरि, तेथील लेणी (शिलावेश्म) ह्यांचे कालिदासाच्या शब्दांमध्ये वर्णन पहा:

पाण्डुच्छायोपवनवृतय: केतकै: सूचिभिन्नै:।
नीडारम्भैर्गृहबलिभुजामाकुलग्रामचैत्या: ।
त्वय्यासन्ने परिणतफलश्यामजम्बूवनान्ता:।
संपत्स्यन्ते कतिपयदिनस्थायिहंसा दशार्णा: ॥२४॥
तेषां दिक्षु प्रथितविदिशालक्षणां राजधानीम्।
गत्वा सद्य: फलमविकलं कामुकत्वस्य लब्धा ।
तीरोपान्तस्तनितसुभगं पास्यसि स्वादु यस्मात्।
सभ्रूभङ्गं मुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्मि ॥२५॥
नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो:।
त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पै: कदम्बै: ।
य: पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्नागराणाम्।
उद्दामानि प्रथयति शिलावेश्मभिर्यौवनानि ॥२६॥

अनुवाद

२४. उमललेल्या केतकीपुष्पांनी (केवडा) झाकल्यामुळे ज्यातील उपवने पाण्डुर दिसत आहेत, ज्याच्या ग्रामांमधील वृक्ष घरटी बांधण्यास प्रारम्भ केलेल्या काक इत्यादि पक्षांनी गजबजून गेले आहेत, पक्व होऊ घातलेल्या जांभळांनी ज्याची वने लगडलेली आहेत असा दशार्णदेश तू (म्हणजे अर्थात मेघ) येऊ घातल्यावर हंसांच्या थव्यांचे काही दिवसांसाठीचे निवासस्थान बनेल.

२५. त्या दिशेने विदिशा नावाने प्रख्यात अशा राजधानीमध्ये पोहोचल्यावर उसळत्या लाटांच्या आवाजाने रिझवणारे तट असलेल्या वेत्रवतीच्या भ्रुकुटिभंगासारख्या तरंगांनी युक्त जल प्यायला मिळून तुला विलासाचे पूर्ण फल मिळेल.

२६. तुझ्या स्पर्शामुळे पुलकित झाल्यासारखी ज्याच्यावर कदम्बपुष्पे फुलली आहेत अशा ’नीचै” नामक गिरीवर तेथे तू विश्रान्तीच्या हेतूने मुक्काम कर. वारयोषितांच्या रतिगन्धांचे उच्छवास टाकणाऱ्या शिलावेश्मांनी त्या विदिशा नगरीतील युवकांचे उसळते तारुण्य तो उद्घोषित करीत आहे. (शिलावेश्म म्हणजे लेणे.)

---

विदिशेजवळची आणि कालिदासास ’नीचै:’ ह्या नावाने माहीत असलेली ही टेकडी म्हणजेच दिल्लीच्या स्तंभातील ’विष्णुपदगिरि’ असे एकदा ठरल्यावर तिच्यावर तो ’विष्णुध्वज’ अशा वर्णनाचा लोहस्तंभ कोठे उभा असेल ह्याच्या शोधाचा प्रारम्भ होतो, आणि त्यासाठी आपणास प्राचीन भारतीयांच्या ज्योतिर्विज्ञानाकडे वळावे लागते.

फिट्झ् एडवर्ड हॉल ह्यांचा Three Sanskrit Inscriptions ह्या शीर्षकाचा एक लेख Journal of the Asiatic Society of Bengal, Volume 31, Nos I-V, 1862 येथे पृ. १११ वर उपलब्ध आहे. लेखाच्या तळटीपेमध्ये ते लिहितात: ’At Bhelsa, within the fort, I recently found a fragmentary inscription, built into the outer wall of a modern house, and looking upon one of the streets of the town. Subjoined is all that remains of a record of which perhaps a full half is missing:' ह्यानंतर लेखाच्या उपलब्ध दहा ओळी ते देवनागरीमध्ये देतात. त्यतील पाचवी ओळ अशी आहे - भाइल्लस्वामिनामा रविरवतु भुव: स्वामिनं कृष्णराजम्। (भाइल्लस्वामी सूर्य पृथ्वीपति कृष्णराजाचे रक्षण करो.) आता सर्वांच्या स्मृतीमधून पूर्णत: बाहेर गेलेले, पण एकेकाळी दूरवर ख्याति पसरलेले ’भैलस्वामी’ नावाच्या सूर्यदेवाच्या एका स्वरूपाचे मंदिर विदिशेच्या परिसरामध्ये होते, ह्याचा हा एक लिखित पुरावा आहे.

