Skip to main content

कसा बरे विसरु?

म्हणतात विसरून जा सर्व

विसरु शकाल तुम्ही?
आपल्या भावांची कत्तल
वहिनींनी फोडलेला हंबरडा
आया बहिणींवरील बलात्कार
लेकी सूनांचे अपहरण

विसरु शकाल तुम्ही?
शेजारी उडालेले मुंडके
तोडलेले हातपाय
लुटलेली दुकाने
जाळलेली घरे

विसरु शकाल तुम्ही?
मीत्रांनी केलेली गद्दारी
गुंडांचे संरक्षक पोलीस
त्यांना आज्ञा देणारे नेते
शस्त्र पुरवणारे पुढारी

विसरु शकाल तुम्ही?
पोलीस कस्टडीतील मारहाण
तुटलेली मनगटे फुटलेले गुढगे
कागदांवर जबरदस्तीने घेतलेल्या
सह्या नि अंगठयाचे ठसे

विसरु शकाल तुम्ही?
निर्वासित छावणीतील उपाशी दिवस
तुंबलेले मुतारी संडास
घोंगावणार्‍या माश्या डास
न सरणार्‍या त्या रात्री

काय म्हणता?
भाषा फार भडक झाली
माझ्या पत्नीचे पोट फाडून
त्यांनी बाळ बाहेर काढले
त्याचेही तुकडे तुकडे केले
त्यांच्या रक्ताचा रंग
माझ्या शब्दांपेक्षा
नक्कीच भडक होता

विसरु कसा मी?
तो लाल भडक रंग
कान फोडणार्‍या कींकाळ्या
जळण्याचा कुजण्याचा वास
भरून राहिलाय डोक्यात
झोपही पडू देत नाही
विसरता विसरत नाही

म्हणतात विसरून जा सर्व
सांगा विसरु कसा मी?