रॉकस्टार : फिर से उड चला
"फुकट तिकिटाच्या मोहाने माणूस काय काय करेल सांगता येत नाही रे. 'आ अब लौट चले' किंवा 'कोयला' जर मी २-२ वेळा थेट्रात बघू शकतो तर रॉकस्टार का नाही?", एरवीदेखील तिडीक आणणार्या लक्ष्मीकांत बेर्डे सुरात जेव्हा माझा मित्र मला हे सांगायला लागला, तेव्हा मला त्याच्या इंटरनेट कनेक्शनचा गळा घोटावासा वाटला. साली एवढीशी तर असते इथरनेट केबल. दोन मिनिटात खेळ खलास.
पण ती उर्मी आवरल्यावर मी त्याच्याच हातचं वडासांबार खाता खाता दोन मिनिटं आत्मचिंतन केलं. मला तरी पहिल्यांदा कुठे आवडलेला रॉकस्टार?
गाडीत सदैव ती रॉकस्टारी गाणी वाजवणार्या मित्राला मी "गाडी किंवा गाणी" असा अल्टिमेटम दिलाच होता ना?
रेहेमानच्या गाण्याला देव मानणार्या मित्रांबद्दल एके काळी वाटणारा छुपा राग विसरलास? आणि आता सहज म्हणून बघितलं तर माझ्या प्ले लिस्टमधली जवळपास ५०% गाणी रेहेमानचीच निघतात.
शांत हो. उत्तम वडा सांबार खायला घालणार्या मित्राबद्दल असे विचार मनात आणणं म्हणजे पाप.
---------------------------
रॉकस्टार हा एक खास सिनेमा आहे. त्याची जातकुळी उमजायला आणि भिडायला थोडा वेळ लागला मला. पहिल्यांदा भेटला तेव्हा वाटलं- काय पण! उगाच काही सांगून रहिलाय. मग पुन्हा एकदा शांतपणे पाहिला आणि थोडा पटला.
पण हे काही रॉकस्टारबद्दल नाहीचे. रॉकस्टारच्या नायकाबद्दल आहे. तेव्हा -
जेजे ( जनार्दन जाखड) हा एक उनाड कॉलेजकुमार, उडतउडत गायक. त्याला रॉकस्टार बनायचं तर आहे- पण त्यासाठी काही विषेश करत नाहीये तो.
कर्मधर्मसंयोगाने जनार्दन एका मुलीला भेटतो- तिच्याबरोबर नकली प्रेम करतो आणि हळूहळू तिचा असली दोस्त बनून जातो. आता तिचं लग्न ठरलंय आणि जनार्दन सच्च्या दोस्तीखातर इथे काश्मिरात येऊन पोचलाय. एका क्षणी त्याला उमगतंय की ही दोस्तीच आहे की अजून काही?
पण हे काही त्या दोस्ती किंवा प्रेमाबद्दलही नाही. रॉकस्टारच्या नायकाबद्दल आहे. तेव्हा -
गाणं सुरू होतंय ते काश्मिरी सुरावटीवर. जेजे शरीराने कश्मीरातून परत घरी, आणि मनाने आपल्या एकंदर आजवर आयुष्याच्या प्रवासात. गाण्याचे शब्द आणि त्याचं चित्रण ह्याचा असा अनोखा मेळ क्वचितच बघायला मिळतोय. एकदा ऐका आणि मग पुढे चला!
गाण्याला काही बंदिस्त सुरावट नाहिये. ते वार्यावर उडणार्या पानांप्रमाणे मस्त तरंगत रहातं. जेजेचं आजवरचं आयुष्यही तसंच आहे. त्याला काहीच धरबंद नाही. कधी गिटार वाजवत कुटाळक्या करत तर कधी लेक्चर बंक करून मित्रांबरोबर कँटीनमधे रॉकस्टारत्वाची मनोराज्यं रमवत जेजे आपला टिवल्याबावल्या करतोय. मग त्याचं गाणं तरी का म्हणून एका तालात आणि सुरावटीत बद्ध असावं?
फिर से उड़ चला
उड़ के छोड़ा है जहां नीचे
मैं तुम्हारे अब हूँ हवाले
दूर-दूर लोग-बाग़ मीलों दूर ये वादियाँ
कर धुंआ धुंआ तन हर बदली चली आती है छूने
और कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये है भी ना हो
किसी मंज़र पर मैं रुका नहीं
कभी खुद से भी मैं मिला नहीं
ये गिला तो है मैं खफ़ा नहीं
काश्मिरातून घरी परत चाललेला जेजे. बसमधून दिसणार्या जगाचं वर्णन वाटलं तरी ते फक्त वरवरचं. आपला जेजे तसा सगळ्यापासून अलिप्त. कुठलंच काही त्याला कधी आपलं करू शकलं नाही. "कभी खुद से भी मैं मिला नहीं" असा जेजे मग परत चाललाय. रॉकस्टार बनायला.