गुप्तकालीन विदिशा-भिलसा गाव सध्याच्या जागी नसून ते बेस-बेटवा संगमावर होते आणि तेथे परिसरामध्ये भैलस्वामी नावाच्या देवाचे दूरवर ख्याति असलेले मंदिर होते. ह्याची आणि मालव प्रान्ताची कीर्ति ऐकून १२३४ मध्ये सुलतान इल्तमशच्या सैन्याने माळव्यावर चाल केली आणि बरीच लूटमार करून देवळे पाडली, तसेच बरीच लूट दिल्लीस नेली. उज्जयिनीचे मेघदूतामध्ये कालिदासाने वर्णिलेले महाकालाचे मंदिर आणि वर्णनावरून बरेच मोठे असावे असे वाटणारे भिलशाचे भैलस्वामीचे मंदिर, ही अशा तोडलेल्या मंदिरांमध्ये होती असे पुढील वर्णन सांगते. वर्णनात नाव न दिलेले मंदिर भैलस्वामीचे असावे. ह्या सर्व प्रकरणाचे पुढील वर्णन मिन्हाज्-उस्-शिराज़ लिखित तबकात-अल-नासिरी ह्या इतिहासात दिले आहे. (भाषान्तर एच.एम. इलिअट, पृ. ३२८, History of India as Told by Its Own Historians V. II)

"After he (Altamash) had reached the Capital he sent, in A.H.632 (1234 A.D.) the army of Islam towards Malwa and took the fort and the city of Bhilsa. There was a temple there which was three hundred years in building. It was abour one hundred and five gaz high. He demolished it. From there he proceeded to Ujjain, where there was a temple of Maha-kal, which he destroyed, as well as an image of Bikramajit, who was king of Ujjain, and reigned 1316 years before this time. The Hindu era dates from his reign. Some other images cast in copper were carried with the stone image of Maha-kal to Dehli."

ह्याच पुस्तकाच्या रॅवर्टी ह्यांनी केलेल्या भाषान्तरामध्ये हा इल्तमशच्या कार्याचा आढावा घेतांना हाहि अन्य मजकूर आहे:

(Conquering) Ujjain-Nagari and bringing away of the idol of Maha-kal, which they have planted before the gateway of the Jami Masjid in the capital city of Delhi in order that all true believers might tread upon it.
(Tabakaat-i-Naasiri - A General History of the Muhammadan Dynasties of Asia including Hindustan पृ.६२८)

---

अलीकडील संशोधनावरून असे दृष्टीस पडले आहे की चन्द्रगुप्तपूर्व कालापासून ही जागा आकाशस्थ ग्रहगोलांचा वेध घेण्यासाठी वापरात असावी. कनिंगहम ह्यांनी उदयगिरीच्या दोन उंचवट्यांपैकी दक्षिणेच्या उंचवट्यावर काही बांधकामाचे अवशेष, तसेच १६ फुटाहून लांब आणि २’९" व्यासाच्या एका भग्न स्तंभाचे अवशेष, त्यावर बसलेला सिंह, तसेच काही बांधकामाचे अवशेष पाहिले होते (Archaeological Survey of India, Reports Vol. X पृ. ५६), पण त्यावर काहीच टिप्पणी केली नव्हती. केवळ इतकाच उल्लेख केला होता की हा स्तंभ येथून हलवून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न झाला असावा आणि तसे करतांना तो खाली पडून त्याचे तुकडे झाले असावेत. तुकडे नेण्यात कोणाला स्वारस्य नसल्याने ते तुकडे तसेच जागेवर पडून राहिले. हे जागेवर पडलेले सिंहाचे शिल्प १९२० साली खाली दाखविल्याप्रमाणे दिसत होते. हे शिल्प नंतर ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये असलेल्या पुरातत्त्व विभागाच्या वस्तुसंग्रहालयामध्ये १९३० च्या आगेमागे हलविण्यात आले, आणि तेथे ते अजूनहि पहावयास मिळते. त्याचे मूल स्थानावर असतांनाचे १९२० साली घेतलेले चित्र आणि वस्तुसंग्रहालयातील नंतरचे चित्र पुढे दाखवीत आहे. सिंहाच्या खाली दिसणाऱ्या गोल पट्टीवर (abacus) काही प्राण्यांच्या आकृति दिसतात. त्यांकडे काही वेळाने परत येऊ. अलीकडील अधिक बारकाईने केलेल्या ह्या उंचवट्याच्या पाहणीवरून असे वाटते की विस्मृतप्राय असे हे भैलस्वामीचे मंदिर ह्या उंचवट्यावरच असावे.

