Skip to main content

अरबी कहाण्या

मी जुन्या पुस्तकांचा चाहता आहे. जसे जमेल तसे मी ती गोळा करत असतो. गौरी देशपांडे यांनी अरेबियन नाईट्सचे केलेल्या मराठी भाषांतराचे १६ खंड आहेत त्याबद्दल ऐकले, वाचले होते. काही वर्षांपूर्वी मी ते बरेच दिवस शोधत होतो. आणि एकदाचे मिळाले. महाभारत, जातक इत्यादी प्रमाणे मौखिक परंपरेतून आलेल्या वास्तव आणि अद्भूतरम्य यांचे मिश्रण असलेल्या गोष्टी आहेत, ज्या कित्येक शतके सांगितल्या जात होत्या आणि लोक-परंपरेचा भाग होता(आठव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत) असे अभ्यासक सांगतात. त्याची बरीच म्हणजे बरीच भाषांतरे आहेत. पण रिचर्ड बर्टनने केलेले भाषांतर हे मुळाबरहुकुम आहे असे म्हणतात. रिचर्ड बर्टनने केलेल्या भाषांतरात बऱ्याच ऐतिहासिक, समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीयदृष्ट्या तळटीपा आहेत. तेच गौरी देशपांडे यांनी मराठीत आणायला वापरले आहे. त्यांच्या आधी कृष्णशास्त्री चिपळूणकर(आणि इतर प्रभृती) यांनी एका वेगळ्या भाषांतरावरून ह्या गोष्टी मराठी प्रथम आणल्या होत्या. ह्यातील बऱ्याच कहाण्या आणि इतरही अद्भूतरम्य अरबी कहाण्या जसे अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, अलीबाबा आणि चाळीस चोर, सिंदबादच्या सफरी, अलीफ लैला वगैरे आपल्या अनेकांच्या भावविश्वाचा भाग आहेत.

परवा वाचनलयात जी ए कुलकर्णी यांचे ‘एक अरबी कहाणी’ हे पुस्तक मिळाले. जी ए कुलकर्णी यांची अनुवादित पुस्तकेही बरीच प्रसिद्ध आहेत. जी ए कुलकर्णी यांची पुस्तके म्हणजे माझा अजून एक weak-point, त्यातल्या त्यात त्यांच्या पत्रांचा संग्रह. त्यांची काही अनुवादित पुस्तके मी पूर्वी वाचली आहेत. एक अरबी कहाणी हे पुस्तक The Shaving of Shagpat या जॉर्ज मेरेडिथ यांनी लिहिलेल्या जुन्या कादंबरीचा अनुवाद आहे. जी ए यांनी हे पुस्तक अनुवादित केले यात आश्चर्य काही नाही. कारण कल्पनारम्य, अद्भुतरम्य कादंबरी आहे. त्यांना अद्भुताचे म्हणजेच fantasy चे आकर्षण प्रचंड होते. हा मुक्त अनुवाद आहे. मला या पुस्तकाचे आकर्षण वाटायचे दुसरे कारण म्हणजे मलपृष्ठावर लिहिलेले वाक्य जे असे आहे-‘अरेबियन नाईट्सच्या धर्तीची अथपासून इतीपर्यंत वाचनाची उत्कंठा वाढवीत नेणारी अद्भुतरम्य कादंबरी’. हा अनुवाद अनंत अंतरकर(आणि आता आनंद अंतरकर धुरा सांभाळत आहेत) यांनी स्थापन केलेल्या विश्वमोहिनी प्रकाशन तर्फे १९८३ मध्ये प्रकाशित झाले आहे. म्हणजेच जी ए कुलकर्णी यांच्या मृत्यूच्या ४ वर्षे आधी.

प्राचीन पर्शिया देशाची पार्श्वभूमी असलेल्या, ह्या कादंबरीत अरेबियन नाईट्स प्रमाणे विविध गोष्टी आहेत. जॉर्ज मेरेडिथ कवी होता त्यामुळे अधूनमधून काव्यपंक्ती देखील येतात, त्या देखील जी ए यांनी अनुवादित केल्या आहेत. (तश्याच अरेबियन नाईट्स मध्येही काव्यपंक्ती आहेत, ज्या रिचर्ड बर्टन, आणि गौरी देशपांडे यांनी अनुवादित केल्या आहेत). तर ही कादंबरी कशाबद्दल आहे हे सुरुवातीलाच लेखकाने सांगितले आहे. शागपाट नावाचा पर्शियन राजाच्या हजामतीची ही कहाणी आहे. का ही हजामत करायची आहे? त्यात काय विशेष? का तर म्हणे तो पर्शियन राजा त्याच्या जादुई अश्या लांब सडक अश्या वज्रकेसाने शिराझ शहराला जखडून ठेवलेले असते. त्यापासून सुटका करण्यासाठी ही हजामत आवश्यक आहे. ती करतो दरबारातील मुख्य न्हावी(!) शिबली. आणि इतर कादंबरी म्हणजे हे ध्येय साध्य करताना काय अद्भूत गोष्टी घडतात, त्याची सर्व ही कहाणी आहे. खरेच ही अद्भूत अरबी कहाणी आहे. पण त्यामुळेच जी. ए. कुलकर्णी यांनी याला ‘एक अरबी कहाणी’ असे शीर्षक दिले असावे का की काय? ‘शागपाटची हजामत’ असे का नाही दिले?

