Skip to main content

सर आणि मी

परवा crossword मध्ये फेरफटका मारला , तशीही चांगली मराठी पुस्तके मिळण्याची शक्यता तिथे कमीच असते पण घरापासून जवळ म्हणून बरेचदा जाणं होतं . सहजच ह्या कपाटातून त्या कपाटाकडे जाताना "सर आणि मी " हे पुस्तक दिसले. खुप दिवसापूर्वी त्याची लोकसत्तेत (चु. भू . माफ असावी ) समीक्षा वाचलेली . तेंव्हापासून ते वाचायचं आहे हे मनात होतं . पन्नास वर्षाचे सर आणि त्यांची २५ वर्षाची विद्यार्थिनी लग्न करतात आणि ते संसार करतात हे नक्कीच विचार करायला लावणारे काहीतरी असावे असे वाटले म्हणून ...

सर म्हणजे संभाजी कदम , जे जे स्कुल ऑफ आर्टचे डीन आणि त्यांची विद्यार्थिनी जोत्स्ना कदम ह्यांच्या प्रेमापासून ते लग्न-संसाराची ही कथा . अशा वयाने विजोड जोडप्याच्या लग्नाची कहाणी. कोणी जबरदस्तीने लावून दिलेले नाही हे लग्न तर त्यांच्या दोघांच्या कलेच्या सेवेतले ते परमोच्च क्षण ,तो प्रवास हया पुस्तकात आहे . संभाजी कदम काही लेखिकेच्या प्रेमात तिला शिकवत असताना पडलेले नाहीत तर त्यांनी डीन पदाचा राजीनामा दिल्यावर त्यांची खरी ओळख होते .ह्या ओळखीचे नंतर पुस्तकांची देवाण घेवाण ,शिकवणं शिकणं ,वाचणं ,गाणं ह्या अनुषंगाने झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होते . दोघांच्या वयातील फरक २५ वर्षाचा . कायमस्वरूपी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर हे प्रेम होते . पैसे , वय , दिसणं ,शारीरिक आकर्षण ,जात ह्यात कशातच काहीही मिळते जुळते नसताना केलेलं हे लग्न. ते ही लेखिकेच्या पुढाकाराने ह्या नात्याला सुरवात झाली होती . घरचा पूर्ण विरोध असूनही त्या दोघांनी हे लग्न लेखिकेच्या घरच्याची संमती मिळवून केले. अर्थात घरच्यांची लग्नाला मूक संमती होती ती ही नाविलाजाने दिलेली .

मग काय असेल हे नातं टिकण्यासाठी कारणीभूत ? तर दोघांचीही कलेची आवड हेच एक साम्य त्या दोघांना आयुष्य पुढे नेण्यासाठी उपयोगी पडले. सरांच्यावरचे प्रेम अतिशय प्रामाणिक आहे . महत्चाचा मुद्दा ह्यात अधोरेखित झालाय तो म्हणजे कोणतेही शिक्षण तुम्ही घेतले तर त्यातील सर्व काही तुम्हाला येतेच असे नाही तर अखंड आयुष्य त्याचा पाठपुरावा करावा लागतो . लेखिकेने तो पाठपुरावा आपल्या सरांना गुरु मानून त्यांच्याकडून शिकत माकत केला आहे . प्रसंगी सरांचा मारही खाल्ला आहे पण सरांना सोडण्याचा विचार एकदाही त्यांच्या मनात डोकावलेला नाही . एकही दागिण्याची हौस मौज झाली नाही म्हणून हट्ट नाही का त्रागा . त्यांना एक मुलंही होते . त्या मुलाच्या बालसुलभ हट्टाची पुर्तता आणि सरांचे काटेकोर नियम हयावर मात्र त्यांची कसरत होते. पण सरांच्या वैचारिक प्रभग्ल तेकडे बघून आपण त्यांच्याशी लग्न केले आहे मग आचरणात आणताना त्रास का होऊ द्यायचा? हाच लेखिका विचार करून पुढचे आयुष्य मजेने घालवते .