(श्रेय क्र. २ आणि ३)

१९१३-१४ या वर्षामध्ये देवदत्त रामकृष्ण भांडारकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उदयगिरीच्या उत्तरेकडील उंचवट्याची पाहणी आणि उत्खनन करण्यात आले. (जवळच्याच सांचीप्रमाणे उदयगिरीवर बौद्ध अवशेष मिळतील अशी कनिंगहम आणि भांडारकर दोघांचीहि समजूत होती, पण तसे घडले नाही.) ह्या पाहणीमध्ये दोन तुकडयांत मोडून पडलेला एक स्तंभ जमिनीत अर्धा पुरलेला दिसून आला.५ तेथेच एका चक्राचा जो भग्न भाग मिळाला त्यावर काही स्त्री-चित्रे कोरलेली दिसतात.५ स्तंभाचे चार दिशांना पाहणाऱ्या चार सिंहांचे स्तंभशीर्ष आणि त्याखालची गोल पट्टी (abacus) ह्या दोन गोष्टी जागेवरून गडगडून लेणे १९ च्या बाहेर पडलेल्या मिळाल्या. हे स्तंभशीर्षहि ग्वाल्हेरच्या वस्तुसंग्रहालयात नेण्यात आले. ह्या मोडलेल्या स्तंभाचे आणि भग्नचक्राचे अशी अलीकडची, स्तंभशीर्षाची जागेवर असतांनाची दोन आणि वस्तुसंग्रहालयातील एक, तसेच त्यांच्याखालील गोल पट्टीची तीन अशी उपलब्ध छायाचित्रे येथे दर्शवीत आहे.

(श्रेय क्र. ४)

वरील सर्व चित्रांमधील प्राणी कशाचे निदर्शक असावेत ह्याबाबत तर्क करण्यात आले आहेत.२,३,४ एक सिंह असलेल्या शीर्षस्तंभाखालचे प्राणी वर्षाचे सहा ऋतु दाखवितात. चक्रावरच्या आकृति नक्षत्रांच्या आहेत. चार सिंहांच्या शीर्षस्तंभाखाली बारा राशि असून प्रत्येक राशीच्या पुढेमागे आसनावर बसलेला सूर्यदेव आहे असे मानण्यात आले आहे. ह्यांपैकी नक्षत्र आणि राशीविषयक तर्क अधिक विश्वसनीय वाटतात. जवळून निरखून पाहिल्यास राशींपैकी वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, धनु, मकर आणि कुंभ इतक्या राशींची चित्रे ओळखता येतात.

---

उज्जयिनी आणि तिचा परिसर जवळजवळ कर्कवृत्तावर पडत असल्याने प्राचीन कालापासून उज्जयिनीचे नाव भारतीय खगोलविद्येशी निगडित आहे. (अयनचलनामुळे कर्कवृत्त हे २३.५ ह्या त्याच्या सरासरी अक्षांशापासून काहीसे अलग असू शकते. ख्रिस्तपूर्व १०० साली ते २३ ४२’ अंश, ख्रिस्तोत्तर ४०० साली ते २३ ३९’ अंश, आणि ख्रिस्तोत्तर २००१ मध्ये ते २३ २६’ ह्या अक्षांवर होते असे गणिताने शोधण्यात आले आहे.).