ह्या कादंबरीच्या अनुवादाच्या निमित्ताने जी ए यांचा आनंद अंतरकर यांच्याशी पत्रसंवाद झाला होता. तो आणि इतर पत्रसंवाद अंतरकर यांनी आपल्या ‘एक धारवाडी कहाणी’ या संग्रहात त्यांनी मांडला आहे. तो देखील ह्या कादंबरीप्रमाणे मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यात जी ए यांनी त्यांच्या पत्रातून तसेच अंतरकर यांनी देखील अरेबियन नाईट्स संबंधी देखील आपापली मते मांडली आहेत. त्यांनी म्हणे हा अनुवाद आपल्या बहिणीसाठी करून ठेवला होता. तसेच जी ए कुलकर्णी अनुवादाविषयी, अनुवाद-प्रक्रियेविषयी, त्या कादंबरी काही अद्भूत घटना आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल ही विवेचन आहे. तसेच भाषांतर प्रक्रियेविषयी देखील त्याची मते त्यांनी मांडली आहेत(उदा. हा अनुवाद मुक्त अनुवाद आहे, स्वैर अनुवाद नव्हे, इत्यादी). ही दोन्ही पुस्तके आपल्याला समृद्ध करतात. अरेबियन नाईट्स, आणि गौरी देशपांडे यांचे भाषांतर याच्याबद्दल तर विचारायलाच नकोय(अर्थात त्याचे १६ खंड आहेत, कधी वाचून होणार, हा ही एक प्रश्नच आहे!)

खरेतर आजकाल अद्भूतरम्य कादंबऱ्या(आणि चित्रपट) यांचा सध्या जमाना आहे. Harry Potter च्या कादंबऱ्या, चित्रपट, तसेच आपला पूर्णतः भारतीय चित्रपट बाहुबली, प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. The Shaving of Shagpat वर पुढे मागे एखादा इंग्रजी(अथवा भारतीय) चित्रपट आला तर आश्चर्य वाटायला नकोय!

समीक्षेचा विषय निवडा

चिमणराव Sun, 18/06/2017 - 20:19

रिचाड बर्टनचे १००१ लिहिलेले अरेबिअन नाइट्स मिळालेले त्यात ६४० गोष्टी होत्या. त्यातल्या टिपाच फार उपयुक्त आहेत॥ नंतर कळले की १००१ गोष्टींचे पुस्तक नव्हतेच बर्टनचे. खरे खोटे माहित नाही. गौरीचे आताच कळले.
त्याकाळी काळी जादू करणारे लोक असावेत. बंगालमध्ये आहेत म्हणतात

सामो Mon, 19/06/2017 - 00:00

In reply to by चिमणराव

बंगालमध्ये आहेत म्हणतात

असावे. ब‌ंगाल‌ला तारापीठ, कालीपीठ व‌गैरे तांत्रिक‌ उपास‌नांचे प्र‌स्थ‌ फार आहे.

बॅटमॅन Mon, 19/06/2017 - 18:21

In reply to by चिमणराव

१००१ रात्री म्ह‌ण‌जे १००१ स्टोर्या, अर्थात १ रात्र‌ = १ स्टोरी हे स‌मीक‌र‌ण अरेबिय‌न नाईट्स‌म‌ध्ये चाल‌त नाही हे म‌लाही गौरी देश‌पांड्यांचं पुस्त‌क वाच‌ल्याव‌र‌च क‌ळालं. इन‌फॅक्ट तिथे एक स्टोरी ही रात्र‌ क्र‌. ४५ ते रात्र‌ क्र‌. १८५ प‌र्यंत चाल‌ते, ही स‌र्वांत मोठी स्टोरी आहे. (त्यात‌ले राज‌कुमारी अब्रीझाचे व‌र्ण‌न म‌चाक‌च्या तोंडात मारेल इत‌के ज‌ब‌ऱ्या आहे. इत‌क्या सुंद‌र राज‌क‌न्येचा अंत मात्र उगीच दु:ख‌द‌ केलाय‌. असो.)

