द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर
काही दिवसांपूर्वीच संजय बारू यांचं "द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर" हे बहुचर्चित पुस्तक (मराठीतून) वाचलं.
बारूंनी अनेक गोष्टी हातच्या राखून जमेल तितकंच लिहिलं आहे. सोनिया गांधीचं तत्कालीन यूपीए सरकारवर कसं बाह्य नियंत्रण होतं अशा आधीच बाहेर चर्चिल्या जाणार्या गोष्टी वगळता फारसं स्फोटक असं त्यात काही नाही. उलट ममो सिंहाबद्दल बरंच सॉफ्टच आहे. रोचक गोष्टी मात्र अनेक आहेत. लेखक २००८पर्यंतच पंप्र कार्यालयात होते.त्यामुळे यूपीए-०२ मध्ये घडलेल्या अनेक सुरस व मनोरंजक कथा यात कव्हर झालेल्या नाहीत.
कॉन्ग्रेसची कार्यसंस्कृती व विशेषत: सोनियांचा स्वभाव व प्रभाव,त्या प्रत्यक्ष पात्र म्हणून फारशा येत नसल्या तरी, ठिकठिकाणी दिसतो. उदा. आपल्याच पक्षाच्या नरसिंहरावांची त्यांच्या मृत्यूनंतरही केलेली हेटाळणी, उपेक्षा; माजी पंप्र चंद्र्शेखर यांच्या स्मारकाबाबत कुटुंबियांना दिलेली वागणूक अशा गोष्टी वाचल्यावर चीड येते. स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांबाबत इतकी आदरभावना असल्यावर तिर्हाईत मोदींना 'मौत का सौदागर' म्हणणे काही विशेष नाही. बाकी वशिलेबाजी, नटवर सिंह,करण सिंह, प्रणव मुखर्जी(आता मा.राष्ट्रपती) यासारख्या जुन्या खोडांचा प्रभाव, आपल्या पृथ्वीराज चव्हाणांच्या कामगिरीबाबत रोचक तपशील अशा इतर गोष्टीही आहेतच. अणुकरार व डाव्यांचं राजकारण हाही एक वेगळा अध्याय आहे.
घाईघाईत पुस्तक छापल्यामुळे शुद्धलेखनाच्या,प्रूफरीडींगच्या अनेक चुका आहेत. भाषाही 'अनुवादित मराठी' आहे. पण ठीक आहे.
डॉ.मनमोहन सिंह हे किती मुरब्बी राजकारणी व सोनियानिष्ठ आहेत हे कळायला हे पुस्तक वाचायला हवे.
हे पुस्तक काहीस अंडररेटेड राहिलंय असं मला वाटतं की, हा माझा गैरसमज आहे?
अवांतर १: नीरा राडिया टेप्स कुणी संपूर्ण वाचल्या /ऐकल्या आहेत का? मी काही वाचल्या, फारच इंट्रेश्टिंग वाटल्या.
अवांतर २: परवाचं ममो सिंहांचं चलनाच्या निर्माल्यीकरणावरील राज्यसभेतील भाषण आपला नरसिंहराव होऊ नये याच प्रयत्नातलं एक वाटलं.असो.