शिल्पांची ओळख १: हातचा (Laocoon and his sons)

हातचा

संगमरवरात गोठलेली एक जिवंत वेदना. लाओक्वूनच्या त्या पुतळ्यावरून मिखेलान्ज्लोची नजर हलत नव्हती. लाओक्वून ट्रॉय (Troy) मधल्या मंदिरातील पुजारी. ट्रॉय काबीज करण्यासाठी ग्रीकांनी एक उमदा लाकडी घोडा वेशीपाशी ठेवला. घोड्याच्या आत सैनिक लपले होते. इतकी देखणी भेटवस्तू पाहून ट्रॉयची जनता भुलली. लाओक्वून मात्र सावधपणे म्हणाला “अनोळखी व्यक्तीच्या भेटवस्तू पासूनही सावध असले पाहिजे". धूर्तपणे त्याने त्या घोड्याला भाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पॉसेडॉन देव चिडला, त्याने दोन अजस्त्र सर्प लाओक्वून आणि त्याच्या दोघा मुलांना मारण्यासाठी त्यांच्यावर फेकले. यज्ञात बळी जाणाऱ्या गायीप्रमाणे हंबरडा फोडत लाओक्वून गेला.

पण र्होड्सच्या तीन रोमन शिल्पकारांनी लाओक्वूनच्या अंताचा तो बेबस क्षण शिल्पबद्ध केला. सापांचा विळखा सोडवण्यासाठी धडपडणारा, चौथऱ्यावर बसलेला, पायाशी दोन्ही मुले. भुवया आक्रसलेल्या, वेदनेने ओठ विलग झालेले, डाव्या हाताने लहानग्याला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न, धड त्याच्या बाजूला झुकलेले उजव्या मांडीवर दुसरा लेक गलितगात्र पडलेला असा तो लाओक्वूनच्या आयुष्यातला अगतिक क्षण. ते शिल्प म्हणजे फक्त लाओक्वूनचे देखणे शरीर किंवा त्याच्या मुलांचे लोभस रुपडे नव्हते तर एका मर्त्याच्या वेदनेचा, एका पित्याच्या विवशतेचा तो आविष्कार होता.

रोमन सम्राट निरोचा सेनापती - टायटस. त्याच्या प्रसादासाठी हा पुतळा त्या तीन शिल्पिनी बनवला असावा. पण पहिल्या शतकात रोम जळाले आणि त्या राखेच्या ढिगाऱ्यात हे शिल्प गडप झाले. हो, जेव्हा निरो फिडल वाजवत होता तोच तो अग्निसाक्षी अपघात; त्या अपघातानेच हे शिल्प गिळंकृत केले. ते अचानक उत्खननात सापडले सोळाव्या शतकात. कुठे कुणाला वर्दी द्यायची हे न कळल्याने कामगारांनी दोन कोसावर असणाऱ्या पोप ज्युलियस दुसरे यांना वर्दी दिली. पोपमहाशय कलेचे जाणकार आणि चाहते होते. त्यांना ते शिल्प आवडले, ते त्यांना व्हॅटीकनमधे आणायचे होते. पण त्यांना आधी त्यावर जाणकाराचे भाष्य हवे होते. पोपमहाशयांनी लगेच मिखेलान्ज्लोला पाचारण केले. मिखेलान्ज्लो ते शिल्प बघून स्तब्ध झाला. लाओक्वूनच्या त्या पुतळ्यावरून मिखेलान्ज्लोची नजर हलत नव्हती.