आज रेखांशांची मोजणी ’ग्रीनिच गावापासून अमुक रेखांश’ अशी केली जाते. भारतीय भूवर्णनात हेच स्थान उज्जयिनीचे होते. कित्येक करणग्रंथांमध्ये ग्रहांचे स्थान निश्चित करण्यासाठी लागणारे मूळचे ’क्षेपक’ (मूळच्या दिवसाची मूळची स्थिति) उज्जयिनीचे दिलेले असतात. चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या थोड्याच पुढील काळात होऊन गेलेला वराहमिहिर हा उज्जयिनीचाच. (त्याच्या नावातच वराह आणि सूर्याचे एक नाव ’मिहिर’ ह्यांची युति दिसते.) वैदिक कालापासून सूर्यदेवता आणि विष्णु, तसेच विष्णूचा वराह अवतार ह्यांचा निकटचा संबंध मानला गेला आहे. सूर्यरूपी विष्णु प्रतिदिन तीन पावलांमध्ये - उदय, मध्याह्न आणि अस्त - विश्वाचा प्रवास करतो अशी समजूत आहेच. सूर्याच्या वार्षिक उत्तर-दक्षिण-उत्तर आंदोलनाचे कर्कवृत्त-विषुवन्-मकरवृत्त-विषुवन्-कर्कवृत्त असे चार भाग पाडले तर प्रत्येक भागाच्या मधोमध दोन राशी पडतात. ह्या राशींपैकी कर्कवृत्ताच्या आणि मकरवृत्ताच्या मागील आणि पुढील अशा दोन राशींच्या संक्रान्तींना विष्णूचे दोन पाय म्हणतात असा काहीसा संदिग्ध उल्लेख सूर्यसिद्धान्तामध्ये करण्यात आला आहे. त्याचा निश्चित अर्थ संस्कृत टीकाकारालाहि नीटसा समजलेला दिसत नाही, अशी टिप्पणी सूर्यसिद्धान्ताचे भाषान्तरकार रेव्हरंड एबेनेझेर बर्जेस ह्यांनी केली आहे (बर्जेसकृत भाषान्तर सूर्यसिद्धान्त अध्याय १४, श्लोक ८, पृ.३१३).

उदयगिरीवरील वर वर्णिलेल्या वराहाच्या आणि अनन्तशयन विष्णूच्या मूर्ति, तेथेच एकेकाळी उभे असलेले भैलस्वामीचे मंदिर, उदयगिरीचे जवळजवळ कर्कवृत्तावरील स्थान (२३.५४०५२८ उ. ७७.७७१०२८ पू.), तेथे मिळालेली राशींची चित्रे आणि नक्षत्रांची चित्रे, ह्या बाबींचा एकत्रित विचार केल्यास असे म्हणता येते की ह्या टेकडीचा वेधशाळेसारखा उपयोग केला जात असला पाहिजे, आणि कर्कवृत्तामुळे तिचा संबंध विष्णुपदांशी जोडला गेला असला पाहिजे. कनिंगहम ह्यांना दिसलेला सिंहशीर्ष स्तंभ छायायन्त्राचा 'शंकु' (gnomon) म्हणून निर्माण झाला असला पाहिजे. गूगलकृपेने पृथ्वीवरील कोणत्याहि भूभागाचा आकाशातूनचा देखावा कोणालाहि पाहता येणे शक्य झाले आहे. ह्याचा उपयोग करून Google Earth वर उदयगिरीकडे जवळून पाहिले तर वेगळ्या रंगच्छटेमध्ये दिसणाऱ्या काही जागा आणि त्यांचे आकार असे सुचवितात की कोणे एके काळी येथे काही मोठया इमारती वा बांधकाम असावे.