ब‌हुतेक ह‌स्त‌लिखितांत १००१ रात्रींचाच उल्लेख अस‌ला त‌री आज‌व‌र‌ दोन ह‌स्त‌लिखितांम‌ध्ये १००२ व्या रात्रीची म्ह‌णून अजूनेक स्टोरी आलेली आहे. तातारी आणि मेहेर‌जान या गुलाम‌गुलामिणीची प्रेम‌क‌था. शोकान्त आहे, तातारी नंत‌र म‌र‌तो व‌गैरे इत‌केच आठ‌व‌ते. अ स्लेव्ह लॉफ्स या नावाची आहे. ही क‌था त‌शी मोठी आहे, एक पूर्ण पुस्त‌क‌च त्या क‌थेव‌र आहे त्यात त्याचे व‌र्ण‌न‌ इ. स‌र्व दिलेले आहे. हे ह‌स्त‌लिखित ब‌हुधा ल‌ख‌नौम‌ध्ये साप‌ड‌लं. ल‌ख‌नौ आणि इजिप्त अशा दोन ठिकाणी दोन ह‌स्त‌लिखिते साप‌ड‌ली त्यात‌ ही क‌था आलीय असे वाच‌ल्याचे आठ‌व‌ते. दुर्दैवाने नेट‌व‌र याब‌द्द‌ल काहीच माहिती दिस‌ली नाही म‌ला त‌री. कुणाला ज‌म‌ल्यास काही लिंक इ. साप‌ड‌ल्यास द्या. माझ्याक‌डे घ‌री हार्ड कॉपी आहे, प‌ण बाकी ज‌न्तेच्या सोयीसाठी म्ह‌णून‌...

साप‌ड‌लं, साप‌ड‌लं! थोडं म‌ट्र‌ल साप‌ड‌लं!

http://www.thedailystar.net/news-detail-74679

It was over a festive breakfast session in Roufannesa's house that Maulana Jalal jokingly made a reference to The Thousand and One Nights. As the grand old man Dadu Fariduddin heard this, he at once made a correction and said the title of the book was Thousand and Two Nights, Alif laila wa Lailanai; the literal meaning is two nights, and not Alif Laila wah Laila, meaning one night.

Dadu also said that the reason behind this misconception was on account of seeking information on Oriental subjects from British sources. The people of the subcontinent were their slaves for over one hundred and fifty years, which fact had framed the mentality of the people to accept their point of view without challenge.
Dadu Fariduddin got a copy of the manuscript from his library. It was during the reign of Halaku Khan that Baghdad was destroyed and this document passed through many places and persons and reached Hindustan. It then reached Shah Shuja.As the later was escaping to Arakan, the document was left in Murshidabad, from where it went to Jaunpur and into the hands of Shah Fariduddin.

Everyone began looking at the book. The last tale in The Thousand and One Nights was on Shahjada Habib, as everyone knew. The next story after this was Jahakul Abad, meaning slave's laughter.

ppkya Tue, 20/06/2017 - 06:13

In reply to by बॅटमॅन

बरोबर...१००१ आणि १ रात्र, आणि त्या दरम्यान सांगितलेल्या गोष्टी असे स्वरूप आहे...तेवढ्याच गोष्टी असतील असे नाही..माहिती छान आहे बॅटमॅन...

चिमणराव Mon, 19/06/2017 - 18:43

त्याकाळी बाजारात काय लबाडी चालायची, वेश्या कशा तरुणांना फसवायच्या, त्यांचे कान नाक तोडायच्या वगैरे प्रकार भयानक आहेत. म्हाताय्राही तरुणाना फसवून पाठवण्याचे कमिशन मिळवायच्या फारच रंजक.

पुंबा Tue, 20/06/2017 - 10:41

The Shaving of Shagpat वर पुढे मागे एखादा इंग्रजी(अथवा भारतीय) चित्रपट आला तर आश्चर्य वाटायला नकोय!

असं झालं त‌र किती छान‌ होएएल ख‌रंच्.
बाकी लेख अतिउत्त‌म.
बॅट‌मॅन‌ यांनी दिलेली माहिती ब‌हुमोलाची.

ए ए वाघमारे Tue, 20/06/2017 - 14:24

ओरिजिनल अरेबियन नाईट्स किंवा निदान मराठी अनुवाद तरी वाचायची इच्छा होती. त्यामुळे धागालेखकाचा व बॅटमॅनचा हेवा वाटतो.

एक पुस्तक मला मिळालं होतं पण ते डुप्लिकेट निघालं. असो.