थोरला प्लिनी ह्या विद्वानाच्या लेखनात ह्या शिल्पाबद्दल मिखेलान्ज्लोने वाचले होते. एवढ्या मोठ्या अपघातातून हे शिल्प वाचावे आणि परत सापडावे हाही एक अपघातच म्हणायचा. अचानक ध्यानी-मनी नसताना पोपमहाशयांचा सांगावा येतो काय आणि मध्ये १५ शतके जणू झालीच नव्हती अशा थाटात हे शिल्प समोर उभे राहते काय! अप्रूपाची परिसीमा मिखेलान्ज्लोने एका क्षणात अनुभवली. लाओक्वूनच्या शिल्पाचा उजवा हात मोडला होता, त्याच्या मुलाचा एक हात मोडला होता. संपूर्ण नसला,विद्ध असला तरी रोमन शैलीच्या शिल्पकलेचा हा उत्कट आविष्कार त्याच्या समोर होता.

मिखेलान्ज्लोला गुंग बघून पोपमहाशय म्हणाले , “आपल्या नजरेत स्पष्ट दिसतय की थोरल्या प्लीनीने वर्णन केले तेच हे शिल्प आहे. आमचा मानस आहे हे चर्चच्या म्युझियम मध्ये ठेवावे. पण त्याअगोदर जर आपण ह्याची डागडुजी कराल तर बरे पडेल." मिखेलान्ज्लोच्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ उठला. धर्मसत्तेने आपल्याला विषयातील तज्ञ म्हणून पाचारण करावे, आपल्या मताचा आदर व्हावा आणि इतक्या उत्तम शिल्पावर काम करण्याची संधी मिळावी ह्यापेक्षा आणखी भाग्य ते कोणते? पण दुसऱ्याच क्षणी तो नम्रपणे म्हणाला “महाशय, आपली सूचना चांगली आहे. पण इतक्या उत्कृष्ट शिल्पामध्ये मी काहीही जोड लावली तर ते रसभंग करणारे ठरेल. हे शिल्प जसे सापडलंय तसेच आपण म्युझियम मध्ये ठेवावे ही माझी विनंती आहे.”

पोपमहाशयांनी चिकाटी सोडली नाही. त्यांनी पुन्हा प्रश्न केला “आपण काम करणार नसाल तर निदान मार्गदर्शन करा. ह्याचा उजवा हात कसा बांधावा? मुलाच्या डोक्यावर ठेवावा की परमेश्वराला आळवतो तसा आकाशाकडे उंचावलेला असावा की मदतीस याचना करतो तसा समोर असावा? आपण सांगाल तसा बसवू.” आता मिखेलान्ज्लो विचारात पडला. चहुबाजूने पुतळ्याला निरखून मग तो म्हणाला “ज्या पद्धतीने ह्याचे धड मागे वळलेले आहे त्यावरून ह्याचा हात मागे वळलेला, काहीसा मानेवर विसावलेला असावा.” पोपमहाशयांनी मिखेलान्ज्लोचे आभार मानले. पण मिखेलान्ज्लो त्या शिल्पावर काम करणार नाही हे त्यांना फारसे रुचले नाही. त्यांनी जणू एक अघोषित स्पर्धा जाहीर केली. वेगवेगळे शिल्पकार येत आणि आपले हाताविषयी मत देत. शेवटी त्यांनी राफाएल ह्या शिल्पकाराला परीक्षक बनवले. त्याच्या मते हात सरळ वर जात असावा हा तर्क सुयोग्य होता. पोपमहाशयांनी शिल्पकार कामाला लावले. थोड्याच अवधीत परिपूर्ण अवस्थेत ते पहिल्या शतकातील शिल्प Vatican म्युझियममध्ये दाखल झाले.

मंडळी, लाओक्वून शिल्प आजही तिथे आहे. पण नुकतीच त्यात १९८० साली थोडी डागडुजी करावी लागली. होत काय की शक्य-अशक्य, योग्य-अयोग्य, चूक-बरोबर ह्याच्या गणितात आपण नेहमी ‘काळ’ हातचा धरायला चुकतो आणि मग अपघात घडत राहतात. लुडविग पोलाक - रोमच्या म्युझियमचे डायरेक्टर. १९०६ साली त्यांना रोममध्ये एका उत्खननात एक संगमरवरी हात सापडला. हिऱ्याची पारख जवाहीराला. त्यांनी लगेच Vatican म्युझियमशी संपर्क केला कारण त्यांच्या मते तो हात बहुदा लाओक्वूनचा असावा. सुमारे ५० वर्षे त्यावर उहापोह झाला आणि १९५० साली निर्णय झाला हा हात लाओक्वूनचाच - जसा मिखेलान्ज्लोने सांगितला तसा पाठीकडे वळलेला. १९८० साली तो आता पुन्हा बसवलाय. सध्यातरी वाटतय लाओक्वूनची गोष्ट इथे संपली; का आपण पण काळ ‘हातचा’ धरायला चुकतोय ?