शहर एक से, गाँव एक से
लोग एक से, नाम एक
फिर से उड़ चला.. मैं..
/* इथे छोट्या छोट्या तुकड्यांतून जेजेची वाढती लोकप्रियता दाखवलीये, ते आवडलं आपल्याला! त्यातला सीडी रॅकवरच्या खपणार्या सीडीजचा शॉट तर खासच.
अवांतरात अवांतर : ह्यावरून ह्रषिकेश मुखर्जींच्या अभिमानमधलं "मीत ना मिला रे मन का" मधला हा भाग आठवला. अमिताभची वाढती लोकप्रियता कसली छान दाखवलिये! टप्प्याट्प्प्यांत. बेडरूममधून मग दिवाणखान्यात, मोठ्यांपासून लहानांपर्यंत आणि शेवटी मग तो हातात रेडिओ घेउन चाललेला कुणीतरी ऐकतोय "लाख तराने.. रहा मै सुनाए"! टू मच आहे ना? */
तर पुन्हा जेजेकडे येऊ. आपला जेजे आता गायक बनलाय. प्रसिद्ध झालाय. सुरूवातीपासून त्याला हेच हवं होतं. हा खूश असला पाहिजे. पण साला कुठेतरी झोल आहे. त्याच्या ह्या यशाच्या प्रवासात हीर डोकावत रहाते. तिच्या आठवणी जेजेच्या आधीच गोंधळलेल्या मनात अजून शंका कालवून जातात. काय हवंय नक्की त्याला? कसली कमी आहे? प्रचंड भावनिकता हा प्रकार समजायला कठीण असला तरी जेजे तसाच आहे. त्याला लॉजिकल विचार वगैरे गोष्टी झेपतच नाहीत.
मिट्टी जैसे सपने ये कित्ता भी
पलकों से झाड़ो फिर आ जाते हैं
इत्ते सारे सपने क्या कहूँ
किस तरह से मैंने तोड़े हैं छोड़े हैं क्यूँ
फिर साथ चले, मुझे ले के उड़े, ये क्यूँ
कभी डाल-डाल, कभी पात-पात
मेरे साथ-साथ, फिरे दर-दर ये
कभी सहरा, कभी सावन
बनूँ रावण(?) क्यूँ मर-मर के
कभी डाल-डाल, कभी पात-पात
कभी दिन है रात, कभी दिन-दिन है
क्या सच है, क्या माया है दाता ....
काय चाललंय आजूबाजूला? जेजेच्या मनात नक्की काय चाललंय ते सांगायला या ओ़ळींहून उच्च काही नाहीत. कॅमेरा, संवाद ते पकडू शकत नाहीत, पण प्रयत्न करतात.
गोंधळलेला तरीही काहीतरी पाहिजे असलेला जेजे,
हीरच्या आठवणींत आपला हरवलेला शहाणपणा शोधणारा जेजे,
च्यायला आपल्याला नक्की काय हवंय हे ठाऊकच नसलेला जेजे.
तर गाणं पुढे चालूच रहातं-
इधर-उधर तितर-बितर
क्या है पता हवा लिए जाए तेरी ओर
खींचे तेरी यादें तेरी ओर-
अशक्य अशा प्रवाहात आपण खेचून ओढले जातोय हे जेजेला उमगलंय. हीरपासून दूर रहाणं अशक्य आहे- फिल्मीवालं " नेपोलिअन अशक्य" नाही तर खरोखरचं अशक्य आहे हे त्याला माहिती आहे.
पण प्रसिद्धीचं वलय भेदून हीरला प्राप्त करणं अशक्य आहे हेसुद्धा हळूह़ळू जेजेला कळून चुकलंय. प्रसिद्धी आणि संगीत ह्यापासून सुटका नाही. जेजेचं नवं रूप आता जॉर्डन आहे.
जेजेचं बेताल, यादृच्छीक आयुष्य त्याच्या स्वप्नाच्या चौकटीत बंदीस्त होताना गाण्याला हळूहळू एक लय सापडते. गाण्याचा ताल आता लयीवर मात करून राहिलाय.