उदयगिरीचे एक नैसर्गिक वैशिष्ट्य असे आहे की तिच्या उत्तर आणि दक्षिण उंचवट्यांच्या मधील दुभाजक आणि अरुंद अशी खोल जागा, जिच्या पश्चिमेकडील टोकाला अनन्तशयन विष्णूचे लेणे आहे, ही कर्कवृत्ताशी जवळजवळ पूर्णत: संलग्न आहे. कर्कवृत्तावरील सर्व स्थानांमध्ये दक्षिणायन प्रारंभ होण्याच्या दिवशी (summer solstice - २१ जून) सूर्योदय खऱ्या पूर्वेच्या उत्तरेस २३.५ अंशाच्या बिंदूवर होतो, माध्याह्नीला सूर्य सरळ डोक्यावर असतो आणि सूर्यास्त खऱ्या पश्चिमेच्या उत्तरेस २३.५ अंशाच्या बिंदूवर होतो. त्या जागेचे हे वैशिष्ट्य तत्कालीन स्थापत्यकारांच्या लक्षात आले असले पाहिजे, कारण ह्या अरुंद जागेची उत्तरेकडील बाजू तासून काढण्यात आली आहे आणि तिच्यावर अन्य कसलेहि काम केलेले नाही. दक्षिणेच्या भिंतीमध्ये अनन्तशयन विष्णूचे शिल्प आहे. ह्या मार्गाच्या अनन्तशयनापासून विरुद्ध बाजूस जर शंकु (gnomon) उभा केला तर दक्षिणायनाच्या प्रारंभाला सूर्योदय होताच शंकूची छाया लांब पसरून अनंतशयनाच्या पायांकडे जाईल. दुभाजक आणि अरुंद जागेचे हे वैशिष्टय लक्षात आल्यावर तेथेच ’विष्णुध्वज’ उभा असणे हे तर्कसंगत वाटते. त्या अरुंद दुभाजकाची दोन रेखाचित्रे, त्याची दोन बाजूनी छायाचित्रे, तसेच कर्कवृत्तावरच्या कोणत्याहि स्थानी २१ जूनच्या दिवशी सूर्योदयाच्या, माध्याह्नीच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी छाया कशा पडतील हे दाखविणारी छायाचित्रे पुढे जोडत आहे. (सूर्याच्या स्थितीची ही तीन चित्रे ह्या संस्थळावरून मिळविली आहेत. दिलेल्या अक्षांशासाठी वर्षाच्या प्रत्येक दिवशी सूर्याचा आकाशातील प्रवास कसा असेल हे तेथे पाहता येते.)

पुढचा प्रश्न म्हणजे वर दाखविलेला संस्कृत लेख हा कोणाच्या आज्ञेने स्तंभावर कोरण्यात आला आहे. ह्या प्रश्नाला स्पष्ट उत्तर नाही, पण दोन तर्क सहज करता येतात. स्तंभ निर्माण करणाऱ्या चन्द्रगुप्त विक्रमादित्य ह्याच्या देखरेखीखाली श्लोकाची निर्मिति निश्चितच झालेली नाही, कारण तो स्वर्गवासी झाला असल्याचा उल्लेख लेखातच आहे. शक्यता अशी वाटते की त्याच्या मृत्यूनंतर लवकरच त्याच्या वंशजांपैकी कोणाच्या तरी, उदाहरणार्थ त्याचा पुत्र कुमारगुप्त, आज्ञेप्रमाणे हा श्लोक तयार करून स्तंभावर कोरण्यात आला असावा.

स्तंभाला ’विष्णुध्वज’ असे अभिधान आहे. ह्या अभिधानायोग्य सध्या उर्वरित स्तंभावर काहीच नाही. त्याच्या शीर्षस्थली काही मूर्ति, चिह्न असण्याची अपेक्षा आहे. तेथे असे काय होते ह्याचाहि विचार करण्यात आला आहे.३ स्तंभाच्या सर्वात वर असलेला चौरस आणि त्या भागामध्ये असलेली एक खाच पुढील चित्रामध्ये दाखविली आहे. अशा खाचेत बसू शकणारी आणि विष्णूशी संबंधित अशी गोष्ट म्हणजे डाव्या हातामध्ये असलेले सुदर्शनचक्र. असे चक्र हातात धरलेली विष्णूची मूर्ति उदयगिरीमधील क्र. ६ च्या लेण्यामध्ये दिसते आणि तेथे ते चक्र अशाच एका चौरस व्यासपीठावर आधार दिलेले असेहि दिसते. त्या मूर्तीचे चित्र आणि चक्राचा अधिक जवळून दिसणारा देखावा हाहि पुढे दाखवीत आहे. चौरस व्यासपीठाच्या साम्यामुळे असे वाटते की स्तंभाच्या सर्वात वरच्या खाचेमध्ये विष्णूचे निदर्शक असे चक्र उभे असावे आणि त्यामुळे स्तंभाच्या ’विष्णुध्वज’ अशा वर्णनाचे समर्थन होत असावे.