छायाचित्रे:
https://www.flickr.com/photos/mharrsch/11358770/

https://www.flickr.com/photos/lviggiano/6039131463/

(फोटो आंतरजालावरुन साभार.लेख अन्यत्र पूर्वप्रकाशित.)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

क्षमस्व, लेखात चित्र दिसत नाही, म्हणून येथे विकिपीडियावरून साभार.

http://en.wikipedia.org/wiki/Laoco%C3%B6n_and_His_Sons

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओळख आवडली. नुकतंच पाहिलेल्या 'डाईंग गॉल' शिल्पाची कथा थोडीशी अशीच आहे. (साभार, विकी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

संगमरवरात गोठलेली एक जिवंत वेदना.

सुरुवातच इतकी प्रभावी केलीत. लेखच पूर्ण आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाओकूनच्या पुतळ्यामागची कहाणी रोचक आहे! ट्रोजन युद्धातली कहाणीच फक्त अगोदर माहिती होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<रोमन सम्राट निरोचा सेनापती - टायटस. त्याच्या प्रसादासाठी हा पुतळा त्या तीन शिल्पिनी बनवला असावा. पण पहिल्या शतकात रोम जळाले आणि त्या राखेच्या ढिगाऱ्यात हे शिल्प गडप झाले. हो, जेव्हा निरो फिडल वाजवत होता तोच तो अग्निसाक्षी अपघात; त्या अपघातानेच हे शिल्प गिळंकृत केले.>

ह्या माहितीमध्ये थोडी दुरुस्ती हवी. दुरुस्तीबरोबरच नीरो, टायटस, लाओक्वूनचा पुतळा ह्यांबद्दल अजून काही माहिती, तसेच काही मनोरंजक तपशील आणि माझ्या दोन रोम भेटींमधील चित्रेहि देतो.

धनंजय ह्यांनी दाखविलेले विकिपीडियावरील चित्रहि 'ओरिजिनल' नसून 'कॉपी' असावे. प्रसिद्ध शिल्पांच्या कॉप्या करायची पद्धत चांगलीच रूढ होती आणि आहे. फ्लोरेन्समधील मिकेलअ‍ॅंजेलोच्या प्रख्यात 'डेविड'च्या अनेक कॉपीज ठाऊक आहेत. त्यातील एक तर फ्लोरेन्समध्येच 'सान्ता मारिया फिओरे'च्या चौकात उभी आहे. (मूळचा 'डेविड' जवळच अकादेमिया नावाच्या म्युझिअममध्ये मोठ्या बंदोबस्तात उभा आहे. त्याचे छायाचित्र घेणेहि शक्य नाही.) ही कॉपी आहे असे मी म्हणतो कारण की वॅटिकन म्यूझिअममधील लाओक्वून - निश्चितच 'ओरिजिनल' - मी पाहिला आहे आणि त्याची बॅकग्राउंड अगदीच निराळी आहे. खालील चित्र पहा. वॅटिकन लाओक्वूनचा हात मान्तोर्सोली नावाच्या शिल्पकाराने १५३२ साली बनविला. वॅटिकन लाओक्वूनचे दोन्ही हात आता पूर्ण आहेत पण विकिपीडिया कोपीमध्ये उजवा अजूनहि कमीच आहे. धाग्यात वर्णिल्याप्रमाणे लाओक्वूनचा मूळचा उजवा हात सापडल्यावर तो शिल्पावर पुनः बसविण्यात आला, यद्यपि मान्तोर्सोलीने १५३२ साली बनविलेला हातहि संग्रहाचा भाग म्हणून सांभाळला गेला आहे.