तूर्त या हेव्यातून मिळालेले दुवे-

रिचर्ड बर्टन च्या अरेबियन नाईट्च्या १६खंडांच्या स्कॅन कॉपीज.
http://www.burtoniana.org/books/1885-Arabian%20Nights/

ही सगळी साईटच बर्टनला समर्पित आहे.

त्याच्या परिचय असा करून दिला आहे

Soldier, explorer, linguist, ethnologist, and controversialist.

controversialist ...याला मराठीत काय म्हणावे.

बाकी जीएंचं 'एक अरबी कहाणी' अर्ध वाचून पडलंय. शोधावं लागेल.

The Shaving of Shagpat वर पुढे मागे एखादा इंग्रजी(अथवा भारतीय) चित्रपट आला तर आश्चर्य वाटायला नकोय

भारतात तरी शक्य नाही. बिल्लू बार्बर मधला बार्बर गाळायला लावणारे भावनादुखे लोक आहेत इथे. त्यामुळे 'शागपटची हजामत' वगैरे अशक्यच!

बॅटमॅन Tue, 20/06/2017 - 14:33

In reply to by ए ए वाघमारे

ब‌र्ट‌न‌च्या १६ खंडांचे म‌स्त म‌राठी भाषांत‌र गौरी देश‌पांड्यांनी केलेले आहे, ते पुण्यात ज‌रा शोधाशोध केल्याव‌र मिळेल‌. अप्पा ब‌ळ‌वंत चौकात र‌सिक साहित्य‌ इथे चौक‌शी क‌रून प‌हा, तिथे विलास नाम‌क गृह‌स्थ आहे तो अशा बाब‌तीत ब‌रीच म‌द‌त क‌र‌तो.

पुंबा Tue, 20/06/2017 - 15:14

In reply to by बॅटमॅन

किंम‌त जास्त आहे का? बुक‌गंगाव‌र दिस‌त नाही आहे. विलास यांच्याब‌द्द‌ल स‌ह‌म‌त्. कुठ‌लेही पुस्त‌क मिनिट‌भ‌रात शोधून देतात.

चिमणराव Tue, 20/06/2017 - 14:47

रिचर्ड बर्टन च्या अरेबियन नाईट्च्या पुस्तकाची प्रत मिळते ( अधुनमधून येते तिथे) गुरुकृपा बुकस्टॅाल,ठाणे,पंजाब नॅशनल बँकेसमोर. १००- १५०रु. महिन्याभरात परत केल्यास ८० परत.

चिमणराव Wed, 21/06/2017 - 13:52

In reply to by बॅटमॅन

पाचसहाशे पानांचं ६४०कथावालं,टिपासहीत ( =1001arabian nights)मी आणून परत केलेलं.कधी पांढरीशुभ्र पानं तर कधी पिवळसर पानांचं असतं. १६ खंडवालं नाही पाहिलं.
ठाणे (अथवा इतर कुलाबा, खडकी,आग्रा वगैरे जिथे आर्मफोर्सेस क्वॅार्टर्स असतात तिथे) बुकस्टालवर चांगली पुस्तके येतात असा माझा एक समज आहे.
किरण नगरकर,चर्चिल वगैरेंच्या पुस्तकांच्या प्रती येत नाहीत.

आदूबाळ Wed, 23/10/2019 - 18:04

गौरी देशपांड्यांच्याही आधी 'अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा' मराठीत आणल्या कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी (१८८०च्या आसपास). त्यात तत्कालीन भाषेच्या लकबीप्रमाणे "काय गे लंडी" वगैरे (आता विस्फोटक वाटणारे) डायलाग होते म्हणे! (कृष्णशास्त्री स्वत:ही भयंकर रंगीन माणूस होता.)

पुढे या सगळ्या मसाल्याचं बालगोपाळांना वाचता येईल असं bowdlerised version हरी कृष्ण दामले आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी प्रकाशित केलं.

मूळ खंड आता मिळत नाहीत. कुठे मिळतील कोणाला माहीत असेल तर कळवावे.

चार्वी Wed, 23/10/2019 - 20:58

In reply to by आदूबाळ

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय आणि छ. प्रतापसिंह महाराज नगर वाचनालय सातारा या दोन ठिकाणी कृष्णशास्त्रींच्या संपूर्ण अरेबियन नाईट्सचे सहा सहा खंड असल्याचे इथे दिसत आहे. हेच का ते मूळ खंड?
***
करवीर नगर वाचन मंदिर इथेही दिसत आहेत.
अर्थात नोंद आहे म्हणजे प्रत्यक्षात असतील अशी खात्री नाही. शिवाय granthalaya.org सध्या (अनेक दिवस) गंडली आहे