बरीच कला क्षेत्रातली नावे ,कॅनवास , रंग आणि बरेच काही कलाविषयक ह्या पुस्तकात वाचायला मिळते. कलाकाराचा प्रवास कसा असतो . आपल्या कलअविष्काराशी तो किती एकरूप होतो . मॉडेल्स , रेषा , रंग , आकार आणि त्याचा मिळून बनलेला कलाविष्कार, कलाकारांचे भोग , इच्छा त्यांच्या सुखाची परमावधी असे बरेच काही वाचकाला खिळवून ठेवते.मध्ये मध्ये लावलेली त्यांची प्रोट्रेट, चित्रं छान आहेत. मध्ये मध्ये लावलेली त्यांची प्रोट्रेट, चित्रं छान आहेत . ती चित्रे साकारतानाचा प्रवास खूप छान आहे , त्यामागचा विचार , चित्रांचे प्रदर्शन ,ती कशी वाचायची वैगेरे... एक वेगळा अनुभव वाटतो.
पुढे काय होते .त्यांचे लग्न यशस्वी होते का नाही ? शेवट काय हे सर्व कळण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवेच .
सर अणि मी
लेखिका: ज्योत्स्ना संभाजी कदम
राजहंस प्रकाशन

समीक्षेचा विषय निवडा

मारवा Sun, 26/06/2016 - 18:37

ज्योत्स्ना कदम यांचं संभाजी कदम यांनी एका उत्कट व्यक्तीगत क्षणी काढलेलं न्युड पेंटींगही पुस्तकात त्या आठवणी सोबत दिलेलं आहे. मराठी चरीत्रात इतक बोल्ड उदाहरण सहसा आढळत नाही.
Tete-a-Tete: Simone de Beauvoir and Jean-Paul Sartre या Hazel Rowley च्या चरीत्रात जस Simone de Beauvoir च नग्न छायाचित्र दिलेल आहे तस आपल्याकडे आढळत नाही. म्हणजे इतक्या सहजतेने देता येत नाही.
यांचे चिरंजीव शार्दुल कदमही एक चांगले चित्रकार आहेत. यांच्यावर श्री रामदास यांनी मिसळपाववर एक सुंदर लेख लिहीलेला आहे तो इथे.
http://www.misalpav.com/node/2737

जेडी Sun, 26/06/2016 - 18:51

त्या न्यूड पेंटिंग बद्दल मी मित्राला बोलले होते पण त्याने एकदम "असे बायकोचे न्यूड पेंटिंग काढणे चांगले आहे का ?" असा शेरा दिला . पण एक कलाकाराने आपली कला सादर करताना त्याकडे एक मॉडेल म्हणून पाहिलेलं आहे आणि त्यापेक्षा जास्ती तिथे काहीच महत्वाचे नाही ही माझी प्रतिक्रिया ऐकून मी पुस्तक वाचेन असे उत्तर मिळाले . मी न्यूड पेंटिंगचा उल्लेख मुद्दाम टाळलेला आहे ,एकतर इथली पाहिलीच पोस्ट आणि त्यात उगाच काहीतरी अजब शेरे यायला नकोत म्हणून

मारवा Sun, 26/06/2016 - 19:45

In reply to by जेडी

आपण इथला पॉर्न विशेषांक वाचला नसेल कदाचित शेजारी बघा एक लालभडक चित्र दिसतयं ते पॉर्न विशेषांकाच आहे. एकदा चाळुन बघा.

दुसर नविनच दिसताय म्हणुन केवळ माहीती देतोय इथे शेजारी काटे चमच्याच्या खाली एक पुस्तक वाचणारी आकृती दिसतेय तिथे सध्या काय वाचताय हा धागा असतो प्रतिसादांची शंभरी भरल्यावर नवा भाग काढण्यात येतो. तिथे आपण हा लेख पुस्तकांवरील एक प्रतिसाद म्हणून टाकावा अशी संस्थळ संपादकांची अपेक्षा असते. म्हणजे ती स्वतंत्र सोय इथे केलेली आहे.

बघा हळुहळु माहीती होइल तुम्हाला एक एक.