(श्रेय क्र. ३)

स्तंभाचे सध्याचे स्थान हे त्याचे मूळचे स्थान नाही हे सहजच सांगता येते. एकतर ११व्या शतकामध्ये तोमार घराण्याने आपली सत्ता स्थापन करून दिल्ली, विशेषेकरून ’किला राय पिठोरा’ म्हणून ओळखली जाणारी जागा (सध्याचा कुतुबमिनारचा परिसर), येथे आपली राजधानी निर्माण करेपर्यंत दिल्लीला प्राचीन भारताच्या राजकारणात काहीच स्थान नव्हते. साहजिकच चन्द्रगुप्ताने आपला विष्णुध्वज तेथे उभारावा असे काहीच कारण दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे स्तंभ विष्णुपद नावाच्या गिरीवर होता. सध्याची त्याची जागा कोणत्याच गिरीवर नाही, इतकेच नव्हे तर आसपासच्या प्रदेशाच्या तुलनेने खोलगटच आहे. वर चर्चा केल्याप्रमाणे विदिशेजवळील टेकडीवर तो उभा केला असणे अधिक शक्य वाटते. तेथून तो येथे कसा आला हेहि स्पष्ट नाही. स्तंभावरील दोन ओळींच्या एका लेखावरून अनंगपाल तोमार ह्याच्या काळापासून तो सध्याच्या जागी आहे असे म्हणता येते. ह्या राजाचा काल ११वे शतक आहे इतकेच म्हणता येते. हा दोन ओळींचा लेख असा आहे: (पहा Archaeological Survey of India Reports, Vol I, (1862-63-64-65) by Alexander Cunningham, 1871 p. 151.) 'Samvat Dihali 1109 Ang (Ananga) Pal Bahi" "In Samvat 1109 Ang (Ananga) Pal Peopled Dilli".

शेषनागाचा मस्तकापर्यंत स्तंभ जमिनीत खोलवर गेला आहे अशी प्रसिद्ध दंतकथा पुढील दोन प्राकृत ओळींच्या मागे आहे.

जहिं असिवर तोडिय रिउ कवालु, णरणाहु पसिद्धउ अणंगवालु ||
वलभर कम्पाविउ णायरायु, माणिणियण मणसंजनीय ||

The ruler Anangapal is famous, he can slay his enemies with his sword. The weight (of the Iron pillar) caused the Nagaraj to shake.

(पहा - http://en.wikipedia.org/wiki/Vibudh_Shridhar)

---

स्तंभ मूळच्या जागेवरून उचलून येथे कोणी आणला ह्याबाबतहि काहीच तर्क शक्य दिसत नाही. दिल्लीच्या प्रदेशापासून माळव्यापर्यंतचा भाग ताब्यात असलेला, तसेच चन्द्रगुप्तापासून अनंगपालापर्यंतच्या काळात (म्हणजे ५व्या ते ११व्या शतकाच्या दरम्यान) होऊन गेलेला कोणी राजाच हे करू शकला असता, पण असा कोणीच राजा दृष्टीसमोर येत नाही. काही ठिकाणी इल्तमशचे हे काम आहे असे मत व्यक्त केले गेले आहे पण ते दोन कारणांसाठी शक्य वाटत नाही. एकतर इल्तमशच्या दीडशे पावणेदोनशे वर्षे आधीपासून स्तंभ आहे तेथेच उभा असल्याचा सबळ पुरावा अनंगपालाच्या लेखाच्या स्वरूपामध्ये आपल्यापुढे आहे. तबकात-इ-नासिरी ह्या इल्तमशच्या समकालीन इतिहासात त्याच्या माळव्यावरील स्वारीचे जे वर्णन वर दाखविले आहे तेथेहि महाकालाच्या मूर्तीसारखा असा काही स्तंभ त्याने आणल्याचा उल्लेख नाही. तेव्हा विष्णुपदगिरीपासून दिल्लीपर्यंतचा स्तंभाचा प्रवास कसा झाला हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित दिसतो.