जेजे एका डिस्कोत, पार्टीत सापडलाय. आपल्या रॉकस्टारच्या प्रतिमेला जागण्यासाठी चेहेर्यावर अल्कोहोलचा शिडकावा करून जेजे आता चाहत्यांच्या गदारोळाला सामोरा जायला सज्ज झाला आहे-
"रंग बिरंगे वहमों में मैं उडता फिरू"
आपला जेजे आता जॉर्डनला शरण गेलाय.
समीक्षेचा विषय निवडा
मला आवडला होता 'रॉकस्टार'.
मला आवडला होता 'रॉकस्टार'. त्यातली नटी म्हणून नर्गिसला उगाच पैसे दिले आहेत, त्याहून एखादी दुकानाबाहेरची पुतळी वापरली असती तरी चाललं असतं, हे खरं आहे. स्क्रिप्ट थोडं ढिलं आहे, हेही मान्य आहे. पण तरीही सिनेमा आवडला होता. मुख्य म्हणजे गाणी आणि रणबीरचा अभिनय. कसले सच्चे डोळे आहेत त्याचे त्या सिनेमात! त्याचं गाण्याकडे खेचलं जाणं, त्याच्या आत खोटेपणाबद्दलचा राग साचत जाणं, तो गाण्यातूनच बाहेर पडणं, समाजनियमांबद्दल त्याचं नाईलाजाने-हताशपणे बेफिकीर असणं, त्याचा कलंदर वल्लीपणा... सगळंच आवडलं होतं.
शिवाय गाण्यांचे शब्द. एकूणएक गाण्यांचे. अगदी रणबीरला सो-कॉल्ड संधी देताना तो जे गाणं गातो, त्याचेही. गाण्यानुसार पिक्चरायझेशनमधे बदलत गेलेले मूड्स. त्यातली उत्कटता. परिणामकारकपणामुळे अंगावर येणारी आणि कलात्मकरीत्या न येणारी. बोनस म्हणून शम्मी कपूर, पियूष मिश्रा आणि तो कॅण्टीन मॅनेजर नट (काय त्याचं नाव?).
आणि हे सगळं व्यापून उरलेला रहमान.
+१
ते गाणं म्हणजे आणखी एक भारी आहे!
आता परत एकदा ऐकून घेतो.
खरं तर जॉर्डन ह्या प्रचंड भावनिक माणसाचा ह्या गाण्याशी मेळ नीट बसत नाही. त्यात जो काही अॅक्टिव्हिजम पेरलाय, किंवा बंडखोरपणा प्रतीत आहे- तो नक्की जॉर्डनमधे आहे का? मला तरी वाटत नाही.
जॉर्डनचा केवळ एक "रॉकस्टार" म्हणून प्रवास मला नीट झेपला नाही. चित्रपट इथे गंडला आहे की काय असं वाटत रहातं.
पण इरशाद कामिल ह्यांनी कमाल लिहिलंय.
ओ इको फ्रेंडली
नेचर के रक्षक
मै भी हूं नेचर!
क्यू सच का सबक सिखाए
जब सच सुन भी ना पाए
सच कोई बोले तो तू
नियम का नूर बताए
.....
तू ही रख्ख- रख्ख साला
(No subject)
खरं तर जॉर्डन ह्या प्रचंड भावनिक माणसाचा ह्या गाण्याशी मेळ नीट बसत नाही. त्यात जो काही अॅक्टिव्हिजम पेरलाय, किंवा बंडखोरपणा प्रतीत आहे- तो नक्की जॉर्डनमधे आहे का? मला तरी वाटत नाही.
जॉर्डनचा केवळ एक "रॉकस्टार" म्हणून प्रवास मला नीट झेपला नाही. चित्रपट इथे गंडला आहे की काय असं वाटत रहातं.
कडकडुन टाळ्या.
मन बोले के रस में जीने का हर्जाना
दुनिया दुश्मन
सब बेगाना इन्हें आग लगाना
मन बोले मन बोले
मन से जीना या मर जाना...........
रॉक म्युजीक मी(जगाने) नेहमीच बंडखोरीचे प्रतीक मानलय... ते ओव्हर इंटेन्सही आहे. हळुवार नाही. त्यात वेदना आहे पण मगरूरीही आहे.. मलाही रॉकस्टार म्हणूनच झेपला नाही. स्पश्ट श्ब्दात सांगायचे तर पकलो होतो कथा बघुन.
हे काय, एवढंच? बाकी पिक्चर
हे काय, एवढंच? बाकी पिक्चर कहाँ है मेरे दोस्त?