नीरो (३७-६८, सम्राट् ५४-६८) ह्याच्या काळात ६४ साली रोममध्ये प्रचंड आग लागली. रोम हे मुख्यत्वेकरून लाकडी बांधणीचे नगर होते. बडया लोकांचे आणि सम्राटांचे प्रासाद सोडले तर सर्वसामान्य प्रजा ३-४ मजल्यांपर्यंत उंच अशा चाळवजा इमारतींतून अरुंद गल्ल्याबोळांनी भरलेल्या वस्त्यांमध्ये राहात असे. त्यामुळे रोममध्ये आगी नेहमीच लागत पण ६४ सालच्या आगीने फारच नुकसान केले आणि इतिहास त्याबद्दल नीरोला दोष देत आला आहे. नीरो तसाहि लोकप्रिय नव्हताच. रोममधील गोरगरिबांच्या वस्त्या सक्तीने खाली करून त्या जागी त्याने आपला Domus Aurea - सुवर्ण प्रासाद - हा प्रासाद अमाप खर्च करून बांधला. ह्या प्रासादासाठी जागा मोकळी व्हावी म्हणून नीरोनेच ही आग घडवून आणली असा संशय होता. ह्या सर्वांमुळे रोमची प्रजा आणि सेनेटहि त्यावर नाखूष होते. परिणामत: त्याला आत्महत्या करून ६८ साली मृत्यूला कवटाळावे लागले.

त्याच्या मृत्यूनंतर सेनेटने त्याच्यविरुद्ध damnatio memoriae चा ठराव मंजूर केला, ज्याचा अर्थ नीरोच्या सगळ्या आठवणी बुजवून टाकणे. ह्याचा भाग म्हणून Domus Aurea संपूर्ण पाडण्यात आला आणि त्यातील अमोल कलाकृति इकडेतिकडे विखुरल्या. त्यामध्ये लाओक्वूनचा पुतळा होता, जो थोरल्या प्लिनीने पाहिलेला होता आणि त्याचे वर्णनहि लिहून ठेवले होते. अशा अनमोल कलाकृति इकडेतिकडे विखुरल्या आणि नंतरच्या तीन शतकांमध्ये रोममधील अंतर्गत भांडणे आणि सीमेपलीकडील टोळ्यांची आक्रमणे ह्यामुळे साम्राज्य खिळखिळे होऊन नष्ट झाले. ह्या सर्वाचे उत्तम चित्रण गिबन्सच्या ’Decline and Fall of the Roman Empire' ह्या अनेक खंडांच्या ग्रंथात मिळते.

नीरोनंतर त्याच्या ज्यूलिअस सीझरपासून सुरू झालेल्या ज्यूलिओ-क्लॉडिअन घराण्याची सत्ता संपली आणि सेनेटर वेस्पेशिअन सम्राट् (६९-७९) झाला. त्याच्यापासून फ्लेविअन (Flavian) घराणे सुरू झाले. टायटस (Titus) हा त्याचा मुलगा. तो नीरोचा सेनापती नव्हता. Domus Aurea पाडून मोकळ्या झालेल्या जागेवर एक अँफिथिएटर बांधण्यास वेस्पेशिअनने ७० साली प्रारंभ केला. नीरोने सूर्यदेवतेचे मुख असलेला आपला ३५ मीटर उंचीचा प्रचंड उभा ब्रॉंझ पुतळा आपल्या नव्या प्रासादाबाहेर उभा करण्यासाठी बनविला होता. तो ह्या नव्या इमारतीबाहेर उभा करण्यात आला आणि त्याच्यावरून ह्या अँफिथिएटरला कलोसिअम (Colossus - Colosseum) असे नाव नंतर मिळाले. फ्लेविअन घराण्याच्या वेस्पेशिअने बांधलेले म्हणून त्याचे मूळचे नाव ’फ्लेविअन अँफिथिएटर’ असे होते. ह्या प्रचंड पुतळ्याचे पुढे काय झाले ह्याबाबत काहीच माहिती नाही.