मूळ जागेपासून तो दिल्लीपर्यंत कसा आला असावा ह्याबद्दल तर्क करता येतो. ह्या स्तंभाहून उंचीने आणि वजनाने कितीतरी मोठा असा एकसंधी आणि दगडी अशोकस्तंभ फिरोझशाह तुघलक ह्या सुलतानाने हरियाणातील खिझराबाद ह्या गावातून उचलून आणून त्याला दिल्लीतच फिरोझशाह कोटला ह्या त्याच्या तत्कालीन राजधानीमध्ये कसे उभे केले ह्याचे वर्णन शम्स-इ-शिराज ह्या समकालीन इतिहासलेखकाने आपल्या तारिख-इ-फिरोझशाही ह्या इतिहासामध्ये केलेले आपणास वाचता येते (पहा: History of India as told by its own historians, V. III, H.M.Elliot, p. 351). तदनुसार स्तंभ खणून काढून शेवरीच्या कापसाच्या गादीवर आडवा केला गेला. त्याला वेताच्या आणि कातड्याच्या वेष्टनामध्ये लपेटून बेचाळीस चाकांच्या खास बनविलेल्या गाड्यावर चढविण्यात आले. प्रत्येक चाक ओढण्यासाठी दोनशे माणसे पुरविली होती. स्तंभ गाड्यावरून जवळच असलेल्या यमुना नदीपर्यंत आणला आणि तेथे त्याला एका मोठया नावेवर चढवून दिल्लीपर्यंत कोटल्याबाहेर आणण्यात आले. ह्या स्तंभापुढे विष्णुध्वज हा लोहस्तंभ हलकाच म्हटला पाहिजे. असाच खास गाड्यावर चढवून रोज काही मैल प्रवास करत तो त्याच्या मूळच्या जागेपासून दिल्लीपर्यंत काही महिन्यांमध्ये पोहोचणे सहज शक्य होते.

कालिदासाच्या ’नीचै:’ गिरीपासून सुरुवात करून अखेर टेकडीचे नाव ’उदयगिरि’ येथे कसे पोहोचले असावे? त्या प्रान्तात दहाव्या शतकात राज्य करणाऱ्या उदयादित्य नामक राजावरून हे नाव पडले असावे असा तर्क कोठेकोठे वाचावयास मिळतो. मला दुसरीहि एक उपपत्ति सुचते. चंद्रगुप्ताच्या इच्छेनुसार प्रथम ’नीचै:’ गिरि हा ’विष्णुपदगिरि’ ह्या नावाने ओळखला जाऊ लागला असेल, आणि म्हणून तेच नाव त्याच्या मृत्यूनंतर लिहिल्या गेलेल्या लेखामध्ये मिळते. कालान्तराने चन्द्रगुप्त आणि विष्णुपदगिरीची आठवण पुसट होत गेली. तेथील भैलस्वामीचे मंदिर, सूर्याची उपासना आणि सूर्योदयाशी अनन्तशयन विष्णूचा संबंध स्तंभाच्या सावलीमुळे जोडला जाणे ह्याचा परिणाम जनमानसावर अधिक होऊन विष्णुपदगिरि हे नाव मागे पडून उदयगिरि हे नाव अधिक प्रचलित झाले असावे.

श्रेय क्र. ७

ह्यापुढील मोठा प्रश्न म्हणजे हा स्तंभ कोणत्या तन्त्राने निर्माण केला असावा. ह्याचे जे उत्तर देण्यात आले आहे७ त्यानुसार कोळशाच्या भट्टीमध्ये तापवून नरम केलेल्या २० ते ३० किलो वजनाच्या लोहगोलांना घणाच्या घावांनी - forge welding - एकमेकांशी जोडून हा स्तंभ निर्माण करण्यात आला आहे. वरील चित्रामध्ये ही प्रक्रिया दर्शविण्यात आली आहे. स्तंभ ९८% ओतीव लोखंडाचा असून लोखंडाचे खनिज हे कोळशाबरोबर मुशीमध्ये वितळवून केला गेला आहे. ह्या पद्धतीमुळे तयार धातूमधील फॉस्फरसचा भाग टिकून राहतो, आणि स्तंभ न गंजण्याचे ते कारण आहे. ही पद्धति सध्याच्या चुनकळी खनिजाबरोबर वितळवण्याच्या प्रक्रियेहून भिन्न आहे. स्तंभावरील लेख हा कोरून काढलेला नसून punch-marked नाणी तयार करतात त्याच पद्धतीने ब्राह्मी अक्षरांच्या अवयवांचे साचे करून आणि त्यांवर घणाचे घाव घालून ही अक्षरे उमटविण्यात आली आहेत.

---

टीप १ - अन्य काही लेखकांच्या अनुसारे ही मूर्ति दिल्लीतील ’तांबडया दगडाच्या मनोऱ्यापुढे' (कुतुब मिनार?) जमिनीमध्ये पुरण्यात आली. १७३४-४५ ह्या काळात हे मंदिर त्याच जागी राणोजी शिंदे ह्यांचे मन्त्री रामचन्द्रबाबा सुखटणकर ह्यांनी पुन: बांधले (पहा ’Ujjain’ by KB Dongray, p. 131). बदाउनीच्या मुन्तखाब-उल-तवारिखप्रमाणे १२९२ मध्ये अलाउद्दीन खिलजीने भिलशावर पुन: हल्ला केला आणि ह्यावेळी भैलस्वामीची मूर्ति जागेवरून हलवून बदाऊन गावात वेशीसमोर टाकण्यात आली. हा उल्लेख Studies in the Religious Life of Ancient and Medieval India - दिनेश चंद्र सरकार पृ. ११५ आणि खाली उल्लेखिलेल्या निबंधांपैकी क्र. १ येथे पहावयास मिळेल.

टीप २. ’विदिशा’ ह्या जुन्या नावाचा अपभ्रंश ’भिलसा’ असा झाला असावा अशी सार्वत्रिक समजूत आहे. ’मेघदूता’तील वर दाखविलेले श्लोक शिकतांना आम्हाला तसेच सांगण्यात आले होते. भाइल्लस्वामी/भैलस्वामी ह्या तेथील एकेकाळच्या प्रसिद्ध मंदिरावून तर हे नाव पडले नसेल ना, अशी शंका मला येत आहे. विदिशा-भिलसा ह्यापेक्षा भैलस्वामी-भिलसा अधिक शक्य वाटते.

---

संदर्भ निबंधांची यादी :

1. Inscriptions from Udayagiri: locating domains of devotion, patronage and power in the eleventh century, Michael Willis.

2. The Lion Capital from Udayagiri and the Antiquity of Sun Worship in Central India, by Meera Dass and Michael Willis. (South Asia Studies, 18:1, 25-45) One-Lion capital in museum and in situ, Varaha old pict.

3. The Original Image Atop the Delhi Iron Pillar, by R.Balasubramaniam, Meera I. Dass and Ellen M. Raven. Indian Journal of History of Science, 39.2 (2204) pp. 177-203 (Four lion Pillar museum and in situ, reference to Nakshatra figures, square platform top and slit, Vishnu holdin chakra)

4. A Recut Aśokan Capital and the Gupta Attitude towards the Past, by Joanna Williams, Artibus Asiae, Vol. 35, No. 3 (1973), pp. 225-240.

5. Udayagiri Hills in Madhya Pradesh - An Ancient Astronomical Site, Sharan and Dass (used for black and white passage, broken pillar on north hill, Nakshatras and date for Sanakanika inscription).

6. Estimation of the original erection site of the Delhi iron pillar at Udayagiri, Meera I Dass and R. Balasubramaniam, Indian Journal of History of Science, 39.1 (2004), pp. 51-74.

7. The Iron Pillar at Delhi, T. R.Anatharaman, Iron and Steel Heritage of India, Jamshedpur, pp. 1-28.

8. On Technical Analysis of the Characters of the Oldest Delhi Iron Pillar Inscription, R.Subramaniam and V.N.Prabhakar, Current Science, Vol 92, No 12, 25 June 2007.

9. Date of Sanakanika inscription and its astronomical significance for archaeological structures at Udayagiri, Anand M. Sharan and R. Balasubramaniam.

10. On the astronomical significance of the Delhi iron pillar, R. Balasubramaniam and Meera I. Dass.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

अरविंदजी, अत्यंत रोचक आणि अभ्यासपुर्ण लेख. आपल्या इतर लेखांप्रमाणेच.
फारच आवडलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अत्यंत रोचक आणि वाचनीय. लेखन करताना केलेला दांडगा अभ्यास पाहून दडपून जायला होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपेक्षेप्रमाणे उत्तम आणि माहितीपूर्ण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय रंजक लेख! आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर या धाग्यावर छायाचित्रं आवडली अशी मठ्ठ पण प्रामाणिक अन "ताबडतोबी" प्रतिक्रिया देणार होते पण तसं म्हणणं म्हणजे आतला दागीना सोडून बाहेरची डबी म्हणणं होइल निदान काही जणांना तसं वाटेल. पण डबी आवडली म्हणजे दागीना आवडत नाही असं थोडीच आहे?

सांगायचा मुद्दा हाच की लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आहेच पण विज्युअली देखील अपीलींग आहे= लेखातील छायाचित्रे म्हणजे सौंदर्याची मेजवानी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

खूप मजा आली वाचायला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेख. माहिती आणि छायाचित्रं दोन्ही अपेक्षेनुसार उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.