वेस्पेशिअनने आपला मुलगा टायटस ह्याच्यावर ज्यू लोकांची बंडाळी मोडून काढण्याची जबाबदारी टाकली होती आणि टायटसने ती उत्तमरीत्या बजावली. वेस्पेशिअननंतर टायटस (३९-८१) सम्राट् (७९-८१) बनला. त्याच्यानंतर त्याचा धाकटा भाऊ डोमिशिअन हा सम्राट् झाला. त्याच्या काळात सेनेटकडून टायटसला ज्यू लोकांवरील विजयाबद्दल Triumphus ह्या समारंभाचा मान बहाल करण्यात आला आणि त्याच्या नावाने Arch of Titus ही कमान रोमन फोरममध्ये उभारण्यात आली. तेथे कलोसिअमच्या जवळच ती अजूनहि उभी आहे. तिच्या आतील दोन समोरासमोरील बाजूंवर टायटसची विजययात्रा दाखविली आहे, जिच्यामध्ये जेरुसलेममधील देऊळ उद्ध्वस्त करून टायटसच्या मागून विजयी सैनिक तेथील मेनोरा (७ शाखांचा दिवा, ज्यू परंपरेचे प्रतीक) आणि अन्य संपत्ति घेऊन येतांना दिसतात. विजयाचे निदर्शक म्हणून विजयकमानी उभारण्याची प्रथा येथूनच सुरू झाली आणि दिल्लीतील ’इंडिया गेट’ ही कमान त्याच परंपरेतील आहे.

खालील चित्रांमध्ये बहुसंख्य चित्रांना वेगळ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. कलोसिअमच्या आतील भागाचे चित्र पुढे आहे. 'ग्लॅडिएटर', स्पार्टाकस' अशा सिनेमांवरून आपल्याला तेथ चालणारे खेळ कसे होत ह्याची कल्पना आहेच. चित्रामध्ये सम्राट, अन्य बडे लोक आणि सर्वसामान्य ह्यांच्या बसण्याचा जागा दिसत आहेत. खेळ जेथे होत ती सपाट जागा आता नाही आणि त्याच्याखालील खेळासाठी आणलेले प्राणी ठेवण्याच्या जागा वगैरे दिसत आहेत. कारंज्याचे भांडे 'पोर्फीरी' ह्या दुर्मिळ दगडातून बनविलेले असून लाओक्वूनसारखेच ते आता वॅटिकन म्यूझिअममध्ये आहे आणि तेहि नीरोच्या प्रासादातूनच आलेले आहे. त्याच्या खालील मोझेइक जमीनहि तेथीलच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती व चित्रे ही उत्तम. रोमन साम्राज्याची माहिती असा एक स्वतंत्र लेख आपण टाकलात तर वाचायला नक्की आवडेल.

हा लेख लिहण्यापूर्वी केलेल्या रिसर्चमध्ये टायट्स हा सुरुवातीला नीरोचा सेनाधिकारी होता अशी माहिती मिळाली होती. (तो पुढे सम्राट झाला.) याबद्द्ल पुन्हा सोर्सकडे जावून खात्री केली जाईल. ल़़क्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोमन साम्राज्याचा इतिहास ही फारच मोठी गोष्ट आहे आणि मी काही तसा त्यातील तज्ज्ञ नाही. पण रोमच्या ठळकठळक अवशेषांवर आणि वॅटिकनवर काहीतरी लिहू शकेन.

माझे येथील सिस्टीन चॅपेलवरचा, ऑस्टिया अँटिकावरचा आणि पाँपेवरचा असे लेख पाहिले आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0